सत्यपाल मलिक यांचे ‘सत्य’?  

सत्यपाल मलिक प्रकरणाच्या निमित्ताने...

सत्यपाल मलिक.  
भारतीय जनता पार्टीचे एक वरिष्ठ नेते. 
एके काळी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष.  
पुढे राज्यपाल बनतात.  
बिहार, जम्मू काश्मीर, गोवा, मेघालय  
अशा विविध राज्यांचे राज्यपाल म्हणून काम पाहतात. 
पन्नास वर्षांनतर जम्मू-काश्मीरला  
कुणीतरी राजकीय नेता राज्यपाल म्हणून मिळतो. 
तो निवृत्त सैनिकी अधिकारी नसतो.  
निवृत्त पोलीस अधिकारी नसतो. 
किंवा प्रशासनातील अधिकारी नसतो. 
लोकांमधून आलेला,  
लोकांमध्ये मिसळणारा एक राजकीय कार्यकर्ता असतो. 
काश्मीरची मूळ समस्या त्यांच्या लक्षात आलेली असते. 
काश्मीरचं दुखणं संपवायचं असेल तर  
युवकांशी बोलावं लागेल.  
तीस वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लोकांवर  
भर द्यावा लागेल.  
त्यांच्या अडचणी समजावून घ्याव्या लागतील.  
त्यांना शिक्षण, खेळ, कामधंदे उपलब्ध करून द्यावे लागतील. 
मग ते लोकांबरोबर बोलायला लागतात. 
लोक त्यांच्याशी सरळ फोनवर बोलायला लागतात.  
आपल्या समस्या सांगतात. 
त्यांच्या मोबाईलवर त्यांच्या व्हॉटस्अ‍ॅपवर  
सामान्य लोकांचे, युवकांचे, विद्यार्थ्यांचे मेसेजेस् यायला लागतात. 
त्यांच्या समस्या तत्काळ सोडवल्या जातात. 
प्रत्येक गावात मुलांना खेळण्यासाठी  
खेळाचे मैदान तयार केले जाते. 
44 नवीन महाविद्यालयं सुरु केली जातात. 
शिक्षणाबरोबरच सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास व्हावा म्हणून  
इमानदारीने प्रयत्न केले जातात. 
जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातात.  
अनेक वर्षांपासून साधा सिनेमाही न पाहू शकलेला युवा  
मैदानी खेळात रमू लागतो. 
फुटबॉल मॅचेसचं आयोजन केलं जातं.   
‘आय पी एल’मध्येही आपल्या खेळाडूंनी खेळावे,  
असं स्वप्न पाहिलं जातं.  
विशेष प्रयत्न केले जातात.  
सामान्य लोकांच्या समस्या सोडवल्या जातात. 
‘हा वेगळाच गव्हर्नर आहे,  
आपल्या हातावर स्वतःचं हृदय ठेवून आपल्याशी बोलतो.  
हा नक्कीच आपलं काही वाईट करणार नाही.’ 
असा विश्वास लोकांच्या मनात निर्माण होऊ लागतो. 
आपली दोन-अडीचशे मुलं  
जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सैनिकी ताकदीशी  
मुकाबला करू शकणार नाही,  
हे त्यांना समजावून सांगितलं जातं. 
त्यांच्यामध्ये ‘सेन्स ऑफ फटिग’ निर्माण केला जातो. 
त्यांना मुख्य प्रवाहात आणलं जातं.            
सत्यपाल मलिक यांच्या वर्ष-दीड वर्षाच्या काळात  
पोलिसांवर/सैनिकांवर होणारी दगडफेक थांबते. 
कुठेही गोळीबार होत नाही. 
सरकारचा निषेध केला जात नाही.  
दहशतवादी कारवाया आटोक्यात येतात. 
एव्हढं असूनही त्यांच्याच काळात  
अनेक खतरनाक निर्णय घेतले जातात. 
जम्मू-काश्मीर राज्याची विधानसभा भंग केली जाते. 
त्यांच्याच शिफारसीने 370 कलम हटवले जाते. 
अनेक दशकांपासून आरएसएसने, जनसंघ-भाजपने  
पाहिलेले स्वप्न पूर्ण होते.    
जम्मू-काश्मीर आपला राज्याचा दर्जा गमावते. 
त्या राज्याचे तीन भागांत तुकडे केले जातात. 
तो केंद्रशासित प्रदेश बनतो. 
ते राज्यपाल असतानाच  
तीन माजी मुख्यमंत्र्यांना अटक केली जाते.   
त्यांच्याच काळात अनेक धाडसी आणि ऐतिहासिक घटना घडतात. 
सामान्य लोक त्यांच्यावर खुश असतात. 
पण अतिरेक्यांसाठी ते खलनायक असतात.  
असं म्हणतात की,  
आतंकवाद्यांच्या ‘हिटलिस्ट’मध्ये त्यांचं नाव आहे. 
पाकिस्तानी अतिरेक्यांकडून त्यांना धोका आहे. 
निवृत्तीनंतरसुद्धा त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने धोका आहे.  
त्यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा देणे आवश्यक आहे. 
त्यांना सुरक्षित ठिकाणी  
सरकारी निवासस्थान मिळणे आवश्यक आहे. 

