विक्षिप्तपणाचं त्यांना वावडं नव्हतं, मात्र...

वरदान रागाचे- भाग 4

दुधीभोपळा. फोटो सौजन्य:1mg.com

महात्मा गांधी यांचे सर्वांत ज्येष्ठ नातू (मणिलाल यांचे चिरंजीव आणि तुषार यांचे वडील) अरुण गांधी वयाच्या 88 व्या वर्षीही समाजकार्यात सक्रिय आहेत. त्यांचे बालपण व तारुण्य दक्षिण आफ्रिकेत तर नंतरचे आयुष्य भारतातील इंग्रजी पत्रकारितेत गेले. निवृत्तीनंतर ते अमेरिकेत वास्तव्य करीत आहेत. ते वय वर्षे 11 ते 13 या काळात आजोबांच्या सहवासात राहिले, त्याचा सखोल प्रभाव त्यांच्या विचारांवर व कार्यावर राहिला आहे. ते स्वतःला शांती पेरणारा शेतकरी (Peace Farmer) असे संबोधतात. त्यांचे 'Legacy of Love' हे पुस्तक मराठीत 'वारसा प्रेमाचा' या नावाने गेल्या वर्षी साधना प्रकाशनाकडून आले आहे. त्याचाच उत्तरार्ध म्हणावे असे छोटे पुस्तक म्हणजे 'Gift of Anger', त्याचा मराठी अनुवाद कर्तव्य वरून प्रत्येक शुक्रवारी व शनिवारी क्रमशः प्रसिद्ध करीत आहोत. लेखमालेचा समारोप 2 ऑक्टोबरला होईल. त्यातील हा चौथा लेख.   
- संपादक

ज्यांना जगण्यातल्या मोठ्या सत्याचा शोध घ्यायचाय ती माणसं आश्रमात येऊन स्वेच्छेनं राहाताहेत असं आजोबांना वाटत होतं, पण सगळ्यांच्या बाबतीत असं नव्हतं. कुणी कुणाला सोबत म्हणून आलं होतं. कधी एखाद्या व्यक्तीबरोबर त्यांचं अख्खं कुटुंब नि मित्रमंडळीही येऊन राहिली होती. आश्रमात राहाण्यामागे आपण सगळे एकत्र आहोत, एक आहोत अशी भावना सगळ्यांच्या मनात रूजावी असा बापूजींचा प्रयत्न होता. स्वत:ला पणाला लावून दुसऱ्याला खूष ठेवण्यासाठी आपण धडपडू नये असं त्यांना वाटायचं. त्यांच्या या भूमिकेला त्यांच्या अनुयायांनी आव्हान दिलं तरी त्यांना चालणार होतं.

अतिशय ठामपणानं दिलेला ‘नकार’ हा कुणाला तरी खूष करण्यासाठी दिलेल्या होकारापेक्षा किंवा एखादा त्रास टाळण्यासाठी दिलेल्या होकारापेक्षा चांगला हे त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यांच्या या सांगण्यावर प्रश्न उपस्थित करण्याचं धैर्य बहुतांशी लोकांमध्ये नव्हतंच. संतप्रवृत्तीचा एक अतिशय समंजस माणूस म्हणून लोक त्यांचा आदर करायचे. त्यामुळंच आश्रमात येऊन ते सुचवतील तसं करावं, सांगतील ते शिकावं असाच लोकांचा कल असायचा.

जेमतेम सहा वर्षांची इला मात्र याला अपवाद. ‘आपल्याला जे हवं ते बोलणं व मागणं हे योग्यच नव्हे तर महत्त्वाचंही आहे.’ या तत्त्वाचा पुरावा बनली होती त्यावेळी सगळ्यांसाठी. 

