प्रेमात खूप ताकद असते हे बापूजींना मान्य असलं तरी...

वरदान रागाचे- भाग 20

फोटो सौजन्य: freepik.com

जगात जी-जी महत्त्वाची नि मोठी माणसं असतात ती कायम गंभीर असतात... त्यांच्या अशा तऱ्हेच्या व्यक्तिमत्त्वामुळं मनावर वेगळी छाप पडते असा आपला सर्वसाधारण समज असतो... पण बापूजी मात्र वेगळे होते. मनानं मऊ, गंमत करणारे, खेळात भाग घेणारे. रात्रीचं जेवण झालं की ते पाय मोकळे करायला थोडं बाहेर पडायचे. मी त्यांच्या सोबत जायचो. त्यांची उंची पाच फूट पाच इंच इतकी होती. मला नुकतं चौदावं लागलं होतं पण मी त्यांच्याहून उंच होतो. ते चालताना एक हात माझ्या खांद्याभोवती टाकायचे नि दुसरा हात आमच्याबरोबर आणखी कुणी चालत असेल त्यांच्या खांद्यावर टाकायचे. आम्हांला ते त्यांची काठी म्हणायचे. कधी चालताना ते मध्येच आमच्या खांद्यांवर दाब देऊन पाय हवेत उचलून झोका घेतल्यासारखं करायचे. एखादं लहान मूल आपल्या पालकांच्या मध्ये उभं राहून जसं चीत्कारत झोके घेईल तशाच आनंदानं बापूजी या गमती करायचे. आम्ही त्यांचा हा खेळ बघून आश्चर्यानं एकदम स्तब्ध व्हायचो तेव्हा हसत-हसत म्हणायचे, ‘काय रेऽ तुम्ही लक्षच देत नाही माझ्याकडं...’

बापूजींची विनोदबुद्धी तीव्र होती, त्यातून त्यांचा सरळपणा कळायचा. उपजत शहाणपणानं ते लोकांशी इतकं सहज वागायचे की, ते वेगळे कुणीतरी आहेत असं लोकांना वाटायचंच नाही. त्यांचं वय वाढत गेलं तसं लोकांना त्यांचे गुण ठळकपणानं दिसायला लागले आणि मग जन्मापासूनच ते असे संतवृत्तीचे असावेत असा समज व्हायला लागला. लोकांनी किती म्हटलं, नावाजलं तरी आपण इतरांपेक्षा कुणी वेगळे आहोत, खास आहोत हे त्यांनी कधीही मान्य केलं नाही. उलट ते मला नेहमी लहानपणाबद्दल, त्या वेळच्या साधेपणाबद्दल, घरच्यांच्या मायेबद्दल सांगायचे. करारीपणा आणि ठरलेल्या विषयाशी बांधिलकी या गुणांनी त्यांनी त्यांचं मोठेपण कमावलं होतं. अधिक चांगला माणूस होण्यासाठी आपण कुठल्याही टप्प्यावर प्रयत्न करू शकतो, फक्त आपल्याला तसं वाटायला हवं असं त्यांचं म्हणणं नेहमी असायचं.

बापूजींनी उपोषणाचा उपयोग राजकीय भूमिका घेण्यासाठी आणि समाजात बदल करण्यासाठी केला... मात्र अगदी सुरुवातीला, तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना, त्यांनी जगण्याचा इतका साधासहज विचार केलेला नव्हता. अन्नाचा उपयोग त्या वेळी ते वेगळ्या हेतूंसाठी करायचे. ते खाण्याचे शौकिन होते. पुरणपोळी ही तर खूपच आवडीची गोष्ट. दक्षिण अफ्रिकेत असताना, एकदा कधीतरी त्यांनी आणि बा म्हणजे आजीनी मिळून काही पाहुण्यांना घरी जेवायला येण्याचं निमंत्रण दिलं होतं. बा स्वयंपाकघरात कामं उरकत होती पण स्वयंपाकघरातून दरवळणाऱ्या गोड वासाचा मोह पडून बापूजी आत शिरले. बा पुरणपोळी करतेय हे बघून ते फार खूश झाले पण लगेच काळजीच्या स्वरात म्हणाले, ‘सगळ्यांना पुरणार नाहीत या पुरणपोळ्या...’

‘पुष्कळ होतील...’ बांनी शांतपणे सांगितलं.

