सगळ्यांसाठी सन्मान आणि समानता या गोष्टींसाठी लढायला हवं...

वरदान रागाचे- भाग 27

‘सेल्फ एम्प्लॉइड वीमेन्स असोसिएशन’ अर्थात 'सेवा' संस्थेतील महिला | फोटो सौजन्य: sewabharat.org

राजकारणात काहीही घडत असो किंवा त्यापलीकडच्या जगातही काहीही चाललेलं असो... आपण एकटेही नक्की थोडाबहुत प्रभाव निर्माण करू शकतो. मी भारतदौऱ्यावर येतो तेव्हा टोकाची गरिबी बघून हतबलता येते. तरीही समतेची मनात मूळ धरून राहिलेली भावना असंख्य माणसांच्या चिकाटीमुळे प्रत्यक्षात येते. गरजू नि गरीब माणसांना त्यांच्या स्थितीतून बाहेर काढण्याची इच्छा जोर धरते.

काही वर्षांपूर्वी भारतात इला भट यांना भेटलो. प्रचंड काम असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्या आज परिचित आहेत. असंघटित महिला कामगारांसाठी झटणारी आणि त्यांच्या जीवनाला दिशा देणारी सबळ कार्यकर्ती म्हणून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरचे पुरस्कार त्यांना लाभले आहेत. मी भेटलो तेव्हा मला त्यांची गोष्ट तपशीलवार कळली. फळं-भाज्या विकण्यासारख्या लहानलहान उद्योगधंद्यांना त्या लघुकर्ज पुरवठा करायच्या.

भारताच्या कानाकोपऱ्यातल्या नऊ दशलक्ष स्त्रियांना या योजनेचा लाभ मिळाला. त्या स्वतःच्या पायांवर उभ्या राहिल्या, त्यांना आर्थिक स्थैर्य मिळालं. या सगळ्या जणींनी एक दिवस भटबाईंना सांगितलं, ‘व्यापारी तत्त्वावर काम करणाऱ्या बँकांच्या पतपुरवठ्यावर अवलंबून राहण्यात काही अर्थ नाही... त्यामुळं त्यांना स्वतःची ‘को ऑपरेटिव्ह’ बँक काढायची इच्छा आहे.’

हा सगळा व्यवहार किती कठीण असतो ते भटबाईंनी त्यांच्या परीनं समजावण्याचा प्रयत्न केला. या बायकांपैकी बऱ्याच जणी अशिक्षित होत्या, स्वतःची सही करणं त्यांना जमायचं नाही. सगळा विचार करून त्यांनी आपला निर्णय सांगितला, ‘अवघड असेल तर शिकून घेऊ. आम्हाला शिकायचं आहे.’

इला भटांच्या घरी बैठकीच्या खोलीत ही सगळी चर्चा चाललेली होती. त्या बायकांचा निश्चय बघून तिथंच उत्स्फूर्त शिकवणीलाच सुरुवात झाली. त्या रात्री उशिरापर्यंत शिकवणी चालली.

दुसऱ्या दिवशी भटबाईंनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आणि संस्थेच्या उभारणीच्या कागदपत्रांवर प्रत्येक बाई स्वतः सही करेल हे काळजीपूर्वक पाहिलं. स्वतःच्या प्रयत्नांतून तयार झालेल्या या स्वरोजगार केंद्रासाठी सगळ्या झटायला लागल्या आणि कालांतरानं त्यांनी ‘सेवा को-ऑपरेटिव्ह बँक’ स्थापन केल्याची घोषणा केली.

सेवा म्हणजे ‘सेल्फ एम्प्लॉइड वीमेन्स असोसिएशन’. प्रत्येक स्त्रीनं स्वावलंबी व्हायला पाहिजे या उद्देशानं गरिबात गरीब बाईला या संस्थेनं तेव्हापासून हात दिला आहे. त्यातून कितीतरी स्त्रिया आत्मविश्वासानं उभ्या राहिल्या आहेत.

1974ला ‘सेवा’ बँकेची स्थापना झाली तेव्हा डॉलरपेक्षाही कमी रकमेचा का होईना... पण भाग खरेदी करून सुमारे चार हजार स्त्रिया भागधारक झाल्या होत्या. त्यानंतर मी पाहिलं तेव्हा सुमारे दहा हजार सक्रिय ठेवीदार या बँकेनं मिळवले... शिवाय बचतखाते, कर्ज अशा माध्यमांतून बँकेला भक्कम करता-करता या संस्थेनं आरोग्य आणि कायदा या क्षेत्रांतही आपली सेवा समाजासाठी देऊ केली.

