बापूजींचा मारेकरी उजव्या विचारांच्या फळीतला होता. जातिव्यवस्था नष्ट व्हायला हवी आणि सगळ्यांना समान वागणूक मिळायला हवी या त्यांच्या तत्त्वज्ञानावर खवळलेला होता. अशाच साच्यातले लोक बापूजींविषयीच्या आठवणी नि विचार यांना कमी लेखायचं काम सातत्यानं करत आले आहेत. सगळ्याच धर्मांत काहीतरी चांगलं असतं त्यामुळं जे चांगलं ते ओळखून त्या-त्या धर्मातल्या श्रद्धांवर आणि आस्थांवर भरवसा ठेवायला हवा. ‘प्रत्येक धर्माचरणाचे मार्ग वेगवेगळे असले तरी अंतिमतः त्यांचं सांगणं एकच असतं. अखेर सगळ्यांचं ध्येय एकच असेल, मुक्कामाची जागा एकच असेल तर कुठल्याही मार्गानं गेल्यानं काय फरक पडेल?’ बापूजी सगळं सुटं आणि सोपं करून सांगायचे.
बापूजींना मूलभूत सत्याचा शोध घ्यायचा असायचा... त्यामुळं मूळ धर्मग्रंथांपर्यंत पोहोचा आणि त्यातले सकारात्मक भाग शोधा असं ते लोकांना नेहमी सांगायचे. दृष्टीकोन संकुचित असणाऱ्या माणसांना नेहमी स्वतःचं म्हणणंच बरोबर वाटतं. दुसऱ्यांना कमी लेखण्यातून ते ताकद मिळवत राहतात. समाजाच्या प्रश्नांना, शंकांना सामोरं जायची त्यांना भीती वाटते. ज्यांचा दृष्टीकोन व्यापक असतो त्यांच्यावर हल्ला करण्यात अशा लोकांना आनंद मिळतो. अशी माणसं बघून बापूजी नक्की म्हणाले असते, भित्र्या माणसांकडं तसूभर श्रद्धा नसते. तिथं गुंतू नका.
अल्बर्ट आईन्स्टाईन या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञानं बापूजींबद्दल म्हटलं होतं, ‘असा कुणी माणूस पृथ्वीवर पाय ठेवून गेला यावर पुढच्या पिढ्यांचा विश्वास बसणार नाही.’ यू.एस.सेक्रेटरी ऑफ स्टेट्स जॉर्ज सी.मार्शल म्हणाले होते, ‘गांधी म्हणजे मानवजातीच्या विवेकाचा प्रवक्ता!’ आणखी एकानं म्हटलं होतं, ‘विनम्रता आणि सत्य या गोष्टी कुठल्याही साम्राज्याहून अधिक ताकदीच्या असतात हे सिद्ध करून दाखवणारा माणूस म्हणजे बापूजी.’
बापूजींकडं ना कुठलं पद होतं, ना कुठलं कार्यालय, ना संपत्ती. त्यांनी कुठलंही सैन्य उभारलं नाही, साम्राज्यं उभारली नाहीत की सापेक्षतेच्या सिद्धान्ताचा शोधही लावला नाही... मात्र त्यांनी सांगितलेलं सत्य आपल्या हृदयापर्यंत खोलवर पोहोचलं... म्हणूनच त्यांची प्रतिमा आणि त्यांचं नाव आपल्याला इतकं पूज्य वाटतं.
आश्रमात असताना बापूजींनी माझ्या दुर्गुणांची आणि दोषांची यादी तयार करायला मला सांगितलं होतं. एकदा सगळे वाईट गुण कळले की याला फैलावर घेता येईल असं त्यांना वाटत होतं का? मुळीच नाही. उलट कुठले दोष सुधारता येतील याचा अंदाज येण्यासाठी ही यादी होती. आपल्यातल्या कमतरता रूप पालटून आपलं शक्तिस्थान कशा होतील याचं स्पष्टीकरण आपल्याला स्वतःशी यातून करता येतं. अखेरीस आपलं ध्येय कालच्यापेक्षा आज आपण अधिक चांगलं माणूस होण्याचं आहे. जसजसं आपण दोष सुधारण्याचा प्रयत्न करायला लागतो, आपल्याला ‘स्नोबॉल’ परिणाम दिसायला लागतो. सुधारण्याचा परीघ वाढायला लागतो. मी आयुष्यभर अशाच पद्धतीनं स्वतःमध्ये बदल करत आलो आहे. जगावर आपल्या असण्याचा सकारात्मक परिणाम व्हावा यासाठी सातत्यानं प्रयत्न करण्याची गरज असते असं बापूजींनी सांगितल्यामुळं मी त्या दिशेनं रोज जाणीवपूर्वक प्रयत्न करत राहतो.
