‘हम आपका कत्ल तो करेंगे,
मगर आपको शहीद नही होने देंगे’
– आपल्या विरोधकांसाठी वापरला जाणारा
राजकारणी लोकांचा एक खास ‘डायलॉग’!
याची परत आठवण येते त्याचं कारण म्हणजे
राहुल गांधींची सध्याची स्थिती.
****
घटना क्र. एक
वर्ष 2013.
काँग्रेसच्या नेतृत्वाखाली युपीएचं सरकार.
पंतप्रधान होते डॉ. मनमोहनसिंग.
त्यांचे मंत्री अनेक घोटाळ्यांच्या आरोपात अडकलेले.
विशेष म्हणजे सरकारकडून त्वरित कारवाईपण चालू.
म्हणजे मंत्र्याकडून राजीनामे घेणे,
त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करणे, वगैरे.
त्यातच लिली थॉमस खटल्यामध्ये
सुप्रीम कोर्टाकडून एक निकाल येतो की,
कुठल्याही खासदार, आमदार वगैरे मंडळींना
जर दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाली तर
त्यांची खासदारकी/आमदारकी तर रद्द होईलच
पण शिक्षा भोगल्यानंतरही त्यांना पुढील सहा वर्षे
कुठलीच निवडणूक लढवता येणार नाही.
हा अतिशय धक्कादायक निकाल होता.
खरं तर दक्षिणेपासून ते उत्तरेकडचे
सर्वच राजकीय नेते आतून हादरले होते.
काही दिवसांतच लालू यादव यांच्या खटल्याचा
निकालही लागणार होता.
त्यामुळे सर्वच सहकारी पक्षांकडून
पंतप्रधानांना विनंती करण्यात आली
आणि तो कायदा रद्द करण्यासाठी
एक अध्यादेश काढण्याचे ठरले.
****
घटना क्र. दोन
राहुल गांधींना
भ्रष्टाचारी आणि गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांशी झालेला हा समझौता
पसंत पडत नाही.
ते त्वरित प्रेस कॉन्फरन्स घेतात.
त्यांची भूमिका स्पष्ट असते :
‘अगर आप देश मे फैले हुए भ्रष्टाचार से लढना चाहते है,
तो हमे राजनीतिक मजबुरीयो से
ऐसे समझौते नही करने चाहिये.
भ्रष्टाचार को किसी भी किमत पर बर्दाश्त नही किया जायेगा.
ऐसे अध्यादेश को फाडकर फेक देना चाहिये.’
झालं.. सगळीकडे बातमी पसरते.
‘राहुल गांधींनी
आपल्याच सरकारचा अध्यादेश फाडून फेकला’.
त्यांची बऱ्यापैकी बदनामीसुद्धा होते.
सर्व प्रकारे त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला जातो.
पण ते तडजोड करत नाहीत.
शेवटी सरकारला तो अध्यादेश रद्द करावा लागतो.
आणि याचा सर्वात आधी फटका बसतो
तो लालू प्रसाद यादव यांना.
****
घटना क्र. तीन
13 एप्रिल 2019 च्या लोकसभेच्या निवडणुका.
प्रचाराची रणधुमाळी.
काँग्रेसच्या सभांमध्ये ‘चौकीदार चोर है’ च्या घोषणा.
नेमके याचवेळी भारतीय बँकाची लुट करून
निरव मोदी, ललित मोदी, मल्ल्या, चोक्सी,
असे अनेक नेते परदेशात पळालेले.
राहुल गांधींची कर्नाटकमध्ये सभा.
त्यांचं भाषण जोरात.
ते बोलायला लागतात भ्रष्टाचाराबद्दल.
‘एक छोटासा सवाल ...
इन सब चोरों के नाम मोदी, मोदी, मोदी कैसे है?
नीरव मोदी, ललित मोदी, ...
और अभी थोडा ढुंढेंगे और बहुत सारे मोदी निकलेंगे’
आता विरोधी पक्षाकडून सरकारवर अशा टीका होत असतात.
तसं पाहिलं तर सर्वच राजकीय नेते अशा प्रकारे किंवा
या पेक्षाही वाईट भाषेत बोलत असतात.
