समारोप : सगळ्यात मोठा आनंद

वरदान रागाचे - भाग 28

महात्मा गांधी यांचे चित्र हाती घेतलेले अरुण गांधी | फोटो सौजन्य: Jeff Marini

महात्मा गांधी यांचे सर्वांत ज्येष्ठ नातू (मणिलाल यांचे चिरंजीव आणि तुषार यांचे वडील) अरुण गांधी वयाच्या 88 व्या वर्षीही समाजकार्यात सक्रिय आहेत. त्यांचे बालपण व तारुण्य दक्षिण आफ्रिकेत तर नंतरचे आयुष्य भारतातील इंग्रजी पत्रकारितेत गेले. निवृत्तीनंतर ते अमेरिकेत वास्तव्य करीत आहेत. ते वय वर्षे 11 ते 13 या काळात आजोबांच्या सहवासात राहिले, त्याचा सखोल प्रभाव त्यांच्या विचारांवर व कार्यावर राहिला आहे. ते स्वतःला शांती पेरणारा शेतकरी (Peace Farmer) असे संबोधतात. त्यांचे 'Legacy of Love' हे पुस्तक मराठीत 'वारसा प्रेमाचा' या नावाने गेल्या वर्षी साधना प्रकाशनाकडून आले आहे. त्याचाच उत्तरार्ध म्हणावे असे छोटे पुस्तक म्हणजे 'Gift of Anger', त्याचा मराठी अनुवाद  'वरदान रागाचे' या नावाने लेखमालेच्या स्वरुपात कर्तव्य वरून  सलग 14 आठवडे ( 3 जुलै 2020 पासून दर शुक्रवारी व शनिवारी) प्रसिद्ध होत राहिला. आज 2 ऑक्टोबर 2020 रोजी गांधी जयंतीच्या दिवशी या 28 भागांच्या लेखमालेचा समारोप होत आहे. सोबतच 'Gift of Anger'चा 'वरदान रागाचे' हा मराठी अनुवाद आज साधना प्रकाशनाकडून पुस्तक रूपाने प्रकाशित होत आहे. 
  
- संपादक

2015 सालातला तो दिवस. ब्राँझमध्ये घडवलेल्या, माझ्या आजोबांच्या, नऊफुटी पुतळ्याचं अनावरण त्या दिवशी लंडनच्या पार्लमेंट स्क्वेअरमध्ये झालं. त्या प्रसिद्ध चौकात ब्रिटिश संसदेचं प्रतिनिधित्व करणारी महत्त्वाची नेतेमंडळी तर होतीच... शिवाय जागतिक स्तरावर काम करणारी माणसंही होती. सगळ्या महत्त्वाच्या माणसांच्या उपस्थितीत समारंभ होत असताना माझ्या मनात मात्र आजोबांच्या सहवासातले सुंदर क्षण उसळी मारून वर येत होते.

हा पुतळा उभारताना बापूजी असते तर मस्करी करत म्हणाले असते, ‘मी केवढा आणि हा पुतळा केवढा! आणि होऽ भारताला स्वातंत्र्य मिळण्यासंदर्भात ठाम विरोधात असणाऱ्या, आपला तिरस्कार करणाऱ्या, निंदा करणाऱ्या सर विन्स्टन चर्चिल यांच्या पुतळ्याजवळ स्वतःचा पुतळा असणं या गोष्टीचाही त्यांनी मजेत समाचार घेतला असता. विरोधाभासातून घडलेल्या या विनोदाबद्दल गालात हसत राहिले असते. पार्लमेंट स्क्वेअरमध्ये बहुतांश पुतळे श्वेतवर्णीय नेत्यांचे आहेत. त्याच परिसरात बापूजींचा आणि नेल्सन मंडेलांचा पुतळा आहे. चर्चिल यांच्या साम्राज्यवादी भूमिकेपासून किती दूरवरचा प्रवास ब्रिटननं केला याचं प्रतीक म्हणून स्वतःच्या आणि मंडेलांच्या पुतळ्याचा आजोबांना अभिमान वाटला असता.