सेवाग्राममध्ये आम्ही पहिल्यांदा आलो तेव्हा माझे आईवडिल आणि इला आठवडाभर तिथं राहिले. इला आणि मला दक्षिण आफ्रिकेतल्या आमच्या घराची, म्हणजे फिनिक्स आश्रमाच्या दिनक्रमाची सवय होती. अर्थात तिथं आम्ही राहत असलो तरी तोही आश्रम बापूजींनीच स्थापन केला होता. खरंतर सामुहिक जगण्याचा पहिला प्रयोग दक्षिण आफ्रिकेतल्या याच आश्रमात झाला. सगळ्यात आधी आमचे जवळचे नातेवाईक, काही चुलतमावस भावंडं तिथं राहायला लागली. नंतर मित्रमंडळीही आली. एकमेकांच्या सहकार्यानं निसर्गाच्या अधिक जवळ जात जगण्याचं व्रत घेणं या संकल्पनेची भुरळ पडून काही इतर माणसंही तिथं राहायला आली.

फिनिक्स आश्रम अतिशय साधा होता, पण सेवाग्रामशी तुलना करता तिथं आम्ही बऱ्यापैकी समृद्ध जगायचो असं सेवाग्रामचं वातावरण बघितल्यावर वाटायला लागलं. तिथं आमच्या घरामध्ये कामचलावू का होईना फर्निचर होतं. लाकडी घरांना पन्हळीचे पत्रे होते. इथं सेवाग्राममध्ये सगळी मातीत बांधलेली घरं, झोपड्याच म्हणा! बसायचंही सारवलेल्या जमिनीवर. सगळ्यांत मोठा फरक होता अन्नाचा. दोन्ही आश्रमांमध्ये शेतात स्वत: धान्यं पिकवून खाण्याचाच प्रघात होता. मात्र फिनिक्समध्ये माझी आई कितीतरी प्रकारचे मसाले वापरून स्वयंपाक करायची. सेवाग्राममधलं जेवण, अगदी मोकळेपणानं सांगायचं तर अक्षरश: भयंकर होतं. तिथं रोज उकडलेला अळणी दुधीभोपळा जेवणात मिळायचा. अगदी रोज. रोजचा स्वयंपाक न चुकता आधल्या दिवशीइतकाच बेचव असायचा.

इलानं आणि मी याबद्दल तक्रार केली, तर आईवडिलांनी आम्हांला गप्प बसवलं आणि दम दिल्यासारखं सांगितलं, आपण इथे पाहुणे म्हणून आलोय, बापूजींची जशी शिस्त आहे ती तशीच चालेल. त्याबद्दल काहीही म्हणायचं नाही. मग आम्ही स्वयंपाकघरात काम करणाऱ्यांशी बोललो. त्यांनीही तेच उत्तर दिलं: ‘‘गांधीजींनी दिलेल्या सूचनांनुसार आम्ही वागतोय.’’ जेवणात काय करायचं याबद्दल बापूजींनी विचार करूनच तशी सूचना दिली असणार असंच सगळ्यांना वाटत होतं. यातून एक गोष्ट तर स्पष्ट झाली... आम्हालाच नाही तर सगळ्यांना जेवणात वेगवेगळ्या भाज्या आवडणार होत्या. मात्र त्याबद्दल प्रश्न विचारून कुणालाही उद्धटपणाचा शिक्का स्वत:वर मारून घेणं नको होतं. त्यामुळंच रोजरोजच्या रटाळ बेचव जेवणाबद्दल काही विचारणं सोयीचं नव्हतं.

इलाला कसल्याही शिक्क्याची भीती नव्हती. आठवडाभर सलग दुधीभोपळ्याची सपक भाजी खाऊन तिला पुरे झालं होतं. सहा वर्षाच्या मुलीला शोभेलसा राग नाकावर वागवत तिनं बापूजींच्या झोपडीकडे मोर्चा वळवला. बापूजींसमोर उभी राहात म्हणाली, ‘‘तुम्ही या आश्रमाचं नाव बदलून टाका. सेवाग्राम ऐवजी ‘कोलाग्राम’ असं ठेवा.’’ - भारतातील या ग्रामीण भागात दुधीभोपळ्याला कोला म्हटलं जायचं.

