भौतिक स्थैर्य आणि नैतिकता यांचे संबंध व्यस्त असतात...

वरदान रागाचे- भाग 8

आजकाल बहुतांशी लोकांकडं माझ्या आजोबांची कृश अंगकाठी, साधेपणा झळकवणारं एखादं तरी चित्र किंवा फोटो असतोच. भौतिक गोष्टींचा त्याग, गरजेचे म्हणून आपण घालतो त्या कपड्यांमध्येही काटकसर केलेल्या बापूजींची प्रतिमा सगळ्यांना एखाद्या संतमहात्म्यासारखीच भासते. पण एक सांगू, त्यांना तुम्हा सगळ्यांइतकंच पैशांचं महत्त्व ठाऊक होतं. आर्थिक सक्षमता ही भारताच्या स्वातंत्र्याची किल्ली आहे यावर त्यांचा विश्वास होता. ते ठामपणानं आर्थिक सक्षमतेबद्दल बोलायचे कारण, जर एखादा सामान्य माणूस आपल्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडू शकत नसेल तर राजकीय स्वातंत्र्य अर्थहीन आहे हे त्यांना पटलेलं होतं.

एकदा माणूस आश्रमात सदस्य म्हणून दाखल झाला की आर्थिकदृष्ट्या कुणामध्ये कसला फरक उरत नसे. सगळेच अतिशय साधं जगायचे. शेतातला भाजीपाला पिकवण्यापासून ते बुट्टीच्या संडासाच्या स्वच्छतेपर्यंत सगळी कामं आम्ही एकत्र करायचो. सारवलेल्या जमिनीवर बसून आम्ही जेवायचो. अभ्यास तिथेच चालायचा नि गप्पाटप्पाही. आम्हाला कुणी जेवायला वाढतबिढत नव्हतं. आमची ताटं, वाटी, पाणी आम्ही घ्यायचो, झालं की घासूनही आम्हीच ठेवायचो.

आम्हाला सगळ्यांना सारखीच वागणुक असल्यामुळं कुणालाही आपल्यावर अन्याय होतोय असं वाटायचा प्रश्न नव्हता. आमच्यापैकी पुष्कळजणांना खूष राहाण्यासाठी फार काही लागत नाही हे बापूजींना ठाऊक होतं. समोरच्याकडं माझ्यापेक्षा जास्त काहीतरी आहे अशी तुलना आली की भांडण लागतं, कारण दुसऱ्याकडे असणारं ते ‘जास्त’ आपल्यालाही हवं वाटतं. आर्थिक विषमता संपवणं ही जगभरातली हिंसा कमी करण्याची पहिली पायरी आहे असं आजोबांना लक्षात आलं होतं. अहिंसेसंदर्भात आजोबा शिकवण द्यायचे तशी कुणी देऊच शकत नाही. असं मी म्हणतो कारण असमानतेमुळे रागाला हळूहळू कशी उकळी येते हे पाहण्याची अनुभवातून परिपक्व झालेली नजर आजोबांकडे होती.

बापूजी अगदीच साधेपणाने राहायचे, पण या साधेपणाचा कधी अडसर त्यांना झाला नाही. उलट जगभरातल्या महत्त्वाच्या काही माणसांना ते प्रत्यक्षात भेटू शकले. 1930 मध्ये ब्रिटिश सरकारने लंडन येथे आयोजित केलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेला ते भारताच्या भविष्याविषयी चर्चा करण्यासाठी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले होते. त्यावेळीही त्यांनी हातावर विणलेल्या खादीचे भरड कपडे घातले होते. ग्रामीण भागात राहाणाऱ्या अतिशय गरीब शेतकऱ्यांच्या उद्योगाला गती देण्यासाठीचं त्यांचं हे पाऊल होतं. खादीच्या या चळवळीनं इतका वेग घेतला की ब्रिटिशांच्या कापड गिरण्यांच्या उद्योगावर त्याचा परिणाम व्हायला झाला. स्वातंत्र्याची आस दाखवण्याचा मार्ग म्हणून लोक प्रचंड प्रमाणात खादीचे देशी कपडे वापरू लागले. त्यामुळंच भारतातून स्वस्तात कापूस घेऊन, मोठमोठ्या गिरण्यांमध्ये प्रक्रिया करून यंत्रावर बनवलेले अधिकचे महागडे कापड भारतात विकायच्या ब्रिटिशांच्या मनसुब्याला धक्के बसायला लागले.

