तुमचा अहंकार धगधगता असेल तर दुसऱ्याबद्दल आदर व करुणा बाळगणं कठीण जातं...

वरदान रागाचे- भाग 18

फोटो सौजन्य: sanitation.indiawaterportal.org

सेवाग्रामच्या आश्रमात बापूजींना भेटायला माणसांची सतत रीघ लागलेली असायची. एकदा एक तरुण तरतरीत माणूस इंग्लंडहून त्यांना भेटायला आला. ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ची डॉक्टरेट होती त्याच्याकडे. तो तल्लख... शिवाय तरुण असल्यामुळं त्याच्या विचारांना वेग होता. त्याला भारतीय अर्थव्यवस्थेत बदल घडवायचा होता. या तरुणाचे आईवडील आजोबांना खूप मानणारे... त्यांचे मित्रच होते. वडील मोठे उद्योजक होते. आपल्या या मुलानं- श्रीरामनं कुठलंही काम हाती घेण्याआधी त्याला गांधीजींचा आशीर्वाद मिळायला हवा या हेतूनं त्यांनी श्रीरामला सेवाग्रामला पाठवलं होतं.

...तर श्रीराम सेवाग्रामला आला. आपण कुठं, किती यश मिळवलं आणि देशाची अर्थव्यवस्था बदलण्याचं त्याचं नियोजन कसं तयार आहे याविषयी जवळपास अर्धा तास तो अतिशय मिजाशीत सांगत राहिला. बापूजी जसं प्रत्येकाचंच म्हणणं लक्षपूर्वक व संयमानं ऐकायचे तसं श्रीरामचंही ऐकत होते.

‘‘आता तुमचे आशीर्वाद मिळाले की झालं. त्यानंतर मला लगेच काम सुरू करता येईल...’’ श्रीराम म्हणाला.

‘‘आशीर्वाद तुला असा सहज नाही मिळणार. तुला तो कमवावा लागेल...’’ बापूजींनी उत्तर दिलं.

‘‘म्हणजे? मी काय करू त्यासाठी?’’

‘‘आम्ही रोज आश्रमातल्या संडासांची स्वच्छता करतो. त्यात तू आम्हांला मदत कर.’’

श्रीरामला धक्काच बसला. 

तो चाचरत म्हणाला, ‘‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून मी पीएच.डी. मिळवलीय. माझा मोलाचा वेळ मी संडास स्वच्छ करण्यात घालवावा असं वाटतंय तुम्हाला? खरंच?’’

‘‘होऽ जर तुला माझा आशीर्वाद हवा असेल तर अर्थात...’’ बापूजींनी शांतपणे सांगितलं.

श्रीरामचा अजून स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. शंकित मनानंच तो खोलीबाहेर पडला. रात्री राहायला तो तिथेच होता. सकाळी अनिच्छेनं का होईना आम्हां सगळ्यांबरोबर तो संडास-स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी झाला. आमच्याबरोबर मैल्याच्या बादल्या आणि बुट्‌ट्या त्यानं वाहिल्या. कामं आटोपल्यावर शक्य तितकं घासून-घासून त्यानं अंग स्वच्छ केलं आणि आवरल्यावर तो बापूजींकडे आला.

‘‘तुम्ही म्हणालात तसं मी केलं. आता मला तुमचे आशीर्वाद द्या...’’

आजोबा गालात हसत म्हणाले, ‘‘अरे... इतक्या लवकर? नाही नाही. जितक्या उत्साहानं बाहेर पडून देशाची अर्थव्यवस्था बदलून टाकण्याविषयी तू बोलतोस तितक्याच उत्साहानं तू संडास साफ करतोस याबद्दल माझी खातरी पटेल तेव्हा मी तुला आशीर्वाद देईन.’’

