बापूजींच्या मते कुठल्याही साधनसंपत्तीचा, संसाधनांचा अतिरेकी वापर करून ती वाया घालवणं ही गोष्ट मुळात भविष्यकालीन संकटांची नांदी असते. स्वतःच्या उत्कर्षासाठी आणि मनोरंजनासाठी माणसांकडून होत असलेलं जिवंत प्राण्यांचं शोषण ही गोष्ट तर आणखी धक्कादायक. चित्ते, सिंह, हत्ती यांच्यासारख्या सुंदर प्राण्यांच्या शिकारीचा शौक पूर्ण करण्यासाठी आजही असंख्य श्रीमंत माणसं खास अफ्रिकेची टूर आखतात. काही वर्षांपूर्वी मिनेसोटातल्या एका दंतवैद्यानं झिम्बाब्वेची राष्ट्रीय संपत्ती असणाऱ्या ‘सेसील’ नावाच्या, काळ्या आयाळीच्या सिंहाची शिकार केल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळली होती. अर्थात इतका असंतोष व्यक्त होऊनही त्या डॉक्टरवर आरोपपत्र दाखल झालं नाही... कारण तिथं शिकार कायदेशीर आहे. आपला शिकारीचा शौक पुरा करण्यासाठी हजारो डॉलर्स खर्च करण्याची ऐपत असल्यामुळं जंगलातल्या एखाद्या सुंदर जनावराला मारण्याचा विशेषाधिकारच त्या डॉक्टरसारख्या माणसांना मिळाला होता. काही गरीब देश करामुळं राष्ट्रीय उत्पन्नात पडणाऱ्या भरीचा विचार करत जंगल सफारींची प्रचंड जाहिरात करतात, प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी मोहक योजना आखतात... पण म्हणून तिथल्या जनावरांना ठार मारण्याचा परवाना पर्यटकांना दिलेला नसतो. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी संघर्ष करणाऱ्या देशांच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचं आणि स्रोतांचं अशा तऱ्हेनं शोषण करणं हासुद्धा अतिशय तीव्र स्वरूपाचा अपव्यय आहे.
मी ज्या बेफिकिरीनं माझी छोटी पेन्सील निरुपयोगी म्हणून भिरकावून दिली... त्याच निष्काळजीपणानं आपण माणसांशी वागतो ही सगळ्यात दुःखदायक गोष्ट आहे.
1971 सालातला एक अनुभव सांगतो.
मी आणि माझी बायको सुनंदा मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यावरून चाललो होतो. एका परिचितांना भेटून आम्ही घराकडे परतीच्या मार्गावर होतो. आजसारखंच मुंबई तेव्हाही महानगरच होतं. लोकांची येजा करणारी गर्दी; रस्त्याच्या मध्येमध्ये भिकारी; अगदी बाजूच्या गटारांवरसुद्धा फळ्या टाकून, दुकानं थाटून खरेदीविक्री करणारे दुकानदार आणि गिऱ्हाइकं अशा धुमश्चक्रीतून वाट काढत होतो. जागोजागी पडलेला कचरा किड्यामुंग्यांना, रोगजंतूंना आमंत्रण देत होता. मी रस्त्यावर लक्ष एकवटून चालत होतो की, कुठंतरी कशाततरी पाय पडायला नको... शिवाय आजूबाजूचं त्रासदायक दृश्य टाळता येईल तितकं बरं! तितक्यात बाजूच्या एका ढिगाऱ्यात मला रंगीत कपड्यात गुंडाळलेलंसं काहीतरी दिसलं. मी लक्ष देऊन त्या बोचक्याकडं पाहिलं तर काहीतरी हालचाल जाणवली. मी तिथल्यातिथे थांबलो आणि सुनंदाला लगेच हाक मारली.