गोलमेज परिषदेत सहभागी होण्यासाठी आलेल्या जगभरातल्या पाहुण्यांना अगत्यानं बकिंगहॅम पॅलेसमध्ये बोलावलं होतं. तिथंही आजोबा धोतर आणि खांद्यावर शाल या वेशात पोहोचले. राजवाड्यातील सहाय्यकांना त्यांचा हा वेश बघून आश्चर्य वाटलं. राजाला भेटण्यासाठी अशा अवतारात जाणं योग्य नाही हे त्यांनी आजोबांना सांगितलं. त्यावर आजोबा नेहमीसारखं मंद हसले आणि त्यांनी बाणेदारपणे उत्तर दिलं, ‘मी नेहमी ज्या कपड्यांत असतो त्या कपड्यात मला भेटण्यात किंग जॉर्जना अडचण असेल, तर मी आत येत नाही.’ नंतर पत्रकारांना ही गोष्ट कळली. त्यांना गोष्टीचं मर्म कितपत कळलं, कोण जाणे! - पण त्या दिवशीची मुख्य बातमी होती, ‘गांधी यांनी धोतर नेसून किंग जॉर्ज यांच्या मेजवानीसाठी राजवाड्यात प्रवेश केला.’ 

गांधी राजवाड्यातील किरमिजी रंगाच्या देखण्या गालिचावरून, अतिवापराने तळवे झिजलेली चप्पल घालून, धोतरासारख्या साध्या वेशात राजाला भेटले या अद्‌भूत घटनेच्याच पत्रकार प्रेमात पडले. बापूजी राजवाड्यात गेले तेव्हा किंग जॉर्ज यांनी पट्‌ट्यापट्याची विजार आणि त्यावर सकाळच्या वेळी घालतात तसा कोट घातला होता. राजाच्या शेजारी राणी मेरी होती. तिनं त्यांच्या तिकडच्या पद्धतीप्रमाणं झळाळता चंदेरी गाऊन घातला होता. एकूण ब्रिटिश लोक चहाच्यावेळी घालतात तो पोषाख दोघांनीही घातला होता. नंतर आजोबांना कुणीतरी विचारलं, राजाच्या समोर तुम्हाला तुमच्या अंगावर कपडेच नाहीयेत असं वाटलं नाही का? त्यावर हसत पण उपहासानं ते म्हणाले, ‘‘राजानं आम्हाला दोघांना पुरतील इतके कपडे घातले होते की!’’

आर्थिक यश मिळवणं ही बापूजींच्या लेखी वाईट गोष्ट नव्हती. मात्र तुमची आर्थिक उन्नती होत असताना तुम्ही इतरांना त्या स्थितीत येण्यासाठी मदत केली नाहीत तर ती वाईट गोष्ट आहे असं त्यांना वाटायचं. त्यांना स्वत:साठी पैसा नको होता, पण त्यांच्या डोक्यात जे प्रकल्प आकाराला येत होते ते प्रत्यक्षात आणण्यासाठी पैसाच हवा हे वास्तव त्यांना कळत होतं. फंड जमवण्यासाठी त्यांच्याकडे नियोजन तयार होतं. ते जेव्हा जेव्हा प्रवास किंवा अन्य कारणानं बाहेर पडायचे तेव्हा लोक त्यांच्या भवती गर्दी करायचे, स्वाक्षरी मागायचे. त्यांची प्रार्थना ही सर्वधर्मियांना कवेत घेणारी असायची. त्यामुळं प्रार्थनेसाठी हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती, ज्यू, बौद्ध अशा सगळ्या धर्मांचे लोक उपस्थिती लावायचे. प्रार्थनेनंतर अर्थातच स्वाक्षरीसाठी झुंबड उडे. त्यांचं नियोजन हेच तर होतं. एका स्वाक्षरीसाठी पाच रूपये किंमत लावण्यानं निधी जमा व्हायला मदत होणार होती. सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी लागणारा पैसा यातून बऱ्यापैकी जमा होणार होता. 

