गरीबीचं उदात्तीकरण त्यांना करायचं नव्हतं, आणि...

वरदान रागाचे- भाग 5
 

फोटो सौजन्य: metzlerviolins.com

महात्मा गांधी यांचे सर्वांत ज्येष्ठ नातू (मणिलाल यांचे चिरंजीव आणि तुषार यांचे वडील) अरुण गांधी वयाच्या 88 व्या वर्षीही समाजकार्यात सक्रिय आहेत. त्यांचे बालपण व तारुण्य दक्षिण आफ्रिकेत तर नंतरचे आयुष्य भारतातील इंग्रजी पत्रकारितेत गेले. निवृत्तीनंतर ते अमेरिकेत वास्तव्य करीत आहेत. ते वय वर्षे 11 ते 13 या काळात आजोबांच्या सहवासात राहिले, त्याचा सखोल प्रभाव त्यांच्या विचारांवर व कार्यावर राहिला आहे. ते स्वतःला शांती पेरणारा शेतकरी (Peace Farmer) असे संबोधतात. त्यांचे 'Legacy of Love' हे पुस्तक मराठीत 'वारसा प्रेमाचा' या नावाने गेल्या वर्षी साधना प्रकाशनाकडून आले आहे. त्याचाच उत्तरार्ध म्हणावे असे छोटे पुस्तक म्हणजे 'Gift of Anger', त्याचा मराठी अनुवाद कर्तव्य वरून प्रत्येक शुक्रवारी व शनिवारी क्रमशः प्रसिद्ध करीत आहोत. लेखमालेचा समारोप 2 ऑक्टोबरला होईल. त्यातील हा पाचवा लेख.   
- संपादक

आपल्यापैकी बरेच लोक भौतिक सोयी नि सुखांमागे धावत राहातात. जाहिराती, टेलीव्हिजन, सिनेमे आणि सोशल मिडियातून सातत्याने हेच चित्रं सगळ्यांच्या मनावर उमटवलं जातं आणि हा पाठलाग माणसासाठी महत्त्वाचा बनू लागतो. आणखी मोठं घर घेण्यानं किंवा जास्त वेगवान कार घेण्यानं आपल्याला भरपूर सुखाची हमी मिळणार नाहीये हे आतून आपल्याला ठाऊक असतं. मुळात सुख मिळवण्याचे हे उपायच नव्हेत. सर्वसाधारण अपेक्षांवर आपण माणूस या नात्यानं खरे उतरत नाही तेव्हा आपण ढोबळसं उत्तर स्वत:ला व इतरांना देऊन टाकतो, ‘‘मला वेगळं काहीतरी हवंय... मला निराळा शोध घ्यायचा आहे.’’

बापूजी स्वत:चं आयुष्य अतिशय साधेपणानं जगायचे. काही माणसांना इतर काहींपेक्षा उत्तम आयुष्य जगण्याचा हक्क आहे हे मुळात त्यांना अमान्य होतं. अर्थात अगदी समज आल्यापासून त्यांना हे समतेचं तत्त्व मान्य होतं हे खरं नाही. लंडनला वकिली करत असताना महागड्या बॉन्ड स्ट्रीटवरून त्यांनी स्वत:च्या मापाचा खास सूट शिवून घेतला होता. इतकंच नाही, त्यांनी ब्रिटिश पद्धतीच्या नृत्याचे धडे घ्यायला सुरुवात केली होती, व्हायोलीन आणलं होतं - हा सगळा अट्टाहास ‘प्रॉपर इंग्लिश जंटलमन’ दिसावं म्हणून.

नंतर वकिलीनिमित्तानं ते दक्षिण आफ्रिकेत आले आणि एका केसबाबतीत रात्रीच्या रेल्वेनं प्रिटोरियाला निघाले होते. रेल्वेच्या पहिल्या वर्गाचं तिकिट त्यांच्याकडं होतं. प्रवासादरम्यान एका उंच दणकट अशा गोऱ्यानं त्यांना हटकलं.

‘‘ए कुली, चल बाहेर निघ इथून...’’ वांशिक संदर्भानं तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत तो गोरा ओरडला.

‘‘माझ्याकडे पहिल्या वर्गाचं तिकीट आहे....’’, आजोबांनी उत्तर दिलं.