आजूबाजूला चाललेल्या इतक्या वेगवान व्यवहारात आम्ही दोघंही गुडघ्यावर जोर देत खाली वाकलो आणि काळजीपूर्वक ते बोचकं उघडलं. पाहतो तर काय... साधारण तीनच दिवसांचं ते नवजात अशक्त बाळ होतं. ती मुलगी कुणाची असू शकेल याची चौकशी आम्ही आसपास केली... पण कुणीच आमच्याकडे लक्ष देईना. सुनंदा त्या छोट्याशा पोरीला घेऊन तिथंच थांबली. मी पोलिसांत वर्दी देण्यासाठी फोन शोधत शेजारच्या दुकानात गेलो. पोलिसांना यायला खूप वेळ लागला... कारण त्यांच्यासाठी ही काही तातडीची घटना नव्हती. नंतर मला कळलं की, अशी छोटी बाळं त्यांना अनेकदा सापडतात. सुनंदाकडचं छोटं बाळ त्यांनी ताब्यात घेतलं. आता राज्य सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या अनाथालयात, रिमांड होममध्ये हे बाळ जाणार होतं. त्या वेळी मी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या अग्रगण्य दैनिकासाठी पत्रकार म्हणून काम करत होतो. मी पोलिसांना विचारलं, ‘मी येऊ का बरोबर?’ त्यांनी खांदे उडवत होकार दिला.
जेव्हा आपल्या आसपास सततच त्रासाचा, वेदनांचा आणि दुःखाचा माहोल असतो... तेव्हा त्याकडं पाहण्याची आपली नजर बोथट होते असं मला वाटतं... तरी ती छोटी मुलगी बघून मला इतका धक्का बसला होता की, तिला पोलिसांकडं सोपवून निवांतपणानं घरची वाट धरणं अशक्य होऊन बसलं होतं. सोडून दिलेली, हरवलेली, अनाथ झालेली असंख्य मुलं तिथं जाऊन स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्याच्या दुर्धर प्रसंगातून माझी आता सुटका नव्हती. पोलिसांनी नंतर मला सांगितलं की, ते मुलांचे पालक, नातेवाईक शोधायचा प्रयत्न करतात... पण अशा टाकून दिलेल्या मुलांची संख्या सतत इतकी वाढते आहे की, मुलांना त्यांचं घर शोधून देण्याच्या प्रयत्नांत जेमतेम पाच टक्के यश मिळतं. काही बाळं इतकी अशक्त असतात की, ती मरून जातात. आम्हांला सापडलेल्या मुलीबाबतीत काय होतंय याची मला उत्सुकता होती... कारण ती अगदीच लहानखुरी होती. त्यावर अनाथालयाच्या मेट्रन म्हणाल्या, ‘कितीही अशक्त आणि कुपोषित दिसली... तरी ही मुलगी आहे. मुलांच्या तुलनेत मुलींची जगण्याची आणि संघर्षाची चिकाटी जास्त असते, त्या जास्त लवचीक, जुळवून घेणाऱ्या असतात... त्यामुळं जगण्याची संधी मुलींना जास्त मिळते.’
अनाथालयात सोय झाली तरी तिथल्या मुलामुलींचं आयुष्य काही फार आशादायक नसतं. तिथले कर्मचारी अपुऱ्या वेतनावर काम करणारे, प्रसंगी पैशांवर आणि मुलांसाठीच्या अन्नधान्यावर डल्ला मारणारे. तरी बरं... हे अनाथालय सरकारी होतं... निदान कुणाचीतरी नजर तिथल्या यंत्रणेवर होती. लहान गावाशहरांमध्ये असणाऱ्या अनाथालयांमध्ये मृत्युदर हा जवळपास 80% इतका आहे. जी मुलं जगतात ती वयाच्या अठराव्या वर्षी कुठल्याही आधारावाचून बाहेरच्या जगात जगण्यासाठी सोडली जातात. एकदा ती बाहेर पडली की त्यांचं रक्षण करणारं, त्यांना मदत करणारं कुणीच ना मागे असतं... ना सोबत.... सुधारगृहातून बाहेर पडलेल्या बहुतांश मुली वेश्याव्यवसायाकडे वळतात आणि मुलं कुठल्या-ना-कुठल्या टोळीचा भाग होऊन लहानमोठ्या चोऱ्या करायला शिकतात. पुढे मोठे गुन्हे करण्यात पदवीधर म्हणावं इतकी त्यांची तयारी होते.
