मिलिंद बोकील यांच्या मुलाखतींचा संग्रह 'बोधाचा जोडला तारा'

मिलिंद बोकील यांच्या मुलाखतींचा संग्रह 'बोधाचा जोडला तारा'

साधना प्रकाशनाचे नवे पुस्तक

लेखक मिलिंद बोकील यांचे साधना साप्ताहिकाशी असलेले नाते मागील तीन-चार दशकांपासूनचे आहे. मात्र, साधना प्रकाशनाशी त्यांचे नाते मागील सहा वर्षांपासून आहे. या काळात त्यांची ‌‘कहाणी पाचगावची‌’, ‘मेळघाट: शोध स्वराज्याचा‌’ आणि ‌‘गोष्ट मेंढा गावाची‌’ ही तीन पुस्तके साधना प्रकाशनाकडून आली. त्या निमित्ताने आणि अन्य काही निमित्ताने त्यांच्याशी झालेल्या संवादातून, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा गाभा व आवाका यांचा अधिक अंदाज आला. त्यांच्या एकूण लेखनाविषयीचे कुतूहल वाढीस लागले. त्यामुळे, 2024 च्या सुरुवातीला साधना साप्ताहिकाची ‌‘ऐवज‌’ ही दीर्घ मुलाखतींची व्हिडिओ मालिका करायचे ठरले, तेव्हा त्यांचे नाव अग्रक्रमावर होते. त्यांना तशी विनंती केली आणि मग त्यांची दीर्घ मुलाखत दोन भागांत करायचे ठरले. ललित साहित्याच्या संदर्भातील मुलाखत प्रा. रेखा इनामदार-साने यांनी, तर ललित-वैचारिक साहित्याच्या संदर्भातील मुलाखत मी (विनोद शिरसाठ) घ्यावी असे ठरवले. त्याप्रमाणे मार्च 2024 मध्ये त्या मुलाखतीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पुण्यातील त्यांच्या घरी केले. मुलाखतीचे ते दोन्ही भाग व्हिडिओ स्वरूपात ‌‘यू-ट्यूब‌’वर प्रसिद्ध करायचे आणि त्यांचे शब्दांकन साधना साप्ताहिकात सलग दोन अंकांत प्रसिद्ध करायचे असे नियोजित होते, पण दोन भाग मिळून ती व्हिडिओ मुलाखत झाली तब्बल पाच तास! मुलाखतीमधील सर्वच प्रश्नांना आलेली उत्तरे अगदी नेमकी आणि सूत्रबद्ध होती. तेव्हा लक्षात आले, हा तर एका पूर्ण साधना अंकाचा ऐवज आहे. शब्दांकन होऊन आल्यावर त्या मुलाखतींमधील विषय आणि त्यातील आशय अधिक गहन व गंभीर वाटला. दरम्यान, साधना साप्ताहिकाचा 76 वा वर्धापनदिन आणि देशाचा 77 वा स्वातंत्र्यदिन येत होता. म्हणून ठरवले की, या मुलाखतींचा विशेषांक करू आणि त्या निमित्ताने मिलिंद बोकील यांच्या साहित्यावर एक दिवसभराचे चर्चासत्र भरवू. त्याप्रमाणे नियोजन झाले आणि 17 ऑगस्ट 2024 रोजी ते चर्चासत्र झाले, त्यात त्या विशेषांकाचे प्रकाशनही झाले. ही प्रक्रिया करत असताना काही मुद्दे प्रकर्षाने लक्षात आले.

