बदल घडतात यावर माणसांचा विश्वास हवा

वरदान रागाचे- भाग 26

जर्मनीतील ज्यू छळछावणीचे प्रवेशद्वार

दुसऱ्या महायुद्धात बर्लिनमध्ये निरर्थक तिरस्काराचा बळी ठरलेल्या ज्यूंच्या स्मरणार्थ हॉलोकॉस्ट इथं एक स्मृतीस्थळ उभारलं आहे. इथल्या एका चौकात एक फलक आहे. दुसऱ्या महायुद्धात उद्ध्वस्त झालेल्या बर्लिन शहराचे तपशील त्यावर आहेत. इमारती नष्ट झाल्या, लाखो माणसं मेली. जी जिवंत उरली ती गलितगात्र होऊन अन्नपाण्यासाठी तडफडतानाच्या प्रसंगांची चित्रं फलकावर आहेत. जिवंत उरलेली जर्मन माणसं सगळ्या धर्मांची होती, भुकेली होती, निराश होती. तिरस्काराचा प्रतीकात्मक पराभव झाला तरी कितीतरी निर्दोष माणसांनीही त्यांची स्वप्नं गमावली, आपला निवारा गमावला. 

भूतकाळातल्या या सगळ्या तीव्र आठवणी आणि त्यांची स्मारकं आपल्याला शिकण्यासाठी प्रवृत्त करतात. सहवेदना जागवतात.

...पण खरंच आपण शिकतो का भूतकाळातून? बदल होतो का आपल्यात? नाझीवृत्तीतून उफाळलेला उन्माद आणि तिरस्कार जगभरातल्या अनेक देशांमध्ये आजही आपण पाहतो आहोत हा खरा धोकादायक मामला आहे...

माणसामाणसांना विभक्त करणारा. शाळांच्या स्तरावर भडकलेले छळवाद, रस्त्यांवर होणारी मारझोड आणि नाना त्रास, सामूहिक हत्या, जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात होणारं विस्थापन हा या सगळ्याचा परिपाक आहे. दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या समाप्तीनंतरही तिरस्काराच्या या वणव्यानं घास घेणं थांबवलेलं नाही. कंबोडिया, रवांडा आणि बोस्निया या ठिकाणी घडलेले मनुष्यवध हीच कहाणी सांगत राहतात. सिरियाचा विध्वंस अलीकडचाच.

द्वेषाच्या वणव्यात होरपळ सोसावी लागलेले हे देश आपल्यापासून खूप लांबयेत, त्यांनी भोगलेली दहशत आपण लांबून पाहिलीय... पण तीही आपल्यासारखीच माणसंयेत. त्यांनाही जीवनात काहीतरी अर्थपूर्ण करायचंय, आपल्या कुटुंबाला जपायचंय, मुलांना सुरक्षित छत द्यायचंय, बांधवांना मदत करायचीय, सगळ्यांसह शांततेत नि सुखात आयुष्य घालवायचंय. इतकी साधीसोपी आणि पूर्ण करता येतीलशी स्वप्नं पाहणारी ही सगळी माणसं आत्ता कुठंयत? ही सगळी कुठंतरी निर्वासितांसाठी उभारलेल्या तात्पुरत्या छावण्यांमध्ये जगतायत... कुणालाच आपली काळजी नाहीये का? कुणी उठून आपल्याला मदत करणारये की नाही या विवंचनेत त्यांचे दिवस सरताहेत.

आपल्यातल्या जुळणाऱ्या गोष्टी एकदा ओळखू यायला लागल्या की आपण स्वतःकडं आणि जगाकडंही  वेगळ्या नजरेनं पाहायला लागतो. सध्या चाललेल्या भांडणांमध्ये किंवा संघर्षात, दुःखात आपला तसा काही संबंध नाही असं वाटल्यामुळं तुम्ही बाजूला राहाल तर कदाचित आज एका गटाचे असणारे तुम्ही उद्या बहिष्कृत व्हाल. वंश, धर्म, राष्ट्रीयत्व, लिंग, लैंगिक प्राधान्य, राजकीय मत, शारीरिक घडण, वय, सामाजिक-आर्थिक स्थिती, शारीरिक सक्षमता किंवा दुर्बलता, भाषा, उच्चारणाची ढब, व्यक्तिमत्त्वाचा प्रकार, आवडता खेळ आणि टीम - माणसामाणसांत विभाजन करणाऱ्या गोष्टींची यादी करावी तितकी कमी. फरक हे असणारच आहेत, कुठल्याही गोष्टीवरून तुम्ही इतरांसाठी ‘बाहेरचे’ दिसू शकता, असू शकता. फक्त त्यात किती कट्टरता बाळगावी हा खरा प्रश्न आहे.