‘अगंऽ या दिसताहेत त्या सगळ्या मी एकटाच संपवू शकतो.’ बापूजींनी पुन्हा सांगायचा प्रयत्न केला.

‘नाही होऽ इतक्या काय खाता? सांगतेय नाऽ पुरतील.’

‘तू मला आव्हान देतेस होय? बरंऽ हातात आहेत तितक्या पूर्ण कर. मग बघ कोण बरोबर ते...’ बापूजींनी त्यांचा खास मिश्कील सूर लावला.

बांनी त्या दिवशी चांगल्या भक्कम नि मोठाल्या अठरा पुरणपोळ्या केल्या होत्या. तिनं पुरणपोळी बापूंच्या ताटात वाढली. एकानंतर दुसरी, दुसरीनंतर तिसरी करत बापूजींनी आनंदानं पोळ्यांचा फडशा पाडला. बा हरली. तुमचं बरोबर असं तिनं मान्य केलं.

त्या अठरा पुरणपोळ्या कदाचित त्यांना जन्मभर पुरल्या असाव्यात... कारण त्यानंतर बापूजींनी त्यांच्या लाडक्या पुरणपोळीचा त्याग केला. कायमसाठी. त्यांच्या रोजच्या आहारातही त्यांनी खूप बदल केले. रोजचा आहार दिवसेंदिवस अधिकाधिक साधा होत गेला. मी आश्रमात राहायला आलो तेव्हा तर ते अगदीच अळणी जेवू लागले होते. कुठल्याही मसाल्यावाचून, अगदी मिठावाचून शिजवलेलं अन्न ते खायचे. एकदा मी माझ्या एका बहिणीला- आभाला विचारलंही, ‘बापूंसाठी कोण स्वयंपाक करतं? मला एकदा चव बघायचीय...’

‘तू खाऊच शकणार नाहीस त्यांचं अन्न. ते फार बेचव असतं.’

बघितलं तर जितक्या उपलब्ध आहेत तितक्या भाज्यांचा शेळीच्या दुधात शिजवलेला तो काला होता. मी एक घास खाल्ला तर अक्षरशः गिळवेना.

त्यानंतर मला राहवेना. मी बापूजींना विचारलंच, ‘असं बेचव, खायची मजा न देणारं अन्न का खायचं? काय मिळतं असं खाऊन?’

‘मी जगण्यासाठी खातो, खाण्यासाठी जगत नाही.’ त्यांनी मंद हसत उत्तर दिलं होतं.

मी मागंही म्हणालो होतो, बापूजी काही परिपूर्ण, आदर्श माणूस नव्हते. कधीकधी साधेपणाच्या हट्टापायी ते विषय फार ताणायचे. जर आपण शक्य तितकं साधं जगू शकलो तर लोकांना जगण्यासाठी सहजपणानं उपयोगी पडू शकतो हा मुद्दा ते स्वतःच्या जीवनशैलीतून पुन्हापुन्हा स्पष्ट करत.

स्व-परिवर्तनावर बापूजींचा अपार विश्वास होता. स्वतःत बदल घडवणं ही गोष्ट ते अतिशय प्रयत्नपूर्वक साधायचे, फक्त कधीतरी एखादी युक्ती सापडण्याचा अवकाश असायचा. छोट्याछोट्या कृतीतून मोठ्या कामांना गती मिळते असं ते म्हणायचे. अर्थात मला हे पटवण्यासाठी एखादं भाषण देऊन टाकण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. स्वतःच्या जगण्यातून आणि वेगवेगळ्या गोष्टी सांगत ते माझं मन वळवायचे.

एक दिवस चरख्यावर बसलेलो असताना त्यांनी एका अतिशय अव्यवस्थित, ढिसाळ जगणाऱ्या माणसाची गोष्ट सांगायला सुरुवात केली. 

