महात्मा गांधी यांचे सर्वांत ज्येष्ठ नातू (मणिलाल यांचे चिरंजीव आणि तुषार यांचे वडील) अरुण गांधी वयाच्या 88व्या वर्षीही समाजकार्यात सक्रिय आहेत. त्यांचे बालपण आणि तारुण्य दक्षिण अफ्रिकेत तर नंतरचे आयुष्य भारतातल्या इंग्लीश पत्रकारितेत गेले. निवृत्तीनंतर ते अमेरिकेत वास्तव्य करत आहेत. वय वर्षे 11 ते 13 या काळात ते आजोबांच्या सहवासात राहिले, त्याचा सखोल प्रभाव त्यांच्या विचारांवर आणि कार्यावर राहिला आहे. ते स्वतःला शांती पेरणारा शेतकरी (Peace Farmer) असे संबोधतात. त्यांचे 'Legacy of Love' (‘लिगसी ऑफ लव्ह’) हे पुस्तक मराठीत 'वारसा प्रेमाचा' या नावाने गेल्या वर्षी साधना प्रकाशनाकडून आले आहे. त्याचाच उत्तरार्ध म्हणावे असे छोटे पुस्तक म्हणजे 'Gift of Anger' (‘गिफ्ट ऑफ अँगर’)... त्याचा मराठी अनुवाद ‘कर्तव्य’वरून प्रत्येक शुक्रवारी आणि शनिवारी क्रमशः प्रसिद्ध करत आहोत. लेखमालेचा समारोप 2 ऑक्टोबरला होईल. या लेखमालेतला हा 14 वा लेख.
- संपादक
आश्रमात बापूजींच्या सान्निध्यात राहतानाचे दिवस वेगळेच होते. ते दिवस आठवतात तेव्हा मला बापूजींची उबदार माया आठवते, त्यांनी सांगितलेले शहाणपणाचे बोल आठवतात आणि त्यांचं सौम्य हसू आठवतं. कुठलीही गोष्ट अतिशय प्रेमानं आणि संयमानं शिकवायचे ते.
आश्रमाच्या जवळपासच्या गावात राहणारं एक कुटुंब एक दिवस त्यांच्या अनिल नावाच्या छोट्या मुलाला घेऊन बापूजींकडे आलं. अनिल सहा वर्षांचा होता. या छोट्या अनिलला गोड खाण्याची फार सवय होती. ही सवय तत्काळ सुटली नाही तर त्याच्या तब्येतीवर घातक परिणाम होतील असं डॉक्टरांनी बजावलं होतं. अनिलला मात्र गोडाचा जबरदस्त नाद लागलेला होता. कुणाच्या नजरेत येऊ नये इतक्या चटकन किमान खडीसाखर तरी घेऊन तो निसटायचा. कसंही करून आपल्याला हवं ते मिळवायची सवय यातून लागत होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही काळ त्याला समजावणं, गोडापासून दूर ठेवणं असे प्रयत्न करून दमल्यावर त्याच्या आईला वाटलं, आता याला बापूच समजावतील! बापू अनिलशी बोलतील तर अनिल या चक्रातून बाहेर पडेल असं तिला वाटत होतं. बापूजींकडं जाऊन तिनं सगळं सांगितल्यावर त्यांनी सांगितलं, ‘दोन आठवड्यांनी भेटा...’
अनिलची आई थोडी बुचकळ्यात पडली. जी गोष्ट लगेचच सांगता येईल त्यासाठी बापूजींना दोन आठवड्यांचा वेळ कशाला हवाय? दोन आठवड्यांनी अनिलला घेऊन आल्यावर बापूजी फक्त त्याच्या कानांत काहीतरी कुजबुजले. कानांतल्या गोष्टी झाल्यावर त्या दोघांनी एकमेकांना टाळी दिली. ती किंचित नाराज झाली... पण नंतर अनिलकडे बघताना तिला आश्चर्य वाटायला लागलं की, गोड खाणं शक्य तितकं टाळायचा प्रयत्न तो मनापासून करायला लागला होता. परिणामी त्याची तब्येतही सुधारायला लागली. बापूजींनी घडवलेल्या चमत्कारामुळे अनिलचे आईबाप आनंदून गेले. एक दिवस अनिलची आई बापूजींना मुद्दाम भेटायला आली नि तिनं विचारलं, ‘तुम्ही नेमकं असं काय केलंत की, अनिल सुधारला?’