1. ललित व ललित-वैचारिक या दोन्ही प्रकारांतील विपुल व सकस लेखन करणारा हा आजच्या मराठीतील आघाडीचा लेखक आहे. दोन्ही प्रकारांतील या दर्जाचे व इतके लेखन करणारे लोक आताच्या मराठीत हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेही नाहीत.
2. बोकील यांचे हे लेखन विसाव्या शतकाची अखेरची दोन दशके आणि एकविसाव्या शतकाची प्रारंभीची दोन दशके या दरम्यानचे आहे, म्हणजे जवळपास 40 वर्षांचा कालखंड त्यांच्या लेखनाच्या मध्यवर्ती आहे.
3. या लेखकाचा वावर व कार्यक्षेत्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर राहिले आहे, कामाच्या निमित्ताने जगभरातील अनेक देशांत त्यांची भ्रमंती झाली आहे. साहजिकच अनुभवविश्व खूपच मोठे आहे.
4. या लेखकाच्या अभ्यासाची व्याप्ती आपण समजत होतो, त्यापेक्षा बरीच जास्त आहे. त्यामधील विविधताही अधिक आहे आणि ते सर्व अभ्यासविषय परस्परांना जोडणारे आहेत. त्यातून समग्रता अधोरेखित होते. 
5. या लेखकाच्या प्रेरणा इथल्या मातीत व तळागाळातील समूहांत घट्ट रुजलेल्या आहेत. ‌‘मला मराठीचे पांग फेडायचे आहेत‌’ असे हा लेखक सहजतेने सांगतो, तेव्हा तो भाबडा आशावाद किंवा वृथा अभिमान वाटत नाही.
6. भाषा, साहित्य, समाज आणि राज्यसंस्था या सर्वांच्या संदर्भात या लेखकाची काही एक निश्चित व निर्णयात्मक भूमिका आहे. आणि भारतीय संविधानाशी व मानवी संस्कृतीच्या मूल्यांशी असलेली बांधिलकी पक्की आहे.
7. या लेखकाचे आस्थाविषय समाजशास्त्र, लोकशाही, आदिवासी-दलितादी वंचित समूह, ग्रामीण विकास असे तर आहेतच; शिवाय गांधी-विनोबा यांच्या परंपरेला प्रागतिक व कालसुसंगत पद्धतीने ते मांडू पाहत आहेत.

वरील मुद्दे लक्षात आल्यावर असेही तीव्रतेने वाटले की, ललित साहित्याच्या संदर्भातील मुलाखत मुख्यतः उभे छेद (व्हर्टिकल सेक्शन) घेणारी झाली आहे; त्यातून बोकील यांच्यातील लेखक, व्यक्तीजीवन आणि मानवी मन यांचे अंतरंग विविध पद्धतीने पुढे येतात किंवा त्यातील पापुद्रे उलगडून दाखवले जातात. मात्र, ललित-वैचारिक लेखनाच्या संदर्भातील मुलाखत मुख्यतः आडवे छेद (हॉरिझॉन्टल सेक्शन) घेणारी झाली आहे; त्यातून त्यांच्या लेखन विषयांची व अभ्यासाची व्याप्ती लक्षात येते. अर्थातच हे असे नकळत घडले असावे, त्याचे कारण ललित साहित्याच्या संदर्भात मुलाखत घेणारी व्यक्ती साहित्य समीक्षक आहे, तर ललित-वैचारिक लेखनाच्या संदर्भात मुलाखत घेणारी व्यक्ती संपादक आहे. पण त्यातून हे स्पष्ट झाले की, ललित साहित्याच्या संदर्भात आडवे छेद घ्यायला वाव आहे आणि ललित-वैचारिक साहित्याच्या संदर्भात उभे छेद घेणे बाकी आहे. 

साहजिकच, ते चर्चासत्र संपल्यावर असेही वाटले की, या दोन भागांतील दीर्घ मुलाखतींमध्ये आणखी काही प्रश्न व उत्तरे समाविष्ट केली तर एक उत्तम पुस्तक आकाराला येईल. त्यातून मिलिंद बोकील नावाचा माणूस आणि लेखक, हा प्रवास उलगडून दाखवता येईल. मग तसा प्रस्ताव मिलिंद बोकील यांच्यापुढे ठेवला. तेव्हा त्यांनी मागील दशकभरात झालेल्या त्यांच्या सहा मुलाखतींचा उल्लेख केला. 
1.‘गवत्या‌’ कादंबरीच्या संदर्भात अंजली जोशी यांनी घेतलेली आणि मुंबई येथील ‌‘मुक्त शब्द‌’ दिवाळी अंक 2014 मध्ये प्रसिद्ध झालेली मुलाखत. 
2. सुजाता देशपांडे यांनी सांगली येथील ‌‘चतुरंग अन्वय‌’ दिवाळी अंक 2015 साठी घेतलेली मुलाखत. 
3. अंजली जोशी यांनी ठाणे येथील ‌‘मॅजेस्टिक गप्पां‌’मध्ये 29 सप्टेंबर 2017 रोजी घेतलेली मुलाखत.
4. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी पुणे विद्यापीठाच्या ‌‘विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ‌’साठी 2 जुलै 2019 रोजी घेतलेली मुलाखत.
5. नीरजा यांनी ‌‘मॅजेस्टिक गप्पा‌’ विलेपार्ले येथे 7 फेब्रुवारी 2020 रोजी घेतलेली मुलाखत.
6. कीर्ती मुळीक यांनी पुणे येथील साहित्य प्रेमी भगिनी मंडळाच्या कार्यक्रमात मार्च 2022 मध्ये घेतलेली आणि नंतर ‌‘मिळून साऱ्याजणी‌’ मासिकात सप्टेंबर 2022 मध्ये प्रसिद्ध झालेली मुलाखत. 

