परस्परांबद्दलचा आदर आणि सामंजस्य यांतूनच जग पुढे जाण्याची शक्यता आहे

वरदान रागाचे- भाग 21

महात्मा गांधी यांचे सर्वांत ज्येष्ठ नातू (मणिलाल यांचे चिरंजीव आणि तुषार यांचे वडील) अरुण गांधी वयाच्या 88व्या वर्षीही समाजकार्यात सक्रिय आहेत. त्यांचे बालपण आणि तारुण्य दक्षिण अफ्रिकेत तर नंतरचे आयुष्य भारतातल्या इंग्लीश पत्रकारितेत गेले. निवृत्तीनंतर ते अमेरिकेत वास्तव्य करत आहेत. वय वर्षे 11 ते 13 या काळात ते आजोबांच्या सहवासात राहिले, त्याचा सखोल प्रभाव त्यांच्या विचारांवर आणि कार्यावर राहिला आहे. ते स्वतःला शांती पेरणारा शेतकरी (Peace Farmer) असे संबोधतात. त्यांचे 'Legacy of Love' (‘लिगसी ऑफ लव्ह’) हे पुस्तक मराठीत 'वारसा प्रेमाचा' या नावाने गेल्या वर्षी साधना प्रकाशनाकडून आले आहे. त्याचाच उत्तरार्ध म्हणावे असे छोटे पुस्तक म्हणजे 'Gift of Anger' (‘गिफ्ट ऑफ अँगर’)... त्याचा मराठी अनुवाद ‘कर्तव्य’वरून प्रत्येक शुक्रवारी आणि शनिवारी क्रमशः प्रसिद्ध करत आहोत. लेखमालेचा समारोप 2 ऑक्टोबरला होईल. या लेखमालेतला हा 21 वा लेख.  
- संपादक

शारीरिक इजा करण्याहून पलीकडं कितीतरी हिंसा अस्तित्वात असते... त्यामुळेच अहिंसा समजून घेताना तिचे विविध बारकावे आणि कंगोरे लोकांनी समजून घ्यायला हवेत असं बापूजींना वाटायचं. त्यांनी अहिंसेची पाच मूलतत्त्वे सांगितली होती. त्यांचं पालन मीसुद्धा करायला हवं पण त्याआधी ती नीट समजून घ्यायला हवीत अशी त्यांची इच्छा होती. मला ते पटलं. अहिंसेच्या या पाच मूलभूत तत्त्वांच्या पायावर मी आजही जगतो आहे. 

ती तत्त्वं अशी...
आदर
सामंजस्य
स्वीकार
गुणांची पारख आणि त्यांची नोंद
करुणा आणि प्रेम

अनेकांचं म्हणणं असायचं की, बापूजींचे दृष्टीकोन आणि त्यांची स्वप्नं खूपच आदर्शवादी आहेत. खऱ्या जगात असं काही असत नाही. 

...मात्र माझा अनुभव सांगतो की, तसं नाहीये. बापूजींनी विचारपूर्वक ठरवलेली ही तत्त्वं खरंतर मानवी संस्कृतीचा मूलभूत भाग आहेत... मात्र आपण त्याकडं दुर्लक्ष करून खूप मोठा धोका स्वीकारतो आहोत.

माणूस कुठल्याही जातीचा, धर्माचा, वंशाचा, देशाचा असो... परस्परांबद्दलचा आदर आणि सामंजस्य यांतूनच जग पुढे जाण्याची शक्यता आहे. या सगळ्यांच्या आधारावर भिंती बांधणं, बांध घालणं अशा विभागणीनं राग वाढतो, बंडखोरी वाढते, हिंसा वाढते. त्याऐवजी आपण मोकळेपणा ठेवत आणि परस्परसामंजस्यानं आणि आदरानं वागत असू तर अहिंसेच्या तिसऱ्या तत्त्वाकडं आपण नैसर्गिकपणे जात असतो... स्वीकाराकडं! दुसऱ्यांचं म्हणणं समजून घेणं, त्यांचं स्थान समजून घेणं यांतून आपण अधिक शहाणे आणि खंबीर होतो.