तो एका छोट्या अपार्टमेंटमध्ये राहायचा. हा खरंतर वयानं तरुण, चुणचुणीत... पण घरातली कुठलीच कामं कधी करायचा नाही. घर आवरायचा नाही. सगळीकडे नुसता पसारा आणि केरकचरा. बापूजी रंगवून सांगायला लागले, ‘त्याच्या स्वयंपाकघरातलं सिंक खरकट्या भांड्यांनी भरून वाहत होतं. नुसतं भरून वाहत होतं हे म्हणणं कमीच पडेल, जवळपास छतापर्यंत ढीग लागला होता भांड्यांचा.’ या माणसाला ठाऊक होतं की, आपण खरंतर घाणीत लोळतोय, सगळं गलथान म्हणावं यापलीकडे पोहोचलेलं आहे... मात्र त्यानं स्वतःशीच ठरवलं होतं, मी इथं एकटा राहातोय, जोवर मी कुणाला इथं बोलावणार नाही तोवर बाहेरच्यांना ही स्थिती कळायचा प्रश्नच येणार नाही. प्रश्नच मिटला.

कालांतरानं त्याच्या कामाच्या ठिकाणी असणाऱ्या एका मुलीच्या तो प्रेमात पडला. त्यानं तिला डेटवर नेलं, कितीतरी ठिकाणी ते फिरले... पण स्वतःच्या घरी तिला आणण्याचं मात्र त्यानं टाळलं. पार्कात फिरले, नदीकिनारी तासन्‌तास गप्पा मारल्या. अशाच एका क्षणी तिनं त्याला प्रेमभरानं गुलाबाचं लाल टपोरं फूल दिलं.

प्रेमाचं प्रतीक म्हणून तिनं गुलाबाचं फूल दिलं होतं. तो एरवी कितीही गलथानपणानं घरात राहत असला तरी या गुलाबाच्या फुलाचं स्थान त्याला ठाऊक होतं, ते विशेषच होतं. गुलाब घेऊन तो घरी आला पण ठेवावं कुठं त्याला? योग्य जागा नको? सगळी खरकटी भांडी वरखाली करून झाल्यावर त्या ढिगात त्याला एक छान फुलदाणी सापडली. त्यानं ती स्वच्छ घासली, तिच्यात ताजं पाणी भरलं आणि तिच्यात गुलाब ठेवला.. फुलदाणीतला गुलाब कुठून छान दिसेल असा विचार करता-करता स्वयंपाकघर व जेवायला बसायची जागा स्वच्छ करायला हवी... मग फुलदाणी ठेवता येईल असं त्याला वाटलं. मग त्यानं डायनिंग हॉल नि डायनिंग टेबल चकचकीत केलं. तिथं ठेवलेली फुलदाणी आता खूपच छान दिसायला लागली. तरीही मनाला आजूबाजूची घाण डाचत होती. मग त्यानं भांड्यांचा ढीग घासूनपुसून लावून टाकला. मन लावून बाकीच्याही खोल्या आवरल्या, केर काढून फरशी स्वच्छ पुसून घेतली. घरातले एकानंतर एक, एकानंतर एक भाग स्वच्छ होत जाण्याची जणू साखळीच तयार झाली. सगळं घरच सुंदर, स्वच्छ झाल्यावर तो थांबला. प्रेयसीनं दिलेला टपोरा लाल गुलाब जितका देखणा होता तितकाच देखणा त्याला आपल्या आसपासचा माहोलही हवा होता. एका स्त्रीनं प्रेमानं गुलाब देण्याची घटना त्याचं आयुष्य बदलवून गेली. 

मी अवघडलेल्या किशोरवयात असताना या प्रेमकहाणीनं हेलावून गेलो होतो... अजूनही आठवतंय. आपल्यापैकी प्रत्येकात वैगुण्यं असतात पण प्रेमाचा आणि नरमाईचा संकेत किंवा तशी कृती आपल्याला स्वीकाराची भावना दर्शवते आणि मग आपल्यातलं शक्य तितकं चांगलेपण बाहेर यावं म्हणून आपण धडपडायला लागतो. त्या दिवशी चरख्यावर बसल्या-बसल्या ही गोष्ट ऐकताना मी एका उत्कट अवस्थेत मनाशी खूणगाठ बांधली होती, माझ्यावर कुणीतरी प्रेम करावं इतका चांगला मी होईन... आणि होऽ घरही स्वच्छ ठेवेन.

