साने गुरुजींचे विचार माझ्या पिढीला मार्गदर्शक ठरले

माझ्या जीवनाचे शिल्पकार- भाग 3

साने गुरुजींची पहिली भेट झाली ती ‘श्यामची आई’ वाचताना. अर्थात सर्व वाचकांप्रमाणे मीही प्रभावित झालो. मी तेव्हा मॅट्रिकच्या वर्गात होतो. माझे मामा त्या वेळी जळगावला मुख्याध्यापक होते. ते साने गुरुजींचे मित्र होते. त्यांच्याकडून मला गुरुजींबद्दल खूप ऐकायला मिळाले आणि त्यामुळे त्यांना भेटावे असे वाटले. साने गुरुजींबद्दल खूप प्रेम आणि आदर असलेला, खानदेशातून आलेला खुशाल पाटील हा कॉलेजमध्ये माझा मित्र होता. तो एक दिवस मला अचानक म्हणाला, ‘‘साने गुरुजी इथं आलेत आणि आज रात्री आम्ही काही जण गुरुजींबरोबर फिरायला जाणार आहोत. तू वेदिकाश्रमातल्या माझ्या खोलीवर साडेआठला ये.’’ मला साने गुरुजींच्या भेटीची फार उत्सुकता वाटली. मी ठरल्याप्रमाणे खुशाल पाटलाच्या खोलीवर गेलो. खानदेशचे सात-आठ कॉलेज विद्यार्थी आधीच तेथे आले होते. पावणेनऊच्या सुमारास चौधरी हा आमचा मित्र साने गुरुजींना घेऊन आला आणि आम्ही निघालो. आम्ही फर्ग्युसन कॉलेजच्या मागच्या बाजूच्या टेकडीवर चढायला लागलो. साने गुरुजी काही बोलत नव्हते, त्यामुळे मी काहीसा अस्वस्थ झालो. थोड्या वेळाने आम्ही टेकडीवरील नामदार गोखल्यांच्या स्मारकाजवळ येताच साने गुरुजी एकदम थांबले आणि म्हणाले, ‘‘आपण आता इथंच बसू या.’’ आम्ही खाली बसल्यावर साने गुरुजी बोलू लागले. त्यांचे भाषण मला आजही आठवते.

त्याचा आशय पुढीलप्रमाणे होता- साने गुरुजी म्हणाले, ‘‘मी स. प. कॉलेजमध्ये सीनिअर बी. ए.ला असताना खूप वाचीत असे. देशभक्तांची चरित्रे वाचताना माझे मन उचंबळून येई. ना. गोपाळकृष्ण गोखल्यांचे इंग्रजी चरित्र मी वाचले. ते चरित्र श्रीनिवास शास्त्रींनी लिहिले होते. महात्मा गांधी नामदार गोखल्यांना गुरू मानत, हे वाचून मी केवळ ते चरित्र वाचून थांबलो नाही, तर गोखल्यांची माहिती देणारी सगळी पुस्तके मी वाचली. तात्यासाहेब केळकरांनी लिहिलेले लोकमान्य टिळकांचे चरित्रही वाचले आणि महात्माजींचे आत्मचरित्रही वाचले. गांधीजी ज्या वेळी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले, तेव्हा ते त्या वेळच्या तीन थोर नेत्यांना भेटले. ते तीन थोर नेते म्हणजे ज्यांना मुंबईचे सिंह म्हणत ते फिरोजशहा मेहता, पुण्याचे लोकमान्य टिळक आणि गोपाळकृष्ण गोखले. महात्माजी फार सोपे आणि सुंदर इंग्रजी लिहितात. एका वाक्यात त्यांनी या तीन थोर नेत्यांचं वर्णन केलं आहे. गोखल्यांच्या मृदू प्रेमळ स्वभावामुळे महात्माजींना ते गंगामाईसारखे वाटले. महात्माजींनी लिहिले आहे, गंगामैयाने मला हृदयाशीच धरलं.’’ साने गुरुजी नंतर अर्धा-पाऊण तास बोलत होते. त्यांनी गोखल्यांची देशभक्ती, त्यांचा व्यासंग यावर बोलत त्यांचे व्यक्तिमत्त्व आमच्या डोळ्यांसमोर उभे केले.

