छळाचा प्रतिकार करण्यासाठी विनयशीलतेचाच उतारा हवा

वरदान रागाचे- भाग 19

‘बेअरफूट कॉलेज’च्या माध्यमातून सोलर इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या अशिक्षित गरीब बायका. | फोटो सौजन्य- skmclasses.weebly.com

बापूजींनी खूप लहान वयात विनयशीलतेबद्दल विचार करायला सुरुवात केली. केरकचरा उलचणाऱ्या, मैला वाहणाऱ्या माणसांच्या मुलांशी खेळायची परवानगी आपल्याला का नाही हे त्यांना पोरवयात कळायचं नाही. जसजसे ते मोठे होत गेले... तसं ब्रिटिश आपल्या सत्तेच्या ताकदीचा उपयोग करून भारतीय माणसांना कसं वाकवतात हे त्यांना दिसायला लागलं.

दरम्यान दक्षिण अफ्रिकेत श्वेतवर्णीयांनी अश्वेतांबद्दल केलेला तीव्र पक्षपात त्यांना दिसला, त्यांनी तो अनुभवलाही. भेदाभेद आणि विषमता कुठं जन्म घेतात हे त्यांच्या लक्षात आलं. माणसांचा एक गट जेव्हा स्वतःला बाकीच्यांपेक्षा उच्च समजायला लागतो आणि इतरांना प्रतिष्ठा देण्याची गरज नाही अशा समजुतीत वागायला लागतो तेव्हा विषमता जन्म घेते. या छळाचा प्रतिकार करण्यासाठी विनयशीलतेचाच उतारा हवा असा त्यांचा ठाम विश्वास होता.

दक्षिण अफ्रिकेत भारतीयांबाबतीत होणारा दुजाभाव दूर होऊन त्यांना योग्य वागणूक मिळावी यासाठी बोलणी करण्यात बापूजींनी पुढाकार घेतला होता. तिथल्या सरकारनं भारतीय प्रश्नांच्या संदर्भात एक अधिकारी नेमला होता, बापूजींना भारतीयांच्या वतीनं त्याच्याशी बोलायचं होतं.

बापूजींनी अतिशय शांतपणे बाजू मांडली. ते म्हणाले, ‘जसं तुम्हांला भासवलं गेलंय तसं नाहीये. भारतीय माणसं तुमच्या सरकारला मुळीच अडचणीची नाहीत. उलट अतिशय काटकसरीनं राहणारी कष्टाळू माणसं आहेत ती. त्यांच्यामुळं उलट तुमच्या देशाचा लाभच होतोय.’ बापूजी सांगत होते ते सगळंच त्या अधिकाऱ्याला पटलं. त्यानं त्यांचीही बाजू बापूजींना हलक्या आवाजात सांगण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, ‘तुम्हांला वाटतं तो विषमतेचा मुद्दा वेगळ्या गोष्टींवर उभा आहे. युरोपिअन माणसांना आणि देशांना भारतीयांच्या दुर्गुणांची भीती वाटत नाही... त्यांच्या सद्‌गुणांची, नीतिमत्तेची भीती वाटतेय.’

हा अतिशय महत्त्वाचा बोध होता. माणसांना, मग त्या स्त्रिया असोत की अल्पसंख्यांक किंवा स्थलांतरित असोत... त्यांना दडपलं जातं, हक्क नाकारले जातात तेव्हा त्यांचं मोल समजून घेणं आपण टाळत असतो. त्यांना दडपून टाकण्यानं आपण अधिक ताकदीचे होतोय असं आपल्याला वाटतं... पण ही ताकद फसवी असते. आपल्यात खराखुरा आत्मविश्वास असेल तर आपण समोरच्या माणसाचे गुण, त्याच्या क्षमता ओळखून त्याच्या गरजेनुसार त्याच्यासाठी उभे राहतो. कधी त्याच्या यशाबद्दल टाळ्या वाजवून तर कधी त्याच्या अडचणीच्या वेळी त्याला हात देऊन सोबत करतो.

दक्षिण अफ्रिकेत, दर्बनमध्ये जरूर पडली तेव्हा-तेव्हा बापूजी मोफत आरोग्यसेवांमध्ये स्वयंसेवक म्हणून कंबर कसून उभे राहिले. त्यातून त्यांची मनःशक्ती आणि विनयशीलता सगळ्यांना दिसली. ते नसते तर काही गरजू आणि आजारी-जखमी माणसांना कदाचित शुश्रूषा आणि देखभालीची ऊब मिळालीच नसती.