‘‘तुझ्याकडं काय आहे नि काय नाही याची मला पर्वा नाही. जर तू बऱ्या बोलानं उतरत नसशील तर मी पोलीसांना बोलावतो.’’

‘‘हो, त्याचा तर विशेषाधिकार आहे तुम्हाला.’’, आजोबांनी काळ्या माणसांसाठी असणाऱ्या तिसऱ्या वर्गात न जाण्याचा आपला इरादा शांतपणे व्यक्त केला.

तो गोरा माणूस ताबडतोब तिथून गेला व एक पोलीस आणि रेल्वेचे एक अधिकारी यांच्यासह परतला. त्या तिघांनी मिळून आजोबांना तिथून अक्षरश: उठवलं नि रेल्वेबाहेर काढलं. त्यानंतर कुत्सित हसत त्यांनी आजोबांचं सामान बाहेर फेकलं आणि रेल्वेला निघण्याचा सिग्नल दिला.

आजोबांनी ती रात्र तिथल्या फलाटावर थंडीत कुडकुडत घालवली. मनात मात्र सतत एकच विचार होता, आपल्याला नक्की काय करायचंय पुढे?

‘‘आपल्याचसारख्या दुसऱ्या जिवंत माणसांचं अवमूल्यन किंवा अवमान काहींसाठी आनंददायक कसा काय ठरू शकतो याचं नवल मला वाटत राहातं.’’, हे वाक्य त्यांनी नंतर लिहिलं.

फलाटावर घालवलेली ती दीर्घ थंडगार रात्र! तुमचा ज्या गोष्टींवर विश्वास आहे त्याबद्दल तुम्ही बोलायलाच हवं ही जाणीव बापूजींना त्याच रात्रीनं करून दिली. दुसऱ्या माणसांच्या अपेक्षेबरहुकूम वागण्याचं सत्र चालू ठेवून ना तुम्ही खूष राहाता, ना पूर्णत्वाची भावना तुम्हाला लाभते... जगाचंही यात काही भलं होत नाही. या घटनेनंतर त्यांनी वांशिक व वर्णद्वेषविषयक मुद्दयांवर जाहीर बोलायला सुरुवात केली. ते बोलायचेही अशा पद्धतीनं की लोक भारावून जायचे, त्यांना बापूजींचं म्हणणं पटायचं. या अनुभवानंतर त्यांनी दक्षिण आफ्रिकेतल्या भारतीयांच्या दुर्दशेविषयी नि सरकारच्या चुकीच्या व पूर्वग्रहदूषित धोरणांविषयी लिहायला सुरुवात केली.

काही वर्षांनी भारतातून बापूजी पुन्हा दक्षिण आफ्रिकेत परतले तेव्हा वर्णद्वेषाविषयी खंबीरपणे बोलणारा व भूमिका मांडणारा माणूस म्हणून त्यांची प्रतिमा जनमानसात माहिती झाली होती. यावेळी परतताना दोन जहाजं भरून भारतीय कामगार त्यांच्यासोबत आले होते. सत्तेवर असणाऱ्या सरकारला या इमिग्रंट्‌स काळ्या लोकांना आपल्या भूमीवर येऊ देण्याबद्दलची गोऱ्यांची अनिच्छा ठाऊक होती. कृष्णवर्णीय लोकांचे हक्क अबाधित राहावेत म्हणून काम करणाऱ्या माझ्या आजोबांवर ते भयंकर चिडलेले होते. त्यामुळं गांधींसह या लोकांना दक्षिण आफ्रिकेत प्रवेश करू देणं म्हणजे संकटाला निमंत्रण देण्यासारखं आहे अशी सरकारची भावना होती. सरकारनं त्यामुळंच दोन आठवडे जहाजावरून कुणाला उतरूच दिलं नाही. अखेर आजोबा जहाजातून उतरले तेव्हा जमावाने त्यांच्यावर हल्ला केला, डोक्यातून रक्त येईपर्यंत रानटीपणानं मारहाण केली. त्यावेळी खरंतर त्यांना मारून टाकलं असतं जमावानं, पण त्यांनी आपल्या मित्राच्या घरापर्यंत कशीबशी वाट काढली. तिथं त्यांची बायको-मुलं त्यांची वाट पाहत थांबले होते. चुकीच्या गोष्टीविरोधात आवाज उठवण्याचा अर्थ त्यांना चांगलाच कळत होता. या मार्गात कितीही धोके असले तरी आता त्यांना कुणीच थांबवू शकणार नव्हतं. तसा निश्चयच त्यांनी केला होता. जमावाला सामोरं जाण्याच्या धोक्यापेक्षा व त्यासाठी उपसाव्या लागणाऱ्या कष्टापेक्षा फार मोठं ध्येय त्यांच्या नजरेसमोर होतं...