अमेरिकेला राहायला गेल्यावर तिथल्या शक्य तितक्या विद्यार्थ्यांशी संवाद घडून बापूजींचं जगण्याचं तत्त्वज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचवावं असं मला वाटायचं. माझ्या नावावर पीएच.डी.ची उपाधी नसल्यामुळं महाविद्यालयांमध्ये शिकवण्यासाठी मला परवानगी मिळायची नाही. बापूजींना मात्र असल्या औपचारिकतेची गरज कधी पडली नाही. जिथं जो विचार पोहोचवण्याची गरज जाणवायची तिथं ते कसंही करून पोहोचायचे... त्यामुळं आजोबांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन त्यांच्याच नावे मी अहिंसेवर कार्य करणारी एक संस्था स्थापन केली आणि या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घ्यायला लागलो, भाषणं द्यायला लागलो. व्यक्तिगत पातळीवर अनेक विद्यार्थ्यांबरोबर काम करताना आणि लोकांना न्यायाची संकल्पना समजावून सांगताना, संघर्ष संपवण्याचे मार्ग सांगताना बापूजींच्या कल्पना जीवनाला किती जोडून घेणाऱ्या आहेत हे मला आणखी उलगडत गेलं. माणसामाणसांमधले दुरावे, टणक भिंती फोडून टाकण्यासाठी आणि संवादाचा सेतू तयार करण्यासाठी बापूजींचं तत्त्वज्ञान अतिशय प्रभावी काम करतं याचा अनुभव मी घेत होतो.
1990च्या सुरुवातीच्या काळात पोलिसांच्या पाशवी वागणुकीमुळे आणि वांशिक भेदामुळे होणाऱ्या अन्यायाविरोधात लॉस अँजेलीसमध्ये दंगे उसळले. मी त्यावेळी मेम्फिसमध्ये राहत होतो. हिंसेचा लोळ तिथवर आला तेव्हा जमावाला शांत करण्यासाठी मी हस्तक्षेप करावा अशी विनंती जवळपासच्या लोकांनी माझ्याकडं केली. अशा वेळी काय करायचं हे माझ्या मनात ठरलं होतं. जमावाला शांत करण्यासाठी, त्यांचं मन वळवण्यासाठी आजोबांसारखी चुंबकीय ताकद माझ्याकडं नव्हती... मात्र बापूजी अशा प्रसंगी किती तऱ्हेचे पर्याय अजमवायचे ते मी पाहिलं होतं. सगळ्यात आधी ते प्रार्थनेसाठी सगळ्यांना साद घालायचे आणि प्रश्नांवर एकत्र चर्चा करू या म्हणत संवाद सुरू करायचे.
मेम्फिसमध्ये विषय तापला... साधारण आठवड्याच्या मध्यांतरानंतर गुरुवारी. मी त्यातल्या त्यात जलद म्हणजे रविवारी प्रार्थनासभेचं आयोजन केलं होतं. वेगवेगळ्या धार्मिक आणि अन्य श्रद्धा बाळगणाऱ्या सगळ्याच लोकांना या सभेचं निमंत्रण मी दिलं होतं. मी ज्या विद्यापीठाच्या परिसरात राहायचो त्यांच्याच विश्वस्तांपैकी एकांना विचारलं होतं या कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भात... तर त्यांनी हा व्याप मोठा असेल त्यामुळं किमान दोन आठवडे तयारीसाठी लागतील असं मला सांगितलं होतं. दोन आठवडे! मी त्यांना म्हणालोही, घर आज जळत असेल तर दोन आठवड्यांनी पाणी फवारण्यात काय अर्थ?