त्या काळात बोअर युद्ध सुरू होताच आरोग्यसेवेमध्ये काम करण्याच्या अनुभवाचा उपयोग करून त्यांनी ॲम्ब्युलन्स पथकाची उभारणी केली. या पथकात त्यांनी हजारांवर स्वयंसेवक तयार ठेवले. या स्वयंसेवकांपैकी काही जण तर नवशिके मजूर होते... पण जखमांवर मलमपट्टी कशी करावी इथपासूनच्या लहानसहान गोष्टी बापूजींनी त्यांना शिकवल्या. प्रत्यक्ष युद्ध ज्या जागी घडलं तो भाग खूप खडकाळ नि अडचणीचा होता. तिथं वाहन जाणं अशक्यच होतं... मात्र बापूजींच्या ‘स्वयंसेवक पथका’नं तळपत्या उन्हात कधी वीस मैल तर कधी त्याहून जास्त अंतर धावत जाऊन स्ट्रेचरवरून जखमींना उपचारकेंद्रात पोहोचवलं. त्यांची काळजी वाहिली. युद्ध संपल्यावर या पथकाचं कर्तव्यतत्परतेबद्दल नि शौर्याबद्दल खूप कौतुक झालं. ब्रिटिशांनी मेडल देऊन बापूजींचा गौरव केला.

हे सगळं ठीक झालं... पण युद्धामुळं समोर आलेला अमानुषतेचा भेसूर चेहरा बघून बापूजी हादरून गेले. बोअर युद्धाआधी झालेल्या अँग्लो-झुलू युद्धात अगणित स्थानिक झुलूंची ब्रिटिशांनी केलेली कत्तल त्यांनी पाहिली होती. ‘कुठलातरी मोठा चषक मिळवण्यासाठी कुरघोडी करावी तशी माणसांची शिकार करत सैनिक धावत सुटले होते!’ असा उल्लेख त्यांनी यासंदर्भात केला होता. जमिनीवर तीरकामठा घेऊन उभ्या असणाऱ्या झुलूंवर बंदुकांनी सज्ज ब्रिटिश सैनिक घोड्यावर स्वार होऊन हल्ले करत होते.

सत्तेचा नि ताकदीचा उन्माद आणि मगरुरी माणसातलं ‘हीन’ कसं बाहेर काढतं हे बघून बापूजी अस्वस्थ झाले होते. त्याही वेळी बापूजी ‘ॲम्ब्युलन्स पथक’ सांभाळत होते. दोन्ही युद्धांत जखमी झुलू सैनिकांना नि ब्रिटिश सैनिकांना त्यांनी सारख्याच सन्मानानं वागवलं आणि उपचार केले. सगळ्यांना समान प्रतिष्ठेनंच वागवलं गेलं पाहिजे आणि तशीच सेवाही दिली पाहिजे हे त्यांनी पथकाला निक्षून सांगितलं होतं.

समाज म्हणून आपण कुठं चुकतो यावर दोन्ही युद्धांचा वेगळ्या रितीनं जवळून अनुभव घेतल्यावर बापूजींनी शिक्कामोर्तब केलं. सत्तेची मालकी आणि लगाम आपल्या हाती राहावा म्हणून समाज हिंसेची संस्कृती आपलीशी करतो ही एक प्रचंड मोठी चूक आहे असं बापूजींच्या लक्षात आलं. खरी संपत्ती ही पैशाअडक्यातून किंवा वर्चस्वाच्या गणितातून नाही... तर सगळ्या माणसांना समान प्रतिष्ठा असते या स्वीकारातून उभी राहते. 

‘एकट्या माणसाचं हित हे संपूर्ण समाजाच्या हिताशी निगडित असतं.’ बापूजींनी मला आवर्जून सांगितलं होतं.

जगभरात उसळलेल्या हिंसेला त्यांच्या मते सात सामाजिक पातके/पाप कर्मे कारणीभूत आहेत. ते असे...

- कष्टाविना संपत्ती

- विवेकहीन सुखोपभोग

- नीतिमत्तारहित व्यापार

- मानवतेविना विज्ञान

- चारित्र्याविना शिक्षण

- त्यागरहित भक्ती

- तत्त्वहीन राजकारण

अलीकडे या दोषांमध्ये मी आणखी एकाची भर घातली...

- जबाबदाऱ्यांवाचून हक्क

प्रत्येक जिवाचं आपलं म्हणून एक मोल असतं हे आपल्याला मान्य असतं तेव्हा सगळ्यांसाठी हितकर असे बदल घडण्याची सुरुवात होते. याबाबतीत बंकर रॉय या भारतीय शिक्षणतज्ज्ञाचं मला खूप कौतुक वाटतं. ते तीन वर्षं स्क्वॅश या खेळाचे राष्ट्रीय पातळीवरचे विजेते होते. भारतातल्या अतिशय नामांकित शिक्षणसंस्थांमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं होतं. ‘माझ्यासमोर केवढं मोठं जग पसरलेलं होतं, कितीतरी संधी जणू माझ्या पायापाशी होत्या.’ त्यांनी सांगितलेलं एकदा... मात्र स्वतःचं महागडं नि उच्चभ्रू शिक्षण वापरून हमखास नावलौकिक आणि यश देणारा डॉक्टरसारखा किंवा राजदूतासारखा जॉब घेण्याऐवजी त्यांनी खेड्यात राहून विहिरी खोदायच्या ठरवलं. आईवडलांचा विरोध असूनही असं वेगळंच काम निवडलं.

