कोणे एके काळी
कर्ते-धर्ते लोक घरातून बाहेर पडायचे.
तीर्थयात्रेवर निघायचे.
त्यांना थोडंफार पुण्य कमवायचं असायचं.
दररोजच्या कंटाळवाण्या ‘रुटीन’ आयुष्यापासून दूर पळायचं असायचं.
आपलं नैराश्य घालवायचं असायचं.
आत्मशुद्धी करायची असायची.
भौतिक - ऐहिक आयुष्य व ऐषआराम सोडून ‘त्यागी’ वृत्ती अंगिकारायची असायची.
माणसं जोडायची असायची. लोकांना समजून घ्यायचं असायचं.
दुनियादारी शिकायची असायची.
नवीन ज्ञान प्राप्त करून परत नवा ‘अवतार’ घ्यायचा असायचा.
***
भारताच्या राजकीय पटलावर सुद्धा अशा घरदार सोडून जाणाऱ्या नेत्यांच्या यात्रांना विशेष महत्त्व आहे.
***
एक नेता असतो.
सहा महिने. चार हजार किलोमीटरचा प्रवास. कन्याकुमारीपासून ते राजघाट, दिल्लीपर्यंत.
हेतू हाच की, लोकांशी संवाद साधणे.
भारतभर पायीपायी फिरतो. हजारो किलोमीटर. लोकांशी भेटत राहतो. संवाद साधतो.
छोटी छोटी गावं पाहतो. लोकांची गरिबी पाहतो. शाळेत कधीच न गेलेली लहान लहान मुलं पाहतो.
आपल्या हातावर शरीरावर आपल्या नवऱ्याचे नाव गोंदलेल्या छोट्या छोट्या मुली पाहतो.
अतिशय क्षीण झालेल्या, अशक्त अशा गर्भवती महिला/मुली पाहतो.
असंच एका दाटून आलेल्या संध्याकाळी हातात कंदील घेऊन एक म्हातारी त्यांची वाट पाहत असते.
कुणीतरी नेता येणार आहे म्हणून.
जेव्हा यांची भेट होते तर ‘चाळीस वर्षांपासून मी प्यायला पाणी मिळावं म्हणून वाट पाहते. किती भटकावं लागतं आम्हाला? कधी करणार प्यायच्या पाण्याची सोय?’
त्यांच्याकडे उत्तर नसतं. पिण्याचं पाणी नाही.
शिक्षणाची सोय नाही. औषध नाही. काम नाही. लोकांना न्याय मिळत नाही.
या रोजच्या समस्या आणि त्याच्याशी झगडणारे आपले लोक आणि त्यांचं ‘दुःख’
त्यांना आपल्या दुखणाऱ्या जखमी पायाच्या वेदनेपेक्षाही जास्त वाटू लागतं.
यातून अनेक युवा त्यांच्याशी जोडले जातात.
त्यांना लोक ‘तरुण तुर्क’ म्हणायला लागतात.
पुढे ते भारताचे पंतप्रधान होतात. अतिशय कमी काळातही ते आपली छाप पाडतात.
त्यांचं नाव आहे चंद्रशेखर.
***
तेलगु सिनेमाचा लोकप्रिय नायक.
अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, निर्माता अशा विविध भूमिका साकारत
300 ‘सुपर हिट’ सिनेमांची निर्मिती करून
लोकांच्या मनावर चाळीस वर्षे राज्य करतो.
त्यांच्या गळ्यातील ताईत बनतो. आणि वयाच्या साठाव्या वर्षी
रुपेरी दुनियेचा झगमगाट सोडून लोकांसाठी काम करावं म्हणून राजकारणात येतो.
1982 मध्ये आपला राजकीय पक्ष काढतो.
आपल्या ‘इम्पोर्टेड गाडी’चं रुपांतर एका रथामध्ये करतो.
अन संपूर्ण आंध्रप्रदेशमध्ये ‘चैतन्य रथम’ घेऊन यात्रा काढतो.