साने गुरुजी मधेच म्हणाले, ‘‘गोखले तुमच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये वीस वर्षे प्रोफेसर होते. सुरुवातीस ते गणित शिकवीत. पुढे इंग्रजी साहित्य आणि इतिहास शिकवू लागले. वीस वर्षे शिकवल्यानंतर गोखल्यांनी राजीनामा देऊन सर्व वेळ राजकीय कार्याला देण्याचे ठरवले. ज्या वेळी त्यांना निरोप देण्याचा समारंभ झाला, तेव्हा गोखल्यांनी केलेले भाषण तुम्ही वाचा... ‘फेअरवेल टु फर्ग्युसन कॉलेज’- फार सुंदर आहे ते भाषण. तुम्ही सगळे जण ते जरूर वाचा.’’ साने गुरुजींनी त्या भाषणातील दोन-तीन परिच्छेद आम्हाला सांगितले. गोखले म्हणाले की, त्यांचे मित्र त्यांना कॉलजेमध्ये राहण्याचा आग्रह करीत होते, परंतु जोपर्यंत तुम्हाला लोक ‘राहा’ म्हणतात, तोपर्यंत जाण्यात मौज असते. गोखल्यांना राजकारणाबद्दल आकर्षण वाटत असले, तरी पैलतीरावर काय आहे हे माहीत नसतानाच ते राजकारणाच्या प्रवाहात उडी घेत होते, असे ते म्हणाले. साने गुरुजी म्हणाले, ‘‘गोखल्यांनी त्यांच्या या भाषणात एका कोळ्याची गोष्ट सांगितली आहे. समुद्राची गाज ऐकू आली की, कोळ्याला घरी राहवत नसे आणि तो आपली होडी हाकत असे. गोखले म्हणाले की, त्यांना अशीच मायभूमीची हाक ऐकू आली. त्यांना आता घरी, फर्ग्युसन कॉलेजात राहणे शक्य नव्हते.’’

साने गुरुजी थोडे थांबले आणि म्हणाले, ‘‘मी 1930 मध्ये अमळनेरला शिकवत होतो. परंतु महात्माजींनी सत्याग्रह सुरू केला. मला देशाची हाक ऐकू आली आणि मी शिक्षकपदाचा राजीनामा देऊन सत्याग्रहात जायचे ठरवले. त्या वेळी मला गोखल्यांचे हे भाषण आठवले.’’ साने गुरुजी बोलत होते आणि आम्ही मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो. ते म्हणाले, ‘‘गोखल्यांनी सर्व्हंट्‌स ऑफ इंडिया सोसायटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. गोखले आणि त्यांचे सहकारी यांनी, आपण आता जिथं बसलो आहोत तिथेच देशसेवेची शपथ घेतली. मी सीनिअर बी. ए.ला असताना गोखल्यांचे मराठीमध्ये चरित्र लिहिले. लिहायला सुरुवात करण्यापूर्वी याच पवित्र जागी येऊन गोखल्यांच्या स्मृतीला वंदन केले. ते चरित्र लिहिताना मी एक दिवसाआड येथे येत असे आणि परत खोलीवर गेल्यावर भराभरा लिहीत असे.’’ साने गुरुजी मधेच थोडे थांबले आणि नंतर म्हणाले, ‘‘गोखल्यांनी इथे देशसेवेची शपथ घेतली आणि जीवनाच्या अखेरीपर्यंत ती पाळली. तुम्हीही आज शपथ घ्या की, आपली मायभूमी स्वतंत्र होण्यासाठी तुम्ही सर्वस्व अर्पण कराल. प्रत्येकाने आपल्या मनाशी शपथ घ्या. मला खात्री आहे, तुम्ही ती पाळाल. यापुढच्या स्वातंत्र्यलढ्यात आपण सर्व जण तुरुंगातच भेटू.’’ साने गुरुजी बोलायचे थांबले. आम्ही स्तब्ध होतो. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मी मनाशी शपथ घेतली. माझे भाग्य हे की, साने गुरुजी म्हणाल्याप्रमाणे येरवडा तुरुंगात मी ज्या बराकीत होतो, तेथेच साने गुरुजींना काही महिन्यांनी आणण्यात आले.