आजोबांवर हल्ला करणाऱ्यांपैकी काही माणसांना पोलीसांनी अटक केलं आणि या प्रकरणाला आणखी एक वळण मिळालं. पोलीसांनी बापूजींना या लोकांविरोधात रितसर तक्रार नोंदवायला सांगितली. ती केली की त्यांच्यावर कुठले आरोप ठेवायचे याचा निर्णय पोलीसांना घेता आला असता. मात्र आजोबांनी असं काही करण्यास नकार दिला.

‘‘तुम्ही तक्रार दिली नाहीत तर मला त्यांना सोडून द्यावं लागेल...’’, आश्चर्यानं पोलीस त्यांना म्हणाला.

‘‘चालेल.’’ आजोबांनी शांतपणे सांगितलं.

आपण तक्रार देऊन पोलीसांना त्यांची कारवाई करू दिली तर कृष्णवर्णीय नि भारतीय लोकांविषयी आधीच असणारा तिरस्कार वाढण्याची शक्यता आपण तयार करू... उलट हिंसेवर किंवा बदला घेण्यावर आपला विश्वास नाही असा संदेश आपल्या कृतीतून त्यांच्यापर्यंत पोहोचला तर आपल्या वागण्याचा ते पुनर्विचार करतील. कधीकधी तोंडातून आवाजही न काढता तुम्ही तुमचं म्हणणं अधिक परिणामकारपणे मांडू शकता. - आजोबा हरतऱ्हेनं विचार करत प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाऊ पाहात होते.

या घटनाक्रमानंतर भारतात परतल्यावर बापूजींनी शर्ट-पॅन्ट या पेहरावाचा त्याग करून खादीचं धोतर आणि खांद्याभोवती जरूरीप्रमाणे शाल हा वेश स्वीकारला. याबद्दल ते म्हणायचे, भारतातल्या गरीबातल्या गरीब व्यक्तीकडं इतकंच असेल तर मला त्यापेक्षा अधिक बाळगण्याचा अधिकार नाही. गरीबीचं उदात्तीकरण त्यांना करायचं नव्हतं, पैशांच्या महत्तेबद्दल ते अनभिज्ञ मुळीच नव्हते. त्यांनी प्रवासादरम्यान पैसा गोळाही बराच केला... पण कशासाठी? तर गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी. लोकांच्या मूलभूत गरजा भागण्यानं त्यांच्या आयुष्यात पडणारा फरक आणि अवाजवी गरजा भागवण्यातून न पडणारा फरक या दोन्हींबद्दल त्यांनी बराच विचार केला होता. फरकाची चांगली समज त्यांना होती.

माझे आईवडिल फिनिक्स आश्रमात बापूजींचं तत्त्वज्ञान जगत होते. मी लहान असताना जवळपासच्या शेतांवर काम करणाऱ्या कृष्णवर्णीय मजुरांच्या मुलांशी खेळायला जावं म्हणून तेच प्रोत्साहन द्यायचे. मला या मुलांबरोबर खेळायला जाण्यासाठी उद्युक्त करण्यातून आर्थिक स्तरामधल्या तफावतीबद्दल काही कळावं नि संपत्तीबद्दलचा माझा दृष्टीकोन आकाराला यावा हे ही त्यांना साधायचं होतं. त्या मुलांकडं कुठली आलीत खेळणीबिळणी! - पण आम्ही मुलं काडेपेट्यांची रिकामी खोकी आणि शर्टाची बटणं यांच्या जोडाजोडीतून लहानखुऱ्या कार्स बनवायचो. तिथल्या ओढ्याकाठची मऊ काळीभोर माती खणून आम्ही मूर्ती बनवायचो. असे नवे खेळ शोधून काढायला आम्हाला खूप मजा यायची. आम्ही बनवलेली खेळणी नीट जपून ठेवायचो. आज प्लॅस्टिची ना-ना तऱ्हेची खेळणी नि गॅजेट्‌स मुलांना मिळतात, पण एक-दोन दिवसांत मुलं या खेळण्यांना कंटाळतात.