इटुकल्या इलाला इतकं रागावलेलं बघून बापूजींनी कामातून लक्ष काढून तिच्यावर एकाग्र केलं आणि विचारलं, ‘‘बाळा, काय म्हणायचंय तुला? नीट सांग बरं...’’

‘‘आम्ही इथं आल्यापासून सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त दुधीभोपळा खायला देतात. दुसरं काहीच नाही. मला कंटाळा आलाय त्याचा.’’, इलाच्या रागाची वाफ बाहेर पडली.

‘‘खरंच असंय?’’, बापूजींना आश्चर्य वाटलं. पण ते जरा मस्करी करत म्हणाले, ‘‘बघायला हवं या गोष्टीकडे नीट. आणि तू म्हणतेस तसं असेल तर आपल्याला खरोखर आश्रमाचं नाव बदलायलाच लागणार!’’

बापूजी स्वत: अगदीच मोजका पोषक आहार घ्यायचे. बरेचदा तर अहिंसक चळवळीचा भाग म्हणून ते उपासच करायचे. पण इतरांनी आहाराबाबतीत आपल्यासारखं दक्ष असावं नि कडक नियम पाळावेत अशी त्यांची अपेक्षा नसे. ते कामात इतके गुंतलेले असायचे की सामुहिक पंगतीच्या वेळी तिथं येणं त्यांना जमायचं नाही. म्हणूनच आम्ही सगळे काय खातोय याची कल्पना त्यांना असणं शक्यच नव्हतं.

रोज संध्याकाळची प्रार्थना झाली की ते प्रवचन द्यायचे. त्या दिवशी त्यांचं बोलून झाल्यावर त्यांनी आश्रमाच्या व्यवस्थापकांना सगळ्यांसमोर बोलावलं नि रोज सगळ्यांना दुधीभोपळा का खायला घातला जातोय त्याचं स्पष्टीकरण मागितलं. त्यावर व्यवस्थापकांनी म्हणजे मुन्नालाल यांनी बापूजींच्याच सूचनेचा उल्लेख केला, ‘शेतात जे पिकतं तेच सगळ्यांनी खायचं!’

‘‘म्हणजे तुम्ही मला असं सांगताय का की शेतात फक्त दुधीभोपळेच लावलेत?’’, बापूजींनी विचारलं.

‘‘तुम्ही म्हणाला होतात की सगळ्यांनी साधं अन्न घ्यावं. म्हणून मला वाटलं, हेच तुम्हाला हवंय.’’

‘‘अहो पण, साधा आहार म्हणजे रोज तिन्ही त्रिकाळ एकाच पद्धतीचं अन्न खाणं नव्हे.’’

मुन्नालाल यावर ओशाळले आणि त्यांनी कबूली दिली, ‘‘आम्ही पूर्ण शेतात दुधीभोपळ्याची लागवड केली आणि अपेक्षेहून जास्त पीक आलं. इतक्या सगळ्या भोपळ्यांचं करायचं काय ते आम्हाला कळेना, म्हणून जेवणात दुधीभोपळ्याचं प्रमाण वाढवावं लागलं. वाया घालवणं चूक, संपवणं बरोबर असं वाटलं.’’

याला काही चांगलं नियोजन म्हणता येणार नाही असं म्हणत बापूजींनी सूचना दिली, ‘‘आपण भाजीपाला नि फळांचे वेगवेगळे प्रकार शेतात लावायला हवेत... मात्र अन्न रांधताना ते साधं असावं याकडे लक्ष द्यायला हवं.’’ अर्थात भविष्यासाठी सूचना दिली की आधीच्या गोंधळावर इलाज सुचवणं हा त्यांचा स्वभावच. त्यानुसार ते म्हणाले, ‘‘आता तुमच्याकडे इतके जादा भोपळे आहेत तर सगळे गाडीत भरा. गावात जा. तिथं भोपळ्यांच्या बदली दुसरा भाजीपाला घ्या.’’