अहिंसेची पुढची तत्त्वं... दुसऱ्यांच्या गुणांची पारख आणि उल्लेख आणि करुणा यांतून खासगी आयुष्यात माणूस म्हणून आपण समाधानी आणि परिपूर्ण होतो. त्यांतून जगभरातच एक सुंसवाद तयार व्हायला मदत होते. समोरच्याचे गुण ओळखून त्याचं खुल्या दिलानं कौतुक करता येण्याचा आपल्यावर आणि समोरच्या माणसाच्या जगण्यावर सखोल परिणाम होतो. त्यातून अतिशय प्रसन्न करणारे बदल दिसू लागतात... त्यामुळंच सांगतो, भरपूर पैसाअडका असणारा माणूस माझ्यालेखी श्रीमंत नव्हे, उलट जाणवणारं सौंदर्य आणि चांगुलपणा यांची पारख करून ज्याला लगोलग कौतुक करता येतं तो खरा श्रीमंत. प्रत्येक गोष्टीत शोधून-शोधून उणंदुणं दाखवणं, करवादत राहणं त्या मानानं सोपं आहे... खरंतर त्याऐवजी आपण रोजच्या जगण्यात चांगलं काय ते पाहून त्याचा मोकळा उल्लेख करू शकलो तर केवढे तरी आनंदाचे क्षण आपल्याला सहजपणानं लाभतील.

आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी बापूजींच्या नजरेतून सुटायच्या नाहीत. त्यांची नोंद घेण्यात बापूजी एकदम तरबेज. प्रत्येकातलं चांगलं त्यांना दिसायचं. मला हा गुण जगण्यासाठी फार महत्त्वाचा वाटतो. पुढे मी अमेरिकेला राहायला गेलो तरी कामानिमित्तानं भारतात अध्येमध्ये फेरी व्हायची तेव्हा लहान मुलांना, त्यांच्या कुटुंबीयांना भेटणं माझ्या यादीत हमखास असायचं. या भेटींदरम्यान मला जाणवलेलं आहे की, भारतातल्या या कुटुंबांकडं जगण्यासाठी आरामाच्या गोष्टी अमेरिकन माणसांच्या तुलनेत अगदी कमी होत्या, नव्हत्याच खरंतर. तरीही जे आहे त्याचं समाधान आणि त्याचा आनंद व्यक्त करण्याची वृत्ती त्यांच्याकडं होती.

आपल्याकडं जरुरीपेक्षा जास्तच ऐशाराम असल्यामुळं आहे त्याचं मोल मानण्याची आपली वृत्ती काळवंडून गेली आहे की काय अशी भीती मला वाटते. असं वाटतं की, हारीनं लावलेल्या आणि ‘अनलिमिटेड’ या टॅगसह सजलेल्या तऱ्हतऱ्हेच्या पदार्थांच्या बुफे मेजवानीसारखं आपलं आयुष्य झालं आहे. सगळं भरपूर उपलब्ध असल्यामुळं ताज्या सफरचंदाची गंमत आपल्याला चाखता येईनाशी झाली आहे.

बापूजींनी स्वतःचं डामडौलाचं आयुष्य खोडून काढत विलक्षण साधेपणा स्वीकारला. त्यांच्याइतका नाट्यमय वाटावा असा बदल आपल्या आयुष्यात आपण कदाचित करू शकणार नाही... पण ‘लेस इज समटाइम्स मोअर’ असं म्हणत आपण कमीतकमी गोष्टींमध्ये दर्जेदार जगण्याविषयी विचार करू शकतोच. कमीतकमी सामान असेल तर कमीतकमी विचलित व्हायला होईल आणि कदाचित त्यामुळं छोट्याछोट्या गोष्टींबद्दल कृतज्ञतेची भावना जाणवेल, ऋण व्यक्त करावंसं वाटेल. यातूनच आनंदाकडं जायची वाटही गवसेल.

