निम्मं जग कसे दिवस काढत आहे हे पाहाण्याची खिडकी आपल्यापाशी नसते

वरदान रागाचे- भाग 9

फोटो सौजन्य: Tuca Vieira

माझ्या मुलानातवंडांपैकी काहींनी आमच्या कुटुंबासाठी जिवापाड महत्त्वाचं असणारं अहिंसेचं मूल्य जपायचं नि त्यानुसार आयुष्यभर जगायचं असा निर्णय घेतला. आमच्या कुटुंबात सक्रिय कार्यकर्तेही आहेत आणि व्यावसायिकदृष्ट्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मंडळीही आहेत. या मुलानातवंडांचा मला अभिमान वाटतो. माझा नातू भारतात वकिली करतो. देहविक्रयासाठी विकलेल्या मुलींची त्यानं सुटका केली होती. माझी नात भारतातील खेड्यापाड्यांमध्ये दुर्लक्षित असणाऱ्या मात्र महत्त्वाचं काम करणाऱ्या संस्थांची ओळख आपल्या व्हिडिओ पत्रकारितेतून लोकांना करवून देते. एक नातू अमेरिकेत आपल्या रुग्णांची अतिशय आस्थेनं काळजी घेणारा तज्ज्ञ डॉक्टर बनला आहे. एक तर लॉस एन्जिल्स मधल्या एका गुंतवणुक कंपनीचा अतिशय प्रसिद्ध असा व्यवस्थापकीय संचालक म्हणून चमकतो आहे. मला स्वप्नातही कल्पना करता येणार नाही अशा आकड्यांचा पगार तो दरमहा मिळवतो, पण स्वत:पलीकडे असणाऱ्या जगाबद्दलची त्याला समज आहे. आपण पुरेसे नसलो तरी ‘त्या’ जगाला बांधील आहोत, आपल्या पैशाची जिथं गरज आहे तिथं सढळहस्ते पुरवायला हवा हे त्याला कळतं. मी तर आजोबांचं म्हणणंच पुन्हा पुन्हा सांगत आलोय की तुमचा पैसा तुमची योग्यता कधीच ठरवत नाही, तुमचे निर्णय व वागणुक ठरवते.

गरीबी आणि विषमतेचं उच्चाटन व्हावं, लोकांना उत्तम आरोग्यव्यवस्था लाभावी हे बापूजींचे आग्रहाचे नेहमीचे मुद्दे होते. या सगळ्यासाठी केवळ सद्‌हेतू नव्हे तर पैसाही लागतो हे त्यांना ठाऊक होतं. स्वत:साठी काही नकोच असल्यामुळं लोकांसाठी या व्यवस्था उभारण्यासाठी पैसे मागण्यात त्यांना संकोच वाटायचा नाही. मी याबाबतीत त्यांचं अनुकरण केलं. अमेरिकेला आल्यावर मी अहिंसा या विषयाला वाहिलेली एक संस्था सुरू करायचा मनोदय जाहीर केला होता. संस्थेमार्फत काय काय करायचंय याचा आराखडा मी व सुनंदा तयार करू लागलो. कार्यशाळा, सेमिनार्स, लेक्चर्स वगैरे जसंजसं आम्ही ठरवत होतो आमचा उत्साह अधिकाधिक वाढत होता. एखाद्या विद्यापीठाच्या परिसरातच ही संस्था असायला हवी अशी माझी कल्पना होती, त्यानुसार मी वेगवेगळ्या विद्यापीठांच्या अध्यक्षांना विनंतीपत्रं लिहिली. माझा संपूर्ण आराखडा त्यांना कळवला. कुणाकडूनही उत्तर आलं नाही. कदाचित त्यांना माझी कल्पना अशक्य कोटीतली आहे असं वाटलं असेल किंवा कदाचित त्यांनी माझ्या पत्राचा लिफाफा न उघडता तो केरात टाकल्याची शक्यताही आहेच.

