बदल घडवायचा तर दृष्टीकोन सकारात्मक हवा

वरदान रागाचे- भाग 25

आफ्रिकन-अमेरिकन व्यक्तींवरील अमेरिकन पोलिसांच्या अत्याचाराविरोधात अमेरिकेत सुरू असलेल्या निदर्शनातील एक दृश्य. | फोटो सौजन्य- AFP

आजच्या काळातली जागतिक नेतेमंडळी पाहून बापूजी उदास झाले असते, खरोखरच... आपल्या देशातल्या माणसांचं जगणं सुधारण्याऐवजी स्वतःमध्ये रमलेले, स्वतःची स्थिती आरामदायक व्हावी म्हणून झटणारे सुखलोलुप नेते बघताना बापूजींसारख्या कनवाळू माणसाला  साहजिकच दुःख झालं असतं. ज्यांच्या हाती सत्ता असते त्यांनी तिचा उपयोग त्यांचे सहकारी, त्यांची कुटुंबं, त्यांचा देश यांच्या उत्थानासाठी करायला हवा असं बापूजींचं राजकारण त्यांना सांगायचं... मात्र तसं नेहमी घडणार नाही हेही त्यांना ठाऊक होतं. ‘जनतेविषयीच्या खऱ्या कळवळ्यातून आणि प्रामाणिकपणातून सत्ता लाभते. तसं नसेल तर तिचे लगाम ज्यांच्या हाती त्यांना ती भ्रष्ट करते.’ बापूजी जे म्हणाले त्याचं दृश्यरूप बरेचदा आपल्याला आसपास दिसतं. सरकारातील बहुतांश अधिकारी आणि नेतेमंडळी निवडणुकांमध्ये यश मिळवून वैयक्तिक प्रगती साधतात आणि या मार्गावरून चालताना द्वेष आणि तिरस्कार वाढीला लागेल असं वर्तन करत राहतात. त्यांना लोकांनी निवडून दिलंय त्यामुळं शासनाच्या त्या जागेचा, लोकशाहीचा त्यांनी मान ठेवला पाहिजे याचं विस्मरण त्यांना  होतं. लोकशाहीच्या ताकदीला ते कमी लेखतात.

आपल्या आसपास होणारा अन्याय, भडकणारे दंगेधोपे यांच्याविरोधात आपण कसे उभे राहू शकू? तर सगळ्यात आधी आपण त्याकडं नीट पाहायला हवं. यासाठी बापूजींसंदर्भातलं तुम्हाला ठाऊक असलेलंच उदाहरण मी देतो.

1895मध्ये दक्षिण अफ्रिकेत, ‘माझ्या रेल्वेच्या डब्यात मी काळ्या रंगाचा माणूस बसू देऊ शकतच नाही!’ ही भूमिका घेत गोऱ्या माणसानं रेल्वे पोलिसांकडं तक्रार करून आजोबांना रेल्वेतून सामानासुमानासकट ढकलून दिलं. वर्णभेदविषयक किती टोकाचा पूर्वग्रह समाजात आहे याचा बापूजींना आलेला हा पहिला अनुभव. त्या तुसडेपणानं आणि घृणेनं ते हादरून गेले होते. तिथल्या भारतीयांना त्यांनी हा अनुभव सांगितला  तेव्हा ऐकणाऱ्यांनी केवळ खांदे उडवले. त्यांपैकी कुणी म्हणालं, ‘जर गोऱ्याला तुम्ही डब्यात नको होतात तर तुम्ही उठून दुसऱ्या ठिकाणी जाऊन बसायचं ना?’ बापूजींनी उत्तर दिलं, ‘का उतरावं? का दुसरीकडे जावं? हा अन्याय आहे. मूकपणानं अन्याय सहन करता कामा नये.’

रोज घडणाऱ्या अन्यायाला कुठलाही विरोध न दर्शवता उदासीन राहिल्यामुळं अन्यायाची जाणीव गमावलेल्या माणसांकडं पाहून बापूजींना तीव्रतेनं जाणवलं, ‘आपण स्वतःला जितकं छळतो तितकं बाहेरचं कुणी छळू शकत नाही.’

