मुलांना स्वातंत्र्याची ओढ असते, त्यांना ते सतत वाजवून घ्यायचं असतं

वरदान रागाचे- भाग 16

महात्मा गांधी यांचे सर्वांत ज्येष्ठ नातू (मणिलाल यांचे चिरंजीव आणि तुषार यांचे वडील) अरुण गांधी वयाच्या 88व्या वर्षीही समाजकार्यात सक्रिय आहेत. त्यांचे बालपण आणि तारुण्य दक्षिण अफ्रिकेत तर नंतरचे आयुष्य भारतातल्या इंग्लीश पत्रकारितेत गेले. निवृत्तीनंतर ते अमेरिकेत वास्तव्य करत आहेत. वय वर्षे 11 ते 13 या काळात ते आजोबांच्या सहवासात राहिले, त्याचा सखोल प्रभाव त्यांच्या विचारांवर आणि कार्यावर राहिला आहे. ते स्वतःला शांती पेरणारा शेतकरी (Peace Farmer) असे संबोधतात. त्यांचे 'Legacy of Love' (‘लिगसी ऑफ लव्ह’) हे पुस्तक मराठीत 'वारसा प्रेमाचा' या नावाने गेल्या वर्षी साधना प्रकाशनाकडून आले आहे. त्याचाच उत्तरार्ध म्हणावे असे छोटे पुस्तक म्हणजे 'Gift of Anger' (‘गिफ्ट ऑफ अँगर’)... त्याचा मराठी अनुवाद ‘कर्तव्य’वरून प्रत्येक शुक्रवारी आणि शनिवारी क्रमशः प्रसिद्ध करत आहोत. लेखमालेचा समारोप 2 ऑक्टोबरला होईल. या लेखमालेतला हा 16 वा लेख.  
- संपादक

माझी दोन मुलं अगदी लहान होती तेव्हा त्यांनाही इतर मुलांप्रमाणं आपली वाढदिवसाची पार्टी व्हावी असं वाटायचं. आम्हालाही आईबाप म्हणून त्यांचे आनंद साजरे करावेत असं वाटणं साहजिकच होतं. त्याच काळात आम्ही भारतातल्या अनाथालयात वाढणाऱ्या मुलांना योग्य नि प्रेमळ घर मिळावं, माणसं मिळावीत या खटपटीत असायचो. आपली काळजी करणारी, आपल्यावर प्रेम करणारी माणसं मिळणं, ऊबदार कुटुंब मिळणं याचा अर्थ काय असतो ते मुलांना कळायला हवं असं आम्ही ठरवलं. त्यामुळंच मुलांचा वाढदिवस तर करायचा, पण स्थानिक अनाथाश्रमातील आमच्या मुलांसोबत असं नियोजन आम्ही केलं.

‘‘पण आमची पार्टी आम्ही अनोळखी मुलांबरोबर का साजरी करायची, आमचे नेहमीचे ओळखीचे मित्रमैत्रिणी का नाही बोलवायचे?’’, आमच्या मुलीनं न राहवून विचारलं.

‘‘ज्यांच्याकडे आधीच खूप आहे त्यांच्याबरोबर मजा करायची, त्यांना जेजे सहज मिळतं ते खायचंप्यायचं याला काय अर्थ आहे सांगा बरं? ज्यांच्याकडं कमी आहे त्यांना द्यायला हवं, हो ना?’’ मी माझा मुद्दा सांगितला.

दोन्ही मुलांना आमचं नियोजन काही फार आवडलं नाही, पण अनाथाश्रमात पोहोचल्यावर मात्र त्यांचा नूर पालटला. आम्ही ज्या घटनेमुळं या कामाकडे वळलो त्या घटनेपेक्षा वेगळं काही चित्र नव्हतं इथं. संस्थेच्या सगळ्या वातावरणात एक उदासी होती, खिन्नपण होतं. जागा थोडी अंधारी होती. भिंतीवरचा रंग जागोजागी उडालेला होता. मुलांना खेळायला खेळणी नव्हती. काही लहान मुलं तर मन रमवण्यासाठी सारखी मागंपुढं डुलत होती. स्पर्श करून बरं वाटेल, खेळायला मजा येईल असं काहीच नव्हतं तिथं.