इला त्या दिवशी आश्रमभर चांगलीच चमकली! अर्थात तेच ते रटाळ जेवण बदललं म्हणून नव्हे... बापूजींनी तिच्या निमित्ताने स्वत:शीच जणू संवाद केला. शिकवण घेतलीही व दिलीही. आपल्या अडचणींविषयी कधीही मौन बाळगू नये! एखादी चूक सांगायला आपण भ्यालो तर जगामध्ये आपण बदल कसे काय घडवून आणणार?

आईवडिल आणि इला गेल्यावर आश्रमाच्या दिनक्रमाच्या ठेक्यात मी रूळलो. रोज मी पहाटे 4.30 ला उठायचो आणि पाचच्या प्रार्थनेसाठी तयार राहायचो. प्रार्थनेला सगळ्यांनी उपस्थित राहाणं आवश्यक असायचं. ती आटोपली की दिवसभरात महत्त्वाची काय काय कामं असणारेत याबद्दल बापूजी बोलायचे. कधीकधी ते आश्रमातल्या एखाद्या व्यवहारिक मुद्‌द्यावर आपली मतं सांगायचे. अशावेळी मला गंमत वाटायची, की जगासाठी एवढे महान असणारे ‘महात्मा गांधी’ शेतात लावलेल्या भाज्यांना पाणी पाजण्याची योग्य पद्धत कुठली यावर सगळ्यांचं बौद्धिक घेताहेत. - एकूण, कुठलाच विषय आजोबांसाठी बिनमहत्त्वाचा किंवा त्यांच्या वकुबाला न शोभणारा नसे!

प्रार्थनेचं आटोपलं की मी तासभर कसरत करायचो. योगा वगैरे. त्यानंतर रोजची कामं. आम्हाला प्रत्येकाला बुट्टीचा संडास साफ करण्याचं नावडतं काम कर्तव्य म्हणून करावंच लागे. भारताच्या कानाकोपऱ्यात त्यावेळी असली कामं हलक्या जातीच्या लोकांकडून करवून घेतली जायची. लोकांमधले भेदाभेद नाहीसे होण्यासाठी आम्ही प्रत्येकानं आळीपाळीनं हे भयंकर नकोसं काम करायलाच हवं असा बापूजींचा आग्रह होता. त्यातून या कामाविषयी जगभरात जे पूर्वग्रह आहेत, समजुती आहेत त्या मोडून पडायला मदत होईल असं त्यांचं म्हणणं.

बुट्टीच्या संडासातला मैला घेऊन-घेऊन तो खताच्या खड्‌ड्यांपर्यंत जाण्याची मला फार घाण वाटायची. पहिल्यावेळी मी नाक मुरडत वासाची किती घाण वाटतेय हे दाखवलं. गांधीजींचा नातू म्हणून मला खास वागणुक मिळेल अशी माझी अपेक्षा होती. प्रश्नच उद्‌भवला नाही! ठरल्याप्रमाणं सगळ्यांनी मिळून ते काम केलं. आश्चर्य म्हणजे थोडा वेळ गेल्यावर ते काम जितकं घाण वाटत होतं तितकं घाण वाटेनासं झालं. सगळे समान आहेत हे सांगण्याची बापूजींची ही पद्धत, त्यामुळं कामाकडे वेगळ्या तऱ्हेनं पाहायला मी शिकलो.