लहानलहान गावांमध्ये काम करताना त्यांनी आपल्या शिक्षणाचा रुबाब मागं टाकला, अधिकच नम्र होऊन ते माणसांमध्ये मिसळले. तिथल्या माणसांना त्यांनी स्वतःचं काहीही शिकवायचा प्रयत्न केला नाही. उलट ‘तुमच्याकडून शिकायचंय मला’ असं म्हणत ते गावकऱ्यांनी सांगितलेलं शिकत राहिले. यातूनच ‘बेअरफूट कॉलेज’ची सुरुवात झाली. स्थानिक माणसांना अवगत असलेलं ज्ञान, कलाकौशल्यं यांचा उपयोग नवीन कल्पना शोधण्यासाठी करायचा आणि त्यातून शक्यता धुंडाळायच्या अशा तऱ्हेनं हे कॉलेज चालायचं.

माझ्या आजोबांच्या तत्त्वांच्या आधारे रॉय यांचा दृष्टीकोन आकाराला आला होता. समानता आणि विनम्रता ही ती तत्त्वं. बापूजींच्या आश्रमात जे चालायचं तेच वेगळ्या पद्धतीनं रॉय यांच्या कॉलेजात चालायचं. ते लोकांना म्हणायचे, तुमचे प्रश्न नि तुमच्या अडचणी घेऊन इकडं या आणि त्यातून शिकण्याची संधी मिळवा, पैसे मिळवण्याची संधी नव्हे.

अगदी सुरुवातीच्या दिवसांत कुठल्याची सोयीसुविधा नव्हत्या तेव्हा लोक जेवाखायचे, झोपायचे नि काम करायचे ते जमिनीवर. गरीब माणसांना ‘तुम्ही अमुकतमुक शिकायला हवं’ असं सांगण्यापेक्षा तुम्हांला तुमच्या जमिनीवर वाढताना-जगताना जे कळलंय, जे येतंय ते महत्त्वाचं आहे हे त्यांनी गावकऱ्यांच्या मनांवर बिंबवलं.

या शिक्षणात लेखन-वाचनाला अग्रक्रम नव्हता... पण लांबदूरच्या गावांमध्ये वीज पोहोचली आहे का, पाणी उपसण्यासाठी पंप आहे का या गोष्टींना प्राधान्यक्रमात फार वरचं स्थान होतं... त्यामुळंच अशिक्षित गरीब बायकांना रॉय यांनी सोलर इंजिनिअर म्हणून तयार केलं.

या उपक्रमाला अपूर्व यश मिळालं. काही आठवड्यांतच कुठलंही मॅन्युअल किंवा क्रमिक पुस्तक न वाचता, सूर्याच्या ऊर्जेचा उपयोग करून अख्खं गाव या बायकांनी उजळवून टाकलं. बेअरफूट कॉलेजातल्या या महिला चमूनं पुढे भारतातली अनेक गावंशहरं सौर्यऊर्जेनं दीपवली. हे बघून अन्य देशांनाही उत्सुकता वाटली. त्यांनी विचारणा केली तेव्हा अफगाणिस्तानातल्या आणि अफ्रिकेतल्या कितीतरी राज्यांमध्ये सौरऊर्जेचं तंत्र त्यांनी पोहोचवलं. रॉय आवर्जून सांगतात, ‘सिएअरा लिओनी, गॅम्बिया आणि अशा कितीतरी देशांमधल्या अशिक्षित आजीबाईही सूर्याची ऊर्जा कशी वापरावी हे शिकवतात... मोठी कामं मार्गी लावतात.’

अगदी सुरुवातीच्या काळात मनात स्वप्नं घेऊन रॉय खेड्यापाड्यांत फिरत होते तेव्हा त्यांना बघून गावाच्या कट्‌ट्यावर बसलेले लोक चकित व्हायचे. हा माणूस कुठलातरी कायदा मोडून, पळ काढून इथवर आला नसेल ना किंवा कुणालाही कळू नये असा स्वतःचा भूतकाळ मागं टाकायच्या प्रयत्नात तो अशा दुर्गम गावामध्ये आला असेल का... असे ना-ना विचार लोकांच्या मनात यायचे. नाहीतर उगीच कोण उच्चशिक्षित कशाला गावची वाट धरेल?

‘खेड्यापाड्यांतल्या, गरिबीत जगणाऱ्या माणसांकडे कुठली-ना-कुठली कौशल्यं नि कला असतात... त्या कौशल्याला जरा मुलामा दिला, नव्या कल्पना वापरल्या तर मुख्य प्रवाहात या ज्ञानाचं चीज होईल असा विचार करून मी तुमच्याकडे आलोय...’ हे लोकांना समजावता-समजावता रॉय थकून जायचे. त्यांच्या कॉलेजात येणाऱ्या बहुतांश बायका अशिक्षित तर असायच्याच... वर त्यांच्या बोलीभाषाही वेगवेगळ्या असायच्या... त्यामुळंच विषय समजून घेण्यासाठी किंवा समजावण्यासाठी व्याख्यान द्या, संवाद साधा असे मार्ग वापरण्याऐवजी रॉय खुणांची भाषा वापरायचे, कठपुतळ्यांच्या मदतीनं विषय सांगायचे. ते गमतीनं म्हणायचे, ‘या कठपुतळ्या जागतिक बँकेच्या रिपोर्ट्‌सचे कागद रिसायकल करून बनवल्यात!’

