महुआ मोइत्रा

महुआची फक्त संसद सदस्यताच जाईल की तिला जेलमध्येही जावं लागेल की ती तिसरा मार्ग पत्करेल?

आपण सतत बोलत असतो,  
‘राजकारणात चांगले लोक यायला पाहिजे.  
शिकले सवरलेले लोक यायला पाहिजे.  
महिलांनी समोर यायला पाहिजे.’  
मग फार मोठा गाजा वाजा करत  
संसदेत ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ आणलं जातं.  
जास्तीत जास्त महिलांनी नेतृत्व करावं,  
राजकारणात यावं – हाच हेतू असतो.  

***

ही कहाणी अशाच एका महिलेची आहे.  
तिच्या स्वप्नाची आहे.  
तिच्या यशाची आहे.  
तिच्या गुणवत्तेची आहे.  
जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या  
तिच्या व्यक्तिमत्त्वाची आहे.  
कार्पोरेट क्षेत्रातील तिच्या कामगिरीची आहे.  
परदेशातील उत्तम नोकरी आणि  
अतिशय उज्ज्वल भविष्य सोडून  
आपल्या देशात परत येऊन  
समाजसेवा करण्याच्या तिच्या निर्णयाची आहे.  
ही कहाणी तिच्या प्रेमाची आहे.  
तिच्या दोस्तीची आहे.  
फितूर झालेल्या मित्रांची आहे.  
तिच्या कार्पोरेट जगातील गुंतागुंतीची आहे.   
तिच्या गुंतागुंत असलेल्या नात्यांची आहे.  
तिच्या खासगी आयुष्याची आहे.  
तिच्या सार्वजनिक जीवनाचीही आहे.   
आणि एक स्त्री म्हणून  
ती करत असलेल्या संघर्षाची आहे.  
तिच्या लढ्याची आहे.  
कुठलीही कसर न सोडता   
‘साम-दाम-दंड-भेद’चा यथेच्च वापर करणाऱ्या  
भारतातील राजकारणाची आहे.      

