सर्वसामान्य लोकांना सहन करता येणार नाहीत
असे धक्क्यांमागून धक्के महाराष्ट्राच्या राजकारणात बसत आहेत.
किंबहुना मागच्या नऊ-दहा वर्षांमध्ये
सतत काही ना काही घडत आहे.
दररोज.
नवनवीन घडामोडी. नवनव्या घटना.
आपल्यासमोर काही ना काही वाढलेलं असतं.
एक धक्का बसला.
त्यातून सावरतो न सावरतो तोच दुसरा धक्का!
***
काही दिवसांपूर्वीच आपले पंतप्रधान
अमेरिका, इजिप्त वगैरे देशांचा दौरा करून आले.
टीव्हीवर दररोज दिसणाऱ्या बातम्या पाहून
आपण संपूर्ण जगच जिंकलं आहे,
अशी भावना सामान्य लोकांच्या मनात निर्माण होत होती.
जेव्हा पंतप्रधान भारतात परतले तेव्हा त्यांचं जबरदस्त स्वागत झालं.
असं म्हटलं जातं की, स्वागतासाठी आलेल्या भाजपच्या अध्यक्षांना
त्यांनी एअर पोर्टवरच विचारलं,
की, देशात काय चाललंय?
इकडे तर विरोधी पक्षांची पाटण्यात बैठक झाली होती.
ती बऱ्यापैकी यशस्वी झाली होती.
काँग्रेसपासून ते आम आदमी पार्टीपर्यंत
सर्वच पक्ष सहभागी झाले होते.
नितीश कुमार सोबतच शरद पवारांची भूमिकाही
अत्यंत महत्त्वाची झाली होती.
त्यातच महाराष्ट्रातील ‘महा विकास आघाडी’
आतल्या आत मजबूत होताना दिसत होती.
शिंदेंची शिवसेना म्हणावा तसा चमत्कार दाखवू शकत नव्हती.
ठाकरे ब्रँड आणि
हिंदुत्व मतांमध्ये प्रमुख हिस्सेदार असलेली ठाकरेंची शिवसेना
‘खल्लास’ होत नव्हती.
उलट सर्व महत्त्वाचे आमदार, खासदार जाऊनही
ठाकरेंची शिवसेना
दिवसेंदिवस मजबूत होताना दिसत होती.
लोकांची सहानुभूती वाढतच होती.
त्यात परत शिंदेंच्या पक्षातील सिनियर मंडळी
‘आमच्या पन्नास लोकामुळेच हे सरकार आलंय’
याची जाणीव सतत भाजपला करून देत होती.
जाहिरातीद्वारे ‘तू मोठा की मी मोठा’ असा विचित्र खेळही
सुरु झाला होता.
त्यात शरद पवारांनी वेळोवेळी केलेल्या राजकीय चालीमुळे
त्यांच्या पक्षात फुट पडत नव्हती.
इन्कम टॅक्स, सीबीआय, इडी
(सुप्रिया ताईंसहित संसदेतील विरोधी पक्षाच्या लोकांचं
कोड वर्ड म्हणजे म्हणजे ICE)
यांचा उपयोग/दुरुपयोग भाजपला पूर्णपणे साथ देत नव्हता.
अजित दादा यांच्या कुटुंबियांपर्यंत इडी पोचली होती.
भुजबळ साहेब दोन वर्षं आत राहून आले होते.
पण अजूनही केसेस बाकी होत्या.
हसन मुश्रीफसुद्धा इडीच्या धाडीमुळे त्रस्त होते.
अटक होऊ नये म्हणून कोर्ट कचेऱ्या चालू होत्या.
त्यांचे कुटुंबीयसुद्धा इडीच्या पिडेमुळे त्रस्त झालेले
आपण टीव्हीवर पाहिले होते.
‘आम्हाला गोळ्या घालून मारून टाका’ - अशी वाक्यंही
घरातल्या माता-भगिनींकडून येत होते.
प्रचंड अस्वस्थता होती.
सुनील तटकरे असो की इतर नेते, सर्वच त्रस्त होते.
प्रफुल पटेल यांची तर गोष्टच वेगळी.
