वेगवान जगण्यापेक्षा शांततामय जगण्याची माणसाला जास्त जरूरी असते

वरदान रागाचे- भाग 6

बापूजी प्रवासाला जायचे तेव्हा हा अनुभव नेहमीचाच ... लोक त्यांच्याभवती गोळा व्हायचे, आनंदानं, उत्साहानं जल्लोष करायचे, घोषणा द्यायचे! तरी बापूजींच्या एका दर्शनाने लोक किती भावनाविवश होतात याचा मला थेट अनुभव नव्हता. एकदा रेल्वेनं रात्रभर प्रवास करून मुंबईला पोहोचायचं होतं. त्या प्रवासात त्यांच्या अन्य सहकाऱ्यांबरोबर मीही होतो. मला या प्रवासात सोबत घेताहेत म्हणजे आपण कुणीतरी खास आहोत असं वाटत होतं. बापूजींचा तिसऱ्या वर्गानंच प्रवास करण्याचा हट्ट होता, पण रेल्वे प्रशासनानं एक जादा डबा खास त्यांच्यासाठी रेल्वेला जोडला. इतर प्रवाशांप्रमाणं आमच्या डब्यात नरम बैठक नव्हती, ना उशा होत्या. आम्ही कडक बाकावर बसून प्रवास करत होतो. - तरी आमच्यासाठीचा एक खास डबा जोडला जाणं हे विशेषच की!

प्रवास सुरू झाल्यापासून ज्या पहिल्या स्टेशनवर आम्ही थांबलो तिथं फलाटावर शेकडो माणसांची गर्दी झाली होती. लोक आजोबांना हाका मारत होते, त्यांना स्पर्श करायचा प्रयत्न करत होते. हळूहळू ‘गांधी चिरायू होवो... लाँग लिव्ह गांधी...’ अशा घोषणांच्या जणू लाटाच्या लाटा सगळीकडून येऊ लागल्या. समाजात आजोबांबद्दल असणारा आदर, लोकप्रियता जाणवून मला आणखी अभिमान वाटायला लागला. अंगावर रोमांच उभे राहिले. लोकांच्या प्रेमाची इतकी उधळण चालू असताना बापूजी नेहमीप्रमाणे अगदी नम्र नि शांत होते, पण मला त्यांच्यासारखं शांत राहाण्याची ही युक्ती साधलेली नव्हती. 

आजोबांबद्दल आदर असणाऱ्या माणसांची संख्या अफाट होती, त्यांना बापूजींच्या सहवासात काही क्षण तरी राहायचं होतं आणि माझं नशीब असं की मी तर चक्क बाकावर त्यांच्या शेजारी बसलेलो होतो! केवढा मोठा गौरव आहे हा या विचारानं मी उत्तेजित झालो होतो. मी वळून वळून बापूजींकडं बघत होतो, पण त्यांना स्वत:च्या मानसन्मानाविषयी फार काही वाटतंय असं दिसत नव्हतं. उलट लोकांच्या प्रेमाला ते हात हलवून, त्यांच्याशी बोलून प्रतिसाद देत होते आणि हातातली सुती पिशवी खिडकीतून बाहेर काढून लोकांकडून गरीबांसाठीचा निधी जमवत होते. प्रत्येकानं या पिशवीत आपल्या ऐपतीप्रमाणं निधी टाकला. एक बाई बापूजींना म्हणाली, ‘‘माझ्याकडं नाहीत हो पैसे...’’ तेव्हा त्यांनी हळूवार स्मित करत तिच्या हातातल्या चांदीच्या कड्याकडं बोट केलं. ‘‘हे चालेल का? ठीकाय मग.’ असं म्हणत तिनं सहजपणानं आपलं चांदीचं कडं त्या पिशवीत सरकवलं.