तुरुंग हे विद्यापीठच असते. तेथे आम्हाला आचार्य भागवतांची तत्त्वज्ञानावरची आणि काकासाहेब गाडगीळांची ‘ग्यानबाच्या अर्थशास्त्रा’वरची व्याख्याने ऐकायला मिळाली. गांधी जयंतीनिमित्त आचार्य जावडेकरांनी तीन व्याख्याने दिली. साने गुरुजी आमच्यामध्येच बसत आणि आचार्यांच्या भाषणाची सतत टिपणे घेत. व्याख्यान संपवून परत आल्यावर साने गुरुजी लिहायला सुुरुवात करीत. रात्री उशिरापर्यंत ते लिहीत असत. आचार्यांची तीनही व्याख्याने साने गुरुजींनी लिहिली आणि नंतर ते आचार्यांकडे गेले. आचार्यांना म्हणाले, ‘‘आपली तीन भाषणे मी लिहून काढलीत. ती आपण तपासून द्या.’’ आचार्य जावडेकर म्हणाले, ‘‘1932 मध्ये धुळे जेलमध्ये विनोबाजींनी गीताप्रवचने दिली आणि तुम्ही त्या वेळी लिहून घेतल्यामुळेच वाचकांना ती मिळाली. मी वाचतो तुम्ही जे लिहिलेत ते.’’ साने गुरुजींनी लिहिलेली ती व्याख्याने आचार्यांनी वाचली आणि वहीच्या शेवटी लिहिले, ‘मी महात्मा गांधींवर जी तीन व्याख्याने दिली, त्या व्याख्यानांतील माझे सर्व विचार साने गुरुजींनी बरोबर उद्‌धृत केले आहेत; मात्र शब्द त्यांचे आहेत.’ साने गुरुजींनी लिहिलेली ती व्याख्याने पुढे कोणी तरी प्रसिद्ध केली, परंतु ती फारशी कुणाला मिळाली नाहीत. आचार्य जावडेकरांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव आणि माझे मित्र प्रभाकरपंत हे इस्लामपूरला पूर्वी आचार्य राहत असलेल्या जागेत राहत. मी एकदा तेथे गेलो असताना, आचार्यांची पुस्तके पाहत होतो. तेव्हा मला ही व्याख्याने मिळाली. महात्मा गांधींचे जीवन, त्या जीवनावरील आचार्य जावडेकरांचे विचार आणि ते साने गुरुजींच्या शब्दांत लिहिलेले- असा अपूर्व त्रिवेणी संगम या छोट्या पुस्तकात आहे. मी ती व्याख्याने ‘साधने’त पुन्हा प्रसिद्ध केली.

येरवडा तुरुंगातील साने गुरुजींची एक आठवण फार हृद्य आहे. साने गुरुजी नेहमी म्हणत की, प्रत्येक भारतीयाने मातृभाषेव्यतिरिक्त आणखी एक तरी भारतीय भाषा शिकली पाहिजे. ते स्वत: राजमहेंद्रीच्या तुरुंगात असताना तमिळ भाषा शिकले होते. आम्ही सात-आठ जण गुरुजींकडे एक दिवस गेलो आणि त्यांना म्हणालो, ‘‘गुरुजी, तुम्ही आम्हाला बंगाली शिकवाल का?’’ साने गुरुजी हसून म्हणाले, ‘‘जरूर शिकवीन. मात्र तुम्ही नियमाने शिकले पाहिजे.’’ थोडे थांबून साने गुरुजी म्हणाले, ‘‘मी शिकवीनच, पण तुम्हाला बंगाली थोडी-थोडी येते!’’ साने गुरुजी थट्टा करीत आहेत, असे आम्हाला वाटले. दुसऱ्या दिवशी आम्ही जेलरकडून फळा व खडू मिळवला आणि तो गुरुजींना दिला. ठरल्याप्रमाणे दुपारी चार वाजता आम्ही सात-आठ जण गुरुजींकडे गेलो. गुरुजींनी फळा नीट ठेवला आणि म्हणाले, ‘‘वाचा मी काय लिहिलेय ते.’’ फळ्यावर नागरी लिपीत साने गुरुजींनी रवींद्रनाथांची कविता लिहिली होती. आम्ही ती वाचली आणि आम्हाला तिचा साधारण अर्थ कळला. साने गुरुजी म्हणाले, ‘‘वाचलीत ना कविता? समजली ना?’’ मी म्हणालो, ‘‘थोडीफार समजली.’’ साने गुरुजी हसले आणि म्हणाले, ‘‘म्हणूनच मी काल म्हणालो की, तुम्हाला थोडेफार बंगाली येते. पण कवितेचा अर्थ समजणे पुरेसे नाही. आता मी तुम्हाला ती कविता शिकवतो.’’ त्यानंतर साने गुरुजींनी अत्यंत रसाळपणे आम्हाला ती कविता शिकवली. कवितेचे शीर्षक होते, ‘संन्यासी उपगुप्त’.