काहीही वाया घालवणं म्हणजे हिंसा असं पेन्सिलीच्या निमित्तानं मला शिकवणाऱ्या बापूजींनी माझी नजर खरोखर व्यापक केली. अन्यथा तरुण मुलामुलींचं बहुमोल जीवन अशा तऱ्हेनं वाया जाणं ही पॅसिव्ह हिंसा आहे हे मला कसं जाणवलं असतं? आता जर या हिंसेची जाणीव आपल्याला झालीये... तर काहीतरी करायला हवं असं माझ्या मनानं घेतलं. मी कितीतरी अनाथालयं नि निवारागृहं पालथी घातली. अशाच एका अनाथालयात बाळ कुशीत घेऊन उभं असलेलं फिकट तपकिरी केसांचं नि निळ्या डोळ्यांचं एक जोडपं मला दिसलं. ते दोघं स्वीडनहून आलेले होते आणि बाळ दत्तक घेण्याच्या किचकट प्रक्रियेशी झुंजत होते. त्यांनी मला लेफ नावाच्या त्यांच्या आणखी एका स्वीडीश मित्राची ओळख करून दिली. त्यानं पूर्वी इथूनच एक भारतीय बाळ दत्तक घेतलेलं होतं... त्यामुळं या जोडप्याला दत्तकप्रक्रियेत मदत करण्यासाठी तो खास आला होता. अशा भावनिक प्रश्नाशी सोयरसुतक नसलेल्या लोभी मध्यस्थांपासून त्यांची सुटका होणं जरुरीचं होतं. अशी माणसं या निमित्तानं प्रसंगाचा फायदा घेऊन बाळाच्या दत्तक प्रक्रियेआड पैसे लुबाडण्याचा प्रयत्न करत राहतात.
त्या भेटीनंतर लेफ माझ्या संपर्कात राहिला. अनेक स्वीडीश कुटुंबं भारतातून मुलं दत्तक घेऊ इच्छितात... पण भारतात येऊन इथली प्रक्रिया समजून सांगत मदत करणारा प्रामाणिक माणूस हवा असतो असं सांगत लेफनं मला या विषयाकडं वळवलं. खरोखर यात पडावं की नाही याचा विचार मी करत होतो आणि मनात आलं की, बापूजींनी काय सांगितलं असतं? मी या लोकांच्या उपयोगी पडावं असंच बापूजींना वाटलं असतं.
पुढे अनेक वर्षं मी आणि सुनंदा या कामात सक्रिय राहिलो आणि सुमारे 128 बाळांना स्वीडन, भारत आणि फ्रान्स यांसारख्या देशांमध्ये त्यांचं-त्यांचं कुटुंब मिळालं. ही सगळी प्रक्रिया नेहमीच आनंदाची नव्हती. कधी अतिशय उल्लसीत करणारे अनुभव यायचे... तर कधी मन मोडून पडेल असे. आम्ही विशिष्ट कुटुंबांसाठी मंजूर झालेली बाळं ताब्यात घ्यायचो. कागदोपत्री कामकाजाच्या पूर्ततेसाठी साधारण तीन महिने लागायचे. त्या काळात आम्ही खासगी नर्सिंग सेंटरमध्ये बाळाला ठेवून त्याची काळजी घ्यायचो; त्याचं वजन वाढावं, ते निरोगी असावं याकडं लक्ष द्यायचो... आमच्या प्रयत्नांना खूपदा चांगलं फळ यायचं... पण काही वेळा बाळं इतकी कुपोषित आणि अशक्त असायची की, ती जगायची नाहीत. त्यांचा मृत्यू झाला की खूप वाईट वाटायचं... पण मी त्यांना तसंच सोडायचो नाही. मी स्वतः अशा मृत बाळांना विधिपूर्वक निरोप द्यायचो, स्मशानापर्यंत सोबत करायचो. एकदा अशाच एका मृत बाळाला घेऊन मी जवळचं स्मशान शोधत अनेक गल्ल्या पालथ्या घातल्या होत्या. निष्प्राण झालेलं लहान मुलाचं ते शरीर हातांत घेऊन स्मशानाचा शोध घेताना मला बापूजींची आठवण सतत येत राहिली... जगातली असमानता संपवायला हवीय असं ते कळकळीनं म्हणायचे. ती आठवण सतत मनाशी जागी होत राहिली होती.