सकाळची नेहमीची कामं उरकली की न्याहारीची वेळ (आहाहा!), त्यानंतर माझ्या गुरुजींबरोबर पुढचे धडे गिरवण्यासाठी मी तळपत्या उन्हातून बाहेर जात असे. कधीकधी तापमान 46 अंश सेंटिग्रेडची सीमा ओलांडे तरी माझे तऱ्हेवाईक गुरुजी कुणीतरी व्रत देऊन ठेवल्यासारखे उन्हातून हटत नसत, सावलीला जात नसतं. तरी बरं अशावेळी ओला कपडा डोक्यावर घ्यायची सूट मला मिळालेली होती. नाहीतर कठीण होतं! आश्रमातले सगळेच रहिवासी मानसिक शिस्तीचा भाग म्हणून किंवा ठरल्यापणे आपण करू शकतो का याबद्दलची क्षमता तपासत राहाण्यासाठी कुठली ना कुठली व्रतं घेत राहायचे. माझे गुरूजी त्यांच्या व्रतांबाबतीत नि नियमांबाबतीत थोडे जरी मऊ असते तरी त्या भाजणाऱ्या उन्हात मी खुषीनं नवं नवं शिकत राहिलो असतो. 

कोणतंही व्रत घेऊन ते प्राणपणानं पाळणं हा हिंदू संस्कारांच्या नित्यनियमांचा भाग. मी माझ्या आईच्या आईकडे, म्हणजे माझ्या तिकडच्या आजीकडे गेलो होतो तेव्हा तिथल्या मावशीनं केवळ दोन वेळाच जेवेन असा प्रण केला होता. आम्ही सगळे मिळून एका छोट्या सहलीला गेलो होतो तेव्हा आम्हाला तिच्या या व्रताबद्दल कळलं. दुपारी सगळे जेवायला बसले तरी ती जेवत नाहीये, उलट कसल्यातरी बारक्या गोळ्या चघळतेय असं माझ्या नि इलाच्या लक्षात आलं. इतकी छान सहल, चविष्ट जेवण असून ती लांब का राहातेय याची उत्सुकता वाटून आम्ही तिला विचारलं, असं का? तर तरी म्हणाली, ‘‘सकाळी न्याहारी करून झालीय माझी, आता पुन्हा खाता येणार नाही. तसा नियमच आहे माझा. त्यामुळं आता जेवण थेट रात्री.’’

माझ्या या मावशीप्रमाणं माझे गुरूजीही घेतलेल्या व्रताबाबतीत कठोर होते. आपला नियम मोडण्याची एकही फट ते ठेवायचे नाहीत. त्यामुळं तळपत्या उन्हातली मधली अर्ध्या तासाची जेवणाची सुट्टी वगळता आमचा अख्खा दिवस बाहेर जायचा. यात भर म्हणून इथली हवा कोरडी. सगळीकडे धुरळा. त्यामुळं पाऊस पडायला लागला की सगळीकडे नुसता चिखल होई. सगळं इथं टोकाचंच, त्यामुळं थंडीतही तापमानाचा पारा तीस असायचा.

ऊन कितीही तापलं तरी सावलीला जायचं नाही ही काही एकमेवच उफराटी रीत नव्हती माझ्या गुरूजींची. मागं कधीतरी आश्रमात राहाणाऱ्या एकाशी त्यांचं कशावरून तरी वाजलं, त्यातून ते त्या माणसावर बरसले. प्रकरण बापूजींकडे गेलं. सगळं ऐकून घेतल्यावर बापूजींना आढळलं की गुरूजी बोलू नयेत अशा गोष्टी त्या माणसाला बोलून बसले आहेत. बापूजींनी त्यांना सांगितलं की राग आवरायला शिकणं तुम्हाला भाग आहे.

‘‘तुम्हीच सांगा, काय करू?’’, माझ्या गुरूजींनी विचारलं.

‘‘तुम्ही बुद्धिमान आहात. काय करावं याचा निर्णय मी तुमच्यावरच सोडतो.’’, बापूजींनी उत्तर दिलं.

