जेव्हा जेव्हा
विरोधी पक्षाचे लोक एकत्र येऊ लागतात
मोदी सरकारवर दबाव वाढू लागतो
तेव्हा तेव्हा
कुजबूज सुरु होते,
‘राहुल गांधी जेलमध्ये जाणार
सोनिया गांधी जेलमध्ये जाणार
नॅशनल हेराल्ड, वगैरे वगैरे.’
===
कालही तसेच झाले.
इकडे संसदेचे अधिवेशन सुरू होणार
आणि तिकडे दिल्ली पोलिसांनी
राहुल, सोनिया यांच्या विरोधात
फ्रेश एफआयआर दाखल केली.
===
तसं पाहिलं तर दहा बारा वर्षांपूर्वीच
भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमन्यम स्वामी यांनी
गांधी कुटुंबाच्या विरोधात तक्रार केली होती.
तेव्हा पासून ईडी तपास करत आहे.
राहुल गांधींना तर पन्नास पन्नास तास
बसवून ठेवण्यात आले होते.
पण कुठंच काही मिळालं नाही.
कुठंच काही सापडलं नाही.
या केसमध्ये दम नाही
हे जसे ईडीला माहित आहे
तसेच सुब्रमन्यम स्वामीनाही माहित आहे.
या केसमध्ये आणखी पुढे गेलो तर आपणच तोंडावर पडू
हे सगळ्यांना माहित आहे.
===
भाजप-आरएसएसच्या जवळचे
एक पत्रकार म्हणतात की,
‘सुब्रमन्यम स्वामी ही तक्रार मागे घेणार आहेत
म्हणून आता मोदी-शहा यांनी नवीन मार्ग शोधला आहे.’
ईडीने आता हे प्रकरण दिल्ली पोलिसांच्या
आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठवलं
आणि तपास करा असं सांगितलं.
===
आता नवा खेळ सुरू होईल.
परत तपास होईल.
परत रात्री-बेरात्री बोलावण्यात येईल.
पत्रकारांना चटपटीत बातम्या मिळतील.
भक्तमंडळी आस लावून बसतील की
‘गांधी फॅमिली जेलमध्ये कधी जाईल.’
हे सगळं 2029 पर्यंत चालू राहील.
मग कदाचित गुजरातच्या न्यायालयाने
राहुल गांधीला दिली होती
तशी दोन-चार वर्षांची शिक्षा देण्यात येईल.
तोपर्यंत कोर्ट कचेऱ्या चालू राहतील.
बदनामीचे सत्र चालू राहील.
===
पण ज्या प्रकरणावरून हा खेळ चालू आहे
ते प्रकरण नेमकं काय आहे
हे समजावून घेण्यासाठी कुणाकडेच वेळ नसेल.
तर हा विषय आहे पत्रकारितेशी संबंधित.
मीडियाशी संबंधित.
===.
पण मीडिया कसा मॅनेज करायचा,
मिडियाची देखभाल कशी करायची
त्याचा उपयोग आपल्या भल्यासाठी कसा करायचा
या सगळ्या गोष्टी काँग्रेसने
भाजपकडून शिकायला पाहिजे.
===
आता हेच बघा
अर्नब गोस्वामीचं
हजारो कोटींचं टीव्ही चॅनल
किती मस्त चालतंय.
रजत शर्माचंही तसंच.
बाकी उरली सुरली चॅनल्स
अंबानी साहेबांनी घेतली.
एनडीटीव्ही मस्ती करत होता तर
तो अडाणी साहेबांनी घेतला.
सगळे कसे शिस्तीत वागतात.
आता सुधीर चौधरीला स्वतःचं
काहीतरी सुरू करायचा शौक आला
तर त्याला सरकारी दूरदर्शननं
मोठा कॉन्ट्रॅक्ट देऊन मोठा ‘टेक ऑफ’
करायची सोय करून दिली.
एवढं सगळं करूनही
सगळं कसं मस्त मस्त!
===
नाही तर हे काँग्रेसवाले बघा.
बाप-दाद्यांनी सुरू करून दिलेला पेपरसुद्धा
नीट सांभाळता येत नाही.