ते शरद पवार साहेबांचे खास.
पण त्यांचीही मालमत्ता इडीने जप्त केलेली होती.
****
हे सर्व पाहत असताना अचानक एक घटना आठवली.
अशाच त्रासाची. अशाच जाचाची.
एकंदर खेळ तोच!
महाविकासआघाडीचं सरकार असताना
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी
आपली दर्दभरी कहाणी कथन करून
भाजपबरोबर जाणंच योग्य आहे, असं सांगितलं होतं.
त्यांनी एक पत्र मा. मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं होतं.
ते खूप व्हायरलही झालं होतं.
त्यामध्ये त्यांनी आपलं दुखणं जाहीरपणे मांडलं होतं.
अचानक त्यांच्या मालमत्तेवर धाडी पडतात.
मोठ्या मुलाला इडी बोलावतेय.
सर्वांनाच त्रास सुरु होतो.
पण कारवाई चालूच असते, त्रास वाढतच असतो.
सर्व काही सहन करायचं ते आपल्याला
आणि आपल्या कुटुंबियांनाच,
हे त्यांना कळून चुकलेलं असतं.
फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन वाढतंच असतं.
आपण भ्रष्टाचारी आहोत म्हणून
बीजेपीचे माजी खासदार पिपाणी घेऊन गावभर वाजवत असतात.
बदनामी चालू असते.
पण कारवाई बंद करणार कोण?
केंद्र सरकारला सांगणार कोण?
प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत.
अशा अवस्थेत त्यांनी पत्र लिहिलंय.
त्यातला आशय -
“कोणताही गुन्हा नसताना
केंद्रीय तपास यंत्रणांकडून
नाहक त्रास सुरु आहे.
तपास यंत्रणेचा दलाल व
माजी खासदार बदनामी करत आहे.
कुटुंबियांना त्रास देत आहेत.
एका केसमध्ये जामीन मिळाला की,
दुसऱ्या केसमध्ये गुंतवणे
त्यातून बाहेर आलो की, तिसऱ्या केस मध्ये...
आपण पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्र मोदीजी
यांच्याशी जुळवून घेतलेलं बरं...
आपल्या एका निर्णयामुळे हे थांबेल ...
युद्धात अभिमन्यूसारखं लढण्यापेक्षा
किंवा कर्णासारखं बलिदान देण्यापेक्षा
धनुर्धारी अर्जुनासारखं लढावं.”
इतका स्पष्ट सल्ला त्या आमदार महोदयांनी दिला होता.
त्यावेळचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना
कळकळीची विनंती करून कळवले होते.
पण उद्धवजींनी ते ऐकलं नाही.
भाजपबरोबर तडजोड केली नाही.
शेवटी पक्ष फुटला. जवळचे लोक सोडून गेले.
सत्ता गेली.
मुख्यमंत्रीपदही गेलं.
पक्षही गेला.
धनुष्यबाणही गेलं.
आमदार-खासदारही गेलेत.
***
आज फक्त पात्रं बदललेली आहेत.
परिस्थिती तशीच आहे.
उद्धवजींच्या भूमिकेत स्वतः शरद पवार साहेब आहेत.
थोडक्यात सांगायचं म्हणजे
‘भाजपला शरण जाणंच योग्य’ असं
सर्वच उद्योगी नेत्यांना वाटत असतं.
तशाच प्रकारचा प्रयत्न
आता एनसीपीमध्येही सुरु झाला होता.
अनेक त्रस्त नेते आपलं म्हणणं
पवारसाहेबांना वारंवार सांगत होते.
पण उद्धवजींप्रमाणेच पवार साहेबांनी
आपली भूमिका बदलली नाही.
पवार साहेब ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
उलट ते या नेत्यांना समजावून सांगत होते की,
‘भाजपबरोबर गेल्याने
फक्त इडीच्या टेबलावर असलेली फाईल
कपाटात जाईल.
पण बंद होणार नाही.
धैर्य दाखवा. सामोरे जा.’
असा सल्ला या काळात कुणीही ऐकणं अवघड असतं.