पहिली फेरी. दुसरी फेरी. तिसरी फेरी. आणि चवथी फेरी.
जवळपास 40000 किलोमीटरचा प्रवास.
नऊ महिने घराकडे फिरकतपण नाही. दरम्यान त्याच्या दोन मुलांची लग्न होतात.
पण हा झपाटल्यासारखा लोकांमध्ये फिरत असतो.
रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्यामोठ्या हॉटेलमध्ये जाऊन सामान्य लोकांसोबत जेवण करणे,
झाडाखाली बसणे, येणाऱ्या हजारो लोकांमध्ये सहजपणे मिसळणे
यामुळे त्याचे वेगळेच रूप लोकांसमोर येत असते.
त्याला फक्त कल्याण करायचं असतं ‘तेलगु’ लोकांचं.
त्याच्या पक्षाचं नाव असतं ‘तेलगु देसम पार्टी’ आणि नेत्याचं नाव एन. टी. रामाराव.
विरोधक म्हणतात : ‘काही होणार नाही असली ‘नाटकं’ करून! हा रामाराव नाही हा ‘ड्रामा राव’ आहे. वगैरे वगैरे.
पण त्याच्या प्रत्येक गावातील, प्रत्येक घरातील लोकांच्या भेटी गाठी चालू असतात.
आणि अवघ्या नऊ महिन्यांतच तो आंध्रप्रदेशचा मुख्यमंत्री बनतो.
पुढे लोकसभेच्या निवडणुका येतात. इंदिराजींची हत्या झालेली असते.
प्रचंड सहानुभूतीची लाट असते. संपूर्ण भारतात भाजपच्या फक्त दोनच जागा निवडून येतात.
सर्वत्र कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि कॉंग्रेस दिसत असते.
त्याच्या लोकांशी एकरूप होणाऱ्या यात्रेचा प्रभाव कमी झालेला नसतो.
त्याच्या राज्यात त्याचाच पक्ष आघाडीवर असतो.
विशेष म्हणजे त्याच्या पक्षाबरोबर युती केल्यामुळे भाजपचा खासदार तेथे निवडून येतो.
ते सुद्धा पी.व्ही. नरसिंहरावसारख्या नेत्याला पराभूत करून.
त्यावेळी 30 खासदार असलेल्या ‘तेलगु देसम पार्टी’ या प्रादेशिक पक्षाकडे
राष्ट्रीय स्तरावरचा मुख्य विरोधी पक्ष म्हणून पाहिलं जातं.
आणि सत्ताधारी पार्टी असते कॉंग्रेस!
त्या लोकसभेत कॉंग्रेसचे खासदार असतात 414!
***
भाजपसारखा पक्ष वाजपेयी आणि अडवाणी यांच्यासारखे धुरंदर नेते. पण पक्ष वाढत नाही.
एक दिवस अडवाणीजी विचार करतात.
गुजरात मधील सोमनाथपासून युपीमधील अयोध्यापर्यंत पायी यात्रा करावी.
पण एवढं लांबचं अंतर चालत चालत पार करणं थोडंसं अवघड वाटतं.
मग प्रमोद महाजनसारखे नेते नवी कल्पना घेऊन येतात.
एक रथ तयार करतात. आणि ‘राम रथ यात्रा’ सुरु होते.
गुजरातमधील नियोजन नरेंद्र मोदी पाहतात.
यात्रेची सुरुवात गुजरातमधून आणि नियोजन मोदीजींकडे
त्यामुळे लोकांचा सहभाग अतिशय अभूतपूर्व!
इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी बघून आणि पुढे ‘फॉल्स होप’ निर्माण होऊ नये म्हणून
प्रमोद महाजनही अडवाणीजींकडे बोलून जातात :
‘यह गुजरात है इसलिये इतने लोग है, शायद महाराष्ट्र मे इतने लोग नही रहेंगे!’
पण होतं वेगळंच!
प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राज्यात लोकांची गर्दी वाढतच जाते.