प्रेमात खूप ताकद असते हे बापूजींना मान्य असलं तरी ते काही अव्यवहारी किंवा कल्पनांचं मायाजाल तयार करून त्यात रमणारा माणूस नव्हते. गोष्ट सांगण्याचं आतलं खास कारण त्यांच्याकडे होतं. त्यांना, मी किंवा भोवतालच्या आम्हां सगळ्यांमधूनच गुलाबाचं फूल घडवायचं होतं. आमच्यापैकी प्रत्येकानं समाजात मिसळल्यावर आपल्या विचारानं जगण्याविषयीच्या आशेबरोबरच प्रफुल्लितपणाही लोकांमध्ये पेरावा आणि त्यांना अधिक चांगलं माणूस होण्याकरता प्रेरित करावं असं त्यांना वाटायचं. प्रेमाचं, आशावादाचं, सत्याचं एखादं उदाहरण अनेकदा इतकं ठसठशीत नि उजळ दिसतं की, त्या प्रकाशात नि अस्तित्वात बाकी सगळ्या नकारात्मक गोष्टी निस्तेज होऊन जातात. एकदा असं घडलं की लोक स्वतःच्या शक्यता अधिक चांगल्या तऱ्हेनं पाहू शकतात. निर्णय मग अर्थात त्यांचा उरतो की, निस्तेज, काळोख्या जगाचा भाग व्हायचं की टपोरा गुलाब होऊन फुलदाणीत मिरवायचं. तुम्ही स्वतः  चांगले असता तेव्हा आजूबाजूचं सगळं जग तुमच्याहून अधिक चांगलं व्हावं म्हणून धडपडता. ही खरी गोष्ट आहे.

गोष्टीबद्दल आणखी एक मुद्दा - आपल्या त्या गबाळ्या तरुणानं संपूर्ण घर चकचकीत करून टाकलं ते कुणाच्याही दोषारोपाला नि टीकेला उत्तर म्हणून नव्हे. तो ज्या तऱ्हेनं जगतोय ते चूक आहे असं त्याला कुणी तिसऱ्यानं सांगण्याची गरज नव्हती. त्याला ते आधीच ठाऊक होतं. त्याला फक्त एका चांगल्या धक्क्याची गरज होती... ज्यामुळं सिंकमध्ये खरकट्या भांड्यांचा ढीग रचून ठेवण्याऐवजी तो घासून नीटनेटका ठेवण्यात जास्त मौज आहे हे त्याला कळेल. ज्या तरुणीनं त्याला प्रेमानं गुलाब दिला तिनं जर ‘तू असा कसा वागतोस? तुझ्या सवयी केवढ्या वाईट आहेत...’ असं म्हणून त्याच्याविषयीच्या तक्रारींचा पाढा वाचला असता तर कदाचित त्याला कधीच बदलावंसं वाटलं नसतं. आपण माणसं सकारात्मक उत्तेजनेला प्रतिसाद देतो, नकारात्मक नव्हे. आपल्या कुठल्याही सहकाऱ्याला, मित्राला किंवा कुटुंबातल्या सदस्याला तुम्ही सांगायला गेलात की, तो किंवा ती म्हणावं तितकं सरस काम करत नाहीये, उलट जे करताहेत ते सगळं फिसकटतंच आहे तर परिणाम उलटा होईल. अशा प्रकारे कुणी हल्ले केले, दोषारोप केले तर लोक शक्यतो बचावाचं धोरण स्वीकारतात आणि आक्रमक होतात. त्याऐवजी योग्य तितकं कौतुक करण्याचं धोरण आपलंसं केलंत तर समोरच्यात तुम्हांला हवा तसा बदल घडतो, प्रोत्साहन मिळतं.

बापूजींच्या निःस्वार्थी स्वभावामुळं आणि एकूणच कामाच्या पद्धतीमुळं ते जे काही सांगायचे, लिहायचे त्यांतून त्यांना देशात जो हवा होता तो बदल घडवता आला. आपल्यात वसत असलेलं सकारात्मक चैतन्य ओळखणं आणि ते योग्य वेळी, योग्य जागी वापरणं हीच आपण स्वतःला आणि दुसऱ्यालाही दिलेली बक्षिसी असते. आजकाल मानसोपचार तज्ज्ञही हीच थिअरी सांगतात. जगताना प्रेम, कृतज्ञता, निःस्वार्थीपणा आदी गुणांचा वापर आपण जितक्या सहजपणे करतो त्याप्रमाणात अधिक चांगलं माणूस होण्याची आपली असोशी वाढत जाते आणि त्यातून रक्तदाब कमी होणं, ताण कमी होणं, झोप चांगली लागणं असे चांगले परिणाम तब्येतीवर होतात. परिस्थिती कितीही निराश करणारी असली तरी तिच्याकडे सकारात्मकतेनं पाहण्याचा मजबूत नजरिया बापूजींच्या अहिंसावादी जीवनशैलीनं माणसांना दिला आहे.