या पुतळ्याचं अनावरण करताना पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी बापूजींचं वर्णन ‘राजकीय इतिहासातली सर्वांत उत्तुंग व्यक्ती’ या शब्दांत केलं होतं. खरंच... कल्पना, गुण आणि नेतृत्व यांबाबतीत बापूजी हे सगळ्यांत उत्तुंग व्यक्ती होते यात काही शंकाच नाही... मात्र अधिक महत्त्वाचं हे की, मनाच्या पातळीवर आपण सगळे समान आहोत अशी त्यांची श्रद्धा होती... त्यामुळंच कदाचित त्यांचा पुतळा इतर पुतळ्यांपेक्षा जमिनीच्या थोडा समतल राखलेला आहे... मी समाजातला एक माणूस आहे, कुणी विशेष नव्हे असं ते आग्रहानं सांगायचे. तेच इथं जाणवतं.

आदर्श माणूस किंवा महात्मा या रूपात त्यांनी स्वतःला पाहिलंच नाही... त्यामुळं या रूपात बांधूनही घेतलं नाही. त्यांना स्वतःचे दोष ठाऊक होते, ते समजून घेऊन सुधारण्याचा प्रयत्न सातत्यानं चालायचा. राजकीय किंवा धार्मिक क्षेत्रात समाजाच्या गळ्यातला ताईत ठरलेली माणसं ही अखेर सर्वसामान्य भावभावना असणारी माणसंच आहेत हे त्यांनी ओळखलं होतं. कुणीही लोकोत्तर म्हणून जन्माला येत नाही. सगळेच स्वतःला प्रयत्नपूर्वक वाढवत, विस्तारत नेत असतात.

...त्यामुळंच जगातल्या काही भागांत बापूजींच्या प्रतिमेला तडे जातील अशी वक्तव्यं आजही केली जातात. त्यांच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ लावला जातो तेव्हा मला फार दुःख होतं. घाना विद्यापीठात काही विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची परिणती तिथला नुकताच उभारलेला आजोबांचा पुतळा उतरवण्यात झाली. कधीतरी पुतळा उभारून आपला गौरव व्हावा म्हणून ना बापूजी जन्माला आले... ना मृत्यू पावले... त्यामुळं त्यांच्यावर अशा गोष्टींचा परिणाम मुळीच झाला नसता... मात्र आपण वंशवादी, फुटीरतावादी आहोत असा समज ज्या विद्यार्थ्यांचा झाला आहे त्यांच्याशी बोललं पाहिजे असं वाटून ते त्या मुलांजवळ जाऊन बसले असते.

कृष्णवर्णीयांना संबोधताना आता निषिद्ध आणि मानहानिकारक मानला जाणारा ‘काफिर’ हा शब्द दक्षिण अफ्रिकेत असताना तरुण वयात आपण वापरला होता हा स्वतःच्या चुकीचा पुरावा त्यांनी स्वतःच दिला असता. ते म्हणाले असते, ‘मुलांनोऽ तुमचं माझ्याबाबतीतलं विधान बरोबर आहे. त्या वेळी मी हा चुकीचा शब्द वापरला होता... पण मला चांगला शब्द ठाऊक नसल्यामुळे जो माहीत होता, वापरात होता तोच मी वापरला. हा शब्द लांछनास्पद आहे हे ज्या वेळी माझ्या लक्षात आलं त्या वेळेपासून त्याचा वापर करणं मी ताबडतोब थांबवलं.’

