त्यांनी संताप आणि वीज यांची तुलना समोर ठेवली...

वरदान रागाचे-  भाग 2

महात्मा गांधी यांचे सर्वांत ज्येष्ठ नातू (मणिलाल यांचे चिरंजीव आणि तुषार यांचे वडील) अरुण गांधी वयाच्या 88 व्या वर्षीही समाजकार्यात सक्रिय आहेत. त्यांचे बालपण व तारुण्य दक्षिण आफ्रिकेत तर नंतरचे आयुष्य भारतातील इंग्रजी पत्रकारितेत गेले. निवृत्तीनंतर ते अमेरिकेत वास्तव्य करीत आहेत. ते वय वर्षे 11 ते 13 या काळात आजोबांच्या सहवासात राहिले, त्याचा सखोल प्रभाव त्यांच्या विचारांवर व कार्यावर राहिला आहे. ते स्वतःला शांती पेरणारा शेतकरी (Peace Farmer) असे संबोधतात. त्यांचे 'Legacy of Love' हे पुस्तक मराठीत 'वारसा प्रेमाचा' या नावाने गेल्या वर्षी साधना प्रकाशनाकडून आले आहे. त्याचाच उत्तरार्ध म्हणावे असे छोटे पुस्तक म्हणजे 'Gift of Anger', त्याचा मराठी अनुवाद कर्तव्य वरून पुढील 12 आठवडे (प्रत्येक शुक्रवारी व शनिवारी) क्रमशः प्रसिद्ध करीत आहोत. म्हणजे या लेखमालेचा समारोप 2 ऑक्टोबरला होईल. 
- संपादक

हिंसा आणि द्वेषभावनेला प्रेम आणि क्षमेचं उत्तरं देऊन माझ्या आजोबांनी जगाला अचंबित केलं. रागाच्या जहरीपणाचं भक्ष्य होणं त्यांना मंजूर नव्हतं. मला मात्र या बाबतीत काही यश येत नव्हतं. वंशभेदानं बुजबुजलेल्या दक्षिण आफ्रिकेत गोऱ्या मुलांकडून माझ्यासारख्या भारतीय मुलावर मी ‘काळा’ म्हणून आणि काळ्या मुलांकडून मी ‘पुरेसा काळा’ नाही म्हणून हल्ला झाला. अशा अस्वस्थ वातावरणात मी मोठा होत होतो.

शनिवारी दुपारी गोऱ्यांची वस्ती असणाऱ्या रस्त्यावरून मी गोळ्या आणण्यासाठी चाललो होतो. त्यावेळी तीन किशोरवयीन मुलांनी माझ्यावर झडप घातली. एकाने गालावर लगावून दिली आणि मी धडपडलो, तेव्हा दुसऱ्याने मला झोडपलं, हसायला सुरुवात केली. रस्त्यावरच्या कुणाचंतरी या हल्ल्याकडं लक्ष जाऊन त्यांनी हटकण्यापूर्वीच या मुलांनी धूम ठोकली. मी फक्त नऊ वर्षांचा होतो. या घटनेनंतर वर्षभरानं दिवाळीनिमित्त आमचं सगळंच कुटुंब शेजारच्या गावी मित्रपरिवाराबरोबर सणाचा आनंद घेत होतं. त्या गावात अशाच कुणा दुसऱ्या ओळखीच्यांकडे जाताना मला दिसलं की काही तरूण काळे आफ्रिकन रस्त्याच्या कोपऱ्यावर रेंगाळले आहेत. त्यातील एक अचानक माझ्या मागे आला नि त्यानं हातातल्या काठीनं माझ्या पाठीवर सण्‌कन प्रहार केला... कारण तसं काहीच नव्हतं, पण होतंही! - की मी भारतीय होतो. या अनुभवानं माझ्यातल्या रागाला हवा मिळाली आणि बदला घेण्याच्या भावनेनं मी पेटून उठलो.

त्यानंतर मी वेटलिफ्टिंग करायला सुरुवात केली, बदला घेता येण्यासाठी शारीरिकदृष्ट्या कणखर होणं गरजेचं, त्यासाठी ही कसरत उपयोगी पडेल असं मला वाटलं. बापूजींच्या अहिंसेचे वाहक आणि प्रवक्ते म्हणवून घेणारे माझे आईवडिल माझ्या सततच्या भांडणांनी हताश झाले होते. त्यांनी माझा आवेश निवळण्यासाठी प्रयत्न केले, पण माझा संताप बराच टोकाला पोहोचला होता. ते फार काही करू शकले नाही.