वाचताना असं वाटेल की, बापूजी किती विचित्र वागताहेत, किती ताठरपणा दाखवताहेत... पण तसं नव्हतं. श्रीराम स्वतःबद्दल जरुरीपेक्षा जास्त गुर्मीत बोलतोय, वागतोय... त्याला जर खरोखर बदल घडवायचा असेल तर अडसर त्याच्या अहंकाराचा होणार आहे हे बापूजींनी ओळखलं होतं. तुमचा अहंकार इतका धगधगता असेल तर दुसऱ्याबद्दल आदर व करुणा बाळगणं कठीण जातं... शिवाय अशा वेळी जात आणि वर्गव्यवस्था तुम्ही अगदी सहजपणानं मान्य करता. ‘आपलंच बरोबर!’ या आग्रही भूमिकेमुळं दुसऱ्याचा दृष्टीकोन समजून घेण्यासाठी अशी माणसं वेळच देत नाहीत. गरीब माणसांच्या गरजा, त्यांचं जगणं बापूजींना अगदी मुळापासून कळत होतं... म्हणून तर सामान्यांसारखं राहण्याचा प्रयत्न बापूजींनी केला. भारतातला गरिबातला गरीब माणूस जितका साधेपणानं जगतो तितक्या साधेपणानं जगण्याचा प्रयोग त्यांनी आश्रमात केला होता. खालच्या जातीतल्या लोकांना भारतभरात ‘अस्पृश्य’ म्हटलं जायचं आणि त्यांनी संडास स्वच्छ करावेत आणि मैला वाहावा अशीच समाजरचना होती. देशातल्या सर्व माणसांचं जगणं सुकर व्हावं अशा तऱ्हेनं श्रीरामला भारतीय अर्थव्यवस्था बदलून टाकायची होती हे बापूजींना कळलं होतं. तसं असेल तर मग या लोकांचं जगणं त्याला आधी कळायला हवं असं त्यांचं म्हणणं होतं.

भारताच्या भविष्याबद्दलचे आराखडे आखण्यासाठी नि निर्णय घेण्यासाठी आयोजलेल्या महत्त्वाच्या परिषदेतही ते अतिशय साधेपणानं गेले आणि नम्र राहिले. विनयशीलता ही कमजोरीची निशाणी आहे असं त्यांच्या मनाला कधीच शिवलं नाही. उलट विनयशील माणसात खरोखरचं धैर्य असतं. उद्धटपणामुळं, मगरुरीमुळं जी फूट पडते... ज्या तऱ्हेची अंतरं माणसांत व विचारांत तयार होतात... ती खूप घातक असतात याबद्दल ते बोलत राहायचे. आपण आपल्याभोवती असणाऱ्या लोकांहून वेगळे आहोत, अधिक चांगले आहोत हे सिद्ध करण्याची भावना हळूहळू तुम्हांला रागाच्या आणि हिंसेच्या दिशेनं घेऊन जाते. आपण परस्परांशी जोडलेले असतो या वस्तुस्थितीचा अखेरीस आपल्याला विसर पडतो. दुसऱ्याला समजून घेण्याचा साधेपणा आणि विनय आपल्याकडे नसतो तेव्हा आपण धडपडणाऱ्या माणसांवर विनाकारण बरसतो, निर्वासितांचा आणि विस्थापितांचा तिरस्कार करायला लागतो. एक दिवस कधीतरी तुमच्याही पायाखालची जमीन निसटून जाऊ शकते आणि होत्याचं नव्हतं होऊ शकतं हे त्या वेळी दिसत नसतं. जगातल्या काही युद्धग्रस्त देशांमधल्या उलथापालथींमुळं त्यांच्या नागरिकांना युद्धस्थितीतून निसटून जीव वाचवण्यासाठी कुठंतरी आश्रय घेण्याची वेळ आलेली आहे. अशी वेळ तुमच्यावर आली नाही, तुम्ही नशीबवान निघालात... पण परिस्थितीचा ताव आपल्याला कळतो की नाही? आज वेगवेगळ्या वंशांच्या, भिन्न वर्गांच्या, भिन्न जातींच्या आणखी एक भर म्हणजे भिन्न राजकीय स्थितींच्या माणसांच्या वेगवेगळ्या पातळीवरच्या वैचित्र्यपूर्ण संघर्षाच्या मध्ये कुठेतरी गरगरत असताना बापूजी विनयशीलतेचा आग्रह का धरायचे आणि त्याचा उपयोग काय हे आपल्याला जास्त चांगलं कळू शकतं.