माझा एक सहकारी ‘ख्रिश्चन ब्रदर्स युनिवर्सिटी इन मेम्फिस, टेनिसन’ या विद्यापीठाच्या प्रमुखांशी निगडित होता. त्यानं माझी व त्यांची भेट घडवली. त्यांनी अतिशय उत्साहानं मला विद्यापीठाच्या आवारातच घर, ऑफिससाठीची जागा संस्थेच्या कार्यासाठी विनामूल्य देण्याची तयारी दर्शवली. केवढा आनंद झाला मला! संस्था चालवण्यासाठी आमचं विद्यापीठ कुठलाही आर्थिक भार सोसणार नाही, ती व्यवस्था तुमची तुम्हालाच करावी लागेल असंही त्यांनी मोकळेपणानं सांगितलं. आमची अर्थातच ती तयारी होती. मी त्यांचा प्रस्ताव तत्क्षणी स्वीकारला... माझी स्वप्नं कशी रूजणारेत, कशी वाढणारेत याची त्यावेळी मला जराही कल्पना नव्हती, मात्र त्या स्वप्नांसाठीचा निश्चय पक्का होता.

संस्था उभारणीसाठी लागणारा पैसा कसा जमवायचा याची आखणी करण्यासाठी मी आता रात्रंदिवस एक करायला सुरुवात केली. माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा आजोबा तरळले, सुती पिशवी घेऊन रेल्वेमधून नि कार्यक्रमांदरम्यान निधी गोळा करणारे, आपल्या स्वाक्षरीसाठी पैसे आकारणारे. स्वाक्षरीच्या आठवणीबरोबर माझे डोळे चमकले. मला आठवलं, त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या पत्रांचा गठ्ठा मी माझ्या घरात सुरक्षित जपून ठेवला आहे. केवढा मोठ्ठा ठेवा आहे माझ्याकडे हे जाणवून मला प्रचंड आनंद झाला. बापूजींनी वेळोवेळी माझ्या आईवडिलांना आणि आम्हा मुलांना लिहिलेली ती पत्रं होती. या सगळ्या पत्रांच्या प्रती भारत सरकारकडे मी दिल्या होत्या, पण मूळ पत्रव्यवहार माझ्याकडे शाबूत होता. अर्थात काळानुसार या पत्रांसाठी वापरलेला कागद झिजायला लागला होता, अक्षरं अस्पष्ट व्हायला लागली होती. या ठेव्याचं जतन करण्यासाठी लागणरा पैसा माझ्याकडे नव्हता. मग काय हा ठेवा पूर्णपणे कपटेकपटे होऊन नष्ट होईपर्यंत मी छातीशी घेऊन बसावं? ती मोठी चूक झाली असती. मग मी ठरवलं, हा ठेवा संग्रहालयं, संग्राहक यांच्यापर्यंत न्यायला हवा. अहिंसेचं काम पुढं नेण्यासाठी यातूनच पैसा उभा राहिल... माझ्या जागी बापूजी असते तर त्यांनी काय केलं असतं? - उत्तर अगदी स्पष्ट होतं. तेच मी केलं.

निर्णय झाला. मी थेट ‘ख्रिस्तीज ऑक्शन हाऊस’शी संपर्क साधला. लिलावासाठी त्यांनी मला त्यांची किंमत सांगितली ती एक लाख दहा हजार अमेरिकन डॉलर्स ही होती. आता माझं स्वप्न प्रत्यक्षात उतरणार होतं! माझे कायदेशीर सल्लागार असणारे एक मित्र मदतीसाठी पुढे आले. त्यांनी 501(सी)3 अंतर्गत ‘एम.के.गांधी इन्स्टिट्यूट फॉर नॉनव्हायोलन्स’ या धर्मादाय संस्थेची नोंदणी करायला आम्हाला मदत केली. संस्थेच्या उत्पन्नापैकी एक कवडीही मी माझ्या खाजगी गोष्टींसाठी वापरतो की काय असल्या शंका घेणारं कार्यकारी मंडळ मला बिलकूल नको होतं. त्यामुळंच माझ्या खाजगी संपत्तीपैकी असणारी बापूजींची पत्रं मी ‘ख्रिस्टीन’ मंडळींना लिलावासाठी उपलब्ध करवून दिली आणि त्यातून येणारा पैसा हा थेट नव्या संस्थेच्या खात्यावर पाठवायला सांगितला.

