बापूजींच्या हत्येची बातमी सगळीकडं पसरली तशी घरी मित्रांची-परिचितांची गर्दी वाढायला लागली. घर आवाजांनी भरून गेलं... जो-तो तेच विचारत होता, ‘हे खरं आहे का?’
आणखी काही तपशील कळतो का हे पाहण्यासाठी वडलांनी भारतात त्यांच्या भावाशी बोलायचा प्रयत्न करून पाहिला. सगळं कळेपर्यंत बराच वेळ गेला. आम्ही राहत होतो तिथली दूरध्वनी यंत्रणा अगदीच सुमार होती... शिवाय एक फोन लावायचा तर या ऑपरेटरकडून त्या ऑपरेटरकडं जाईपर्यंत खूप वेळ लागायचा. अखेर फोन लागला पण खूप खरखर होती. वडलांनी त्यातूनही तिकडं निरोप दिला की, अंत्यसंस्कारासाठी आम्ही सगळ्यांनी पोहोचायचं कसं ते बघतोय. काकांनी सांगितलं, ‘तसं करू नका. हातात वेळ फार कमी आहे.’
बापूजींची हत्या झाली तेव्हा संध्याकाळची पाच वाजून सोळा मिनटं झाली होती... तरी काही तासांत लाखभर लोक दिल्लीत दाखल झाले होते. सुव्यवस्था पाहणाऱ्या अधिकाऱ्यांचा कयास होता की, अंत्यसंस्कारासाठी अधिक वेळ लावला तर अर्धा भारत दिल्लीत पोहोचेल आणि भावनेच्या भरात दंगे उसळतील. काकांकडून ही माहिती कळल्यावर गोष्टी बदलल्या. तरी दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत अंत्यसंस्काराचा कार्यक्रम पुढे नेता येईल अशी तयारी त्यांनी दाखवली. भारतातल्या भारतात येणाऱ्यांसाठी ते काही प्रमाणात सोयीचं असलं तरी आम्हाला मात्र पाच हजार मैलांवरून बापूजींना शेवटचा निरोप देणं भाग होतं.
खरखरणाऱ्या रेडिओवर अंत्ययात्रेसंबंधातलं प्रसारण आईवडलांसोबत दुसऱ्या दिवशी मी ऐकलं. ऐकताना कळलं की, बापूजी त्या काळात दिल्लीला बिर्ला हाऊसमध्ये राहत होते. बापूजींसोबत असताना मी बिर्ला हाऊसमध्ये राहिलेलो होतो. त्या दिवशी नेहमीप्रमाणे कुणा भाच्याच्या, कुणा पुतण्याच्या खांद्यावर रेलून ते प्रार्थना घेण्यासाठी बगीच्याकडं निघाले होते. प्रार्थनेसाठी गर्दी व्हायचीच... त्याप्रमाणे होती... पण बापूजी पुढे सरकतील तशी गर्दी त्यांना चालण्यापुरती वाट करून देत होती. त्यातच एक माणूस झपाट्यानं पुढं आला आणि त्यानं बापूंसमोर आलेल्या बाईला बाजूला सारलं नि बापूजींवर गोळ्या झाडल्या. याच जागेवर कितीतरी वेळा मी बापूजींसोबत चाललो होतो... त्याच जागेवर आता त्यांनी देह ठेवला.