‘कुठलाही चमत्कार वगैरे मी केलेला नाही. तो मला कुठं येतो? गोड सोड, ते खाणं चांगलं नव्हे असं तुमच्या मुलाला सांगण्याआधी मी स्वतःची गोड खाण्याची सवय तर सोडायला हवी ना? त्यामुळेच मी तुम्हांला दोन आठवड्यांनी यायला सांगितलं. त्या काळात मी गोडापासून ठरवून लांब राहिलो. ते जमलं तेव्हा त्याला सांगितलं, मी केलंय... तूही प्रयत्न करशील का?’
कुठलीही गोष्ट शिकवण्याची बापूजींची पद्धत इतरांहून वेगळी होती. त्यांचं म्हणणं होतं, मुलं मुळात पाठ्यपुस्तकातून जितकं शिकू शकतात त्याहून अधिक ती आपल्याला शिकवणाऱ्या लोकांच्याकडे पाहत शिकतात. त्या लोकांचं व्यक्तिमत्त्व कसं आहे, ते जे शिकवतात त्यातलं स्वतः किती पाळतात हे मुलं बघत असतात. जुन्या वळणाप्रमाणे मोठ्यांनी लहानांना, ‘मी काय सांगतोय तेवढंच कर, मी जे करतोय ते नको करूस!’ असं दरडावणं त्यांना मंजूर नव्हतं. उलट शिक्षकांनी, शिकवणाऱ्यांनी आपण जे मुलांना शिकवू पाहतोय त्याचं पालन आपण स्वतः आधी करतो आहोत का हे तपासणं गरजेचं असतं असं त्यांना वाटायचं... त्यामुळेच ते पालकांना, शिक्षकांना नेहमी सांगायचे, ‘आपल्या मुलांनी जसं वागणं तुम्हांला अपेक्षित आहे तसे आधी तुम्ही वागा. तुम्हांला बघून मुलं शिकतील, तुम्ही सांगता ते ऐकून नव्हे.’
गणित आणि विज्ञान शिकवायला माझ्यासाठी एक शिक्षक बापूजींनी नेमलेले होते... पण त्यांना मनातून ठाऊक होतं की, आयुष्याचे सगळ्यात महत्त्वाचे आणि समजुतीचे धडे मी त्यांच्याकडे बघत-बघत शिकणार आहे. ते मनानं अतिशय मवाळ नि संयमी शिक्षक होते. कुणी वडील म्हणून, तर कुणी आजोबा या नात्यानं आपल्याकडून शक्य तितकं शिकून घ्यावं असं त्यांना वाटायचं. असा प्रयोग सगळ्यात आधी त्यांनी दक्षिण अफ्रिकेतल्या टॉलस्टॉय फार्मवर केला होता. पुष्कळ माणसांनी एकत्र येऊन काम करावं, जेवावं-खावं, मिळूनमिसळून राहावं असा सामुदायिक जगण्याचा पहिला प्रयोग त्यांनी इथेच केला होता. या पहिल्यावहिल्या प्रयोगात कुटुंबप्रमुख या नात्यानं सगळ्यांना शिस्त लावणं, नव्या गोष्टी शिकवणं याची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतलेली होती. त्या वंशविद्वेषाच्या, वर्णभेदाच्या काळात आश्रमात राहणाऱ्या ‘काळ्या’ मुलामुलींसाठी कुणी बाहेरचा शिक्षक येऊन शिकवेल अशी स्थिती नव्हती... त्यामुळे तीही जबाबदारी बापूजींनीच घेतली होती.
आपल्या उदाहरणातून नि वागणुकीतून मुलांना शिक्षण देणं ही बापूजींची पद्धत आजच्या पालक-शिक्षकांना उपयोगी पडावी खरंतर! मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ वाढल्याची तक्रार आज अनेक पालक करतात, याबाबतीत मुलांना आळा घालण्याविषयी बोलतात... पण प्रत्यक्षात ते काय करतात? त्यांचा जो वेळ मुलांसाठी राखीव असायला हवा त्यात ते कुणाशी-ना-कुणाशी फोनवर तरी बोलत राहतात किंवा स्क्रीनवर बोटं तरी नाचवत राहतात. मुलांना यातून काय संदेश जातो? फोन किंवा कुठलंही इलेक्ट्रॉनिक उपकरण हे कशाहीपेक्षा, अगदी आपल्यापेक्षाही अधिक महत्त्वाचं आहे हेच नकळत मुलं ग्रहण करतात. आपल्या मुलांनी फळं खावीत, भाज्या खाव्यात याचा आग्रह धरणारे पालक पेस्ट्रीजच्या पेस्ट्रीज मटकावतात, स्वतःच्या थंडगार पदार्थ खाण्यावर निर्बंध आणू शकत नाहीत तेव्हा निराशेनं मान हलवणंच शिल्लक उरतं. अशा ‘लोका सांगे...’ वृत्तीच्या पालकांना आणि शिक्षकांना सोयीस्कर विसर पडतो की, आपण वागतोय त्याचंच अनुकरण मुलं करणार आहेत.
