राजकारणात कधी काय होईल,
सांगता येत नाही.
अचानक ‘झिरोचा हिरो’ होतो
किंवा ‘हिरो एकदम झिरो’ बनतो.
आणि मग लोक म्हणू लागतात:
“यार, क्या बोलूँ?
‘ऐसे वैसे’ लोग ‘कैसे कैसे’ हो गये
‘ऐसे वैसे’ लोग ‘कैसे कैसे’ हो गये
और
‘कैसे कैसे’ लोग ‘ऐसे वैसे’ हो गये!”
____________________________________
ही कहाणी आहे महाराष्ट्रातील अशाच एका नेत्याची.
जो कधीकाळी खूप चमकला.
मग अचानक गायब झाला.
अदृश्य झाला.
अज्ञातवासात गेला.
कहाणीमध्ये दोन लोकांची ‘टीम’ आहे.
त्यांची चांगली मैत्री आहे.
त्यांनी एकत्र केलेलं काम आहे.
त्यांना मिळालेलं यश आहे.
पण त्यासोबतच ‘जेलसी’ आहे.
खोटेनाटे आरोप आहेत.
कटकारस्थान आहे.
घाणेरडं राजकारण आहे.
आणि त्या नेत्याच्या राजकीय अस्तित्वाचा अंत आहे.
वेदना, अपमान, त्रास, मनस्ताप, नामुष्की -
चुपचाप, अगदी शांतपणे, सहन करण्याचा
त्याचा दोन दशकांचा अनुभव आहे.
वयाच्या बासष्टाव्या वर्षीसुद्धा अंधकारमय भविष्य आहे.
पण अचानक काळोख्या रात्री वीज चमकावी,
प्रकाश पडावा
आणि आजूबाजूचं स्वच्छ दिसावं,
पुन्हा आपले ‘अच्छे दिन’ परत आलेत असं वाटावं,
असंच काहीसं त्याचं झालंय.
____________________________________
संजय विनायक जोशी.
नागपूरमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म.
मेकॅनिकल इंजिनिअर. काही दिवस प्राध्यापकी.
संघाच्या विचाराने प्रेरित होऊन पूर्ण आयुष्य
आरएसएससाठी समर्पित.
शांत स्वभाव, सामान्य लोकांमध्ये मिसळण्याची वृत्ती,
खेड्यापाड्यात, वाड्यावस्त्यांवर जाऊन काम करायची तयारी,
शिक्षण चांगलं आणि बुद्धिमान व्यक्तिमत्व.
____________________________________
वर्ष १९८८.
गुजरातमध्ये भाजपचं काम करायला रवानगी.
संघासाठी भाजपची प्रयोगशाळा बनलेल्या गुजरातमध्ये
हा सुशिक्षित शांत स्वभावाचा २८ वर्षांचा तरुण
आपलं काम करायला सुरुवात करतो.
त्याच्यासोबत येतो दुसरा आक्रमक नेता. नरेंद्र मोदी!
दोघांची मैत्री होते.
संपूर्ण गुजरात राज्य ते पिंजून काढतात.
त्यांना यश मिळतं.
वर्ष १९९५.
गुजरातमध्ये मध्ये कमळ खुलतं.
गुजरातमध्ये भाजपचं सरकार येतं.
____________________________________
सत्ता मिळाल्यानंतर मुखवटे फाटतात.
खरे चेहरे समोर येऊ लागतात.
दोघेही मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत, असं वाटतं.
पण केशुभाई पटेल मुख्यमंत्री होतात.
भाजपमध्ये दोन गट पडतात.
शंकरसिंग वाघेला बंड करतात.
संशयाची सुई नरेंद्र मोदीकडे.
त्यांना गुजरातमधून दिल्लीला बोलावले जाते.
सुरेश मेहता नवे मुख्यमंत्री.
पुढे काही दिवस राष्ट्रपती राजवट.
राजकीय अस्थिरता.
परत वाघेला नंतर दिलीप पारीख.
म्हणजे तीन वर्षांत चार मुख्यमंत्री
आणि राष्ट्रपती शासन सुद्धा.
____________________________________
वर्ष १९९८.
गुजरात निवडणूक संजय जोशींच्या मार्गदर्शनाखाली.
त्यात भाजपचा विजय.
केशुभाई पटेल पुन्हा मुख्यमंत्री.
अर्थात यशाचे पूर्ण ‘क्रेडिट’ संजय जोशींनाच!
____________________________________
वर्ष २००१.