कृतज्ञता कशाकशाबद्दल वाटायला हवी हे सहजपणे उमगत नाही... पण त्याचेही मार्ग आहेत. दिवसभराच्या घाईगडबडीला थोडा विराम देऊन क्षणभर सुंदर सूर्योदय आठवा... उमलणारी कळी, लहान मुलाचं खुदखुदणं... त्या क्षणांपाशी थांबणं ही कृतज्ञता आहे. स्वतःच्या आयुष्याकडं त्रयस्थपणे बघा, त्या विशिष्ट अंतरावरून जगभरातल्या तुमच्याशी जोडलेल्या अशा सगळ्या माणसांचा विचार त्यांना तुमच्या जागी ठेवून करा. समजा... ते तुमच्या जागी असते तर केवढे खूश असते!

तुमच्या कुटुंबाबद्दल, मित्रमंडळींबद्दल विचार करा, त्यांच्या कुठल्याकुठल्या गोष्टी तुम्हाला आवडतात, त्यांचं कशाबाबतीत कौतुक वाटतं त्या सगळ्याची यादी करा. ही यादी तुमच्या खासगी कप्प्यात ठेवा नि कधीतरी सवडीनं तिच्याकडं बघा... जुने दिवस आठवताना आपल्याला एक वेगळीच जाणीव व्हायला लागते... वेगळी समज आपल्यामध्ये येते... आणि कळतं की, कृतज्ञता ही खोल आतून येते, ती बाहेरून उसनी आणता येत नाही.

आपल्या जगण्यात किती सुंदर आणि चांगल्या गोष्टी आहेत याची दखल घेण्याऐवजी आपण काय नाही याचे पाढे वाचत बसतो तेव्हा आपण स्वतःशी हिंसाच करत असतो. जगभरातली आश्चर्यं नि चमत्कारिक गुपितं समजून घेण्यासाठी आणि त्यांविषयी कृतज्ञ राहण्यासाठी आपण कुठल्या विशिष्ट धर्माचे असण्याची गरज नाही. खरंतर यासाठी कुठल्याही धर्माची गरज नाही. जगातलं सगळं उदात्त नि मंगल आपल्या आवतीभोवती सहजपणानं अस्तित्वात आहे. लहानमोठ्या गोष्टींची दखल घेऊन त्यांच्याविषयीच्या सहजभावनेनं आपण आपल्या आतलं काही बदलतोच... पण जगाकडं पाहण्याचा आपला दृष्टीकोनही लखलखीत होतो.

आपल्यापेक्षा अधिकचं ज्यांच्याकडं असतं त्यांच्याशी आपण सहसा स्वतःच्या परिस्थितीची तुलना करतो... मात्र आपल्याकडं जे आहे त्याबद्दल कृतज्ञता बाळगण्यानं आपला प्रवास ज्यांच्याकडं काहीच नाही अशांसाठी उभं राहण्याच्या दिशेनं म्हणजे करुणेच्या दिशेनं होऊ लागतो. करुणेचा किंवा प्रेमाचा अर्थ एखादा धनादेश लिहून स्थानिक संस्थेला सुपुर्त करण्याहून थोडा जास्त आहे. अर्थात असे धनादेश कमी महत्त्वाचे नसतात. माझा मुद्दा वेगळा आहे. ज्या वेळी तुमच्या मनात करुणाभाव जागृत होतो तेव्हा तुम्ही समोरचा किती ताकदीचा आहे, त्याला काय वाटतंय हा विचार बाजूला सारून तो किंवा ती शक्य तितकी स्वावलंबी व्हावी म्हणून मदत करत असता. अशा भावनेतून तुम्ही समोरच्या माणसाला मदत करायला सरसावता तेव्हा तुम्हाला त्याचा आत्मसन्मानही कळू लागतो आणि सगळ्यांना समभावानं वागवण्याची खूण पक्की होते.

समोरच्या माणसांना समजून घेत तुम्ही त्यांच्या जगाचे भाग झालात आणि त्यांना तुमच्या जगाचा हिस्सा होऊ दिलंत की बापूजींच्या अहिंसेच्या मूलतत्त्वांविषयी आणखीच आस्था वाटायला लागते... कारण त्यांच्या पालनातून स्वतःबरोबर आसपासच्या माणसांना शांतता लाभावी, त्यांचं चांगलं व्हावं, एकूण जगाचं चांगलं व्हावं ही भावना मूळ धरू लागते. आपण अधिक विश्वात्म होतो.