===
१९३७मध्ये पंडित नेहरूंनी
‘असोसिएटेड जर्नल लिमिटेड’ [AJL]
नावाची एक कंपनी सुरू केली.
हजारो लोकांनी त्यांना मदत केली.
भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून
सुरू असलेल्या चळवळीला मदत व्हावी
ब्रिटीश सरकारविरोधात जनजागृती करावी
लोकांना संघटित करावे अशा हेतूने
काही वृत्तपत्र सुरू केले.
इंग्रजीत ‘नॅशनल हेराल्ड’,
हिंदीमध्ये ‘नवजीवन’
आणि ऊर्दूमध्ये ‘कौमी आवाज’.
===
पेपर चांगले चालत होते.
भारत स्वतंत्र झाला.
अनेक वर्षे काँग्रेस पक्षच सत्तेत होता.
पण वृत्तपत्रांची स्वायत्तता अबाधित होती.
कॉंग्रेसचे पेपर असले तरी
सरकारवर टीका करायचे.
माफी नव्हती.
कंपनी वाढत होती.
लोकांचा पाठिंबा मिळत होता.
अनेक ठिकाणी ऑफिसेस झाली होती.
सगळं काही व्यवस्थित चालू होतं.
===
पण पुढे इतर वृत्तपत्रांसारखं
AJL वरही संकट आलं.
तंत्रज्ञान बदललं.
प्रिंट मिडियावर टीव्ही मिडिया
भारी पडू लागला.
आर्थिक तंगी सुरू झाली.
संपादक मंडळींचे पगार करण्यासाठी,
पत्रकारांचे पगार करण्यासाठी पैसे नव्हते.
इतर खर्च करण्यासाठी पैसे नव्हते.
मग कर्ज घेण्यात आले.
वेळोवेळी काँग्रेसकडून जवळपास
90 कोटी रुपये घेण्यात आले.
तरीही 2008 मध्ये कंपनी बंद पडली.
===
मग काँग्रेसच्याच काही नेत्यांनी
या कंपनीला परत सुरू करू
आपली समृद्ध परंपरा चालू ठेवू,
या भावनेने नियोजन केले.
2010 मध्ये ‘ना नफा ना तोटा’
या तत्वावर ‘यंग इंडियन लिमिटेड’
नावाची कंपनी सुरु केली.
आणि यंग इंडियन या कंपनीने
AJL कंपनीचे शेअर्स घेतले.
===
इथेच गडबड झाली.
2004 ते 2014 पर्यंत केंद्रात
काँग्रेसचेच सरकार होते.
ते सरकार काहीही करू शकले असते.
त्यांनी जर कुठल्याही उद्योगपतींना
सांगितले असते तर कुणीही
जाहिराती दिल्या असत्या.
मदत केली असती.
पेपर वाचला असता.
पण त्यांनी तसे केले नाही.
आपली प्रतिमा स्वच्छ ठेवण्याच्या भानगडीत
स्वतःसाठीच मोठं संकट निर्माण केलं.
===
यंग इंडियन मध्ये डायरेक्टर म्हणून
सोनिया, राहुल, मोतीलाल व्होरा
आणि ऑस्कर फर्नांडीस होते.
पेपर काँग्रेसचाच.
आर्थिक मदत काँग्रेसकडूनच.
स्थापन केला पंडित नेहरूंनी.
त्यामुळे त्यांनी एका खिशातले काढून
दुसऱ्या खिशात घातले.
बरं कंपनी सेक्शन 8 म्हणजे
कुठलाही पगार घेता येणार नाही.
कुठलाही नफा घेता येणार नाही.
कामाचा मोबदला घेता येणार नाही.
प्रॉपर्टी ट्रान्स्फर होणार नाही.
कुठलेही भाडेतुडे घेता येणार नाही.
कुठल्याही सोयीसुविधा, गाडी, घोडे वगैरे
वापरता येणार नाही
असा स्वच्छ, स्पष्ट करार झाला.
===
पण भाजपसारखा विरोधी पक्ष
समोर असताना संकट येणार नाही,
हे शक्य नव्हतं.
डॉ. सुब्रमन्यम स्वामी यांनी
सरळ हिशोब लावला.