लिलावाची तारीख घोषित झाली. त्याच रात्री मिसिसिपीमध्ये असताना रात्री दोन वाजता माझा फोन वाजला. अपरात्री झोपेतून उठवल्यामुळे मी किंचित वैतागल्या स्वरात बोललो, पण दुसऱ्या बाजूनं कोण बोलतंय हे कळल्यावर अक्षरश: उडालो. भारताच्या राष्ट्रपतींच्या कार्यालयातून तो फोन होता. त्यांचे खाजगी सचिव माझ्याशी बोलत होते. माझ्या आजोबांच्या नावाचा मी व्यापारी हेतूनं वापर करतोय हे बरोबर नाही व मी ताबडतोब लिलाव थांबवावा असं त्यांनी मला सांगितलं. दुसऱ्या भाषेत सांगायचं तर त्यांनी माझ्यावर धडाधडा नाना आरोप केले. मी त्यांना माझा लिलावामागचा हेतू व नियोजन सांगण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण रात्रीच्या त्या आडवेळी मी त्यांना ते नीट सांगू शकलो नाही. अचानकपणे अशी अडचण येऊन कोसळेल अशी कल्पनाही मी केली नव्हती. त्यामुळे मी गडबडलो होतो. माझ्या बोलण्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाहीये हे जाणवून शेवटी मी फोन ठेवला.

दुसऱ्याच दिवशी भारताच्या राष्ट्रपती कार्यालयानं आपलं म्हणणं प्रेसला पाठवलं. त्यात त्यांनी महात्मा गांधींच्या नावाचा दुरूपयोग केल्याचा आरोप माझ्यावर ठेवत माझा धिक्कार केला होता. यानंतर एक वेगळाच सिलसिला सुरू झाला. पूर्ण भारतभरातून मला अपमानित करणारी, शिवीगाळ करणारी, दोषारोप करणारी पत्रं यायला लागली. मला प्रचंड धक्का बसला. संस्था सुरू करण्याआधी मी वेड्यासारखा काम करत रात्रंदिवस जागा असायचो... आताही रात्रंदिवस जागा असायला लागलो... माझ्या हेतूंबद्दल उलटसुलट, निष्कारण चुकीचं उठवल्याबद्दल आता हा राग होता! मला याची परतफेड करायची होती. आजोबांच्या आत्म्यानं अचानक प्रगट व्हावं नि मला मार्गदर्शन करावं असं मला प्रकर्षानं वाटत होतं... ते होतेच की बरोबर, - पण मला काही केल्या त्यांचा आवाज ऐकू येत नव्हता.

असाच विचारात गढलेलो होतो तेव्हा अचानक एका रात्री मला आठवलं की बापूजी म्हणायचे, सगळी माणसं सारख्या तोलाची असतात, पण प्रत्येक माणसाचं वेगळं महत्त्व असतं. - जेव्हा जेव्हा बापूजींपुढं एखादा पेचप्रसंग उभा राहायचा नि त्यांना निर्णय घेता यायचा नाही तेव्हा ते लोकांकडं जायचे. त्यांचं मत घ्यायचे. तसं करावं का? मी लगेच निर्णय घेतला. न्यूयॉर्क टाईम्सला विचारलं, तुमच्याकडं मी एक खुलं पत्र पाठवू का, माझ्या अडचणी सांगून त्यावर लोकांचं मत विचारणारं? वाचकांनी मला मार्गदर्शन करावं अशी माझी इच्छा आहे.

‘मी काय करावं?’ असं शीर्षक देऊन मी माझी अवस्था नि प्रश्न वाचकांसमोर मांडले. वाचकांनी दिलेला प्रतिसाद थक्क करणारा होता. 90% वाचकांनी माझ्या कामाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. भारतीय वर्तमानपत्रांनीही या पत्राची दखल घेत आपल्या वृत्तपत्रात न्यूयॉर्क टाईम्सच्या सहकार्यानं ते छापलं. माझ्यावर येऊन आदळलेली लाट हळूहळू निमायला लागली. महात्मा गांधींच्या मार्गाचा अवलंब केल्याबद्दल लोकांनी माझ्यावर कौतुकाचा वर्षाव केला. अगदी माझ्यावर पत्रातून त्वेषानं हल्ला पुकारलेली माणसंही नंतर माझ्या हेतूची प्रशंसा करायला लागली, कामासाठी शुभेच्छा द्यायला लागली.