आपल्यापासून शेकडो, हजारो मैलांवर असणाऱ्या विषमतेबरोबरच द्वेषही आपल्याला गोंधळात पाडतो. कितीतरी अमेरिकन माणसांशी माझं याबाबत बोलणं झालेलं आहे. रवांडामधल्या हुतू आणि तुत्सी यांमधला भेद, मध्यपूर्वेतला शिया आणि सुनी यांचा झगडा, भारतातला हिंदू-मुस्लीम संघर्ष - असे संघर्ष इतक्या लांबून पाहताना खरोखर रहस्यमय वाटतात. जुडिओ-ख्रिश्चन पार्श्वभूमीवर वाढलेल्या अमेरिकन माणसाला संघर्षात अडकलेल्या या जोड्यांकडं लांबून पाहताना वाटतं की, यांचं भांडण एकसारखंच आहे. प्रत्येकाच्या संघर्षाचे सूक्ष्म कंगोरे त्याला जाणवत नाहीत.

अमेरिकन माणसं या जागतिक पातळीवर लक्षवेधी ठरलेल्या धर्मसंघर्षाला किती वरवर किंवा अज्ञानातून पाहतात याची थट्टा मला इथं करायची नव्हती. माझा मुद्दा आहे तो गोंधळाबद्दल. लांबून पाहताना हे दृश्य किती भ्रामक समजूत घडवतं हे मला सांगायचं आहे. आपण वाळीत टाकलेली माणसं बरेचदा आपल्यासारखीच असतात. आपल्या गटाबद्दलची तीव्र निष्ठा आणि बाहेरच्यांबद्दलची उपेक्षा यांत तसं म्हटलं तर काय अर्थ असतो सांगा. 

मानसोपचारतज्ज्ञांचं म्हणणं असं की, जी माणसं निरुद्देश, सहजपणानं एखाद्या गटात सामील होतात त्यांना तो गट आवडायला लागतो आणि इतरांपेक्षा तो कसा चांगला आहे त्याची आग्रहपूर्वक मांडणी ही माणसं करायला लागतात. अशा अवस्थेतल्या माणसांनी सांगितलेले भेद किती निरर्थक असतात हे आपण पाहत असतो. अशांपैकी काहींना तुम्ही निळे टीशर्ट द्या, काहींना लाल द्या... त्यातूनही सोपा अर्थ लावून ते मैत्री किंवा शत्रुत्व पत्करतील. असा एक प्रयोग करण्यात आला तेव्हा लक्षात आलं की, ज्यांना लाल शर्ट दिलेत ते त्यांच्यासारखाच लाल टीशर्ट घालणाऱ्यांना पाठिंबा देतात, त्यांच्याशी अधिक चांगलं वागतात. निळ्यांबाबतीतही हेच घडतं. एकूण ज्यांना ‘आपली माणसं’ मानलंय त्यांना संपूर्ण सहकार्याचं धोरण ठेवून ‘इतरांना’ आपण वगळतो हेच या प्रयोगातून समोर आलं.

आपापल्या गटाकडं झुकण्याच्या वृत्तीचा उगम कुठं होतो याचा शोध काही मानसोपचार तज्ज्ञ घेत आहेत. त्यांपैकी काहींचा निष्कर्ष असा की, आपापल्या गटाशी जोडलेलं राहण्याची ऊर्मी माणसं नैसर्गिकरीत्याच बाळगून असतात. तिथं स्वतःचं प्रतिबिंब त्यांना सहजी सापडतं. आपणही आपल्या मुलांना सांस्कृतिक नियमअटी शिकवतो, त्याप्रमाणे वर्तनाची अपेक्षा बाळगतो. यात अखेर आशा उरते ती शैक्षणिक संस्थांकडून. तिथं अशा विभागणीपेक्षा एकात्मता, सर्वसमावेशकता बाळगली गेली तर पुष्कळ बदल घडेल. 