***

तर घडलं असं.  
कलकत्त्यातील एक अतिशय हुशार मुलगी  
शिक्षणात नाव कमावते.  
पुढे उच्च शिक्षणासाठी परदेशात जाते.  
तिचं ज्ञान, तिचं व्यक्तिमत्त्व आणि तिचं कौशल्य  
यामुळे तिचं जागतिक स्तरावर सुद्धा कौतुक होतं.  
तिची आपली एक वेगळी ओळख निर्माण होते.   
पुढे अमेरिकेत, इंग्लंडमध्ये  
‘जे.पी. मॉर्गन’ची ती उपाध्यक्ष बनते.             
एक अतिशय काबिल ‘इन्वेस्टर बँकर’ म्हणून  
जगभर लोक तिला ओळखू लागतात.  
आपल्या ‘करियर’च्या  
अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर असतानाच  
ती भारतात येऊन समाजसेवा करण्याचा निर्णय घेते.  
राहुल गांधींना भेटते.  
राजकारणात येते. 
युथ काँग्रेसमध्ये काम करते.  
पुढे ममता बॅनर्जीच्या टीएमसीतर्फे निवडणूक लढते.  
आमदार बनते.  
नंतर लोकसभेची निवडणूक लढते.  
खासदार बनते.  
तिचं आकर्षक व्यक्तिमत्त्व,  
तिचं अभ्यासू वक्तृत्व,  
तिने उपस्थित केलेले प्रश्न,  
लोकसभेतील तिची भाषणं,  
सर्वांनाच मंत्रमुग्ध करतात.  
भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतीने केलेल्या भ्रष्टाचारावर  
ती बोलायला लागते तेव्हा सर्व सभागृह हादरत असतं.  
‘तुमच्या भ्रष्टाचारामुळे विजेचं बिल वाढतं,  
एअरपोर्ट, पोर्ट चे चार्जेस वाढतात.’ असं ती ठणकावून सांगते.     
‘तुमच्या मंत्र्यांना स्वतःच्या डिग्रीचं प्रमाणपत्र  
दाखवता येत नाही आणि तुम्ही  
सामान्य लोकांना कागद मागतात...’ 
सीएएविषयी तिने संसदेत केलेलं भाषण तुफान गाजतं.    
अतिशय आक्रमकपणे हल्ला करून  
सत्ताधारी पक्षाला सळो की पळो करण्याची  
ताकद तिच्यात असते.  
संसदेत गुंजणारा तिचा बुलंद आवाज बंद व्हावा,  
असं सत्ताधारी पक्षाला वाटणं स्वाभाविक असतं.     
ती फक्त आपल्या पक्षाचीच बाजू मांडत नाही.  
ती फक्त आपल्या राज्याच्याच समस्या मांडत नाही.  
तर आपल्या देशातील सर्व सामान्य लोकांच्या  
दैनंदिन आयुष्यावर परिणाम करू शकतील   
अशा कॉर्पोरेट भ्रष्टाचारावर बोलत असते.  
म्हणूनच ती टीएमसीचा राष्ट्रीय स्तरावरचा  
एक प्रभावी चेहरा बनते.                 
तिने कार्पोरेटमध्ये काम केलेलं असतं.  
आणि तिचा आर्थिक बाबींचा विशेष अभ्यासही असतो.  
तिने मांडलेले प्रश्न, तिने मिळवलेली माहिती  
आणि तिने केलेल्या संशोधनाची दखल  
देश-विदेशातील मिडिया घेतो.  
अदानी उद्योग समूहावर भ्रष्टाचाराचा आरोप करून,  
ती भ्रष्टाचाराची कहाणी सांगणाऱ्या  
‘हिंडेनबर्ग रिपोर्ट’मध्येही तिचा उल्लेख केला जातो.  
तिचं बिनधास्त जगणं  
आणि न घाबरता सत्ताधिशांशी टक्कर घेणं,  
सत्ताधाऱ्यांना आवडत नाही.  
पुरुषी मानसिकतेने पछाडलेले नेते  
तिला ‘नगरवधू’ म्हणून हिणवतात.     
पण ती आपलं काम सोडत नाही.  
ती घाबरत नाही.  
मोठ्या हिमतीने ती आपली लढाई लढत असते.  
अशा या वादळी व्यक्तिमत्त्वाचं नाव आहे – महुआ मोइत्रा.   

***

यशाच्या शिखरावर चढत असलेलं  
हे कार्पोरेट दुनियेतून राजकारणात आलेलं  
एक व्यक्तिमत्त्व.   
‘कॉर्पोरेट दुनिया’ आणि ‘राजकारणाची दुनिया’ याच्यात फरक आहे.   
आजच्या काळातील आपल्या देशाच्या राजकारणात  
काम करणं तर तेवढं सोपं राहिलं नाही.  
सर्वच बाजूंनी घेरून तुम्हाला घायाळ केलं जातं.  
तुमची चूक शोधून,  
तुम्हाला कुठंतरी पकडून फसवायची योजना असते.      

***

प्रत्येकाच्या खासगी आयुष्यात काहीतरी, कुठेतरी  
एक ‘ग्रे एरिया’ असतोच!  
असंच काहीसं तिच्याबद्दल घडतं.  

तिची खासगी छायाचित्रे  
आयटी सेलकडून ‘व्हायरल’ केली जातात.  
पार्टीमध्ये हातात दारूचा ग्लास,  
तोंडात सिगार असलेले फोटो  
भारतातील कोट्यवधी लोकांच्या मोबाईलवर  
झळकू लागतात.  
इतकंच नाही तर शशी थरूर वगैरे नेत्यांबरोबरचे  
प्रायव्हेट बर्थडे पार्टीचे  
एडिट केलेले फोटोही व्हायरल होतात.  
लोकही ते चविष्टपणे पाहू लागतात.  
आणि सुरु होते बदनामीची मोठी मोहीम!          
तिला चुकवावी लागते महिला होण्याची किंमत! 