बाळ आपलंसं झालं की ती-ती कुटुंबं आनंदात अक्षरशः नाहून निघायची. त्यांच्या आनंदाचं वर्णन करणं खरोखर अशक्य आहे. अशाच एका भारतीय बाईला आम्ही भेटलेलो होतो. तू वांझोटी असल्यामुळं तुझ्या पोटी कधीच मूल जन्माला येणार नाही असं तिला सांगण्यात आलं होतं. आम्ही तिला एक मुलगी शोधून दिली. दत्तक का होईना... पण स्वतःची मुलगी मिळाल्यावर ती बाई आनंदून गेली. दोघाही पतिपत्नींनी आम्हा दोघांचं इतकं अगत्य केलं... जणू काही आम्ही त्यांच्यासाठी कुणी माणसं नव्हे देव आहोत. त्यांच्या वैवाहिक आयुष्यात समाधान आणलं म्हणून ते आम्हांला फार मानायचे. नंतर कधीतरी आमच्या कानांवर बातमी आली... ती बाई गरोदर राहून तिला मुलगा झाल्याची.
या बातमीनं आम्हांला आनंदच झाला खरोखर... पण प्रचंड काळजीही वाटायला लागली. भारतीय कुटुंबांमध्ये मुलाचं कौतुक आणि त्याची जागा विशेष! मग आता दत्तक मुलीची परिस्थिती दुहेरी गैरसोयीची होऊन बसणार... एकतर ती मुलगी... शिवाय दत्तक आणलेली... या मुलीला कुटुंबात आता दुय्यम स्थान मिळणार या परिस्थितीचा विचार करून आम्हांला भयंकर ताण आला. कदाचित तिला फार बरं वागवलंही जाणार नाही असंही मनात यायला लागलं. शेवटी आम्ही ठरवलं की, असा ताण घेण्यापेक्षा थेट जाऊन या पालकांशी बोलावं आणि सांगावं की, आम्ही मुलीला परत घेऊन जातो.
तसा प्रस्ताव या पालकांना द्यायचा अवकाश... दत्तक मुलीची आई अत्यंत निकरानं म्हणाली, ‘नाही नाही हो... ती आमची राजकुमारी आहे, आमची लाडकी आहे. तिला सुख मिळावं, तिला याच कुटुंबात राहता यावं म्हणून आम्ही काहीही करायला तयार आहोत!’ इतकं म्हणून ती बाई आणि तिचा नवरा, दोघंही रडायला लागले. त्यांची अवस्था बघून आम्हांला कळलं की, ते बिचारे खरोखरच दुखावलेत, घाबरलेत. जगात फार गोष्टींचा नाश होतो आणि त्यातून खूप हिंसा होते हे खरं असलं तरी याच जगात चांगुलपण अजूनही शिल्लक आहे याची जाणीव या निमित्तानं आम्ही स्वतःला करून दिली. आम्ही या पालकांचा निरोप निर्धास्त मनानं घेतला. पुढे आमचा संपर्क कायम राहिला. दोन्ही मुलं एकत्र आणि आनंदात वाढताना आम्ही पाहू शकलो.
दत्तक घेतलेल्या असंख्य पालकांनी आमच्याशी चांगला संपर्क ठेवला, आपल्या कलाकलानं वाढणाऱ्या मुलांचे फोटो वेळोवेळी आम्हांला पाठवले. अपवाद फक्त पॅरिसमधल्या एका कुटुंबाचा. त्यांनी मूल दत्तक घेतल्याघेतल्या आमच्याशी असणारे संबंध, संपर्क यांना पूर्णपणे काट मारली. आम्ही चौकशीसाठी पाठवलेल्या कुठल्याही पत्राचं उत्तर दिलं नाही. अशा वेळी काय करणार? ते मूल नि त्याचं नवं कुटुंब स्वस्थ असू दे अशी प्रार्थना करणंच केवळ आमच्या हाती होतं.
या घटनेनंतर जवळपास दोन दशकांनी ‘एम.के.गांधी इन्स्टिट्यूट फॉर नॉनव्हायोलन्स’ या संस्थेतून मला निरोप मिळाला की, फ्रान्समधून एक बाई माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते आहे. ही तरुण बाई कोण, तिला माझ्याशी का आणि काय बोलायचं आहे याची काहीच कल्पना मला नव्हती. ती संस्थेत पुन्हापुन्हा फोन करून माझ्याशी बोलण्याची विनंती करत राहिली. अखेर तिनं तिचा नंबर दिला आणि मला फोन करण्याचा निरोप ठेवला. मी फोन केला. त्या तरुणीचं नाव सोफी. तिनं सांगितलं की, ती तिच्या पालकांची दत्तक मुलगी आहे. ती अगदी बाळ असताना तिला दत्तक घेतलं गेलं होतं... पण भूतकाळाबद्दल कित्येकदा विचारूनही पालक कसलीच माहिती पुरवत नाहीत. पालकांना तिचं पूर्वायुष्य सांगण्यात कसलाच रस नाही. जेव्हा कधी विषय निघतो तेव्हा ते म्हणतात, ‘‘तुझ्या आयुष्याचा तो तुकडा बिनमहत्त्वाचा आहे. तू विसरून जा की, असा काही भूतकाळ तुला होता....’’