उलटी चक्रं फिरायला लागतात.
भूकंप, पोटनिवडणुकीतील पराभव, वगैरे.
सरकारविरोधी वातावरण.
मग काय? अचानक नरेंद्र मोदी ‘पॅराशूट’ मुख्यमंत्री होतात.
आणि इथून सुरू होतो राजकारणाचा खतरनाक खेळ!
____________________________________
२००१-२००५.
सर्वात आधी संजय जोशींना गुजरातमधून बाहेर काढून
दिल्लीला बोलावण्यात येते.
अडवाणीजींची कृपा!
संजय जोशी भाजपचे राष्ट्रीय महासचिव असताना
परत एकदा त्यांचे संघटनकौशल्य दिसते.
हिमाचल, उत्तराखंड, छत्तीसगड, झारखंड, बिहार,
मध्यप्रदेश, ओरिसा, जम्मू-काश्मीर,
अशा अनेक राज्यांमध्ये भाजपचं प्रदर्शन चांगलं होतं.
भाजपचा सगळ्यात तरूण संघटन महासचिव म्हणून
त्यांचं वजन वाढतच असतं.
शिवराज सिंह चौहान यांना मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री करताना
संजय जोशी यांचीच भूमिका महत्त्वाची असते.
उमा भारतीचा विरोध ते अतिशय आक्रमकपणे मोडतात.
अडवाणीजींची पाकिस्तान भेट आणि
त्यांनी जिनांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे
आरएसएस आणि भाजपची नाराजी आणि
त्यांना द्यावा लागलेला राजीनामा!
असं बोललं जातं की निरोपाचा हा ‘कडू डोस’
अडवाणीजींना संजय जोशींकडूनच देण्यात आलेला असतो.
मुख्यमंत्री असलेल्या मोदीजींपेक्षाही जोशींचं पद भारी असतं.
या दोन्ही नेत्यांमधील दुश्मनी वाढतच असते.
वर्ष २००५.
अचानक गुजरात मधील एका हॉटेलमध्ये
एका महिलेसोबत अश्लील अवस्थेत
संजय जोशींना दाखवणारी एक सीडी समोर येते.
त्या सीडीचे वितरण मोठ्या प्रमाणावर संपूर्ण देशभर केले जाते.
हा मोदी-जोशी राजकीय दुश्मनीचा परिणाम आहे,
असं सर्रास बोललं जातं.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सुशिक्षित, सुसंस्कृत, प्रचारक असलेल्या,
अविवाहित संजय जोशी यांना हा धक्का सहन होत नाही.
ती सीडी बनावट आहे, खोटी आहे
हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी होतो.
आणि त्यांना भाजप-आरएसएस पासून दूर व्हावे लागते.
पक्षाची प्रतिमा, संघटनेची प्रतिमा जपण्यासाठी
स्वतःची कुर्बानी द्यावी लागते.
हे का होत आहे, हे कोण करत आहे हे माहीत असताना सुद्धा
तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागतो.
____________________________________
दिवस, महिने, वर्षं निघून जातात.
तपास चालू असतो.
आणि सहा वर्षांनंतर सिद्ध होतं कि असं काही झालंच नव्हतं.
ती सीडी बनावट होती.
त्या सहा वर्षांमध्ये खूप काही बदललेलं असतं.
मोदीजी गुजरातमध्ये परत निवडून आलेले असतात.
सर्वत्र गुजरात मॉडेलची चर्चा.
राष्ट्रीय स्तरावर मोदीजींचा प्रचंड मोठा दबदबा.
____________________________________
पण भाजपचे अध्यक्ष असतात नितीन गडकरी!
त्यांचे व संजय जोशींचे नागपूर, आरएसएस असे जुने ‘कनेक्शन’.
संघ आणि नितीन गडकरी यांना
संजय जोशींच्या कर्तृत्वाची माहिती असते.
त्यांच्या चारित्र्याबद्दल शंका नसते.
नेमके काय झालेले होते, याची कल्पना असते.
त्यामुळे संजय जोशी यांचा राजकीय पुनर्जन्म होतो.
त्यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात येते.
मोदीजींना ते आवडत नाही.
ते यूपीमध्ये प्रचाराला जात नाहीत.
संजय जोशींना विरोध करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत.
____________________________________
वर्ष २०१२.
स्थळ: मुंबई.
भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक.
मोदीजींचे खास दूत पक्षाध्यक्ष नितीन गडकरींना भेटतात.