बापूजींकडे आश्रमात राहायला येण्याआधीही शाळेचं मला काही विशेष आकर्षण नव्हतं, ना शाळेचा प्रभाव होता माझ्यावर. उलट शिक्षकांचा भिववणारा अनुभव होता माझ्या गाठीला. दक्षिण अफ्रिकेतल्या वर्णद्वेषामुळे कृष्णवर्णीय मुलांसाठी शिकवायला कुणी शिक्षक सहसा मिळत नसे आणि श्वेतवर्णीयांसाठीच्या शाळेत कृष्णवर्णीय मुलांचा प्रवेश ही गोष्ट शक्य नव्हती. सहाव्या वर्षी मला शाळेत घालायची वेळ आल्यावर माझ्या आईवडलांनी आम्हांला जाता येईल अशी कॅथलिक कॉन्व्हेंट शाळा निवडली खरी... पण अडचण एकच होती. दर्बन शहरापासून ही शाळा अठरा मैल लांब होती. मी माझ्यापेक्षा सहा वर्षांनी मोठ्या बहिणीसोबत, सीतासोबत या शाळेत जायला लागलो. शाळेत वेळेवर पोहोचता यावं म्हणून आम्ही पहाटे पाचला उठून तयार व्हायचो नि कंटाळवाण्या, कष्टवणाऱ्या वाटेवर चालायला लागायचो. तयार झालो की एका उसाच्या शेतातून मैलभर चालत आम्हांला बसस्टॉपपाशी पोहोचायला लागायचं. तिथून चार मैलांवर असणाऱ्या रेल्वे स्टेशनवर बसनं पोहोचायचं आणि अखेर ट्रेन मिळाली की शाळा गाठायची असं चालायचं. हेच सगळं उलट्या क्रमानं पार पाडत आम्ही संध्याकाळनंतर घरी पोहोचायचो.
या शाळेच्या प्राचार्या सिस्टर रेगीस अतिशय कोरड्याथंड मनाच्या आणि करडी शिस्त असणाऱ्या होत्या. वर्ग सकाळी आठ वाजून वीस मिनटांनी सुरू व्हायचा. जर तुम्ही तोवर पोहोचला नसाल तर वर्गात न शिरता थेट त्यांचं ऑफिस गाठायला लागायचं. तिथं वापरून-वापरून घोटीव झालेली दणकट छडी तुमची वाट बघत असायची. मी आणि माझ्या बहिणीनं कितीतरी वेळा त्यांच्या छडीचा प्रसाद चाखला होता. सिस्टर रेगीसना आमची परिस्थिती ठाऊक होती. कुठंही क्षणभर वेळ वाया न घालवता आधी बस, नंतर ट्रेन अशी मजलदरमजल करत आम्ही शाळेत पोहोचतो, आम्ही अतिशय चांगलं वागणारी मुलं आहोत नि शिस्तभंग कधीच करणार नाही याची त्यांना कल्पना होती. आम्हांला मारून काही फायदा नाही, विनाकारण आम्हांला शिक्षा भोगावी लागतेय हे ठाऊक असूनही त्यांनी त्यांचा शिरस्ता कधी मोडला नाही.
त्यांच्या क्रूर शिक्षांमुळं माझ्या वागण्यात काही बदल होत नव्हता. त्यांच्या भीतीनं मी पुढच्या काळात शाळेत नेहमी वेळेवरच पोहोचलो असंही झालं नाही... कारण मुळात मी मुद्दामहून उशीर करतच नव्हतो. एक मात्र झालं, हळूहळू मी अतिशय चिडका होत गेलो आणि शाळेत जाणं माझ्या जिवावर यायला लागलं. ज्या मुलांना मारझोड होते ती भविष्यात अतिशय हिंसक होतात असं मानसोपचार तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हे तज्ज्ञ अगदी खरं बोलताहेत हे मी माझ्या अनुभवावरून खातरीपूर्वक सांगतो आहे. सिस्टर रेगीसकडून छड्या खाऊन, झणझणणारा हात घेऊन मी त्यांच्या ऑफिसातून निघायचो... तेव्हा मी चिडलेला असायचो हे साहजिक आहे... पण मला तिथून बाहेर पडताना अतिशय खुजं, शक्तिहीन वाटायचं. थेट जाऊन कुणालातरी असंच बडवावं अशी इच्छा असायची. मोठी माणसं जेव्हा लहान मुलांना मारतात तेव्हा हिंसेचं एक निरर्थक चक्र ती सुरू करत असतात हे लक्षात घ्यायला हवं.
