अहिंसात्मक पालकत्व स्वीकारण्याचा सजग निर्णय आपण नक्की घेऊ शकतो

वरदान रागाचे - भाग 17

महात्मा गांधी यांचे सर्वांत ज्येष्ठ नातू (मणिलाल यांचे चिरंजीव आणि तुषार यांचे वडील) अरुण गांधी वयाच्या 88व्या वर्षीही समाजकार्यात सक्रिय आहेत. त्यांचे बालपण आणि तारुण्य दक्षिण अफ्रिकेत तर नंतरचे आयुष्य भारतातल्या इंग्लीश पत्रकारितेत गेले. निवृत्तीनंतर ते अमेरिकेत वास्तव्य करत आहेत. वय वर्षे 11 ते 13 या काळात ते आजोबांच्या सहवासात राहिले, त्याचा सखोल प्रभाव त्यांच्या विचारांवर आणि कार्यावर राहिला आहे. ते स्वतःला शांती पेरणारा शेतकरी (Peace Farmer) असे संबोधतात. त्यांचे 'Legacy of Love' (‘लिगसी ऑफ लव्ह’) हे पुस्तक मराठीत 'वारसा प्रेमाचा' या नावाने गेल्या वर्षी साधना प्रकाशनाकडून आले आहे. त्याचाच उत्तरार्ध म्हणावे असे छोटे पुस्तक म्हणजे 'Gift of Anger' (‘गिफ्ट ऑफ अँगर’)... त्याचा मराठी अनुवाद ‘कर्तव्य’वरून प्रत्येक शुक्रवारी आणि शनिवारी क्रमशः प्रसिद्ध करत आहोत. लेखमालेचा समारोप 2 ऑक्टोबरला होईल. या लेखमालेतला हा 17 वा लेख.  
- संपादक

आजोबांची मानसिक शिस्त बघून भलेभले चकित व्हायचे. आपण किती दृढनिश्चयी आहोत याचा अनुभव त्यांना त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षी आला होता. बापूजींची आई हिंदू परंपरेनुसार सतत हे ना ते व्रत करत असायची. शपथा घेत असायची. त्या वेळच्या प्रसंगानुसार काही काळासाठी ती त्या-त्या गोष्टींचा त्याग करायची. बापूजी अगदी लहान असताना म्हणजे दुडदुडत नुकतेच चालायला लागले होते त्या काळात तिनं सूर्य पाहिल्याशिवाय तोंडात घास घेणार नाही असा प्रण  केला होता.

एरवी हे व्रत इतकं कठीण नव्हतं... पण त्या वेळी होता पावसाळा. ही गोष्ट बापूजींच्या स्मरणातून कधीतरी नंतर वर आली. त्या दिवसांत आकाश कायम काळ्या ढगांनी भरून आलेलं असायचं. सूर्य कुठून दिसणार? आई दररोज खपून सगळ्यांसाठी सुंदर स्वयंपाक करायची, एकत्र जेवायला बसायचं म्हणून आनंदात असायची... पण सूर्यदर्शन न झाल्यामुळे एकही घास खाऊ शकायची नाही. बरेच दिवस ती भुकेनं तळमळत राहिल्यामुळं बापूजी अस्वस्थ झाले. कुणाविषयी मनातून वाटणाऱ्या सहवेदनेचा त्यांचा हा पहिला अनुभव होता.

आईचं व्रत चालूच होतं. छोटा मोहन खिडकीतून आकाशाकडे बघत ‘ढग निवळू दे, सूर्य दिसू दे’ अशी प्रार्थना करत होता. सूर्याचे किरण त्या काळ्या ढगांच्या गर्दीतून अचानक चमकले आणि अत्यानंदानं मोहननं आईला हाक मारली... पण हातांतलं काम आटोपून ती खिडकीपर्यंत येईतोवर सूर्य पुन्हा ढगांच्या गर्दीत लुप्त झाला होता. तोंड पाडून बसलेल्या आपल्या मुलाकडं पाहत आई म्हणाली, ‘असू दे रे. मी आज खावं अशी देवाची इच्छा नसणार.’