तरी या सगळ्या वादंगाचा परिणाम व्हायचाच होता. असंख्य खरेदीदारांनी लिलावातून माघार घेतली आणि ठरल्याहून निम्मीच किंमत त्यातून उभी राहिली. या प्रकरणाची अखेर एका औपरोधिक म्हणाव्या अशा वळणावर झाली. या पत्रव्यवहाराचा खरेदीदार कोण होतं ठाऊकाय? भारत सरकार!! मी आधी भारताशी बोलणी करून त्यांना माझा उद्देश नि गरज सांगितली होती नि त्यांनी माझं म्हणणं धुडकावून नंतर प्रस्ताव विचित्र तऱ्हेनं ताणला होता. त्याचे परिणाम मला भोगावे लागले होते.

आपल्याला प्रत्येकाला उपजत कुठल्या ना कुठल्या कौशल्याची देणगी लाभलेली असते, तिचा उपयोग फक्त आपल्यासाठी नव्हे तर इतरांना ताकद देण्यासाठीही करायला हवा असं बापूजी म्हणायचे. एका मोठ्या महागडे दागिने घडवणाऱ्या कंपनीची एक जाहिरात पाहण्यात आली होती, त्यात ते असा दावा करायचे की एकदा त्यांच्या कंपनीचं घड्याळ तुमच्या मनगटावर विराजमान झालं की तुम्ही त्याच्या इतके प्रेमात पडता की तुमच्या पुढच्या पिढीसाठी तुम्ही हा ठेवा जपून ठेवता. या ऐवजाची काळजी घेता. काळाच्या कसोटीवर चालणाऱ्या बहुमोल ऐवजाविषयी मला फार काही ठाऊक नाही, पण आपण हयातभर काही मूल्यांची जीवापाड जपणूक करत असतो, त्या मूल्यांबाबतीत काही संकल्पना फार नेमक्या ठरतात. बापूजींचं एक सांगणं आठवतंय याच संदर्भातलं. चांगलं शिक्षण, परिश्रमाची आवड, उत्कृष्ट कुटुंब लाभल्यामुळं आपल्यातली काही कौशल्यं झळाळून उठतात, पण ते गुण आपल्यात वास करत असले तरी आपलेच असतात असं समजू नये. आपण केवळ त्यांचे विश्वस्त असतो. आपल्या कौशल्यांचं आपण काय करतो, ती कुणाकरता व कशी वापरतो त्यावर अवलंबून असतं त्यांचं प्रवाहित होणं! त्यांचा उपयोग आपल्याकरता नाही, सगळ्यांसाठी व्हायला हवा.

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही... वेलस्ली कॉलेजच्या तरुण स्त्रियांचा नि प्रोफेसर्सचा एक गट एका सहलीनिमित्तानं भारतात येणार होता. त्यांना फिरवण्याची जबाबदारी माझी होती. आपली मूल्यनिष्ठा नि तत्त्वं यांच्या पुंजीवर एकेकटी माणसंही किती चांगली कामं उभारतात आणि दारिद्रयात खितपत जगणाऱ्यांच्या जगण्यात ही तत्त्वं अलगद सोडून केवढा लक्षणीय बदल दिसू लागतो हे मला त्यांना दाखवायचं होतं. पहिल्या दिवशी आम्ही मुंबईतील झोपडपट्टीमध्ये सुरु असणारे काही प्रकल्प पाहिले, त्यानंतर रेल्वेनं रात्रभर प्रवास करून साखर कारखान्याजवळ वसवलेल्या एका छोट्या गावात आलो. तिथल्या प्रकल्पांमुळे लोकांचे उजळलेले चेहरे त्यांनी पाहिले. वेगवेगळ्या भागात फिरताना उत्साहानं मुसमुसलेली बरीच माणसं भेटली, त्यांच्या प्रभावातून उभे राहाणारे उपक्रम पाहून सगळेच भारावले.