लोक ऐकतात.
लोक विसरतात.
****
घटना क्र. चार
हे भाषण झाल्यानंतर तीन दिवसांतच
गुजरातमधील भाजपचे आमदार पुर्णेश मोदी हे
राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करतात.
संपूर्ण मोदी समाजाची बदनामी केली म्हणून
त्वरित गुन्हा दाखल केला जातो.
****
घटना क्र. पाच
2021 मध्ये सुरतच्या कनिष्ठ न्यायालयात खटला सुरु होतो.
प्रत्येक सुनावणीसाठी राहुल गांधी यांनी स्वतः हजर राहावे,
अशा मागण्या पुर्णेश मोदींकडून केल्या जातात.
त्यांचा हेतू स्पष्ट असतो.
कसंही करून राहुल गांधींना त्रास द्यायचा.
पण मा. न्यायाधीश त्या मागण्या मान्य करत नाही.
शेवटी आपल्या मनासारखं होत नाही म्हटल्यावर
पुर्णेश मोदी स्वतः उच्च न्यायालयात जातात
आणि या खटल्यावर ‘स्टे’ आणतात.
प्रकरण हळूहळू आपोआप संपेल असे वाटायला लागते.
****
घटना क्र. सहा
7 फेब्रुवारी 2023 रोजी लोकसभेत अदानी प्रकरण सुरु होतं.
प्रचंड हंगामा सुरु होतो.
‘अदानी-मोदी भाई भाई’ अशा घोषणा सुरु होतात.
‘अदानीच्या कंपनीमध्ये गुंतवले गेलेले
वीस हजार कोटी रुपये कुणाचे आहेत?’
अशा प्रकारचे अनेक अवघड प्रश्न विचारले जातात.
परत एकदा राहुल गांधी चर्चेत येतात.
त्यांच्या भाषणातील बराचसा भाग
संसदेच्या कामकाजातून वगळण्यात येतो.
****
घटना क्र. सात
भाजपचे आमदार पुर्णेश मोदी अचानक सक्रीय होतात.
दहा दिवसांतच म्हणजे 16 फेब्रुवारी 2023 ला
उच्च न्यायालयात परत जातात.
आपल्याच खटल्यावरचा ‘स्टे’ परत घेतात.
आणि राहुल गांधींच्या विरोधात दाखल झालेला खटला
परत सुरु होतो.
न्यायालयीन लढाई चार वर्षांनी परत सुरु होते.
आता निकाल यायला आणखी किती वर्षे लागतील?
असा प्रश्न निर्माण होतो.
****
घटना क्र. आठ
काही दिवसांतच म्हणजे 27 फेब्रुवारीलाच
त्या न्यायालयात नवीन न्यायमूर्तींची नेमणूक होते.
आधीचे न्यायमूर्ती बदलले जातात.
आणि जोरात चक्र सुरु होते.
महिन्याभरातच निकाल जाहीर केला जातो,
हे बघितल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो.
विशेष म्हणजे अशा प्रकारच्या मानहानीच्या गुन्ह्यात
जास्तीत जास्त दोन वर्षांची शिक्षा सुनावता येते.
अशा स्थितीमध्ये जगभरातील मा. न्यायालये
शक्यतो काही रक्कम दंड म्हणून किंवा
दिवसभर न्यायालयात बसा, वगैरे
अशा प्रकारच्या प्रातिनिधिक शिक्षा देताना दिसतात.
जेव्हा राहुल गांधींना माफी मागाल का? असा प्रश्न
विचारण्यात येतो तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर असतं :
“मैं राजकीय नेता हूं और इस नाते से
भ्रष्टाचार का खुलासा करने के लिए मैंने यह बयान दिया था.
मैंने जो कहा, वह मेरा फर्ज था.
मैंने हमेशा भ्रष्टाचार के खिलाफ आवाज उठाई है.
मेरा इरादा कभी गलत या किसी को ठेस पहुंचाने का नहीं था.
हमें दया नहीं चाहिए.”