मेम्फिसमधल्या वेगवेगळ्या धार्मिक संस्थांमधल्या आणि चळवळींतल्या लोकांना एकत्र करण्यासाठी माझ्या सहकाऱ्यांनी बरीच मदत केली. प्रार्थनासभेत येऊन शांतता आणि सुसंवाद यांविषयीची एखादी प्रार्थना पाच मिनटांसाठी जरूर सादर करावी असं आम्ही निमंत्रण देताना प्रत्येक गटाला सांगितलं होतं. हे गट किती मोठे आहेत, लहान आहेत, संस्था किती लोकप्रिय आहेत, त्यांचं समाजात वजन आहे अथवा नाही या गोष्टींशी मला सोयरसुतक नव्हतं... प्रत्येकाला आम्ही पाच मिनटं प्रार्थनेसाठी दिली होती. याचा परिणाम काय होणार हे काळानं ठरवलं असतं... प्रयत्न करणं आपल्या हाती होतं.
जवळच असलेल्या फुटबॉलच्या एका मोठ्या मैदानावर आम्ही सगळ्यांची व्यवस्था केली होती. प्रार्थनासभेसाठी या ठिकाणाची निवड करणं सर्वार्थानं उचित वाटलं मला. हे निर्विवाद निःपक्षपाती ठिकाण होतं. चर्च, मशीद किंवा सिनेगॉग अशा ठिकाणी प्रार्थना घेतली असती तर त्याचा अर्थ बदलत गेला असता. आपल्या भावनांची कदर केली गेलीय आणि आपल्याला समानतेनं वागवलं गेलंय असं मैदानात उपस्थित प्रत्येकाला वाटलं. आमच्या आवाहनाला प्रतिसाद देत जवळपास तीस भिन्नधर्मीय गटांनी पाच मिनटांसाठी शांततेचं आवाहन करणारी प्रार्थना सादर केली. त्या दिवशी फुटबॉल मैदानाच्या गोल पोस्टजवळ सगळ्यांमध्ये विलक्षण समजूत, मैत्री आणि समरसतेची भावना निर्माण झाली. आपल्यात खूप कमी गोष्टी जुळतात असं वाटणारी माणसं त्या दिवशी एकमेकांकडं पाहून स्मितहास्य करत होती, एकमेकांना मिठ्या मारत होती. आत्मिक तृप्तीच्या या झऱ्याचा परिणाम पुढचे कित्येक आठवडे जाणवत राहिला. मेम्फिसवर ओढवू पाहणारा अनर्थ या प्रार्थनासभेमुळं टळला असं कितीतरी दिवस माणसं म्हणत राहिली.
आपण दुसऱ्यांसमोर खुले होतो, मोकळेपणा ठेवू लागतो तेव्हा शांतीची आणि आशावादाची फुलं उमलायला लागतात. मग कुणीही एकटा उरत नाही, सगळ्यांनी सगळ्यांसाठी उभं राहण्याची भावना बळावते. आश्रमाच्या वास्तव्यात आजोबा याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट आग्रहानं सांगायचे, आपल्या रक्ताच्या नातेसंबंधांपलीकडं संपूर्ण मानवजातीशी नातं मानायला हवं. ते एक विस्तारित कुटुंब असतं. आपल्या भावंडांचं दुःख दूर करण्यासाठी आपण खासगी पातळीवर जसा त्याग करतो तशीच वर्तणूक शेजाऱ्यापाजाऱ्यांसाठी असायला हवी. अगदी अनोळखी माणसांना मदत करण्यासाठीही आपण लहानमोठे व्यक्तिगत त्याग करायला हवेत. आधी मला राग यायचा की, बापूजी मला कसलीच सवलत देत नाहीत. शेवटी त्यांचा सख्खा नातू म्हणून मला इतरांपेक्षा काही महत्त्व आहे की नाही? खूप नंतर माझ्या लक्षात आलं की, बापूजी काहीतरी महत्त्वाचं नि मोठं सांगू पाहताहेत. आपल्यापैकी बहुतांश जण या मोठ्या जगातला आपला इवलासा भाग सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडत असतो... पण आपण विसरतो की, आतून आपण सगळेच एकमेकांशी सूक्ष्मपणे जोडले गेलेलो असतो, एकट्यानं वाढण्याची-फुलण्याची क्षमता आपल्यात नसते.