कवितेचा आशय पुढीलप्रमाणे होता- ‘उपगुप्त या तरुण भिक्खूने एका नगरात प्रवेश केला, तेव्हा एक तरुण स्त्री त्या नगराच्या सीमेवरच उभी होती. उत्तम वेशभूषा केलेली, अलंकार घातलेली ती तरुणी एक वारांगना होती. त्या देखण्या तरुण संन्याशाला पाहून ती मोहित झाली आणि चट्‌कन पुढे येऊन म्हणाली, ‘आपण माझ्या रंगमहालात चला.’ संन्यासी उपगुप्त हे ऐकून चकित झाला. तो स्तब्ध उभा राहिला. तेव्हा ती तरुणी त्याला तिच्या घरी चलण्याचा आग्रह करू लागली. उपगुप्त तिला म्हणाला, ‘मी आज येऊ शकणार नाही.’ त्या तरुण स्त्रीने विचारले, ‘मग केव्हा याल?’ यावर उपगुप्त म्हणाला, ‘योग्य वेळ येईल तेव्हा मी तुला पुन्हा भेटेन.’ असे म्हणून उपगुप्त झपझप चालत निघून गेला. निराश झालेली ती तरुण स्त्री त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिली. पुढे त्या वारांगनेचा त्या नगरातील धनवान तरुणांनी हवा तितका उपभोग घेतला. काही वर्षांनी तिचे तारुण्य आणि सौंदर्य ओसरले. तिला काही व्याधी झाल्या आणि कोणीही तिच्याकडे फिरकेनासे झाले. तिच्यावर उपासमारीने भीक मागण्याची वेळ आली. एका संध्याकाळी पाऊस येत होता. वारा सुटला होता. त्या भिकारणीला लोकांनी, कुत्र्याला हाड-हाड करून घालवतात तसे, हाकलले होते. ती त्या नगराच्या वेशीजवळ एका झाडाच्या आडोशाला कशीबशी विसावली होती. कमालीची दु:खी होती ती. इतक्यात तिला कोणी तरी जवळ आल्याची चाहूल लागली. तिने पाहिले. एक संन्यासी तिच्याजवळ आला आणि म्हणाला, ‘तुला आठवत असेल- काही वर्षांपूर्वी आपली भेट झाली, तेव्हा तू मला तुझ्या घरी बोलावलं होतंस, पण मी आलो नव्हतो. मी तुला म्हणालो होतो, कधी तरी मी तुला भेटेन. आज मी पुन्हा आलोय. तू आजारी दिसतेस. बहुधा उपाशी असणार. चल, मी तुला माझ्या झोपडीत नेतो.’ असे म्हणून त्या व्याधिग्रस्त भिकारणीचा हात धरून उपगुप्त तिला त्याच्या कुटीकडे घेऊन गेला. साने गुरुजी त्या कवितेवर बोलत होते आणि आम्ही मंत्रमुग्ध होऊन ऐकत होतो. गुरुजींनी नुसती कथा सांगितली नाही, उपगुप्ताची व्यक्तिरेखा आमच्या डोळ्यांसमोर उभी केली. साने गुरुजींच्या शब्दांनी रवीद्रनाथांच्या त्या कवितेच्या अंतरंगावर दिव्य प्रकाश पडला होता. साने गुरुजींजवळ शिकणे हा एक अपूर्व अनुभव होता.