***

निवृत्त झाल्यावर  
ते दिल्लीत राहायला येतात. 
पण त्यांना सरकारी घर दिलं जात नाही.  
त्यांच्या सुरक्षेबाबत त्यांनी गृह मंत्रालयाला लिहिलेलं असतं. 
पण त्यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा मिळत नाही. 
हे असं कसं होतंय, हे जाणून घेण्यासाठी    
नेमकी काय परिस्थिती आहे हे समजावून घेण्यासाठी     
‘DB Live’ या युट्यूब चॅनलचे पत्रकार प्रशांत टंडन  
त्यांची मुलाखत घ्यायचं ठरवतात.     
त्यांना भेटायला त्यांच्या घरी जातात. 
एका माजी राज्यपालांचं घर.  
तेही जम्मू-काश्मीरच्या. 
दिल्लीतील एक ‘मिडल क्लास’ सोसायटी.  
भाड्याचा एक फ्लॅट.  
फक्त एकच सुरक्षा रक्षक.  
तोही गैरहजर. 
हे सर्व पाहून तो पत्रकार परेशान होतो. 
एकीकडे अर्नबसारखा पत्रकार असो, 
किंवा  
‘भारताला स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळालं’ असं बोलणारी   
एखादी सिनेतारका असो,  
वा बंगालमधले भाजपचे आमदार असो, 
किंवा महाराष्ट्रातील फुटलेले आमदार-खासदार असो  
सर्वांना जबरदस्त सुरक्षा त्वरित देण्यात येते. 
गुलाम नबी आझादांसारखे  
कुठलेही पद नसलेले नेते असो -   
सुरक्षा, सरकारी घरदार त्वरित दिले जाते.  
मग इथं तर विषय गंभीर आहे – मग असं का? 
हा प्रश्न कुणालाही सतावेल.  
मग तो पत्रकार अशा सर्व गोष्टी  
जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. 
सत्यपाल मलिक यांना भेटतो. 
त्यांना बोलतं करतो. 
त्यांच्या चर्चेतून  
एकामागून एक धक्कादायक गोष्टी निघू लागतात. 
मोदी सरकारचा  
सामान्य लोकांच्या मनात असलेला चेहरा 
आणि त्या चेहऱ्यामागे लपलेला दुसरा चेहरा  
लोकांना दिसू लागतो. 
कॅलिडोस्कोप फिरवल्यानंतर  
बदलत जाणारं चित्र दिसावं, तसं. 
सर्वांनाच हैराण करणारं. 
सरकारचा कोणता चेहरा खरा? - हा प्रश्न निर्माण करणारा. 
आपल्या डोक्यात असलेला की  
सत्यपाल मलिक यांच्या बोलण्यातून आपल्या लक्षात येणारा? 
ही मुलाखत अनेक प्रश्न निर्माण करते. 
आणि सुरु होतो एक नवा सिलसिला. 
 
***

इतके दिवस एकांतवासात गेलेले मलिक साहेब  
पुन्हा चर्चेत येतात. 
त्यानंतर अनेक महत्त्वाचे पत्रकार त्यांना भेटतात.  
प्रसिद्ध पत्रकार करण थापर त्यांची दीर्घ मुलाखत घेतात. 
रविश कुमार त्यांची मुलाखत घेतात.  
नेहमीप्रमाणे सोशल मिडिया आघाडीवर असतो. 
हळूहळू मुख्य प्रवाहातील काही टीव्ही चॅनल्स सुद्धा  
त्यात सामील होऊ लागतात.  
आणि सुरु होते स्फोटक माहिती देणारी मालिका.   
सरकारचा बुरखा टराटरा फाडला जातो.   
मोदी सरकार आणि त्यांचा कट्टर राष्ट्रवाद.  
मोदीजी आणि भ्रष्टाचार.  
आरएसएसच्या नेत्यांची भूमिका. 
सैनिकांबद्दल दिसत असलेले बेगडी प्रेम. 
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल.  
तत्कालीन गृहमंत्री राजनाथसिंग. 
राष्ट्रपतींचे कार्यालय .   
पीएमओ आणि पीएमओ मधील मंत्री जितेंद्र सिंग. 
विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या नियुक्त्या आणि  
लायकी नसलेल्या लोकांच्या नियुक्त्या करण्यासाठी  
होणारी लुडबुड.   
या शिवाय   
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे,  
पुलवामा येथे शहीद झालेले चाळीस ‘सीआरपीएफ’चे जवान  
आणि  
सरकारची संदिग्ध भूमिका! 
अनेक इश्यू समोर येतात. 
देशातील राजकीय वातावरण ढवळून निघायला लागतं. 
रिटायरमेंटनंतर  
अडगळीत शांतपणे बसलेले माजी राज्यपाल  
अचानक केंद्रस्थानी येतात. 
अतिशय शांतपणे, इनोसंट चेहऱ्याने  
त्यांनी सांगितलेली प्रत्येक घटना 
भारताच्या राजकीय पटलावर  
अनेक स्फोट करू लागते.     