या सगळ्या प्रवासादरम्यान आम्ही राहायचो ती ठिकाणं अगदी साधी असायची. एकतर आम्ही लांबलांबच्या गावात धूळभरल्या रस्त्यांमधून एसटीने प्रवास करत होतो. त्या रस्त्यांवर उपलब्ध असणाऱ्या हॉटेल्समध्ये शॉवर वगैरेची सोय असणं शक्यच नव्हतं. तिथं आंघोळीसाठी एक बादली गरम नि एक बादली गार पाणी मिळायचं. काही दिवस असे गेल्यावर एक बाई तक्रार करायला लागल्या की काय चाललंय काय, आम्हाला झोपायला आरामशीर बिछाना असावा नि केस धुण्यासाठी शॉवर असावा इतकीच तर आमची अपेक्षा आहे.

अखेर एका मोठ्या शहरात एका नव्याने सुरू झालेल्या फाईव्ह स्टार हॉटेलात बाईंना हवी तशी सोय मिळाली. त्यांची नुकतीच सुरुवात असल्यामुळे जाहिरातीच्या उद्देशानं त्यांनी निम्म्या किंमतीत आम्हाला खोल्या उपलब्ध करून दिल्या. आम्हाला आनंदच झाला. सजवलेल्या देखण्या लॉबीत आम्ही सगळे वाट बघत थांबलो. रूम अजून ताब्यात मिळायच्या होत्या. मात्र भारतातील प्रवासादरम्यान दीर्घ काळ या सुखसोयींपासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना आनंदानं आकाश ठेंगणं झालं होतं. केवढ्या सुखसोयी नि आराम होता तिथं. कधी एकदा या स्वच्छ सुंदर माहौलचा उपभोग घेतो असं त्यांना झालं होतं. त्यांनी पटकन किल्ल्या ताब्यात घेतल्या.

अर्ध्या तासानं माझ्या खोलीवर टकटक झाली. दारात त्रासलेल्या मुद्रेतले विद्यार्थी बघून मला आश्चर्य वाटलं.

‘‘मिस्टर गांधी, आपण दुसऱ्या कुठच्या हॉटेलात आपला मुक्काम हलवूया का? हे प्रचंड महागडं हॉटेल आहे. कमी खर्चिक जागा शोधूया.’’, दार उघडल्या उघडल्या एक विद्यार्थी मला म्हणाला.

‘‘का? काय झालं? मला वाटलं तुम्ही फार खूष व्हाल इथल्या मुक्कामानं.’’

‘‘इथल्या खोल्या सुंदरच आहे. तो प्रश्न नाही, पण खोलीची खिडकी उघडते ती झोपडपट्टीच्या दिशेनं. तिथं लोक कुठल्याही सोयींवाचून जगताहेत. समोर दिसणाऱ्या लोकांकडं जीवनावश्यक मूलभूत गोष्टीही नसताना आपण अशा डामडौलात राहायचं म्हणजे आठवडाभर जे शिकतोय त्यात काय अर्थ उरतो? त्या शिक्षणाच्या विरोधात जातं इथलं जादाचं सुख!’’

मला त्यांच्यामध्ये जाग्या झालेल्या करूणेनं आनंदच झाला. मी त्यांना म्हटलं, ‘‘आपण इथंच राहातोय आज. ज्या दृश्यानं त्रास झाला ते दृश्य या शिक्षणाचा भागच समजा!’’

‘‘एरवी आपण अगदी सुखाआरामाचं जीवन जगतो. निम्मं जग कसे दिवस काढत आहे हे पाहाण्याची खिडकी आपल्यापाशी नसते. आज ती खिडकी तुम्हाला दिसली. ती झाकण्याची सोय नाही. आपण या खिडक्या झाकता कामा नयेत. ही जी तीव्र विषमता तुम्ही बघितली ती आता कदाचित आयुष्यभर तुमच्या सोबत असेल. ही आठवण भविष्यात तुम्ही काय काम करायला हवंय याचं भान देईल, जागं ठेवेल.’’