पुढे साने गुरुजींना नाशिक तुरुंगात ठेवण्यात आले. त्यांची सुटका 1945च्या अखेरीस झाली. सुटल्यानंतर साने गुरुजींनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दौरा केला. राष्ट्र सेवादलातील मुलांना ते गोष्टी सांगत. तरुणांना नवे-नवे विचार देत. साने गुरुजींमुळे गावोगावी सेवादलाच्या शाखा सुरू झाल्या. पुढे साने गुरुजींनी पंढरपूरचे मंदिर सर्वांना खुले व्हावे म्हणून सेनापती बापटांबरोबर दौरा केला आणि दौऱ्याच्या शेवटी पंढरपूरला उपोषण केले. मी पंढरपूरला त्यांची दोन भाषणे ऐकली. केवळ अविस्मरणीय अशी ती भाषणे होती. चंद्रभागेच्या काठी ज्ञानदेव, तुकाराम, नामदेव यांच्या कुळीतल्या, आधुनिक काळातील त्या संताच्या ओघवत्या वाणीतील मानवतेचे संकीर्तन ऐकताना माझे देहभान हरपले.

साने गुरुजींची सेवादल सैनिकांच्या शिबिरातील अनेक बौद्धिके मी ऐकली. सांगलीला 1950 च्या मे महिन्यात आमचे प्रांतिक शिबिर भरले होते. त्या शिबिरात साने गुरुजींनी तरुण कार्यकर्त्यांसमोर जी दोन व्याख्याने दिली, त्यांमधील विचारांनी आम्हा सर्वांची मने उजळून गेली. साने गुरुजींनी त्यांच्या स्वप्नातील भारताचे चित्र आमच्यासमोर रेखाटले आणि त्यांचे ते स्वप्न साकार होण्यासाठी कोणत्या मार्गाने गेले पाहिजे, हे सांगताना गुरुजींनी जे विचार मांडले, त्या विचारांनी आम्ही केवळ प्रभावितच झालो नाही; तर पुढे अनेक वर्षे राष्ट्र सेवादलात त्या विचारांच्या प्रकाशात आम्ही मित्रांनी वाटचाल केली. ते विचार पुढीलप्रमाणे होते : प्राचीन भारतात विद्येची उपासना कशी केली जात होती, कला कशी बहरली होती, पराक्रमी वीर दुष्टांचे निर्दालन कसे करीत होते... गंगा, सिंधू, नर्मदा, गोदा, कृष्णा, कावेरी यांच्या काठांवर शेती आणि संस्कृती कशी बहरली होती- हे सुरुवातीस साने गुरुजींनी सांगितले. त्यानंतर आपल्या समाजातील जातिव्यवस्थेमुळे समाज कसा दुभंगला आणि त्यामुळे परकीय आक्रमणांपुढे आपण हतबल कसे ठरलो अन्‌ अखेर आपण पारतंत्र्याच्या सापळ्यात कसे सापडलो, हे थोडक्यात सांगितले. पारतंत्र्यामुळे आपला देश उद्‌ध्वस्त कसा झाला, लोक दरिद्री आणि लाचार कसे बनले याचे विदारक चित्र गुरुजींनी रेखाटले. ते पुढे म्हणाले, ‘‘आता आपण स्वतंत्र झालो आहोत, आता आपल्याला नवा भारत निर्माण करायचा आहे.’’ त्यासाठी काय करावे लागेल याचे विवेचन साने गुरुजींनी त्यांच्या दुसऱ्या दिवशीच्या भाषणात केले.