मी पहिल्यांदा आजोबांबरोबर प्रवासाला गेलो तेव्हा ज्यांना ज्यांना स्वाक्षरी हवीय त्यांच्या वह्या नि पैसे जमा करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. अशी महत्त्वाची जबाबदारी मिळाल्यामुळं मी रोमांचित झालो. आपण बापूजींच्या खूप जवळचे आहोत म्हणून ते आपल्याकडे इतकं मोठं काम सोपवताहेत या विचारानं भारावून गेलो.

त्या ‘सेल्फी’पूर्व काळात कुठले आलेत सेलफोन्स नि कॅमेरे! मोठ्या लोकांच्या स्वाक्षरी घेण्याचा प्रघातही खूप तुरळक दिसायचा. काही खास व विशेष माणसांची स्वाक्षरी आपल्या खाजगी संग्रहासाठी कुणाकुणाला हवी वाटायची. काही दिवस मी हे काम अतिशय मन लावून केलं. माझ्या मनात सतत यायला लागलं की मलाही हवीय आजोबांची स्वाक्षरी, पण माझ्याकडे कुठले पैसे? बापूजी अपवाद म्हणून मला ‘अशीच’ सही देतील याबद्दल मनात विश्वास नव्हता. मग मला वाटलं, मी त्यांना इतकी मदत करतोय, तर त्या बदल्यात मिळते का स्वाक्षरी यासाठी प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे! मी काही रंगीत कागदांचे तुकडे जमवले. ‘स्वाक्षरी पुस्तक’ तयार करता येईल अशा मध्यम आकारात ते एकसारखे कापले नि शिवून वही तयार केली. संध्याकाळची प्रार्थना आटोपल्यावर इतर वह्यांसोबत मी माझी गबाळी वही आत सरकवली. स्वाक्षरी घेण्यासाठी मी शेजारी उभा होतो. स्वाक्षरीचं काम पटपट करण्याच्या घाईत मी सरकवलेली आगंतुक वही त्यांच्या लक्षात येऊ नये यासाठी मी ओठ आवळून उभा होतो.

- पण उपयोगच नव्हता. किती वह्यांसोबत किती पैसे आलेत या हिशेबात आजोबा चांगलेच काटेकोर होते. त्यांना कामासाठी पैसे उभारायचे होते. तितकं दक्ष असणं योग्यच होतं. माझ्या त्या वहीसोबत पैसे नाहीत हे बघून ते किंचित थांबले.

‘‘या स्वाक्षरीसाठी पैसे नाहीयेत. का बरं?’’

‘‘ती माझी वही आहे बापूजी. माझ्याकडं पैसे नाहीत.’’

हसत ते म्हणाले, ‘‘अच्छा, म्हणजे माझी नजर चुकवून स्वाक्षरी घ्यायचा प्रयत्न चालला होता तुझा? मला सांग, तुला स्वाक्षरीची गरज काय पडली?’’

‘‘कारण प्रत्येकाकडं आहे. मलाही हवी मग.’’

‘‘पण सगळे लोक पैसे देऊनच स्वाक्षरी घेताहेत हे तू बघताहेस ना?’’

‘‘पण बापूजी, तुम्ही तर माझे आजोबा आहात. माझे आजोबा!’’, मी जोर लावून पाहिला.