यात्रा बिहारमध्येच अडवली जाते. पूर्ण होत नाही.
तरीही त्या यात्रेमुळे भारतातील राजकारणाला एक वेगळीच दिशा मिळते.
याचाच परिणाम म्हणून मोठ्या मुश्किलीने दोन खासदार निवडून आणलेल्या या पक्षाचं रुपांतर
आज सर्वात शक्तिशाली अशा ‘महाशक्ती’मध्ये झालेलं दिसतं.
***
एक अतिशय लोकप्रिय मुख्यमंत्री. वाय. एस. रेड्डी.
अशाच लोकांशी जोडल्या जाणाऱ्या यात्रेमुळे
चंद्राबाबू नायडूसारख्या नेत्याचे सरकार खाली खेचतो.
स्वतःच्या जीवावर कॉंग्रेसचे सरकार बनवतो.
पण अचानक एका हेलीकॉप्टर दुर्घटनेमध्ये त्याचा मृत्यू होतो.
राजकीय वारसा असलेली त्याची विधवा पत्नी आणि तरुण मुलगा
‘कॉंग्रेस हाय कमांड’ला भेटतात.
राज्यातील लोक आमच्यासोबत आहे, म्हणतात.
पण त्यांचं म्हणणं ऐकलं जात नाही.
त्यांना सत्तेपासून दूर ठेवलं जातं. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात.
सर्व प्रकारचा त्रास सहन करून तो तरुण नेता आपला नवा पक्ष स्थापन करतो.
लोकांना भेटण्यासाठी प्रजा संकल्प यात्रा काढतो.
3648 किलोमीटरचा प्रवास. 341 दिवस सतत रस्त्यावर चालणं.
लोकांना भेटणं. त्यांच्या अडचणी समजावून घेणं. त्यांच्यापैकी एक बनणं.
विशेष म्हणजे प्रचंड बहुमताने निवडून येऊन तो आपलं सरकार स्थापन करतो.
आज तो आंध्रप्रदेशचा अतिशय पावरफुल मुख्यमंत्री आहे.
त्याचं नाव आहे जगन मोहन रेड्डी.
***
राजघराण्यात जन्मलेला, कॉंग्रेसमधील एक मोठा नेता लोकांनी दिलेला कौल मानून
सत्ता, राजकारण यांचा काही काळासाठी त्याग करतो.
राजकारणविरहित आयुष्य जगण्यासाठी व आध्यात्मिक अनुभूती घेण्यासाठी
‘नर्मदा परिक्रमा’ करायचं ठरवतो.
आपल्या राजमहालाचा त्याग करून व ऐशोआराम सोडून
आपल्या पत्नीसोबत नर्मदा नदीच्या कडेकडेने
तीन-चार हजार किलोमीटर पायी चालण्याची योजना आखतो.
रस्त्यात येणारे गोरगरीब, शेतकरी, आदिवासी लोक, गाव, वस्त्या, वाड्या,
मंदिर, मठ, साधू , संत, गुरु,
जंगल, चिखल, पायवाट बघत बघत, मिळेल ते अन्न खात,
मिळेल त्या जागेवर झोपत, नदी किनाऱ्याने फिरत फिरत
सहा महिने पायाला भिंगरी लागल्यागत असतो.
तो नेता आहे दिग्विजयसिंग.
त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम दिसतो.
पुढे झालेल्या निवडणुकीत
‘मोदी शहा युगात’सुद्धा अनेक वर्षांपासून मजबूत असलेले
शिवराज सिंह चौहान यांचे भाजप सरकार कोसळते.
कमलनाथच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचे सरकार बनते.
(अर्थात फोडाफोडीमुळे नंतर सरकार बदलले जाते.)
***
शतकाचा गौरवशाली वारसा असलेला एक ताकदवान राजकीय पक्ष
मागच्या सात-आठ वर्षांपासून सतत निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करत असतो.