याच पाच तत्त्वांना जगण्याचा भाग करून घेण्यानं खरोखर आपण सगळ्यांच्याच आयुष्यात आनंद निर्माण करू शकतो. मनात आणलं तर आदर, सामंजस्य, स्वीकार, गुणांची पारख व त्याची नोंद, करुणा आणि प्रेम या पंचसूत्रीनं आपण जग बदलवू शकतो.

परिस्थिती कितीही बिकट असली तरी बापूजी आपला संदेश जनमानसात पोहोचवण्याचा मार्ग कसाही शोधून काढायचे. मी आश्रमात राहायला होतो त्या वेळी आजोबा भारताच्या वतीनं प्रतिनिधी म्हणून लंडनला परिषदेला गेल्याची घटना मी सांगितली होती. आपल्या देशाच्या भवितव्याची चर्चा करण्यासाठी बापूजी तिथे गेले होते. इतक्या मोठ्या परिषदेला जातानाही त्यांनी स्वतःसाठी कपडे कुठले निवडले? हातावर सूत कातून बेतलेलं खादीचं धोतर आणि उपरणं हा त्यांचा गणवेशच तोवर तयार झाला होता... पण तो त्यांनी निवडण्याचं सबळ कारण होतं. लंडनला ते भारताचे प्रतिनिधी म्हणून जाणार होते... त्यामुळं आपल्या ‘दिसण्यातून’ भारताचं प्रतिबिंब त्यांना हवं होतं. आपल्या देशातले बहुसंख्य लोक भयंकर गरिबीत जगतात, त्याचं प्रतीक म्हणून त्यांचा हा साधा वेश होता. 

एका देशाचे प्रतिनिधी म्हणून योग्य त्या सन्मानानं ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांची राहण्याची व्यवस्था लंडनमधल्या उच्चभ्रू ठिकाणी केली होती... मात्र बापूजींनी नकार दिला. ते म्हणाले, ‘‘शक्य असेल तर सूतगिरणी कामगारांचा पाहुणा म्हणून त्यांच्यामध्येच राहायची माझी इच्छा आहे....’’

ब्रिटिश अधिकारी त्यांचं म्हणणं ऐकून उडालेच. भारतातला कापड उद्योग भारतातच राहावा ही बापूजींची भूमिका आणि त्यामुळे ब्रिटिश कापडउद्योगावर झालेला परिणाम या पार्श्वभूमीवर हे अधिकारी बापूजींना बघत होते. बापूजींच्या नेतृत्वाखाली विणकरांनी, एकूणच भारतीयांनी आपलं कापड स्वतःच विणायचा निश्चय केल्यामुळं भारतातून कापूस नेऊन, प्रक्रिया करून महागड्या दरात पुन्हा भारतात कापड विकायचा ब्रिटिशांचा उद्योग पूर्वीप्रमाणे चालेनासा झाला होता... त्यामुळं अर्थातच तिकडच्या कामगारांच्या मेहनतान्यात कपात झाली. परिणामी, ब्रिटिश कापड उद्योगाशी संबंधित लोक बापूजींवर चिडून होते.

‘‘तुम्ही या कामगारांबरोबर राहिलात तर तुमची खैर नाही. ते तुम्हाला जिवंत सोडणार नाहीत.’’ एका अधिकाऱ्यानं इशारा दिला.

‘‘आमची धडपड तुम्ही सुरक्षित राहावं यासाठी आहे. त्यांच्यामध्ये तुमच्याविषयी प्रचंड राग भरलेला आहे हे लक्षात ठेवा.’’ पुन्हा त्यानं बापूजींना सावध केलं.

‘‘असं असेल तर मी त्यांच्याबरोबरच राहायला हवं हे नक्की होतंय! मी त्यांच्यासोबत राहिलो, बसलो तर भारतीय माणसांच्या या पवित्र्याबद्दल त्यांना सांगू शकेन...’’ बापूजी आनंदानं म्हणाले.