मुलांची खेळाची वेळ अतिशय रचनात्मक असली पाहिजे याकडे माझ्या आईवडिलांचा कटाक्ष होता. त्यामुळंच मी शाळेत जायला लागलो तेव्हा माझ्या या शेतावरच्या मित्रांना मी एबीसीडी शिकवली, आकडे कसे मोजायचे हे शिकवलं. मला वाचता यायला लागल्यावर या माझ्या मित्रांनाही वाचता यायला लागलं. माझ्यानिमित्ताने त्यांच्यासाठी जणू पूर्णपणे नव्या जगाचे दरवाजे उघडत होते. मी शाळेतून कधी घरी येतोय याची ही मंडळी वाट बघत असायची. अमेरिकन मुलंमुली शाळेत कसा कंटाळा येतो नि वर्ग कसे वैतागवाणे असतात याची तक्रार अगदी सहज करू शकतात... पण दक्षिण आफ्रिकेतली ही अती गरीब मुलं... आपण कधी शिकू याचा विचारही त्यांनी केला नव्हता... त्यामुळं शिकणं ही त्यांच्यासाठी अद्‌भूत गोष्ट होती.

मी मुलांना शिकवतोय याचा गवगवा चार ठिकाणी व्हायला वेळ लागला नाही... अनेक आफ्रिकन पालक मी त्यांच्याही मुलांना शिकवावं म्हणून दुरून दुरून येऊ लागले. काहीकाही तर दहा मैलांचं अंतर कापून आपल्या मुलांना घेऊन आले. सगळेच अनवाणी. आपल्या मुलांना किमान वाचता यावं अशी या पालकांची इच्छा होती. या आमच्या उपक्रमात माझ्या बहिणीनं गणित शिकवण्यासाठी म्हणून शिरकाव केला. हळूहळू माझे आईवडिलही सहभागी झाले. गरीब मुलांसाठी एक खरीखुरी शाळाच तिथं आकार घेऊ लागली.

लोकांना शिक्षण घेऊन आपलं आयुष्य बदलायची आटोकाट इच्छा असते, पण या साध्या गोष्टीसाठीही त्यांच्याकरता कुणी उभं नसतं हे किती अन्यायकारक आहे हे माझ्या लक्षात येऊ लागलं. आमची ही ‘दुपारची शाळा’ व्यवस्थेविरूद्धचा आवाज बनली. इथं मी ‘लोकांनी जसं वागावं अशी आपली अपेक्षा असते तो बदल आपण स्वत:त घडवून आणावा’ ही बापूजींची इच्छाच प्रत्यक्षात उतरवत होतो. ... तुमचे शब्दच नव्हे कृतीही बोलते... 

बापूजींच्या मार्गावर चालायचं असं ठरवून माझ्या आईवडिलांनीही गरीबीचं व्रत स्वीकारलं होतं. त्यामुळं आमच्या गरजा अगदी कमीतकमी असायच्या, बचतीचं तर नावंही नव्हतं. मात्र भवताली दिसणाऱ्या कृष्णवर्णीय आफ्रिकनांच्या तुलनेत आम्ही खूपच सुखात जगत होतो असं म्हणायला हवं.

आजूबाजूच्या असमानतेविषयी बोलायची माझ्या आईची स्वत:ची म्हणून एक पद्धत होती, खरंतर ती त्यासाठी प्रत्यक्ष जे करायची ते अधिक बोलकं असायचं. आमच्याकडे एक गाय होती. तिचं दूध आम्हाला पुरून उरायचं. तिनं ते आजूबाजूच्या गरीब लोकांसाठी अगदी नाममात्र किंमतीत विकायला सुरुवात केली. आमच्याकडं आम्ही करायचो त्या भाज्याही अशाच पद्धतीनं ती अत्यल्प किंमतीत त्यांना विकायची. गावाशहरातल्या हितचिंतकांकडून जमवलेले कपडे या माणसांना जरुरीप्रमाणे द्यायची. मी कळत्या वयाचा झाल्यावर मला जाणवलं की आई फारच कमी पैशात शक्य त्या गोष्टी या माणसांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतेय. तेव्हा मी तिला विचारलं, तू मुळात इतके कमी पैसे घेतेस, त्यापेक्षा तू फुकटच का नाही देत त्यांना या गोष्टी?