या विषयावर गुरुजींनी घेतलेल्या निर्णयाचं सगळ्यांना आश्चर्य वाटलं. आजोबांनाही विलक्षण धक्का बसला. गुरूजींनी कुठूनतरी एक तार पैदा केली आणि शब्दश: ओठ शिवून टाकले. या कृतीचं स्पष्टीकरण म्हणून त्यांनी एक चिठ्ठी लिहिली. त्यात म्हटलं, माझं डोकं रागानं तडकणार नाही याची खात्री होईपर्यंत ओठ शिवलेलेच राहतील. संतापाविषयी स्वत:ची समजूत काढत त्यांनी आठवडेच्या आठवडे घालवले. या काळात भूक लागली की ते पातळ पदार्थच घ्यायचे, ते ही ओठांच्या कडेला नळकं लावून त्यातून ओतायचे. मी भेटलो तेव्हा त्यांच्या खालच्या व वरच्या ओठावर जखमेची ताजी खूण मला दिसली होती, त्यामागं ही कहाणी होती. असा हटवादीपणा पाहता जरा ऊन लागलं म्हणून ते झाडाखालची शांत सावली गाठतील हे कसं शक्य होतं?

स्वत:च्या विशिष्ट दृष्टीकोनातून आलेल्या विक्षिप्तपणाशी बापूजींचं वावडं नव्हतं. मात्र जी माणसं एखाद्या गोष्टीची कारणमीमांसा करत नाहीत व स्वत:साठी विचार करू धजत नाहीत त्यांना पाहून बापूजींचा संताप व्हायचा. बहुतांशी माणसांची गर्दीच्या मागं मुकाट जायची मानसिकता त्यांना दु:ख द्यायची. आजच्या सोशल मिडियाच्या जमान्यात फार विचार न करता एकमेकांना लाईक आणि फॉलो करायच्या निरर्थक कृतीनं बापूजी नक्की कष्टी झाले असते. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीने कुठला व्यायाम नि आहार वापरत आपलं वजन घटवलं ते जाहीर केलं रे केलं की लाखो लोक लगेच तसाच प्रयत्न आंधळेपणानं करायला लागतात. दुधीभोपळ्याच्या ‘साध्या’ आहाराइतकंच हे बालीश! एखादा राजकीय नेता अतिशय तीव्र व कट्टर विधानं करतो व लोक त्याबद्दल विरोधाचा एक शब्द उच्चारत नाहीत. का? तर ते त्याच राजकीय पक्षाचे धार्जिणे असतात म्हणून. एखादा धार्मिक बुवाबाबा महिलांच्या मानवी हक्कांना नाकारतो, तरी लोक चकार शब्द उच्चारत नाहीत, कारण परंपरापालन त्यांना प्रिय वाटतं.

आजकाल बरेचसे राजकीय पक्ष एखाद्या विषयाबद्दल जनमताचा कौल काय आहे याचा अंदाज घेऊन मगच स्वत:च्या फायद्याची भूमिका घेताना दिसतात. त्या विशिष्ट विषयाबद्दल बाकी मतप्रवाह काय आहेत हे पाहायची तसदी ते क्वचित घेतात, कारण जर नंतर आपलं मत बदललं तर प्रेसवाले अशा उड्यांबद्दल चांगलेच सडकून काढतील! बापूजींना पक्षीय राजकारणात रस नव्हता, त्यांना आपण नेहमी योग्य असायला हवं यात रस होता. माझ्याशी ते तऱ्हतऱ्हेच्या गोष्टी बोलायचे, तेव्हा कळायचं की त्यांना रोज नवनव्या कल्पना सुचायच्या. त्या कल्पनांचा रोजच्या जगण्यात उपयोग करून पाहायला त्यांना आवडायचं. तरी स्वत:ला आवडलेल्या गोष्टींबद्दल सतत प्रश्न विचारत राहाणं हा त्यांचा खाक्या होता. ते स्वत:ला कधी फार खूष होऊ द्यायचे नाहीत. एखादी शिकवण, एखादा विचार आपण खूप कर्मठपणे आणि हट्ट्राग्रहाने पाळतो तेव्हा खरंतर आपण मूळ उद्देशापासून हटून केवळ त्या त्या विचाराची चेष्टा/अपमान करत असतो असं ते म्हणायचे.