अनिच्छेनं का होईना... पण ब्रिटिश अधिकाऱ्यानं बापूजींचं म्हणणं मान्य केलं आणि त्यांना सूतगिरणी कामगारांकडं नेलं. बापूजी अतिशय आस्थेनं आणि समंजसपणानं त्या सगळ्यांना भेटले. अर्थात ती खासियतच त्यांची! त्यांनी मग त्या सगळ्यांना भारतातल्या विलक्षण गरिबीविषयी आणि लोकांच्या जगण्याच्या स्तराविषयी सांगितलं. स्वतःचे कपडे स्वतः बनवण्यातून काही गावं आपल्या किमान उत्पन्नाच्या सीमा थोड्या तरी पार करू शकली आणि त्यांची स्थिती किंचित सुधारली हेही बापूजींनी सांगितलं. आपल्या देशातल्या गरीब माणसांबद्दल सांगून ते थांबले नाहीत... तर आपल्याला ब्रिटनमधल्या कामगारांची हालत कळतेय आणि कुटुंबाला आणखी चांगले दिवस यावेत असं कामगारांना वाटणं रास्तच आहे याची कबुली दिली. इतकं झाल्यावर भारतीय माणसांना त्यांच्या गरिबीतून उठण्याकरता आपण सगळ्यांनी हात द्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. ब्रिटिश कामगारांनी बापूजींचं म्हणणं शांतपणे ऐकून तर घेतलंच... वर त्यांच्या भूमिकेचा मनःपूर्वक स्वीकार केला. काही जणांनी तर बापूजींना कायमस्वरूपी आपल्या आवडत्या लोकांच्या यादीत स्थान दिलं, त्यांच्या वेगवेगळ्या प्रयोगांना आणि प्रयत्नांना आपणहून मदत केली.

रागावलेल्या नि चिडलेल्या माणसांचं होतं काय... की, त्यांना स्वतःची भूमिका बदलणं मोठं कठीण असतं, त्याहून कठीण असतं ते स्वतःच्या हिताविरोधातल्या भूमिकेचं समर्थन करणं... मात्र समोरच्याचं ऐकून घेणं, त्यांच्या स्थितीबद्दल समज असणं या गुणांमुळं बापूजींनी सूतगिरणी कामगारांच्या भडकलेल्या रागाची वाफ केली आणि त्यांना वेगळा दृष्टीकोनही दिला. एखादा विषय व्यक्तिगत कोनातून पाहण्याऐवजी जागतिक परिप्रेक्ष्यातून कसा पाहावा याचं भान दिलं.

बापूजींचे वेगवेगळे सत्याग्रह म्हणजे अहिंसेच्या पायावर रचलेले प्रोत्साहन देणारे उपक्रमच असायचे. विषमतेतून आणि धार्मिक कट्टरतेतून होणाऱ्या अन्यायाबाबत लोक याच चळवळीचा भाग म्हणून एकत्र आले आणि त्यांनी याबद्दल आवाज उठवला, जाब विचारला. आपल्या समाजात असणाऱ्या प्रश्नावर हे लोक एकत्र येऊन प्रतिक्रिया देत होते, त्या विरोधातल्या आपल्या आत्मीक प्रतिकाराचं प्रदर्शन करत होते. माझ्या आजोबांप्रमाणेच मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर आणि नेल्सन मंडेला यांनी चळवळीसाठी हाच दृष्टीकोन अनुसरला. पुढे अनेकांनी तसं केलं. दडपशाही आणि शोषण यांच्या विरोधात त्यांनी अहिंसेच्या पायावर चळवळी उभारल्या... मात्र पुढे जात बापूजींना सक्रिय अहिंसेची चळवळ प्रत्यक्षात आणायची होती, त्यातून भविष्यासाठी चांगली भूमी तयार व्हावी आणि त्याचा ध्यास घेऊन अनेकांना कार्य करता यावं असं त्यांना वाटत होतं. सामंजस्य आणि करुणा यांची बीजं पेरल्यावर वाढणाऱ्या झाडांच्या सावलीत चुकीच्या गोष्टींच्या झडीला विरोध तयार व्हावा असाही एक विचार होता. त्यातूनच सक्रिय अहिंसेचा उपयोग करून सूतगिरणी कामगारांच्या मनात त्यांनी संवेदना आणि करुणा पेरली. समजुतीच्या बिया त्यांच्या जमिनीत टाकल्या. अन्यथा ब्रिटिश कामगार आक्रमक झाले असते आणि त्यांनी भारतीय कामगारांची गरिबीतून वर येण्याची इच्छा दडपून टाकली असती, नष्ट केली असती. अशा नकारात्मक मार्गावर जाण्याऐवजी त्यांनी भारतीय कामगारांच्या बाजूनं विचार केला आणि चित्र बदलू लागलं.