माझ्या मुलांना हे असं जग पहिल्यांदाच कळत होतं, त्यांना प्रचंड धक्का बसला. त्यानंतर मात्र त्यांनी आपली खेळणी अनाथाश्रमात द्यायला सुरूवात केली. एकदा आम्ही तीन चाकी सायकल तिथं दिली तर तिथली मुलं हे नवं काहीतरी बघून इतकी चकित झाली की बासच! त्यांना सायकल माहित नसेल हे कुणाच्या गावीही नव्हतं. त्यावर बसायचं कसं, ती ढकलायची नि चालवायची कशी हे सगळंच नवीन होतं त्यांच्यासाठी.

अनाथाश्रमातल्या मुलांशी ओळख झाली, बोलचाल सुरू झाली तेव्हापासून वाढदिवसाच्या पार्टीबद्दल मुलांचा नजरियाच बदलला. या प्रत्यक्ष उदाहरणामुळे ‘ज्यांच्याकडे आपल्यापेक्षा कमी आहे त्यांच्याशी आपल्याकडचं वाटून घेण्यात अर्थ आहे.’ या माझ्या म्हणण्याचा अर्थ त्यांना नीट लागला होता. त्यामुळं आधी जी मुलं अनोळखी वाटत होती ती आता अनोळखी उरली नव्हती. एका नव्या जगाशी सांधा जुळून आला होता.

अहिंसेचा मुद्दा आपण योग्य उदाहरणं देत सांगितला की मुलं तो चांगल्या पद्धतीनं समजून घेतात. त्यांना या तत्त्वाची ताकद कळते. म्हणूनच मला वाटलं, मेम्फिसमध्ये ज्या विचारांच्या शिक्षकांचा गट मी अनुभवला त्या वृत्तीवर काम करायला हवं. ज्या शिक्षकांचा शारीरिक शिक्षेवर एवढा भर आहे नि त्यानं फरक पडतो असा विश्वास आहे त्यांना या विचाराचे हानीकारक कंगोरे शांतपणानं दाखवले पाहिजेत. त्यासाठी ‘कॉन्फ्लिक्ट रिझोल्यूशन कोर्स’ डिझाईन केला मी. आपले संघर्ष, आपले झगडे नीट पाहाता यावेत व त्यातून आपल्यासाठी योग्य काय ते ठरवता यावं यासाठी खास आखलेला हा कोर्स होता. मुलांनाही स्वत:चे प्रश्न सोडवण्यासाठी अहिंसेच्या तत्त्वावर आधारलेली एखादी पद्धती किंवा मॉडेल हवं आहे. कारण ते काही त्यांच्या पालकांकडे किंवा भवतीच्या मोठ्या माणसांकडे बघून शिकता येणं शक्य नाही. 

असा पहिला कोर्स मी मिडल स्कूलसाठी घेतला. आपल्या मित्रमैत्रिणी किंवा परिचित यांची भांडणं किंवा प्रश्न सोडवण्यासाठी मध्यस्थ म्हणून काम कसं करता येईल हे शिकण्यात मुलामुलींना खूप रस होता. समजा दोन माणसं कुठल्यातरी मुद्‌द्यावर एकमेकांशी सहमत नाहीत व एका विशिष्ट जागी येऊन त्यांचं बोलणं थबकलं आहे अशावेळी मध्यस्थानं त्यांच्या मध्ये बसून व सुविहित विचार करून ताण संपुष्टात आणायचा असतो.

मात्र हे करायचं कसं याबद्दल वाचून घेणं, ऐकणं व प्रत्यक्षात कृती करणं यातलं अंतर मला त्यांना समजावून सांगायचं होतं. मध्यस्थानंही काही नियम पाळत विषयातला संवाद दोहोबाजूनी पुढे नेणं अपेक्षित असतं. कुठलाही मुद्दा मांडताना दोन्ही पक्षांनी रागानं बोलू नये आणि उत्तर देण्यापूर्वी समोरच्याचं लक्षपूर्वक ऐकावं हे सगळ्यात महत्त्वाचं. मध्यस्थाची भूमिका सोपी नसते, त्यासाठी बरीच तयारी हवी हे मी बऱ्याच उदाहरणातून त्यांना सांगत होतो, बोलतं करत होतो.