अट एकच: संजय जोशींना काढा.
कार्यकारिणीतून काढा. पक्षातून काढा.
एक तर जोशी राहतील नाही तर मोदी!
प्रसंग अतिशय बाका. अतिशय कठीण. निर्णय घेणे अवघड.
जोशींना संघाचा पाठींबा. गडकरीसाहेब सुद्धा जोशींच्या बाजूने.
जोशी-मोदी दोघांनी एकत्र काम करावे अशी अपेक्षा.
पण मोदीजी अहमदाबादमध्येच. विमान उडण्यासाठी तयार.
पण जोपर्यंत जोशींच्या राजीनाम्याची बातमी येत नाही
तोपर्यंत विमान उडणार नाही हे पक्कं.
काहीतरी भयंकर होणार.
आपला पंतप्रधानपदाचा चेहरा,
सर्व उद्योगपतींचा पाठिंबा असलेला नेता
असा नाराज होऊन कसं चालेल?
शेवटी संघ, पक्ष आणि अध्यक्ष गडकरी
आपल्या काळजावर दगड ठेवून निर्णय घेतात.
गडकरींची ‘प्रेस कॉन्फरन्स’
‘संजय जोशी यांनी राजीनामा दिला आणि पक्षाने तो स्वीकारला!’
एका वाक्यात सर्व काही!
मोदीजींचे विमान उडायला लागते.
त्या क्षणापासून मोदीजींचं राजकीय विमान उडतंच आहे.
उंच उंच भरारी घेत आहे.
कुठेच थांबत नाही. कधीच थांबत नाही.
____________________________________
पण मोदीजींची ही दादागिरी कुणालाच आवडत नाही.
भाजपमधील अनेक नेते आपला विरोध दाखवतात.
‘व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आहे’ हे सांगतात.
बिहारचे तत्कालीन उपमुख्यमंत्री सुशील मोदी
जाहीरपणे आपला विरोध दर्शवतात.
‘पार्टी महत्त्वाची, कुठल्याही नेत्याने स्वतःला पक्षापेक्षा मोठे समजू नये.’
असे मीडियासमोर येऊन सांगतात.
भाजपचे मुखपत्र असलेल्या ‘कमल संदेश’ मध्ये टीका होते.
आरएसएसच्या ‘Organiser’ आणि ‘पांचजन्य’ मध्ये टीका केली जाते.
पण हे जहर शांतपणे पिले जाते. पचवले जाते.
त्यानंतर काही दिवसांनीच श्रवण गर्ग या ज्येष्ठ पत्रकाराला
सरसंघचालक मोहन भागवत
आपल्यासोबत जेवायला बोलावतात.
काही दिवसांपूर्वीच मोदीजींचे नाव पंतप्रधानपदासाठी
भाजपतर्फे मान्य झालेले असते.
निवडणुका व्हायच्या असतात.
श्रवण गर्ग यांनी गुजरातमध्ये अनेक वर्ष काम केलेले असते.
मोदीजींचे व्यक्तिमत्व व काम करण्याची पद्धत त्यांना माहीत असते.
सरसंघचालक त्यांच्याबरोबर चर्चा करतात.
‘इन्होने गुजरात में पार्टी, प्रशासन और संघ पर भी कब्जा किया है,
आप ऐसे तानाशाही मिज़ाज को कैसे नियंत्रित करोगे?’
- असा प्रश्न त्या पत्रकाराकडून विचारला जातो.
‘हम कंट्रोल करेंगे’ असं उत्तर मिळते.
दरम्यान, मोदीजींचा दहा वर्षांचा कार्यकाळ पाहता,
श्रवण गर्ग यांनी विचारलेल्या प्रश्नाचं महत्त्व
सगळ्यांच्याच लक्षात आलं असेल.
____________________________________
या घटनेला आता बारा वर्षे झालेली आहेत.
जुन्या जखमेवरील खपली अचानक काढली जाते.
रक्त भळाभळा वाहू लागतं.
वेदना ताज्या होऊ लागतात.
बारा वर्षानंतर संघासमोर
परत तीच परिस्थिती निर्माण होताना दिसते.
‘व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आहे. संघटन मोठं आहे.’
बारा वर्षांपूर्वी ‘कमल संदेश’, ‘Organiser’ आणि ‘पांचजन्य’मध्ये
छापलेल्या गोष्टी आणि त्या वेळी असलेले सहकारी मंडळीचे मत
परत आज समोर येत आहे.
भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची वेळ आहे.