जागतिक पातळीवरच्या बऱ्याच नेत्यांना बापूजींच्या अंत्ययात्रेसाठी उपस्थित राहायची तीव्र इच्छा होती... पण आमच्याप्रमाणे त्यांनाही तिथं पोहोचता आलं नव्हतं. पोपकडून श्रद्धांजली संदेश आला. अमेरिकेचे अध्यक्ष हॅरी ट्रूमन आणि किंग जॉर्ज सहावा यांच्याकडूनही शोकसंदेश आले. भारतातल्या असंख्य धर्मांची, जातींची, रंगांची लाखो माणसं अंत्ययात्रेत सहभागी झाली होती. तितकीच माणसं शहराच्या महत्त्वाच्या भागांमध्ये जमून अंत्ययात्रेला दुरून नमस्कार करत होती. प्रत्येकाला त्यांचं अखेरचं दर्शन घ्यायचं होतं. या सगळ्यांत बापूजींना लाभलेली उल्लेखनीय श्रद्धांजली म्हणजे त्यांच्या मृत्यूची बातमी कळल्यावर देशामध्ये ठिकठिकाणी चालू असलेला हिंसाचार तत्क्षणी बंद पडला. अगदी एखादं बटण बंद करावं तसा. देशभर चाललेल्या कत्तली बापूजींच्या मृत्यूच्या बातमीनं थांबल्या आणि बापूजींचं शांततेचं, एकजुटीचं स्वप्न आश्चर्यकारकरीत्या प्रत्यक्षात आल्याचं साऱ्या देशानं अनुभवलं!
...पण हजारो किलोमीटरवरून खरखरत्या रेडिओवर अंत्ययात्रेचं प्रसारण ऐकत बसलेल्या माझ्या मनाला बिलकूलच शांतता नव्हती. घडलेली घटना मनःपटलावरून पुन्हा पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा आधी धक्क्यात, दुःखात असलेलं माझं मन आक्रमक झालं. मला प्रचंड राग यायला लागला. रेडिओ ऐकत असताना राग अनावर होऊन अखेर माझा जणू स्फोट झाला.
‘मी बापूजींबरोबर बिर्ला हाऊसमध्ये असतो तर त्यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या माणसाचा गळाच दाबला असता. मी त्याला खरोखर ठार मारलं असतं.’ रागानं उसळत मी म्हणालो.
वडलांनी डोळे पुसले आणि ते अतिशय गंभीरपणे माझ्याकडं बघायला लागले. शांत स्वरात त्यांनी प्रश्न केला, ‘आजोबांनी काय शिकवलं ते इतक्यात विसरलास?’
ते फार दुःखात होते पण तरी त्यांच्या आवाजात सहानुभूती होती. माझ्याकडं प्रेमानं बघत त्यांनी मला बापूजींसारखंच जवळ ओढलं आणि म्हणाले, ‘आपला राग शहाणपणानं वापरावा असं त्यांनी तुला सांगितलं होतं ना अरुण? आत्ताचा तुझा राग मला कळू शकतो... पण मला सांग... त्याचा उपयोग तू कसा करशील?’
क्षणभर विचार करत मी दीर्घ श्वास घेतला नि म्हणालो, ‘त्यांनी अहिंसेसाठी जसं काम केलं तसं मीही करेन. जगातली हिंसा नाहीशी व्हावी म्हणून प्रयत्न करेन.’
माझं ऐकून वडलांनी मान हलवली... म्हणाले, ‘बरोबर बोललास. हा धडा कधीही विसरू नकोस आता. बापूजींसाठी आपल्याला चांगलं काही करायचंच असेल तर त्यांचं काम आपण पुढं न्यायला हवं. त्यांचं ध्येय आपलं करून घ्यायला हवं. काल घडलं तसं वाईट पुन्हा कधीही घडू नये म्हणून आपलं आयुष्य आपण या कामी लावलं पाहिजे.’