आपल्या ध्येयांविषयी आणि जगभर न्याय प्रस्थापित व्हावा म्हणून आजोबा खूप सजग असायचे. त्यांची ही जाग इतकी पक्की की, जगताना कधीतरी गंमत करावी, एखाद वेळेला स्वतःला सूट द्यावी याचा त्यांना संपूर्णपणे विसर पडायचा. सुदैवानं माझ्या आजीचं मात्र यावर लक्ष असायचं आणि ती त्यांना अधूनमधून याची आठवण करून द्यायची. बा लिहूवाचू शकायची नाही... पण तिच्या शहाणपणावर बापूजींचा पूर्ण विश्वास होता, तिची कदर होती.

बा आश्रमातल्या दैनंदिनीबद्दल कधीतरी शंका उपस्थित करायची किंवा प्रश्न विचारायची तेव्हा बापूजी लक्ष देऊन ऐकायचे. आश्रमात आपल्या कुटुंबाला इतर कुठल्याही कुटुंबापेक्षा वेगळं वागवलं जाणं त्यांना मंजूर नव्हतं. मी अगदी पहिल्यांदा आश्रमात आलो तेव्हा खूप लहान होतो. त्या वेळी मी पाहिलं होतं, केव्हातरी बा तिची खास शेंगदाण्यांची चिक्की आम्हां नातवांसाठी गुपचूप करायची आणि आजोबांच्या नकळत सगळ्यांना खाऊ घालायची. मी आजोबांचा जरा जास्त लाडका असलो तरी अध्येमध्ये बाच्या हातची चविष्ट चिक्की मटकावण्यात मला काही गैर वाटायचं नाही. आम्ही सगळे चिक्की खात असताना चोरटं हसत तीही एक तुकडा तोंडात टाकायची आणि आम्ही सगळे हसायचो, आमच्या गुपिताची मजा घ्यायचो. बापूजींना हे सगळं ठाऊक होतं... पण त्यांनी तिला रोखण्याचा प्रयत्न कधीही केला नाही.

2 ऑक्टोबरला बापूजींचा वाढदिवस अख्ख्या भारतातले लोक साजरा करायचे... पण आश्रमात मात्र कुठले समारंभ वगैरे करण्यासाठी बापूजींनी मज्जाव केला होता. सगळ्यांना समान वागणूक मिळावी असं त्यांना वाटायचं. त्यात मग तेही आले. मी तिथं असताना स्त्रियांच्या एका गटाकडून त्यांना चिठ्ठी आली होती की, त्यांना सेवाग्राममध्ये यायचं आहे आणि बापूजींच्या वाढदिवशी होणाऱ्या मेजवानीत सहभागी व्हायची इच्छा आहे. बापूजींनी ताबडतोब उत्तर दिलं की, आम्ही वाढदिवस वगैरे गोष्टी मुळीच साजऱ्या करणार नाही आहोत... शिवाय तुम्हां सगळ्यांना जेवूखाऊ घालण्यासाठी आमच्याकडं पैसाही नाही... मात्र या गटानं बापूजींच्या वाढदिवशी त्यांच्यासोबतच राहायचं हे इतकं पक्कं ठरवलं होतं की, 2 ऑक्टोबरला त्या सगळ्या जणी सेवाग्राममध्ये आल्याच. दुपारी जेवणाची वेळ झाल्यावर आश्रमवासी नेहमी जेवायला जमतात त्या ओसरीवर जमले. बानं पाहिलं की, खास बापूंच्या सहवासात राहायचं म्हणून बाहेरून आलेला स्त्रियांचा गट झाडाखाली बसला आहे. आपापली शिदोरी त्यांनी सोबत आणलेली आहे आणि त्या जेवायचीच तयारी करताहेत.