बापूजी मुलांशी गप्पा मारत बसले असते तर मुलांना म्हणाले असते, ‘आपण कुणीच संपूर्ण नसतो, बिनचूक नसतो. रोज आणखी चांगला माणूस व्हायचा प्रयत्न करणं मात्र आपल्या हाती असतं. अनेक विद्यार्थ्यांनी दावा केला की, दक्षिण अफ्रिकेत जाऊन बापूजींनी तिथं असणाऱ्या भारतीयांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात तीव्र लढा दिला. तुलनेत तिथल्या स्थानिक कृष्णवर्णीयांच्या दुःखांबद्दल मात्र हालचाल केली नाही... कृष्णवर्णीयांसाठी काम करणारे बरेच मोठे नेते तिथं आधीच असल्यामुळं तिकडे बापूजी शिरले नसावेत बहुधा... विद्यार्थ्यांच्या या शंकांना उत्तर देताना बापूजी म्हणाले असते, ‘माझी देशभक्ती ही विशिष्ट क्षेत्रापुरती मर्यादित नाही. कुणाचाही आणि कशाचाही अपवाद वगळून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचा दीर्घकालीन आणि व्यापक विचार हा माझ्या देशभक्तीचा गाभा आहे.’ 

गांधीजींचा सर्व समाजाला एक मानणारा विचार दक्षिण अफ्रिकेतल्या सर्व ज्येष्ठश्रेष्ठ नेत्यांना ठाऊक होता. त्यांची बांधिलकी ठाऊक होती. डेस्मंड टुटू आणि नेल्सन मंडेला यांच्यासारख्या नेत्यांनी आपल्या स्वातंत्र्यलढ्यात प्रेरणादायक आणि अनुकरणीय व्यक्ती म्हणून गांधीजींना फार मानाचं स्थान दिलं होतं. त्यांची नीती आपलीशी केली होती. अफ्रिकन अमेरिकी समाजातल्या मार्टिन ल्यूथर किंगसारखी महनीय माणसंही त्यांच्या अहिंसाविचाराची पाईक झाली होती. 

बापूजींचा पुतळा हा वादग्रस्त विषय झाल्यामुळं सुरक्षिततेच्या दृष्टीनं सरकारनं घाना विद्यापीठातल्या पुतळ्याची जागा बदलण्याचा निर्णय घेतला... मात्र तरीही हा पुतळा भारत आणि घाना यांच्यातल्या मैत्रीचं प्रतीक आहे अशी भावना या पुतळ्याबद्दल घाना सरकारची होती. ‘सरत्या शतकातलं सर्वांत प्रभावशाली आणि महत्त्वाचं व्यक्तिमत्त्व’ म्हणून आपल्या जनतेनं या पुतळ्याकडं पाहावं, स्फूर्ती घ्यावी अशी घाना सरकारची अपेक्षा होती.

इतिहासातल्या अन्य महत्त्वाच्या माणसांचं जगणं, त्यांची कृती वेळोवेळी तपासली गेली आहे... त्यामुळं एके काळी आपल्याला लाडक्या असणाऱ्या ‘हिरो’ मधले अवगुण आणि दोष सापडणं ही खचितच चकित करणारी गोष्ट नव्हे. माणसांना आदर्शाच्या चौकटीत बसवणं, त्यांना अवतारी मानणं हा आपला दोष आहे. आपण माणसं आपापल्या काळाचं, त्या वेळच्या राजकीय घडामोडींचं आणि त्या-त्या वेळच्या अपेक्षांचं अपत्य असतो. बापूजींसारखी बुद्धिमान आणि शहाणी माणसं स्वतःच्या प्रत्येक कृतीला भूत, वर्तमान आणि भविष्य यांच्या चाळणीतून दीर्घ पल्ल्यात, व्यापक दृष्टीकोनातून पाहू शकतात हे त्यांचं विशेष!

इतिहासाची पानं चाळून पाहिली की आपण अगदीच नगण्य आहोत असं वाटणं साहजिक आहे. या सगळ्या कहाण्यांमधून कुठला प्रभाव आपल्यावर टिकला आहे याचा बारकाईनं विचार करून पाहिला तर आश्चर्य वाटतं. मी या पुस्तकात ज्या माणसांच्या गोष्टी सांगितल्या त्यांचा लहान अगर मोठा, काहीतरी महत्त्वाचा परिणाम समाजाच्या आयुष्यावर झाला आहे. मला या गोष्टी यासाठी सांगायच्या होत्या की, आपण सगळेच आपल्या भोवतालच्या लोकांच्या आयुष्यामध्ये बदल करू शकतो, फक्त प्रयत्न नेटानं करायला हवेत हे मला पटलं होतं. ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक वाटत होतं.