काही जण आपल्या वागण्यातून मानवता आणि विनयशीलता अशा तऱ्हेनं प्रसृत करतात की, जणू त्यांना सुचवायचं असतं की, एकमेकांना ‘सहिष्णुता’ शिकवण्याची किती गरज आहे, सहनशीलता वाढवल्याशिवाय काही खरं नाही वगैरे... पण मला वाटतं की, यातून निराळे प्रश्न उद्‌भवू शकतात. आपण कुणालातरी सहन करतोय किंवा करू शकतो ही भावनाच किती अहंमन्य आहे... नाही? यातून काय दिसतं? अशा वेळी तुम्ही स्वतःला इतरांपेक्षा वेगळ्या आणि वरच्या जागेवर नेऊन ठेवलेलं असतं आणि समोरच्यांना ते आहेत तसे स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यामुळं तुम्ही अगदी शांत आणि विनम्र वागत राहता. 

बापूजी या मुद्‌द्यावर काय म्हणाले असते ठाऊक आहे?

ते म्हणाले असते की, सहिष्णुता पुरेशी नसते, बरेचदा शब्दशः तसं वागल्यानं आपण एकमेकांपासून जास्त लांब जातो, वेगळे पडतो. आपल्यापेक्षा वेगळ्या वातावरणात जगलेल्या, वाढणाऱ्या पण फरक समजून घेण्यास राजी असणाऱ्या त्या दुसऱ्या माणसाला खऱ्या अर्थानं समजून घ्यायची जबाबदारी आपल्याला अशी झटकता येणार नाही.

अमेरिकेत झालेल्या 2016च्या अध्यक्षीय निवडणुकीत एका मोठ्या राजकीय पार्टीच्या उमेदवारानं प्रचारादरम्यान अतिशय झोंबरी, द्वेषपूर्ण, कडवट भाषा वापरली होती. त्या प्रकारानं नागरिकांना प्रचंड धक्का बसला होता. मुळात संपूर्ण प्रचारदौऱ्याचा अजेंडा इतरांबद्दल जास्तीजास्त तुच्छतापूर्ण बोलणं, टवाळी करणं, गरळ ओकणं हाच होता. तो त्याच्यामागं येणाऱ्या अनुयायांना नि गर्दीला सतत सांगत होता, माझ्याशी जोडलेले राहाल तर ‘इतर’ लोकांपेक्षा जास्त चांगलं जगाल. त्याच्या वल्गना आणि गोंगाट बघून... समाजाच्या कुठल्याही प्रश्नावरचा नेमका तोडगा देण्याची कुवत नसताना उगीच पोकळ, जोरजोरात भाषणबाजी करून आपल्याच अहंकाराच्या आणि लहरींच्या महालात मश्गूल राहिलेले जगभरातले हुकूमशहा मला आठवत राहिले. अशांची बडबड कुठल्याच माणसाच्या मनापर्यंत पोहोचत नाही, ती धडकून त्याच्यावरच येऊन आदळते! फक्त गर्दीच्या नशेत ते लक्षात येत नाही. अशा भडकू डोक्याच्या बेदरकार मेंदूंनी जगभरात किती अनागोंदी माजवली आणि नुकसान केलं याचे दाखले संपूर्ण इतिहासात आपल्याला दिसतात. अर्थात मी मघाशी सांगितलं तशा हुकूमशहांचा अनुभव हा जगाला नवा नाही. 

अशा कितीतरी लोकांशी बापूजींचा संबंध आला. त्यांचं म्हणणं एकच असायचं की, सगळ्यांपेक्षा उच्च स्वरात बोलणाऱ्याकडं खरंतर बोलण्यासारखं कमी असतं. ‘उथळ पाण्याला खळखळाट फार!’ ते गालातल्या गालात हसत आम्हांला नेहमी सांगायचे. जी माणसं मुळात कल्पक असतात, प्रश्नांवरचे मार्ग शोधू शकतात अशा प्रामाणिक माणसांना आपलं म्हणणं ऐकून घेतलं जावं म्हणून आवाज मोठा करायची गरज नसते. त्यांच्या सांगण्याचं वजनच असं असतं की, माणसं ऐकून घेतात.