मथितार्थ काय... तर तल्लख माणसांनी आणि प्रख्यात संस्थांनी निर्माण केलेलं ज्ञान किंवा अन्य काहीही हे सामान्य माणसांनी केलेल्या निर्माणापेक्षा अधिक चांगलं असतं असं मानायचं काही कारण नाही. बेअरफूट कॉलेज हे भारतातलं असं एकमेव कॉलेज जिथं पीएचडी किंवा आणखी मोठाल्या पदव्या घेतलेले शिक्षक नव्हते. स्वतःच्या हातांनी काम करणाऱ्या आणि शारीरिक श्रमाला प्रतिष्ठा देणाऱ्या मंडळींकडे असलेलं मूलभूत ज्ञान आणि काम यांवर रॉय यांचा अढळ विश्वास होता.

तुम्ही कितीही उत्कृष्ट शाळांमधून नि संस्थांमधून शिक्षण घेतलेलं असलं तरी गावाखेड्यांतली एखादी अशिक्षित गरीब बाईही समाजाला काहीतरी नवं शिकवू-सांगू शकते हे मान्य करायला फार विनय लागतो. आजोबांचं एक वाक्य रॉय नेहमी बोलण्यात वापरायचे, ‘आधी ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, मग तुमच्यावर हसतील, चेष्टा करतील, मग भांडतील आणि नंतर तुमच्या मनासारखं होईल. तुम्ही जिंकाल!’ 

समता आणि सामूहिक निर्णय या मुद्‌द्यांवर भर दिल्यामुळं आजोबाही कायम जिंकत राहिले. बरेचदा अतिशय चांगल्या हेतूनं बाहेरची मंडळी गरीब-अशिक्षित खेडेगावांमध्ये आपल्या-आपल्या ब्ल्यू प्रिंटनुसार बदल घडवण्याचा मनसुबा घेऊन दाखल व्हायची. रॉयनी मात्र असं केलं नाही. माणसांकडे त्यांचं म्हणून ज्ञान आणि कौशल्यं असतात, ती ओळखून त्यांना विकासासाठी थोडी दिशा देणं हे आपलं काम आहे हे समजून घेण्याचा विनय रॉय यांच्याकडे होता. गावात वापरता आणि नियंत्रित करता येईल असं तंत्र त्यांनी आणलं.

नम्रतेबद्दलच्या आणि सेवा देऊ करण्याच्या उमेदीबद्दलच्या आजोबांच्या संकल्पना बेअरफूट कॉलेजच्या यशामुळं अधिक खऱ्या ठरतात. लोकोपयोगी कामाची उमेद आणि जोडीला नम्रता असेल तर संपूर्ण जगात बदल घडवता येणं शक्य आहे यावरचा विश्वास पक्का होतो. हीच गोष्ट आणखी एक संदेश देते, कुठल्याही अहंकारावाचून बदलासाठी पाऊल उचललं तर जग तुम्हांला स्वीकारतं, बदल घडतो.

आजोबा स्वतःकडं खूप प्रामाणिकपणानं पाहायचे. कितीतरी ठिकाणी खरंतर जगभरात त्यांच्यामुळं मोठमोठे बदल घडले तरी आपल्याला लोककल्याणासाठी कुठलातरी खास वरदहस्त मिळालाय अशी त्यांची भावना नव्हती. आपल्याला कुठलंही वरदान लाभलेलं नाही असं सांगताना ते म्हणायचे, ‘मला जे यश मिळालं तसं कुठल्याही स्त्रीपुरुषाला मिळवता येऊ शकतं याबद्दल माझ्या मनात अगदी जराही शंका नाही. अट केवळ एकच, त्यांनी माझ्याइतक्याच श्रद्धेनं आणि आशेनं प्रयत्न करायला हवेत!’

प्रत्येकाचं मोल मी जाणतो किंवा जाणते हे म्हणणं सोपं आहे, आचरणात आणणं कठीण! माझी निवड बरोबरच आहे, मी योग्य तेच करतो आहे असं आपल्याला बहुतांश वेळा वाटत असतं. याचा दुसरा अर्थ असा की, मी वगळता उरलेले चुकीचे आहेत. मानसशास्त्रज्ञांचं याबाबत म्हणणं असं की, पुष्कळदा माणसं माहितीच्या आधारावर निर्णय घेण्याऐवजी ‘आतून वाटलं म्हणून’ मत तयार करतात आणि मग त्याला सबळ करण्यासाठी इतर माहितीचा आधार घेतात. लहानमोठ्या प्रसंगांत आपणही असेच अजाणता निर्णय घेऊन टाकतो.