‘‘मी तुझा आजोबा आहे याचा मला खूप आनंद आहे, पण नियम तो नियम! जर बाकी लोक पैसे देत असतील तर तूही द्यायला हवेत. कुणासाठीही नियमातून सूट असणार नाही.’’

आजोबांच्या उत्तरानं माझा अहंकार दुखावला. मी कुणीतरी ‘खास’ आहे या नजरेतून माझ्याकडं बघितलं जावं ही माझी इच्छा होती. मी एकदम रागवून म्हटलं, ‘‘तुम्ही बघाच बापूजी. मी तुमची स्वाक्षरी एकही पैसा न देता मिळवून दाखवीन. कितीही वेळ लागला तरी चालेल पण मी जिंकणारच.’’ 

‘‘असंय का! बघू तर मग, आव्हान कोण जिंकतं ते...’’ बापूजींच्या डोळ्यांत मिश्किलपणाची झाक उमटली.

खेळ सुरू झाला. त्यानंतर पुढचे कितीतरी आठवडे मी त्यांच्याकडून स्वाक्षरी घेण्याचे नाना हातखंडे आजमावले. त्यांना सतावण्याचा एक मौका सोडला नाही. माझी सगळ्यात आवडती युक्ती म्हणजे ते मोठमोठ्या जागतिक नेत्यांबरोबर किंवा अन्य अधिकाऱ्यांसोबत चर्चेत गढलेले असायचे तेव्हा खोलीत अचानक घुसायचं नि वहीची पानं फडफडवून स्वाक्षरी मागायची. एकदा तर मी अशाच एका महत्त्वाच्या बैठकीत मोठमोठ्यानं ओरडत घुसलो की काहीही झालं तरी मला आत्ताच्या आत्ताच स्वाक्षरी हवीय. खरंतर यावर ते चिडायला हवे होते, पण त्याऐवजी त्यांनी मला छातीशी ओढून घेतलं आणि माझ्या तोंडावर हात ठेवत चर्चा सुरू ठेवली. चर्चेत गुंगून गेलेली माणसं माझ्या अचानक येण्यानं दचकली होती नि आता काय होणार असा भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता. मला शांत करण्यासाठी आजोबा पटकन स्वाक्षरी देऊन मोकळं होतील असा माझा अंदाज होता, पण माझ्या लक्षात यायला हवं होतं की साक्षात युनायटेड किंगडमला आव्हान देणाऱ्या माणसाशी मी खेळतो आहे. इतका सोपा खेळ नसणार हा!

आमचा हा खेळ काही दिवस चालू राहिला. बापूजींचे एक मोठे पाहुणे माझ्यामुळे चर्चेत वारंवार येणाऱ्या अडथळ्यांना इतके वैतागले की माझा विषय निकालात काढायचा असं त्यांनी ठरवलं.

‘‘बापूजी, तुम्ही त्याला स्वाक्षरी एकदाची देऊन का टाकत नाही. ते केलंत की ही कटकट टळेल आणि आपल्याला विनाअडथळा चर्चा पुढे नेता येईल.’’, त्यांनी संताप कितीही दाबला तरी तो लपत नव्हता.

आमच्या नात्याचा विषय सहजपणाने त्यांच्या हाती जाऊ देतील ते बापूजी कसले. त्यांनी शांतपणे सांगितलं, ‘‘माझा नि माझ्या नातवाचा हा खेळ आहे. त्यानं मला आव्हान दिलंय. तुम्ही त्यात सामील होण्याची गरज नाही.’’

बापूजींनी मनावर असणारं नियंत्रण सोडलं नाही. रागावून मला खोलीबाहेर घालवलं नाही. खरंतर त्यांनी चिडावं म्हणून मी कितीतरी आगावूपणा करून झाला होता, पण चुकूनही ते उसळले नाहीत.