त्या स्टेशनवरून गाडी पुढं गेल्यावर बापूजींनी थकल्यासारखा सुस्कारा सोडला आणि हातातल्या कामाकडे वळले. मात्र पुढच्या स्टेशनवर गाडी थांबली तेव्हा आधीपेक्षा मोठी गर्दी त्यांची वाट बघत होती. तेच सगळं पुन्हा घडलं. खरंतर आम्ही या ठिकाणी पोहोचेपर्यंत मध्यरात्र झाली होती तरी हर्षभरित लोकांचं उधाण दर नव्या स्टेशनवर अगदी तसंच येत राहिलं. बापूजींना भेटायला, त्यांची एक झलक पाहाण्यासाठी धडपडणाऱ्या उत्साही लोकांमुळं गाडीतील प्रवाशांना चढणं-उतरणं मुश्किल झालं होतं. सगळे प्रवासी गर्दीतून कशीबशी वाट काढत होते. बापूजीही प्रत्येकवेळी हात हलवून, तर कधी बोलून लोकांच्या प्रेमाला उत्तर देत होते, पिशवीत निधी गोळा करत होते. लोकांकडून इतका मोठा सन्मान मिळणं ही गोष्ट कितीही सुंदर वाटली तरी खूप दमवणारी असते हे मला तत्क्षणी जाणवून गेलं. संपूर्ण प्रवासभर त्यांना शांतता नव्हती नि रेल्वेमधल्या अन्य लोकांनाही.

बापूजींबरोबर जसजसा मी अधिक प्रवास करत गेलो, मला जाणवलं की दिवस असो की रात्र त्यांच्या येण्याची बातमी कळली की लोक गर्दी करतातच. त्यांचा करिश्मा होताच असा. जर प्रवास कारने चाललेला असला तर रस्त्यांवर मैलोन्‌मैल रांग त्यांच्या स्वागतासाठी उभी असे. कुणी त्यांना हाका मारे, कुणी घोषणा देई, कोणाला अश्रू आवरेनासे होत. अशा प्रवासांचं नियोजन व्यवस्थित जाहीर करून लोकांपर्यंत माहिती पोहोचवायची आजच्यासारखी सोशल मिडियाची सोय तेव्हा नव्हती. उलट त्याकाळात बहुतांशी लोक खेड्यांत राहायचे, फोनसारख्या आज सोप्या वाटणाऱ्या गोष्टीही तेव्हा सहज उपलब्ध नव्हत्या. तरी ‘गांधीजी’ येताहेत ही बातमी सगळीकडे अचूक कशी पोहोचायची याचं काहीही स्पष्टीकरण मला देता येत नाही. कुठलीतरी अगाध शक्ती दरवेळी न चुकता हे घडवते असं सांगण्याहून वेगळं काय समजावणार मी स्वत:ला!

लोकांचं प्रगाढ प्रेम हृदयात जपून ठेवण्यामागे बापूजींची स्वत:ची अशी राजकीय कारणं होती. त्यांना माहिती होतं की त्यांच्या एका हाकेवर शेकडो, हजारो, लाखो लोक एकत्र येतील आणि ते सांगतील तो त्याग करायला तयार होतील. मात्र प्रत्येक गोष्टीची किंमत द्यावी लागते तशी या आदराची नि मानमरातबाचीही, हे मला लवकर कळलं.

एकदा कुठल्याही दौऱ्यासाठी आश्रमातून बाहेर पडलं की बापूजींना शांतता नि एकांत मिळणं दुरापास्त. भारतातल्या कुठल्याही खेड्याशहरात ते येताहेत अशी बातमी लागली की तास्‌नतास रस्त्यावर रांगेत थांबलेली, त्यांना पुकारणारी, क्षणभर तरी ते दिसावेत म्हणून डोळ्यांत जीव आणून वाट बघणारी झुंबड उडे. या प्रेमाला त्यांनी हात हलवून, नमस्कार करून उत्तर दिलं की गर्दी नाहीशी होई, पण नवी माणसं ती जागा ताबडतोब घेत. दररोज पहाटे तीन वाजता उठण्याचा बापूजींचा शिरस्ता असे. पहाटे पाचच्या प्रार्थनेनं त्यांचा दिवस सुरू होई, त्यामुळं झोपायची वेळही लवकर. रात्री नऊ वाजता ते झोपून जात. मात्र प्रवासादरम्यान सतत भेटत राहाणाऱ्या लोकांमुळे त्यांची रात्रीची झोप आश्रमात असे तशी शांत व स्वस्थ नसे. त्यामुळं येणाऱ्या अस्वस्थतेनं रागाचा भडका उडावा इथंवर परिस्थिती होई, पण बापूजी कधीही आपला शांतपणा गमावून उद्विग्न होत नसत.