जगातल्या भयंकर अडचणी नि परवड दिसायला लागली की काय करावं याचा गोंधळ उडतो. नेमका मार्ग सुचत नाही. त्या विद्यार्थ्यांचंच पाहा ना! झोपड्या बघून अस्वस्थता आली म्हणून हे विद्यार्थी लगेच उठून तिथल्या लोकांना एका रात्रीकरता हॉटेलात, त्यांच्या खोलीत राहायला आणू शकत नव्हते. तसं केलं असतं तरी दीर्घकालीन उपयोग झाला नसता. मात्र जगण्यातला विरोधाभास नि विसंगती त्यांना जाणवणं ही बदलाची पहिली पायरी आहे. कदाचित रस्त्यापलीकडच्या त्या झोपडीत विस्कटलेलं आयुष्य जगणारी माणसं ही माणसंच आहेत, त्यांचीही काही प्रतिष्ठा आहे, म्हणून त्यांच्या अवस्थेविषयी काळजी वाटणं हीही पहिली पायरी असू शकते.

आपल्या आसपास वेगवेगळ्या परिस्थितीमधली माणसं राहातात आणि आपण बघितलेली माणसं गरीब गटात मोडतात अशी ढोबळ विभागणी म्हणून हे विद्यार्थी आता या प्रश्नाकडे पाहात नव्हते. गरीबीची किंवा गरीबांची नोंद घेतली नि दुर्लक्ष करून नव्या विषयात लक्ष घातलं असं आता त्यांच्याकडून होत नव्हतं. उलट आपल्याला मऊ पलंगाचा किंवा गरम पाण्याच्या शॉवरचा जितका आनंद होतो तितकाच आनंद याही माणसांना होणार आहे याची एक ठोस जाणीव त्यांना झाली. तो आनंद का मिळत नाही याच्या मुळाकडं जायची खिडकी त्यांना दिसली.

- म्हणून तर मला बिल गेट्‌सारखी माणसं फार आवडतात. आपल्याकडं असणाऱ्या प्रचंड संपत्तीमुळं आपण कुणीतरी वेगळे नि अधिक चांगले आहोत असं त्यांना बिलकुल वाटत नाही. ‘प्रत्येक जीव समान महत्त्वाचा असतो.’ अशी बिल आणि मिलिंडा गेट्‌स यांच्या फाऊंडेशनची मूलभूत धारणा आहे. जगभरातील गरीब माणसांना आत्मसन्मानानं उभं करण्यापाठीमागं त्यांचा हाच विचार असतो. गरीबांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करायचे तर उत्तम आरोग्यसुविधा नि शिक्षण महत्त्वाचं असं ते मानतात नि यासाठी त्यांचं विशेष जिव्हाळ्याचं क्षेत्र असतं लहान व तरूण मुलामुलींचं. प्रत्येक मूल जगावं नि त्यानं जोमानं वाढत आपलं अवकाश विस्तारावं असं त्यांचं म्हणणं. बिल गेट्‌स हे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत, मात्र ते टॅक्स किती भरतात यावरून त्यांची श्रीमंती मोजता येत नाही. आपल्या प्रचंड संपत्तीचं प्रदर्शन न मांडता ज्यांच्याकडं ती नाही त्यांची काळजी वाहण्यानं ते खरे श्रीमंत ठरत आहेत.

नशीब/दैव आपल्यावर मेहरबान असेल किंवा आपल्याकडं खरोखर काही वैशिष्ट्यपूर्ण असेल तर आपण ते दुसऱ्यासह वाटून घ्यायला हवं असं आजोबा नेहमी म्हणायचे. ते आज असते मला खात्री आहे, ते बिल गेट्‌सना भेटले असते आणि त्यांच्या परोपकारी वृत्तीचं, कामाचं त्यांनी भरभरून कौतुक केलं असतं. त्यांना सहकार या भावनेचं व त्यातून सुरू झालेल्या चळवळीचंही खूप कौतुक वाटलं असतं.