मुलांनी एकमेकांसोबत या तंत्राचा सराव सुरू केला. अर्थात आधी ती थोडी संकोचून गेली होती, पण हळूहळू त्यांना कळलं की मध्यस्थीचं तंत्र शिकणं व वापरणं खरोखरच परिणामकारक आहे. एकमेकांत असणारा बेबनाव, असहमती कोणत्याही हिंसेशिवाय अतिशय अगत्यानं मार्गी लावता येते हे मुलं शिकली.

आपल्याला कुणाची एखादी गोष्ट पटली नाही की प्रत्युत्तर म्हणून आवाज वाढवा, भांडणं करा, हाणामारी करा हे सोपे मार्ग वाटतील, पण स्वत:वर पूर्ण काबू ठेवून संघर्ष हाताळण्यामुळं आपल्या जगण्यावर नियंत्रण मिळवता आल्याचं समाधान लाभतं ही किल्ली मुलांना सापडली.

नंतर मला कोर्समधल्या एका मुलासंदर्भातील घटना कळाली. तो आमचा कोर्स आटोपून संध्याकाळी घरी पोहोचला तेव्हा त्याचे आईवडिल काहीतरी कारणानं एकमेकांवर ओरडाआरडा करत होते. त्याला भांडणांची सवय होतीच. त्यावरच्या प्रतिक्रियाही ठरून गेल्या होत्या. त्यामुळे आधीच्या सवयीप्रमाणं तो मलूल होऊन त्याच्या खोलीत जाऊन बसला, पण एकाएकी त्याच्यात धाडस संचारलं आणि तो बाहेर आला.

‘‘आई, बाबा, हे बघा, आता मी आता ‘पीअर मेडिएटर’ म्हणून प्रमाणपत्र मिळवलंय. मला तुमची वादावादी मिटवण्याचा प्रयत्न करू दे. त्यासाठी तुम्ही एकमेकांच्या समोर बसा. मी मध्यस्थ म्हणून काम करेन.’’ तो शांतपणानं म्हणाला.
आपल्या मुलाचं शहाणपण, त्याचा शांतपणा पाहून पालकांना धक्का बसला. त्यांनी आपला आवाज खालच्या पट्टीला आणत ताबडतोब त्याची माफी मागितली. मग काय! एकमेकांना मिठ्या मारण्याचा कार्यक्रम सुरू झाला.

आपलं घर, पैसे, हिऱ्याची अंगठी म्हणजे एकूण स्थावरजंगम मालमत्ता वारशानं कुणाला मिळावी याचं इच्छापत्र करून ठेवण्याची पद्धत आहे. पुढच्या पिढ्यांना वारशानं येणारी घरं, दागदागिने, जमीनजुमला मिळावा अशी तरतूद बरेच लोक काळजीपूर्वक करून ठेवतात. हे झालं भौतिक संपत्तीचं... पण आपण मागं ठेवून जाणार असलेल्या नैतिक वारशाचं काय? आपल्या पालकनीतीमध्ये प्रेम देणं आहे की राखून ठेवणं आहे? ते जे काही आहे तेच पिढ्यान्‌पिढ्यांतून प्रवास करणार आहे.

अहिंसात्मक पालकत्वाचा पहिला धडा बापूजींनी त्यांच्या आईवडलांकडूनच घेतला. त्यातून त्यांना प्रेमाची ताकद उमगली. आपण अतिशय गुणी आहोत असा दावा बापूजींनी कधीही केला नव्हता... त्यामुळे त्यांच्या चुकांच्या कबुल्यांचे किस्से अधिक आहेत. त्यांनी जेव्हा कधी चुका केल्या तेव्हा त्यांच्या पालकांनी त्यांना प्रेमानं समजून घेतलं. बापूजींनी वडलांना पत्र लिहून हातून घडलेली चूक कशी कबूल केली याबद्दल मी आधी सांगितलं आहे. बापूजींच्या वडलांच्या डोळ्यांतून पाणी आलं आणि त्यांनी प्रेमानं आपल्या मुलाला मिठी मारली. या प्रसंगाबद्दल लिहिताना पुढे बापूजींनी म्हटलंय, ‘मी ज्या चुका केल्या त्यांचं मला झालेलं ओझं डोळ्यांतल्या पाण्यातून वाहून जायला माझ्या वडलांनी मला मदत केली. मला हलकं केलं.’ त्या वेळी बापूजींचे वडील त्यांच्या अंगावर खेकसले असते, त्यांना नको नको ते बोलले असते, त्यांना खोलीत डांबून घातलं असतं तर नंतर बापूजी जसे झाले तसे झाले असते का? ते वेगळे घडले याचं कारण या पालकत्वात आहे असं नाही वाटत? 