बापूजींनी मला दिलेलं समतेचं आणि सर्वसमावेशकतेचं मूल्य कितीतरी दशकं माझ्या आयुष्यात प्रभावी आणि परिणामकारक साधन बनून गेलं आहे. भविष्यातही असेल. बाहेरचे प्रभाव कितीही शक्तिशाली असले आणि आयुष्याला निराळ्या दिशांचा संकेत देणारे असले तरी आपण जर या मूल्यांची जपणूक करत त्यांची शिकवण मुलांना दिली तर आशा आहे.

आपल्यात दुफळी माजवणाऱ्या नि आपलं जीवन संपवणाऱ्या अडचणी कुठल्या एका कायद्यानं नाहीशा करता येणं शक्य नाही. एकमेकांचा आदर करत सामंजस्यानं विषय समजून घेऊ इच्छिणारी मोकळी मनं मात्र या संघर्षाला हलक्या हातानं सोडवू शकतात. आज जर आजोबा असते तर 1964 मध्ये ‘नागरी हक्क कायद्या’वर स्वाक्षरी करून अमेरिकेचे अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी जे पाऊल उचललं त्याबद्दल आजोबांनी जॉन्सन यांना तोंडभर हसून शाबासकी दिली असती. वंश, धर्म, लिंग आणि जन्मानं मिळालेलं राष्ट्रीयत्व या सगळ्यांचा विचार वगळून सगळ्यांसाठी समान नागरी हक्क देणारा कायदा लागू होण्यानं तुम्ही खूप मूलभूत मुद्‌द्यांना हात घातला आहे असंही ते त्यांना म्हणाले असते. चार वर्षांनंतर या कायद्याचा आढावा घेऊन सगळ्यांसाठी घरांची सोय करण्याचं वचन ही गोष्टही कौतुकास्पद वाटली असती आजोबांना. तरीही ही केवळ सुरुवात आहे याचं भान त्यांनी गमावलं नसतं... म्हणूनच आज पन्नास वर्षांनीही समानतेचा अभाव या समाजात ढळढळीत दिसतो या वास्तवानं ते चकित झाले नसते.

बदल घडतात यावर माणसांचा विश्वास हवा. ‘नागरी हक्क कायदा’ अस्तित्वात आल्यानंतर पाच वर्षांनी, 1968मध्ये न्याय विभागानं न्यूयॉर्कमधल्या स्थावर जंगम मालमत्ताविषयक काम करणाऱ्या कंपनीवर कायदेशीर मार्गानं दावा दाखल केला. त्याचं असं म्हणणं होतं की, ही कंपनी अफ्रिकन, अमेरिकन माणसांना सेवा देण्याचं नाकारते आणि भाड्यानं जागा हवी असणाऱ्या असंख्य ग्राहकांबद्दल दुजाभावानं वागते. या कंपनीचे अध्यक्ष होते डोनाल्ड ट्रम्प. कायदा त्यांच्या या अन्यायकारक भेदाभेदाच्या वागणुकीला वेसण घालू शकला नाही. 

काही वर्षांनी चित्र बदललं तेव्हा लक्षात आलं की, मतदारांनाही या गोष्टीची विशेष चाड नव्हती... कारण आता हीच व्यक्ती अमेरिकेची अध्यक्ष झाली आहे.