मी सेवाग्राममध्ये असण्याच्या काळात बापूजी ब्रिटिशांकडून भारतासाठी स्वातंत्र्य मिळवण्यासाठीच्या मोठ्या संघर्षात गुंतले होते. भारताला संपूर्ण स्वातंत्र्य मिळवताना देशाची फाळणी होऊन मुस्लिमांसाठी स्वतंत्र पाकिस्तानची निर्मिती करायला त्यांचा विरोध होता. आज जे हिंदू-मुसलमान शेजारी-शेजारी गुण्यागोविंदानं नांदतात त्यांना त्यांच्या मुळांपासून कापण्यामुळं फार मोठ्या हिंसेला खतपाणी मिळण्याची शक्यता त्यांनी बोलून दाखवली होती. स्वातंत्र्यापूर्वीच्या देशात अस्पृश्यांना गावकुसाबाहेर राहावं लागायचं, देवळांमध्ये आणि शाळांमध्ये त्यांना प्रवेश नसायचा, स्त्रियांनाही अस्पृश्यांप्रमाणेच वागवलं जायचं. नव्या स्वतंत्र देशात या वंचित घटकांसाठी त्यांना समान हक्क हवे होते. स्वातंत्र्य चळवळीत सामील असणाऱ्या कितीतरी नेत्यांनी बापूजींची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. ‘स्वातंत्र्यप्राप्ती हे आपलं पहिलं ध्येय आहे, समानतेच्या हक्काच्या मागणीमुळं या ध्येयाबद्दलची एकाग्रता कमी होते... तेव्हा एकदा स्वातंत्र्य पदरात येऊ दे. मग आपण बाकी सगळे मुद्दे विचारात घेऊ.’ असं या नेत्यांचं सांगणं होतं. सगळ्यांसाठी मुक्तीच्या मागणीला आणखी उशीर लावता कामा नये असा बापूजींचा टोकाचा आग्रह होता. कुठल्याही प्रकारची विषमता समाजात शिल्लक असणं हा एकूण मानवतेवर केलेला हल्ला असतो असं त्यांना अगदी आतून वाटत होतं... त्यामुळंच ते तडजोडीसाठी राजी नव्हते.

वेगळ्या संस्कृतीतली गांजलेली, अन्यायानं पिचलेली माणसं पाहिली की ‘त्यांच्यासोबत घडतंय ते चुकीचं आहे’ असा उच्चार आपण लगेच करतो. कुठंही काही वाईट घडत असेल तर त्याचा उच्चार करणं साहजिकच आहे... मात्र दुसऱ्याची चूक दाखवताना ती स्वतःतही पाहता यायला हवी. जेव्हा-जेव्हा काही कामानिमित्तानं मी अमेरिकन माणसांना भेटायचो तेव्हा भारतातल्या अस्पृश्यतेचा विषय निघाला की ती खेदानं मान हलवायची. मानभावीपणानं विचारायची, ‘अस्पृश्यांनी विहिरीतलं पाणी शेंदून वापरलं तर ते बाटतं असं तुमच्या त्या वेळच्या उच्चकुलीन हिंदूंना कसं काय वाटायचं बुवा? कठीण आहे.’ त्या वेळी अशा हळहळकर्त्यांना अतिशय सभ्यपणे मी अमेरिकेतल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांबाहेर, पाणी पिण्याच्या जागांवर, पोहण्याच्या तलावांबाहेर कित्येक वर्षं असणाऱ्या ‘व्हाइट्‌स ओन्ली’च्या पाटीची आठवण करून द्यायचो. या भेदभावाबद्दल खरोखर आपल्याला काळजी वाटते का? का वाटते? आपण दुसऱ्यांपेक्षा जास्त चांगल्या जागेवर उभे आहोत याबद्दलचा दंभ आहे का हा?

...तर हा दंभच आपल्याला असले चिकित्साहीन प्रश्न विचारू देत असला पाहिजे किंवा कदाचित आपली स्थिती फार चांगली नाहीये हे गुपित आपल्याला आतल्या आत कळून आलेलं असतं... त्यामुळं आपल्या ‘वेगळेपणाच्या’ अहंकाराला फुलवण्यासाठी आणि स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी दुसऱ्याचे दोष दाखवत सुटण्याची सवय अंगात मुरत असावी.