सोफीचं वय सव्वीस वर्षं होतं. वडलांची काही कागदपत्रं चाळताना तिला माझ्याशी झालेला पत्रव्यवहार दिसला नि तिच्या जन्मासंदर्भातली कागदपत्रंही पाहण्यात आली. त्यावर जन्मसाल लिहिलं होतं. ते सगळं बघून तिचा समज झाला की, मीच तिचा जैविक बाप आहे आणि कमीतकमी मी तरी तिला तिच्या भूतकाळाबद्दल सांगेन. माझी माहिती कळण्यासाठी तिनं गुगलचा आधार घेतला आणि मला शोधून काढलं.
बाळपणी एका फ्रेंच कुटुंबाला आपण भारतातून दत्तक गेलोय हे माझ्याशी बोलल्यावर सोफीला कळलं. ती आणि मी सुमारे तासभर बोललो असू. त्या संभाषणात मी तिला शक्य तितकी माहिती देण्याचा प्रयत्न केला. तिला हुंदके अनावर झाले होते. तिला बरंच, बरंच काही मला विचारायचं होतं... पण मी तिच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं देऊ शकलो नाही. मागचं आठवण्यासाठी मदत करतील अशी त्या वेळची कुठलीच कागदपत्रं माझ्याकडं नव्हती. तेव्हा मी आणि सुनंदा भारतात राहायचो. मुंबईत साडेतीनशे स्क्वेअर फुटांचा आमचा फ्लॅट. त्यात सगळी कागदपत्रं नि फायली ठेवायची चैन आम्हांला परवडणारी नव्हती. या कामात सल्लागार असणारी माणसं दत्तक घेणाऱ्या कुटुंबांना कागदोपत्री नीट राहण्यासाठी मदत करायची, त्यांचं काम वेगळं होतं. आमचं काम वेगळं होतं... त्यामुळं लहानग्यांना त्यांचं कुटुंब मिळालं आणि सगळं सुरळित झालं की आम्ही संदर्भ आणि कागदपत्रं नष्ट करून टाकायचो.
त्या आठवड्यात सोफी माझ्याशी तीन वेळा बोलली. माझा आवाज ऐकला की बरं वाटतं म्हणायची. भेटायला हवं म्हणायची. आमचं हे बोलणं चालू होतं तेव्हा मी न्यूयॉर्कमध्ये रॉचेस्टरला राहायचो. मला भेटण्यासाठी तिथपर्यंत येण्याचा घाट घालण्याचा विचार तिनं केला... मात्र दोनच दिवसांत रडत-रडत तिचा फोन आला की, विमानाची तिकिटं इतकी महाग असतील असं वाटलं नव्हतं. तिकिटांचा खर्च झेपणार नसल्यामुळं भेटता येणार नसल्याचं कळल्यामुळं तिला काहीच सुचेनासं झालं होतं. वाईट मलाही वाटलं... पण परिस्थिती कशी आणि कधी कूस पालटेल याचा अंदाज आपल्याला देता येत नसतो. मला ‘एडिनबर्ग फेस्टिव्हल’चं निमंत्रण आलं. तिथं व्याख्यान देण्याच्या निमित्तानं स्कॉटलंडला आठवडाभर माझा मुक्काम असणार होता. पॅरिसहून तिथं पोहोचणं त्या मानानं फार खर्चीक नव्हतं.
या तरुण, चुणचुणीत मुलीशी माझी त्या आठवड्यात चांगली ओळख झाली. ती मला म्हणाली, ‘तुम्ही माझे ‘आध्यात्मिक वडील’ आहात.’ तेव्हापासून सोफी माझ्या संपर्कात राहिली. माझ्या मुलांमध्ये तिचीही भर पडली आणि मी आणखी एकीचा बाप झालो.
