आजूबाजूचं वातावरण –
हिरोचं झिरो होणं
झिरोचं हिरो होणं
सर्वशक्तिमान माणसाचं केविलवाणं बनणं
सर्वसामान्य लोकांचं गहिवरणं
एका विचित्र हतबलतेचं येणं
हळूहळू
दररोज
एका काळजात एकेक खिळा ठोकला जाणं
एका साम्राज्याचं उध्वस्त होणं
आणि आपलं गुपचूप सर्व काही पाहत राहणं!
अवघड असतं, असलं जगणं!
शाळेत असताना गुरुजींनी एक कहाणी सांगितली होती.
ती गोष्ट ऐकल्यावर डोळ्यासमोर काही दिवस तो राजाच दिसायचा.
पुढे चार पुस्तकं शिकल्यावर वाटलं, छे, असं कसं होऊ शकतं?
श्रद्धा - अंधश्रद्धा... ज्याचा त्याचा प्रश्न.
आपण नाही मानत हे सगळं!
पण न जाणे का अचानक ती कहाणी प्रकर्षाने आठवू लागली.
म्हटलं सांगावं तुम्हालाही.
आटपाट नगर होतं. तिथे एक राजा राज्य करायचा.
राजा कुटुंबवत्सल. शांत शांत. आक्रमक नाही.
पण प्रजेची काळजी घेणारा. जणू काही आपल्या घरातलाच एक माणूस.
प्रत्येकालाच आपला वाटायचा.
त्यांचा भव्यदिव्य राजवाडा.
हिरे, सोनं, नाणं, पैसा, अडका, दागिने, तर होतेच
पण सगळ्यात मोठी दौलत : त्यांच्यावर प्रेम करणारी माणसं!
सर्वांनाच तो राजा व त्याचा परिवार खूप आवडायचा.
अतिशय सद्गुणी. सत्शील.
तो होता प्रजेच्या मनातला राजा. सर्वच त्याचे गुण गायचे.
आपलं नशीब चांगलं, हा आपला राजा आहे, असं म्हणायचे.
त्याच्या राज्यात प्रचंड सुबत्ता.
अतिशय श्रीमंत राज्य.
सर्वत्र दूरवर पसरलेली समृद्धी.
लोकांची नजर लागेल अशी श्रीमंती.
सर्व काही आलबेल होतं.
अचानक परिस्थिती बदलली.
वातावरण दूषित झालं.
वारं उलटं फिरायला लागलं.
राजाच्या समोर त्याच्या राजवाड्यातील दौलत
हवेत उडून जाऊ लागली.
त्याच्या तिजोरीतील हिरे, दागिने, सोनंनाणं
त्याच्या डोळ्यासमोर राजवाड्याच्या मोठ्या खिडकीतून
उडून बाहेर आकाशात दूर दूर जाऊ लागले.
मग त्याच्या किचनमधील सोन्याची भांडीकुंडीसुद्धा
त्याच्या डोक्याभोवती गोल गोल फिरून खिडकीतून उडू लागले.
राजाने आपल्या जवळच्या लोकांकडे पाहिलं.
त्याची माणसं त्याच्या पाया पडू लागले.
आपला आदरभाव दाखवू लागले.
पण हळूच त्याला सोडून जाऊ लागले.
राजा खिन्न.
त्याला काहीच सुचत नव्हतं.
डोक्याला हात लावून तो बसला.
एवढ्यात त्याच्या डोळ्यासमोर खास राजभोजनासाठी बनवलेल्या
मजबूत सोन्याच्या थाळ्याही
खिडकीवाटे उडून जाऊ लागल्या.
त्याची आवडती खिडकी.
तेथे बसून तो राजउद्यान पहायचा.
तेथे बसून तो दूरचे डोंगर बघायचा.
खास बनवलेले तळे बघायचा.
आपण मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या या महान साम्राज्याचा
अशा प्रकारे आपल्या डोळ्यासमोर नाश होत आहे,
हे पाहणे त्याला सहन झाले नाही.