एकदा मला शांत करण्यासाठी त्यांनी कागदावर ‘बापू’ असा शब्द लिहिला नि माझ्याकडे दिला. म्हणाले, ‘‘ही घे तुझी स्वाक्षरी.’’

‘‘नाही नाही. ही काही स्वाक्षरी नव्हे.’’, मी माझं मत सांगितलं.

‘‘हे बघ, तुला देता येण्यासारखं इतकंच आहे माझ्याजवळ.’’ एरवीच्याच चिकाटीनं त्यांनी शांतपणे मला ऐकवलं.

मी त्याचं सांगणं समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. अजून थोडे दिवस गेल्यावर मला कळलं की पूर्णपणे मोफत स्वाक्षरी मला मिळूच शकणार नाहीये. हे लक्षात आल्यावर मी त्यांना छळायचा थांबलो. एरवी असा प्रसंग असता तर मला पराजय झाल्यासारखं वाटलं असतं, पण यावेळी मला खूप अभिमान वाटत होता. आमच्यातल्या या छोट्याशा स्पर्धेतून मला काय मिळालं ते एका फटकाऱ्यात लिहून टाकता येणार नाही. बापूजींनी मला मूल्यांकनाबद्दलचा एक धडाच शिकवला यातून. स्वाक्षरीची किंमत पाच रूपये असं एकदा ठरल्यावर सगळ्यांसाठी पाच रूपये हे अगदी उघड होतं. माझा अपवाद करत त्यांनी मला स्वाक्षरी मोफत दिली असती तर त्यांनी स्वत:चंच मोल कमी केलं असतं. 

या धड्यासोबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी शिकलो, ती म्हणजे माझ्याकडे पाच रूपये भले नसतील, पण मी महत्त्वाचा आहे हे मला यातून कळलं. देशभरातून आलेल्या महत्त्वाच्या अधिकारी व्यक्तींइतकाच मीही महत्त्वाचा आहे हे आजोबांनी आपल्या वागण्यातून मला दाखवलं. त्या मोठमोठ्या माणसांना जो आदर आजोबांकडून मिळतो तोच मलाही मिळतो हे मी पाहिलं. त्यांच्यादेखत आजोबांनी माझ्याकडे ‘नसती कटकट’ म्हणून कधीच दुर्लक्ष केलं नाही, आणि मला ते कमकुवतही समजले नाहीत. माझं म्हणणंही त्या मोठ्या माणसांइतकंच महत्त्वाचं आहे आणि ते ऐकलं जातं याचा विश्वास मला वाटणं ही केवढी मोठी गोष्ट होती.

बापूजींनी मला स्वाक्षरी दिली नाही हे खरंय, पण त्यांनी मला त्याहून मोठं बक्षीस दिलं. त्यांनी रोज मला एक तासाचा वेळ द्यायला सुरूवात केली. या तासाभरात ते माझ्याशी बोलायचे, माझं ऐकून घ्यायचे. खरंतर त्यांचा सगळा दिनक्रम इतका व्यस्त असायचा की त्यात ते माझ्यासाठी कसा काय रोज एक तास देणार हे मला कळत नव्हतं. पण जर तुमचं आयुष्य शिस्तबद्ध असेल तर तुम्ही कल्पनेपलीकडच्या गोष्टी साध्य करू शकता. बापूजींनी मला माझं वेळापत्रक तयार करायला सांगितलं. अभ्यासाची वेळ, खेळाचा तास, आश्रमातल्या रोजच्या करायच्या गोष्टींसाठी लागणारा वेळ, सकाळ नि संध्याकाळची प्रार्थना या सगळ्यांची नोंद मी वेळापत्रकात घेतली. माझ्या राहायच्या जागी त्यांनी ते वेळापत्रक मला लावायला लावलं. माझ्या प्रत्येक मिनिटाचा हिशेब मला कळला पाहिजे आणि त्यातून जगण्यातल्या प्रत्येक क्षणाचं मोल मला कळायला हवं हाच यामागचा उद्देश होता.