साधं उदाहरण द्यायचं तर हे बघा... तुम्ही कार खरेदी करण्यासाठी बाजारात जाता. त्यातली एक तुम्हांला पसंत पडते. मग तुम्ही ‘पसंत केलेलं मॉडेलच कसं योग्य आहे’ हे सांगण्यासाठी सोयीनुसार माहिती जमा करता. असंच आपण निवडणुकांदरम्यानही वागतो. वस्तुस्थिती नीट उलटसुलट तपासून घेण्याऐवजी आपण पाठिंबा देण्यासाठी एक उमेदवार निवडतो आणि त्याच्याविषयीच्या शक्य तितक्या सकारात्मक गोष्टी गोळा करून सगळ्या नकोशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतो.

माझ्याबाबतीतही असंच काहीसं घडलं होतं. एक निर्णय मला घ्यायचा होता. मी ठरवलंय ते बरोबरच आहे असं मला वाटत होतं. नंतर लक्षात आलं की, मला जे बरोबर वाटतंय त्याची दुसरी बाजूही विचारात घेता येणं हा खरा विनय आहे. आजोबांच्या आयुष्यावर बेतलेला ‘गांधी’ नावाचा सिनेमा रिचर्ड ॲटनबरो यांनी 1982मध्ये दिग्दर्शित केला. असा काही सिनेमा तयार होतोय असं पहिल्यांदा कळलं तेव्हा मी अस्वस्थ झालो होतो.

म. गांधींच्या कुटुंबीयांशी याबाबत काहीच बोलायचं नाही असं ॲटनबरोंचं ठरलेलं होतं. पुढे कळलं की, भारत सरकारनं या सिनेमाला पंचवीस दशलक्ष डॉलर्सची मदत दिलीय. या बातमीनं तर मी घाबरलोच. मी ‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये माझ्या सदरात याबद्दल टीका केली आणि म्हटलं की, हे पैसे गरिबांच्या कल्याणासाठी खर्च झाले असते तर आजोबांना अधिक आवडलं असतं. खरंच तर होतं! पंचवीस दशलक्ष डॉलर्स ही रक्कम असंख्य लोकांचं आयुष्य बदलवण्याइतकी प्रचंड रक्कम होती... ती अशी सिनेमावर वाया जावी?

‘गांधी’ रिलिज होण्यापूर्वी काही दिवस आधी झालेल्या खास शोमध्ये येण्याचं निमंत्रण मलाही होतं. मी खुर्चीत जाऊन बसलो पण खूप बेचैन होतो. सिनेमा सुरू झाला आणि माझे डोळे भरून आले. सिनेमात काही त्रुटी होत्या... पण आजोबांचा आत्मा या सिनेमानं टिपला होता खरोखर. सिनेमा सुरू होतानाच पडद्यावर एक विधान झळकलं होतं, ‘आमच्या मनात होते ते सगळे प्रसंग आणि घटना आम्हांला चित्रीत करता आलेल्या नाहीत... तरीही जितक्या केल्या त्यात, ‘आम्ही नोंदींशी व दस्तावेजांशी प्रामाणिक राहिलो, त्यांचा अर्थ व भाव हरवू दिला नाही आणि... ज्यांच्यावर सिनेमा आधारलेला आहे त्याच्या हृदयाशीही प्रामाणिक राहिलो.’ या कबुलीत त्यांनी म्हटलं ते तडीस नेलं.

घरी पोहोचताच मी माझ्या आधीच्या सदराचा उत्तरार्ध असणारं पुढचं सदर लिहायला घेतलं. आधीच्या सदरात केलेली टीका मागं घेऊन मी सिनेमाविषयी माझ्या मनात निवळ कौतुकाची आणि प्रेमाची भावना असल्याचं मान्य केलं. आजोबांची भूमिका साकारणाऱ्या बेन किंग्जले यांनी बापूजींचा प्रेमाचा आणि हिंसेचा संदेश कोटीकोटी माणसांपर्यंत सहजतेनं पोहोचवला. एरवी हे काम इतकं सोपं नव्हतं. ‘गांधी’ सिनेमाला तब्बल आठ ॲकॅडमी ॲवॉर्ड्‌स मिळाली, उत्कृष्ट चित्रपट म्हणूनही या सिनेमावर मोहर उमटली. यात ॲटनबरो आणि किंग्जले यांनाही मानाचे पुरस्कार लाभले आणि ते योग्यच होतं.

मला काय मिळालं? 

- मला दुसरी बाजू समजून घेण्याच्या विनयाविषयीचा एक मोठा नि महत्त्वाचा धडा मिळाला.

एकमेकांचं वर्णन करण्यासाठी आपण जे शिक्के मारतो, जे फरक करतो, मग ते लिंगविषयक असोत की धर्मविषयक अथवा राष्ट्रीयत्वाबाबत - बापूजींना ते नको वाटायचं. राष्ट्रभक्तीच्या प्रेरणेविषयी त्यांना काळजी वाटायची. इतर कुणाचाही विचार न करता, संपूर्ण जगाच्या एका कोपऱ्यात स्वतःला सुरक्षित वाटून घेण्याचा मार्ग म्हणजे ही प्रेरणा असं त्यांना वाटायचं.

