प्रियजनांनी जागवलेल्या आठवणी...

माझे पप्पा हेमंत करकरे - भाग 15

मी कायकाय करू शकतो यावरून मी स्वतःचं मूल्यमापन  करतो. पण इतर लोक मात्र आपण काय केलंय यावरून आपल्याला जोखतात.
- हेमंत करकरे, वय 21, 10 मार्च 1975 
(रोजनिशीतली नोंद)


पप्पांना वीरमृत्यू आल्यानंतर त्यांना आदरांजली वाहणाऱ्या लेखांचा पूर आला. फार थोड्या व्यक्तींना मरणोत्तर एवढा आदर मिळतो, एवढी मान्यता मिळते. पप्पांच्या सामाजिक बांधिलकीचं होणारं कौतुक आमच्यासाठी प्रेरणादायी होतं. मराठी वृत्तपत्रं तर त्यांच्या मित्रांनी आणि सहकाऱ्यांनी लिहिलेल्या लेखांनी भरून जात होती. त्यापैकी या दोन आठवणी... 


सुसंस्कृत आणि आस्थेवाईक!
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी जागवलेल्या आठवणी...

वीस वर्षांपूर्वीची गोष्ट. शाळेतल्या नववीपासून ते कॉलेजपर्यंतच्या मुलांचे - आमचे ‘टफ टिन्स’ आणि ‘युथ’ असे दोन क्लब्ज नुकतेच जीव धरू लागले होते. गाव ठाणे (त्या वेळी ते नुकतेच शहर होत होते.) या टीममध्ये एक मुलगा होता कार्तिक आणि युथमध्ये त्याची बहीण होती कल्याणी. आम्ही सारे दर रविवारी सकाळी भेटायचो. वेगवेगळ्या विषयांवर बोलायचो. ‘आमचा मामा आलाय ठाण्यामध्ये... ट्रान्सफर होऊन.’ एक दिवस एक्साईट होऊन ते दोघं म्हणाले. ‘त्याला बोलावायचंय आपल्या मिटिंगला... एसीपी आहे तो पोलीसमधला... आधी इंजिनिअर... त्यानंतर आयपीएस....’ ते दोघं भडाभडा बोलत होते.

‘चालेल की... नाव काय त्यांचं?’

‘हेमंत मामा... हेमंत करकरे....’

लगेचच्याच रविवारी सकाळी कार्तिक-कल्याणीचे हेमंतमामा आमच्या कोंडाळ्यात दाखल झाले... स्वतःच्या करिअरबद्दल भरभरून बोलले आणि त्या दिवशीपासून ते सगळ्या मुलांसकट माझेही मित्र झाले. शिक्षणानं इंजिनिअर, त्यानंतर हिंदुस्थान लिव्हर, नॅशनल प्रॉडक्टिव्हिटी काउन्सिल अशा नोकऱ्या आणि त्यानंतर आयपीएस होऊन पोलीसदलामध्ये प्रवेश... या सगळ्या प्रवासामध्ये या माणसाची काही वैशिष्ट्यं कायम राहिली. अभ्यासू स्वभाव आणि त्यामुळं सतत, अफाट वाचनाची सवय... गुन्हेगारीचा माग काढतानाही त्यातल्या पुनर्वसनाच्या, विकासाच्या वाटेबद्दल ममत्व... आणि तरुण पिढीबद्दलचं जबरदस्त प्रेम! गडचिरोलीला नक्षलग्रस्त भागातल्या पोस्टिंगवर असताना त्यांनी नक्षलवादाचा इतिहास अभ्यासला. दाट जंगलातल्या लाकडाचे मनोरम आकार शोधून त्याला पॉलीश करून घड्याळासारख्या वस्तू तयार केल्या. या काळातली तीन वर्षं आम्ही एका इमारतीमध्ये वरतीखाली राहायचो त्यामुळं खूप गप्पा व्हायच्या. मराठी साहित्याबद्दलही त्यांना खूप आस्था आणि आवड. (आमच्या दोन दशकांच्या अतिशय दाट मैत्रीमध्ये आम्ही एकमेकांना सतत अहोजाहो केलं... बहुतेक सवयीनं. आजच हे जाणवतंय. असो.)

1989 मध्ये आम्ही ठाण्यातल्या शाळांमधून एक जनजागरण कार्यक्रम राबवला. त्याचं नाव होतं ‘ड्रग-फाईट 89’. या वेळी आमच्याबरोबर एक कार्यकर्ता म्हणून करकरे शाळाशाळांमध्ये फिरले. विद्यार्थ्यांबरोबर जिव्हाळ्यानं बोलले.