अगदी आजही महात्मा गांधी या व्यक्तीचा जगावर जो प्रभाव दिसतो तो पाहता, चिडके नि सूडबुद्धीचे गांधी जगावर परिणाम करू शकले असते का? त्यांच्या आचारविचारांमुळे ते सगळ्यांमध्ये जसे वेगळे उठून दिसले तसं घडलं असतं का? आपल्या मुलांशी आपण रागानं, लाडानं जे काही वागलेलो असतो त्याचं प्रतिबिंब त्यांच्यात उमटत असतं... त्यामुळे आपल्या रागालोभाचा परिणाम असंख्य लोकांवर नकळत घडत असतो हे मान्य करणं वावगं ठरणार नाही.

प्रेम, प्रतिष्ठा आणि करुणा या गुणांमुळे एक घर बदलतं तेव्हा खातरी पटते की, याचा गुणाकार होऊन कितीतरी घरांचा पाया बळकट होऊ शकतो. व्यापक पद्धतीनं विचार केला तर देशही बदलू शकतो नि अख्खं जगही. अहिंसात्मक जीवनपद्धतीचं बीज बापूजींच्या लहानपणी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात भिनलं आणि त्याचं महत्त्व नि त्याची परिणामकारकता जाणून त्यांनी आयुष्यभर या मूल्याची जोपासना केली. असंख्य लोकांनी त्यांना संतांसमान मानून पूजलं... पण बापूजींना त्या स्थानाचा मोह कधीच नव्हता. आजूबाजूच्या माणसांप्रमाणेच चुकणारा, त्यातून शिकणारा, कष्ट करून सगळ्यांची काळजी घेत समाजासोबत राहणारा मी एक सामान्य माणूस आहे... हेच त्यांनी त्यांच्या जगण्यातून कायम सांगितलं.

मी आश्रमात असताना त्यांनी माझ्याकडून वचन घेतलं होतं... मी आजपेक्षा उद्या अधिक चांगला होईन यासाठी मी प्रयत्न करेन हे ते वचन. खरंच तर आहे! एखादं ध्येय नजरेसमोर ठेवलं की आपण सहसा त्यापासून ढळत नाही. मी त्यांना वचन दिलं आणि खरोखर रोज सकाळी उठलो की माझ्या मनात पहिला विचार हाच यायचा की, मी कालच्या दिवसापेक्षा आज अधिक चांगला कसा वागेन!

किशोरावस्थेच्या म्हणून वेगळ्याच अडचणी असतात. बापूजींनाही मोठं व्हायच्या या टप्प्यात असं काही समोर येत गेलं की, त्यांच्या चांगल्या गुणांपासून, जगण्याच्या मूल्यांपासून त्यांची फारकत होत गेली. आपला पौगंडावस्थेचा काळ आपण आठवला तर बरेच गोंधळ आठवतील आपल्याला. बापूजींच्या बाबतीत मात्र कुटुंबाचा पाठिंबा नि प्रेम ही एक भक्कम गोष्ट त्यांना लाभली होती... त्यामुळंच खोटेपणाच्या, फसवणुकीच्या चक्रात खोलखोल जाणं त्यांना टाळता आलं.