ज्यांना स्वत:चं मत नसतं, जे चुकीच्या गोष्टीविरूद्ध ब्र उच्चारत नाहीत त्यांना सांगण्यासारखं बापूजींकडे खूप काही होतं. जर सहा वर्षांची इला स्वत:बद्दल बोलू शकते तर आपल्यासाठी काय अवघड आहे? एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या श्रद्धा नि आपलं म्हणणं काय आहे याची स्पष्टता नसेल तर दुसऱ्या कुणाच्या दृष्टीकोनाशी जुळवून घेणं आपण थांबवायला हवं. वाहून जाता कामा नये. आपल्या लेखी एखाद्या गोष्टीचा अर्थ काय आहे हे धुंडाळण्यासाठी स्वत:ला अवसर न देता, योग्य काय नि चांगलं काय याबद्दलची दुसऱ्याची व्याख्या आपण जशीच्या तशी स्वीकारत असू तर आपण निव्वळ शिजवलेला अळणी भोपळा स्वीकारत असतो.

आपल्याला कशाचं मोल अधिक वाटतं, प्रवाहाविरोधात असलं तरी हरकत नाही, पण आपल्याला कोणत्या गोष्टीसाठी ठाम उभं राहावं वाटतं हे स्वच्छ कळतं तेव्हा आपण अधिक कणखर ठरलेलो असतो. तेव्हाच आपल्याला आपली शक्ती गवसलेली असते. 

गांधींचा नातू या नात्यानं त्यांच्या अहिंसा या तत्त्वाचं पालन करणं आणि त्याच्या विविध बाजू अभ्यासत राहाणं हे मी आयुष्यभर करत आलो आहे. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत चालत राहावं नि या मार्गात कधीही विचलित होऊ नये अशीच इच्छा मी केलेली आहे. पण इला त्यांच्याशी ज्या निर्भयपणे बोलली ते बघता मला वाटलं की त्यांना जणू मला हेच सुचवायचं होतं, की स्वत:चा विचार कर, स्वत:ला काय वाटतं नीट बघ. त्यांचं तत्त्वज्ञान हे असं जिवंत सळसळतं होतं. त्यामुळे कुठल्याही मूलभूत विचारांतून ठरलेल्या गोष्टीबद्दलही नेहमी प्रश्न केले जायचे, ते सुधारत नेले जायचे. मी बापूजींचा नातू असलो तरी त्यांच्यासारखा नव्हतो. त्यामुळं तुम्हीही मला त्यांच्यावेगळं पाहायला हवं, तर कळेल तुम्हाला माझा झगडा काय होता ते.

‘‘तू कसला जाडजूड नि उंच आहेस, तुझे आजोबा कसे सडपातळ होते.’’ मी भारतातून परत आलो तेव्हा आसपासची मुलं मला चिडवायची.

पौगंडावस्थेतली मुलंमुली कायम अस्थिर असतात, त्यांना नेहमी असुरक्षिततेच्या भावनेनं पछाडलेलं असतं. त्यामुळं त्यांनी माझी तुलना ‘ग्रेट गांधीं’शी केली की मला सहन व्हायचं नाही.

‘‘हा इतका मोठा वारसा! मला कसा काय झेपणार?’’, मी आईला एकदा विचारलं होतं.

‘‘या वारशाचा तू ताण घेतलास तर खूप ओझं होईल... पण जगण्याचा, सत्याचा अर्थ समजून घेण्याचा हा मार्ग आहे असं मानलंस तर हलकं वाटेल.’’, आईनं अतिशय शहाणपणानं उत्तर दिलं होतं.