‘जनमानसावर पकड आणि प्रभाव असणारे महात्मा गांधी म्हणून भविष्यात हा मुलगा समाजाच्या आदरास पात्र ठरेल’ असं भविष्य त्यांना बघून कुणीही त्यांच्या लहानपणात वर्तवलं नसतं... कारण खरोखरच ते इतके लहानखुरे, हडकुळे दिसायचे की, त्यांच्यामध्ये एक कणखर, असामान्य नेता दडलेला आहे असं कुणाला वाटणं शक्य नव्हतं. लंडनच्या पार्लमेंट स्क्वेअरमधला त्यांचा पुतळाही त्यांच्या व्यक्तिमत्त्वासारखा विनम्र, सात्त्विक दिसतो आणि वेशभूषाही तशीच साधी, धोतर-उपरणं ही. खऱ्या आयुष्यात असो किंवा पुतळ्यासाठीच्या धातूत अगर दगडात असो, बापूजी जणू आपल्याला आठवण करून देतात, ‘तुमच्या ध्येयाबाबत तुमची अढळ श्रद्धा आणि ठरलेलं पार पाडण्याचा ठाम निश्चय या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही कसे दिसता ते त्यापुढं गौण ठरतं.’

मी आश्रमात असताना माझ्या आणि आजोबांच्या गप्पा जेव्हा-जेव्हा व्हायच्या तेव्हा त्यांच्या जुन्या दिवसांबद्दल ते सांगायचे. त्यांच्यामधले दोष, दुर्बळपणा लपवायचे नाहीत. उमेदीच्या वयात कारण नसताना ज्या जोखमी पत्करल्या नि त्यांचे जे परिणाम भोगले त्याबद्दलच्या गोष्टी मोकळेपणानं ते बोलायचे. माणसामाणसांमधले भेद नाहीसे व्हायला हवेत आणि आपण आतून एकमेकांशी जोडलेले असतो हे त्यांना कळायला हवं हे उद्दिष्ट साधण्यासाठी त्यांनी जीवनभर प्रयत्न केले. बोअर युद्धाच्या वेळी त्यांनी उभारलेल्या आणि सक्षमपणे चालवलेल्या ‘इंडिअन ॲम्ब्युलन्स पथका’मध्ये काम करताना जिवावर बेतण्याची भीती होती. त्या धोकादायक वातावरणात भयंकर जखमी झालेल्या सैनिकांना उपचार केंद्रात पोहोचवण्याचं काम त्यांच्या पथकानं चोख केलंच... शिवाय पथकाच्या नेतृत्वाची जबाबदारी म्हणून ब्रिटिशांच्या अमानुष हल्ल्याचा बळी ठरलेल्या झुलूंवरही उपचारकेंद्रात शुश्रूषा होईल हे त्यांनी पाहिलं. आजोबा आणि त्यांचे भारतीय स्वयंसेवक नसते तर झुलूंच्या मृत्यूचा आकडा तेव्हा होता त्याहून प्रचंड मोठा असला असता.

प्रत्येक धर्माचे पवित्र ग्रंथ करुणेचं समर्थन करतात. एकमेकांवर प्रेम करावं, एकमेकांचा आदर करावा असं सांगतात. मानवी व्यवहारात सुसंवाद राखला जावा या दृष्टीनं या मूलभूत संकल्पना महत्त्वाच्या आहेत हे धर्म न मानणारी माणसंसुद्धा मान्य करतात. तरीही प्रसंगी आपणा सर्वांनाच या तत्त्वांचा विसर पडतो आणि सोयीस्कर वाट निवडली जाते. समग्र मानवतेचा विचार करून जे आहे ते एकमेकांत वाटून घेण्यातून आणि एकमेकांच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करण्यातून आपलं मोठेपण ठरतं हे विसरता कामा नये.