त्या पराभवाची जबाबदारी घेऊन तो अध्यक्षपदाचा राजीनामा देतो.
इतरांनीही जबाबदारी घ्यावी अशी त्याची माफक अपेक्षा असते.
पण तसं होत नाही.
सत्तेपासून दूर राहणं जमत नसल्यामुळे किंवा सत्ता लवकर परत मिळेल याची शाश्वती नसल्यामुळे
किंवा ‘इडी’सारखी इडापिडा मागे लागू नये म्हणून अनेक नेते पक्ष सोडायला लागतात.
पक्ष खिळखिळा होत जातो.
एकामागून एक मोहरे निघून जातात.
एकीकडे बलाढ्य सत्ताधारी पक्ष
आणि दुसरीकडे विखुरलेले आणि एकमेकांचा नायनाट करण्यासाठी टपलेले विविध विरोधी पक्ष
त्यात माध्यमांची एकांगी भूमिका
आणि हळूहळू नष्ट होत जाणाऱ्या घटनात्मक संस्था
अशा परिस्थितीमध्ये त्याला प्रकर्षाने जाणवायला लागते की आपण लोकशाही वाचवायला पाहिजे.
आपण लवकर सत्ताधीश बनणार नाही, हेही त्याला उमजतं.
हा लढा लोकशाही वाचवायचा आहे. हा लढा देश वाचवायचा आहे.
यासाठी सर्वात महत्त्वाचे आहेत लोक. या देशातील प्रजा.
पक्ष, अध्यक्षपद, पक्षाचं नेतेपद, राजकारण, सत्ता सर्व काही मागे सोडून तो निघतो.
जणू काही जुन्या जमान्यातील लोक तीर्थयात्रा करण्यासाठी निघायचे, त्याप्रमाणे!
तो नेता आहे राहुल गांधी.
भारत जोडो यात्रा.
कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत.
सहा महिने. 3570 किलोमीटरचा प्रवास. बारा राज्ये. दोन केंद्रशासित प्रदेश.
कोट्यवधी लोक.
ही यात्रा सुरु करण्यापूर्वी तो श्रीपेरुम्बुदूरला जातो.
ज्या ठिकाणी त्याच्या वडिलांची हत्या झालेली असते.
असंही म्हटलं जातं की त्या जागेला तो पहिल्यांदाच भेट देत आहे.
कदाचित मागच्या 31 वर्षांमध्ये त्या जागेला भेट देण्याची त्याची हिम्मत झाली नसावी.
पण आता त्याने सर्व गोष्टींचा त्याग करून एक मोठ्ठं ध्येय साध्य करायचं ठरवलेलं दिसतं.
त्याला लोकांकडून मिळणारा प्रतिसाद आणि प्रचंड प्रेम हेच दाखवत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून राहुल गांधीचं रुपांतर ‘पप्पू’मध्ये करण्यात त्याच्या विरोधकांना यश मिळालं होतं.
पण ही पदयात्रा सुरु झाल्यानंतर काही दिवसांमध्येच त्याची ‘इमेज’ पूर्णपणे बदललेली दिसत आहे.
आता आय.टी. सेल कडूनही तसे हल्ले होताना दिसत नाही.
नफरत विरोधी यात्रा सुरु झाल्याबरोबर सरसंघचालक एका मशिदीला भेट देतात.
काही दिवसांतच आरएसएसचे नंबर दोनचे नेते श्री. दत्तात्रय होसबाळे
देशातील गरिबी, श्रीमंत आणि गरिबांमधील वाढलेली दरी, बेरोजगारीबद्दल कडक भूमिका घेतात.
थोडक्यात त्याने उपस्थित केलेले मुद्दे परत ऐरणीवर येतात.
सुरुवातीलाच तामिळनाडू, केरळ, तेलंगणमध्ये लोकांचा अभूतपूर्व प्रेम, पाठींबा मिळतो.
विरोधक आणि राजकीय जाणकारसुद्धा म्हणतात,
‘तिथं ठीक आहे. तिकडं भाजपचं काही नाही. कर्नाटकात येऊ द्या. मग बघा.’