आपल्या सगळ्यांचं जगणं आणि विधिलिखित एकमेकांत गुंतलेलं आहे... त्यामुळंच स्वातंत्र्याचं सत्य समजून घेण्याचा विनय आपल्याकडे हवा हे बापूजींना आकळलं होतं. स्वातंत्र्याचं सत्य समजून घेण्याचा धडा माझ्या जगण्यात उतरावा असं त्यांना वाटत होतं कदाचित... म्हणूनच त्या दिवशी त्यांनी मला ‘चरखा घेऊन खोलीत ये.’ असं सांगितलं. मी चरखा घेऊन गेलो नि ते काय सांगताहेत याची वाट बघत बसलो त्यांच्यासमोर... पण त्यांनी जे करायला सांगितलं त्यानं मी गोंधळून गेलो. ते म्हणाले की, चरख्याचा प्रत्येक भाग सुटा कर आणि माझ्यासमोर मांड. मी तसं केलं. मनाशी काहीतरी ठरवल्याशिवाय बापूजी असलं तिरपागडं काही सांगणार नाहीत यावर माझा विश्वास होता. चरख्याच्या सुट्या भागांकडं बघत ते म्हणाले, ‘‘चलऽ काम सुरू कर. सूत कातायला घे.’’

‘‘आता कसं करणार बापूजी? चरखा तर सुटा करून टाकलाय.’’

‘‘अच्छा... मग असं कर, पुन्हा जोडून टाक.’’

‘‘जोडायचाच होता तर सुटा कशाला केला? उगीच वेळ वाया गेला ना!’’ मी किंचिंत चरफडलो पण लक्ष देऊन चरख्याचे भाग जोडायला लागलो. 
काम जवळपास पूर्ण होतच आलेलं होतं... इतक्यात बापूजी पुढे वाकले आणि कडेला पडलेली चरख्याच्या छोट्या चक्राखाली लावायची एक स्प्रिंग त्यांनी हातात घेतली. ती स्प्रिंग माझ्याकडे परत द्यायचा त्यांचा विचार नसावा असं एकूण वाटत होतं.

‘‘बापूजीऽ ती स्प्रिंग लावल्याशिवाय चरखाजोडणीचं काम मला पुरं करता येणार नाही. ती द्या.’’

‘‘का नाही करता येणार? एवढ्याशा स्प्रिंगनं काय अडेल तुझं?’’

‘‘अहोऽ पण त्याशिवाय चरख्याचं चाक फिरणार नाही.’’

‘‘अरेऽ पण हा इतका लहानसा भाग आहे यंत्रातला. त्यानं काही फार फरक पडायला नको. तू हुशार आहेस. या छोट्या स्प्रिंगशिवायही तू चरखा चालवून दाखवशील... नक्की.’’ डोळे मोठे करून स्प्रिंगकडे पाहण्याचं नाटक करत ते म्हणाले.

‘‘नाही हो. मला नाही जमणार ते.’’ मी ठामपणानं म्हणालो.

‘‘बरोब्बर बोललास!’’ बापूजींच्या आवाजात एकदम जोश होता. त्यांनी आधी मला धक्का रिचवू दिला आणि शांतपणानं म्हणाले, ‘‘एखादी गोष्ट संपूर्ण होण्यासाठी प्रत्येक सुटा भाग खूप महत्त्वाचा असतो. चरखा सुरेख चालण्यासाठी ही छोटीशी स्प्रिंग जशी महत्त्वाची तसंच एका साध्या माणसाच्या असण्याचं संपूर्ण मोठ्या समाजासाठी महत्त्व असतं. कोणीही निरुपयोगी किंवा बिनमहत्त्वाचा नसतो. आपण सगळे सामंजस्यानं आणि सुसंवादानं तरतो.’’

जसं चरखा चालण्यासाठी त्यातला प्रत्येक भाग जागच्याजागी आणि कार्यरत असणं आवश्यक आहे... तसंच जीवनाचंही आहे. बापूजींनी दिलेली ही युक्ती व्यावसायिक यशासाठीही वापरता येऊ शकते. स्वतःच्या मोठमोठ्या कंपन्या आणि उद्योग चालवणारी खरी कणखर माणसं त्यांच्यासाठी काम करणाऱ्या लहानसहान व्यक्तींचं महत्त्व त्यांच्याइतकंच आहे हे सत्य जाणून असतात. प्रत्येक स्तरावर काम करणाऱ्या कामगारांचं मोल जाणून त्यांना योग्य ती प्रतिष्ठा दिली तर उद्योगाची अधिक भरभराट होईल हे ती ओळखून असतात. 