प्रत्येक माणूस वेगळ्या प्रकारे खास असतो, महत्त्वाचा असतो ही जाणीव तयार होण्यासाठी बापूजींनी मला मदत केली. त्यांच्या प्रेमाचा वर्षाव सगळ्यांवर सारखा व्हायचा मग ती माणसं लहान असोत की मोठी, गरीब असोत की श्रीमंत. आपण स्वत:तल्या माणूस म्हणून उपजत वैशिष्ट्याला नजरेआड करता कामा नये. आपण जे कुणी व जसे कुणी आहोत त्याचा मान आपणच ठेवायला हवा. काहीवेळा आपल्या भवतालची इतर माणसं आपल्याहून चांगली आहेत असं आपल्याला वाटायला लागतं, पण आपल्यातली कुठली अशी गोष्ट आहे जिच्यामुळं जगात आपल्याला महत्त्वाचं मानलं जातं, ती पाहायला आपण विसरतो. एकदा त्याविषयी जाणून आत्मविश्वास जागा झाला की आपल्या भवतालच्या माणसांचं सामाजिक स्थान काय आहे? जागतिक परिप्रेक्ष्याचा विचार करता त्यांच्याकडे कुठली सत्ता आहे याचं भान वगळून आपण विचार करायला लागतो, त्यांना प्रतिष्ठा द्यायला लागतो.

माझ्या आजोबांच्या आयुष्यावर अभ्यास करणाऱ्या अनेक विद्वानांनी ‘प्रगती आणि संपत्तीचा विरोधक’ असं त्यांचं चित्र रंगवलं आहे, पण हे त्यांच्या तत्त्वांचा गैरअर्थ काढल्यासारखं झालं. अतिशय वाईट स्थितीत असणाऱ्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी पैशांचा कसा उपयोग करता येतो हे त्यांना ठाऊक होतं. मात्र पैशानं माणसाला प्रतिष्ठा लाभते हा विचार त्यांना मंजूर नव्हता. त्यांना कधीही महागडे कपडे घालून विमानाच्या पहिल्या वर्गातून प्रवास करणारा माणूस हा कळकट पोतेरं घालून पुलाखाली झोपणाऱ्या माणसापेक्षा मोठा वाटला नाही. त्यांचं स्वत:चं वागणं त्यांची भूमिका जास्त स्पष्ट करणारं होतं. खादीचं भरड धोतर आणि खांद्यावर शाल पांघरून ते देशातल्या मोठ्यात मोठ्या माणसांना भेटत होते, इतकंच काय जगभरही याच वेशात फिरत होते. याची सत्यता पटवणारे कितीतरी फोटो मी पाहिलेले आहेत. आज राजेशाही कारकीर्द असणारे जगभरातले इतर नेते जेव्हा चमकदार गणवेश, त्यावर चमकणारी हिरेमाणकं आणि भलीदांडगी टोपी घालून लोकांच्या भेटीगाठी करताना मी पाहतो तेव्हा मला हसू फुटतं. वेडेपणा जाणवतो. आपली योग्यता जगाला कळावी म्हणून बापूजींना अशा दिखाऊ झकपक पोषाखाची कधीच जरूर वाटली नाही.