त्यानंतर मात्र नकारात्मक शेऱ्यांकडं मी दुर्लक्ष करायला लागलो. माझ्या आजोबांचा ज्या तत्त्वावर विश्वास आहे त्याच मार्गावर मी चालतो आहे. - पण तरी, मी एक वेगळा माणूस असू शकतो, नव्हे असतोच. बापूजींसारखा मी शाकाहारी नाही. मी प्रयत्न केला नाही असं नाही, पण तरी मला लक्षात आलं की संपूर्ण आयुष्यभर मी शाकाहार नाही अनुसरू शकत. रेस्टॉरंटमध्ये मी मांसाहारी जेवण जेवताना बघून लोकांनी ‘कसं पकडलं’च्या थाटात मला अनेकदा गाठलेलं आहे. माझ्या आजोबांच्या विचारांचा प्रसारक म्हणून ते मला बघत असतात नि त्याचवेळी माझ्या हातात हॅम्बर्गर असतो! असे प्रसंग जेव्हा जेव्हा घडतात तेव्हा बुचकळ्यात पडलेल्या लोकांना मी शक्य तितकं समजवायचाही प्रयत्न केलेला असतो. - माणसानं विशिष्ट प्रकारची विचारसरणी पाळायची ठरवली की ‘तुम्ही म्हणून जे कुणी असता त्या सगळ्याचं समर्पण करून त्या त्या विचारांची बूज राखली जाते असं होत नसतं’ हे बापूजी कायम सांगायचे. तुम्ही स्वत: विचार करून, स्वत:ला प्रत्येक टप्प्यावर प्रश्न विचारून मग त्या प्रक्रियेचे भाग होणं महत्त्वाचं. मी आतून वेगळा व बाहेरून वेगळा असा न राहता आजोबांच्या मूलभूत विचारांना आपलंसं केलं... म्हणजेच ते तत्त्वज्ञान आपलंसं केलं ना!

दुसऱ्यांना खूष करण्यासाठी त्यांना हवं त्या पद्धतीनं स्वत:ला ढाळू नये... गर्दीचा कल बघून त्या दिशेनं चालत राहाण्यानं जग बदलण्यासाठी, अधिक चांगलं करण्यासाठी तुम्ही काही करू शकत नाही. मोठमोठ्या कंपन्यांनामध्ये काम करणारी खूप माणसं मला नेहमी भेटतात. ती रात्री उशीरापर्यंत आपल्या कामाच्या डेस्कला चिकटून असतात... आपण भरपूर व निष्ठेनं काम करतोय तर ते वरिष्टांना असं दिसणं अपेक्षित आहे हा समज बऱ्याचदा यामागे असतो. खरंच अशा कृतीनं एकूण उद्योगाच्या गुणात्मकतेत, दर्जात त्यांच्याकडून भर पडते काय? स्वत:शी आणि कुटुंबाशीही प्रामाणिक राहात दर्जेदार काम करण्याचे मार्ग असू शकतात का? कुणीतरी सांगतं की हेच बरोबर, हेच योग्य, म्हणून आपण कुठल्याही प्रश्नाशिवाय तीच री ओढत राहाण्यानं आपण खरोखर आनंदी होतोय का? नसेल तर आपण आपला मार्ग काळजीपूर्वक नि विचारपूर्वक निवडायला हवा.

(अनुवाद: सोनाली नवांगुळ)

- डॉ. अरुण गांधी


वाचा 'वरदान रागाचे' या लेखमालेतील पहिले तीन भाग:

1. प्रास्ताविक- आजोबांकडे मिळालेले धडे
2. त्यांनी संताप आणि वीज यांची तुलना समोर ठेवली...
3.तोडगा काढणे हे ध्येय असेल तर तो मार्ग योग्य असतो..

Tags: अरुण गांधी महात्मा गांधी सोनाली नवांगुळ Book New Book Translation Gift of Anger Arun Gandhi Mahatma Gandhi Load More Tags

Add Comment