मा. न्यायमूर्ती अवघ्या महिनाभरातच हा खटला संपवतात
आणि 23 मार्च 2023 ला राहुल गांधी यांना
कायद्याप्रमाणे देता येणारी जास्तीत जास्त शिक्षा सुनावतात.
ती शिक्षा असते : दोन वर्षांची सजा.
****
घटना क्र. नऊ
इकडे सुरतमध्ये गुजरातच्या कनिष्ठ न्यायालयाने
गुजराती भाषेत लिहिलेल्या आपल्या 175 पानी निकालपत्रात
राहुल गांधींना शिक्षा सुनावली न सुनावली की
तिकडे दिल्लीमध्ये लोकसभा सचिवालय
राहुल गांधी यांची खासदारकी त्वरित रद्द करते.
त्यापेक्षाही जास्त वेगाने प्रशासन काम करते.
राहुल गांधी यांना महिन्याभरातच
सरकारी घर खाली करायलासुद्धा सांगितले जाते.
आणि त्याच वेगाने राहुलसुद्धा आपलं सरकारी घर सोडतो.
****
घटना क्र. दहा
लोक म्हणायला लागतात :
‘कनिष्ठ कोर्टाने शिक्षा दिली पण सत्र न्यायालयात न्याय मिळेल.’
‘भारतात संविधान आहे. घटनेप्रमाणे राज्य चालतं.’
‘त्याने कुणाची मुद्दामहून बदनामी केलेली नाही.’
‘ज्यांची नावं घेतली त्यांनी खटला दाखल केलेला नाही.’
‘इतकी कठोर शिक्षा? कमालच आहे!’
‘त्याच्या वक्तव्यामुळे कुठं दंगे झाले का?
जान-मालचं नुकसान झालं का?’
‘त्याची शिक्षा रद्द होईल. मार्क माय वर्ड!’
काही लोक असंही म्हणतात,
‘गुजरातमध्ये न्याय मिळणं कठीण दिसतंय.
मा. न्यायालयासमोर ज्या बाबी सादर केल्या जातील
त्या बघूनच ते निर्णय देतात.’
‘आता न्याय सुप्रीम कोर्टातच!’
सत्र न्यायालयात याचिका दाखल केली जाते.
याचिका फेटाळली जाते.
राहुल गांधी यांची शिक्षा रद्द होत नाही.
दरम्यान भारतात बऱ्याच ठिकाणी
राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले जातात.
त्यात बिहारमधील भाजपचे खासदार आणि माजी उपमुख्यमंत्री
सुशील मोदीही असतात.
दरम्यान राहुल गांधींच्या विरोधात मा. न्यायालयामध्ये
अतिशय चांगल्याप्रकारे खटला लढवून त्यांना योग्य ती शिक्षा दिल्यामुळे
22 मे 2023 रोजी मा. गृहमंत्री श्री. अमितभाई शहा यांच्या हस्ते
श्री. पुर्णेश मोदी यांचा जाहीर सत्कार करण्यात येतो.
****
घटना क्र. अकरा
मग मा. उच्च न्यायालयात राहुल गांधींतर्फे
पुनर्विचार याचिका सादर केली जाते.
न्या. गीता गोपी या सुनावणीपासून स्वतःला दूर ठेवतात.
आपल्या न्यायालयात हा खटला लढवण्यासाठी त्या नकार देतात.
मग ती याचिका सुनावणीसाठी येते,
न्या. हेमंत एम प्रच्चक यांच्या न्यायालयात.
न्या. हेमंत एम प्रच्चक हे गुजरातमधील अतिशय ख्यातनाम व्यक्तिमत्त्व.
मोदीजी मुख्यमंत्री असताना म्हणजे 2002 ते 2007 पर्यंत
ते गुजरात सरकारचे वकील [APP] होते.
2015 ते 2019 मध्ये ते गुजरात मध्ये केंद्र सरकारचे वकील होते.
अशा वरिष्ठ न्यायमूर्तींच्या न्यायालयात
या पुनर्विचार याचिकेची सुनावणी सुरु होते.
यात मुख्य दोन मुद्दे असतात.