आपल्यावर होणारा अन्याय हळूहळू सवयीनं आपल्याला दिसायचा बंद होतो... इतरांच्या दडपणुकीबाबतीतही हेच घडतं. आपल्या दैनंदिन इच्छाआकांक्षा आणि आपलं जगणं यांत आपण इतके गुंतून जातो की, ‘पाहणं’ थांबतं. उपद्रवी, निर्लज्ज वागणुकीकडं ‘हे काय नेहमीचंच’ म्हणून आपण पाहायला लागतो आणि हळूहळू तसंच पाहायला शिकतो.

बापूजी कुठल्याही गोष्टीबद्दल एक मंत्र सांगायचे, ‘लगेच. आत्ता!’ आसपास होणाऱ्या अन्यायाकडं, विषमतेकडं जाणीवपूर्वक लक्ष द्या. अन्यायाकडं, कुठल्याही तऱ्हेच्या कट्टरतेकडं न पाहिल्यासारखं करून तिचा स्वीकार करू नका. आपण शक्य तितक्या पद्धतींनी लढा द्यायला हवा. रागाकडं रागानं आणि द्वेषाकडं द्वेषानं पाहून काहीच हाती येत नाही हे बापूजींनी ओळखलं होतं. जे प्रश्न सोडवण्याची आपली इच्छा असते त्यांचा या मार्गांनी गुणाकार होतो. ते वाढतात. बापूजी म्हणायचे, तुम्हाला बदल घडवायचा तर दृष्टीकोन सकारात्मक हवा... प्रेम, सामंजस्य, व्यक्तिगत पातळीवर त्याग करण्याची तयारी आणि परस्पर आदर यांतून सकारात्मकता आकार घेते.

आजोबांना बदल घडवायचा असायचा... तेव्हा त्यांचा सगळ्यात पहिला मार्ग संवादाचा असायचा. संवादाचा मार्ग फोल जायचा तेव्हा ते मोठ्या प्रमाणात आंदोलनाला सुरुवात करायचे... त्यामुळं त्या विशिष्ट घटनेशी जोडलेल्या माणसांची सहानुभूती त्यांना मिळायची. विषयाकडं लक्ष वेधलं जायचं.

बापूजींच्या अहिंसक सत्याग्रहाचा मार्ग कदाचित आज तितका प्रभावी ठरणार नाही असं वाटलं तरी कोणतं अंतिम ध्येय साधायची आपली इच्छा आहे याचा विचार शांतपणानं करता येईल. उदाहरणार्थ, तरुण अफ्रिकन-अमेरिकन माणसावर पोलिसांनी केलेली आक्रमक चढाई आणि गोळीबार ही गोष्ट अतिशय निर्घृण आहे आणि या घटनेचा धिक्कार करायलाच हवा... मात्र त्यानंतर झालेल्या निषेधांमध्ये अपराध्याला शिक्षा झाली पाहिजे हीच गोष्ट लोकांनी लावून धरली.

बापूजी दूरचा विचार करायचे. अशा माणसांना जबाबदार मानून जाब विचारायलाच हवा ही खरी गोष्ट आहे... पण सामाजिक हिताच्या दृष्टीनं त्याहून व्यापक विचार होणं गरजेचं ठरतं. गोळीबार करण्याच्या कृतीमागे कसली भीती नि कुठले पूर्वग्रह आहेत यांची छाननी करून मुळाला हात घातला जायला हवा आहे असं बापूजींना वाटलं असतं. असे पूर्वग्रह आणि तऱ्हतऱ्हेच्या भीती तशाच दाबलेल्या राहिल्या तर किंवा त्यांची विचारणा झाली नाही तर सगळं नीट झालंय असंच पुढची घटना घडत नाही तोपर्यंत आपल्याला वाटत राहतं. तिकडं जरा पाहायला हवं.