सतत रागात धुमसण्यानं मलाही काही फार बरं वाटत नव्हतं. मनात आकस ठेवून तऱ्हतऱ्हेच्या कल्पना करत राहाण्यानं मला कणखर नव्हे, कमकुवत वाटायला लागलं. बापूजींच्या आश्रमात मला आणून सोडण्यामागे आईवडिलांचा तोच हेतू होता... माझ्या आतल्या संतापाची मला नीट समज यावी आणि त्याच्याशी मला कसा सामना करता येईल हेही मी समजून घ्यावं! मलाही तेच हवं होतं.

सेवाग्रामला आल्यावर आजोबांच्या पहिल्या भेटीतच मला जाणवलं होतं की कुणीही काहीही म्हणो किंवा करो, सतत इतका शांतपणा नि इतकं नियंत्रण कसं काय टिकतं यांचं! तरी मी सध्या कुठलीही वाईट गोष्ट करणार नाही व आजोबांचं अनुकरण करेन असं स्वत:ला वचन दिलं. आईवडिल नि इला गावी गेल्यावर खालच्या रस्त्याला असलेल्या खेड्यातील मुलांबरोबर मी खेळायला सुरुवात केली. त्यांच्याकडं जुना टेनिस बॉल होता. हाच बॉल ते सॉकरसाठी वापरायचे. गोल करायच्या जागी खुणेकरता मी काही दगडं आणून ठेवली.

सॉकर खेळायला मला फार आवडायचं. पहिल्या दिवसापासून या मुलांनी माझ्या दक्षिण आफ्रिकन उच्चाराची टिंगल करायला सुरुवात केली, पण मी कितीतरी वाईट अनुभव पचवले होते, त्यामुळं त्यांची छळणुक मी सहन केली. खेळ भरात आलेला असताना मी बॉलमागे धावत होतो तितक्यात एका मुलानं मुद्दामच पाय आडवा घातला. त्या धूळभरल्या मैदानात मी जोरात आपटलो. माझ्या गुढघ्याइतकाच दुखावला माझा अहंकार! त्यानंतर रागाचा चढलेला पारा, हृदयाची वाढलेली धडधड, बदला घ्यायचा ही मनाकडून आलेली आरोळी या सगळ्याचा अनुभव पूर्वीही मला होता. मैदानातून उठताना तिथला एक दगड मी उचलला आणि हात उंचावून शक्य तितक्या जोराने माझा अपमान करणाऱ्यावर भिरकावण्याच्या तयारीत उभा राहिलो.

माझ्या डोक्यातून अगदी मंद आवाज आला, ‘‘नको... नको करूस!’’

मी दगड तिथंच मैदानात भिरकावला आणि आश्रमाच्या दिशेने पळालो. अश्रू ओघळून गालांपर्यंत पोहोचले होते. आत शिरताच आजोबा दिसले. मी तत्क्षणी त्यांच्याजवळ गेलो नि त्यांना झाली गोष्ट सांगितली.

‘‘बापूजी, मी अलीकडे सारखा रागात असतो. काय करू तेच कळत नाही.’’

मी त्यांचा माझ्याबाबतीत अपेक्षाभंग केला आणि त्यांना नाराज केलं असं मला वाटत राहिलं. मात्र त्यांनी माझ्या पाठीवर शांतपणे थोपटलं आणि म्हणाले, ‘‘तुझा चरखा आण बरं, आपण दोघं मिळून सूत कातूया.’’

मी आश्रमात आलो त्यानंतर सगळ्यात आधी आजोबांनी मला चरखा वापरायला शिकवला. मी रोज सकाळी नि संध्याकाळी एकेक तास त्यावर सूत कातायचो. गंमत म्हणजे हे करताना मन शांत होत जायचं.