बा त्यांच्यापाशी गेली आणि तिनं विचारलं, ‘‘तुम्ही इथं वेगळ्या का बसताहात? आमच्यासोबत या. सगळे मिळून जेवू या... तसं नको आहे का तुम्हांला?’’

‘‘आम्हांला सगळ्यांना जेवायला-खायला घालणं आश्रमाला परवडू शकत नाही... शिवाय वाढदिवसाचं काही खास असणार नाही असं बापूजी म्हणाले होते... म्हणून...’’ एक बाई म्हणाली.

‘‘अरेच्चाऽ असं आहे होयऽऽ काय आहे ना... कधीकधी मजा करायला हरकत नाही ही गोष्ट आमचे म्हातारबुवा विसरून जातात. त्यांच्या वतीनं मी तुम्हांला आमच्यासोबत येऊन जेवायचं निमंत्रण देते. मग तर झालं?’’

बापूजींना बाच्या सूचनांचं आणि कल्पनांचं कौतुकच होतं असं नव्हे... ते अनेकदा तिचं ऐकायचेही. अगदी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातही स्वयंपाकघर सोडून आम्हां सगळ्यांच्या बरोबरीनं सामील व्हा, काम करा अशी विनंती बापूजींनी भारतातल्या समस्त स्त्रियांना केली होती. ‘जोवर भारतातली अर्धी जनता कोणत्या-ना-कोणत्या पद्धतीनं दडपशाही भोगतेय तोवर राजकीय स्वातंत्र्याला अर्थ असणार नाही.’ असं बापूजी निक्षून सांगायचे.

बापूजींनी केलेल्या असंख्य कामांप्रमाणे स्त्रियांच्या स्वातंत्र्याविषयीचा मुद्दा हा मूलगामी आणि अत्यंत महत्त्वाचा होता. त्यांनी आपल्या आईचं, पुतलीबाचं उदाहरण तर स्वतःच्या डोळ्यांनीच पाहिलं होतं. घरगुती जबाबदाऱ्यांच्या बुरख्याआड तिला तिचं बौद्धिक कुतूहल मारत राहावं लागलं होतं. बापूजींचे वडील भारतातल्या एका मोठ्या शहराचे पंतप्रधान होते. त्यांच्याकडं लोकांचं येणंजाणं सतत चालू असायचं. त्या वेळी मोठमोठ्या नेत्यांमध्ये होणाऱ्या धार्मिक आणि राजकीय चर्चांमध्ये सहभागी व्हायला पुतलीबाला खूप आवडायचं... मात्र तो काळ 1860चा होता. जसं मूल बापाच्या आज्ञेत राहतं तसं स्त्रीनंही राहावं आणि शक्यतो सतत सगळ्यांच्या नजरेत येऊ नये असं त्या काळात मानलं जायचं... त्यामुळं अशा चर्चा व्हायला लागल्या की पुतलीबा जवळच्या एखाद्या खोलीत जाऊन गुपचूप बसायची आणि सगळं ऐकायची, त्यातून काही शिकता येईल का याचा अंदाज घ्यायची.