आपली संपत्ती आणि वैभव मोठेपण नि महत्त्व पटवण्याकरता वापरत असाल तर खरंच सांगतो, शेवटी तुम्हाला या पसाऱ्याचं फोलपण जाणवल्यावाचून राहाणार नाही. कधीतरी कुणी त्यांची महागडी कार किंवा प्रचंड मोठा बंगला दाखवून माझ्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना स्वत:लाच काहीतरी हुकल्याची जाणीव आतून झालेली आहे हे माझ्या लक्षात येतं. आपल्या आत जाणवणारी पोकळी कुठल्याही बाह्य भौतिक गोष्टींनी भरत नसते. नोकरीवरून काढून टाकलं म्हणून किंवा घराचं भाडं देता येत नाही म्हणून कितीतरी माणसं स्वत:ला निरूपयोगी समजतात हे मी पाहिलं आहे. माझ्या पाहण्यातली अशी बरीच माणसं त्यांच्या श्रीमंत मित्रांपुढं स्वत:ला दुबळं समजतात. ते लोक आपल्याला सामावून घेणार नाहीत कारण आपण त्यांच्यासारखे श्रीमंत नाही असं वाटून स्वत:चा छळ करतात. आपल्याकडं भौतिक मुबलकता नाही याची त्यांना लाज वाटते. काय कारण असं वाटण्याचं? आपण माणूस म्हणून जे कोणी आहोत ती आपली योग्यता अशा बाह्य गोष्टींनी कशी काय ठरू शकते? या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे मान्य करायला हवं नि त्या वेगळ्या ठेवायला हव्यात.

मोठमोठ्या पगारांच्या नोकऱ्या करणाऱ्या माणसांनी स्वत:च्या यशाबद्दल खूष व्हावं, काही हरकत नाही! मात्र आपल्या बँकेतल्या भक्कम बॅलन्सच्या आधारे त्यांनी स्वत:ची योग्यता जोखण्याची चूक करू नये. खरं तर दिसते त्याबरोबर विरूद्ध असते ही गोष्ट. ‘‘भौतिक स्थैर्य आणि नैतिकता यांचे संबंध व्यस्त असतात. जेव्हा यातील एकात वाढ होते, दुसऱ्यात घट होऊ लागते.’’ बापूजी अतिशय खात्रीनं सांगायचे. अर्थात पैसा कमावणं ही प्रतिष्ठा देणारी गोष्ट नव्हे असं त्यांचं मुळीच म्हणणं नव्हतं. श्रीमंतीच्या बरोबर विरूद्धअर्थी मानली जाते गरीबी ही स्थिती. श्रीमंतीचं कौतुक नव्हे म्हणून गरीबी हीच माणसाला खऱ्या अर्थानं सन्मानित करणारी स्थिती आहे असाही त्यांचा सूर नसे. सगळ्या गोष्टींवर पाणी सोडून केवळ भौतिक यशच महत्त्वाचं मानणं त्यांना मंजूर नव्हतं. पैसा तुमच्यासाठी सगळंकाही असेल तर जा, घाम गाळा, कष्ट उपसा आणि हवा तितका पैसा मिळवा. पण पैसा मिळवणं या साध्यापर्यंत पोहोचलं की त्याच्या पलीकडचीही स्थिती येते, तिचा विचार आवश्यक आहे.

(अनुवाद: सोनाली नवांगुळ)

- डॉ. अरुण गांधी

वाचा 'वरदान रागाचे' या लेखमालेतील पहिले सात भाग:

1. प्रास्ताविक- आजोबांकडे मिळालेले धडे
2. त्यांनी संताप आणि वीज यांची तुलना समोर ठेवली...
3.तोडगा काढणे हे ध्येय असेल तर तो मार्ग योग्य असतो..
4. विक्षिप्तपणाचं त्यांना वावडं नव्हतं, मात्र...
5. गरीबीचं उदात्तीकरण त्यांना करायचं नव्हतं, आणि...
6. वेगवान जगण्यापेक्षा शांततामय जगण्याची माणसाला जास्त जरूरी असते
7. सगळ्या तऱ्हेच्या कल्पनांचं वारं आपल्या भवती वाहायला हवं! 

Tags: पुस्तक अरुण गांधी महात्मा गांधी सोनाली नवांगुळ पैसा आर्थिक स्थैर्य गरीब श्रीमंत भौतिक स्थैर्य Book New Book Translation Gift of Anger Arun Gandhi Mahatma Gandhi Money Economical Stability Rich and Poor Materialistic Stability Load More Tags

Add Comment