मागच्या दहा वर्षांमध्ये अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सोपी होती.
दोन नेते भेटायचे.
‘किसको बनायेंगे अध्यक्ष?’
‘ए नाम ठीक रहेगा.’
‘ठीक है, बना दो.’
परत तीन वर्षानंतर तोच संवाद.
‘किसको बनायेंगे अध्यक्ष?’
‘उनकाही नाम ठीक रहेगा.’
‘ठीक है, बना दो.’
दोन टर्म झाल्यानंतर तोच संवाद.
‘किसको बनायेंगे अध्यक्ष?’
‘उनकाही नाम ठीक रहेगा.’
‘ठीक है, बना दो.’
दोन टर्म झाल्यावर भाजपघटनेनुसार तिसरी टर्म देता येत नाही.
‘ठीक एक्स्टेन्शन दे दो.’
ते एक्स्टेन्शनही संपले.
पण नवीन अध्यक्ष निवडला जात नाही.
काय असेल भानगड?
के. पी. मलिक, राजीव रंजन सिंग सारखे पत्रकार सांगत आहेत की
यावेळी आरएसएस अतिशय कडक भूमिका घेत आहे.
मोदीजी आज स्वतःला मजबूत करत आहेत
पण संघ पुढच्या तीन-चार दशकांचा विचार करतो.
त्यांना मोदीजींच्या निवृत्तीनंतरही
पक्ष मजबूत व्हायला पाहिजे, असे वाटते.
त्यासाठी नव्या चेहऱ्याचा शोध सुरू आहे.
हे काम करण्याची हीच योग्य वेळ आहे.
हेही वाचा: नव्या ‘चिराग’च्या शोधात अलादिन...(दिलीप लाठी)
अनेक राष्ट्रीय स्तरावर काम करणारे पत्रकार म्हणतात की
भाजप अध्यक्ष म्हणून संघाला स्वतंत्रपणे काम करणारा नेता पाहिजे.
त्याला संघाचे विचार कार्यकर्त्यांमध्ये रुजवता यावेत.
त्याला पक्षाची ध्येय-धोरणे लोकांपर्यंत पोहोचवता आली पाहिजेत.
त्याने फक्त मोदी-शहाच्या हातातले बाहुले म्हणून काम करू नये.
मोदी-शहांकडून अनेक नावे समोर येत आहेत.
देवेंद्र फडणवीस. विनोद तावडे.
अनुराग ठाकूर. शिवराजसिंह चव्हाण.
वगैरे वगैरे.
विशेष म्हणजे मोदी-शहा यांना आता
संघाबरोबर गंभीरपणे चर्चा करावी लागत आहे.
या वेळी संघसुद्धा आपली संमती देत नाही.
संघातर्फे वसुंधराराजे सिंधिया, योगी आदित्यनाथ, वगैरे
नावं समोर येत आहेत.
पण सगळ्यात मोठा ‘मास्टर स्ट्रोक’ आहे
श्री. संजय विनायक जोशी याचे नाव.
अचानक ‘कोल्ड स्टोरेज’मध्ये वर्षानुवर्षे पडलेले
हे नाव परत सर्वत्र गाजत आहे.
सोशल मीडिया, मेन स्ट्रीम मीडिया, भाजप, आरएसएस
आणि राजकीय चर्चांमध्ये धक्कादायकरीत्या चर्चिले जात आहे.
विधानसभा निवडणूक निकालानंतर
खूप काही घडणार आहे!
कुठल्याही परिस्थितीत संजय जोशी हे नाव
‘गुजरात लॉबी’ला मान्य होईल असे दिसत नाही.
पण आरएसएस ने बाजू उचलून धरली तर अध्यक्ष नाही
तर किमान महासचिव म्हणून ते परत येऊ शकतात.
काहीच झाले नाही तर किमान
संजय जोशींच्या ओठांवर गजलेचे हे वाक्य तरी घोळत राहील :
‘ये भी क्या एहसान कम है देखिये न आपका
हो रहा है हर तरफ़ चर्चा हमारा आपका!’
- दिलीप लाठी
diliplathi@hotmail.com
(लेखक, वसुधा रिसर्च अँड पब्लिकेशन्स प्रायव्हेट लि.चे व्यवस्थापकीय संचालक आणि ज्ञानज्योती या नियतकालिकाचे संपादक आहेत.)
Tags: dilip lathi modi sanjay joshi nitin gadkari bajp president election bjp Load More Tags
Add Comment