अमली पदार्थांविरुद्ध शाखेचा चार्ज मुंबईमध्ये त्यांनी घेतला 1994च्या सुमारास. त्याच वेळी आमची आयपीएच संस्था आणि स्त्रीमुक्ती संघटना यांची अशी योजना चालली होती की, कुमारवयीन मुलांसाठी एक विकासात्मक कार्यक्रम आखावा. मी करकरेंबरोबर बोललो. त्यांना त्यात रस होताच. कुमारवयीन मुलांच्या मानसिकतेची ओळख, त्यांना दाखवायची भविष्यातल्या व्यवसायाची दिशा, तणाव नियोजन, लैंगिकता शिक्षण आणि अमली पदार्थांविरोधी प्रबोधन असे विभाग असलेला जिज्ञासा प्रकल्प तयार झाला. मुंबई पोलिसांची संपूर्ण संघटनाशक्ती करकरेंनी या प्रकल्पासाठी जागृत केली.

खासकरून मुंबई महानगरपालिकांच्या शाळांमध्ये नववीदहावीचे विद्यार्थी, तसंच वस्ती पातळीच्या खासगी शाळांमधले विद्यार्थी यांच्याकरता पंधरा तासांचा हा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यासाठी आम्हाला संवादक कार्यकर्ते तयार करायचे होते. या प्रशिक्षणासाठी मुंबईच्या पोलीस क्लबचं वातानुकूलित सभागृह उपलब्ध झालं. संवादकांच्या पहिल्या बॅचला अमली पदार्थविरोधी प्रबोधन या विषयावरचं सत्र कसं घ्यायचं याचं प्रशिक्षण करकरे आणि मी असं दोघांनी घेतलं. अफूच्या झाडाच्या गुणवैशिष्ट्यांपासून ते अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारापर्यंत असा संपूर्ण इतिहास करकरेंनी ससंदर्भ शिकवला.

त्यांच्या बोलण्यामध्ये जितका अभ्यास असायचा तितकीच कळकळ असायची. मुंबई पोलिसांमधला आमचा एक व्यसनाधीन रुग्ण या काळामध्ये पुण्याच्या आमच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर पडून नोकरीवर रुजू झाला. करकरेंनी त्यांना आग्रहानं अमली पदार्थांविरोधी शाखेमध्ये स्वतःबरोबर घेतलं. त्याला जिज्ञासा प्रकल्पामध्ये गुंतवलं. आज सकाळीसुद्धा हा मला फोनवर विचारत होता, ‘असे कसे गेले आमचे साहेब...?’ 

1996 मध्ये ‘जिज्ञासा’ प्रकल्पाचं उद्घाटन झालं. आज बारा वर्षांनंतरही हा प्रकल्प चालू आहे. 25 नोव्हेंबरला म्हणजे अगदी परवा-परवा यूपीएस कुरिअर कंपनीनं या प्रकल्पाला ताजी देणगी दिली. तेव्हा आठवलं की, या प्रकल्पासाठीची पहिली देणगी करकरेंनी मिळवून दिली होती. 1997 साली लारसन टुब्रो कंपनीचे एक ज्येष्ठ संचालक होते मोहन वाघ. त्यांच्या कार्यालयात करकरे मला घेऊन गेले. पुढची 15 मिनटं जिज्ञासा प्रकल्पाची इतकी ‘पॅशनेट’ मांडणी त्यांनी केली की, हा माणूस पोलीस अधिकारी की सेवाभावी कार्यकर्ता हे मला कळेना. जिज्ञासा प्रकल्पाचं ‘ट्रेनिंग मॅन्युअल’ प्रसिद्ध करणं असो की दशकपूर्तीचा समारंभ... कुठंही असले तरी करकरे येणारच कारण ते प्रकल्पाचे निमंत्रक होते. 

जिज्ञासा प्रकल्प शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी पण नुक्कडवर जमणाऱ्या, रोजंदारी करणाऱ्या 15 ते 21 वर्षं वयोगटातल्या तरुणांना व्यसनांपासून दूर ठेवणारा आणि समाजासाठी सक्रिय करणारा एक जाणीव-जागृती प्रकल्प करकऱ्यांना सुरू करायचा होता. त्याचं नाव आम्ही ठरवलं होतं... ‘एहसास’. एटीएसच्या जबाबदाऱ्यांचा वाढता व्याप पेलतानाही त्यांचा नियमित फोन असायचा तो या स्वप्नाची चर्चा करण्यासाठी.

केंद्रीय खात्यामध्ये प्रतिनियुक्तीवर असताना करकरे तीनचार वर्षं युरोपात राहिले. तिथंही त्यांचा अभ्यास चालू असायचा. ई-मेलवरून वाचनीय मजकूर पाठवत राहायचे. या काळात त्यांनी मिळवलेल्या अनुभवाचा आणि अभ्यासाचा फायदा त्यांच्या एटीएसच्या जबाबदारीमध्ये नक्कीच होत असणार.