***

घटना सुरु होतात जम्मू काश्मीरमध्ये. 
सगळं काही व्यवस्थित चालू असताना  
‘आरएसएस’ची वरिष्ठ व्यक्ती आणि  
भाजपचे तत्कालीन जनरल सेक्रेटरी  
सकाळी सकाळी गव्हर्नर साहेबांना भेटतात.  
त्यांचं नावही मलिक साहेबांनी जाहीर केले आहे.  
(त्यांचं नाव आहे राम माधव. 
पुढे त्यांनी ही मुलाखत पहिल्यांदा प्रसारित केलेल्या  
‘DB Live’लासुद्धा  
कायदेशीर नोटीस पाठवल्याचे कळते.) 
अंबानीच्या व्यवसायाशी संबंधित फाईल  
मंजूर करायला सांगतात. 
ते काम करावं म्हणून विनंती, दबाव. 
शेकडो कोटींची लाच देण्याची चर्चा. 
पण गव्हर्नर असलेला हा फकीर माणूस  
ते चुकीचं काम करत नाही. 
इथूनच खटके उडायला लागतात.  
यात त्यांना मोदीजींच्या जवळचे तीन लोक दिसतात. 
त्यांनी त्यांची नावेही घेतली. 
उद्योगपती अंबानी. ‘आरएसएस’चे राम माधव.  
आणि भाजपचे त्या राज्याचे माजी अर्थ मंत्री हसीब द्राबू. 
मोदीजींनी स्वतः गव्हर्नर साहेबांना  
या तिघांना भेटायला सांगितलेलं असतं.  
हसीब द्राबूचा ‘हायडल’चा प्रकल्प प्रकल्प असतो. 
दोन्ही प्रकल्पांत भ्रष्टाचार आहे,  
हे गव्हर्नर साहेबांना समजतं.  
जेव्हा त्यांना तीनशे कोटी रुपये मिळतील, असं सांगण्यात येतं   
तेव्हा त्यांचं म्हणणं असतं की,  
आपण अंगावरचे कुर्ता पायजमा धरून  
फक्त पाच ड्रेस सोबत आणलेले आहेत  
तेवढेच परत घेऊन जायचे आहे.   
त्यांच्या फकीरीबद्दल त्यांच्या मनात शंका नसते.  
‘न खाउंगा न खाने दुंगा’ म्हणणाऱ्या मोदीजींवर  
त्यांचा विश्वास असतो.  
म्हणून तक्रार केली जाते. 
आता भ्रष्टाचार संपेल,  
चुकीचे काम करणाऱ्या लोकांना सजा मिळेल,  
असा विचार मलीकजी करत असतात. 
पण तसं काही घडत नाही.  
गव्हर्नर साहेब आपल्या भूमिकेवर ठाम असतात. 
‘रिलायंस इन्शुरंस’ला प्रत्येक कर्मचाऱ्याने साडेआठ हजार रुपये व  
निवृत्त झालेल्यांनी वीस हजार रुपये द्यावे असा हा प्रकल्प असतो.  
कर्मचाऱ्यांना लुबाडून अंबानीच्या रिलायंस इन्शुरन्सला  
पैसे देणारा हा प्रकल्प ते मंजूर करत नाहीत. 
हसीब द्राबूचा हायडलचा प्रकल्पही गव्हर्नर नामंजूर करतात. 
पण द्राबू गव्हर्नर साहेबांना भेटतात आणि सांगतात, 
‘तुम्ही हायडल प्रकल्प रद्द केला, हरकत नाही.  
मी तो प्रकल्प दुसऱ्या मार्गाने मंजूर करून घेईन.’ 
असं बोललं जातं की, तो प्रकल्प पुढे मंजूर केला जातो.    
कारण पुढे गव्हर्नर साहेबांची गोव्याला बदली होते. 
 