ते म्हणाले, ‘‘आपल्या देशात तीव्र सामाजिक आणि आर्थिक विषमता आहे, ती नष्ट झाली पाहिजे. पण समता म्हणजे दारिद्र्याचे समान वाटप नाही. मला समृद्ध भारतातील समता हवी आहे. यासाठी ही सुजला भूमी आपण सुफला केली पाहिजे. भारतातील खेडी दुधा-मधाने भरली पाहिजेत. उघडेबोडके डोंगर पुन्हा वृक्षराजींनी हिरवेगार दिसले पाहिजेत. आधुनिक जगातील विज्ञान येथे आणतानाच आपण निसर्गाचेही रक्षण केले पाहिजे.’’ साने गुरुजी पुढे म्हणाले की- पाश्चात्त्य राष्ट्रे आपल्या पुढे गेली याचे कारण त्यांनी ज्ञानाची, विज्ञानाची उपासना केली आणि त्याचबरोबर त्या ज्ञानाचा उपयोग करताना हातांनी भरपूर काम केले. आपण किती आळशी, कामचुकार आहोत, हेही साने गुरुजींनी सांगितले आणि ते म्हणाले की, श्रम आणि ज्ञान यांच्या संगमावर आपला भारत उभा राहिला पाहिजे. हा विचार स्पष्ट करताना साने गुरुजींनी श्रमदान पथकांची कल्पना मांडली. आपले रस्ते आपणच बांधले पाहिजेत, आपली तळी आपणच साफ केली पाहिजेत- हे सांगताना साने गुरुजी म्हणाले, ‘‘निसर्गाची आपल्यावर फार मोठी कृपा आहे. आपल्याला मिळणारा सूर्यप्रकाश, आपल्याकडे पडणारा पाऊस, आपली सुपीक जमीन... हे सगळं आपल्याला मिळालं आहे. आता आपण नीट श्रम करून, नद्यांच्याच नव्हे तर ओढ्या-नाल्यांच्या पाण्याचा वापर करून उत्तम शेती केली पाहिजे. आपल्या खेडेगावांचे रूप पूर्णपणे पालटले पाहिजे. सगळीकडे स्वच्छता असली पाहिजे. प्रत्येक लहान गावातही शाळा असली पाहिजे.’’ यानंतर ज्ञानाचे महत्त्व सांगताना साने गुरुजींनी आधुनिक जगातील विज्ञानमहर्षींचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. ते म्हणाले, ‘‘निसर्गातील सत्याचा या ज्ञानोपासकांनी शोध घेतला आणि विज्ञानाच्या साह्याने आपल्या निसर्गातील शक्तीचे स्रोत त्यांना सापडले. या शक्तिस्रोतांच्या साह्याने आपण आपले जीवन समृद्ध केले पाहिजे.’’

महात्मा गांधींची ग्रामस्वराज्याची कल्पना स्पष्ट करताना साने गुरुजी म्हणाले, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या खेडेगावांचे वर्णन दुर्गंधीने भरलेली डबकी असे केले. अनेक बाबतींत ते खरे आहे. अस्पृश्यता हा आपल्या जीवनातील कलंक आहे. तो आपण पुसून टाकला पाहिजे. गावात बंधुभाव, सहकार्य निर्माण झाले पाहिजे. अज्ञान, अंधश्रद्धा यांचे निर्मूलन केले पाहिजे. अशा रीतीने डॉ. आंबेडकरांना नको असलेली दुर्गंधी-घाण काढल्यावरच एकोप्याने राहणाऱ्या, एकत्र कष्ट करणाऱ्या, नव्या पिढीला नवे ज्ञान देणाऱ्या, स्वच्छ-निर्मळ निसर्गाने नटलेल्या आदर्श खेड्यातच महात्माजींचे ग्रामस्वराज्याचे स्वप्न साकार होईल.’’