आपण अशा घट्ट बांधीव गटांमध्ये स्वतःला विभागतो तेव्हा साहजिकच आम्ही करतो ते इतर कुणाहीपेक्षा बरोबर आहे आणि बाकीचे लोक त्यांच्या जागेवरून काय पाहतात, त्यांना काय वाटतं हे समजून घेण्याची गरज आम्हांला नाही... नव्हे... त्यांचं अस्तित्व आमच्यावर परिणाम घडवू शकत नाही असं आपण सांगत असतो. या मार्गावर काटे असतात, वेगळं पडण्याचे, हिंसेचे. अहिंसामय दृष्टीकोन मात्र आपली जमीन अनाग्रही करतो... तो म्हणतो, ‘तुम्ही जरी आमच्यासारखे नसलात तरी तुमचे दृष्टीकोन, तुमची स्वप्नं यांविषयी आम्हांला आदर आहे.’ ही वाट विनयशीलतेतून लाभते.

एखाद्या गोष्टीवर बसलेल्या शिक्क्यांकडे दुर्लक्ष करणं, दुसऱ्याचा दृष्टीकोन स्वीकारणं या गोष्टी म्हणाव्या तितक्या सोप्या नाहीत... पण यांचा परिणाम प्रचंड होतो. न्यूयॉर्कमधील रॉचेस्टरमधल्या एका शाळेतल्या शिक्षिकेनं मला तिच्या वर्गातल्या मुलांशी गप्पा मारण्यासाठी बोलावलं. मी या गप्पांमध्ये अहिंसेविषयी बोलावं अशी तिची इच्छा होती. मग मी वर्गातल्या मुलामुलींना माझ्या आजोबांविषयी सांगितलं.

एरवी लोकांकडून अनेकदा अनुभवायला येणाऱ्या रागाचा किंवा निराशेचा अनुभव लोकांना प्रेमानं, आदरानं आणि आवश्यक ती दखल घेऊन वागवलं की येत नाही. सगळं चित्रं बदलतं. मी आजोबांच्याच गोष्टींच्या आधारे त्यांची ही शिकवण मुलांपर्यंत पोहोचवली आणि परत आलो... मात्र नंतर मुलांच्या शिक्षिकेनं त्यांना एका प्रकल्पाचं काम दिलं. रोजच्या जगण्यात बापूजींची शिकवण कशी उपयोगी पडते याविषयीचा प्रकल्प होता.

मुलांनी काय काय शोधून काढलं हे ऐकण्यासाठी महिन्यानंतर मी पुन्हा या शाळेत गेलो. त्या वेळी एक गोंडस गबदूल मुलगी उठून उभी राहिली नि म्हणाली, ‘तिचं वजन जास्त असल्यामुळं ती नेहमी फालतू टिंगलटवाळीचा विषय होऊन बसायची. तिचा छळ व्हायचा. असं झालं की तिला खूप राग यायचा नि ज्यांनी कुणी टिंगल केलीय त्यांच्यावर ती ओरडायची, त्यांना शिव्याशाप द्यायची...

मात्र जेव्हापासून बापूजींच्या गोष्टी नि त्यांची वागायची पद्धत समजली तेव्हापासून तिनं तिच्या प्रतिक्रियेत बदल करायचा ठरवलं. प्रेमानं कसा आणि काय फरक पडतो ते तपासायचं ठरवलं... त्यामुळं त्यानंतर महिन्याभरात जेव्हाकेव्हा कुणी वजनावरून चिडवलं तेव्हा ती शांतपणानं सामोरी गेली. तिच्या इतक्या शांत प्रतिक्रियेमुळं चिडवणाऱ्यांना निःशस्त्र झाल्यासारखं वाटलं, काय करावं हे कळेना झालं!

त्यानंतर तिनं ‘हार्ट्‌स ऑफ डायमंड’ नावाचा एक क्लब सुरू केला. या क्लबमध्ये तिच्यासारख्या किंवा वेगळ्या अडचणी असणाऱ्या सगळ्यांना यायचं निमंत्रण होतं. आपण आपले झगडे आणि मानसिक गोंधळ यामुळं राग-राग करण्यापेक्षा आणि स्वतःला छोटं करण्याऐवजी प्रेमानं प्रश्न सोडवू या असं या क्लबच्या वतीनं ती सांगायला लागली.