त्यानंतर असे ठरले की, साधना विशेषांकातील दोन भागांची दीर्घ मुलाखत मध्यवर्ती ठेवावी आणि वरील सहा मुलाखतींमधील काही प्रश्न व उत्तरे घ्यावीत. शिवाय, वरीलपैकी कोणत्याच मुलाखतीत न आलेले काही प्रश्न व उत्तरे नव्याने समाविष्ट करून पुस्तकाची अंतिम संहिता तयार करावी. त्यासाठी गरजेनुसार प्रश्न व उत्तरे यांचे क्रम बदलावेत, पुनरावृत्ती वगळावी आणि आवश्यक तिथे भर टाकावी. अर्थातच, या प्रक्रियेत स्वतः मिलिंद बोकील यांना तर सहभागी व्हावे लागेलच; शिवाय या पुस्तकाचे संपादन कोणी तरी अभ्यासू व्यक्तीने करायला हवे. तसा विचार करताना आमच्या समोर प्रा. अंजली जोशी यांचे नाव आले. त्या प्रथितयश लेखिका आहेत, नामांकित मानसशास्त्रज्ञ आहेत आणि मुख्य म्हणजे मिलिंद बोकील यांच्या लेखनाशी त्यांचा उत्तम परिचय आहे. मग त्यांना तशी विनंती केली. त्यांनी त्यासाठी आनंदाने होकार दिला आणि पुरेसा वेळ देऊन अतिशय तत्परतेने संपादनाचे काम पूर्ण केले. शिवाय विवेचक व मर्मग्राही प्रस्तावनाही लिहिली. ह्या साक्षेपी संपादनामुळे हे पुस्तक एकसंध आणि प्रवाही झाले आहे. 

ह्या पुस्तकाच्या निर्मितीप्रक्रियेमध्ये अनेकांचा हातभार लागलेला आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मराठीतील काही गुणवंत विदुषींनी संवादक म्हणून आपला सहभाग त्यामध्ये दिलेला आहे. मराठी साहित्यव्यवहाराला नि:संशय श्रेयस्कर अशी ही गोष्ट आहे. त्यांच्या चिकित्सक आणि अभ्यासू प्रश्नांमुळेच ह्या पुस्तकाचे वाङ्मयीन महत्त्व वाढलेले आहे. मुळात या मुलाखती ज्यांनी संयोजित/प्रकाशित केल्या त्या सर्व प्रकाशक आणि संपादकांनीही ह्या प्रकल्पासाठी हार्दिक सहकार्य दिले. त्यांना मन:पूर्वक धन्यवाद. ह्यातील पाच मुलाखती दृक्‌‍‍-श्राव्य स्वरूपात होत्या, त्यांपैकी साधनातील दोन मुलाखतींचे शब्दांकन करण्याचे अवघड काम सुहास पाटील व रेणुका कल्पना यांनी केले. आणि उर्वरित तीन मुलाखतींचे ऑडिओ टू टेक्स्ट हे काम आमचा सहकारी सुदाम सानप याने निगुतीने केले. साधनातर्फे 2024 मध्ये जे चर्चासत्र झाले ते यशस्वी करण्यामध्येही आमच्या सर्व सहकाऱ्यांचा मोलाचा वाटा होता. तो विशेषांक आणि हे पुस्तक तयार करताना गिरीश सहस्रबुद्धे, सुरेश माने व आरती सुमित यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. त्या सर्वांचे या निमित्ताने आभार. 

- विनोद शिरसाठ
kartavyasadhana@gmail.com
संपादक, साधना (साप्ताहिक व प्रकाशन)


पुस्तक विकत घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : बोधाचा जोडला तारा (मिलिंद बोकील) - साधना प्रकाशन

Tags: milind bokil new book मिलिंद बोकील साधना डिजिटल बोधाचा जोडला तारा अंजली जोशी वंदना बोकील कुलकर्णी नीरजा सुजाता देशपांडे नीता बोकील रेखा इनामदार साने विनोद शिरसाठ कीर्ती मुळीक Load More Tags

Add Comment