तपासयंत्रणांकडून विविध मार्गाने दबाव निर्माण केला जात होता.
***
नेमकी त्यावेळी उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता वाढत होती.
तिन्ही पक्षांच्या मिळून होणाऱ्या
‘वज्रमुठ’ सभांना प्रचंड प्रतिसाद मिळत होता.
‘आपण शिवसेनेला फोडून चूक केली की काय?’,
भाजप नेत्यांना असं वाटणं स्वाभाविक होतं.
आणि परत भाजपकडून एनसीपीवर कब्जा करण्यासाठी
जोरदार हल्ला झाल्याचं बोललं जातं.
याची कुणकुण उद्धव ठाकरे आणि संजय राउत यांना लागली.
त्यांनी पवार साहेबांची भेट घेतली.
पवार साहेबांना स्पष्टपणे त्यांची भूमिका विचारण्यात आली.
आणि साहेबांनीही सांगितलं,
‘काही नेते इडीमुळे त्रस्त आहेत.
त्यांच्या कुटुंबीयांवर पण दबाव आहे.
आणि त्यांना भाजपमध्ये जायचं आहे.
एनसीपी भाजपला पाठिंबा देणार नाही.
वैयक्तिकरित्या ते लोक जाऊ शकतात.’
दरम्यान ‘वज्रमुठ’ सभा तहकूब झाल्या होत्या.
पुढे पवार साहेबांनी एनसीपीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
पण नेतृत्वबदल करून कदाचित ताईंना अध्यक्ष करून
त्यांच्यासमोर जर सर्वच नेत्यांनी एका सुरात सांगितलं की,
‘आपण भाजपला पाठिंबा देऊ’, तर त्यांना ऐकावंच लागेल,
असा विचार केलेले नेते तोंडघशी पडले.
साहेबांना राजीनामा परत घ्यावा लागला.
आणि परत एकदा
भाजपची एनसीपी फोडण्याची योजना अयशस्वी झाली.
***
भाजपसाठी ही धोक्याची घंटा होती.
***
भाजपचे बरेच जुनेजाणते कार्यकर्ते
एनसीपी-भाजप युतीच्या विरोधात होते.
80 तासांच्या ‘फडणवीस-अजित पवार’ सरकारमुळे
आपल्या पक्षाने विश्वासार्हता गमावली असं त्यांना वाटत होतं.
म्हणूनच ‘ती आपली चूकच झाली होती’,
असं फडणवीसांसारखे नेतेही बोलायला लागले.
भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरणं स्वाभाविक होतं.
***
अशा परिस्थितीत
मिडियाच्या नजरेत ‘संपूर्ण जग जिंकून आलेले’ मोदीसाहेब
27 जूनला मध्यप्रदेशच्या दौऱ्यावर जातात.
आधीच मध्यप्रदेशमध्ये भाजपची हालत खराब आहे.
काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले ‘शिंदे’
भाजपसाठीच डोकेदुखी बनत आहेत.
तेथील जनमत चाचण्या भाजप विरुद्ध लहर दाखवत आहेत.
यापूर्वी कर्नाटकच्या जनतेने दिलेल्या झटक्यामुळे
भाजपच्या उच्चस्तरीय नेत्यांनाही सांगण्यात आलेले आहे की,
‘फक्त ‘मोदी ब्रँड’ आणि ‘हिंदुत्व’ या दोनच गोष्टींवर
सत्ता मिळणं अशक्य आहे.’
‘ऑर्गनायझर’मध्ये तसं प्रसिद्ध झालेलं आहे.
त्यात परत पंजाबमधील अकाली दल,
बिहारमधील नितीश कुमार, महाराष्ट्रातील ठाकरे शिवसेना,
असे अनेक महत्त्वाचे पक्ष विरोधात गेलेले.
युपी, बंगाल, मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र
अशा अनेक राज्यांमध्ये लोकसभेच्या जागाही कमी होतील,
असा सर्वच सर्व्हेंचा अंदाज.
आणि लोकसभेच्या निवडणुका आता नऊ महिन्यांवर आलेल्या.