एक तर कनिष्ठ न्यायालयाने
दोषी म्हणून दिलेला निवाडा [conviction] आणि
त्या अनुषंगाने दिलेली शिक्षा [sentence]
या दोन्ही बाबींवर ‘स्टे’ देण्यासाठी
हा विनंती अर्ज केलेला असतो.
कारण अशा शिक्षेमुळे होणारे संपार्श्विक नुकसान [collateral damage]
हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा असतो.
कारण या शिक्षेमुळे खासदारकी रद्द होणार असते,
त्यामुळे त्या मतदारसंघातील लाखो लोकांवर अन्याय होणार असतो,
असे अनेक कायदेतज्ञ सांगतात.
याच मुद्द्यामुळे
नवज्योतसिंग सिद्धू यांना न्यायालयाने ‘स्टे’ दिला होता,
असेही सांगण्यात येते.
सिंद्धूंकडून झालेल्या मारहाणीमुळे तर
एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला होता.
तरीही त्यांना ‘स्टे’ मिळाला होता.
राहुल गांधींची केस त्या मानाने फारच किरकोळ होती.
त्यांना सहज ‘स्टे’ मिळेल असं सांगण्यात येत होतं.
पण मा. न्यायमूर्तींनी
त्यांची पुनर्विचार याचिका रद्द केली.
आपल्या 125 पानांच्या निकालपत्रात
त्यांनी अनेक गोष्टींचा उल्लेख केला.
राहुल गांधी हा नेहमीचा/सवयीचा गुन्हेगार [Habitual Offender] आहे.
त्यांच्याविरोधात आठ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे
वीर सावरकर यांच्या नातवानेही राहुल विरोधात
गुन्हा दाखल केलेला आहे.
अशा अनेक बाबींचा उल्लेख करत हेही सांगण्यात आले की,
ही याचिका रद्द केल्याने त्यांच्यावर अन्याय झालेला नाही.
****
उच्च न्यायालयाने दिलेल्या दणक्यामुळे
सर्वत्र खळबळ माजणे स्वाभाविक होते..
काँग्रेसकडून सांगण्यात येत होते की, हे एक षडयंत्र आहे.
भाजपचे प्रवक्ते म्हणतात की,
‘कसं बोलावं, कसं वागावं’ हे
काँग्रेसवाले राहुल गांधींना का शिकवत नाहीत?
माफी मागायला सांगितली तर
राहुल म्हणतात, ‘मै सावरकर नही हुं’
यात भाजप प्रवक्त्यांचा सात्विक संतापही दिसतो.
राहुल गांधींची प्रतिक्रिया मात्र
अनेकांना चकित करणारी आहे.
‘मै हिंदुस्थान के लोकतंत्र के लिये लढ रहा हुं
और आगे भी लढता रहूंगा...
चाहे मुझे सदस्यता मिले या ना मिले
मै अपना काम करता रहूंगा...
मुझे पुरे जीवन के लिये अयोग्य करार दे दिया जाये,
चाहे मुझे जेल मे डाल दिया जाये,
मै सवाल पूछना बंद नही करुंगा...’
एवढं बोलून ते हरियानातील एका शेतकऱ्यासोबत
त्याच्या शेतात भाताची लागवड करताना दिसले.
****
काँग्रेसने 2024 विसरावे, याची त्यांना जाणीव आहे.
‘भारत जोडो’ यात्रेने एका नव्या राहुल गांधींची निर्मिती केलेली आहे.
आपलं आयुष्य फक्त दीनदुबळ्या गरीब जनतेसाठी,
हेच त्याचं ध्येय दिसतं.
सतत मिळालेल्या सत्तेमुळे
काँग्रेसचे नेते आपली विचारधारा पूर्णपणे विसरलेले आहेत,
याची त्यांना जाणीव आहे.
आरएसएस आणि जनसंघ यांनी
आपली विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी
अनेक दशके मेहनत घेतली त्याप्रमाणेच
परत काँग्रेसला नव्याने सुरुवात करावी लागेल.
प्रवास खडतर आहे.
रस्ता खाचखळग्यांचा आहे.
समोर सर्वच दृष्टीने प्रचंड ताकद असलेला पक्ष आहे.