साने गुरुजी भाषणाच्या शेवटी म्हणाले, ‘‘राष्ट्र सेवादलाने समाजवादी शीलाचे तरुण निर्माण केले पाहिजेत. श्रम आणि ज्ञान यांच्या साह्याने समृद्ध भारत निर्माण करता येईल; परंतु त्याचबरोबर आपले चारित्र्य, शील निष्कलंक असले पाहिजे. जाती-धर्मांच्या भेदावर मात करून आपण देशात बंधुभाव निर्माण केला पाहिजे. बंधुभाव हे आपल्या राष्ट्रीय चारित्र्याचे वैभव आहे. आपण पूर्वी परकीय आक्रमणांपुढे हार खाल्ली; कारण आपल्यात भेद होते, विषमता होती. आपण आपसात भांडलो आणि इंग्रजांनी आपल्याला जिंकले. आता क्रांतिकारक हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि आपल्या दीर्घ काळच्या सत्याग्रही लढ्यांमुळे आपण स्वतंत्र झालो आहोत. आता श्रम, ज्ञान आणि शील यांच्या त्रिवेणी संगमावर आपल्याला भारतमातेचे भव्य मंदिर उभे करायचे आहे.’’

साने गुरुजींचे हे विचार माझ्या पिढीला मार्गदर्शक ठरले. आम्ही अपुरे पडलो असू; परंतु त्या चिरंतन प्रकाश देणाऱ्या विचारांमुळेच आपल्याला साने गुरुजींचा स्वप्नातील, विश्वात शोभून राहणारा भारत निर्माण करता येईल.

पुण्याला भरलेल्या साहित्य संमेलनात साने गुरुजींनी भाषण करून ‘आंतरभारती’चा विचार अत्यंत प्रभावीपणे मांडला. पुढे काही दिवसांनीच साने गुरुजींनी त्यांची प्राणज्योत मालवून टाकली. महात्मा गांधींच्या निधनानंतर साने गुरुजींना त्यांच्या जीवनाचा एक आधार हरपला, असे वाटले. परंतु ‘साधना’ साप्ताहिक सुरू केल्यावर त्यांच्या कर्तृत्वाला पुन्हा बहर आला. 1950 च्या मे महिन्यात सेवादलाच्या शिबिरात मी ज्या वेळी त्यांचे भाषण ऐकले, त्या वेळी त्यांची अखेर जवळ आली आहे, अशी शंकाही माझ्या मनात आली नाही. महात्मा गांधींप्रमाणेच आचार्य विनोबा भावे यांचा साने गुरुजींच्या जीवनाला मोठा आधार होता. मला अनेकदा वाटते की, विनोबाजींचे भूदान आंदोलन 1950 मध्ये सुरू झाले असते, तर साने गुरुजींनी त्या आंदोलनात समर्पण वृत्तीने उडी घेतली असती. समर्पण ही साने गुरुजींच्या मनाची ओढ होती. तसे देशव्यापी जन-आंदोलन नसल्यामुळे आणि देशामध्ये सत्तेच्या राजकारणाची सुरुवात झाल्यामुळे साने गुरुजींच्या मनातील मृत्यूबद्दलचे आकर्षण आवरणे त्यांना शक्य झाले नसावे, असे मला वाटते.

- ग. प्र. प्रधान


वाचा माझ्या जीवनाचे शिल्पकार या प्रकरणातील इतर भाग : 

एस्‌. एम्‌. पाठीवर थाप मारून म्हणाले, ‘‘प्रधान, तू पास झालास!’’

नानासाहेबांच्या मार्गदर्शनामुळेच मी समाजवादी चळवळीत सतत काम करत राहिलो...


साधना प्रकाशनाकडून आलेली ग. प्र. प्रधान यांची तीन महत्त्वपूर्ण पुस्तके साधना मिडिया सेंटरसोबतच Amazon वरही उपलब्ध असून ती खरेदी करण्यासाठी क्लिक करा :

माझी वाटचाल 

स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत

लोकमान्य टिळक - पेपरबॅक  हार्डकवर

Tags: ग. प्र. प्रधान जन्मशताब्दी साने गुरुजी माझी वाटचाल माझ्या जीवनाचे शिल्पकार पुस्तक G.P. Pradhan Sane Guruji Majhi vatchal Majhya jivanache shilpkar Load More Tags

Comments:

विष्णू दाते

खूप सुंदर! पूज्य साने गुरुजींच्या प्रगल्भ, उदात्त विचारांचे अतिशय सुंदर वर्णन प्रधानसरांनी लिहिले आहे!

Add Comment