‘‘अगदी नाममात्र पैसे मी त्यांच्याकडून घेतेय कारण त्यांची व्यक्ती म्हणून काही प्रतिष्ठा आहे तिला माझ्याकडून धक्का पोहोचता कामा नये. आपण आपल्या कुटुंबासाठी आपल्या बळावर अन्न, कपडे पुरवू शकतो या भावनेनं त्यांची जगण्याची हिंमत टिकून राहातेय. त्यांचा स्वाभिमान महत्त्वाचा आहे! तो राखला जावा यासाठी मी इतकं तर करूच शकते.’’

माझी आई त्यांच्याबद्दल वाटणाऱ्या दयेनं नव्हे तर करूणेनं द्रवली होती. आपल्या लहानशा कृतीने या माणसांचा स्वत:बद्दलचा अभिमान, स्वत:च्या क्षमतेबद्दल वाटणारा विश्वास नव्यानं बाळसं धरत असेल नि त्यातून ते स्वत:साठी, कुटुंबासाठी अधिक चांगलं साध्य करू शकणार असतील तर हा हस्तक्षेप जरूरीचा आहे असं आईला वाटायचं. दयाभावनेनं नव्हे तर सच्च्या करुणेतून आपण दुसऱ्यासाठी काही करू पाहतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी असणारे आपले संबंध गहिरे होतात. गरीब माणसाच्या आत्मसन्मानाबद्दल माझी आई अगदी आजोबांसारखं बोलायची, वागायची. 

माणसाला स्वत:चा आवाज असावा, त्यानं स्वत:साठी बोलावं असं आजोबा नेहमी म्हणत असले तरी त्यांनी याबद्दल खुबीनं एक इशारा देऊन ठेवला होता. आपलं म्हणणं मांडताना ‘जर मी म्हणतो तेच खरं’ असं म्हणत एखादा माणूस दुसऱ्याचा दृष्टीकोन समजून घेण्याची तसदी घेत नसेल तर ते चुकीचं आहे हे त्यांनी स्पष्ट केलं होतं. यातून ते स्वत:लाही वगळायचे नाहीत.

आश्रमातला दिनक्रम किंवा एकूणच तिथली सगळी रचना ही मुळात माणसानं त्याच्या पूर्वग्रहांमधून मोकळं व्हावं, निष्कारण केलेल्या कप्प्यांमधून स्वत:ला सोडवावं आणि समजूत, स्वीकार आणि दुसऱ्याचं कौतुक करणं या गुणांच्या वाढीसाठी प्रयत्न करावेत यासाठी उत्तेजन देणारं होतं. माणसामाणसांमधले फरक, वेगळेपण समजून घेण्यासाठी हे वातावरण खूप पोषक होतं.

समाजाला नवी उमेद मिळावी आणि बदल घडावा यासाठी, अन्यायाविरोधात ठामपणे बोलता यावं यासाठी अन्यायाचा अनुभव तुम्हाला घ्यावा लागतो. या अन्यायाचं दाहकपण हाडांपर्यंत पोहोचलं की आपल्याला खरा आवाज फुटतो असं बापूजींचं म्हणणं!

आपल्या पटलेलं सत्य ठामपणे बोलून दाखवण्यानं कधीकधी वेगळ्या अनिश्चिततेचा सामना करावा लागू शकतो. भारतात असताना मी माणसामाणसांमध्ये आखलेल्या वंश-वर्गभेद नि जातीच्या वेडगळ सीमांविषयी व त्यातील पूर्वग्रहांविषयी अभ्यास करायचा ठरवला होता. त्याच दरम्यान मुंबईतल्या माझ्या कार्यालयात मिसिसिपीची एक बाई मला भेटायला आली. ती भारतातभर प्रवास करत होती. आम्ही अमेरिकेतल्या वंश/वर्गभेदाविषयी बरंच बोललो. त्यावेळी मला वाटलं, भारत, दक्षिण आफ्रिका आणि अमेरिका या देशांमधल्या वांशिक व वर्गविषयक भेदांमधले बारकावे समजून घेत सांस्कृतिक भेदाभेदाचा तुलनात्मक अभ्यास या निमित्तानं करायला हवा.