सोफीबाबतीत आला तसाच अनुभव मला आला आम्ही भारतातून स्वीडनला दत्तक गेलेल्या मुलामुलींचं स्नेहसंमेलन भरवलं तेव्हा. ही सगळी बाळं आता कुमारवयात होती. स्वतःचे जैविक आईबाप कोण हे कळून घ्यायची इच्छा आहे असं या मुलामुलींपैकी बहुतेक जणांनी मनोगतात सांगितलं. आपले खरे आईबाप शोधण्यात त्यांना माझी मदत हवी होती.
‘आम्ही शाळेत जायला लागल्यापासून बघतोय, शाळेतली मुलंमुली बऱ्याचदा त्यांचे डोळे कुणासारखे, त्यांचे केस कुणासारखे यांबद्दल बोलतात.’ एकानं मला सांगितलं. दुसऱ्यानं सांगितलं, ‘आम्हांला आमच्या खऱ्या पालकांबद्दल काहीच ठाऊक नाहीये. आम्हांला आमच्या आईकडून काय मिळालं, बापाचा कुठला वारसा घेऊन आम्ही वावरतोय याबद्दल कळावं असं वाटतं. ते कळत नाही यामुळं अस्वस्थ वाटतं.’
या मुलांची मनोगतं ऐकून मी विचारात पडलो. असा काही प्रश्न भेडसावू शकतो याचा विचारच कधी माझ्या मनाला शिवला नव्हता. आपल्यापैकी बरेच जण आपण वागवत असलेल्या जन्मतपशिलांना गृहीत धरून चालतो... मात्र भूतकाळाशी असणारं तुमचं नातं नाकारलं जातं, मुळांपर्यंत पोहोचण्याची फटही दिसेनाशी होते... तेव्हा हे तपशील अतिशय महत्त्वाचे होऊन बसतात. आपली पार्श्वभूमी माहिती असणं आणि नसणं याचा सांधा आजच्या जगण्याशी कसा जोडला जातो हे विलक्षण आहे.
सोफीला जसं मी सांगितलं तसंच या मुलांनाही सांगावं लागलं की, काहीही जुनं रेकॉर्ड माझ्याकडे शिल्लक नाहीय. जरी ते तपशील माझ्याकडं असते तरी जैविक पालकांना शोधणं ही सोपी गोष्ट नाही. जुने माग शोधत जाण्याचा हा प्रवास अतिशय कठीण आहे.
‘‘वास्तवाकडं तुम्ही सगळे जरा नीट बघा... तुमच्या जन्मदात्या आईनं तुम्हांला सोडण्याचा वेदनादायक निर्णय घेतला तो तुम्हांला चांगलं भविष्य लाभावं म्हणून. कदाचित त्यानंतर तिनं पुढं शिक्षण घेतलं असू शकेल, कदाचित तिचं आयुष्य आता बरं चाललं असू शकेल. तिला जे मिळू शकलं नाही ते सगळं काही तुम्हांला मिळावं या अपेक्षेनं तिनं स्वतःला दुखवून घेतलं असणार. आम्हीही तशाच हेतूनं तुमची सुटका केली. तुम्ही अनाथालयात असता तर आज जिथं आहात तिथवर कदाचित येऊ शकला नसतात, जगलाही नसतात बहुधा. आता आयुष्यानं तुम्हांला तुमच्यावर प्रेम करणारे पालक दिलेत, आनंद आणि स्थैर्य दिलंय, सुरक्षितता दिलीय... तरीही... आम्ही तुमचं आयुष्य नकळत बरबाद केलं असं जर तुम्हांला वाटत असेल तर कृपया आम्हांला क्षमा करा...’’ मी काकुळतीनं पण गांभीर्यानं म्हणालो.
माझं बोलणं संपल्यावर सगळी मुलं जागची उठली आणि त्यांनी मला आणि सुनंदाला मिठीत घेतलं. खूप गलबलून आलं होतं सगळ्यांनाच. तशाच ओल्या स्वरात त्यांनी आम्हांला विचारलं, ‘आम्ही तुम्हां दोघांना आजीआजोबा म्हणू का?’
