महात्मा गांधी यांचे सर्वांत ज्येष्ठ नातू (मणिलाल यांचे चिरंजीव आणि तुषार यांचे वडील) अरुण गांधी वयाच्या 88व्या वर्षीही समाजकार्यात सक्रिय आहेत. त्यांचे बालपण आणि तारुण्य दक्षिण अफ्रिकेत तर नंतरचे आयुष्य भारतातल्या इंग्लीश पत्रकारितेत गेले. निवृत्तीनंतर ते अमेरिकेत वास्तव्य करत आहेत. वय वर्षे 11 ते 13 या काळात ते आजोबांच्या सहवासात राहिले, त्याचा सखोल प्रभाव त्यांच्या विचारांवर आणि कार्यावर राहिला आहे. ते स्वतःला शांती पेरणारा शेतकरी (Peace Farmer) असे संबोधतात. त्यांचे 'Legacy of Love' (‘लिगसी ऑफ लव्ह’) हे पुस्तक मराठीत 'वारसा प्रेमाचा' या नावाने गेल्या वर्षी साधना प्रकाशनाकडून आले आहे. त्याचाच उत्तरार्ध म्हणावे असे छोटे पुस्तक म्हणजे 'Gift of Anger' (‘गिफ्ट ऑफ अँगर’)... त्याचा मराठी अनुवाद ‘कर्तव्य’वरून प्रत्येक शुक्रवारी आणि शनिवारी क्रमशः प्रसिद्ध करत आहोत. लेखमालेचा समारोप 2 ऑक्टोबरला होईल. या लेखमालेतला हा 15 वा लेख.
- संपादक
मी सोळा वर्षांचा असताना माझ्या वडलांबाबतीत अहिंसात्मक पालकत्वाचा अनुभव घेतलेला आहे. माझ्या वडलांना शहरातल्या एका परिषदेला उपस्थित राहायचं होतं... तर आमच्या कारनं त्यांना तिथं सोडायचं काम त्यांनी माझ्यावर सोपवलं. त्यांची परिषद आटोपेपर्यंत मी माझी काही कामं करावीत नि नंतर वेळेत त्यांना न्यायला जावं असं ठरलं. आम्ही दक्षिण आफ्रिकेतल्या ग्रामीण भागात राहत होतो... त्यामुळं शहरात जायचा मोका सहसा मिळायचा नाही. मला वडलांच्या निमित्तानं ही संधी मिळाल्याचा खूप आनंद झाला... त्यामुळे इतके दिवस मनात साठवून ठेवलेल्या, शहराबद्दल ऐकलेल्या बऱ्याच गोष्टी स्वतः पाहायच्या होत्या. हातातली कामं आटोपेपर्यंत त्या वेळचा बहुचर्चित अमेरिकन सिनेमा बघून टाकावा हा मोह मी टाळू शकलो नाही. एवीतेवी आईवडलांनी मला मुद्दामहून तशी परवानगी कधीच दिली नसती. मी पटकन सिनेमागृहाकडे धाव घेतली.
वडलांना मी सकाळी परिषदेच्या ठिकाणी वेळेवर पोहोचवलं होतं. तिथूनच संध्याकाळी बरोबर पाच वाजता मी त्यांना न्यायला जाणं अपेक्षित होतं. हातात जी कामं होती त्यांपैकी एक होतं आईनं दिलेल्या यादीनुसार वाणसामानाची खरेदी... आणि होऽ वडलांनी सोपवलेल्या बाकीच्या किरकोळ कामांमध्ये एक महत्त्वाचं काम म्हणजे कारचं सर्व्हिसिंग आणि ऑईल बदलणं. परिषदेच्या ठिकाणी सोडल्यावर ते म्हणालेही होते, ‘अख्खा दिवस आहे अरुण तुझ्याकडे, त्यामुळं ही कामं काही जास्त नव्हेत.’
मी अगदी घड्याळाच्या काट्यांवर उभा असल्याप्रमाणे बाकी कामं झटझट आटोपली आणि गाडी गॅरेजमध्ये पोहोचवली. दोनची वेळ मला गाठायची होती. आपण नियोजनानुसार सगळं कसं उत्तम पार पाडलं या आनंदात मी थिएटरमधल्या खुर्चीत सुखात बसलो. जॉन वेनचा सिनेमा अपेक्षेप्रमाणे चांगलाच होता. साडेतीन वाजता तो संपला तेव्हा कळलं की, मुळात हा दोन भागांत दाखवला जाणारा सिनेमा आहे, दुसरा भाग लगेचच सुरू होणार होता. मी ताबडतोब वेळेचा हिशेब केला नि ठरवलं, अर्धाएक तास आणखी थोडा सिनेमा बघितला तरी मी वडलांना घ्यायला वेळेत पोहोचू शकेन... तर इथंच थांबावं. मात्र मी सिनेमा बघण्यात इतका गुंगून गेलो की, साडेपाच वाजता ‘द एन्ड’ची पाटी झळकल्यावर मला भान आलं. मी दचकून गॅरेजकडे धाव घेतली. अर्थात कितीही धावाधाव केली तरी परिषदेच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत सहा वाजणारच होते. तसंच झालं.