दक्षिण आफ्रिकेत राहाण्याच्या निमित्तानं मला, ‘तुम्ही गोरे नसाल तर फक्त काळेच असता, म्हणजे ‘वेगळे’ असता’ हा अनुभव होताच. मिसिसिपीच्या बाईंनी मला अमेरिकेतलं आणखी निराळं वास्तव सांगितलं. त्या म्हणाल्या, गोऱ्या अमेरिकनांकडे तर आफ्रिकन आणि त्यांचे पूर्वापार गुलामी करणारे लोक यांच्यातही सांस्कृतिक व वर्गीय बरेच स्तर आहेत. भारतामध्ये कातडीच्या रंगावरून भेदभाव होत नाही, पण इथली जातिव्यवस्था माणसामाणसांमध्ये असणारं अंतर दर्शवते. उदाहरणार्थ, ब्राह्मण, अस्पृश्य.

मिसिसिपी विद्यापीठानं विविध संस्कृतींमध्ये असणाऱ्या पूर्वग्रहांवर अभ्यास करण्यासाठी मला फेलोशिप देऊ केली होती. त्यामुळे मी व माझी बायको अमेरिकेला गेलो. गांधीजींचा नातू अमेरिकेत आलाय ही बातमी पसरल्यावर लोक मला भेटायला यायला लागले. त्यांचा नातू म्हणून मला मिळणाऱ्या आदरानं मी खरोखर हेलावलो. मला कळलं, अजूनही लोकांना गांधींबद्दल जाणून घेण्याची खूप इच्छा आहे. त्यानंतर वर्षभरानं बहुतेक, 1988 मध्ये न्यू ऑर्लीन्स विद्यापीठानं मला व्याख्यानासाठी निमंत्रण दिलं. लोकांना या कार्यक्रमाविषयी कळावं म्हणून ‘वंशवादावर गांधींचे विचार’ असे फलक त्यांनी असंख्य ठिकाणी लावले, भरपूर जाहिरात केली. हा काळ लक्षात घेण्यासारखा आहे. याच काळात क्लू क्लूक्स क्लॅन या वंशवादी संघटनेचे सदस्य डेव्हिड ड्यूक हे लुईझियाना हाऊसचे प्रवक्ते या नात्यानं जनमानस प्रभावित करत होते.

आमचं विमान न्यू ऑर्लीन्समध्ये धावपट्टीवर स्थिर होतंय तितक्यात एक घोषणा झाली, ‘मिस्टर गांधी यांनी कृपया पुढे यावं!’ आणि घोषणा होताच, चार पोलीस समोर आले.

मी थोडा गोंधळात पडलो. खरंतर अंगाला किंचित कंप सुटला, की मी काय केलंय? पोलीसही मला सांगेनात की नेमकं काय चाललंय, पण त्यातला एक म्हणाला, ‘‘तुमच्या सुरक्षेसाठीच आहे हे सगळं!’’ पुढे दोन नि मागे दोन पोलीस असा ताफा घेऊन मी विमानातून उतरलो, कारमध्ये बसलो व विद्यापीठात पोहोचलो. तिथं पोहोचल्यावर मला कळलं की क्लू क्लूक्स क्लॅन या संघटनेकडून काही धमक्या मिळाल्या, त्यात माझ्या खूनाचीही धमकी होती, म्हणून विद्यापीठानं ही खबरदारी घेतली होती.

काही झालं तरी भाषण होणार असं आम्ही ठरवलं. मी बोलणार होतो त्या जागेपासून ऐकणाऱ्यांमधलं अंतर पुरेसं जास्त राखलं होतं, पहिली रांग तर मोकळीच ठेवण्यात आली... भाषणाच्या नेमक्या वेळेत मला मागच्या बाजूने व्यासपीठावर आणण्यात आलं. भाषण संपताच झटकन मला कारमध्ये बसवून विमानतळावर पोहोचवलं गेलं. तिथंही खास महत्त्वाच्या लोकांसाठी असणाऱ्या सूटमध्ये मला थांबवण्यात आलं. पोलीस बरोबर होतेच. अखेर विमान आलं, पण मला सगळ्यात शेवटी आत पोहोचवलं गेलं. आतही विमानकंपनीनं पहिल्या वर्गाचं आसन माझ्यासाठी राखून ठेवलेलं होतं. मी तिथं बसल्यावर पोलीसांनी मला अदबीनं सलाम ठोकला आणि मग माझा निरोप घेतला.