***

पुढे गोव्याचे गव्हर्नर असतानासुद्धा तिथले मुख्यमंत्री  
मोठ्या प्रमाणावर पैसे खात आहेत, 
कोविडच्या काळात चुकीचे निर्णय घेत आहेत,  
हे गव्हर्नर साहेबांच्या लक्षात येते. 
त्वरित ‘न खाउंगा न खाने दुंगा’ म्हणणाऱ्या मोदीजींकडे  
तक्रार केली जाते. 
दोन दिवसांतच त्यांना मोदीजींचा फोन येतो  
आणि सांगितलं जातं,  
‘तुमची माहिती चुकीची आहे.’  
‘तुम्ही कुणाकडून तपासणी केली?’, असं विचारल्यावर  
मोदीजी त्यांना एका व्यक्तीचं नाव सांगतात. 
ते ऐकून गव्हर्नर साहेबांना धक्का बसतो. 
कारण मोदीजी ज्या व्यक्तीचं नाव सांगतात,   
ती व्यक्तीच एक नंबरची भ्रष्ट असते.  
मुख्यमंत्र्याच्या घरी बसून पैसे घेत असते.   
गोव्यातील लोक हळूहळू  
राज्यपालांच्या सोबत खंबीरपणे उभे आहेत,  
हे दिसू लागतं. 
पण लगेच त्यांची बदली केली जाते. 
त्यांच्यासाठी एक खटारा विमान त्वरित पाठवलं जातं. 
दिवसभर प्रवास करत कसंतरी ते मेघालयला पोहोचतात. 
आणि गोव्यातील काही भ्रष्ट लोकांच्या समोर  
उभी राहिलेली  
किरकिरी नष्ट होते. 
मोदीजींना मानणारा एक कार्यकर्ता असलेले राज्यपाल  
उद्विग्न होऊन सहजच बोलून जातात,  
आपले निरीक्षण नोंदवतात : 
‘मै सेफली कह सकता हु कि  
मोदिजीको करप्शन से कोई नफरत नही है!’  
 
***

मोदीजींच्या काळात घटनात्मक संस्थांची काय स्थिती आहे  
हे दर्शवणारी एक घटना सत्यपाल मलिक सांगतात. 
ते गव्हर्नर असतानाची घटना. 
त्यांना महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना  
भेटायला जायचे असते.  
त्या राष्ट्रपती आणि ते गव्हर्नर.  
दोन्ही घटनात्मक पदे. 
पण राष्ट्रपती भवनाकडे जाणाऱ्या  
अर्ध्या रस्त्याचा प्रवास पूर्ण होतो न होतो की  
त्यांना फोन येतो. 
भेट होऊ शकणार नाही. झालं.  
नंतर त्यांना समजतं की राष्ट्रपतींना भेट देणाऱ्यांच्या यादीलासुद्धा 
पीएमओची मान्यता लागते. 
घटनात्मकदृष्ट्या देशातील सर्वात महत्त्वाची व्यक्तीसुद्धा  
आपल्याला कोण भेटणार आहे, हे ठरवू शकत नाही.  
त्यांनी सांगितलेल्या घटना एकामागून एक धक्के देऊ लागतात. 
एका राजकीय विश्लेषकाने तर असं सांगितलंय की,  
‘पूर्वी घटनात्मक पदांवर बसलेल्या व्यक्तीचं रुपांतर  
‘रबर स्टँप’मध्ये केलं जायचं.  
पण आता तर ‘रबर स्टँप’लाच अशा पदावर बसवलं जातं.’ 
विशेष म्हणजे  
आदिवासी समाजाच्या व्यक्तीला  
राष्ट्रपती पदासारख्या सर्वात मोठ्या घटनात्मक पदावर बसवण्याचं 
काम केल्याचे क्रेडीटही हा पक्ष घेतो.    
आपण काय बोलणार? 
मलिकांनी सांगितलेली घटना खोटी असावी,  
एवढंच बोलू शकतो.   
 
*** 

मागे किसान आंदोलन चालू असताना सुद्धा  
राज्यपाल महोदय मोदीजींना भेटले होते. 
शेकडो शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले होते. 
हे जेव्हा मलिक यांनी मोदीजींना सांगितलं तर  
उत्तर मिळालं होतं एका प्रश्नाच्या रुपात, 
‘क्या मेरे लिये मरे?’  
पण पाचच मिनिटांत त्यांचं भांडण होतं.  
त्यांना मोदीजी खूप घमेंडखोर वाटतात.  
आपल्याच दुनियेत मस्त असलेले वाटतात.    
आणि ते समोर आणतात मोदीजींचा एक असंवेदनशील चेहरा! 
अठरा-अठरा तास काम करणारा पंतप्रधान – ही मोदीजींची प्रतिमासुद्धा उध्वस्त होताना दिसते. 
गव्हर्नर आपलं निरीक्षण नोंदवतात,  
‘मोदिजी इल इनफॉर्मड है. लोग उनतक सही जानकारी नही जाने देते.’   
  