आपला खजाना असा हवेत उडत जाताना पाहणं,
त्याला सहन झाले नाही.
एक प्रचंड मोठी झेप टाकून त्याने खिडकीवाटे हवेत उडून जाणारी
ती सोन्याची थाळी पकडली.
अनेक युद्धे सहजपणे जिंकलेल्या त्या राजाला
आपण काहीतरी वाचवतो, याचं समाधान वाटलं.
आपल्या हातातील मजबूत व अतिशय किमती
अशा सोन्याच्या थाळीकडे तो पाहत होता.
इथून पुन्हा आपल्याला सुरुवात करायची आहे,
असे विचार त्याच्या डोक्यात येत होते.
तेवढ्यात आश्चर्य घडले.
त्याने पकडलेल्या त्याच्या हातातील थाळीचा भागच त्याच्याकडे राहिला.
उरलेली थाळी सुद्धा हवेत उडून गेली.
दूर आकाशात.
आता मात्र त्याला काहीच सुचत नव्हतं.
आपले आपले म्हणणारे त्याचे जवळचे लोक,
इतकंच नाही तर सेवकमंडळीसुद्धा त्याला सोडून जाऊ लागली.
आता आपल्या नशिबात फक्त एवढीच मालमत्ता राहिली आहे,
हातात असलेल्या सोन्याच्या थाळीच्या तुकड्याकडे पाहत,
तो स्वतःशीच पुटपुटला.
मग त्याने काही दिवस राज्य सोडून दूर निघून जायचं ठरवलं.
आपली आवडती प्रजा, आपलं आवडतं राज्य, आपला आवडता राजवाडा
इथले रस्ते, इथली घोडागाडी, रथ, हत्ती, सर्व काही त्यागायचे.
काही दिवस.
वारं परत व्यवस्थित वाहू लागेल.
काळी रात्र संपेल.
सूर्य उगवेल.
परिस्थिती बदलेल.
सर्व काही पहिल्यासारखं होईल.
काही दिवसानंतर आपण परत येऊ.
धोतरामध्ये तो सोन्याच्या थाळीचा तुकडा बांधला.
राजाने राज्य सोडले.
काही दिवसांचा प्रवास.
तो प्रवासी म्हणून एका नव्या राज्यात पोहोचला.
तेथील वातावरणात प्रचंड उत्साह होता.
सर्वत्र आनंद. प्रत्येक माणूस खुश.
काहीतरी ‘सेलिब्रेशन’ सुरु होतं.
सुबत्ता तर प्रचंड.
‘आपण प्रवासी आहात ना?
चला आमच्या सोबत.
आज आमच्या राजाने सर्वांसाठी महाभोज आयोजित केला आहे.
आमच्या राजाचे आणि आमच्या राज्याचे भाग्य बदलले आहे.
अचानक धनलाभ झाला आहे.’
त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे
तो राजा त्याच्या मागे मागे मुकाट्याने चालू लागला.
भूकही लागली होती.
प्रचंड मोठा राजवाडा.
सणासुदीचं उत्साही वातावरण.
हजारो लोक मिष्टान्न खात आहेत.
अतिशय भव्यदिव्य नजारा.
हा राजाही जेवायच्या पंगतीमध्ये.
आणि काय आश्चर्य!
तेथे असलेल्या सोन्याच्या थाळ्या, सोन्याच्या ताट-वाट्या, चांदीचे पेले, सर्व काही-
त्याला ओळखीचे वाटू लागले.
तो परत परत पाहतो.
सर्व काही त्याला ओळखीचं वाटू लागतं.
आपण स्वप्नात तर नाही ना? क्षणभर त्याला वाटतं.
तो स्वतःला चिमटा घेतो.
पण ते खरं असतं.
त्या नव्या राज्याची, त्या नव्या राजाची सुबत्ता दाखवणारी प्रत्येक वस्तू
त्याच्या ओळखीची असते.