तत्त्वांच्या बाबतीत तडजोडीला जराही राजी नसणारा आणि न्यायाच्या लढाईच्या बाबतीत एकट्याचं देहरूपी आणि तत्त्वरूपी सैन्य घेऊन उभं ठाकणारा माणूस म्हणून बापूजींना लोकांनी पाहिलेलं आहे... काही जाणकारांनी आणि मर्मदृष्टी असणाऱ्या इतिहासकारांनी मात्र त्यांचं रूप पाहिलं ते मध्यस्थीसाठी, वाटाघाटीसाठी तयार असणाऱ्या माणसाचं. आपल्या विरोधी बाजूला असणाऱ्यांची स्थिती समजून घेण्याची सहवेदना बाळगणं हे बापूजींचं सगळ्यात मोठं कौशल्य. ब्रिटिशांशी बोलणी करतानाही त्यांनी शांतपणा आणि अदब न गमावता वाटाघाटी केल्या. अखेर त्यांना उमगलं की, या वाटाघाटींचा उपयोग होत नाहीये, काहीतरी वेगळाच विचार करणं आवश्यक आहे तेव्हा त्यांनी तेही केलं. शांततामय मार्गानं केलेला मिठाचा सत्याग्रह हे त्यांनी पुढचा टप्पा गाठल्याचं निदर्शक... भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी लोक रागानं इतके भडकले होते की, भारतभरात अतिशय हिंसक घटना घडायला लागल्या होत्या. आजोबांनी अशा चवताळलेल्या लोकांना असंतोषाची आणि बदलाची इच्छा सांगण्याचा सकारात्मक मार्ग देऊ केला. त्यातून अधिक चांगल्या गोष्टी घडवता येतात याची खातरी दिली. अहिंसा हा तो मार्ग. या मार्गानं लोकांमधला राग आणि कडवटपणा बाहेर येण्याऐवजी त्यांच्यामधलं चांगुलपण आणि चांगलं घडवण्याची ऊर्मी, दोन्ही उफाळून येतं. आजोबांचं शांत वागणं आणि सहजपणानं चेहऱ्यावर फुलणारं हसू पाहून लोकांच्या लक्षात यायचं की, निराशेच्या गर्तेत रुतून राहण्यापेक्षा शांततामय मार्गानं संधींकडे लक्ष एकाग्र करता येतं.

मिठाच्या सत्याग्रहानंतर काही वर्षांनी ब्रिटिश संसदेनं ‘गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बिल’ संमत केलं. भारताच्या स्वातंत्र्याकडे जाण्याचं हे पहिलं पाऊल होतं. तीस कोटी भारतीयांना यातून स्वतःची सत्ता स्थापन करता येणार होती. अनेकांना वाटलं, हा बापूजींचा फार मोठा विजय आहे पण त्यांचा आग्रह याहून आणखी मोठा होता... प्रेमाचा आणि अहिंसेचा मूलभूत संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचणं ही त्यांना गरज वाटत होती. एका शासनाच्या जागी दुसरं शासन यावं हे त्यांचं ध्येय कधीच नव्हतं, त्यांची सत्याग्रहाची चळवळ राजकारणापलीकडची होती. ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून सत्ताभार घेण्याबाबतच्या एका बैठकीचं वर्णन त्या वेळच्या एका पत्रकारानं केलेलं होतं. या पत्रकाराला बापूजींच्या भूमिका नि त्यांचं राजकारणातलं स्थान आवडायचं नाही. त्यानं केलेलं हे वर्णन आहे. बैठकीला उपस्थित मोजक्या भारतीयांपैकी बापूजी वगळता इंग्रजांच्या जागांवर आता स्वतः आरूढ होणार असणारे सगळेच ब्रिटिशांइतकेच उदासीन आणि हेकट वाटत होते. ‘या सगळ्यांमध्ये बापूजी मात्र कमालीचे निरागस दिसत होते. त्यांच्या डोळ्यांमधून जणू सौम्य अशी किरणं बाहेर पडताहेत असं वाटत होतं.’ बापूजींचं व्यक्तिमत्त्व मुळीच पसंत नसणाऱ्या पत्रकारानं त्यांचं बैठकीत अनुभवलेलं हे रूप. बापूजींचं आणि या पत्रकाराचं भले मतैक्य नसेल, त्यांचं राजकारणातलं नि समाजकारणातलं स्थान त्याला मंजूर नसेल... तरीही बापूजींचं असणं किती मंत्रमुग्ध करत होतं हे कबूल करण्यावाचून त्याला गत्यंतर उरलं नाही. हा बापूजींच्या लहानखुऱ्या मूर्तीचा करिश्मा!