वॉलमार्टसारख्या प्रचंड मोठ्या उद्योगानं मध्यांतरी सगळ्या कामगारांचं वेतन भरभक्कम वाढवलं आणि प्रत्येक माणसाला नि श्रमाला प्रतिष्ठा देण्याची भावना प्रत्यक्षात आणून दाखवली. जगातल्या कुठल्याही मोठ्या खासगी उद्योगाहून जास्त कामगार वॉलमार्टच्या प्रचंड यंत्रणेत काम करतात. साहजिकच सगळ्यांचा मेहनताना वाढवण्याचा निर्णय खूप महाग पडणार होता, धाडसी तर होताच. या पावलामुळं कंपनीला पैशांचं नुकसान मोठ्या प्रमाणात सोसावं लागणार होतं... पण मला खातरी आहे की, दीर्घकालीन टप्प्यांचा विचार करता लोकांना सन्मानानं वागवण्याचा परिणाम म्हणून कामगार अधिक निष्ठेनं आणि पूर्वीपेक्षा जास्त श्रम करून कंपनीसाठी उभे राहिले असतील. होय. अगदी तसंच झालं पुढे. वॉलमार्टची स्टोअर्स जास्त चांगल्या रितीनं चालायला लागली, ग्राहकांनी समाधानाची पावती देण्याचं प्रमाण कैक पटींनी वाढलं.

मला ठाऊक आहे की, वॉलमार्टची आधारभूत किंमत काय आहे, बॉटमलाईन काय आहे याबद्दल अगदी आज बापूजी असते तरी त्यांनी उत्सुकता दाखवली नसती... पण एक मात्र शंभर टक्के खरं की, अर्थव्यवस्थेची संकल्पना आणि आपली मानवतेबद्दलची असोशी वॉलमार्ट केसमध्ये जुळून आल्याचा प्रचंड आनंद त्यांना झाला असता. दुकानांच्या आडव्या फळ्यांवर माल रचणारा कामगार हा चरख्यातल्या त्या छोट्याशा स्प्रिंगसारखा असतो. त्याच्याशिवाय संपूर्ण चक्र चालणार कसं? त्याला चांगलं वागवण्यानं, उचित प्रतिष्ठा देण्यानं संपूर्ण संस्था यशस्वी होते. जी अधिकारी व्यक्ती कामगाराची योग्यता ओळखते आणि त्याचा मान राखते ती कोणत्याही परिस्थितीत जिंकते; उलट आपण बंद खोलीत बसून ठरवलेली ध्येयधोरणं आणि निर्णय यांवर उद्योगाचं किंवा कशाचंही यश अवलंबून आहे अशी आढ्यताखोर भाषा वापरणारे स्वतःचं भवितव्य धोक्यात आणत असतात.

मोठ्या पदांवर काम करताना अनेकदा वर सांगितलेली ही चूक मोठ्या प्रमाणात घडते. आपल्या हाताखाली वेगवेगळ्या स्तरांवर काम करणारा मोठा जनसमुदाय आपल्यापेक्षा कमी महत्त्वाचा मानून वर्तन घडतं. 

9/11च्या दुर्घटनेत सुसाईड बॉम्बर म्हणून काम करणारी मुस्लीम मुलं ही नुकतीच वयात आलेली तरुण मुलं आहेत हे समजल्यावर सगळं जग हादरलं होतं. आपण काहीतरी महान काम करतो आहोत असा समज करून दिल्यामुळं जिवावर उदार होऊन त्यांनी विध्वंस केला. या भयंकर वृत्तीला म्हणावं तरी काय... हे आपल्यापैकी बहुतांश जणांना समजेनासं झालं होतं. जगण्याची किंमत काय नि अर्थ काय याचा फेरविचार करावा लागत होता. तरी खोलात विचार करून बघता अशीही शक्यता आहेच नाऽ की, समाजाच्या एका मोठ्या गटाच्या लेखी अशा लोकसंख्येची कसलीच किंमत नाही, त्यांना या मुलांकडं ढुंकून बघायचं नाही, ही मुलं अशीच गरिबीत खितपत मरणार असा त्या तरुण मुस्लीम मुलांचा समज करून देण्यात विशिष्ट लोक यशस्वी ठरले असतील... हा समज पक्का होण्यात समाजाकडून मिळालेली वागणूक जबाबदार असणार. 