त्यांनी असं विचारणं आनंदाचंच होतं आमच्यासाठी. आम्ही हो म्हणालो. त्यावर एक मुलगी म्हणाली, ‘आमची अडचण कशी चुटकीसरशी सोडवलीत तुम्ही! आता आम्ही सगळ्यांना सांगू शकतो की, आम्ही आमच्या आजीआजोबांसारखे दिसतो म्हणून!’
आणखी काही वर्षं मध्ये लोटली आणि स्वीडनमध्येच आम्ही आणखी एक स्नेहसंमेलन घेतलं. त्या वेळी मुलंमुली बरीच मोठी झाली होती, काहींची लग्नं झाली होती, काहींना तर मुलंही होती. त्यांच्याकडे बघताना मला असीम समाधान वाटत होतं आणि मनात येत होतं... खरंच, प्रत्येक माणसाला चांगलं संगोपन मिळालं, त्याची काळजी घेतली गेली की केवढा निखार येतो त्याच्या व्यक्तिमत्वाला. हे सगळं किती अनमोल आहे! आपल्या प्रत्येक कृतीचा गुणाकार होत असतो...’
बऱ्याच वर्षांपूर्वी मी आणि सुनंदानं एक छोटं पाऊल उचललं आणि आता त्यामुळं केवढ्या मोठ्या स्तरावर त्याचा परिणाम दिसतो आहे. आमची एक छोटी कृती आणि एक छोटा हस्तक्षेप आमच्यासह किती जणांचं जीवन उजळवून टाकेल याचा त्या वेळी विचारही केला नव्हता.
पॅसिव्ह हिंसा किंवा तटस्थ राहण्यातून झालेली हिंसा ही शारीरिक हिंसेइतकीच विनाशकारी नि पडझड करणारी असू शकते. कधीकधी असं वाटून जातं, ‘सात अब्ज लोकांमधला मी एक, मी एखादी गोष्ट केली तरी आणि नाही केली तरी काय विशेष फरक पडणार?’ ...पण खरंतर आपण सगळेच एका विराट जाळ्याशी जोडले गेलेलो आहोत. आपल्या रस्त्यांवर, गल्लीबोळांत, विचारांत, भाषणांमध्ये आणि जागतिक राजकारणामध्ये हिंसेचा उद्रेक झालेला असतो... तेव्हा शांतता ही अप्राप्य गोष्ट वाटायला लागते... मात्र याच काळात खऱ्या अर्थानं अहिंसेची ओळख आपल्याला पटू शकते. अनिर्बंध संतापावर नियंत्रण आणणं आणि आपल्यात उसळलेल्या शक्तीवर संयमानं नियंत्रण ठेवणं यांहून बऱ्याच गोष्टी अहिंसेच्या छत्रीखाली असतात. आपण जगाकडं कसं बघतो, प्रत्येक कृतीकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन कसा आहे या गोष्टीत अहिंसेची मुळं खोल तपासता येतात. अहिंसेचे पदर खूप सूक्ष्म, अतिसूक्ष्म असतात. मला तो एवढासा पेन्सिलीचा तुकडा शोधायला पाठवण्यात बापूजींना काय साधायचं होतं? आपल्याला जगात जो बदल घडायला हवाय तो आधी स्वतःत घडवायला हवा हीच शिकवण त्यांना मला द्यायची होती. ‘काहीही वाया घालवायचं नाही’ हा निर्णय जर तुम्ही एकट्यानं घेतलात तर विषमता नष्ट होण्यात कशी मदत होऊ शकेल?
दुसरं सोपं उदाहरण सांगतो.
अमेरिकेतल्या कंपन्यांमधले सीईओ एखाद्या साधारण कामगाराच्या दोनशे पट जास्त संपत्ती कमावतात या बातमीनं तुम्हांला धक्का बसत असेल तर कमीतकमी तुम्ही व्यक्तिगत भूमिका तरी घेऊ शकता! होय ना?
कुठलीही गोष्ट वाया जाणं बापूजींना आवडायचं नाही हे खरंच... पण अमुक गोष्ट निरुपयोगी आहे किंवा राखण्याच्या लायकीची नाही हे सांगण्यासाठी मात्र त्यांची उपजत विनोदबुद्धी ते वापरायचे. मी आश्रमात होतो तेव्हा माझ्याकडं त्यांनी एक महत्त्वाचं काम दिलेलं होतं. रोज त्यांच्यासाठी बरीच पत्रं यायची. ती पत्रं नि पार्सल्स पाकिटांतून, गठ्ठ्यांतून सोडवून देण्याचं काम मी करायचो. त्या काळात रीसायकलिंगची फॅशन अजून आली नव्हती... पण प्रत्येक गोष्टीचा पुनर्वापर हा बापूजींचा शिरस्ताच होता... त्यामुळं पत्रं लिफाफ्यातून बाहेर काढतानाच मला सूचना असायची की, लिफाफा अशा तऱ्हेनं फाडावा की, बापूजींना पत्रोत्तर देण्यासाठी आतला कोरा भाग वापरता यायला हवा. किती कागद वाचायचा यातून!