बापूजींच्या प्रत्येक कृतीतून त्यांचा सच्चेपणा, प्रेम, चांगुलपणा, सकारात्मक ऊर्जा यांचं प्रतिबिंब उमटत राहिलं. बाहेर येताना त्यांच्या डोळ्यांत जाणवलेले शांत-सौम्य किरणही हेच दर्शवत होते. 

अहिंसेच्या चळवळीला ते ‘सत्याग्रह’ असं संबोधायचे हे आठवतंय? त्याचा अनुवाद त्यांनी ‘आत्मबळ’ असा केला होता. त्यांच्या सकारात्मक नि प्रेमळ वागणुकीनं ते समोरच्यांमध्ये उत्साह आणायचे. त्यांच्या कार्याला ताकद पुरवायचे. अमुक गोष्ट साधण्यासाठी किंवा साधण्यापुरती चळवळ असा चळवळीचा अर्थ त्यांच्या दृष्टीनं कधीही नव्हता. ब्रिटिशांनी भारतीयांची स्थिती बदलावी, त्यांचा दर्जा बदलावा असं बापूजींना वाटायचं... पण त्यांचं वाटणं केवळ भारतीय जनतेपुरतं नव्हतं. सकारात्मकता आणि समजूतदारपणा या गोष्टी त्यांना जगभर पोहोचवायच्या होत्या.

माणसाच्या मनातल्या भयाच्या इंधनावर शासन आणि धर्म या दोन्ही गोष्टी चालतात असं बापूजींचं एक निरीक्षण होतं. आपण जर चुकीचे वागलो तर देव शाप देईल आणि नरकात पाठवेल ही भीती लोकांना घालून धर्म लोकांना नियंत्रणाखाली ठेवतात. जी माणसं धर्माचं मुखत्यारपत्र घेतलेल्या या विशिष्ट लोकांचं ऐकत नाहीत, त्यांच्या मागण्या मान्य करत नाहीत त्या माणसांबाबतीत धार्मिक गटतट आपल्या मनचे निवाडे करून त्यांना वाळीत टाकतात. जनतेला नियंत्रणाखाली ठेवण्याच्या थेट आणि स्पष्ट पद्धती धर्मापेक्षा शासनाकडे जास्त असतात. उदाहरणार्थ, दंड, तुरुंगवास. अगदी लांब कशाला जा... पालकांकडे आणि शिक्षकांकडे पाहिलं तरी हे कळतं. शिक्षेची भीती घालून किंवा अन्य धोके दाखवून पालक आणि शिक्षकही मुलांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. एकूण समाजातल्या भीतीवर सगळा खेळ चालू राहतो.

बापूजींना या प्रश्नाची चांगली समज होती... त्यामुळेच जग भीतीनं नव्हे तर प्रेमानं बदलेल, जिंकता येईल असं त्यांना सतत वाटायचं. त्यांचं प्रेम, दयाळूपणा आणि सकारात्मकतेचा हवाहवासा संसर्ग देण्याची ताकद पाहूनच त्यांच्याभोवती लोकांचा घोळका कायमच असायचा.


(अनुवाद: सोनाली नवांगुळ)

- डॉ. अरुण गांधी

'वरदान रागाचे' या लेखमालेत प्रसिद्ध झालेले इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा... 

Tags: पुस्तक अरुण गांधी महात्मा गांधी सोनाली नवांगुळ अहिंसा प्रेम विनोद आत्मबळ सत्याग्रह परिवर्तन Book New Book Translation Gift of Anger Arun Gandhi Mahatma Gandhi Non- Violance Love Sense of Humour Self Strenght Satyaghaha Change Load More Tags

Comments:

राजू कोंपले

फारच प्रेरणादायी व अनुकरणीय लेखमाला

Add Comment