या मुलीच्या प्रकल्पानं मी खूप भारावून गेलो. त्रास देणारे, छळणारे जितके दाखवतात तितके ताकदीचे नसतात - उलट ते कुणीतरी कमजोर भक्ष्य मिळण्याची वाट बघत असतात, ते मिळालं की त्यांचं महत्त्व वाढतं - हे सत्यच तिच्या या प्रयोगातून तिनं अधोरेखित केलं. अशा छळणाऱ्यांचा, गुंडगिरी करणाऱ्यांविषयीचा राग या मुलीच्या प्रयोगानं कमी होत जावा आणि हळूहळू त्यांना सामीलकीची भावना जाणवावी असं निमंत्रण दिसतं. त्या शाळकरी मुलीला जो आत्मसन्मान प्रेमाच्या प्रयोगातून गवसला त्यातून इतरांनाही मदत झाली. कुठल्यातरी काल्पनिक शिडीवर बसून आरडाओरडा नि भांडणं करण्यापेक्षा एकमेकांना समपातळीवर मानत प्रेम नि आदर देणं हिताचं आहे हे मुलांनाही कळत जातंच.

सुसंस्कृत समाजात सगळ्यांना एकमेकांची प्रामाणिक कदर असायला हवी. आपल्याला अपेक्षित असणाऱ्या समाजात संपूर्णतया आर्थिक समानता असू शकणार नाही हे मान्य... पण आजइतकी प्रचंड आर्थिक दरी तरी नसावी असं बापूजींना वाटायचं. यशस्वी आणि भरीव प्रगती झालेली माणसं भव्य गेट असणाऱ्या त्याहून भव्य बंगल्यांमध्ये राहतात आणि इतर समाजाच्या वेदना, त्रास, दुःख यांपासून विलग होतात. हा असमतोल संकटांना निमंत्रण देतो. आपल्या यशाचं श्रेय आपण मोठ्या अभिमानानं स्वतःकडे घेतो... पण आपण एकटे यशस्वी होऊच शकत नाही हे सत्य आहे. आपल्या यशाची कमान अनेक लोकांनी तोलून धरलेली असते, आपल्या जिंकण्यात अनेकांचे हातभार असतात, त्यांचं श्रेय ओळखण्याची आणि त्यांना ते देण्याची विनयशीलता आपल्याकडे हवी.

राजेंद्र सिंग नावाच्या एका परिचित मित्राची गोष्ट सांगतो. त्यांनी शिक्षण घेतलं ते मेडिकल डॉक्टर होण्याचं. यथावकाश भारतातल्या ‘सारिस्का’ या तशा नीरस गावात प्रॅक्टिससाठी जायचा निर्णय घेतला.

काही काळ गेला, तसतसे ते गावात रुळायला लागले. गावातल्या एका ज्येष्ठानं त्यांना सांगितलं, ‘आम्हांला पाण्याची जितकी गरज आहे तितकी शिक्षणाची नि औषधांची नाहीच.’ ते आजोबा एवढंच बोलून थांबले नाहीत. त्यांनी राजेंद्र सिंगना सोबत घेऊन बाजूची पर्वतांची रांग दाखवली, जमीन दाखवली. सगळीकडेच मोठमोठाल्या भेगा पडल्या होत्या.

‘आमच्याकडं पाऊस इतका कमी. जेवढा येतो तेवढा या भेगांमध्ये गायब होतो.’ आजोबांनी सांगितलं. जुन्याजाणत्या शहाणपणानं त्यांनी पाणी छोट्याछोट्या खड्‌ड्यांमध्ये भरून कसं वाचवता येईल याचे उपाय सांगितले. डॉ. राजेंद्रना कळायचं ते कळलं आणि त्यांनी या आजोबांना सांगितलं, ‘आमच्या सोबत राहा, मार्गदर्शन करा... आपण या कल्पना वापरून पाणीसिंचनाचा एक प्रकल्पच आकाराला आणू या!’

‘नको, नको. एक तर मी खूप म्हातारा झालोय, मला झेपणार नाही आणि लोक आधीच तऱ्हेवाईक म्हणून माझी चेष्टा करतात. माझा धाक वाटेल, विश्वास वाटेल असं शिक्षणही माझ्याकडं नाही, उलट तुमच्याकडे डॉक्टरची पदवी आहे. लोक तुमचं ऐकतील. तुम्ही पुढे होऊन काम करा.’ आजोबांनी मोकळेपणानं सांगितलं.

वाळवंटातले आजोबा कितीही काही सांगोत... डॉ.राजेंद्र सिंगनी मात्र माझ्या आजोबांच्या शहाणपणाचा मार्ग स्वीकारला. ‘आधी करून दाखवायचं, मग बोलायचं’ असं ठरवल्यावर पाण्याचा प्रवाह जिथून येतो त्या मार्गावर पाणीसाठा व्हावा म्हणून काही खड्डे त्यांनी खोदले. पाऊस आला तेव्हा हे खड्डे भरले, तहानलेल्या जमिनीत पाणी मुरायला लागलं. थांबायला लागलं. गावकरी चकित झाले. आणखी काही खड्डे करण्यासाठी मार्गदर्शन करण्याची विनंती त्यांनी राजेंद्र सिंगना केली. आता या वाळवंटाचा कायापालट होऊन खूप वर्षं लोटली. तिथली जमीन पाणी धरू लागली आहे, परत सुपीक झाली आहे, पाण्याच्या वाहणाऱ्या प्रवाहांनी समाजात आनंदही वाहायला लागला आहे.