मला बघून वडलांचा जीव भांड्यात पडला. मी वेळेत न आल्यामुळं ते खूप काळजीत होते. कारमध्ये बसता-बसता त्यांनी मला विचारलं, ‘का रे? इतका का उशीर?’
मारहाणीच्या रंजक व उत्तेजक दृश्यांनी सजलेला सिनेमा बघताना मला किती मजा आली हे त्यांना मी कसं सांगणार होतो? मला खूप संकोच वाटत होता. तुम्हांला आता वाटत असेल की, आश्रमातले माझे अनुभव... शिवाय नेहरूंबद्दलचा अनुभव जमेस धरता मी खोटं बोलण्याचं धाडस करणार नाही... पण खरं सांगूऽ स्वतःची प्रतिमा जपण्याचा जो दबाव आपल्यावर कळतनकळत तयार झालेला असतो त्यानं आपल्या सदसद्विवेकाची पुरी वाट लागते. मी कुठली सबब सांगावी याचा वेगवान विचार करत पटकन म्हणालो, ‘कार तयार नव्हती!’ माझ्या उत्तरानं वडलांचा चेहरा साफ पडलाय असं मला दिसलं.
‘मी गॅरेजमध्ये फोन केला होता... ते तर असं काही म्हणाले नाहीत.’ वडलांचा आवाजही अगदी खोल गेला होता.
पुढं काय करावं याचा त्यांनी क्षणभर थांबून बहुधा विचार केला आणि निराशेनं मान हलवली. तशाच खोल आवाजात ते म्हणाले, ‘मला खूप वाईट वाटतंय तू खोटं बोलल्याचं. नेहमी खरं बोलायला खूप धाडस लागतं, आत्मविश्वास लागतो. एक पालक म्हणून तुला तो देण्यात मला यश आलं नाही. मीच चुकलोय. पश्चात्ताप म्हणून मी आज पायी घरी जाईन.’
त्यांनी कारचा दरवाजा उघडला नि ते रस्त्यावरून चक्क चालायला लागले. मी कारमधून उतरलो नि त्यांची माफी मागितली. चुकल्याचं कबूल केलं. कसलंही उत्तर न देता ते चालत राहिले. तरीही मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत राहिलो, पुन्हा कधीही मी खोटं बोलणार नाही असं वचनही दिलं. त्यावर पुन्हा शांत नि खोल आवाजात ते म्हणाले, ‘कुठंतरी मीच चूक केलीय. खरं बोलण्याचं महत्त्व तुला कशा तऱ्हेनं पटवलं असतं तर तुझ्यापर्यंत अधिक चांगल्या तऱ्हेनं पोहोचलं असतं याचा विचार मी चालताना करेन. मला तो करायलाच हवा अरुण.’
मी खरोखर घाबरलो वडलांच्या निश्चयामुळे. तडक कारकडे पळालो. मनात असलं तरी मी त्यांच्याबरोबर चालू शकणार नव्हतो, नाहीतर कार कुणी घराकडे नेली असती? खेडेगावातल्या खडबडीत अंधाऱ्या रस्त्यावर त्यांना एकट्यानं चालायला लावणंही योग्य नव्हतं. मग मी प्रयत्नपूर्वक सावकाश गाडी चालवत, गाडीच्या दिव्याच्या प्रकाशात त्यांची सोबत करत राहिलो. सहा तास लागले आम्हांला पोहोचायला. दिवसभर काम करून इतकं अंतर चालणं त्यांना फार त्रासाचं गेलं असणार यात शंका नाही... पण माझ्यासाठीही त्यांचं चालणं प्रचंड त्रास देणारं होतं. माझ्या खोटेपणाबद्दल वडलांनी स्वतःला शिक्षा केली होती. मला शिक्षा करून मोकळं होणं खरंतर किती सोपं होतं... पण मी चूक करण्याचा बोजा ते उचलत होते.
आम्ही रात्री जेवणाच्या वेळेत पोहोचू असं अपेक्षित असल्यामुळं आई आमची वाट बघत असणार आणि पोहोचलो नाही म्हणून काळजीनं तिला काही सुचेनासं झालं असणार हे मला ठाऊक होतं. त्या काळात हाताशी मोबाईल फोन नव्हते की केला डायल नंबर नि कळवलं घरी! सार्वजनिक दूरध्वनी व्यवस्था असली तरी खेडेगावात फोन लागणं अवघड असायचं. माझ्या बहिणींना घेऊन आई अंधारात डोळे खुपसून कुठं आमची कार येताना जाणवतेय का हे बघत गच्चीवर खूप वेळ ताटकळत उभी असेल असं दृश्य माझ्या नजरेसमोर वारंवार तरळत होतं. कधीतरी मध्यरात्री तिला अतिशय मंद वेगात पुढे पुढे येणारे गाडीचे हेडलाईट्स दिसले तेव्हा तिला हायसं वाटलं. गाडीनं काहीतरी त्रास दिला म्हणून वेळ झाला असेल असं तिनं गृहीत धरलं होतं. आम्ही दोघंही घरात गेलो तेव्हा तिला झाली घटना कळली.