घटनेचा तिरपा छेद घेऊन खोलवर असलेला पक्षपात आणि त्यातून बनलेली वृत्ती पाहण्याचं भल्याभल्यांच्या नजरेतून सुटून जातं. आमच्या ‘एम.के. गांधी इन्स्टिट्यूट फॉर नॉनव्हायोलन्स’ या संस्थेत होणाऱ्या ‘डायव्हर्सिटी’ विषयावरच्या कार्यशाळेत आम्ही एक वेगळी वाट चोखाळली आहे. ही कार्यशाळा घेणारी व्यक्ती वेगवेगळ्या व्यक्तींच्या फोटोचे मास्क सहभागींना घालायला लावते. हे मास्क जगभरातल्या असंख्य वंशांच्या माणसांचे असतात. समोरच्या छोट्या आरशात स्वतःला पाहा असं मास्क घातला की सांगितलं जातं. मास्कमधल्या डोळ्यांतून कुठल्यातरी निराळ्याच अनोळखी माणसाची छबी आरशात दिसल्यावर पहिल्यांदा सगळेच दचकतात. ‘सध्या आपण दिसतोय ते नेमके कोण आहोत?’ याचं वर्णन करण्यासाठी प्रत्येकाला दोन मिनटांचा वेळ असतो.

कार्यशाळेत सहभागी झालेली माणसं ही विभिन्न वंशांची, उच्च-मध्यम वर्गांतली असतात. प्रत्येकाची पार्श्वभूमी निराळी असते. सहभागींशी आधी बोलणं होतं तेव्हा त्यांनी कबूल केलेलं असतं की ‘आम्ही कुठलेही पूर्वग्रह किंवा गैरसमजुती बाळगत नाही.’ मात्र आरशात स्वतःचं निराळं रूप पाहिल्यावर प्रत्येकाला जाणीव होते, आपलं चुकत होतं स्वतःबाबतीत. माणसांनी आरशातल्या स्वतःच्या रूपाबद्दल वर्णन सांगितलं की, तोवर अव्यक्त राहिलेली, प्रचलित परंपरा आणि समजुती सुप्तावस्थेत ठेवलेली आपल्या मनाची प्रतिमा दिसायला लागते. आपल्या आतल्या अपरिचित चेहऱ्याशी आमनासामना झाल्यानं आपल्याला कळतं की, वंश, जातधर्म, लिंग आणि वय अशा कितीतरी पातळ्यांवर आपण आपल्या अपेक्षा कशा रचत जातो. अशा प्रयोगातून स्वतःशी कबुली देण्याच्या प्रक्रियेत माणूस बदलायला मदत होते.

दक्षिण अफ्रिकेत अतिशय टोकाच्या पूर्वग्रहाला मी तोंड दिलं होतं. त्यातले धोके मला कळले होते. पूर्वग्रहाचे कितीतरी पदर मला बापूजींबरोबरच्या संवादातून कळत गेले आणि पूर्वग्रहांविरोधात, चुकीच्या रूढ समजुतींविरोधात आपण प्रत्येक पातळीवर लढा द्यायला हवा याचा निश्चय मनातून होत गेला. तरी खरं सांगतो... आमच्या संस्थेच्या कार्यशाळेच्या निमित्तानं मला याबाबत जास्त स्पष्टता आली. माणूस कसा दिसतो यावरून त्याची किंमत ठरवण्याची चूक मीही बाकी सगळ्यांप्रमाणेच केलेली आहे. इतकं कळूनही माझी यातून सुटका झाली नव्हती.

बापूजींना समाज बदलायचा होता. लोकांनी एकमेकांमधले फरक पाहण्यापेक्षा जुळणाऱ्या गोष्टी पाहायला हव्यात असं त्यांना वाटायचं. समाजातल्या काही गटांनी मात्र आता वेगळाच पवित्रा घेतला आहे. त्यांनी समाजात झालेल्या फाटाफुटीचा वापर करण्याचं ठरवलेलं दिसतं. आमचा सन्मान व्हायला हवा, आमचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं अशी मागणी स्वतःचं वेगळं अस्तित्व दाखवून हे फुटीरतावादी गटतट करताना दिसत आहेत. त्यातून ते समाजाला दुर्बळ करण्याचा डाव टाकत आहेत. त्यांना खरंतर सामंजस्य आणि स्वीकार नकोच आहे. त्यांना त्यांच्या-त्यांच्या अटींवर स्वतंत्र आणि स्वैर जगायची इच्छा आहे. त्यांचे जे काही प्रश्न आणि जगण्याचे झगडे असतील त्यांप्रति माझी पूर्ण सहानुभूती आहे... पण मला ठाऊक आहे की, वेगळी चूल मांडून केली जाणारी लढाई कठीण आहे. ‘फोडा आणि राज्य करा’ ही नीती कधीही, कुठल्याही समाजाचं भलं करू शकलेली नाही. विभाजित देश असो किंवा समाज कधीतरी संपूर्णपणे मोडून पडतोच. आजचा काळ हेच सत्य सांगतो.