***

2019 च्या निवडणुका आठवा. 
मोदीजींचं भाषण आठवा. 
महाराष्ट्रातच ते बोलले होते.  
बालाकोट येथे हवाई हल्ला केलेल्या सैनिकांबद्दल बोलले होते.  
पुलवामा येथे शहीद झालेल्या सैनिकांबद्दल बोलले होते.  
त्यांनी अतिशय भावनिक आवाहन केलं होतं.  
‘फर्स्ट टाइम व्होटर्स’ना सांगितलं होतं   
त्यांचं पहिलं मत या सैनिकांना समर्पित करण्यासाठी.   
सर्वत्र देशप्रेम आणि सैनिकांबद्दल आस्था,  
प्रेम आणि राष्ट्रभक्ती दिसत होती.  
एक मजबूत सरकार कसं बदला घेतं,  
कसं घरात घुसून मारतं  
याची प्रचिती सर्वांना येत होती.  
पाकिस्तानबद्दल प्रचंड चीड आणि राग होता. 
‘सैनिकांसाठी सर्व काही करणारे  
मजबूत सरकार आणि मजबूत नेतृत्व’  
अशी प्रतिमा तयार झाली होती. 
सैन्य, देश, सरकार आणि राजकीय पक्ष –  
हे समानार्थी शब्द झाले होते.  
जो कोणी  
मोदीजी, सरकार, भाजप यांच्या विरोधात बोलेल तो देशद्रोही 
असं समीकरण झालं होतं.   
पाकिस्तानमध्ये घुसून आपल्या सैनिकांनी हल्ला केला व बदला घेतला  
याचा संपूर्ण देश अभिमान बाळगत होता. 
पण पुलवामामध्ये चाळीस जवान का शहीद झाले? 
पुरेशी सुरक्षा नव्हती की  
‘इंटेलिजन्स फेलुअर’ होता की  
आणखी काही असे प्रश्न विचारणंसुद्धा अवघड झालं होतं. 
पुलवामा हा महत्त्वाचा विषय बनला होता. 
भाजपच्या काही सभांमध्ये तर  
शहीद झालेल्या चाळीस जवानांचे फोटोही लावण्यात आले होते. 
लोकांनी आपलं प्रेम मोदीजींवर दाखवलं.  
त्यांना भरभरून मतं मिळाली.  
आणि मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आलं.  
आज चार वर्षानंतर परत  
पुलवामाचा विषय ऐरणीवर येताना दिसत आहे. 
त्यावेळी जम्मू-काश्मीरमध्ये सर्व अधिकार गव्हर्नरकडेच होते. 
आज तेच गव्हर्नर साहेब सर्व काही सांगत आहेत. 
काय घडलं?  
कसं घडलं?  
कुणाची चूक होती? 
कुणाची काय प्रतिक्रिया होती? 
त्या घटनेचा राजकीय वापर झाला का?  
या सर्व गोष्टींचा उहापोह ते अतिशय निरागसपणे करत आहेत.  
वर्षभरानंतर परत सार्वत्रिक निवडणुकांचा पडघम वाजायला लागेल. 
आणि परत पुलवामा हा विषय  
निवडणुकीत चर्चिला जाईल, असे दिसते.      
 