जॉर्ज क्लूनी आणि ॲन्जोलिना जोलीसारख्या सेलिब्रिटीजच्या प्रसिद्धीची भुरळ पडून लोकांना तशाच प्रसिद्धीची स्वप्नं पडायला लागतात. या कलाकारांबद्दलचं आकर्षण इतकं तीव्र असतं की सतत त्यांच्याभवती फोटोग्राफर्स आणि फॅन्स यांचा गराडा सहज दिसतो ... लांबून बघताना अनेकांना वाटतं की क्लूनी किंवा जोलीसारख्या जागतिक कीर्ती लाभलेल्या ताऱ्यांना आपलं नाव सतत चर्चेत राहाण्यामुळं आतून केवढ्या गुदगुल्या होत असतील! खरंच तर आहे, आपल्या प्रत्येक गोष्टी बद्दल उत्सुकता असणारे लाखो चाहते जगभरात आहेत ही कल्पना आकर्षक आहेच. बापूजींबरोबर प्रवास करताना मलाही मी थोडासा सेलिब्रिटी असल्यासारखं वाटायला लागलं होतं, आणि हो, या वाटण्याची मला गंमत येत होती. 

लोकांच्या लेखी तुम्ही फार महत्त्वाचे असल्यानं चहूबाजूंनी प्रेमाचा नि कौतुकाचा वर्षाव व्हायला लागतो तेव्हा अहंकार कुरवाळला जातो. या सगळ्या गमतीचं जाऊ दे, पण आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आली. असंख्य तारेतारका स्वत:चं हक्काचं खाजगी मिळावं म्हणून सुट्टीसाठी कुठलंतरी खाजगी बेट किंवा कडेकोट व्यवस्था असणारं ठिकाण का निवडतात आणि लोकांना व प्रेसला एकांतासाठी का विनवतात हे माझ्या लक्षात आलं. हॉलीवूड हिल्सच्या सीमेच्या आत त्यांना सुरक्षित का वाटतं याची कारणं माझ्या नीट लक्षात आली. मनोरंजन क्षेत्राची गरज सतत समोर दिसत राहाणं, चर्चेत राहाणं. लोकांच्या भावविश्वाचा, आकर्षणाचा केंद्रबिंदू होण्यात या व्यवसायाचं यश आहे. मात्र या धबडग्यातून अलगदपणे स्वत:च्या हक्काचा खाजगी वेळ मिळवणं व स्वत:त रमत आणखी चांगल्या तऱ्हेनं लोकांमध्ये असण्याची ताकद कमावणं हीही त्यांची गरज. असा एकांत मिळवता आला तरच नवीन काही करता येणं शक्य होतं.

आजकाल मिडिया काही माणसांना त्यांच्यात विशेष उल्लेखनीय काही नसलं तरी सेलिब्रिटी बनवते. चमकदार नक्षीकाम केलेला झुळझुळता गाऊन घालून रेड कार्पेटवर उभं राहिलेले किंवा विदेशातल्या एखाद्या रमणीय बीचवर हातभर बिकिनी घालून बागडतानाचे फोटो हे तथाकथित सेलिब्रिटी सोशल मिडियावर टाकतात. त्यांना सोशल मिडियावर लाखो चाहते लाभतात. कधी एखाद्या मॅगझीनवर झळकलेल्या मुखपृष्ठावरचा असाच एखादा फोटो बघून मी जर कुणाला विचारलं, ‘‘फोटो तर असा छान झळकलाय, पण ही कोण? ती नेमकं काय करते?’’ तर लोक त्याबद्दल नक्की काही सांगू शकत नाहीत. अभिनेता/अभिनेत्री असणारे, राजकीय नेते किंवा मानवी मूल्यांसाठी काम करणारे अभ्यासक, कार्यकर्ते हे त्यांच्या कामाची गरज म्हणून लोकांच्या जीवनाचा भाग होतात. त्यांचं काम लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक असतं. त्यांच्या आयुष्यात त्यांनी स्वीकारलेल्या कामाचा काहीतरी महत्त्वाचा उद्देश असतो, प्रसिद्धी हा त्याचा अनुषंगिक परिणाम. मात्र ज्यांना केवळ प्रसिद्धीच हवी असते त्यांच्या आयुष्यात पोकळपणा असतो, त्यामुळं तात्कालिक चमकोगिरी करत लोकांच्या आकर्षणाचा भाग होऊन त्यांना ही पोकळी भरून टाकायची असते. लोकांच्या वाहवाहीमुळं ती भरतेच! - आणि मग या तथाकथित सेलिब्रिटीजचा अहंकार फुलतो. कुठल्यातरी विशेष कौशल्यामुळं, जगण्यात अनुसराव्या अशा आदर्शामुळं यश मिळण्याऐवजी त्यांना लोकप्रियता लाभते ती निव्वळ प्रसिद्ध असल्यामुळं. खऱ्या सेलिब्रिटीजना गरजेचा वाटतो तसा काही काळाचा एकांत यांना अजिबात गरजेचा वाटत नाही, कारण मुळात पुनर्भरणाची, रिचार्जची गरजच त्यांना नसते. 