***

ही बदनामीची मोहीम जोर धरते  
आणि समोर येतात जय अनंत देहाडराय नावाचे  
एक वकील महाशय.   
काही दिवसांपूर्वीचे महुआचे अतिशय जवळचे मित्र.  
एकदम भारी दोस्ती.  
त्या दोघांच्या अतिशय जवळचा मित्र म्हणजे  
जीव की प्राण म्हणता येईल असा मित्र   
त्यांचा ‘हेन्री’ नावाचा रॉटमिलर कुत्रा.  
काळ बदलतो.  
लोक बदलतात.  
नातं बदलतं.  
महुआच्याच भाषेत सांगायचं म्हणजे  
जिवलग मित्राचं रुपांतर ‘Jilted X’ मध्ये होतं.  
ते दोघेही ‘हेन्री’वर प्रेम करत असतात.  
दोघांना ‘हेन्री’ पाहिजे असतो.  
महुआ त्याला तो कुत्रा देत नाही.  
त्या कुत्र्याचे महुआने ‘सोशल मिडिया’वर  
पोस्ट केलेले फोटो पाहून    
जय अनंत वेडापिसा होतो.  
कुत्रा चोरण्याचा प्रयत्न करतो.  
पोलिसांकडेही प्रकरण जातं.  
आणि अचानक तो महुआच्या विरोधात तक्रार करतो.  
त्यात भ्रष्टाचार, पैशांची अफरातफर,  
असे अनेक आरोप असतात.  

जय अनंत देहाडराय आणि हेन्री 

हिरानंदानी नावाच्या उद्योगपतीकडून पैसे घेऊन महुआ  
अदानी आणि मोदींची बदनामी करते असंही सांगितलं जातं.  
जय अनंतला साथ देतो भाजपचा एक खासदार.  
श्री निशिकांत दुबे.  
तेही कॉर्पोरेटमध्ये काम करून आलेले असतात.  
अदानी-अंबानी सोबत तसेच ‘पीएमओ’सोबत  
त्यांचे जवळचे संबंध आहेत असं बोललं जातं.     
महुआला तिच्या जवळच्या मित्राकडून  
म्हणजे जय अनंतकडून  
मिळालेला धोका एक खतरनाक धक्काच असतो.  
 
महुआचा वकील आणि जय अनंत  
एकमेकांना ओळखत असतात.   
महुआचा वकील जय अनंतबरोबर बोलतो.  
‘तुला ‘हेन्री’ पाहिजे असेल तर घे,  
पण विषय वाढवू नको’  
असा तडजोडीचा सल्ला देतो.  
‘विचार करून सांगतो’ – असं उत्तरही जय अनंत कडून मिळतं.  
जय अनंत हा काही साधासुधा वकील नसतो.  
त्याने यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती असलेल्या  
व्यक्तीसोबत काम केलेलं असतं.  
त्यामुळे त्याचे डावपेच वेगळेच असतात.  
मग कोर्टात उलटंच घडतं.  
जय अनंत मा. न्यायाधीशांनाच सांगतो की,    
जो वकील आपल्या अशिलाविरुद्ध तक्रार करणाऱ्या व्यक्तीसोबतच  
मध्यस्ती करायला लागतो  
तो आपल्या अशिलाला कसा काय न्याय मिळवून देईल?   
शेवटी महुआच्या वकिलाला तिची साथ सोडावी लागते.  