त्यामुळे मोदी-शहा यांच्याकडून
अतिशय ‘कडक’ रणनीती आखली जाणं अपेक्षित.
अशा वेळी एक कार्यक्रम आयोजित केलेला असतो.
तोही भाजपाच्या सामान्य कार्यकर्त्यांसाठी.
निवडणुकांचे ‘बूथ’ सांभाळणारे प्रामाणिक कार्यकर्ते.
मोदीजींचं भाषण त्यांच्यामध्ये नेहमीच जोश निर्माण करत असतं.
हे सर्व मध्यप्रदेशमध्ये चालू असले तरी
अचानक मोदीजी महाराष्ट्राबद्दल बोलू लागतात.
एनसीपीबद्दल बोलू लागतात.
एनसीपीच्या भ्रष्ट नेत्यांबद्दल बोलू लागतात.
शिखर बँक घोटाळा, सिंचन घोटाळा, अवैध खनन घोटाळा,
सत्तर हजार कोटी रुपयांचा घोटाळा...
सगळेच विषय त्यांच्या भाषणात येऊ लागतात.
भाजपचे सामान्य कार्यकर्ते जेव्हा मोदीजींचं भाषण ऐकू लागतात,
तेव्हा एक जोश निर्माण होतो.
विशेषतः जेव्हा मोदीजी मुठी आवळून, छातीवर हात ठोकून,
आवाजाची नाट्यमय चढ-उतार करून आणि
श्रोत्यांशी सरळ कनेक्ट होऊन प्रश्न विचारतात
भ्रष्टाचाराच्या विरोधात
त्यांच्या हृदयातून आलेला हुंकार
जेव्हा लोक ऐकतात
तेव्हा प्रचंड नाट्यमय वातावरण तयार होतं.
भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या विरोधात
लाखो लोक पेटून उठतात.
‘अगर मैं एनसीपी कि बात करू,
तो एनसीपी पर भी करीब करीब
सत्तर हजार करोड रुपये के घोटालों का आरोप है,
महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक घोटाला, महाराष्ट्र सिंचाई घोटाला,
अवैध खनन घोटाला, इनकी लिस्ट भी बहुत लंबी है.
इस पार्टी के घोटालों का मीटर कभी डाऊन ही नही होता...’
पुढे छाती ठोकून जेव्हा ते बोलू लागतात
त्यांचे हातवारे, आवाजातील बदल आणि
लोकांना ‘डायरेक्ट’ प्रश्न विचारून साधला जाणारा संवाद :
‘जिसने देश को लुटा है...जिसने गरीबों को लुटा है...
इनके खिलाफ कारवाई होनी चाहिये कि नही होना चाहिये?
अगर इनकी घोटालों की गारंटी है,
तो मोदी की भी गारंटी है...
कारवाई की गारंटी’
लाखो कार्यकर्त्यांचा जोश, आक्रोश, आणि
‘मोदी...मोदी’च्या घोषणा सर्वत्र घुमू लागतात.
देशभरात विखुरलेले सर्वच भाजप कार्यकर्ते,
मोदीजींवर प्रचंड प्रेम करणारे भक्त आणि
कशाचंही काहीही देणंघेणं नसणारे सामान्य मतदार,
सामान्य लोक सगळ्यांचंच रक्त खवळायला लागलं.
भाजपवर प्रेम करणारे सामान्य लोक सहज बोलून जातात,
‘मानलं मोदीजींना.
त्यांनी बरोबर ओळखलं आमच्या मनात काय आहे?
एनसीपी नको. नको म्हणजे नको.
आता फक्त बघा.
मोदीजी कशी कारवाई करतात.
एका आठवड्यातच हे सगळे नेते जेलमध्ये जातील.’
मोदीजींचा ‘मेसेज’ एकदम स्पष्ट होता.
आता लढाई फक्त भ्रष्टाचाराच्या विरोधात!
राजकीय विचारवंत मत मांडू लागतात की,
‘आता भाजप आणि एनसीपी यांचं गठबंधन होणं शक्य नाही.’