मेम्फीसमध्ये मी शिक्षकांची एक कार्यशाळा घेत होतो. सगळे शिक्षक एकेक करून स्वतःचा अनुभव सांगत होते. मुलांना प्रसंगी छड्या देणं, थोबडवणं ही गोष्ट शिस्त लागण्यासाठी आवश्यक आहे असं मत सरसकट सगळेच मांडायला लागले तेव्हा मी खरोखर हादरून गेलो. एका शिक्षिकेनं तर सांगितलं की, वर्गातल्या मुलांना एकदा मारलं की असा काही धाक तयार होतो की, विचारू नका! त्यानंतर थोडे दिवस मुलं बिथरतील तेव्हा रागाची जळजळीत नजर टाकली तरी पुरतं. मुलं आपोआप सुतासारखी सरळ येतात. या शिक्षिकेला तिच्या कृतीचा कितीही अभिमान वाटला तरी सिस्टर रेगीसनी छड्या देण्याच्या अनुभवानं माझ्या जगण्यात खूप गोंधळ झाले, माझं खूप नुकसान झालं. कार्यशाळेत सामील असणारी शिक्षिका नकळत मुलांना हिंसेचे धडे देत होतीच... शिवाय मुलांना काबूत ठेवण्यासाठी हिंसेची पातळी तिला सतत वाढवत न्यावी लागली होती. मुलांना शिकवण्याच्या तिच्या पद्धतीमुळं ती मुलांच्या मनात अनादर पेरत होती, हिंसा पेरत होती. तिचे विद्यार्थी हळूहळू माणूसपणातून तुटत होते, अमानवीयतेकडे सरकत होते.
अमेरिकेतल्या शाळांमध्ये शिकवण्याची ही हिंसात्मक पद्धत स्वीकारार्ह आहे हे कळल्यावर मला धक्का बसला. तिथल्या एकोणीस राज्यांमध्ये शिक्षण देताना दिल्या जाणाऱ्या शारीरिक शिक्षेला रीतसर परवानगी देतात याचा पत्ता लागला तेव्हा तर मी कोलमडून पडलो. दरवर्षी अधिकारपदावर असलेल्यांकडून सुमारे दोन लाख मुलांना कोणत्या-ना-कोणत्या प्रकारची शारीरिक इजा केली जाते, मारझोड होते असं आकडेवारी सांगते. असल्या प्रकाराला ‘शिस्त’ म्हणणं थांबवून ही सरळसरळ लहान मुलांविरोधात केलेली हिंसाच आहे हे आपण मान्य करायला हवं. अधिकारपदावर असणाऱ्या लोकांना त्यांच्या नैराश्याच्या उद्रेकासाठी ही लहान-लहान मुलं आयती सापडतात आणि कारण नसताना सगळं मुलांवर शेकतं. शिकवण्याचे अधिक चांगले मार्ग निवडून सुसंस्कृत पद्धतीनं समजावण्यासाठी पालकांची नि शिक्षकांची कुवत कमी पडते तेव्हाच ते मुलांना शारीरिक मारहाण करण्याचा मार्ग निवडतात.
प्रश्न सोडवण्यासाठी जेव्हा पालक कायम मुलांना धाक दाखवणं, मारणं असे मार्ग निवडतात तेव्हा या मार्गांबाबतीतही ते हळूहळू अधिकाधिक वाईट तंत्रं वापरायला लागतात. वाढत्या वयातल्या एका मुलाची अशीच गोष्ट माझ्या कानांवर आली तेव्हा माझ्या पोटात खरोखर गोळा आला होता. या मुलाच्या गळ्यात ‘आय ॲम ए बुली. हॉन्क इफ यू हेट बुलीज’ अशी पाटी अडकवून त्याला दाराबाहेर उभं करण्यात आलं होतं. जे पालक आपल्या मुलाला ‘मी खूप त्रासदायक आहे, गुंडच आहे. माझ्यासारख्यांचा तुम्हांला तिरस्कार वाटत असेल, राग येत असेल तर येऊन थेट विचारा...’ असं म्हणायला लावून त्याचं प्रदर्शन मांडतात तेव्हा त्यांना कळायला हवं की, हा अत्यंत क्रूर छळ आहे! शिक्षेचा असा समारंभ मांडणारे पालक खरे ‘बुली’ आहेत माझ्या मते! आपल्यापेक्षा कमजोर असणाऱ्यांना अपमानित करण्यासाठी ताकद वापरणारे खरे छळवादी. पटतंय ना? मुलांना स्वतःबदल शरम वाटेल अशी परिस्थिती उत्पन्न करणं, त्यातून घडणाऱ्या भावनिक हिंसेची जाणीव नसणं याचे पडसाद उमटणारच असतात. आपण कल्पना करू शकणार नाही इतके हे पडसाद तीव्र असू शकतात.