जय अनंतने आरोप केलेले असतात की,  
महुआने दर्शन हिरानंदानी कडून  
दोन कोटी रुपये घेतले.  
दर्शनने महुआचे सरकारी घर फर्निश करण्यासाठी  
75 लाख रुपये खर्च केले.  
दर्शनने महुआसाठी महागड्या भेट वस्तू दिल्यात.  
दर्शनने महुआच्या प्रवासात मदत केली.  
दर्शनने महुआला ‘पर्सनल सेक्रेटरी’ दिला.  
महुआने दर्शनला आपला संसदेचा इ-मेल आयडी आणि पासवर्ड दिला  
आणि त्याने दुबईतून लोकसभेमध्ये प्रश्न विचारले.  
त्यामुळे मोदीजींची बदनामी झाली.  
अदानीजींची बदनामी झाली.         
थोडक्यात पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारले,  
हा मुख्य आरोप असतो.  
म्हणजे भ्रष्टाचार.          
संसद, इ-मेल, दुबईतून प्रश्न, पीएमच्या विरोधात कटकारस्थान,  
अदानी आणि मोदींची बदनामी, देशद्रोह, धर्मयुद्ध,  
वगैरे वगैरे गोष्टी सांगून  
हे अतिशय गंभीर प्रकरण आहे, असं भासवलं जातं.  
लगेच प्रकरण ‘संसदीय ‘एथिक’ समिती’कडे जातं.  
पहिली सुनावणी होते.  
निशिकांत दुबे आणि जय अनंत यांची चौकशी होते.  
दर्शन दुबईमधूनच एक शपथपत्र सादर करतो.  

त्यात बऱ्याच गोष्टी कबूल केल्या जातात.  
आणि महुआ मोइत्राचं आता काही खरं नाही,  
असं सगळ्यांनाच वाटू लागतं.  
आग्यामोहोळ उठल्यासारखं सर्वच टिव्हीवाले  
बदनामी सत्र सुरु करतात.  
त्यात अदानी समूहाचा एनडीटिव्ही आघाडीवर असतो.  

***

महुआच्या बाबतीत  
सगळं काही व्यवस्थित चाललेलं असतानाच  
असं काही होतंय हे पाहिल्यावर  
आमच्या शाळेतल्या गुरुजींनी सांगितलेला किस्सा आठवतो.     
सतत त्रस्त असणारे आमचे गुरुजी म्हणायचे :  
‘एक बात बोल रहा हु, बेटा.  
हमेशा याद रखना.  
कभी मत भुलना.  
अगर दिना खराब चल रहे ना,  
तो ऊँट पर बैठनेवाले आदमी को भी  
कुत्ता काटता है!’     
 
एकीकडे जवळच्या मित्राने दिलेला धोका,  
प्रेमभंगामुळे जखमी झालेला जय अनंत,  
कोणाचीही वाट लावण्यात पटाईत असलेले  
अतिशय शक्तिशाली खासदार निशिकांत दुबे,  
सतत मदत करणारा दुसरा उद्योगपती मित्र  
दर्शन हिरानंदानीकडूनच  
केले जाणारे चुकीचे आरोप,  
कोर्टात महुआचा खटला लढायला गेलेल्या वकिलाची माघार,  
भारतातील सर्वात शक्तिशाली उद्योगपती गौतम अदानी  
यांच्याबरोबर झालेली दुष्मनी,  
सतत भारतातील सर्वात ताकदवान व्यक्ती मा. नरेंद्रभाई  
यांच्यावर महुआकडून सतत केली गेलेली टीका  
त्यामुळे प्रचंड बहुमत असलेल्या बलाढ्य सरकारबरोबरचा संघर्ष                 
त्यात अशा अटीतटीच्या वेळी  
स्वतःच्या पक्षाकडूनच न मिळणारा पाठिंबा.  
टीएमसीच्या डेरिक ओब्रायन किंवा मजीद मेनन यांनी  
जाहीरपणे केलेल्या वक्तव्यावरून ते स्पष्टपणे दिसतं.     
असंही बोललं जातं की,  
ममता बॅनर्जी आणि महुआ मोइत्रा यांच्यातही  
एक सुप्त संघर्ष आहे.   
ममता दीदीला अदानी समूहाकडून बंगालमध्ये  
मोठ्या गुंतवणुकीची अपेक्षा आहे.   
तसेच ममता दीदी आणि नरेंद्रभाई यांचेही  
व्यक्तिगत संबंध चांगले आहेत.  
पूर्वी त्या वाजपेयीजींच्या मंत्रिमंडळात मंत्रीही होत्या.     
आता महुआला जो काही थोडा फार पाठिंबा मिळेल  
तो  काँग्रेसकडूनच!  
अन्यथा त्यांना त्यांचं युद्ध स्वतःच लढावं लागेल.  