***

पुलवामाची दुर्दैवी घटना घडली त्यावेळी  
जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट होती. 
सत्यपाल मलिक गव्हर्नर होते.  
त्यांच्याकडे प्रत्येक घटनेची माहिती असणे स्वाभाविक होती.  
आपले चाळीस जवान अतिरेक्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटामध्ये शहीद झाले. 
सीआरपीएफचा हजारो सैनिकांचा समूह जम्मूहून श्रीनगरला जात होता.    
त्या दिवशी आपले पंतप्रधान मोदीजी एका विदेशी पत्रकारासोबत  
उत्तराखंडमध्ये शूट करत होते. 
जिम कार्बेट पार्कमध्ये. 
डिस्कव्हरी चॅनलसाठी. 
नेमकी त्याच दिवशी पुलवामाची दुर्घटना घडली. 
मलिक साहेब अतिशय दुःखी होते.  
मोदीजींशी संपर्क होत नव्हता. 
नंतर एका ढाब्यावर गेल्यावर मोदिजींनी फोन केला. 
गव्हर्नर साहेब मोदीजींशी बोलले,  
‘आपल्या चुकीमुळे ही दुर्घटना घडली आहे. 
एवढे सैनिक आपण विमानाने पाठवायला हवे होते. 
त्यांनी गृह मंत्रालयाकडे पाच विमानांची परवानगी मागितली होती. 
ती त्यांना मिळाली नाही.  
चूक आपली आहे. 
रस्तेसुद्धा सॅनिटाइझ केलेले नव्हते. 
सुरक्षेच्या दृष्टीने तपासणी केलेली नव्हती. 
मुख्य रस्त्याला मिळणाऱ्या रस्त्यावर साधी सुरक्षा जिप्सीसुद्धा नव्हती. 
तीनशे किलो आरडीएक्स घेऊन एक गाडी दहा दिवसांपासून 
त्या भागात फिरत होती, असं कळतं. 
जे झालं ते आपल्या चुकीमुळेच झालं.’       
मलिक साहेब सर्व काही सांगत होते. 
तोपर्यंत या सर्व गोष्टी त्यांनी  
दोन-तीन पत्रकारांनाही सांगितल्या होत्या. 
मोदीजींनी एवढंच सांगितलं, 
‘आप चूप रहो. ए कूच अलग बात है’ 
पुढे मलिक साहेबांना  
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असलेले अजित डोवाल  
यांचा फोन येतो. 
निरोप तोच, 
‘काश्मीरविषयी आणि पुलवामाविषयी काहीही बोलू नका.’ 
अजित डोवाल हे मलिक यांचे वर्गमित्र.  
त्यामुळे त्यांचे संबंध मैत्रीचे. 
निरोप पक्का असल्यामुळे मलिक या विषयावर काही बोलत नाहीत.  
पुढे गोव्याला बदली झाल्यावर त्यांची मुलाखत घेतली जाते. 
आणि काश्मीरवर काही बोललं जाते. 
त्यावेळीसुद्धा त्यांना मोदीजींचा फोन येतो,  
‘आप अगर काश्मीरपर कूच बोले तो,  
मै आपसे कभी मिलुंगा नही’ 
नंतर मलिक असेही म्हणतात की,  
त्यांना पाकिस्तानला जबाबदार धरून नरेटीव्ह बदलायचे होते. 
हे आणखी धक्कादायक! 
        
***

सत्यपाल मलिक बोलल्यानंतर हा विषय जास्त गंभीर होऊ लागतो.  
माजी लष्करप्रमुख शंकर रॉय चौधरी यांच्यासारखे  
अनेक दिग्गज लोक यावर बोलू लागतात. 
जी गोष्ट लपवायची असते ती जास्त तीव्रतेने पुढे येऊ लागते. 
 
***       

सत्यपाल मलिक यांच्या एकामागून एक येणाऱ्या मुलाखती 
त्यानंतर त्यांची ठिकठिकाणी होणारी भाषणे  
त्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रिया  
आणि त्यांनी उघडे केलेले विकृत चित्र मन विषण्ण करते. 
मोदीजींपासून ते राजनाथसिंगांपर्यंत  
अजित डोवाल यांच्यापासून जितेंद्र सिंगांपर्यंत  
राम माधव यांच्यापासून ते ‘आरएसएस’पर्यंत 
अंबानी यांच्यासारख्या उद्योगपतीपासून ते सरकारमधील दलाल नेत्यापर्यंत  
राष्ट्रपतींपासून पर्यंत लोकसभेचे सभापतीपर्यंत  
सर्वच लोक त्यांच्या बोलण्यात येतात. 
संशयाच्या भोवऱ्यात सापडतात. 
मग आपल्याला प्रश्न पडतो की, नेमकं खरं काय, खोटं काय?  
यावर मोदीजी काहीतरी बोलतील. 
सरकार खुलासा करेल. 
ज्यांच्या काळात गृहमंत्रालयाने विमानांची परवानगी दिली नाही ते  
राजनाथ सिंग काहीतरी बोलतील. 
कारण विषय चाळीस जवानांनी विनाकारण गमावलेल्या जीवाचा आहे. 
त्यांची मुलाखत ऐकल्यावर मन विषण्ण होतं. 
ते जे काही बोलत आहे ते खोटं असावं असं वाटतं. 
आणि तसं असेल तर सरकारने त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला भरावा,  
असंही बरेच जाणकार सांगतात.   
 
***

पण यानंतर होतं काय? 
सरकारची प्रतिक्रिया काय? 
त्यानंतर घडलेल्या घटना,  
सरकार, पोलीस, सीबीआय यांच्या कारवाया  
आणि इतक्या संवेदनशील विषयावर  
सरकारकडून कुठलाही न आलेला खुलासा 
बरंच काही सांगून जातो.  
 