आजकाल बरेच पालक अगदी सहजपणानं मुलांना येताजाता ‘आय लव्ह यू!’ म्हणतात. बापूजींच्या पालकांनी मात्र हे शब्द न उच्चारताही अतिशय निर्हेतुक नि निर्व्याज प्रेम आपल्या मुलापर्यंत पोहोचवलं. जगण्याचे प्रश्न नि त्यांचा ताळेबंद या सगळ्यांहून त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं त्यांचं मूल. मूल त्यांच्यासाठी कधीच ओझं नव्हतं, ना सतत त्यागाची मागणी करणारं नातं. रोजच्या साध्या जगण्यातून त्यांच्यापर्यंत आईबापाचं प्रेम झिरपत राहायचं. जबाबदाऱ्यांमुळे आता पूर्वीसारखं पार्ट्यांना  जाऊन मजा करता येत नाही, एकट्यानं जाऊन मौजमजा करता येत नाही अशा तक्रारी करत राहण्याऐवजी तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्यासाठीचं सगळ्यात बहुमोल बक्षीस देऊ शकता. त्यांना तुम्ही सांगा, तुम्हीच आमचा सगळ्यात मोठा व खराखुरा आनंदाचा ठेवा आहात.

आज जगाकडं पाहताना मला काळजी वाटते. जगण्याच्या आदर्श मॉडेलची संकल्पना बदलत चालल्यामुळे आजकाल ‘आनंदी नि दयाळू’पेक्षा ‘श्रीमंत आणि यशस्वी’ ही शब्दजोडी महत्त्वाची मानली जाते. जुनेजाणते पालक असोत किंवा नव्यानं पालकत्व अनुभवणारे असोत... सगळेच जण म्हणतात, शेवटी मुलांनी खूश राहणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे... मात्र जसजशी मुलं वयानं वाढायला लागतात तसतसे आपण पालक त्यांच्यावर दबाव आणायला लागतो. त्यानं होतं काय... की, घरी वेळ देऊन एकमेकांना समजून घेणं, विश्वास राखणं, प्रेमानं एकमेकांची जोपासना करणं या गोष्टी मागं पडून करिअर्समधली घोडदौड आणि भरपूर पैसा मिळवणं या गोष्टींना महत्त्व येतं. आपल्या माणसावर प्रेम करणं, त्याची काळजी घेणं यांची जागा महागड्या गिफ्ट्‌सनी भरून काढली जाते. 
आपलं काम आणि कुटुंब यांच्यामध्ये संतुलन ठेवता येणं ही गोष्ट फार सोपी नाही हे मला ठाऊक आहे. जी माणसं दोन्हींमध्ये यशस्वी ताळमेळ ठेवून सुंदर जगतात त्यांचं मला खरोखर कौतुक वाटतं. आपण चुकीच्या मूल्यांची पाठराखण करतोय हे समजूनही जर आपण त्याकडे दुर्लक्ष करत असू तर मात्र काळजीचा विषय आहे. दीर्घकालीन हिताचा व गुणवत्तेचा विचार करण्याऐवजी आपण क्षणभंगुर अनुभवांमध्येच खूश होतोय का? या दोन मुद्‌द्यांचा विचार काळजीपूर्वक करू या.

आम्ही भारतातून अमेरिकेत राहायला गेलो तेव्हा विद्यापीठाच्या परिसरात आमचं घर होतं. आमच्या या घरी विद्यार्थ्यांनी आपापले डबे घेऊन आमच्यासोबत बसून जेवायचं खुलं निमंत्रण असायचं. जेवायचं फक्त निमित्त... या निमित्तानं आम्ही बापूजींचं तत्त्वज्ञान, विशेषतः अहिंसा, प्रेम या मुद्‌द्यांवर चर्चा करायचो. माझी बायको मनानं अगदी प्रेमळ, कनवाळू. ती कुणीही मुलं आली की त्यांना प्रेमानं जवळ घ्यायची, विचारायची, ‘कसं चाललंय? काही हवंय का? मनातलं काही बोलायचंय का?’ मला आठवतंय की, तिनं अशी चौकशी केल्यावर एकदा एक विद्यार्थिनी तिच्या गळ्यात पडून रडायलाच लागली. म्हणाली, ‘माझ्या आईबाबांनी मला असे प्रश्न कधीच विचारले नाहीत. तुम्हांला वाटते तशी त्यांना माझी काळजी वाटली असती तर मला केवढं बरं वाटलं असतं...’