खरंतर नागरी हक्क कायद्यामुळं अमेरिकेनं एक मोठी उडी घेतली होती... पण आम्ही अमेरिकन्स तिथंच थांबलो. पुढचा न्यायाचा रस्ता चालायचा असेल तर आत्मशोधाचं, शिक्षणाचं आणि ज्ञानप्रसाराचं काम गंभीरपणानं हाती घ्यावं लागणार आहे. महिलांना, गे आणि लेस्बिअन्स यांसारख्या भिन्नलैंगिक प्राधान्यक्रम असणाऱ्यांना हक्क देण्याच्या लढाईचाही विचार याच तऱ्हेनं करणं भाग आहे. माणसांच्या सुरक्षिततेसाठी कायद्यांमध्ये बदल करण्याची बाब समजून घेता येण्याजोगी आहे, आवश्यकही आहे... पण खरा बदल केव्हा होईल ते सांगू? माणसं भूतकाळातल्या चुका मोकळेपणानं मान्य करतील, समोरच्याला गप्प करण्याऐवजी बोलू देतील आणि पूर्वग्रहविरहित दृष्टीनं जगाकडं पाहायला लागतील तेव्हा खऱ्या अर्थानं बदल घडतील.

समाज आर्थिक उन्नतीवरून नाही... तर प्रेमाची आणि आदराची समज किती खोल आहे यावरून मोजला जायला हवा असं बापूजी नेहमी म्हणायचे. यासाठी ते एक संस्कृत शब्द नेहमी वापरायचे, ‘सर्वोदय’. सर्वोदय म्हणजे सर्वांचा उदय, सर्वांचं कल्याण. सगळ्यांनाच सभ्यपणे, आनंदानं स्वातंत्र्य उपभोगत जगण्याचा अधिकार आहे. आपण सगळेच जण काही प्रमाणात स्वतःला काय आवडतं, काय हवंय ते मिळवण्यापोटी प्रेरित होतो... मात्र स्वतःवरच एकाग्र होण्याऐवजी आपण त्यापलीकडं विचार करू शकलो तर जास्त आनंद वाट्याला येईल, कृतकृत्यही वाटेल. 

बापूजींचा आणखी एक आवडता शब्द ‘स्वराज’. सगळ्यांनाच उत्तम जगण्याचा हक्क आहे त्यामुळं आपण एकमेकांच्या आनंदासाठी प्रयत्न करून त्यांच्या वाट्याचा आनंद त्यांना मिळवून द्यायचा...मात्र होऽ त्यांना अभिप्रेत असणारा हा अर्थ प्रत्यक्षात येण्यासाठी, केवळ राजकीय स्वातंत्र्य उपयोगाचं नाही. त्यापलीकडचं काही उरतं... ‘अन्नपाणी आणि आध्यात्मिक भूक असणाऱ्या करोडो माणसांसाठी स्वराज्या’ची निकड जाणवते आणि पटते असा हा राजकीय स्वातंत्र्यापलीकडचा समाज. बापूजींना या दोन्ही गोष्टींची आस होती.

एखादी कृती योग्य आहे की नाही हे तपासायची एक सोपी युक्ती बापूजींकडं होती. ते म्हणायचे, ‘जर शंका वाटली तर एखाद्या गरीब किंवा गरजू माणसाचा चेहरा नजरेसमोर आणा आणि मग त्या चेहऱ्याकडं बघत स्वतःला विचारा की, तुम्ही विचारपूर्वक जे पाऊल उचललंत त्याचा त्याला किंवा तिला खरोखर उपयोग झाला आहे का? तुमच्या कृतीनं त्या माणसाचं स्वतःच्या जगण्यावर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण आलं आहे का? त्यातून त्याच्या जगण्याचा सन्मान होतो आहे का? त्याला ‘स्वराज्य’ मिळतं आहे का?

असे प्रश्न तुम्ही स्वतःच्या अस्वस्थतेला करता तेव्हा, ‘तुमच्या शंकाकुशंकाच काय... तुम्हीही विरघळून जाता.’ बापूजी म्हणायचे.

(अनुवाद: सोनाली नवांगुळ)

- डॉ. अरुण गांधी

Tags: पुस्तक  अरुण गांधी महात्मा गांधी सोनाली नवांगुळ अहिंसा प्रेम सत्याग्रह परिवर्तन आदर सामंजस्य कस्तुरबा गांधी  Book New Book Translation Gift of Anger Arun Gandhi Mahatma Gandhi Non- Violance Love Satyaghaha Change Respect Harmony  Load More Tags

Add Comment