त्याच्याच राज्यातून, त्याच्याच राजवाड्यातून
त्याच्या आवडत्या खिडकीतून हवेत उडून उंच आकाशात जाणारी वस्तू असते.
‘हे कसं शक्य आहे?’ थोडा वेळ त्याला काहीच सुचत नाही.
‘बासुंदी...बासुंदी, लाडू...लाडू...’
अशा वाढप्यांच्या आवाजाने तो भानावर येतो.
समोर बघतो तर त्याच्या आवडीची सोन्याची थाळी!
एक धक्का!
‘बापरे! हे काय? कसलं माझं नशीब? हे कसं शक्य आहे?’
परत पाहतो तर त्या सोन्याच्या थाळीचा काठावरचा भाग तुटलेला!
दुसरा धक्का!
मग हळूच धोतरामध्ये कडेला गुंडाळलेला सोन्याचा तुकडा तो चाचपडू लागतो.
‘कदाचित... एवढाच सोन्याचा तुकडा आपल्या नशिबात आहे.
देवा तुझे आभार. काहीतरी ठेवलंय माझ्यासाठी.’
तो स्वत:शीच पुटपुटतो.
पण प्रचंड अस्वस्थ होतो.
‘जगात काय फक्त आपल्याकडेच अशा थाळ्या असतील का?
नाही मला हे पाहावेच लागेल. काय खरं काय खोटं?’
त्याची जिज्ञासा चाळवते. त्याची अस्वस्थता वाढते.
त्याला आता काय सत्य आहे, हे जाणून घ्यायचे असते.
त्याचा अंतरात्मा त्याला शांत बसू देत नाही.
धोतरात नीट गुंडाळून ठेवलेला सोन्याच्या थाळीचा तुकडा
तो हळूच बाहेर काढतो.
आणि आपल्या समोर असलेल्या तुटक्या थाळीला जोडून पाहतो.
त्याला कसंही करून जाणून घ्यायचं असतं की
येथे असलेल्या सर्व महागड्या वस्तू त्याच्याच राज्यातून आलेल्या आहेत का?
आणि काय आश्चर्य! तो तुकडा अगदी त्याच थाळीचा असतो. बरोबर जुळतो.
तिसरा धक्का!
आता त्याला काहीच खावेसे वाटत नाही.
प्रचंड भूक. प्रचंड थकावट.
तरीसुद्धा उरले सुरले अवसान आणून तो स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करतो,
‘कदाचित हा सोन्याचा एवढासा तुकडाच तुझं नशिब!
आपल्याकडे काय होतं?
आपण सर्व काही अशाच छोट्याशा भांडवलाने सुरु केलं होतं.
करू सुरुवात पुन्हा या सोन्याच्या तुकड्याने!’
असं स्वतःलाच समजावत असताना त्याला चांगलीच गती येते.
थोडंसं बरं वाटू लागतं.
आपण आता छानपैकी जेवण करू असं वाटतं.
‘आधी तो छोटासा सोन्याचा तुकडा परत आपल्या ताब्यात घेऊ,
आणि यथेच्छ जेवण करू.’
असा विचार करून तो तुकडा त्या थाळीपासून काढायचा प्रयत्न करतो.
आणि काय आश्चर्य!
तो तुकडा त्या थाळीला चिकटतो. निघत नाही.
तो तुकडा ‘स्वतंत्र’ होता याची कुठलीही निशाणी ठेवत नाही.
चवथा धक्का!
‘आता आपल्याला सर्वच नव्यातून निर्माण करायचे आहे. शून्यातून!’
आपल्या मुठी आवळत तो उठतो.
आणि एका नियोजनबद्ध प्रवासाची तयारी करतो.
- दिलीप लाठी
diliplathi@hotmail.com
Tags: साहित्य कथा मराठी साहित्य राजकारण दिलीप लाठी Load More Tags
Add Comment