सिनेमा स्टार किंवा महात्मा यांनाच एकांताची गरज असते असं नाही. तुम्हा-आम्हालाही असते. संगीत नव्हे तर साधं जगण्यासाठीही! आपल्याला सगळ्यांनाच स्वत:तल्या खऱ्या ‘मी’ची ओळख होणं महत्त्वाचं आहे. आजोबा नेहमी गंमतीत म्हणायचे की त्यांना खरा एकांत केवळ दोनच ठिकाणी लाभतो, एक आश्रमात आणि दुसरं म्हणजे तुरूंगात. स्वत:च्या खाजगी एकांताला जपणं हे अंतर्मनातील शांततेसाठी खूप आवश्यक असतं. या प्रचंड कोलाहलाच्या, सतत धावणाऱ्या जगात स्वत:साठी एकांताची जागा मिळणं खूप आवश्यक नि महत्त्वाचं आहे. ती मिळवता येते तेव्हा आपली ऊर्जा पुन्हा ताजी व नवी होते.  एकांतासाठीची जागा काही फार आगळी वेगळी असण्याची गरज नाही. तुम्हाला अगदी तुमच्या खोलीत कुठल्याही विचलनाशिवाय तासभर बसता आलं तरी पुरेसं आहे. पलंगावर लोळत असाल किंवा कागदावर मनातलं काही लिहित असाल तरी चालतं. मुळात काय की आपल्या व्यस्त जगण्यातील काही काळ आपल्याला त्याचा आढावा घेण्यासाठी, चिंतनासाठी, चिकित्सेसाठी मिळायला हवा. त्यातून आपली माणूस म्हणून वाढ होण्यासाठी ऊर्जा मिळते. चिंतन नि आत्मपरिक्षणासाठी असा खाजगी वेळ काढता येण्यानं आपण पुन्हा बाहेरच्या जगात येऊन माणसांशी अधिक चांगल्या व अर्थपूर्ण पद्धतीने जोडले जातो.

आश्रमातल्या दैनंदिनीत प्रत्येक सोमवारी बोलण्याचा उपवास असे, म्हणजे मौनव्रत. तो पूर्ण दिवस बापूजी लिहिण्यात घालवत. मग मात्र आठवड्यातल्या त्यानंतरच्या दिवसात त्यांना निष्क्रिय शांतता नको असे! आपण मूक असताना केलेलं चिंतन आणि त्याचं जगण्यातून उमटलेलं कृतीशील प्रतिबिंब ही खरी कार्यसिद्धी असा त्यांचा विश्वास असे. एकतानता साधण्यासाठी ते नेहमी चरख्याचा आधार घेत. चरख्यातून सूत काढण्याच्या कृतीशी शरीर पूर्णपणे तादात्म्य पावतं आणि त्यातून चिंतनासाठीचा अवकाश तयार होतो असं त्यांचं याबाबतचं म्हणणं. आश्रमात असताना माझा चरख्यावर चांगला हात बसला होता. त्यामुळं मी कधीकधी बापूजींना आव्हान द्यायचो, की बघू, तुम्ही जास्त वेगात सूत कातता की मी! अशा स्पर्धेला त्यांचा विरोध नसे. एकदा त्यांनी माझ्या आईवडिलांना पत्रात आनंदानं लिहिलंही होतं, ‘‘अरूणने कितीतरी वेळा चरख्यावर मला सहजपणानं हरवलं आहे.’’