त्यांचा मित्रपरिवारही मोठा. गेल्या वर्षी त्यांच्या मोठ्या मुलीचं लग्न झालं तेव्हा ओसंडून वाहणारं हे मैत्र सगळ्यांनी पाहिलं. जवळच्या-लांबच्या प्रत्येकाला मदत करत जाणं हा त्यांचा स्वभाव त्यामुळं हे झालं असणार. आमच्या आयपीएच संस्थेच्या नव्या इमारतीमधल्या ग्रंथालयासाठी त्यांनी त्यांच्या संग्रहातली अनेक पुस्तकं दिली... अगदी आठवणीनं.

गेल्या 20 वर्षांमध्ये आमच्या गप्पांच्या मैफली खूप जमायच्या. बऱ्याच वेळा इतर मित्रमंडळीही असायची पण कधीकधी आम्ही दोघंच बसायचो. एकमेकांच्या आयुष्यावर ‘रिफ्लेक्ट’ करायला एकमेकांच्या विचार भावनांचे आरसे होऊन... ही आमच्या दोस्तीची अगदी खासगी वीण. त्याची ओढ आम्हा दोघांनाही असायची. गेल्या काही महिन्यांमध्ये आम्हाला असा वेळ कधी मिळालाच नव्हता पण फोनवर बोलणं होत असायचं. 

‘जगभराच्या दहशतवादाचा चेहरामोहरा बदलतोय. पूर्वीचे बहुसंख्य टेररिस्ट ‘ऑन द फ्रिंज’ म्हणजे समाजाच्या सीमारेषांवरचे असायचे. आत्ताचा हा तरुण एका बाजूनं उच्चशिक्षित आणि नागरी, ग्राहक संस्कृतीमध्ये ‘इन व्हाग’ असा मिसळून जाणारा आणि स्वतःच्या टोकाच्या विचारांना सहजपणे दडवून टाकणारा. त्याला शोधून काढणं तितकंच कठीण...' एकदा करकरे म्हणाले होते. 

गेल्या आठवड्यामध्ये बोलताना म्हणाले, ‘कुठल्याही वैचारिक बांधिलकीमध्ये भावनिक क्रूरता ओतली गेली की दहशतवादाचा जन्म होतो... अनुभवानं आणि निरीक्षणानं पक्कं झालं आहे माझं मत... दहशतवादाला धर्म नसतो कारण हट्टी विचार कोणत्याही धर्मातली अंगभूत सहिष्णुताच मारून टाकतात.’ अशा वेळी त्यांचा आवाज वेगळाच भासायचा. 

‘यंदाच्या वेध व्यवसाय प्रबोधन परिषदेमध्ये येऊन तुम्ही हे सगळं बोलत का नाही...? खूप गरज आहे विद्यार्थ्यांनी, पालकांनी हे ऐकण्याची.’ मी म्हणालो.

‘निश्चितच येईन मी.’ नेहमीच्या मृदू पण ठाम स्वरात ते म्हणाले, ‘बी सिव्हील अँड ॲम्पेथिक टू द मॅन नेक्स्ट टू यू...’ एवढं साधं आपण करू शकत नाही? ‘मी येईन...’

वेधच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये मी त्यांचं नाव सामील केलं पण आता ही भेट काही होणार नाही... होणार नाही असं तरी कसं म्हणू? आता मी विचार करेन तेव्हा करकरे नेक्स्ट मी असणार आहेत, नेक्स्ट टू एव्हरीवन असणार आहेत.’ सिव्हील (सुसंस्कृत) आणि एम्पॅथिक (आस्थेवाईक) या दोन शब्दांचा त्यांना समजलेला अर्थ आपल्याला कसा उमजणार हाच मोठा प्रश्न आहे.

(पूर्वप्रसिद्धी - लोकसत्ता, 30 नोव्हेंबर. 2008)


समाजहितदक्ष
एशिया मिडिया फोरमचे कोऑर्डिनेटर  मिलिंद कोकजे यांनी जागवलेल्या आठवणी...

हेमंत करकरे गेल्यामुळं समाज म्हणून आपलं नेमकं काय नुकसान झालं आहे हे कळायला वेळ लागेल. अनेकांना कदाचित ते कधीच कळणार नाही कारण हडेलहप्पीकरता प्रसिद्ध असलेल्या पोलीसखात्यातल्या अशा अधिकाऱ्यांचं वेगळेपण नेमकं कशात असतं, त्यांची वैशिष्ट्यं काय असतात, त्यांचा समाजाला नेमका काय उपयोग हे जाणून घेण्याची, त्यांचं कौतुक करण्याची, त्यांना उत्तेजन देण्याची संवेदनशीलता आपल्यातले अनेक जण त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांमुळे आणि राजकारणामुळे हरवून बसले आहेत.