डॉ. सिंग आता आजूबाजूच्या काही गावा-शहरांमध्येही पाणीसिंचनाचं तंत्र शिकवत आहेत. अनेक लोक त्यांच्या मोहिमेशी जोडले जाताहेत. पूर्वी नापीक या सदरात मोडणारी हजारो एकरांची जमीन त्यांनी शेतीखाली आणली आहे. नंदनवन फुललं आहे. बरंऽ हे सगळं करण्यासाठी कुठलं अत्याधुनिक तंत्र वापरलं किंवा लाखो डॉलर्सचा प्रकल्प मंजूर करून घेऊन मग सुधारणा योजना हातात घेतली असं काही झालं नाही. 

डॉ. सिंग म्हणतात, ‘समाजातल्या जाणत्या माणसांमध्ये असणारं उपजत शहाणपण वापरून आम्ही योजना आकाराला आणली आणि यशस्वीही केली.’

पाण्याचं वाहतेपण समाजाचं जगणं कसं बदलू शकतं याचा विचार करता-करता त्यांना लक्षात आलं... खरंच की, ‘वाहतेपण’ ही मोलाची गोष्ट आहे. एका मोठ्या समाजाचा एक छोटासा हिस्सा या नात्यानं आपण माणसांशी, त्यांच्या भावभावनांशी, गरजांशी जोडलेले असतो तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण एक व्यक्ती म्हणून वाढतो, फुलतो.

समोरच्या माणसाचे गुण स्वीकारून आपण त्याचं खुल्या दिलानं कौतुक करायला शिकतो तेव्हा कणखर बनतो आणि लवचीकही... कारण यातून सकारात्मकतेचा स्पर्श आणि जाणीव, दोन्ही पोहोचते. बराक ओबामा अध्यक्षपदाच्या दुसऱ्या टर्ममध्ये कार्यरत असताना ते अनेक लोकांचा उल्लेख करायचे. आपण आज ज्या ठिकाणी पोहोचलोय तिथवरच्या प्रवासात कमीअधिक प्रमाणात साथ देणाऱ्या, उपयोगी पडलेल्या असंख्य माणसांची नावं ते घ्यायचे; कधी एखादा प्रसंग सांगायचे. 

‘कुठल्यातरी विशिष्ट समूहाची ओळख म्हणून आपण संकुचित व्हायला नको, एकमेकांना समजून घेणं तिथं सगळ्यात कठीण असतं.’ असं म्हणत ते कोंडाळ्यात राहण्याविषयी सावध करायचे. 

ते सतत सांगायचे, ‘आपण संपूर्ण विराट मानवजातीचे, एकमेकांशी नातं सांगणारे जीव आहोत. आपण एकमेकांपासून नवं काही शिकू शकतो, एकमेकांवर प्रेम करू शकतो.’ - आजोबांचंही तर हेच म्हणणं होतं. ते असते तर त्यांनी बराक ओबामांना लगेच आपली सहमती कळवली असती.

आज आपल्याकडे अतिशय उच्च दर्जाचं तंत्रज्ञान आहे, ज्ञान मिळवण्याच्या अफाट शक्यता आहेत... आपण नम्रपणे इतकंच समजून घ्यायचं आहे की, ज्ञान मिळवणं ही प्रक्रिया आहे आणि ती आयुष्याच्या अखेरपर्यंत चालूच राहणार आहे. खगोलशास्त्रातले निष्णात तज्ज्ञ सांगतात की, विश्वातल्या ज्ञानाच्या पाच टक्के ज्ञान केवळ आपण मिळवू शकलोय... म्हणजे शोध घेण्यासाठी, अभ्यासासाठी अजून पंचाण्णव टक्के शिल्लक आहे. शोध हा किती अंगांनी आणि किती शास्त्रांकडून लागत राहतो.

जगभरातले महान आणि विचारशील लोक आणि गावातली उपजत शहाणपण असणारी माणसं या दोघांकडून ज्ञान मिळवण्याचे मार्ग आपण खुले ठेवले आणि अगणित शक्यता लक्षात घेतल्या तर जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन व्यापक होईल. आजोबाही तेच म्हणायचे, ‘ज्ञानाचा वारा चोहोदिशांनी आत येऊ दे, सगळ्या खिडक्या खुल्या ठेवा!’

(अनुवाद: सोनाली नवांगुळ)

- डॉ. अरुण गांधी

Tags: पुस्तक अरुण गांधी महात्मा गांधी सोनाली नवांगुळ शिक्षण अहिंसा तरुण मुले अहंकार अर्थव्यवस्था गरीब विनयशीलता डॉ.राजेंद्र सिंग बंकर रॉय Book New Book Translation Gift of Anger Arun Gandhi Mahatma Gandhi Teaching Non- Violance Ego Economy Poor Poverty Humility Dr Rajendra Singh Bunker Roy Load More Tags

Add Comment