फक्त भाजपचेच नाही तर देशातील सर्वात मोठे नेते,
सर्वात लोकप्रिय नेते,
आणि देशाचे मजबूत पंतप्रधान सांगतात,
जाहीरपणे सांगतात,
सर्वांसमोर सांगतात,
धमकी देऊन सांगतात,
म्हटल्यावर ‘भाजप-एनसीपी’ हा विषय पूर्णपणे बंद झाला,
असं सगळेच मानतात.
सर्वच लोक मंत्रमुग्ध झालेले असतात.
वातावरणात एक वेगळीच जादू निर्माण होते.
अतिशय विलोभनीय दृश्य!
पण कल्पना करा हे भाषण
अजितदादा, भुजबळ साहेब, प्रफुल्ल सेठ,
मुश्रीफसाहेब, तटकरे साहेब,
वगैरे मंडळींनी एकत्र बसून बघितलं असतं तर काय झालं असतं?
पुढच्या चार दिवसांतच दिसणारं दुसरं विलोभनीय दृश्य!
अजित दादा पवार – उपमुख्यमंत्री.
छगन भुजबळ, वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ,
अदिती तटकरे, ...एकामागून एक चेहरे येतात.
भाजपच्या सरकारमध्ये मंत्री बनतात.
मोदीजींचे भाषण ऐकताना आपलंही रक्त उसळून
भ्रष्टाचाराच्या विरोधात ओरडणारे सामान्य लोकही अवाक् होतात.
‘अरे ही तर एकदम वेगळीच कारवाई दिसते!
विश्वास ठेवावा कुणावर?’
थोडा वेळ आवंढा गिळून म्हणतात,
‘राजकारण आहे बाबा. चला आपल्याला टमाटे विकत आणायचे आहेत.’
***
शेवटी जे व्हायचं होतं ते झालं.
‘उद्धव ठाकरेंना परिस्थिती हाताळता आली नाही’,
असं बोलणाऱ्या शरद पवारांसाठीसुद्धा तीच परिस्थिती निर्माण झाली.
आमदार निघालेत.
खासदार निघालेत.
पक्ष हातातून चाललाय.
आणि सुरु झाला राजकारणातील गच्चाळ खेळ!
पक्ष आमचा!
कार्यालय आमचं!
व्हीप आमचा!
अध्यक्ष आमचा!
आम्ही तुम्हाला पक्षातून काढू.
तुम्ही आम्हाला पक्षातून काढा.
विधानसभा अध्यक्षासाठी नवं प्रकरण!
नवा खटला.
पुढे निवडणूक आयोग येईलच.
पुढे परत कोर्टकचेऱ्या.
नेते कदाचित एकमेकांची मजबुरी समजून घेत असतीलही.
पण खरं मरण कार्यकर्त्यांचंच!
कधीही, कुठंही एकमेकांची डोकी फोडायला तयार!
याची झलक दिसली नाशिकमध्ये.
***
जे व्हायचं होतं ते झालं.
पण काही प्रश्न निर्माण होतात.
एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार यांना काय वाटलं असेल?
अजित दादा आणि मंडळींचं काय चुकलं?
शरद पवार यांनी हा प्रस्ताव का स्वीकारला नसेल?
भाजपने बहुमत असतानासुद्धा एनसीपीला का सत्तेत सहभागी केलं?
पक्षांतर बंदी कायदा अपयशी ठरतोय का?
पुढे काय होईल?
(उत्तरार्ध उद्या सकाळी प्रसिद्ध होईल.)
- दिलीप लाठी
diliplathi@hotmail.com
(लेखक, वसुधा रिसर्च अँड पब्लिकेशन्स प्रायव्हेट लि.चे व्यवस्थापकीय संचालक आहेत.)
Tags: शरद पवार भाजप देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राजकारण नरेंद्र मोदी mns nationalistcongressparty jayantpatil rohitdadapawar modi dhananjaymunde election pawarspeaks badlavyatra narendramodi ncpyouthofficial ajitdadapawar amitshah ig balasahebthackeray rajthackeray amolkolhe rahulgandhi adityathackeray penggemukbadan dada maskerspirulina maskerhijau memes peninggibadan zinc nashik maratha support news Load More Tags
Add Comment