सहकारवृत्तीनं एकत्र येत काम करणाऱ्या माणसांना जगाबद्दल काही जबाबदारीची भावना असते. स्टॉक नि शेअरहोल्डर रिटर्नच्या व्यवहाराच्या कितीतरी पलीकडं जाणाऱ्या या गोष्टी आहेत. अशी खूप उदाहरणं आहेत, पण माझ्या पाहण्यातलं नि अनुभवातलं मी सांगतो आहे. मूलत: मुंबईतून कारभार चालणाऱ्या टाटा ग्रुप बद्दल मला सांगायचं आहे. भारतातला हा सगळ्यात मोठ्ठा उद्योग समूह. त्यांच्या जवळपास तीस कंपन्यांमध्ये कार्स, स्टील पासून अगदी चहा-कॉफीच्या उत्पादनापर्यंत खूप काही बनतं. 1868 मध्ये स्थापन झालेल्या या उद्योगानं आजवर ‘कंपॅशनेट कॅपिटॅलिझम’ असं नाव देत समाजाशी आपली बांधीलकी फक्त मानलीच नाही तर जपलेली आहे.

‘करूणेच्या पायावर उभारलेली भांडवलशाही’ हे टाटांचं तत्त्व आहे. खरं तर त्यांचा नफा नि यश इतकं भव्य आहे की ते राजासारखं ऐषआरामात राहू शकतात, पण त्यांनी निवड केली विनयशीलतेची नि दातृत्वाची. उद्योगातून होणाऱ्या खाजगी व सामूहिक नफ्याचा लक्षणीय भाग ते दर वर्षी भारतातल्या गरीबातल्या गरीब माणसांच्या कल्याणासाठी राखून ठेवतात. गरीब माणसांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळावं, अधिक चांगल्या तऱ्हेनं शेती करता यावी, शिक्षण घेण्याची संधी मिळावी अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर ते योजना आखतात, पायाभूत सुविधा उभारतात.

टाटा स्टील या उद्योगाचं मूळ स्थान जमशेटपूर. तिथल्या स्थानिक कामगारांसाठी ते दर्जेदार जगण्यासाठीच्या सगळ्या सोयीसुविधा पुरवतात. काही वर्षांपूर्वी एका अधिकारी व्यक्तीकडून मी याबद्दल एक फार चांगला विनोद ऐकला होता. हा अधिकारी माणूस म्हणत होता, ‘‘टाटा आपल्या माणसांसाठी घर, कार, त्यासाठी आवश्यक सर्व अन्य सोयी यांची बडदास्त खरोखर अतिशय अगत्याने ठेवतात. जरूरीनुसार अन्य सुखसुविधांचं निर्माण करून त्या उपलब्ध करून देतात, उदा. स्थानिक प्राणीसंग्रहालय, आरोग्यकेंद्र. जगण्यासाठी लागणारं सगळंच तुम्हाला मिळत असेल तर उरतं काय? - तर ‘टाटा तुमच्यासाठी एकच काम शिल्लक ठेवतात. नवरा किंवा बायको निवडण्याचं!’

आपण जे टाटा बघतो त्यांची मुळं ही पर्शियातून उगम पावलेल्या झोरोस्ट्रियन या प्राचीन धार्मिक चळवळीशी निगडित आहेत. सगळे टाटा या पंथाचे अनुयायी होते. आजच्या काळात या भूभागाला आपण इराण म्हणून ओळखतो. अशा चळवळींबाबतीत नेहमी जे घडतं तेच त्यावेळीही घडलं होतं. या धार्मिक चळवळीच्या अनुयायांचा नव्याने सत्तेवर आलेल्या शहांनी छळ आरंभला. या छळाने गांजून खूपसे लोक सतराव्या शतकात ही भूमी सोडून पळून जाऊ लागले. स्वत:च्या देशातून निर्वासित झालेल्या या पंथाच्या अनुयायांनी भरलेल्या बोटी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर येऊन थडकल्या. तत्कालीन शासकांशी बोलून त्यांनी भूमीवर प्रवेश करण्याची परवानगी मागितली. त्यावर राजाने भरलेला पाण्याचा पेला दाखवला नि म्हणाला, ‘‘हा पेला पाण्याने जसा भरलेला दिसतोय तशी आमची भूमीही माणसांनी भरून गेली आहे. नव्या येणाऱ्यांसाठी मुळीच जागा शिल्लक नाही.’’