त्या दिवशी मला वाटलं, एखाद्या मुद्‌द्यावर आपण आवाज उठवतो तेव्हा त्याचा हवा तसा परिणाम खूप नंतर बघायला मिळतो, पण आपण धैर्यानं व्यक्त होण्याची इच्छा दर्शवतो तेव्हा संघर्षाला सुरुवात होते. दुसऱ्या गटात भीती पसरते, गोंधळ माजतो. कधीकधी मान खाली घालून अबोलपणे अळणी भोपळ्याचे तुकडे खाणंच बरं पडतं, गर्दीबरोबर चालत राहाण्यानं जगणं कमी गुंतागुंतीचं आणि सुरक्षित असतं. - तरी, माझ्या आजोबांनी हा मार्ग कधीच स्वीकारला नव्हता. कितीतरी वेळा त्यांनी मार खाल्ला, त्यांच्यावर हल्ले झाले, तुरूंगवास भोगावा लागला, अक्षरश: आठ वेळा त्यांना जीवे मारण्याचेही प्रयत्न झाले. एकदा तर असा एक मारेकरी बापूजींच्या स्वयंसेवकांच्या हाताला लागला, त्याला ताबडतोब पोलीसांकडे सोपवायची त्यांची इच्छा होती, पण बापूजींनी नकार दिला. उलट त्यांनी या मारेकऱ्याला समोर बसवलं. त्याला आपल्याला मारण्याची इच्छा का झाली असेल याबद्दल त्याच्याशी संवाद सुरू केला. खूप प्रयत्न केल्यावरही तो कारण सांगेना, बदलायची तयारी दाखवेना तेव्हा बापूजींनी त्याला जाऊ दिलं, म्हणाले, ‘‘तुला शुभेच्छा! जर माझं मरण तुझ्याच हातून लिहिलं असेल तर मला कुणीही वाचवू शकणार नाही... पण तसं नसेल तर तुला यश मिळणार नाही हे सरळ आहे.’’

आयुष्यभर स्वत:ला पटतं ते बोलून-वागून बापूजींनी विरोध पत्करला, संघर्ष केला, त्यासाठी ते तुरूंगात गेले. जी व्यवस्था अन्यायी आहे तिच्या विरोधात अहिंसक मार्गाने बोलत राहण्यातून, ती बदलण्याकरता आग्रह धरण्यातून त्यांना ताकद मिळत असे.

बऱ्याच लोकांना वाटतं, माझ्या आजोबांनी खूप हलाखीत आयुष्य काढलं... पोटाला फार काही खायला नको, राहायचं मातीच्या सारवलेल्या छोट्याशा झोपडीत, गरीबांसारखे कपडे घालायचे हे सगळं उगीच कोण करतं? देशात, जगभरात त्यांनी खूप मान मिळवला, त्यांचं खूप नाव झालं... या सगळ्यामुळं ते सुंदरशा हवेलीत अवतीभवती दिमतीला असणाऱ्या नोकरांसह आरामात जगू शकले असते. मी कळता झाल्यावर पहिल्यांदा सेवाग्राममध्ये आलो होतो तेव्हा माझी तीच अपेक्षा होती. मात्र ‘पॅशन आणि कंपॅशन’ या त्यांच्या धारणा होत्या. एखाद्या प्राणप्रिय उद्देशासाठी उत्कटतेनं काम करणं व करूणा बाळगणं महत्त्वाचं असं त्यांना वाटत असे. चांगुलपणाची वैश्विक मूलभूत मूल्यं, प्रेम, शांतता, योग्य गोष्टींसाठी ठामपणानं उभं राहाणं, त्यातील नेकी या गोष्टींनी त्यांना आनंद मिळे... एखाद्या राजवाड्यातल्या श्रीमंती थाटातल्या जेवणानं या माणसाला कसला आनंद!