घटना 1  
काही दिवसांपूर्वी पन्नासेक खाप पंचायतींचे प्रतिनिधी  
सत्यपाल मलिक यांना भेटायला येतात. 
घर छोटं असल्यामुळे त्यांच्या खाण्याची व भेटीची व्यवस्था  
त्यांच्या घराशेजारील पार्कमध्ये केली जाते.  
जेवण तयार केलं जात असतं. 
तेवढ्यात केंद्र सरकारचे पोलीस तेथे पोहोचतात.  
सर्व पाहुण्यांना बसमध्ये घालून पोलीस ठाण्यात नेलं जातं. 
सर्वत्र अफवा पसरते की, पोलिसांनी त्यांच्या पाहुण्यांना अटक केली. 
माजी गव्हर्नर साहेबसुद्धा पोलीस ठाण्यात जातात. 
शेवटी प्रकरण मिटते. 
त्यांची मिटिंग आणि खाणे-पिणे तेथेच होते. 
पण या सध्या घटनेतूनसुद्धा सरकारकडून सत्यपाल मलिक यांना  
काहीतरी मेसेज दिला जातो हे निश्चित. 
 
घटना 2 
मलिक साहेबांनी अनेक आरोप केले आहेत.  
अनेक खुलासे केले आहेत. 
काश्मीरमध्ये होऊ घातलेला भ्रष्टाचार आहे. 
गोव्यातील भ्रष्टाचार आहे. 
पण सर्वात खतरनाक, धक्कादायक आणि संवेदनशील विषय आहे  
पुलवामा येथे मृत्युमुखी पडलेले चाळीस जवान.  
पण सीबीआय चौकशीसाठी हातात विषय घेते  
काश्मीरमध्ये होऊ घातलेला भ्रष्टाचार.  
तीन व्यक्ती - मोदीजींच्या जवळच्या : 
राम माधव, अंबानी आणि हसीब द्राबू  
दोन प्रकल्प : रिलायंस इन्शुरन्स आणि हायडल 
आणि एक रक्कम!  
म्हणजे 300 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची चर्चा. 
तक्रार केलेली व्यक्ती - सत्यपाल मलिक. 
आरोपी - वर नमूद केलेले त्रिकुट. 
आणि सीबीआय पाच-पाच तास चौकशी करते  
सत्यपाल मलिक यांची! 
विशेष म्हणजे तीनशे कोटींची लाच दिली जाणार होती,  
अशी चर्चा होती.  
पण या केसमध्ये ना ती ऑफर स्वीकारली गेली होती,  
ना ते पैसे घेतले गेले होते, 
ना ते काम झाले. ना प्रस्ताव मंजूर झाले. 
मग तपास कशाचा असेल?  
म्हणून परत परत तासन्तास चौकशी होऊ लागली  
ती 76 वर्षांच्या सत्यपाल मलिक यांची. 
ज्यांनी तक्रार केली त्यांनाच त्रास द्यायचा प्रकार. 
अशा घटनेनंतर मात्र त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, 
‘मी राज्याराज्यांमध्ये दौरे करणार, लोकांना सत्य सांगणार.  
माझा आवाज ते बंद करू शकत नाही. 
त्यांनी माझी सुरक्षा हटवली.  
माझी हत्या होऊ शकते...’ 
ते बरेच काही बोलले. 
पण सरकारकडून काही कृती दिसत नाही. 
  