शिकागोत राहणाऱ्या फ्रेटा परिवारातल्या इंदिरा आणि पुष्पिका या बहिणींची ही गोष्ट आहे. त्यांच्या उपक्रमाची आखणी वेगळ्या क्षेत्रात होती. कापडावरची कलाकुसर आणि विविध प्रकारची फॅशन डिझाईन करून त्या मुंबईत पाठवायच्या. मुंबईतल्या झोपडपट्टीतल्या स्त्रियांना या डिझाईनचं ब्लॉक प्रिंट आणि टाय-डाय करून कपडे कशा तऱ्हेनं शिवायचे याचं कौशल्य शिकवण्यात आलं होतं.

या सगळ्यांतून त्या सुंदर कपडे शिवायच्या. एक सुंदरसा कॅटलॉग करून हे नमुने बाजारात दाखवले जायचे. त्यांतून येणाऱ्या नफ्यापैकी ऐंशी टक्के नफा या स्त्रियांचा असायचा. या उपक्रमाची व्याप्ती हळूहळू वाढत गेली आणि अत्यंत भरीव यश त्यांना लाभलं. त्यातून लहान मुलांसाठीच्या आणि आरोग्यासाठीच्या योजना सुरू झाल्या.

जाचक दारिद्र्यातून वर येण्याकरता धडपडणाऱ्या स्त्रियांना स्वावलंबनानं उभं राहता यावं यासाठीही बऱ्याच गोष्टी फ्रेटा कुटुंबीयांच्या उपक्रमांतून घडल्या. इंदिरा आणि पुष्पिका यांच्या फ्रेटा परिवारासोबत कितीतरी वर्षं माझी ऊठबस आहे. त्यांचे आईवडीलही सामाजिक भान असणारे आहेत. जग खूप अवघड होत चाललंय मान्य आहे... पण तरी त्यातही काम करता येतं. शेवटी महत्त्वाचं काय याचा निर्णय घेता यायला हवा हे आपण आपल्या मुलांना सांगू शकतो. आजूबाजूला घडणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टींमधून प्रेरणा घेऊन त्यांनी वाढावं आणि त्यांचं फुलणं आपण पाहावं याहून अधिक काय हवं?

आपल्यापेक्षा वेगळं जगणाऱ्या, वेगळेपण असणाऱ्या माणसांविषयीचे पूर्वग्रह बाजूला सारून, त्यांच्यातले आणि आपल्यातले समान धागे शोधून आत्मीय संबंध प्रस्थापित करणं महत्त्वाचं असलं तरी खूप कठीण असतं... त्यामुळंच ‘इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल एज्युकेशन’सारख्या संस्थेचं काम माझ्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. त्यांच्या असंख्य योजनांपैकी शिष्यवृत्ती देऊन वेगवेगळ्या देशांतल्या विद्यार्थ्यांना एखाद्या वेगळ्या देशात पाठवून तिथं शिक्षणाची संधी देण्यासारखी योजना मला मोलाची वाटते.

फुलब्राईट फेलोशीप प्रचंड ॲडव्हान्स्ड कामांसाठी दिली जाते. महाविद्यालयीन स्तरावरच्या विद्यार्थ्यांनाही बाहेरच्या देशांमध्ये शिकल्यामुळे दृष्टीकोन व्यापक होतो याचा अनुभव मिळायला हवा यासाठीसुद्धा ही संस्था काम करते. ‘इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल एज्युकेशन’चे एक प्रमुख ॲलन गुडमॅन यांच्या मते अशा तऱ्हेच्या देवघेवीमागे दिसतो त्याहून मोठा आशय निहित आहे.

सिरिअन युद्धाच्या वेळी विस्थापित झालेल्या शेकडो विद्यार्थ्यांना या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशांमध्ये राहून पुढचं शिक्षण चालू ठेवण्यासाठी मदत झाली आहे. हे सांगताना ते म्हणाले होते, ‘आम्ही या मुलांना उचललं नसतं तर आयसिससारख्या दहशतवादी संघटनेनं उचललं असतं. झटकन निर्णय घेऊन कृती करणं आवश्यक असतं अनेकदा.’

‘इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल एज्युकेशन’मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या देशात जाऊन शिकायची संधी डॉ. गुडमॅन यांनी निर्माण केली आहे. उच्चमाध्यमिक स्तरावर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही संस्थेमार्फंत वेगळ्या देशात काही काळ शिकण्याचा अनुभव मिळावा अशी व्यवस्था आहे. एरवी उच्चमाध्यमिक स्तरावरची मुलं पालकांसोबत राहून स्थानिक शाळेत शिकतात. अशा वेळी बाहेरच्या देशात शिकण्याची संधी मिळणं हा आयुष्य पालटणारा अनुभव ठरतो. असा अनुभव शालेय काळात मिळालेल्या लोकांनी नंतर याबद्दल अतिशय अभिमानानं सांगितल्याचं दिसतं. ‘वाढत्या वयात बाहेरच्या देशांमध्ये काही काळ राहता येण्यानं आमचं आयुष्याच बदललं.’ अशा भावना जवळपास प्रत्येकानं व्यक्त केल्या.