आणखी एका घटनेनं मी असाच हादरून गेलो होतो. आपल्या तेरा वर्षांच्या मुलीनं असभ्य म्हणावेत असे तिचे खासगी फोटो तिच्या शाळेतल्या एका मुलाला पाठवले... यामुळे चिडून शिक्षा म्हणून तिच्या बापानं तिचे लांबसडक केस कापून टाकले. इतकं करून बापाचा राग शांत झाला नाही. त्यानं शिक्षेच्या वेळी भीतीनं, अपमानानं थरथरणाऱ्या या मुलीचं शूटिंग केलं आणि शेवटी स्वतः फ्रेममध्ये झळकून पाहणाऱ्यांना प्रश्न विचारला, ‘हेच योग्य होतं ना?’ हा व्हिडिओ अखेर यूट्यूबवर पोहोचला. त्यानंतर काही दिवसांनी या मुलीनं एका पुलावरून उडी मारून आपलं जीवन संपवलं.
एखादी किशोरवयीन मुलगी किंवा मुलगा आत्महत्येच्या विचारापर्यंत यायला खूप गोष्टी कारणीभूत असू शकतात. मुलगी कायमचीच गेल्यामुळं आता शोकाकुल अवस्थेतला बाप आपण केलेला छळ आठवून स्वतःला पुन्हापुन्हा हाच प्रश्न विचारत असेल... ‘हेच योग्य होतं ना?’
मुलांना शिकवताना नेहमी अहिंसात्मक पद्धत वापरावी, त्यासाठीची साधनंही तशीच... हानी न करणारी असावीत असं बापूजींना वाटायचं. शारीरिक मारहाण, समोरासमोर येऊन तुंबळ हाणामारी यांसारख्या सरसकट दृश्यहिंसेपेक्षा खूप सूक्ष्म पातळीवरच्या हिंसेबद्दल विचार व्हावा याकडं ते लक्ष वेधायचे. अहिंसात्मक पद्धतीनं मुलांचं संगोपन करायचं एकदा ठरलं की प्रेम आणि आदर या मूल्यांची जपणूक करायची हे घरच्या सगळ्यांचं समान ध्येय व्हायला हवं. बरेचदा होतं असं की, ठरलेल्या नियमांबद्दल पालक आणि त्यांची किशोरवयीन मुलं यांचा खटका उडतो. अशा वेळी पालक खूपच आग्रही भूमिका घेतात.
‘हे माझं घर आहे. तू इथं राहातोयस तोवर मी म्हणतो त्या नियमांचं पालन तुला करावंच लागेल...’ वगैरे. अशी भूमिका घेण्यानं होतं काय... की, पालक आणि मुलं दोन वेगवेगळ्या वर्तुळांत एकमेकांविरोधात उभी राहतात. यामुळं दोघांमधल्या संघर्षाबरोबरच वैमनस्यही वाढतं... मात्र एखादं कुटुंब जेव्हा प्रश्न सोडवण्यासाठी किंवा जीवनविचार म्हणून अहिंसामय मार्ग निवडतं तेव्हा सगळ्यांसाठी मिळून नि सर्वांना मान्य होईल असा सामंजस्यपूर्ण तोडगा काढला जातो, एकमेकांना पाठिंबा दिला जातो, मदत केली जाते. या जगात ‘आपण चुकलो आहोत म्हणून कदाचित मुलंही चुकत असतील.’ हे तत्त्व पालकांना मान्य असतं.
(अनुवाद: सोनाली नवांगुळ)
- डॉ. अरुण गांधी
Tags: पुस्तक अरुण गांधी महात्मा गांधी सोनाली नवांगुळ शिक्षण अहिंसा तरुण मुले लहान मुले अभ्यास शाळा संगोपन Book New Book Translation Gift of Anger Arun Gandhi Mahatma Gandhi School Teaching Education Non Violance Teenager Children Upbringing Load More Tags
Add Comment