जर वडलांनी माझ्या अप्रामाणिकपणाबद्दल मला लगेचच शिक्षा केली असती तर कदाचित मला अपमानित वाटलं असतं, अपराधी नव्हे. अपमानित वाटण्याचा प्रवास पुढे मी त्यांचं न ऐकणं, काहीतरी बदला घेण्याचा विचार करणं इथवर गेला असता. अपमानाच्या धगीत धुमसून कदाचित दुसऱ्याला इजा पोहोचवण्यापर्यंतही मी गेलो असतो. बापूजींकडून आलेल्या अहिंसेच्या शिकवणुकीमुळे वडलांनी मान्य केलं की, माझी चूक ही त्यांचीही चूक आहे. त्या चुकीची जबाबदारी नि ती दुरुस्त करण्याचे प्रयत्न आपण मिळून करायला हवेत असं त्यामुळेच त्यांना वाटलं. जबरदस्तीनं एखादी गोष्ट माथी मारणं किंवा समोरच्यानं ऐकावं म्हणून हिंसेची पद्धत वापरणं यांतून अनुभवास येणाऱ्या परिणामापेक्षा वडलांनी केलेल्या कृतीचा परिणाम निराळा होता. त्यांच्या वागण्याचा परिणाम माझ्यावर दीर्घकाळ राहिला. त्यानं जे साधलं, जी ताकद दिली ती जुलमाचा रामराम करून मिळालीच नसती.
मोठी माणसं जे करत नाहीत, जशी वागत नाहीत तशी अपेक्षा ते मुलांकडून करतात तेव्हा मुलांना ते कळत असतं. अशी कुठलीही जबरदस्ती न करता मुलांच्या भावनांची कदर केली जाते तेव्हा ती खऱ्या अर्थानं फुलतात. अखेर आपलं ध्येय आपल्या मुलांना सशक्त आणि चांगला माणूस बनवण्याचं आहे. ती इतर बहकलेल्या मुलांच्या वाईट संगतीची नि हिंसेची बळी ठरता कामा नयेत. मुलं एकमेकांवर हल्ले करतात आणि त्यांचे मित्र फोनवर त्यांच्या हाणामारीचं चित्रीकरण करतात अशा बातम्या आपण अलीकडे नेहमी पाहतो. बापूजींनी हे पाहिलं असतं तर... ‘काय चाललंय आपल्या मुलांबाबतीत?’ असं त्यांनी मुळीच विचारलं नसतं... कारण या प्रश्नाचं उत्तर तर त्यांना ठाऊकच होतं. चांगलं वागणं, चांगल्या गुणांची जोपासना करणं म्हणजे नेमकं काय याची सकारात्मक बाजू आपण पालक म्हणून मुलांपर्यंत पोहोचवू शकलो नसू तर ‘मुलं बेदरकार वागतात, दुसऱ्याच्या भावनांची कदर करत नाहीत.’ अशा तक्रारी करण्यात काही एक अर्थ नाही.
बहुतांश पालक मुलांना तऱ्हेतऱ्हेचे फॅशनेबल कपडे घेऊन देतात. नवीनवी खेळणी बाजारात आली की त्यांनी ताबडतोब ती मुलांसाठी खरेदी केलेली असतात... तरी मुलं समाधानी नसतात. त्यांना आणखी हवं असतं. मग पालक म्हणतात, ‘बघाऽ मुलांना काही किंमतच नाही, इतकं करूनही ती नीट वागत नाहीत. मिळालं त्याप्रति कृतज्ञ नाहीत. अमेरिकेत तर मला दिसतं की, मुलांना नशिबानं जे जगणं, जो ऐशआराम मिळालाय त्यातच ती मश्गूल असतात. जगण्याची दुसरी काही एक पद्धत असते हे त्यांना ठाऊकच नाही. आपल्याला जे काही खास लाभलंय त्याची तुलना करण्यासाठी दुसऱ्या कुणाचं आयुष्य समोरच नसेल तर त्यांना काय मोल कळणार? मोठ्या नि व्यापक स्तरावर आपण स्वतःला बघू शकतो तेव्हाच कृतज्ञभाव जागा होतो. परस्परांशी नातं असेल, संवाद असेल तर आपण अधिक चांगलं जगू शकतो, काम करू शकतो.
(अनुवाद: सोनाली नवांगुळ)
- डॉ. अरुण गांधी
'वरदान रागाचे' या लेखमालेत प्रसिद्ध झालेले इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा...
Tags: पुस्तक अरुण गांधी महात्मा गांधी सोनाली नवांगुळ शिक्षण अहिंसा तरुण मुले लहान मुले अभ्यास शाळा संगोपन Book New Book Translation Gift of Anger Arun Gandhi Mahatma Gandhi School Teaching Education Non Violance Teenager Children Upbringing Load More Tags
Add Comment