या योजनेमुळं वेगळ्या देशात, वेगळ्या चालीरिती नि परंपरा आणि जगण्याचा निराळा दृष्टीकोन घेऊन जगणाऱ्या स्थानिक कुटुंबासोबत विद्यार्थ्यांना राहायला मिळायचं. रोज रात्री त्यांच्या पद्धतीनं जेवणं, सुट्‌ट्या घालवणं, सणसमारंभांत सहभागी होणं यांतून जगाचा एक वेगळाच कंगोरा मुलांसमोर खुला होतो. पुढे एखादा राजकारणी निर्वासितांच्या नि बाहेरच्या देशांमधल्या लोकांच्या येण्याबद्दलचे धोके सांगत गळा काढायला लागतो तेव्हा मोठी झालेली ही मुलं या प्रश्नाकडं वेगळ्या सहानुभूतीनं बघू शकतात. त्यांचा दृष्टीकोन थोडा अधिक व्यापक आणि वेगळा ठरतो. तो त्यांच्या खासगी अनुभवातून आकाराला आलेला असतो.

ज्यांना राजकारणी माणसं ‘बाहेरची’ म्हणून संबोधतात त्यांच्या घरच्या प्रसन्न आठवणी प्रौढ झालेल्या या मुलांच्या मनात तरळत राहतात. आपलं पालकत्व स्वीकारलेल्या घरातला रुचकर पदार्थ करून रात्रीचं जेवायला वाढणारा बाप आठवतो, चांदण्या दाखवत आपल्यासोबत फिरणारी त्या घरची बहीण आठवते. या आठवणींमुळं ‘बाहेरचा’ या शब्दाची संकल्पना बदललेली असते.

9/11ची घटना घडून काही वर्षं उलटली तरी माणसांच्या मनातली दहशत जाता जात नव्हती याचा अनुभव मॅनहॅटनमधल्या एक बाई बोलल्यावर मला आला. या घटनेचा हादरा तिथल्या असंख्य माणसांना अजूनही जाणवतो. हे शहर मोठं, वाढलेलं असलं तरी गल्ल्यांमधून छोट्या-छोट्या गाड्या घेऊन काहीबाही विकणारे फिरते परवानाधारक दुकानदार इथे दिसायचे. शहराचा कितीही आधुनिक भाग असो... तिथं हे चित्र सररास नजरेस यायचं... त्यामुळं या महानगराला छोट्या गावासारखा एक स्वच्छंदीपणा जाणवायचा.

मॅनहॅटनमधल्या या बाई शहराच्या मध्यवस्तीतल्या एका बहुमजली चकचकीत इमारतीत काम करायच्या. सकाळी कामावर जाताना रस्त्याकडेच्या फळविक्रेत्याकडून रोज एक केळ न चुकता विकत घेण्याचा त्यांचा शिरस्ता होता. काही महिने सलग कुणाला भेटत राहिलो की ओळखपाळख वाढते, एकमेकांविषयी काहीतरी कळायला लागतं. तसं या बाईंना या फळवाल्याचं खूप कौतुक वाटायला लागलं. फळवाल्याचा दिवस पहाट होण्याआधीच कसा सुरू होतो; पहाटेपूर्वी मंडईत पोहोचून, ताजी फळं घेऊन तो नेहमीच्या ठिकाणी दुकान कसं थाटतो आणि सगळं आटपून घरी परतायला त्याला किती उशीर होतो; हा दिनक्रम बाईंना ठाऊक झाला होता.

दिवस कडाक्याच्या थंडीचे असोत की झळांनी हैराण करणारे... फळवाल्याच्या या नेमात खंड पडत नाही याचं कौतुक त्यांना वाटायला लागलं. इतकं दमणं, एवढे कष्ट कुणासाठी असं विचारल्यावर त्यानं उत्तर दिलं होतं, ‘दोन लहान मुलं आहेत मला. त्यांना आयुष्यात काहीतरी चांगलं करता यावं म्हणून मी कष्ट उपसायलाच हवेत. मी नाही तर कोण करणार त्यांच्यासाठी?’ असं काही ना काही बोलणं व्हायचं.