***

सत्यपाल मलिक यांचे ‘सत्य’ नेमके काय आहे,  
हे सांगता येत नाही. 
पण ते अतिशय मुरलेले राजकीय नेते आहेत. 
ते गव्हर्नर असताना दिलेल्या मुलाखती पाहा.  
किंवा निवृत्तीनंतर दिलेल्या मुलाखती पाहा.  
ते मोदीजींना ‘इल इनफॉर्मड’ म्हणतात. 
‘घमंडी’ म्हणतात.  
त्यांच्या बोलण्यातून मोदीजींची ‘असंवेदनशील व्यक्तिमत्त्व’  
अशी प्रतिमा तयार होते. 
नंतर ते अमित शहा यांना भेटतात. 
आणि अमित शहा त्यांना सपोर्ट करताना दिसतात. 
‘उनकी अकल मार रखी है लोगोने. आप मिलते रहिये!’ 
असं अमित शहा मोदीजींच्या विरोधात बोललेलं वाक्य विचित्र असतं. 
त्यावर ना अमित शहा खुलासा करतात ना पीएमओ काही बोलतात. 
म्हणजे हा राजकीय धुरंदर नेता अप्रत्यक्षपणे  
मोदी-शहा यांच्या संबंधांतील दुरावासुद्धा दाखवतो. 
त्यांच्यातील सूक्ष्म संघर्ष दाखवतो. 
ते सर्वांच्या विरोधात बोलतात. 
पण अमित शहा यांच्या विरोधात बोलत नाहीत.     
उलट आधी बोललेले वाक्य मागे घेताना दिसतात. 
सत्यपाल मलिक यांनी आपली प्रतिमा जपलेली आहे. 
भ्रष्टाचार त्यांनी कधीही आपल्या अंगाला चिकटू दिला नाही.  
भारतात चारशेपेक्षा जास्त जागा असलेल्या आणि  
‘मिस्टर क्लीन’ अशी प्रतिमा असलेल्या  
राजीव गांधींसारख्या पंतप्रधानांच्या विरोधात  
त्यांनी व्ही. पी. सिंगांसोबत अभियान सुरु केलं होतं.  
बोफोर्स तोफांच्या खरेदीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला,  
हे सांगत त्यांनी गावोगावी जाऊन मोहीम सुरु केली होती. 
त्यावेळी सोशल मिडिया, वगैरे काही नव्हतं. 
पण आपल्या देशासाठी  
जीव पणाला लावून लढणाऱ्या सैनिकांसाठी  
खरेदी केल्या जाणाऱ्या साहित्यामध्ये पैसे खाल्ले जातात,  
हे लोकांना सहन झालं नाही.  
आणि एक प्रचंड बहुमत असलेल्या लोकप्रिय सरकारची  
पुढच्या निवडणुकीत आहुती दिली जाते. 
आताही विषय सैनिकांशी निगडीत आहे.  
आपल्या देशाच्या सुरक्षा यंत्रणेविषयी आहे. 
आपल्या निष्काळजीपणामुळे किंवा आपल्या चुकीमुळे 
किंवा आपल्या गुप्तहेर यंत्रणेच्या अपयशामुळे   
किंवा आपण त्यांना विमान उपलब्ध करून दिले नाही म्हणून  
आपल्याला आपले शूर जवान गमवावे लागले,  
हा संदेश लोकांपर्यंत जाणे, या सरकारसाठी झटका आहे. 
आता परत ‘पुलवामा’चा विषय येत आहे.    
आपली सर्व शस्त्रास्त्रे घेऊन हा योद्धा  
देशातील सामान्य लोकांसाठी लढायला निघालेला आहे. 
तो अदानीवर बोलतोय.  
तो अंबानीवर बोलतोय.  
तो आरएसएसचा साधेपणा बाजूला टाकून त्यांचाही भ्रष्टाचार दाखवतो. 
तो सैनिकाच्या आड येऊन दाखवला जाणारा बेगडी राष्ट्रप्रेमाचा बुरखा फाडतो. 
तो शेतकऱ्यांसाठी लढतोय. 
तो सामान्य लोकांसाठी झगडतोय. 
त्याच्याकडे सांगण्यासारखं खूप काही असेल. 
त्याच्याकडे 370च्या कहाणी मागची कहाणी असेल. 
त्यांच्याकडून आतापर्यंत झालेले खुलासे 
इंग्रजीत म्हणतात तसे  
‘Tip of the Iceberg’ आहे. 
खूप काही बाकी आहे. 

- दिलीप लाठी
diliplathi@hotmail.com   

Tags: सत्यपाल मलिक नरेंद्र मोदी अमित शहा भ्रष्टाचार पुलवामा दिलीप लाठी बालाकोट Load More Tags

Comments: Show All Comments

Divakaran Poduval

Reading & understanding Marathi is a little difficult task, do you have a translated version

Mahendra Patil

Very good analysis

Palkhedkar

छान लेख

Nitin Mane

Very Nice explained, Very Nice Written, Thank you.

Niraj Mashru

अप्रतिम लेख, मस्त वृत्तांत...

हिरा जनार्दन

भारतात गुन्हेगारीचे पीक काढणारे हे सरकार आता तरी घरी बसवले पाहिजे. सरळ, सुबोध उत्कृष्ट मांडणी!

Anup Priolkar

Unbelievable. Salute

नवीन बेंद्रे

विश्लेषण खुप छान आहे. पण मला वैयक्तिक असे वाटते कि जशा नाण्याला दोन बाजु असतात तशाच ह्याला देखील दुसरी बाजु असू शकते. सुरेख शब्दांकन आणि विचार करायला लावणारा लेख आहे. आपण केलेल्या लिखाणासाठी आपले मनःपूर्वक अभिनंदन!!!

Ashok Lokhande

प्रिय दिलीप जी,,, नमस्कार ! ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यपाल सत्यापालजी मलिक यांच्या, त्यांनी विविध प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीतील विविध अश्या बेधडक - स्फोटक अश्या मुद्द्यांवरहुकूम आपण लिहिलेला लेख खूप आवडला. मलिकजींच्या एकेक विधानावर आपण सोपे आणि सुटसुटीत केलेले विश्लेषणात्मक लिखाण, सामान्य वाचकांना आणखीन स्पष्टता देते. यापूर्वीच्या आपल्या लिखाणातून दिसून आलेले संपादकीय कौशल्य,याही लेखामध्ये प्रकर्षाने जाणवते,,खूप खूप अभिनंदन,,आणि शुभेच्छा,,

Tehseen Teerandaz

खुप छान.... Very well explained

Add Comment

संबंधित लेख