कुणी तोंडातून शब्द उच्चारायच्या आधीच बापूजींनी बरीच कामं उरकलेली असायची. एकावेळी अनेक कामं करत राहाणं त्यांना साधलेलं होतं. ते म्हणायचे, आपण हात मोकळे ठेवून नुसते बसलेले असू किंवा अगदी बोलतही असू तेव्हा चरखा हाताशी असावा. रिकामा वेळ कशाला जाऊ द्यावा?’’

त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी चरखा आणला. सूत कातता कातता आता बापूजी जणू काही समजुतीचा गुंताही सुटा करत चालले होते. ते म्हणाले, ‘‘मी तुला एक गोष्ट सांगतो. ऐक...’’

मी कान टवकारून गोष्ट ऐकू लागलो.

‘‘तुझ्याच वयाच्या एका मुलाची ही गोष्ट. तो सारखा रागावलेला असे, कारण त्याच्या मनासारखं काहीच घडत नसे. दुसऱ्या माणसाला काय वाटतं याला तो कधीच महत्त्व द्यायचा नाही, त्याला ते कळायचंच नाही. त्यामुळं ती माणसं वेगळी काही प्रतिक्रिया द्यायची तेव्हा तो डिवचला जायचा. त्यांना रागानं उत्तर द्यायचा.’’

गोष्ट ऐकताना मला वाटलं, तो मुलगा म्हणजे मीच असेन काय? तरी मी सूत कातत आणखी लक्ष देऊन ऐकायला लागलो.

‘‘एक दिवस मोठं भांडण लागलं. भांडणानं गंभीर वळण घेतलं आणि चुकून त्याच्याकडून खून घडला. विचारहीन उन्मादाच्या एका क्षणाला प्रतिसाद देत त्यानं दुसऱ्याचं जीवन संपवलं, आणि त्यातून त्याचं स्वत:चं आयुष्यही बरबाद केलं.’’

‘‘बापूजी, मी तुम्हाला वचन देतो, मी चांगला होण्यासाठी प्रयत्न करेन.’’ अर्थात चांगलं कसं व्हायचं याची तसूभरही कल्पना मला नव्हती, पण एक माहिती होतं की माझ्या रागानं कुणाचा जीव जावा असं मला बिलकुल वाटत नव्हतं.

बापूजी मान हलवत म्हणाले, ‘‘तुला राग फार आहे मात्र. तुझ्या आईवडिलांनी मला तिकडं झालेल्या भांडणांबद्दल सांगितलं आहे.’’

‘‘मला वाईट वाटतंय त्याचं...’’, हे बोलताना मला रडू फुटेल असं वाटत होतं.

मला वाटत होतं त्यापेक्षा बापूजींना वेगळ्या गोष्टीकडे माझं लक्ष वेधलं. चरख्याच्या चक्रातून माझ्याकडं पाहत ते म्हणाले, ‘‘राग या विषयाकडं तू वळलास याचा मला आनंद झाला. राग चांगला असतो. मी ही सतत रागावतो की.’’, चरख्याच्या चाकाला बोटांनी गती देत आजोबा म्हणाले.

‘‘मी कधीच तुम्हाला रागावलेलं बघितलं नाहीये, त्यामुळं माझा विश्वास बसत नाही तुमच्या सांगण्यावर.’’, मी अचंब्यानं उत्तर दिलं.

‘‘हो, कारण मी माझा राग चांगल्याकरिता वापरायचं ठरवलं आहे. माणसामधला राग हा वाहनामध्ये असलेल्या इंधनासारखा असतो. इंधन आपल्या गाडीला पुढं जाण्यासाठी ताकद देते, एका जागेपासून दुसऱ्या चांगल्या जागी जाण्यासाठी गती देते. त्या शिवाय आपण नवी आव्हानं घेण्यासाठी प्रेरित कसं होणार? ती एक ऊर्जा असते. संतापातून तयार होणारी ऊर्जा आपल्याला काय योग्य, काय अयोग्य याबद्दल स्पष्टता आणण्यासाठी भाग पाडते.’’, आजोबांनी आपला मुद्दा स्पष्ट केला.