रोजच्या या उत्स्फूर्त आणि प्रसन्न गप्पांनी दिवसाची सुरुवात होण्याची सवय बाईंना नकळत लागून गेली. एका सकाळी अशाच भेटीत त्यानं निरोपवजा बोलायला सुरुवात केली. म्हणाला, ‘इथं जितकं मिळवायचं होतं, मिळवलं. आता घराकडं जातो. तिथं गरज आहे. बघू केव्हा परतणं होतं ते.’

‘पण कुठं जाणार तुम्ही?’ तिनं विचारलं.

‘आमच्या देशात. अफगाणिस्तानात...’

त्याचं उत्तर ऐकता क्षणी तिनं एक पाऊल मागं घेत त्याच्याकडं दचकून पाहिलं. त्याचे शब्दोच्चार जरा अवघडलेले वाटायचे, रंगही काळ्याच्या आसपास जाणारा होता... मात्र त्याचं नम्र, साधं वागणं, दयाळू स्वभाव यांमुळं तो आपला शत्रू असू शकतो ही शंका बाईंच्या मनात कधीच उमटली नव्हती. आता त्याच्या उत्तरानं एकाएकी या सत्याची जाणीव त्यांना झाली.

आपल्या बायकामुलांना भेटण्याची ओढ त्याच्या डोळ्यांतून दिसत होती. हसण्यातून जाणवत होती. तिला ताबडतोब जाणवलं की, तोही आपल्यासारखाच तर माणूस आहे, सुखदुःखं असणारा... शिवाय त्यानंही अशा अस्वस्थ देशात राहण्याचा आणि तशाच देशात परतण्याचा धोका पत्करलेला आहे. त्यानं कुठं जन्म घ्यावा हे त्याच्या हाती नव्हतं, कुणाच्याच नसतं. सगळी जाणीव झाल्यावर तिनं उत्स्फूर्तपणे त्याला मिठी मारली आणि म्हणाली, ‘जा, जा... आनंदानं घरी जा... आणि घरच्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा सांगा. सगळे खूश राहू देत, सगळ्यांच्या तब्येती चांगल्या राहू देत.’

बापूजींचं म्हणणं आठवतं अशा वेळी. ते म्हणायचे, ‘ढीगभर शिकवणी घेऊन उपयोग होत नाही... पण स्वतः घेतलेल्या एका अनुभवानं मात्र आपण बदलतो.’ एकमेकांना समजून घेण्याच्या आणि कट्टरता संपवण्याच्या बऱ्याच गप्पा आपण मारतो... पण जोवर प्रत्यक्षात त्या दिशेनं कृती करत नाही तोवर अर्थ नाही. नुसतं बोलणं म्हणजे उंटावरून शेळ्या हाकणंच!

आपल्यापैकी प्रत्येकाला अधिक चांगलं जगायची इच्छा असते, आपल्या कुटुंबीयांना दर्जेदार आयुष्य देता यावं अशी इच्छा असते आणि जगातल्या कुठल्याही माणसाच्या खांद्याला खांदा लावून चालता यावं असंही वाटत असतं. तुम्ही केलेल्या अशा एखाद्या कृतीनं पाहणारे प्रभावित होतील... त्यामुळं कृती महत्त्वाची. बापूजी तेच तर म्हणायचे, ‘व्यर्थ बडबडीपेक्षा तुमची एखादी कृती बोलते. ती दिसणं हाच त्या विचाराचा प्रचार!’

बापूजी जेव्हाकेव्हा अहिंसेविषयी बोलायचे तेव्हा शस्त्रास्त्रं खाली ठेवण्याच्या कृतीपलीकडे नेणारं बरंच काही त्यांना सांगायचं असायचं. देशासमोरचे प्रश्न नीट समजून घेऊन ते सोडवण्यानं सगळ्यांना प्रतिष्ठा कशी लाभेल इथवर त्यांचा विचार जायचा. एक छोटी निरुपयोगी वाटणारी पेन्सिल अंधारात शोधायला मला पाठवण्याच्या घटनेतून अहिंसेचा वेगळा अर्थ माझ्या मनात मुरत गेला होता. अहिंसेचा विस्तार आणि तिची खोली कळायला लागली होती.