चरखा मुळात सूत कातण्यासाठी आणि त्यातून घडणाऱ्या चिंतनासाठी असताना मी त्याचं रूपांतर असं खेळात करून टाकायचो, पण तरी, चिंतन व सूतकताई दोन्हीही होतंय ना, याकडं आमचं लक्ष असायचं. त्यातूनच मला तासन्‌तास शांत राहाणं, स्वत:सोबत असणं आवडायला लागलं. पुढच्या एका पत्रात बापूजींनी या गुणाचाही कौतुकानं उल्लेख केला, ‘‘शांतता टिकवून ठेवणं ही आपल्या सगळ्यांचीच गरज आहे, हे आपण शिकावं अरूणकडून!’’

मुलांना सतत या ना त्या गोष्टीत गुंतवून ठेवून आपण त्यांच्या भावी आयुष्यासाठी फार मोठ्ठं काही करतोय असा अनेक पालकांचा समज असतो. मुलांनी शाळेतून परतल्यानंतर त्यांच्याकडे उरलेला जेमतेम वेळ सॉकर गेम आणि टेनिस सराव शिवाय नृत्याचे नि जिमनॅस्टिकचे धडे, पियानो आणि व्हायोलीनची शिकवणी यापैकी एका अगर अनेकांनी ते भरून टाकतात. या शिकवणीकडून त्या शिकवणीकडे धावणाऱ्या मुलांना निव्वळ विचार करायला, निव्वळ खेळायला असा वेळच उरत नाही. आपण एकटेच असू तर आपण काय करू, आपण नक्की कोण आहोत हे शोधण्यासाठीही यामुळे वेळ उरत नाही. सगळ्या कला नि खेळांमधून जी समृद्धी मिळते ती चांगलीच आहे, पण पालकांनी मुलांना दिलेलं उत्तम बक्षीस हे त्यांना स्वत:पाशी राहू देण्याचं असेल! मुलांना त्यांचा एकट्याचा वेळ पालकांनी अध्येमध्ये देत राहायला हवा.

बऱ्याचशा प्रौढ माणसांचं रोजचं वेळापत्रक हे कामांच्या नि उपक्रमांच्या गर्दीनं भरून वाहत असतं. रात्र थोडी नि सोंगं फार अशी अवस्था होते, पण गंमत अशी की ‘या सगळ्या कष्टातून कसं यश मिळालं, त्यापायी झोपही कशी पूर्ण होत नाहीये...’ अशा बढाया मारण्यात त्यांना धन्यता वाटते. एकावेळी असंख्य आघाड्यांवर काम करणं, वेगवान दिवसामध्ये विरामाचा क्षणही न लाभणं, चिंतनाचा अभाव, झालेल्या हानीबद्दल पुनर्विचारासाठी उसंत न मिळणं हा सगळा आजच्या जीवनाचा भाग होऊन बसलाय. ही अवघड जीवनशैली खूप काळापासून चिंतेचा विषय होऊन बसली आहे. एकदा आजोबांचा एक जर्मन मित्र त्यांना भेटण्यासाठी आश्रमात आला होता. ‘तुमच्या दिवसातला एक तृतीयांश वेळ झोपण्यात जातोय हा खूप मोठा गुन्हा आहे’, असं म्हणत त्यानं आम्हाला छेडलं. बापूजींनी मात्र त्याला लगेच उत्तर दिलं होतं, ‘‘अरे बाबा, हा वेळ झोपण्यात घालवल्यामुळं आयुष्यातला उरलेला तेवढाच वेळ नीट जगणं शक्य होतं!’’