आजोबांनी ते माझ्याएवढे होते तेव्हाची दक्षिण आफ्रिकेतली गोष्ट सांगितली. अतिशय हिंसक पूर्वग्रहांचा सामना त्यांना त्यावेळी करावा लागला होता. त्यामुळे खूप चिडचिड व्हायची त्यांची. पण अखेरीस त्यांच्या लक्षात आलं, सूडाची भावना उपयोगाची ठरत नाही. यानंतर ते पूर्वग्रह आणि भेदभाव या गोष्टींवर वेगळ्या करूणेतून काम करायला लागले. संताप आणि तिरस्काराला चांगुलपणाचाच उतारा असतो हे त्यांना कळलं. सत्य आणि प्रेम यांची शक्ती त्यांना उमगली. बदला घेण्याच्या भावनेची निरर्थकता कळली. डोळ्यासाठी डोळा हिरावून घेतला तर सगळं जग आंधळं व्हायला वेळ लागणार नाही हे खरंच तर होतं.

बापूजी काही जन्मापासून समतोल नि संतुलित स्वभावाचे नव्हते हे मला कळलं तेव्हा आश्चर्यच वाटलं होतं. कधीतरी नंतर त्यांचा कायापालट झाला आणि अतिशय आदरानं लोक त्यांना ‘महात्मा’ असं संबोधू लागले. पण हे नंतरचं, आधी कधीतरी ते फार दांडगट नि बेलगाम होते. ते माझ्याएवढे असताना एकदा त्यांनी त्यांच्या वडिलांच्या खिशातले पैसे चोरले, सिगारेट आणण्यासाठी. त्यावेळी बरोबरच्या मुलांमुळं ते अडचणीत आले होते. त्यांचं लग्न झालं तेव्हा ते नि आजी दोघंही तेरा वर्षांचे होते. ते चिडून आजीच्या अंगावर ओरडायचेही. एकदा तर कुठल्या तरी विषयावरून वादावादी झाली नि संतापून त्यांनी आजीला खरोखर घराबाहेर ढकलून दिलं. मात्र आतून आपण ज्या तऱ्हेचा माणूस बनू लागलो आहोत त्याचा त्यांना त्रास होऊ लागला आणि त्यांनी बदलायला सुरुवात केली. स्वत:वर नियंत्रण आणलं. 

‘‘म्हणजे मलाही शिकता येईल हे?’’ मी विचारलं.

‘‘तू या क्षणीही ते करतोहेस...’’ मंद हसत ते म्हणाले.

आम्ही दोघंही आपापल्या चरख्यावर बसलो होतो, त्यावेळी ‘राग चांगल्यासाठी वापरता येऊ शकतो’ हा विचार मनात मुरवण्याचा माझा प्रयत्न चालू होता. आजही मला राग येत नाही असं नाही, पण मी त्याला योग्य मार्गावर नेऊ शकतो, सकारात्मक दिशा देऊ शकतो... आजोबांनी याच शांतपणानं राजकीय बदल होण्यासाठी पाठपुरावा केला म्हणून दक्षिण आफ्रिका नि भारतातही बदल घडले, रूजले.

बापूजी म्हणायचे, राग सकारात्मकतेत कसा बदलून जातो याचा हा चरखा प्रत्यक्ष उदाहरण आहे. कापूस उद्योग हा भारताचा शतकानुशतके चालू असणारा उद्योग होता, पण आता ग्रेट ब्रिटनमधले मोठमोठे कारखाने भारतातून कापूस घेऊन प्रक्रिया करून परत भारतातच आणून अव्वाच्या सव्वा किंमतीनं कापड विकू लागली. आपल्या माणसांना ही किंमत परवडणं शक्य नव्हतं, त्यामुळं परवडतं तसल्या फटकुरात जगावं लागण्यामुळं ती चिडली. साहजिकच होतं ते. तरीही माणसांच्या हातातला उद्योग जाणं, ती दरिद्री होणं या कारणांनी ब्रिटिश उद्योगांवर हल्ला करण्याऐवजी बापूजींनी चरख्याची निवड करत प्रत्येक कुटुंबाला स्वत:ला पुरेल इतकं कापड निर्माण करण्यासाठी उत्तेजन दिलं. त्यांच्या या हाकेचा भारतभर आणि इंग्लंडमध्येही परिणाम जाणवला.