ब्रिटिशांकडून भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या काळात बापूजी अनेक वादविवादांत आणि संशयाच्या भोवऱ्यात अडकले होते. 1931मध्ये भारताच्या भविष्याची चर्चा करण्यासाठी ते गोलमेज परिषदेला प्रतिनिधी म्हणून गेलेले असताना एका ब्रिटिश अधिकाऱ्यानं त्यांना एक जाडजूड लिफाफा दिला. त्याच रात्री बापूजींनी तो लठ्ठ लिफाफा उघडला. आतल्या पत्रात अतिशय जहरी आणि चुकीची विधानं असणारा असंगत मजकूर होता. बापूजींनी कागद एकत्र लावलेली पीन काढली आणि पानन्पान तपासलं. पत्रोत्तर देण्याजोगी एकही रिकामी जागा त्यांना सापडली नाही. शेवटी त्यांनी ते पत्र टाकून दिलं.
दुसऱ्या दिवशी तो अधिकारी भेटला तेव्हा त्यानं विचारलं, ‘पत्र वाचलं का?’ आणि त्यावर त्यांचं उत्तर काय?
‘‘त्या पत्रातल्या दोन गोष्टी मला बहुमोल वाटल्या, त्या मी जपून ठेवल्या आहेत.’’ असं सांगून बापूजी पुढं म्हणाले, ‘‘पत्राचा लिफाफा आणि पत्राला लावलेली पीन या गोष्टी वगळता बाकी सगळा कचरा होता.’’
त्या वेळी या घटनेवर आम्ही मनमुराद हसलो... पण बापूजी किती खरं बोलले होते! ते म्हणायचे, गरज नाही अशा गोष्टींवर आपण आपली बुद्धी आणि वेळ खर्च करतो आणि महत्त्वाचं काय त्याचा अभ्यास करणं सोडून देतो. कुणाशी वैर करणं, कुणाला जळजळीत बोलून उट्टं काढणं यांसाठी बापूजींकडं मुळीच वेळ नसायचा.
कधीकधी वाटतं की, बापूजींना आणखी थोडा वेळ मिळाला असता तर त्यांनी किती कायकाय केलं असतं! आपल्या जगण्यातला कुठलाही क्षण व्यर्थ गोष्टींसाठी जाता कामा नये यासाठी ते दक्ष असायचे... पण अर्थातच आपल्याकडे किती वेळ आहे याचं भाकित कुणालाच करता येत नसतं हे जाणण्याचं शहाणपणही त्यांच्याकडे होतं. त्यांच्या मते दिवसातल्या कुठल्याही प्रहरातला बहुमोल वेळ वाया घालवणं ही सगळ्यात तीव्र स्वरूपाची हिंसा आहे. आश्रमात माझ्या वेळापत्रकावर त्यांची करडी नजर असायची. मी कधी उठायचं आणि दिवसभरात कायकाय करायचं आणि झोपायचं कधी याचं अतिशय बारकाईनं आणि काळजीपर्वक नियोजन मला दिलेलं असायचं. आता वयानं प्रौढ झाल्यावर त्यांची त्या वेळची कळकळ मला जास्तच कळतेय....
‘वेळ ही संपत्ती आहे, ती वाया घालवणं परवडणारं नव्हे!’ असं बापूजी म्हणायचे... त्याचा अर्थ आज अधिकच पोहोचतो आहे.
(अनुवाद: सोनाली नवांगुळ)
- डॉ. अरुण गांधी
Tags: पुस्तक अरुण गांधी महात्मा गांधी सोनाली नवांगुळ हिंसा अपव्यय गरिबी Book New Book Translation Gift of Anger Arun Gandhi Mahatma Gandhi Wastage Poverty Load More Tags
Add Comment