***

महुआ शरण जाईल असं दिसत नाही.  
तिने महाशक्तिमान लोकांशी लढण्याचं आव्हान  
स्वीकारलेलं दिसतंय.  
आपल्याला दोन्ही पातळ्यांवर लढायचं आहे,  
हे तिला माहीत आहे.  
संसदीय समितीसमोर/ न्यायालयीन लढाई  
आणि दुसरी टीव्हीवाल्यांकडून होणारी ‘मिडिया ट्रायल’!  
राजकीय जीवनात ‘पब्लिक परसेप्शन’ तितकंच महत्त्वाचं आहे,  
याची तिला कल्पना आहे.  

इतकं सगळं होऊनही  
महुआ मोइत्रा मात्र विचलित होत नाही.  
ती आणखी खळबळजनक खुलासे करते :  
‘संसदेचे दोन खासदार अदानीचा निरोप घेऊन  
तिला दोनदा भेटले होते  
आणि त्यांनी अदानी बरोबर एक भेट घेऊन  
चर्चा करू व हा विषय संपवू’  
असं म्हटलं होतं’  
हे ती जाहीर करते.  
एवढंच नाही तर  
‘पुढचे सहा महिने अदानी-मोदी विषयावर बोलू नका  
व निश्चिंत रहा, शांततेत जगा’  
असा निरोपही तिला मिळाला होता, असं सांगते.  
‘आपण आपला लढा थांबवणार नाही’,  
यावर ती ठाम असते.  
दर्शन हिरानंदानीवर दबाव टाकून  
त्या शपथपत्रावर सही घेतली असावी, असंही ती सांगते.  
डायरेक्ट पीएमओवर शंका घेते.

इतके दिवस शांत बसलेली महुआ  
राजदीप सरदेसाईला मुलाखत देते.  
भारतातील कोट्यावधी सामान्य लोकांचा आवाज आहे  
आणि या आरोपांमुळे मी दबले, शांत बसले,  
दबावापुढे झुकले, किंवा काही चुकीचं काम केलं,   
असा संदेश सामान्य लोकांसमोर जाऊ नये म्हणून  
ती मीडियासमोर येऊन खुलासे करते.  
प्रत्येक प्रश्नांची उत्तरे देते.

आपल्यावर आपली खासगी दुष्मनी काढण्यासाठी  
एका माजी प्रियकराकडून आणि  
फेक डिग्रीचे आरोप केल्यामुळे  
दुखावल्या गेलेल्या एका राजकीय नेत्याकडून  
ही तक्रार केली गेली असं ती सांगते.  
दर्शनकडून दोन कोटी रुपये घेतले हा आरोप ती नाकारते.  
दर्शननेही आपल्या शपथपत्रात ते लिहिलं नाही हे दाखवते.   
सरकारी घर फर्निश करण्यासाठी  
सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने खर्च केला, हे ती सांगते.   
दर्शन हा मित्र आहे म्हणून  
त्याने एकदा वाढदिवसाच्या दिवशी  
एक स्कार्फ भेट दिला होता आणि  
काही लिपस्टिक्स भेट दिल्या होत्या.  
मुंबईत गेल्यावर कारची व्यवस्था केली होती.  
हाच तो प्रवासखर्च आणि महागड्या वस्तूंची भेट.  
त्याच्या स्टाफ इमेल वगैरे पाठवण्यासाठी  
‘पर्सनल सेक्रेटरी’ सारखी मदत करतो.    
म्हणून आपला इ-मेल आयडी आणि पासवर्ड दिला,  
हेही ती सांगते.  
पण प्रत्येक खासदार  
आपल्या स्टाफतर्फे किंवा पीएतर्फेच मेल पाठवतो.  
थोडक्यात विषय किरकोळ आहे.   
राष्ट्रीय सुरक्षा वगैरेशी जोडणे हास्यास्पद आहे.      
असं तिचं म्हणणं आहे.     
संसदीय समिती समोर दर्शन हिरानंदानीला बोलवा,  
मला त्याची उलटतपासणी करायची आहे,  
अशीही मागणी करते.