मी खूप मन लावून ऐकतोय म्हटल्यावर बापूजींनी आणखी एक तुलना माझ्यासमोर ठेवली. त्यांना सतत अशा वेगवेगळ्या गोष्टींमधली साम्यस्थळं लावून बघण्याचा छंदच होता. त्यांनी संताप आणि वीज यांची तुलना समोर ठेवली नि म्हणाले, ‘‘आपण वीजेचा प्रवाह हुषारीनं वापरत आपलं जगणं अधिक सुटसुटित करतो, मात्र जर यात काही छेडछाड केली, ती चुकीच्या पद्धतीनं वापरली तर आपला मृत्यू ठरलेला! या वीजेसारखाच आपला संताप आपण मानवी कल्याणासाठी हुषारीनं वापरायला हवा.’’

माझ्या संतापी वृत्तीमुळं माझ्या किंवा इतरांच्या आयुष्याचं शॉर्ट सर्किट व्हावं असं मला कधीच नको होतं. तरी मी यातली एखादी ठिणगी वापरून बदल कसा घडवू शकेन?

बापूजी अतिशय आध्यात्मिक होते, पण प्रसंगी ते तितकेच व्यवहारीही व्हायचे. त्यांनी मला एक वही नि पेन्सिल दिली. का? - तर मी माझ्या रागाची नोंद ठेवावी. त्यांनी अगदी बारकाईनं सूचना दिल्या ही वही माझ्याकडे सोपवताना, ‘‘जेव्हा जेव्हा तुझा पारा चढेल तेव्हा तू थोडा थांब व कुणामुळं, कशामुळं आणि का तुझ्या भावनांना हात घातला गेला नि तुझा राग चढला हे त्यात लिही. रागाच्या खोल तळात पोहोचणं हा आपला हेतू आहे. जर उगम सापडला व समजून घेता आला तर आपल्याला उपायही सापडेल हे निश्चित.’’

बापूजींचं म्हणणं होतं, प्रत्येचा दृष्टीकोन समजून घेणं हीच तर प्रश्नाच्या सोडवणुकीची चावी असते. मुळात रागाची वही यासाठी नव्हतीच, की राग आला की त्यात ओकून टाका नि रिकामं व्हा किंवा स्वत:च्या प्रामाणिकपणाबद्दल बरं वाटवून घ्या. बरेच लोक केवळ इथंपर्यंतच थांबतात. (आणि गंमत म्हणजे लिहिलेलं पुन्हा पुन्हा वाचतात आणि त्यांचा राग वाढत जातो, शेवटी आपलंच कसं बरोबर होतं हे त्यांना वाटतं!) खरंतर ही रागाची वही नेमका कशामुळं संघर्ष तयार झाला आणि त्यातून मार्ग काय काढता येऊ शकेल हे समजून घेण्यासाठी असायला हवी. हे समजून घेता येण्यासाठी मला माझ्यापासून निराळं, त्रयस्थ व्हावं लागतं नि दुसऱ्याची बाजू पाहावी लागते. दुसऱ्या माणसामध्ये प्रवेश करता येण्यासाठीचा हा नुस्खा नव्हे...चिडचिड, संताप धुमसू नये, वाढू नये यासाठीचं तंत्र शोधण्याचा हा प्रयत्न आहे.

कधी कधी आपल्याला वाटतं आपण जे काही करतोय त्यानं संघर्ष किंवा भांडण निवळतंय, पण होतं उलटंच. आपल्याला हवं आहे तसं लोक वागतील असं वाटतं, पण तसं घडत नाही म्हणून आपणच वैतागतो, संतापतो. समोरच्यावर शाब्दिक किंवा शारीरिक हल्ला चढवणं, सतत टीका करणं, शिक्षेच्या धमक्या देणं यातून लहान मुलं काय किंवा प्रौढ माणसं काय, दोहोंवर विपरित परिणाम होतो. आपली रागाची प्रतिक्रिया युद्धाचा ज्वर वाढवते. मुळात शोषण करणारे, छळणुक करणारे हे कधीच बलशाली ठरत नाहीत. त्यातून कळतं की एकूण आपण वाट न बघता स्वत:चाच छळ केला. खेळाच्या मैदानात, उद्योगधंद्याच्या ठिकाणी किंवा राजकीय व्यासपीठांवर जे क्षुद्रपणा दाखवतात, शिवीगाळ किंवा मारहाण करतात ते खरेतर कमजोर आणि भेदरलेले असुरक्षित लोक असतात. दुसऱ्याचा दृष्टीकोन समजून त्याला माफ करता येणं ही खऱ्या ताकदीची निशाणी असते असं बापूजींनी मला शिकवलं.