त्या मुलीच्या आईबापाचं तिच्यावर प्रेम असणार यात काही शंका नाही... फक्त ते बिचारे स्वतःच्या गरजा पूर्ण करता-करता किंवा आत्ममग्नतेमुळे आपल्या मुलीपर्यंत आपलं प्रेम पोहोचवू शकले नसतील... आपली पोर कशानं हळवी होते, कशानं थुईथुई नाचायला लागते हे त्यामुळे त्यांना समजलंच नसेल.

न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या माझ्या मुलीनं मात्र स्वतःच्या मुलांना वाढवताना मी आणि तिच्या आईनं भारतात सुरू केलेली एक परंपरा नित्यनेमानं पाळली. रोज संध्याकाळी सात वाजता अख्ख्या कुटुंबानं एकत्र जेवायचा नियमच आम्ही करून घेतला होता. दिवसभर आपण काहीही करत असू तरी संध्याकाळी टेबलावर सगळे एकत्र असायला हवेत हे मुलांना ठाऊक होतं. मुलं लहान असेपर्यंत सगळं नीटच चालू होतं. पुढे हायस्कूलला गेल्यावर मुलांचे मित्र संध्याकाळी लवकर घरी निसटण्याबद्दल त्यांची चेष्टा करायला लागले. मग माझ्या मुलीनं तिच्या मुलांना सांगितलं, ‘इतकं कुतूहल असेल तर त्यांनाही घेऊन या घरी जेवायला. आपल्या कुटुंबाची परंपरा त्यांनाही अनुभवू दे!’

अशीच एक पाहुणी जेवायला म्हणून घरी आली नि जेवणाच्या टेबलावर सगळे दिवसभरातल्या गोष्टी कशा सांगतात ते तिनं डोळे मोठेमोठे करत ऐकलं. म्हणाली, ‘मी पहिल्यांदाच कौटुंबिक जेवणाचा प्रसंग अनुभवतेय! असा असतो होय ‘फॅमिली टाईम’?’ 
या मुलीचे आईबाबा नोकरी करायचे... त्यामुळे प्रत्येकानं आपल्याला पाहिजे ते खायला आणायचं किंवा करून घ्यायचं अशी पद्धत त्यांच्याकडे होती. 

‘आम्ही घरात पोहोचलो रे पोहोचलो की फ्रीजवर डल्ला मारतो. आम्ही काय करतोय, काय नाही याची कुणालाच कसली फिकीर नसते.’ असं सांगताना तिच्या डोळ्यांत खरोखर पाणी दाटलं होतं. माझ्या मुलीच्या घरचं प्रेमळ आणि उबदार वातावरण तिला स्वतःसाठीही हवंसं वाटलं होतं.

मुलांना स्वातंत्र्याची ओढ असते, त्यांना ते सतत वाजवून घ्यायचं असतं... त्यामुळे पालकांचा सहवास आनंदापेक्षा दडपणाचाच जास्त वाटतो त्यांना. तरी घरच्यांनी आपल्याला समजून घ्यावं, आपल्यावर प्रेम करावं असं आतून वाटत असतंच. जेव्हा पालक मुलांसाठी वेळच काढू शकत नाहीत तेव्हा खरंतर मुलाच्या संपूर्णपणाच्या नि आशावादी जगण्याच्या कोवळ्या मागणीविरोधात ते हिंसक वागत असतात, कोवळ्या कोंबाला हानी पोहोचवत असतात.

(अनुवाद: सोनाली नवांगुळ)

- डॉ. अरुण गांधी

'वरदान रागाचे' या लेखमालेत प्रसिद्ध झालेले इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा... 

Tags: पुस्तक अरुण गांधी महात्मा गांधी सोनाली नवांगुळ शिक्षण अहिंसा तरुण मुले लहान मुले अभ्यास शाळा संगोपन पालक हरिलाल गांधी Book New Book Translation Gift of Anger Arun Gandhi Mahatma Gandhi School Teaching Education Non Violance Teenager Children Upbringing Parents Harilal Gandhi Load More Tags

Add Comment