आपल्या सगळ्यांमध्ये किती वेगळेपणा आहे या मुद्द्यापेक्षा आपण सगळे कुठल्या समान धाग्यांनी जोडले गेलोय याकडं व्यापक दृष्टीकोनातून पाहिलं तर आपण स्वतःला नि जगालाही फार मौल्यवान भेट देऊ शकतो. जग उरलं तर आपलं अस्तित्व उरणार आहे. जगभरात श्रीमंत अधिक श्रीमंत होताहेत नि गरीब अधिक गरीब. तुम्ही पहिल्या गटातले असता तेव्हा तुम्हाला काळजीचं कारण नाही असं वाटून जातं... मात्र या वाढणाऱ्या दरीत भरच पडेल असं वर्तन आपण करत राहिलो तर संघर्ष जास्तजास्त पेटणार हे निश्चित. यातून आपण स्वतःला दुखवू, जगालाही दुखवत राहू.
आशियातल्या, अफ्रिकेतल्या आणि लॅटिन अमेरिकेतल्या गरीब वर्गाला अन्न शिजवण्यासाठी, अन्य दैनंदिन गोष्टींसाठी इंधनच मिळत नाही तेव्हा ते इंधनासाठी अख्खं जंगल कापत नेणार हे साहजिक आहे. पर्यावरणाच्या या हानीतून होणारा परिणाम आपल्याला सुरक्षित कसा ठेवू शकणार? सगळ्या गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत आणि म्हणूनच आपणही सगळे एकमेकांवर अवलंबून आहोत. स्वतःचं आयुष्य ऐशआरामात जावं म्हणून जगभरातली वीस टक्के लोकसंख्या पृथ्वीतलावरची ऐंशी टक्के नैसर्गिक संसाधनं वापरत राहते तेव्हा ऐंशी टक्के माणसांना अतिशय हलाखीचं जीवन जगावं लागतं. सगळ्याच जगावर मोठी आपत्ती आणणारी ही गोष्ट आहे.
अमेरिकन जनता तर आणखी धोकादायक चूक करून बसलीय. आपलं सुखासीन जगणं चालू ठेवण्यामध्ये कुणी बाधा आणत असेल तर भिंत घालून त्यांचं येणं-बोलणं सगळंच टाळायचं अशा वृत्तीनं ही जनता अन्य माणसांपासून तुटली आहे. कुठल्याही संघर्षाला तोंड फुटलं की सैन्यबळानं सगळं आटोक्यात येतं असा एक अजब विश्वास जनतेच्या मनात असल्यामुळं त्याचा परिणाम दिसून येतोच म्हणून तर अमेरिकेत जवळपास 60 टक्के फेडरल बजेट सैन्यासाठी आणि विनाशकारी शस्त्रास्त्रं घेण्यासाठी खर्च केलं जातं. आम्ही आमची सगळी ताकद शस्त्रास्त्रं तयार करण्यात खर्च करतो आणि त्यांचं उत्पादन इतकं प्रचंड की, जगभर ती निर्यात केली जातात. सैन्यबळाच्या बाबतीत आपण सर्वोच्च आणि शक्तिशाली आहोत हे युनायटेड स्टेट्सला ठाऊक आहे, त्यांनी जगभर आपल्या या ताकदीचं प्रदर्शनही केलं आहे. याऐवजी आता त्यांनी नैतिक बळाच्या बाबतीत आपली शक्ती जगाला दाखवण्याची गरज आहे. स्पष्टपणे सांगायचं तर आता स्वतःच्या फायद्यापलीकडं जाऊन आपण जगामध्ये चांगल्या गोष्टी करण्यासाठी उत्सुक आहोत असं अमेरिकेला वाटायला हवं आहे. तसं वाटण्यातून आणि त्यानुसार कृती करण्यातून खूप बदल घडतील.