कर्नाटकातसुद्धा लोक जीव ओवाळून टाकतात.
त्याने उपस्थित केलेले मुद्दे लोकांच्या काळजाला भिडतात.
पुढे यात्रा महाराष्ट्रात येते.
लोक म्हणतात, ‘आता बघा. यात्रेचं स्वागत कॉंग्रेसमध्ये फूट पाडून होईल. मोठे नेते कॉंग्रेस पक्ष सोडतील.
यात्रेला पाठींबा मिळणार नाही.’ वगैरे, वगैरे.
यात्रा पुढे चालतच असते. लोक जोडले जातात.
महाराष्ट्रात राहुलकडून ‘वि. दा. सावरकर’ यांच्या माफीनाम्याबद्दल बोलले जाते.
पहिल्यांदाच यात्रा अडचणीत येते की काय, असं वाटू लागतं.
‘दोन मिनिटात यात्रा बंद करू’, वगैरे वक्तव्य विरोधकांकडून यायला लागतात.
विरोधकांसोबत शिवसेनेसारखे मित्रपक्षही निषेध करायला लागतात.
पण राजकीय तडजोड करण्यापेक्षा विशिष्ट वैचारिक भूमिका ठामपणे मांडून यात्रा सुरु असते.
लोकांचा प्रतिसाद वाढत असतो.
अचानक ‘आदिवासी’ लोक हे मूळचे आहेत. जल, जमीन, जंगल महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
येथील प्रत्येक बाबींवर त्यांचा अधिकार आहे. त्यांनी डॉक्टर, इंजिनिअर व्हावं, विमान चालवावं
या गोष्टी राहुलकडून ठामपणे मांडल्या जातात.
भाजप व आरएसएस ‘आदिवासीं’ना मुद्दामून ‘वनवासी’ म्हणतात, असंही तो म्हणतो.
या गोष्टींचा परिणाम गुजरातमध्ये होतो.
मोदीजी आपल्या निवडणुकीच्या भाषणात ‘आदिवासी’ शब्दाचा उल्लेख पन्नासपेक्षा जास्त वेळा करतात.
शेवटी काय ‘अजेंडा’ सेट करण्याचं काम आता राहुल करतोय.
आता यात्रा मध्यप्रदेशात आहे. लोकांचं प्रेम वाढतच आहे. सोबत प्रियांकासुद्धा आहे.
काही दिवसानंतर राजस्थानमध्ये जाणार आहे.
तेथे जरी कॉंग्रेसचंच सरकार असलं तरी आतापर्यंत सामान्य लोकांची यात्रा असलेली
‘भारत जोडो यात्रा’ सरकारी यात्रा होऊ नये, यातच त्या यात्रेचे यशापयश दिसून येईल.
परत ‘सचिन पायलट-अशोक गेहलोत’ वादविवाद आहेच. डोकेदुखी आहेच.
‘हे तर काहीच नाही. ‘काऊ बेल्ट’ राज्यातून यात्रा जाईल तेव्हा बघू काय होतं ते.
एमपी, युपीत खरी गंमत आहे. दिल्ली, हरियाणा अवघड आहे.’, लोक असेही म्हणतात.
***
‘हा पप्पू भारताचा पंतप्रधान होईल!’ असं म्हणून खुदू खुदू हसणाऱ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की,
भारताच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
पाकिस्तानचे दोन तुकडे करून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला दरारा निर्माण करणाऱ्या
सर्वात शक्तिशाली पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनाही लोकांनी
‘गुंगी गुडिया’ म्हणून हिणवलं होतं.
परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही.
काळाच्या उदरात काय दडलेलं आहे, हे आताच सांगता येत नाही.
- दिलीप लाठी
diliplathi@hotmail.com
Tags: भारत जोडो यात्रा काँग्रेस पदयात्रा राजकारण Load More Tags
Add Comment