माझ्या रागाची कोंडलेली वाफ बाहेर पडायला हवी हे वडलांना कळत होतं. नकारात्मक लाटेला सकारात्मक कृती नाहीशी करते याची आठवण मला करून द्यायला हवी ही तर बापूजींनी लावलेली सवय. कामाला लागणं आवश्यक होतं. स्वतःचा शोक शांतवण्यासाठी... शिवाय बापूजींवर प्रेम करणाऱ्या, दुःखात बुडालेल्या अफ्रिकेतल्या असंख्य माणसांसाठी आम्हाला शोकसभा आयोजित करावी लागणार होती. बापूजींनी अफ्रिकेत असताना ‘इंडियन ओपिनियन’ नावाचं नियतकालिक सुरू केलं होतं. बापूजी भारतात परतल्यानंतर माझे वडील या साप्ताहिकाचं काम पाहायला लागले होते. ‘इंडियन ओपिनियन’चा विशेषांक बापूजींच्या आठवणींवर काढायचा असा निर्णय त्यांनी घेतला. आम्ही लोकांना बापूजींविषयीच्या त्यांच्या आठवणी, शक्य असतील तितके फोटो आमच्याकडं पाठवायला सांगितले. बापूजींच्या कार्याचा आढावा घेतला. महिन्याभरात जवळपास शंभर पानांचा संस्मरण विशेषांक तयार झाला. जुन्या पद्धतीच्या हातांनी चालणाऱ्या प्रेसवर आम्ही अंक छापला. या प्रयत्नातून बापूजींविषयी खूप चांगला दस्तावेज तयार झाला ही गोष्ट नंतरची... पण या सगळ्या प्रक्रियेचा परिणाम आमची दुखावलेली, शोकाकुल झालेली मनं, त्यांच्यातला राग शांतवण्यात झाला. केवळ प्रेम आणि परस्परांची काळजी घेणं बाकी उरलं.
बापूजींच्या स्मरणार्थ काढलेला आमचा विशेषांक मी परत-परत बघत होतो, परत-परत आजोबांचा विचार मनात येत होता. आजोबांच्या शेजारी चालल्याचा भास माझ्या मनावर पुन्हा पुन्हा उमटत होता आणि मनात विचार येत होता... ‘खरंच मी बाजूला असतो तर बंदूकधारी माणसाला थोपवू शकलो असतो?’
‘असं वाटतंय की, आत्ताच्या आत्ता त्या मारेकऱ्याला मारून टाकावं.’ त्या दिवशी मी पुन्हा उद्वेगानं म्हणालो.
आईनं खिन्न सुस्कारा सोडला. माझी काय अवस्था झाली आहे हे तिला कळत होतं... पण माझ्या भावनांचा असा उद्रेक बापूजींना मुळीच आवडला नसता हेही तिला ठाऊक होतं. ती फक्त इतकंच म्हणाली, ‘तुझ्या आजोबांना वाटलं असतं की, त्यांच्या मारेकऱ्याला तू क्षमा करावीस.’
मी वेगळ्या भावविश्वात होतो त्यामुळं तिच्या अलिप्त स्वरानं आणि त्यातल्या अर्थानं दचकलो. खरंच होतं तिचं म्हणणं. ती म्हणते तशीच अपेक्षा बापूजींनी माझ्याकडून केली असती. सुडाच्या भावनेनं खवळून उठण्यापेक्षा मी मारेकऱ्याला माफ करावं असं त्यांना वाटलं असतं. सूडभावना बाळगणं हे कुठल्याच प्रश्नावरचं योग्य उत्तर नसतं हे त्यांनी शिकवलं होतं. सुडाच्या भावनेनं एकदा मनाचा कब्जा घेतला की शांतता ढवळून निघते, नष्ट होते आणि माणूस सतत तणावग्रस्त राहायला लागतो. बरंऽ त्यातून आपलं एकदाच काय ते नुकसान होऊन खेळ संपतो असं घडत नाही. हा सैतान आयुष्यभर माणसाला पुन्हा-पुन्हा उद्ध्वस्त करतो. माझ्या लक्षात आलं... स्वतःबाबतीत असं घडू द्यायचं नाही असा निश्चय मी केला... अन्यथा बापूजींना मी खोटं पाडलं असतं.
अहिंसा म्हणजे भ्याडपणा किंवा निष्क्रियता नव्हे हे बापूजींनी आवर्जून सांगितलं होतं. हल्लेखोरांना काबूत आणण्यासाठी मर्यादित प्रमाणात बळ वापरणं आणि आपल्या प्रेमाच्या माणसांचं संरक्षण करणं ही गोष्ट योग्य आहे. बापूजींच्या अनेक काठ्यांपैकी मीही एक होतो... जर त्या दिवशी मी त्यांच्या बाजूला काठी म्हणून असतो तर त्यांच्यावर चालून येणाऱ्या मारेकऱ्याशी मी बोलावं, त्याला थांबवावं, वेगवेगळे मार्ग हाताळून पाहावेत असं बापूजींना वाटलं असतं. घटनेपासून पळ काढू नये असं त्यांना वाटलं असतं. जर-तरच्या गोष्टीच मी करू पाहतोय कारण घटना घडून गेली आणि मी तिथं नव्हतो. आता प्रश्न होता, घडल्या घटनेवरची माझी प्रतिक्रिया काय?