त्यात मतांच्या राजकारणापासून
राहुल बाजूला सरकायला लागले आहेत, असं दिसतं.
लोक असेही म्हणतात की, या सर्व गडबडीत
जर सर्वोच्च न्यायालयातही त्याची शिक्षा कायम राहिली
आणि त्याला तुरुंगात जावे लागले
तर तो भारतातील अतिशय लोकप्रिय नेता होईल.
संपूर्ण राजकारण मुळापासून स्वच्छ करण्याची त्याची तळमळ
आणि गोरगरिबांसाठी काम करण्याची वृत्ती
भारतातील लोकांना माहीत आहे.
शिवाय पप्पू म्हणून प्रचंड मेहनत करून
तयार केलेली त्याची प्रतिमाही नष्ट झालेली आहे.
त्याने सांगितलेल्या देशहिताच्या गोष्टी
जसे नोटबंदी, जीएसटी, कोविड, चीन-भारत संघर्ष
यावर केलेले भाष्य खरे ठरलेले आहे.
राहुल आणि मोदीजींची तुलना करताना एक प्राध्यापक मित्र बोलत होते,
‘भारतातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत मोदीजी.
त्यांचं भव्य दिव्य व्यक्तिमत्त्व.
अनेक लोक त्यांच्याकडे देव म्हणून पाहतात.
त्यांच्या कार्यक्रमाचे भव्य दिव्य ‘इवेन्ट’ असतात.
दिवसांतून अनेक वेळा ते कपडे बदलतात,
लाखो लोकांचा समुदाय ‘मोदी...मोदी’च्या घोषणा देत असतो.
हजारो कोटी रुपयांच्या विमानात ते फिरतात.
तरीही त्यांच्या समोर राहुलचं व्यक्तिमत्त्व बघा.
तो सामान्य लोकांमध्ये मिसळतो.
हजारो किलोमीटरची पदयात्रा करतो.
गोरगरीबांमध्ये मिसळतो.
एखाद्या मेकॅनिकबरोबर गाडी दुरुस्त करतो. बोलतो.
ट्रकवाल्यांबरोबर फिरतो.
त्यांच्या समस्या त्यांचं दुःख समजावून घेतो.
त्याने केलेली तपस्या त्याला सर्व काही त्यागण्याची ताकद देते.
तो भारतातील जनतेच्या मनावर राज्य करणारा
एक अनभिषिक्त सम्राट झालाय.’
मी बराच वेळ त्याचं म्हणणं ऐकत होतो.
पण प्रश्न पडला की, राहुल
एका राजकीय पक्षाचा प्रमुख नेता आहे.
सत्ता मिळवणं ध्येय असायला पाहिजे.
तो काही सेवाभावी संस्था चालवत नाही.
तपस्या, त्याग, वगैरे ठीक आहे पण मतदारांसाठी काय?
उद्या खरंच तो तुरुंगात गेला तर 2024 तर सोडाच
पण 2029 मध्ये सुद्धा त्याला निवडणूक लढवता येणार नाही.
विरोधी पक्षाचे लोक
इडी, वगैरेच्या भीतीतून बाहेर आले नाही तर
रस्त्यावरही उतरणार नाहीत.
आणि भाजपवाले म्हणतील :
‘आम्ही काय केलंय? त्याला तर न्यायालयाने शिक्षा दिली.’
म्हणजे परत मुत्सद्दी राजनेत्याचा प्रसिद्ध संवाद :
‘हम आपका कत्ल तो करेंगे,
मगर आपको शहीद नही होने देंगे’
आता सर्व काही सर्वोच्च न्यायालयाच्या हातात!
- दिलीप लाठी
diliplathi@hotmail.com
(लेखक, वसुधा रिसर्च अँड पब्लिकेशन्स प्रायव्हेट लि.चे व्यवस्थापकीय संचालक आहेत.)
Tags: राहुल गांधी काँग्रेस भाजप नरेंद्र मोदी मनमोहनसिंग दिलीप लाठी पुर्णेश मोदी राजकारण सर्वोच्च न्यायालय Load More Tags
Add Comment