***

हे सगळं असलं तरी  
प्रचंड अधिकार असलेली संसदीय समिती  
महुआच्या बाजूने निकाल देईल  
याची शक्यता फारच कमी आहे.  
संसदेत मोदी-अदानीवर प्रखर टीका करणारे  
राहुल गांधी असोत, की संजय सिंग असोत  
त्यांचे काय हाल झालेत ते आपण पाहिलेत.  
राहुलला काही काळासाठी का होईना  
आपली सदस्यता गमवावी लागली होती.  
संजय सिंग तर जेलमध्येच आहे.  
आता महुआचं काय होईल?  
फक्त संसद सदस्यताच जाईल की  
जेलमध्येही जावं लागेल  
की
ती तिसरा मार्ग पत्करेल   
लवकरच कळेल.     

- दिलीप लाठी
diliplathi@hotmail.com  
(लेखक, वसुधा रिसर्च अँड पब्लिकेशन्स प्रायव्हेट लि.चे व्यवस्थापकीय संचालक आहेत.)

Tags: राजकारण नारी शक्ती वंदन अधिनियम संसद दिलीप लाठी संजय सिंग politics mahua moitra dilip lathi sanjay singh parliament Load More Tags

Comments:

sanjay gaikwad

Perfect in depth analysis of the relevant subject . Very horrible situation in the country. It seems that India is going the dictator ship way . PM cares fund is a private fund and nobody can ask for the details even in RTI act. All sorts of tricks are being used for the winning of elections and for vested interests. Maharashtra politics is ruined and all profit making enterprises and institutes are shifting to Gujarat. God save the country. Jai Hind

नम्रता

महुआ मॅडमना दुबे आणी कंपनी विरोधात लढण्यासाठी खुप शुभेच्छा. लेख माहीतीपुर्ण.

Shyamal Garud

महुआचा या पुरुषसत्ताक व्यवस्थेविरुद्ध असलेला लढा गुंतागुंतीची करुन तिला भयभीत केलं जातंय . बाई सुंदर+जेमतेम हुशार+आज्ञाधारी असली की, ती सुशील व सुंदर असते..पण तीच बाई व्यवस्थेची पाळंमुळं खणून आपल्या बौद्धिक क्षमतेवर जेव्हा एल्गार पुकारते तेव्हा तिच्या भोवती मोहोळ उठविले जाते. लिंगभेदाचं सांस्कृतिक राजकारण गलिच्छ आहे.. त्यात बाई मोठ्ठी हुशार.. त्यामुळे जास्त पोटशूळ उठला आहे.पण बाय छातीला माती लावून उभी आहे. आदीमायची लेक हाय.दिलीपजी खूपच महत्वाचा लेख आहे.. मनापासून अभिनंदन.. पुढील लेखाच्या प्रतिक्षेत.

डॉ अनिल खांडेकर

श्री दिलीप लाठी , तुम्हाला धन्यवाद . समतोल माहिती, कमी शब्दात व्यक्त करण्यात तुम्ही यशस्वी होत आहात . अनेक विषयांवर तुम्ही लिहीले आहे. सामान्य माणसाला योग्य माहिती, मार्मिकपणे देत आहात. कथित मुख्य प्रवाहातील माध्यमातून योग्य माहिती मिळेल अशी आशा नाही . अशा वेळी. तुमच्या सारखे लेखन महत्त्वाची भूमिका बजावतात. धन्यवाद.

Add Comment