9/11ची घटना घडल्यानंतर त्यावरची प्रतिक्रिया अमेरिकेनं इराकवर बॉम्बहल्ले करून दिली. मध्यपूर्वेत आधीच उसळलेला हिंसाचार आणि उद्ध्वस्तता यातून आणखी वाढली. 9/11घटनेत इराक विनाकारण गोवला गेला असं लक्षात आल्यावर अमेरिकेनं अतिरेक्यांविरोधात मोर्चेबांधणी केली. कितीतरी वर्षं उलटली तरी हे युद्ध चालूच आहे, शेवट कुठं होणार आहे कळत नाही. या सगळ्यातून जगात शांतता प्रस्थापित व्हायची चिन्हं दिसण्याऐवजी पॅरिस-ब्रुसेल्समध्ये आणि मध्यपूर्वेत होणारे आतंकवादी हल्ले अधिकाधिक धोकादायक होत चालल्याचं आपण पाहतो आहोत.
अनेकदा लोक मला विचारतात, ‘आत्ता गांधीजी असते तर आतंकवाद आटोक्यात आणण्यासाठी त्यांनी काय केलं असतं?’ मला वाटतं, बापूजींनी आधी परराष्ट्रीय धोरणात बदल केले असते. अधिकाधिक मिळवण्याच्या हव्यासाऐवजी त्यांनी करुणेच्या तत्त्वावर हे धोरण बांधलं असतं. त्यांनी सगळ्या धोरणकर्त्या नि त्याच्या पालनकर्त्या माणसांना नीट समजावून सांगितलं असतं की, प्रत्येक माणसाचं जगाशी असणारं नातं हे परस्पर आदर, सामंजस्य आणि स्वीकार यांच्यावर बेतलेलं असतं. 9/11 च्या घटनेनंतर त्यांनी सगळ्या अमेरिकन नागरिकांना सांगितलं असतं, ‘भल्या माणसांनोऽ इतकी टोकाची निराशा आणि त्यातून उसळलेली हिंसा यांचे स्रोत ओळखा आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करा... माणसं अधिकाधिक आक्रमक होऊन अधिक विनाशकारी हल्ल्यांकडं सरसावतात तेव्हा आपले उपचार चुकताहेत असं लक्षात घ्यायला हवं.’ यावर काही अमेरिकन नागरिक म्हणाले असते, ‘हो... हो... हो... थांबा जरा. आम्ही कुठंही चुकलेलो नाही. मुळात लक्षात तुम्ही घ्या की, हल्ला आम्ही केलेला नाही, आमच्यावर झालाय.’
बरोबर आहे... मात्र जगात द्वेषाची नि तिरस्काराची पातळी वाढतच चालली असेल तर आपण ती नाहीशी करण्याचा प्रयत्न नको का करायला? आजोबा असते तर युनायटेड स्टेट्सवर रागावलेल्या माणसांना, त्या-त्या देशांना जाऊन भेटले असते आणि दोन्ही बाजूंचे संबंध सुधारण्यात त्यांनी पुढाकार घेतला असता.
‘अशांततेतून शांतता जन्माला येत नसते. एखाद्या अवघड गोष्टीसाठी प्रयत्न करणं म्हणजे काटेरी झाडाझुडपांना हात घालणं, त्यांचे घोस पदरात घेणं.’ आजोबा म्हणाले होते. माणसाच्या विनम्रतेतून जखमा बऱ्या व्हायला लागतात, त्याउलट उद्धटपणातून हिंसेला चिथावणी मिळते.
(अनुवाद: सोनाली नवांगुळ)
- डॉ. अरुण गांधी
'वरदान रागाचे' या लेखमालेत प्रसिद्ध झालेले इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा...
Tags: सोनाली नवांगुळ वरदान रंगाचे अहिंसा गांधी हत्या Book New Book Translation Gift of Anger Arun Gandhi Mahatma Gandhi Sonali Navangul Non- Violance Gandhi Assasination Load More Tags
Add Comment