‘शिक्षेपेक्षा क्षमा करण्यात अधिक पुरुषार्थ असतो.’ बापूजी एकदा बोलताना म्हणाले होते...
आपली परीक्षा होते तेव्हा संतापातून आणि हिंसेतून आपली शक्ती दिसत नाही. उलट आपला राग आपण अधिक चांगल्या कृतीकडं कसा वळवतो यातून आपली शक्ती कळते. भारतभर हिंसेनं घातलेलं थैमान बापूजींच्या मृत्यूनंतर तत्क्षणी बंद होणं हीच भारतानं बापूजींना दिलेली अपूर्व भेट आहे. राक्षसी वृत्तीचा अनुभव घेत असताना उत्तर म्हणून क्षमा करण्यासारखी सुंदर कृती करणं ही भेट मीही बापूजींना द्यायला हवी असं माझं मन म्हणू लागलं. जे आपल्यावर प्रेम करतात त्यांच्यावर आणखी प्रेम करणं ही सोपी गोष्ट आहे... मात्र आपला भयंकर तिरस्कार करणाऱ्यांवरही प्रेम करता येण्यात अहिंसेची खरी ताकद सामावलेली आहे.
‘प्रेमाचे कायदे मोठे कठीण असतात. त्यांचा आवाका लक्षात येत नाही. या कायद्यांचं पालन करणं त्याहून कठीण असतं हे मला ठाऊक आहे... पण उदात्त नि उत्तम साधायचं तर ते सोपं कसं असेल? तरी सगळंच पूर्णपणानं कठीण नसतं. आपला द्वेष करणाऱ्यांवर प्रेम करणं ही अतिअवघड गोष्ट असते मान्य... पण तुम्हाला मनोमन ती करावीशी वाटत असेल तर अवघडात अवघड गोष्ट सोपी होऊन जाते हे नक्की.’ पुन्हा एकदा बापूजींचं सांगणं आठवलं.
आजोबांचं म्हणणं अगदी बरोबर होतं. क्षमा करता येणं ही कठीण गोष्ट आहे हे मला कळत होतं... पण कोणत्याही परिस्थितीत हे कठीण पाऊल उचलणं मला भाग होतं. माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी मी हे करायलाच हवं होतं... आमच्या दोन वर्षांच्या सहवासाचा सन्मान म्हणून तरी. आजोबा वारंवार सगळ्यांना सांगायचे, डोळ्यासाठी डोळा घ्यायचा ठरवला तर सगळं जग आंधळं व्हायला वेळ लागणार नाही. न्यायाची संकल्पना आपल्याला पुन्हा एकदा नव्यानं घडवावी लागणार आहे. कुठल्याही दुःखद नि उद्ध्वस्त करणाऱ्या घटनेनंतर आपलं ध्येय जग अधिक चांगलं करण्याचं हवं, आपणही हिंसेच्या नि सुडाच्या पातळीवर उतरलो तर काय अर्थ उरतो? तसं होता कामा नये.
आजोबा गेल्यानंतर मी माझं आयुष्य त्यांनी पाहिलेल्या स्वप्नासाठी पूर्णपणे झोकून दिलं आहे. क्षमा, आशावाद आणि अहिंसा यांचा प्रचार-प्रसार करण्यातून ते सोबत असल्याची भावना मला होते.