स्वतःच्याच आवतीभोवती फिरणाऱ्या आजच्या जगाला बापूजींच्या आईच्या व्रताच्या नि उपवासाच्या कहाण्या उपऱ्या वाटतात हे खरं... पण या सगळ्याचा आजोबांवर खूप प्रभाव पडला. पुढे ते राजकारणात सक्रिय झाले तेव्हा राजकीय किंवा सामाजिक प्रश्नांना गती देण्यासाठी अतिशय दीर्घ मुदतीच्या उपवासांचा उपयोग आजोबांनी करून घेतला. या उपोषणांनी अख्ख्या जगाचं लक्ष वेधून घेतलं. मानसिक संतुलनावर आधीच काम केल्यामुळेच उपोषणासारखा मार्ग अनुसरणं त्यांना शक्य झालं. मानसिक शक्ती अजमावण्यासाठी किंवा शिस्तीत सातत्य ठेवण्यासाठी बापूजी दर सोमवारी मौनव्रत तर करायचेच... शिवाय लहानमोठे उपवासही करत राहायचे. या सगळ्यांतून इच्छांवर नि अभिलाषांवरही नियंत्रण येतं असं त्यांचं म्हणणं. या कठोर व्रतांचं उगमस्थान अर्थातच त्यांची आई. अगदी लहानपणापासून आईची व्रतवैकल्यं, तिचं सगळ्यांसाठी झटणं, तिनं दाखवलेली भावनिक ऊर्जा या सगळ्याचा प्रभाव बापूजींवर पडत राहिला होता. बापूजींच्या नंतरच्या कारकिर्दीतून जगावर त्यांचा असाच प्रभाव तयार झाला.

आपल्या मुलांवर आपल्या वागण्याबोलण्याचा किती खोलवर परिणाम होतो याची आपल्याला जाणीव नसते. प्रेम त्यांना जसं कळतं तसं आपल्या माणसानं केलेलं दुर्लक्षही कळतं. त्यातून घ्यायचा तो धडा घेऊन ती पुढे जात राहतात. आपल्या मुलांच्या जगण्यात, अनुभवांत झिरपत जाईल, उगवेल असं उदाहरण तुम्ही तुमच्या जगण्यातून कसं आकाराला आणाल? बरं, मुलांबाबतीतला प्रश्न अवघड वाटला तर आणखी एक विचार करता येईल... आपल्याला पालक असतात. हो ना? तर आपल्या पालकांनी आचारविचाराबाबतीत आपल्यावर केलेल्या संस्कारांपैकी कुठले संस्कार तुम्हांला झटकून टाकावेसे वाटतात?

आपण लहान असताना आपल्याबाबतीत झालेली हिंसा, अनेकदा अनुभवास आलेली लाजीरवाणी स्थिती आपण कळतनकळत खांद्यांवर वाहत राहतो. ती आपल्या आणि भोवतालच्या परिसरात उमटत राहते. आपल्याला हलवून टाकणाऱ्या आणि हानी पोहोचवणाऱ्या अशा वारशाला संपवायला हवं. सगळ्याचा परिपूर्ण विचार करून अहिंसात्मक पालकत्व स्वीकारण्याचा सजग निर्णय आपण नक्की घेऊ शकतो. आपल्या मुलांसाठी आणि ती भिडणार असलेल्या जगासाठी याहून मोठं बक्षीस काय असणार?

बापू आणि कस्तूर यांना माझ्या वडलांसहित एकूण चार मुलं. माझे वडील मणिलाल हे त्यांचं दुसरं अपत्य. माझे वडील नि त्यांची धाकटी भावंडं देवदास आणि रामदास बापूजी नि त्यांच्या अनुयायांच्या चांगुलपणाच्या नि दातृत्वाच्या मार्गावर चालण्यासाठी स्वतःला कटिबद्ध मानत होती... मात्र मोठा मुलगा हरिलाल हा जात्याच बंडखोर होता आणि स्वतःच्या अडीअडचणी, दु:खं, अपमान यांच्यापलीकडे पाहण्याची उसंतच कदाचित त्यांना मिळाली नाही. पुढे हरिलाल दारूच्या आहारी गेले; त्यांच्यावर चोरीचे, अपहाराचे आरोप झाले. आजोबा त्यांच्या अपयशाबद्दल स्वतःला जबाबदार मानत होते. हरिलालना मदत करायची त्यांची खूप इच्छा होती. आपल्या अपत्याच्या चुकांबद्दल स्वतःला दोषी मानून त्याची शिक्षा स्वतःलाच द्यायची ही पद्धत मूल तुमचं ऐकायला, बदलायला तयार असेल तर उपयोगी ठरते. हरिलालना यांतलं काहीच करायचं नव्हतं. बापूजींनी त्यांना पुन्हा घरी घ्यायची, कौटुंबिक उबेत सुधारायची संधीही दिली... पण मुक्तपणे नि उधळेपणानं जगायची सवय झाल्यावर घरी येण्याचा मोह कुणाला असणार... पुढची काही वर्षं हरिलालनी निराधाराप्रमाणे इथेतिथे काढली. बापूजींनी केलेली एखादी गोष्ट कळली की ते खवळून उठायचे. ‘गांधी’ या नावाची प्रतिष्ठा रसातळाला नेण्यासाठीच आपलं आयुष्य खर्च करायचं असा जणू त्यांनी निश्चय केला होता.