आश्रमात संध्याकाळच्या प्रार्थनेच्या वेळी आश्रमनिवासी असायचेच... शिवाय बाहेरूनही खूप लोक यायचे. प्रार्थना झाली की बापूजी सगळ्यांशी बोलायचे. त्या वेळी कितीदातरी ते पुरुषांना उद्देशून म्हणायचे, ‘बायकांना गाईगुरांसारखं समजणं आणि त्यांच्यावर हुकूमत गाजवणं सोडून द्या. त्यांना दडपू नका.’ त्याच वेळी ते जमलेल्या बायकांनाही आग्रहानं सांगायचे, ‘स्त्रिया कमजोर असतात, त्यांचं संरक्षण करावं लागतं या जुनाट समजुतीला बळी पडू नका. दडपलेली, अन्यायग्रस्त असणारी माणसं त्यांच्याविषयी समाजात पसरलेली किंवा दृढ झालेली प्रतिमा स्वीकारून तसंच जगणं पुष्कळदा स्वीकारतात आणि स्वतःवरचा बोजा वाढवून घेतात... त्यामुळं फावतं कुणाचं? तर दडपशाही करणाऱ्याचं. त्यामुळंच स्त्रियांनी अशा संकुचित दृष्टीकोनाचं कुंपण तोडून, त्यांना बंदिस्त करू इच्छिणाऱ्या पुरुषांच्या बरोबरीनं उभं राहायला हवं....’ बापूजी एकेक मुद्दा मुळापर्यंत पटवून द्यायचे.

ते पुरुषांना आवाहन करायचे, ‘जुनाट, कर्मठ परंपरांच्या बेड्या तोडा आणि स्त्रीकडं बरोबरीची साथीदारीण म्हणून आदरानं, सन्मानानं पाहायला लागा.’ पुरुष शारीरिकदृष्ट्या सबळ असतात तर स्त्रिया नेहमीच आध्यात्मिकदृष्ट्या गतिशील असतात ही समजूत बापूजी बाळगून असले तरी सामाजिक जीवनात स्त्रियांनी संपूर्णपणे सहभागी व्हायला हवं हा त्यांचा विचार प्रागतिकच म्हणायला हवा. भल्याभल्या नेत्यांनी बापूजींना समजावायचा प्रयत्न केला होता की, भारताचं स्वातंत्र्य हे सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही स्त्रियांच्या नि अस्पृश्यांच्या समानतेविषयी बोलायला लागता तेव्हा मूळ उद्दिष्टाला डळमळीतपणा येतो. तो आग्रह सोडा. भारताला स्वातंत्र्य मिळालं की या गटाच्या उत्थानाविषयी, उन्नतीविषयी बोलता येईल... पण बापूजी त्यांच्या म्हणण्यावर अटळ होते. कुठल्याही प्रकारची दडपशाही आणि अन्याय... मग तो अगदी क्षणापुरता का असेना... खपवून घेतला जाता कामा नये असंच ते म्हणत राहिले. खालच्या मानल्या जाणाऱ्या जमातीतल्या लोकांची आणि स्त्रियांची मुक्ती ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यासाठी अजून वाट पाहणं खरोखर अशक्य आहे असं ते म्हणायचे.

दुर्दैवानं ती वेळ लांबत राहिली. माझी आजी नि पणजी कल्पनेतही पाहू शकल्या नसत्या अशा संधी आज पाश्चिमात्य देशांमध्ये स्त्रियांसाठी निर्माण झाल्या आहेत. तरीही जगभरातल्या धर्मांचा आणि संस्कृतींचा स्त्रियांशी असणारा व्यवहार दुय्यम आहे, अपमानास्पद आहे. पुतळीबाला जे सोसावं लागलं ते आजच्या काळातही स्त्रिया सोसत आहेत. खुल्या म्हणवणाऱ्या समाजातल्या कितीतरी स्त्रिया आजही स्वतःला खालच्या पायरीवर राखतात, जुन्या रूढीपरंपरांना आणि मान्यतांना छेद देण्याचं धाडस त्यांच्यामध्ये नाही.

बापूजी खरंच म्हणायचे, स्वातंत्र्याचं पहिलं पाऊल हे आपल्या आतून पडतं... उरलेला मार्ग मग फार कठीण नसतो...!

(अनुवाद: सोनाली नवांगुळ)

- डॉ. अरुण गांधी

'वरदान रागाचे' या लेखमालेत प्रसिद्ध झालेले इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा... 

Tags: पुस्तक अरुण गांधी महात्मा गांधी सोनाली नवांगुळ अहिंसा प्रेम सत्याग्रह परिवर्तन आदर सामंजस्य कस्तुरबा गांधी Book New Book Translation Gift of Anger Arun Gandhi Mahatma Gandhi Non- Violance Love Satyaghaha Change Respect Harmony Load More Tags

Add Comment