नकारात्मक घटनांना सहजी पूर्णविराम देता येत नाही. कुणा मोजक्यांच्या प्रयत्नानं त्यांना खीळ बसत नाही. दुर्दैवानं अशा घटनांचा ओघ जगभरात चालू राहिला होता, त्यातून क्षोभ उसळत राहत होता. माझ्या दत्तक देशात, अमेरिकेत घडणाऱ्या प्रत्येक अविचारी खुनानंतर मित्रांची, कुटुंबीयांची आणि परिचितांची प्रतिक्रिया उखडल्याची असते. दुःखानं आणि मानसिक गोंधळानं स्वतःवरचा ताबा गमावताना मी त्यांना पाहत आलो आहे... जसा रेडिओवरचं प्रसारण ऐकताना माझा माझ्यावरचा ताबा गेला होता.
काही कायदे इतके विचित्र नि अविश्वसनीय असतात की, त्यांच्याबद्दल काय म्हणावं, काय प्रतिक्रिया द्यावी या झगड्यात मी अनेक वर्षं खर्ची घातली आहेत. 1999मध्ये कोलोरॅडोमधल्या ‘कोलंबीन हायस्कूल’मध्ये बारापंधरा मुलं हकनाक मारली गेली. अमेरिकन इतिहासात शालेय स्तरावर घडलेली सगळ्यात क्रूर घटना म्हणून या घटनेकडं पाहायला हवं. या हायस्कूलमध्ये काम करणाऱ्या माझ्या मित्रानं मी तिथल्या मुलांशी बोलावं असं सुचवलं. हल्ल्यातून बचावलेल्या सगळ्यांचाच सूर संतापाचा आणि सुडाचा होता. बोलायला जाण्याआधी काही क्षण मला मित्रानं विचारलं, तू नेमकं काय बोलायचं ठरवलं आहेस? मी जे ठरवलं होतं तेच सांगितलं, ‘वाईट वागणाऱ्याला क्षमा करा आणि उगीच वेळ न दवडता आपलं आयुष्य जगायला सुरुवात करा...’
‘तू असं बोललास तर तुला खोलीबाहेर हुसकून लावतील. सगळे आधीच भयंकर चिडलेले आहेत. तू असं म्हटल्यावर त्यांचा संताप आणखी चिघळेल.’
मित्रानं मला सावध करण्याचा प्रयत्न केला. मी विद्यार्थ्यांसमोर उभा राहिलो आणि आजोबांनी, आईवडलांनी मला अहिंसेची, क्षमा करण्याची शिकवण कशी दिली त्या आठवणी सांगितल्या. मी म्हणालो, ‘तुमचा राग, त्रास, तुमच्या वेदना, सगळंच मला कळू शकतं कारण मीही ते भोगलेलं आहे. आपण समाजात राहतो. आपल्याला अधिक चांगला समाज हवा असेल तर आपली हृदयं तिरस्काराऐवजी प्रेमानं काठोकाठ भरायला हवीत. चुकीच्या प्रवासात अडकून राहण्याऐवजी मनात प्रेम घेऊन आपलं रोजचं जगणं सुरू करायला हवं.’ आणि खरोखर सांगतो, कार्यक्रमाच्या ठिकाणाहून हुसकून लावण्याऐवजी त्यांनी एकसाथ उभं राहून माझं म्हणणं स्वीकारल्याची पावती दिली.
अशाच पद्धतीनं शोकविव्हळ झालेल्या माणसांशी बोलायचा प्रसंग माझ्यावर 2014मध्ये आला. या वेळी घटना फर्गसन, मिसुरी इथं घडलेली होती. एका गोऱ्या पोलिसानं अठरा वर्षांच्या कृष्णवर्णीय तरुणाला ठार मारलं होतं. वांशिक विषमतेच्या आरोपावरून तो पोलीस गजाआड झालेला होता. एकता नि बळ दाखवण्यासाठी प्रचंड मोठा समूह तिथं जमलेला होता. फर्गसनमध्ये त्या वर्षात मारल्या गेलेल्या एकशे दहा लोकांची यादी तिथं मोठ्यानं वाचण्यात आली. जाणता किंवा अजाणता गोऱ्या माणसांनी कृष्णवर्णीयांबद्दल जे पूर्वग्रह आणि समजुती बाळगून व्यवहार केलेला आहे त्याचा उल्लेख मी करावा असं संयोजक मला वारंवार सांगत होते. जमावात चीड स्पष्ट जाणवत होती.