काहीजण असंही म्हणतील की डेव्हिड ड्यूक जेव्हा वांशिक भेदाच्या समनर्थनार्थ प्रक्षोभक बोलतो तेव्हा त्याला पटत असणाऱ्या व विश्वास वाटतो अशा उद्देशासाठीच धडपडत असतो. तो जे करतो ते तो बोलतो. त्याला बोलण्याचा अधिकार आहे. अमेरिकन कायद्यानं त्याला तो अधिकार नागरिक म्हणून दिला आहे. कायदा सगळ्यांना समान असं आपण म्हणतो तेव्हा मला ते पोरकटपणाचं वाटतं. वाटतं, आपण फसवतोय स्वत:ला! मनात हिंसेची लसलस आणि विभाजनाचा उद्देश ठेवून ज्यांना इतरांचे हक्क पायदळी तुडवायचे असतात व मी म्हणतो तेच खरं अशी आरोळी ठोकत जग वेदना आणि नैराश्य भरून टाकायचं असतं त्यांच्याबद्दल न्याय नि समानता याविषयी आपण काय बोलणार? अशा तिरस्काराला विरोध करणं हेच आपलं ध्येय असायला हवं.

तरूण असताना आजोबा खूप लाजरेबुजरे होते. त्यामुळं चळवळीच्या सुरुवातीच्या टप्प्यात ते भाषण करायला समोर यायचे नाहीत. त्यांनी मला एकदा बोलता बोलता सांगितलं होतं, ‘माझा लाजाळूपणा मला फायद्यात पडला... कारण मी जे काही बोलतोय किंवा बोलेन त्याबद्दल मी खूप बारकाईनं विचार करायला लागलो. मुळात मितभाषी असणारा माणूस बोलायला उभा राहतो तेव्हा त्याचा प्रत्येक शब्द तो तोलून मापून वापरतो, त्यामुळं भरकटण्याची शक्यता बहुदा नसतेच.’

माझ्या आजोबांचं उदाहरण तुम्हाला यासाठीच सांगितलं की प्रत्येकवेळी तुम्ही विचारांती बोलावं. तुमच्या बोलण्यानं आसपासच्या समाजाला, जगाला एक तरी पाऊल पुढं टाकायला बळ मिळतं की तुम्ही दुखावताहात त्यांना याचा विचार करा. तुमच्या शब्दांनी काहीतरी चांगलं घडतंय असं कळतं तेव्हा एक करा, मोठ्यानं बोलायला सुरुवात करा... खरंच!

(अनुवाद: सोनाली नवांगुळ)

- डॉ. अरुण गांधी

वाचा 'वरदान रागाचे' या लेखमालेतील पहिले चार भाग:

1. प्रास्ताविक- आजोबांकडे मिळालेले धडे
2. त्यांनी संताप आणि वीज यांची तुलना समोर ठेवली...
3.तोडगा काढणे हे ध्येय असेल तर तो मार्ग योग्य असतो..
4. विक्षिप्तपणाचं त्यांना वावडं नव्हतं, मात्र...

Tags: अरुण गांधी महात्मा गांधी सोनाली नवांगुळ Book New Book Translation Gift of Anger Arun Gandhi Mahatma Gandhi Load More Tags

Comments:

अरुण कोळेकर , शरदचंद्रजी पवार महाविद्यालय जेजुरी.

रागाचे वरदान ही लेखमाला वाचनीय ठरत आहे. अनुवादही सहज ,सुलभ तरीही भाषेची उत्तम लय पकडत प्रवाही ,संवादी बनला आहे. गाधीजीं‌ विषयी कितीही , लिहिलं ,बोललं , वाचलं , ऐकलं तरी गांधीजी दशांगुळे पुरून उरतात.त्यांचं ,जगणं ,जीवन ,विचार आणि कार्य कालातीत ठरले आहेत . गांधीजी सत्याच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा ,ते समजून घेण्याचा प्रयत्न करीत असत. तरीही आपणांस पूर्ण स्वातंत्र्य सापडलले आहे ,असा‌ दावा करीत नसत.त्यामुळेच सार्वकालिकत्व आणि चिरंतनपण त्यांच्या विचार आणि कार्याला प्राप्त झाले . त्यामुळे जगभर गांधीजी अनेकांचे प्रेरणास्थान बनून राहिले आहेत.

Sharmishtha Kher

मूर्तीचं अनेकवचन मूर्त्या असं होत नाही. देवीचं अनेकवचन देव्या करणार का ? आणि कृतीचं कृत्या ?

Add Comment