सगळ्यांनाच आयुष्यात आनंद हवा असतो, बरेचदा भौतिक गोष्टींतून तो चांगल्या प्रकारे मिळेल असं आपल्याला वाटतं आणि तो आणखी हवा, आणखी हवा असं म्हणताना किती लोकांच्या वाटचं सुख आपण एकटेच बळकावून बसतो ते कळेनासं होतं. खरा आनंद इतका सोपा नाही, तो अतिशय सखोल जागेतून उगम पावतो. सगळ्या माणसांच्या शांततेसाठी आणि न्यायासाठी आपण झगडतो तेव्हा आनंद सापडतो. आपल्या सगळ्यांच्या डोळ्यांत स्वप्नं असणं आणि ती पुरी करायची आस असणं यांतच आजोबांची तृप्ती होती, त्यातच त्यांना प्रगाढ शांतता लाभायची. प्रत्येक संघर्ष आणि लढाई त्यांना जिंकता आली नाही, त्यांच्या कल्पनेत होतं तसं जग त्यांना प्रतिमेबरहुकूम साकारता आलं नाही... पण स्वतःला अधिक चांगलं घडवता यावं आणि त्यातून जगामध्ये अधिक चांगले बदल घडावेत यासाठी ते दररोज झटत राहिले. ‘संघर्षात आनंद असतो, प्रयत्नांत असतो आणि त्यातून होणाऱ्या वेदनांमध्ये, पीडेमध्येही तो असतो...’ ते सांगायचे आणि शेवटी म्हणायचे, ‘विजय हा शेवटी असतो. त्यातच सगळा आनंद सामावलेला असतो असं नसतं...’

बापूजींनी शांततेसाठी आणि न्यायासाठी उभारलेल्या चळवळीचे साथीदार होऊन आपण अहिंसेची शक्ती वाढवण्यासाठी ठामपणानं उभं राहायला हवं. आजोबांनी सांगितलेल्या वाटेवरून आपण चाललो तर पृथ्वीवरचा एक घटक म्हणून आपल्या हक्काचा आनंद आपल्याला नक्की मिळू शकतो.

(अनुवाद: सोनाली नवांगुळ)

- डॉ. अरुण गांधी

'वरदान रागाचे' या लेखमालेत प्रसिद्ध झालेले इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा... 

ऑडिओ : महात्मा गांधी यांचे नातू डॉ अरुण गांधी यांच्या ' द गिफ्ट ऑफ अँगर' या पुस्तकाचा मराठी अनुवाद 'वरदान रागाचे' या नावाने, साधना प्रकाशनाकडून 02 ऑक्टोबर 2020 रोजी प्रकाशित होत आहे. त्या निमित्ताने, या पुस्तकाच्या अनुवादक सोनाली नवांगुळ यांनी कोल्हापूर आकाशवाणीवर व्यक्त केलेले मनोगत (निवेदक : नीना मेस्त्री). 

Tags: पुस्तक अरुण गांधी महात्मा गांधी सोनाली नवांगुळ अहिंसा प्रेम सत्याग्रह परिवर्तन आदर सामंजस्य वरदान रागाचे Book New Book Translation Gift of Anger Arun Gandhi Mahatma Gandhi Non- Violance Love Satyaghaha Change Respect Harmony Load More Tags

Comments:

थोरात पांडुरंग आत्माराम

ही अनुवादित लेखमाला संपून गेली याची हुरहूर लागून राहिली आहे, तसे दोन आक्टोबर रोजी संपणार हे स्पष्ट करण्यात आले होते तरीही... गांधी परिवारातील एकजण या आठवणी सांगताहेत हेच विशेष होते. त्या परिवाराविषयी जास्त माहिती, यापुर्वी निदान मला तरी माहित नव्हती. अनुवादक श्रीमती सोनाली नवांगुळ यांना धन्यवाद. गेले दीड वर्षाहून अधिक काळ महात्मा गांधी विचार वेगवेगळ्या लेखमालेद्वारे वाचकांना साधना /कर्तव्य मधून सलगपणे उपलब्ध होत आहे याबद्दल द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच.

Add Comment