‘आपण कुणीही नाही आहोत असा समज असेल तर दाखवून देऊ कोण आहोत ते!’ अशी हवा भरण्यातून ही कृती घडली असेल. 

या मुलांच्या भयंकर कृत्याचं समर्थन करण्यासाठी हे लिहिलेलं नाही... पण ज्या माणसांना बिनमहत्त्वाचे, निरुपयोगी म्हणून निकालात काढलं जातं त्यांना आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी असं भेसूर कृत्य करणं भाग पडलं असेल. जर चरखा चालण्यासाठी त्यांचा उपयोग नसेल तर ते चरखा उद्‌ध्वस्त करणार. अमेरिकेच्या काही भयंकर म्हणवल्या जाणाऱ्या शेजाऱ्यांकडून होणारा गोळीबार याच वृत्तीचं थोडं वेगळं उदाहरण आहे. वांशिक आणि धार्मिक गटातटांना आपण अजाणता किंवा जाणीवपूर्वक टाळतो, नाकारतो तेव्हा त्यांच्या असण्यानसण्यानं आपल्याला काहीच फरक पडत नाही हा संदेश आपण त्यांना देत असतो... आपण त्यांना सांगत असतो की, शक्ती दाखवायचीच असेल तर हिंसेला पर्याय नाही.

बापूजींचा काळ काय किंवा आजचा काळ काय... माणसांवर कोसळलेल्या भयंकर आपत्तींचं मूळ हे त्यांना सन्मानानं न वागवण्यात आणि त्यातून उद्भवलेल्या विषमतेत आहे. इतिहासाचा मागोवा घेतल्यावर हेच सत्य पुन्हापुन्हा लक्षात आलेलं आहे. युद्धांचंच पाहा... स्वतःच्या अहंकाराला कुरवाळत मोठं करणाऱ्या नेत्यांमुळं युद्धं घडलेली आहेत. युद्ध जिंकून स्वतःची ताकद या नेत्यांनी का वाढवली? दुसऱ्यांना जिंकून स्वतःच्या टाचेखाली आणण्यासाठी. अमेरिकेतल्या कृष्णवर्णीय लोकांवर पोलिसांनी गोळीबार केल्याच्या घटनेनंतर जी चळवळ जन्माला आली तिचं नाव ‘ब्लॅक लाइव्ह्‌ज मॅटर’ असं होतं. नावातच किती आक्रोश दडलाय! आपल्या असण्याचा अर्थ काय हे या माणसांना माहिती करून घ्यायचंय. स्त्रिया, अस्पृश्य, मुस्लीम, हिंदू, सुन्नी, शिया, ज्यू, ख्रिश्चन, विस्थापित, निर्वासित, सगळ्या-सगळ्यांच्या जगण्याला अर्थ आहे, त्यांचं अस्तित्व महत्त्वाचं आहे... आपण कितीदा ते नाकारणार आहोत? लहान मुलांनी खेळाच्या मैदानावर उभं राहून ‘मी तुझ्यापेक्षा कितीतरी चांगला आहे.’ असं म्हणणं शोभतं... पण आपल्याला ते शोभतं का? आपण अशीच कृती वर सांगितलेल्या गटांबद्दल करतो तेव्हा ती किती अपरिपक्व आणि मूर्खपणाची असते ते आपल्याला कधी कळणार? आपला दृष्टीकोन निरोगी व्हायला नको का? देशातली बहुसंख्य जनता चांगल्या दर्जाचं आयुष्य जगते आहे यावर आपण कधीही समाधानी असायला नको असं बापूजी सांगायचे. विकासाचा लाभ बहुसंख्यांना नाही... प्रत्येकाला व्हायला हवा आणि त्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत.


(अनुवाद: सोनाली नवांगुळ)

- डॉ. अरुण गांधी

'वरदान रागाचे' या लेखमालेत प्रसिद्ध झालेले इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा... 

Tags: पुस्तक अरुण गांधी महात्मा गांधी सोनाली नवांगुळ शिक्षण अहिंसा तरुण मुले अहंकार अर्थव्यवस्था गरीब विनयशीलता अस्पृश्यता अस्पृश्य Book New Book Translation Gift of Anger Arun Gandhi Mahatma Gandhi Teaching Non- Violance Ego Economy Poor Poverty Humility Untouchability Untouchables Load More Tags

Add Comment