आपल्या घरापलीकडं एक जग आहे याचं भान कितीतरी नेते गमावून बसतात. असं वागतात जणू बाहेरचं जग अस्तित्वातच नाहीये... मात्र बाहेर वसणारं जग आता आक्रसत चाललं आहे. वंशांच्या, धर्मांच्या, जातींच्या कितीतरी खोल प्रतवाऱ्या होऊन बसल्या आहेत. बापूजींना काळाची ही पावलं कळली होती.

आज जे चित्र दिसतं त्यानं मन विदीर्ण होतं. वाटतं, आपल्या-आपल्या जातीचा, वंशाचा गट करून तुटून वेगळं जगायचं आणि कामापुरतं मुख्य प्रवाहात मिसळायचं असं खरोखर होऊ नये. आपण सगळ्यांनी सगळ्यांच्या हितासाठी, एकत्र स्वप्नं बघत नि ध्येय ठरवून जगायला हवं, काम करायला हवं.

अमेरिकन जनता स्व-ओळखीच्या राजकारणात अडकली आहे. इथं माणसं आपापल्या समाजात-गटात स्वतंत्रपणे राहतात. ही भिन्नता ठळक करण्यासाठी मतदानाच्या रांगाही राखल्यासारख्या करण्यात आल्या आहेत. एकूण देशाच्या हितासाठी लोक मतदान करत नाहीत, आपल्या लहानमोठ्या समाजाच्या कल्याणासाठी योग्य वाटतं ते करतात. (उपरोधाची गोष्ट अशी की, ज्या प्रतिनिधीला किंवा राजकीय पक्षाला मत दिलं जातं त्यांनाही देशाची, आपल्या समाजाची फिकीर नाही. स्वतःची प्रगती साधण्यात त्यांना रस असतो.) आपण आपल्या समाजाबाहेरचं मोठं जग पाहतो, आपली नजर विस्तारतो तेव्हा खऱ्या समतेची जाण आपल्याला येते. खऱ्या लोकशाहीत सगळे केवळ समान असतात असं नाही... तर सगळ्यांना समान आदर लाभतो आणि सगळ्यांचं स्वागत असतं.

‘राजकारणातल्या नेतेमंडळींकडं बरेचदा सत्याला रहस्याच्या बुरख्यात दडपून ठेवण्याची युक्ती असते... त्यामुळं सत्य एकदा अस्पष्ट झालं की कायमस्वरूपी तोडगा ठरू शकतील अशा महत्त्वाच्या गोष्टींकडं लक्ष वेधण्यापेक्षा तात्कालिक आणि अनावश्यक गोष्टी करण्यात हे नेते गुरफटतात, जनतेला गुरफटवतात.’ बापूजींनी करून दिलेली ही आठवण खरंतर सगळ्या मतदानकेंद्रांमध्ये ठळक अक्षरात झळकवली पाहिजे. आपणही आपल्या भोवताली हेच चित्र बघत आलेलो आहोत. राजकीय अभियान आणि मोहिमा या गोष्टी त्या-त्या नेत्याच्या वैयक्तिक प्रश्न-अपेक्षा आणि खोटी आश्वासनं यांतून कोत्या होत गेल्या आहेत, जागतिक परिप्रेक्ष्यातून विचार करून आवश्यक गोष्टी तडीस नेणं बाजूला सारलं जात आहे. अशा तोकड्या दृष्टीकोनांमुळंच आजवर माणसांना सोसावं लागलं आहे, देश विच्छिन्न झाले आहेत. 

दूरदर्शीपणाचा अभाव हा विचित्र आजार आहे.

(अनुवाद: सोनाली नवांगुळ)

- डॉ. अरुण गांधी

'वरदान रागाचे' या लेखमालेत प्रसिद्ध झालेले इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा... 

Tags: वरदान रागाचे अहिंसा महात्मा गांधी अमेरिकन आफ्रिकन वंशभेद Book New Book Translation Gift of Anger Arun Gandhi Mahatma Gandhi Sonali Navangul Non- Violance African American Police Brutality Black Lives Matters Load More Tags

Add Comment