बापूजींचं म्हणणं होतं की वेगवान जगण्यापेक्षा शांततामय जगण्याची माणसाला जास्त जरूरी असते. कॉम्प्युटर्स, स्मार्टफोन्स आणि डिजिटल ॲप्सनी आपल्या जगण्याची गती वाढवली आहे, त्याचे फायदेही चिक्कार आहेत, पण हे फायदे तोट्यांना वगळून येत नसतात. हे खरंय की या प्रगत साधनांनी हजारो मैलांवर असणाऱ्या माणसांशी आपण एका क्षणात संपर्क साधू शकतो. पण त्याआधीच्या काळात आपण लांबलचक पत्रांमधून आपल्या घरच्यांबद्दल, आजूबाजूच्या निसर्गाबद्दल जी सविस्तर वर्णनं करायचो त्याची जागा आता त्रोटक नि कोरड्या ई-मेल्सनी घेतली आहे. इमोटिकॉन्समधून मानवी संबंध अधिक चांगले होतात असं खरंच तुम्हाला वाटतं? खरंच त्यातून शांततेबद्दलची जाणीव प्रगल्भ होते?

सोशल मिडियातून आपल्याला बरेच मित्र आणि फॉलोअर मिळतात, पण आपण लक्षपूर्वक पाहिलं तर कळतं आपली ही नाती अधिक झिरझिरीत आणि लेचीपेची असतात. तिकडून जे ‘मित्र’ मिळतात त्यांचा तातडीच्या वेळी आपल्याला उपयोग होईलच असं सांगता येत नाही. फेसबुकवर किंवा टि्वटरवर फोटोमधून माहिती झालेल्या अशा मित्रांपुढं आपण विषमतेसारखा मुद्दा मांडला किंवा सहिष्णूतेबद्दल चर्चा करु लागलो तर तितकं गांभीर्यानं पाहिलं जात नाही. समंजस व शहाणा समाज घडवण्यासाठी असे विस्कळित संबंध उपयोगाचे नसतात.

तरीही मी म्हणेन की आधुनिक तंत्रज्ञानाला दोष देऊन निकालात काढणं चूक आहे. जर योग्य पद्धतीनं हे तंत्रज्ञान वापरलं तर संवाद अधिक चांगला होण्यासाठी आपण प्रयत्न करू शकू, त्यातून सकारात्मक बदल घडवू शकू. दोन-चार वर्षांपूर्वी कधीतरी मी बर्लिनला गेलो होतो, शांतता परिषदेच्या निमित्तानं. परिषदेला माझे मित्र दिपक चोप्रा माझ्या शेजारी बसले होते. समोर चाललेली भाषणं ऐकता ऐकता ते त्यांच्या स्मार्टफोनवर काहीतरी करत होते. नंतर त्यांनी जाहीर केलं की अमुक वक्त्याचं भाषण जवळपास वीस लाख लोकांपर्यंत पोहोचलं आहे! माझ्या या मित्राचे सोशल मिडियावर वीस लाख फॉलोअर्स आहेत हे ऐकून मला आनंद झाला. शांतता परिषदेत झालेल्या चर्चा नि व्याख्यानं यांच्यातील महत्त्वाचे मुद्दे सोशल मिडियाच्या माध्यमातून इतक्या माणसांपर्यंत पोहोचवण्यात तो यशस्वी झाला! सटरफटर काही गोष्टी करण्याऐवजी या तंत्रज्ञानाचा असा उपयोग करण्यानं अनेकांच्या आयुष्यात काही बदल नक्की घडू शकतो.

(अनुवाद: सोनाली नवांगुळ)

- डॉ. अरुण गांधी
 

वाचा 'वरदान रागाचे' या लेखमालेतील पहिले पाच भाग:

1. प्रास्ताविक- आजोबांकडे मिळालेले धडे
2. त्यांनी संताप आणि वीज यांची तुलना समोर ठेवली...
3.तोडगा काढणे हे ध्येय असेल तर तो मार्ग योग्य असतो..
4. विक्षिप्तपणाचं त्यांना वावडं नव्हतं, मात्र...
5. गरीबीचं उदात्तीकरण त्यांना करायचं नव्हतं, आणि...

Tags: पुस्तक अरुण गांधी महात्मा गांधी सोनाली नवांगुळ एकांत सोशल मिडिया आत्मपरीक्षण Book New Book Translation Gift of Anger Arun Gandhi Mahatma Gandhi Seclusion Solitutde Social Media Introspection Load More Tags

Add Comment