चुका करणाऱ्यांकडं सगळीच्या सगळी बोटं रोखून राग व्यक्त करण्याचा भावनावेग पाहून मला अचानक आमची आई आठवली. आम्हा भावंडांना शेजारी बसवून ती सांगायची, ‘तुम्ही समोरच्याकडं बोट रोखता तेव्हा तीन बोटं तुमच्याकडं रोखून बघत असतात बरं का!’ समोरच्या माणसानं किती चुका केल्या, किती वाईट केलं याची तपासणी करण्याऐवजी आपण स्वतःकडं पाहिलं पाहिजे, स्वतःला प्रश्न केला पाहिजे असं मला वाटतं.
बोलायची वेळ झाली तेव्हा मी बापूजींचं सांगणं आठवत राहिलो आणि रागावलेल्या समूहाला त्यातलंच महत्त्वाचं काही सांगावं असा निर्णय घेतला. त्यांच्या मनाची जखम बरी व्हावी, त्यांनी जुना भार वाहू नये असं मला वाटत होतं... पण माझ्यासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट होती... ती म्हणजे त्यांचा प्रवास सुडाच्या पलीकडं जायला हवा.
‘पूर्वग्रह कुणात नसतात? आपल्यापैकी प्रत्येकाकडं तो आहेच... मग आपण कुठल्याही रंगाचे असो की वंशाचे. आपल्या व्यक्तिमत्त्वातला हा दुबळा धागा जोवर आपण ओळखणार नाही तोवर काहीही बदल होणार नाहीत. आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या अडचणी, संघर्ष, प्रश्न यांना तिरस्कारानं आणि क्षुद्रपणानं सामोरं जाण्याऐवजी आपण प्रेम आणि निःस्वार्थी कनवाळूपणा बाळगला तर जगात बदल घडण्याची आशा आहे.’ मी एक प्रकारे त्या समूहाला आव्हान द्यायचंच ठरवलं होतं.
बापूजींचा परवलीचा मंत्र मी त्यांना सांगितला, ‘आपल्याला जगामध्ये जो बदल व्हायला हवा आहे तो बदल आपण प्रथम स्वतःमध्ये घडवायला हवा!’
बोलत असताना त्या गर्दीतून स्वीकाराच्या माना डोलताना दिसत होत्या. अस्पष्टशी कुजबुज ऐकू येत होती. ती समजूतदर्शकच होती. प्रत्येक माणसाला लेबलपलीकडं पाहा नि सगळ्यांमधलं चांगलं शोधण्याचा प्रयत्न करा हा बापूजींचा सशक्त संदेश समजून घेण्याची त्यांची इच्छा मला दिसली. त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करू असा इरादा दिसला. बापूजींच्या सांगण्यानं अजूनही लोक बदलतात, प्रेरित होतात यानं माझं मन उल्लसीत झालं.
आजोबांनी दिलेले जगण्याचे साधेसोपे पण खोल धडे चांगल्या आणि वाईट दोन्ही परिस्थितींत आपल्याला प्रेरणा देतील आणि आपल्या मनातली आशा तेवती ठेवतील असा विश्वास वाटतो. आपल्याला भोवतालच्या जगात परिवर्तन घडवायचं असेल तर सुरुवात स्वतःपासून करायला हवी.
जगात शांतता नांदावी असं आपल्याला वाटतं... ती शांतता आपल्या आत आधी आणता यायला हवी.
(अनुवाद: सोनाली नवांगुळ)
- डॉ. अरुण गांधी
'वरदान रागाचे' या लेखमालेत प्रसिद्ध झालेले इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा...
Tags: महात्मा गांधी सोनाली नवांगुळ अहिंसा गांधी हत्या Book New Book Translation Gift of Anger Arun Gandhi Mahatma Gandhi Sonali Navangul Non- Violance Gandhi Assasination Load More Tags
Add Comment