कुठलीही गोष्ट वाया घालवण्याचे नि भौतिक सुखांच्या पाठलागाचे नकारात्मक परिणाम समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. सगळ्यांना प्रतिष्ठेनं वागवण्याचा अर्थ किती व्यापक आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. अहिंसेच्या तत्त्वज्ञानाचा अर्थ शारीरिक हिंसेपर्यंत मर्यादित राखून आपण त्याची अक्षरशः थट्टा करत असतो, व्यापकतेचा संकोच करत असतो. पश्चिमी बँकांविरोधात झालेल्या ‘इंटिफादा’ आंदोलनात सहभागी झालो असलो तरी आम्ही अहिंसक आहोत असं म्हणणं पॅलेस्टाईननं मांडलं आहे. ‘आम्ही इस्रायलींवर दगडफेक केली... पण बंदुका मुळीच वापरल्या नाहीत.’ असं पुढं ते म्हणतात.

कॅलिफोर्नियातल्या बर्कलीमधल्या ‘रकस सोसायटी’नं एका दंग्याच्या निमित्तानं विधान केलं होतं, ‘आम्ही लोकांना थेट इजा केली नाही.’ पण खरी गोष्ट ही की, असं म्हणणाऱ्या लोकांनी छोट्या दुकानांसमोर मांडलेल्या सामानाचं, वस्तूंचं बिनदिक्कत नुकसान केलं होतं. वाईट याचं वाटतं की, अशा गोष्टींना जितकी झटकन प्रसिद्धी लाभते तितक्या वेगात सहानुभूती आणि सामंजस्य पसरत नाही. बेसबॉलची बॅट घेऊन धाकदपटशा दाखवत माणसात किंवा समाजात परिवर्तन करणं शक्य नसतं.

लहानमोठ्या गटांतल्या चकमकी, मोठी महायुद्धं असा हिंसेचा एक फार मोठा इतिहास मानवी प्रजातीला आहे. हिंसेच्या या थरारात कोट्यवधी माणसांची आयुष्यं संपली. धार्मिक कट्टरता, द्वेष आणि मानवी जगण्याची अप्रतिष्ठा यांतूनही कोट्यवधी माणसांच्या आयुष्याला चटके बसले. इतिहास मानवी दृष्टीनं पाहिला तर दिसतं की, माणसांना शांततामय नि चांगलं आयुष्य नाकारलं जाण्यातून संघर्ष उभे राहिले आहेत.

दक्षिण अफ्रिकेतल्या वर्णद्वेषाच्या इतिहासाबद्दल काय बोलणार? हे लढे किती आक्रमक नि विनाशकारी होत गेले ते आपण पाहिलेलं आहे. तरीही आपण आपल्या पातळीवरची कारणं नि सबबी देत राहतो आणि रोजच्या जगण्याच्या पातळीवर कट्टरता वाढत जाताना ढिम्म बघत राहतो.

आपल्या अमुक-अमुक कृतीचे परिणाम प्रचंड घातक होऊ शकतात हे दिसत असूनही लोक स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी अनुत्सुक आहेत हे दिसतं तेव्हा अलीकडे मी खोल श्वास घेतो नि बापूजींचं सौम्य हसू डोळ्यांसमोर आणतो. बदल असे पटकन घडत नसतात हे त्यांना ठाऊक होतं. स्वातंत्र्य, समता आणि शांतता यांची चळवळ दीर्घकाळ चालणारी, दमवणारी असते. आपल्या आदर्शाकडे वाटचाल करताना बापूजींना किती काय पाहावं लागलं... ते तुरुंगात असताना त्यांच्या बायकोचा आणि जवळच्या मित्राचा मृत्यू झाला. आदर्शाच्या ध्यासाची किंमत त्यांनी अशीही दिली....

तरीही ते काय म्हणाले असते मला ठाऊक आहे... ते म्हणाले असते, ‘ती चळवळ, तो लढा योग्यच होता आणि त्याचं फळ मिळालं, तुम्हालाही तुमच्या श्रमाचं फळ मिळेल.’

परिवर्तनाचं ध्येय मनात धरून निवडलेला अहिंसक मार्ग खूप वेळ घेतो, संयमाची कठोर परीक्षा बघतो.

बापूजींनी कायमसाठी आपल्याला सांगून ठेवलंय... सगळ्यांसाठी सन्मान, सगळ्यांसाठी समानता या गोष्टींसाठी लढायला हवं. माणसाच्या जीवनाची प्रतिष्ठा आहे त्यात. फक्त एकच लक्षात ठेवायचं, चळवळ ही अहिंसकच हवी...!

(अनुवाद: सोनाली नवांगुळ)

- डॉ. अरुण गांधी

Tags: पुस्तक अरुण गांधी महात्मा गांधी सोनाली नवांगुळ अहिंसा प्रेम सत्याग्रह परिवर्तन आदर सामंजस्य वरदान रागाचे Book New Book Translation Gift of Anger Arun Gandhi Mahatma Gandhi Non- Violance Love Satyaghaha Change Respect Harmony Load More Tags

Add Comment