यावर उत्तर म्हणून निर्वासित तांड्याच्या प्रमुखानं चमचाभर साखर पेल्यातल्या पाण्यात घातली. हलवल्यावर ती काही क्षणात विरघळली. त्याकडं बोट दाखवत अतिशय समंजसपणे तो म्हणाला, ‘‘ही साखर जशी पटकन या पाण्यात विरघळली नि आपल्या गुणानं तिनं पाण्याला जसा गोडवा आणला तशी माझी माणसंही तुमच्या माणसांमध्ये विरघळतील... गोडवा आणतील.’’

राजाला त्यांचं म्हणणं पटलं आणि त्यानं आपल्या भूमीत झोरोस्ट्रियन निर्वासितांचं स्वागत केलं. तेव्हापासून त्यांच्या गोडव्यानं ते एकूण भारतीयांच्यात मिसळून गेले आहेत.

साखरपाण्याची ही गोष्ट जे कुणी ऐकतात त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमलतं. तुमच्याही चेहऱ्यावर उमललं असेल! विरघळून जाण्याची ही कल्पनाच किती विलक्षण आहे. या गोष्टीत गोष्टीपेक्षा अधिक काहीतरी आहे. आपल्या भूमीतून उखडून लावल्या गेलेल्या त्या निर्वासितांच्या प्रश्नावर त्यावेळच्या राजाचं उत्तर कसं होतं? आज जगभरातली माणसं अशा परिस्थितीत काय वेगळं उत्तर देतात? निर्वासित, गरीब, वेगळ्या धर्माचे, जातीचे, वंशाचे लोक आपल्या दाराशी आश्रयाच्या अपेक्षेनं येतात तेव्हा आपण देश म्हणून किंवा व्यक्ती म्हणून काय उत्तर देतो? आपल्यापेक्षा वेगळ्या गटाला आपण साखर किंवा मसाल्यासारखी उपयोगिता देऊ शकतो की नाही? ती असते हे मान्य करू शकतो की नाही?

तुम्ही स्वत: तो पाण्याने भरलेला पेला आहात असं समजा आणि आयुष्यात स्वत:साठी हे तत्त्व ठरवा नि अनुसरा, की पेल्यातल्या पाण्याला येऊ पाहणारा गोडवा येऊ द्याल!

(अनुवाद: सोनाली नवांगुळ)

- डॉ. अरुण गांधी

 

वाचा 'वरदान रागाचे' या लेखमालेतील पहिले आठ भाग:

1. प्रास्ताविक- आजोबांकडे मिळालेले धडे
2. त्यांनी संताप आणि वीज यांची तुलना समोर ठेवली...
3.तोडगा काढणे हे ध्येय असेल तर तो मार्ग योग्य असतो..
4. विक्षिप्तपणाचं त्यांना वावडं नव्हतं, मात्र...
5. गरीबीचं उदात्तीकरण त्यांना करायचं नव्हतं, आणि...
6. वेगवान जगण्यापेक्षा शांततामय जगण्याची माणसाला जास्त जरूरी असते
7. सगळ्या तऱ्हेच्या कल्पनांचं वारं आपल्या भवती वाहायला हवं! 
8.भौतिक स्थैर्य आणि नैतिकता यांचे संबंध व्यस्त असतात...

Tags: पुस्तक अरुण गांधी महात्मा गांधी सोनाली नवांगुळ पैसा आर्थिक स्थैर्य गरीब श्रीमंत भौतिक स्थैर्य बिल गेट्स टाटा ग्रुप Book New Book Translation Gift of Anger Arun Gandhi Mahatma Gandhi Money Economical Stability Rich and Poor Materialistic Stability Bill Gates Tata Group Load More Tags

Comments:

Anjani Kher

Are we being gullible and naive about the two names Tata and Bill Gates ? A rumour goes that Tata salt is not salt at all. It is a byproduct of their chemical industry which has salty taste, but it is not sodium chloride and likely to be harmful. Also remember Radia tapes a few years ago. Will Dr Arun Gandhi go through the reactions on his article ?

Add Comment