एकदा तर हरिलाल थेट दिल्लीतल्या मशिदीत पोहोचले... हिंदू धर्माचा त्याग करून मुस्लीम धर्म स्वीकारण्यासाठी. आजोबा सर्वधर्मसमभाव मानायचे... त्यामुळे मुलानं मुस्लीम धर्म स्वीकारण्यामुळे त्यांना वेदना व्हायचा प्रश्न नव्हता. नंतर उघडकीस आलं की, कुठल्याच धर्माबद्दल हरिलालना कसलीच श्रद्धा नव्हती, ना प्रेम! पैशांसाठी त्यांनी हा व्याप केला होता. त्या काळात धार्मिक ताणतणाव चालू होता, त्यातून गांधींपर्यंत पोहोचण्याची वाट म्हणून त्यांच्या मुलाला वापरता येईल असा हरिलालना चिथावणाऱ्यांचा कयास होता. ज्यांनी जास्त किंमत दिली... हरिलाल त्यांना विकले गेले. ‘याचं मात्र मला दु:ख झालं!’ घटना कळल्यावर बापूजींनी पत्रात लिहिलं होतं. धर्म मुळात शुद्ध अंतःकरणातून येतो आणि मुलानं बालीश बंडखोरपणापायी चांगुलपणा आणि सत्य यांच्या शोधाचं अवमूल्यन केलं असं वाटून बापूजी अतिशय व्यथित झाले.

माझ्या वडलांना आणि त्यांच्या भावंडांना बापूजींकडून नैतिक आचरणाचे, कनवाळूपणाचे जे धडे मिळाले तेच धडे त्यांनी हरिलाल यांनाही दिले होते. मी ‘हरिलाल अध्याय’ कितीदातरी स्वतःशी आळवतो. बापूजींनी त्यांच्या चुकांचा दोष स्वतःच्या माथी का घ्यावा हे मला उमगत नाही. पालकांनी जितकं करायचं तितकं सगळं करूनही जर प्रश्न शिल्लक उरत असेल तर त्यांनी स्वतःला माफ करायला हवं. पालकांनी आपली मुलं कितीही हौसेनं आणि सन्मानानं वाढवली तरी कधीकधी निसर्गात एखादं नकारात्मक स्वभावाचं मूल घडत जातं. होतं असं.

व्यावहारिक कौशल्य अंगी असायला हवं... पण तितकीच महत्त्वाची आहे जगाबद्दलची सखोल समज. माझ्यासारखी कितीतरी मुलं आश्रमात होती. आम्हांला सगळ्यांना बापूजी गोष्टी सांगायचे, दिवसभरात घडलेल्या गोष्टींची चर्चा करायचे तेव्हा केवळ वस्तुस्थिती मुलांना कळायला हवी एवढाच त्यांचा हेतू नसायचा... मुलांना शहाणपण यावं हे त्यांचं ध्येय असायचं. उत्तम शिक्षण हे नातेसंबंध आणि भावनांविषयीची समजूत देतं आणि स्पर्धेवर नव्हे तर सहकारावर आधारलेली समाजव्यवस्था घडवण्यासाठी मदत करतं असा त्यांचा विश्वास होता. त्यांनी शहाणपणाचा हा ठेवा माझ्याकडेही सोपवला. आज मला असे काही शिक्षणतज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ दिसतात... जे बापूजींप्रमाणे भावनिक बुद्धिमत्तेविषयी विचार करायला लागले आहेत. भावनिक बुद्धिमत्तेची गरज केवढी जास्त आहे याचा ऊहापोह होणं या अभ्यासकांना महत्त्वाचं वाटतं आहे.