आपण कणखर आणि आरोग्यदृष्ट्या सुदृढ शरीरसंपदा कमावण्यासाठी जितका वेळ खर्च करतो तसा वेळ कणखर नि सुदृढ मन घडावं म्हणून देत नाही. मन निरोगी नसेल तर आपण कशावर तरी चिडतो, कुणाला तरी फटकारतो, काहीतरी नकोसं म्हणून बसतो आणि नंतर पस्तावतो. दिवसभरात कितीतरी वेळा रागाची किंवा निराशेची लाट आपल्यात उसळते आणि त्यावेळी नेमकं काय करावं हा प्रश्न आपल्याला पडतो. कामाच्या ठिकाणी सहकारी काहीतरी बोलतो आणि आपण विचार न करता काहीतरी अयोग्य बोलून बसतो किंवा एखादी त्रासदायक मेल आपल्याला येते नि आपण कुरबुरत तितकंच त्रासिक त्याचं उत्तर देऊन टाकतो. आपलं ज्यांच्यावर खूप प्रेम आहे अशांनाही आपल्या रागाचे चटके बसतात. त्यावर ते जी प्रतिक्रिया देतात ती आपल्याला हवी तशी नसते. ती पसंत न पडून आपण समोरच्याला आणखी झोडपतो.

ज्या माणसांशी प्रेमानं, सहृदयतेनं वागायला हवं त्यांना आपल्या शब्दांनी न भरून येणारं दु:ख आपण देतो आणि आपल्याला कळत नाही की या रागानं आपण स्वत:लाही खोलवर दुखावलं आहे. तुम्ही एखाद्याचा अपमान करता किंवा त्यांच्याशी दुष्ट वागता तेव्हा तुम्हीच किती कष्टी होता, किती व्यर्थता जाणवते स्वत:तली हे पाहा! सगळं शरीर ताठून जातं, मन पोळलं जातं. तुमच्या उद्रेकात तुम्ही स्वत:च इतके बुडून जाता की एकाग्रता हरवते. संतापानं तुमचं जग इतकं आक्रसून जातं की तुम्हाला अपमानाचा तो एक क्षण तेवढा पुन:पुन्हा आठवत राहातो. भले नंतर उपरती होऊन तुम्ही शांत झालात, समोरच्याची माफी मागितलीत, तरी जे व्हायचं ते नुकसान होऊन बसलेलं असतं. आपण जेव्हा भावनातिरेकाने समोरच्यावर अतिशय अविवेकी पद्धतीनं बरसतो तेव्हा घडतं काय? - तर बंदुकीतून गोळी सुटते, जी पुन्हा तिच्यात घालता येत नाही.

वेगळ्या पद्धतीनं प्रतिक्रिया देण्याचा पर्याय असतो हे आपण लक्षात घ्यायला हवं.

(अनुवाद: सोनाली नवांगुळ)

- डॉ. अरुण गांधी

वाचा वरदान रागाचे- भाग 1: प्रास्ताविक- आजोबांकडे मिळालेले धडे

Tags: अनुवाद अरुण गांधी महात्मा गांधी Book New Book Translation Gift of Anger Arun Gandhi Mahatma Gandhi Load More Tags

Comments:

Santosh Padmakar Pawar

हे संस्कारी वाचन आधी व्हायला पाहिजे होते... इथून पुढेही उपयोगी पडेल...धन्यवाद

Manjiri Deshmukh

राग आवरतां आलाच पाहीजे.. त्यासाठी आत्मचिंतन आवश्यक.. आज केवळ स्वत: च्या रागावर खतपाणी घातलं जातय.. राग गाळतां आला पाहीजे., संयम ठेवतां आलाच पाहीजे... गांधीजीनी असे किती अपमान गिळले असतील??? आपण आपल्या छोट्याश्या रागाच भांडवल करतो... त्यामुळे रागावर संयम ठेवलाच पाहीजे मंजिरी देशमुख

Madhav Jagtap

कर्तव्य साधना मार्फत हे अनमोल संस्कार साहित्य आम्हा वाचकांपर्यंत पोहचले, त्यासाठी खुप धन्यवाद...!

Add Comment