या पेपरची बरीच मालमत्ता आहे.
कधी हजार कोटी, कधी दोन हजार कोटी
कधी पाच हजार कोटी
असे आकडे येत होते.
वाढवले जात होते.
आता ईडीचं म्हणणं आहे 359 कोटी.
त्यांनी 2012 मध्ये पीएमएलए अंतर्गत
मनी लॉन्डरिंगची केस दाखल केली.
त्यावेळी काँग्रेसचंच सरकार होतं.
कोर्टात प्रकरण गेलं.
पण त्यात काही झालं नाही.
===
2014 मध्ये नरेंद्रभाई पंतप्रधान झाले.
त्या वेळी स्वामी साहेबांचे आणि मोदीजींचे
फारच जिव्हाळ्याचे संबंध होते.
शेवटी ईडी ने परत जोरात तपास सुरु केला.
मोठ्या प्रमाणावर मीडिया ट्रायल सुरु झाली.
या खटल्यात
राहुल-सोनिया आणि इतर काँग्रेसवाले
गुन्हेगार आहेत की नाही,
हे कोर्टच ठरवेल.
पण सलग दहा वर्षे सत्ता असतानाही
‘नॅशनल हेराल्ड’ उपाशी मरत होतं,
हे वाईट होतं.
===
आता मात्र परिस्थितीने वेगळंच वळण घेतलंय.
एकेकाळी मोदीजींवर प्रचंड भरोसा असलेले
सुब्रमन्यम स्वामी आता गांधींविरुद्ध केलेला आरोप
मागे घेण्याची भाषा करत आहेत.
आता त्यांच्या निशाण्यावर
डायरेक्ट मोदी साहेबच दिसत आहेत.
अमेरिकेतील एका व्यक्तीचा संदर्भ देऊन ते बोलत आहेत.
त्या कुप्रसिद्ध व्यक्तीचे नाव आहे जेफरी एपस्टाइन.
अनेक सत्ताधारी लोकांची हवस पुरवणारा,
त्यांना विकृत अय्याशी शिकवणारा,
त्यांना लहान लहान मुलींचा पुरवठा करणारा,
हा विकृत माणूस आहे.
एपस्टाइन इस्राइलचा एजंट आहे असा आरोप आहे.
जगभरातील सत्ताधाऱ्यांना नादाला लावून
त्यांच्याकडून इस्राइलच्या हिताची कामे तो करून घेत असे.
शेवटी तो पकडल्या गेला आणि जेलमध्येच
त्याचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला.
===
आता जेफरी एपस्टाइनची बरीच माहिती समोर येत आहे.
त्याच्याशी मोदी सरकारमधला एक मंत्री संपर्कात होता.
भारतातील एका उद्योगपतीचे नावही समोर येत आहे.
त्याच्या संभाषणामध्ये मोदीजींच्या नावाचा उल्लेख दिसत आहे.
अमेरिकन सरकार हळूहळू ही माहिती समोर आणत आहे.
===
अशा या बदनाम जेफरी एपस्टाइनचा संदर्भ देऊन
स्वामी साहेब बरीच खळबळजनक माहिती
लोकांसमोर समोर आणत आहेत.
येणाऱ्या काळामध्ये अनेक खळबळजनक खुलासे
होण्याची शक्यता आहे.’
===
अशावेळी किमान भारतीय मीडियाचा फोकस
एपस्टाइनवर न जाता नॅशनल हेराल्डवर जाईल
याचीही व्यवस्था झालेली दिसते.
===
मोदी सरकार कुठलेही काम
विनाकारण करत नाही.
त्यामागे फार मोठी योजना असते.
-दिलीप लाठी
diliplathi@hotmail.com
(लेखक, वसुधा रिसर्च अँड पब्लिकेशन्स प्रायव्हेट लि.चे व्यवस्थापकीय संचालक आणि ज्ञानज्योती या नियतकालिकाचे संपादक आहेत.)
Tags: rahul gandhi sonia gandhi congress bjp ed sadhana digital राहुल गांधी सोनिया गांधी साधना डिजिटल ई डी भाजप कॉंग्रेस नॅशनल हेराल्ड Load More Tags
Add Comment