भारतीय पुराणकथांमधली बापूजींनी सांगितलेली एक गोष्ट मला आठवते. एक राजा आपल्या एकुलत्या एका मुलाला राजवाडा सोडून खुल्या जगात पाठवतो, शिक्षण घेण्यासाठी. मला सगळं काही ठाऊक आहे, माझ्याइतका हुशार आता कुणी नाही अशा खातरीनं मुलगा शिक्षण आटोपून परततो. राजाला मात्र खातरी वाटत नसते. राजा विचारतो, ‘जे अज्ञात आहे ते समजून कसं घ्यायचं हे तुला कळलं का? आणि होऽ अथांगाचा थांग कसा घ्यायचा हेही तुला ठाऊक आहे ना?’

‘छेऽ काय विचारताहात तुम्ही!! असं कसं शक्य आहे?’ तो उत्तरतो.

राजा म्हणतो, ‘सांगतो थांब. पहिल्यांदा मुदपाकखान्यात जा आणि एक अंजीर घेऊन ये.’

मुलानं अंजीर आणून दिल्यावर राजा ते अर्धं कापतो. दोघंही अंजीरातल्या इवल्याइवल्या बियांकडं बघत राहतात. 

‘असं कर, यातली एक बी अर्धी चीर आणि मला सांग तुला काय दिसतं ते.’ राजा आज्ञा देतो.

राजकुमार तसा प्रयत्न करतो... पण बी इतकी लहान असते की, ती हातातून निसटते... तो वैतागून म्हणतो, ‘काहीही नाहीये हो. काय असणार एका छोट्याशा बीमध्ये?’

राजा मान हलवत म्हणतो, ‘जे तुला क्षुल्लक वाटतं, निरुपयोगी वाटतं त्यातूनच बरंच काही घडतं. एका छोट्या बीमधून केवढं मोठं झाड उगवतं... म्हणून तर अंजीर मिळतं. बीमध्ये झाड दडलेलं असतं. जीवनाची बी आहे ती... ‘नाही’मधून जन्मलेली. अशा तुच्छ, शून्य गोष्टींविषयी शिकशील तेव्हा तुझं शिक्षण पूर्ण होईल.’’

बापूजींकडं कमालीचा संयम होता... त्यामुळेच माझ्यासारख्या मुलांना आणि संपूर्ण जगाला ते जगण्यातल्या सूक्ष्म, सुंदर गोष्टी सांगू शकले. ते अस्वस्थ असायचे, त्रस्त असायचे तेव्हाही त्यांच्या चेहऱ्यावर शांतता जाणवायची. त्यांना जगातली सगळी गुपितं उलगडून बघायची होती. एक अगदी निरुपयोगी वाटणारी बारकीशी बी योग्य मातीत रोवली की किती अनोखं जग निर्माण होतं हे त्यांना ठाऊक होतं.

जग समजून घेण्याचा एकही मोका आपण हातून दवडता कामा नये... आपल्याला जितकं दिसतं आणि समजतं त्यापलीकडचं संपूर्ण नि विराट सत्य बघता यायला हवं.

(अनुवाद: सोनाली नवांगुळ)

- डॉ. अरुण गांधी

'वरदान रागाचे' या लेखमालेत प्रसिद्ध झालेले इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा... 

Tags: पुस्तक अरुण गांधी महात्मा गांधी सोनाली नवांगुळ शिक्षण अहिंसा तरुण मुले लहान मुले अभ्यास शाळा संगोपन पालक हरिलाल गांधी Book New Book Translation Gift of Anger Arun Gandhi Mahatma Gandhi School Teaching Education Non Violance Teenager Children Upbringing Parents Harilal Gandhi Load More Tags

Comments:

Savita nanore

खूपच छान लेखमाला आहेत. अभ्यासपूर्वक लेख आहेत.. खूप खूप धन्यवाफ कर्त्यव्य साधनास

सावखेडकर भालचंद्र पंढरीनाथ

खरंच या कथा अतिशय सुंदर आणि संस्कारक्षम आहेत.मात्र त्या ज्यांच्यापर्यंत पोचायला हव्यात,त्यांच्यापर्यंत त्या पोचण्यासाठी काहीतरी करायला हवे.केवळ पालकांवर ही जबाबदारी सोडून चालणार नाही.

Add Comment