ही संवेदनशीलताच करकरेंनी विविध पातळ्यांवर, अगदी पोलीस अधिकारी म्हणूनही नेमकी आयुष्यभर कायम जपून ठेवली होती. मालेगाव स्फोटांच्या तपासामुळे त्यांच्यावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर जी टीका करण्यात आली होती त्यानं ते व्यथित झाले होते. तरीही त्याबद्दल बोलताना अगदी खासगीतही त्यांच्या तोंडून कुणाबद्दलही उणा वा वावगा शब्द कधीही आला नाही. त्यांच्या मृत्यूपूर्वी, आधीच्या शनिवारी रात्री ते माझ्या घरी गप्पा मारायला आणि जेवायला आले होते पण तेव्हाही त्यांच्यातली ही सभ्यता आणि सुसंस्कृतता प्रकर्षानं जाणवली. ती आमच्या संबंधात गेली 20 वर्षं मला सतत जाणवत आली आहे. 

1987ला मी टाइम्स ऑफ इंडियाकरता वार्ताहर म्हणून ठाणे जिल्हा कव्हर करण्याकरता गेलो. त्यानंतर काही महिन्यांनी करकरे बदलून ठाण्यात आले. त्यांची-माझी पहिली भेट झाली ती आयुक्त वाधवा यांच्या कार्यालयात. कळव्यात काहीतरी पोलीस बळजबरीचं एक प्रकरण झालं होतं आणि त्याची माहिती घ्यायला मी त्यांच्याकडं गेलो होतो. त्यांनी माझी करकरे यांच्याशी ओळख करून दिली आणि म्हणाले, ‘ही इज युअर न्यू डीसीपी, आस्क हीम’ त्यांनी मला नंतर त्यांच्या कार्यालयात भेटायला सांगितलं. 

काहीशा अनिच्छेनं करकरे मला केवळ आयुक्तांच्या सांगण्यावरून भेटले, परत भेटायचं नाही हे मनाशी ठरवत... हे पुढं चांगली मैत्री झाल्यावर त्यांनी मला एकदा सांगितलं. आधीच्या ठिकाणी आलेल्या काही अनुभवांमुळं पत्रकारांशी संबंध ठेवायचे नाहीत असं त्यांनी ठरवलं होतं पण त्यांच्या पदामुळं आणि घडणाऱ्या घटनांमुळं त्यांना हे शक्य झालं नाही पण ठाण्यातल्या अनुभवानंतर त्यांनी आपलं मतही बदललं.

ऑफिस दिवाळीनिमित्त बंद असल्यानं खुनाच्या एका प्रकरणात काही माहिती देण्याकरता, त्यांनी मला घरी बोलावलं. तेव्हापासून आम्ही जवळ आलो आणि बघता-बघता मित्र कसे झालो हे कळलंच नाही. इतके मित्र होऊनही आम्ही कायम अहोजाहोवरच राहिलो, अरेतुरेवर कधीच आलो नाही हे आता जाणवतं आहे. त्याचं श्रेयही त्यांच्याकडंच आहे. त्यांच्यापेक्षा मी वयानं, पदानं लहान असूनही त्यांच्या तोंडून माझ्यासाठी कधीच अरेतुरे आलं नाही. ते कायम हळू आवाजात शांतपणे बोलायचे. वाद घालतानाही (फक्त आरोपींशी बोलताना सोडून) कधी त्यांचा आवाज वर गेलेला मी बघितला नाही. एखादा मुद्दा पटलाच नाही तर ‘तुम्ही असं कसं म्हणता?’ यापलीकडं त्यांचे शब्द कधी गेले नाहीत. मला तर वाटतं की, त्यांच्याशी वाद घालताना ते आपले मित्र आहेत म्हणून मी खूपच स्वातंत्र्य घेत असे. 

पोलीसखातं, आयपीएस अधिकारी यांच्याबद्दलची माझी मतं... जणू काही तेच या सगळ्याला जबाबदार आहेत अशा पद्धतीनं मी अरेरावीनं मांडत असे पण त्यांचा कधीच तोल जात नसे. आवाज चढत नसे. ते पटले तर कधी माझे काही मुद्दे मान्य करत, काही बाबतीत त्यांचं मत मांडत पण वादविवादातला सभ्यपणा सोडत नसत. 

त्यांच्या निःस्पृहपणाबद्दल खूप लिहून आलं आहे. खरोखरच हे वैशिष्ट्य सध्या सरकारी अधिकाऱ्यांमध्ये दुर्मीळ झालं असल्यानं त्याचं कौतुक होणं स्वाभाविक आहे. त्यांच्या धैर्याबद्दल तर आता बोलायलाच नको. बलिदान करून त्यांनी ते सिद्ध केलं आहे पण त्याहीपलीकडे त्यांच्यात अनेक गुण होते... एक पोलीस अधिकारी म्हणून आणि माणूस म्हणूनही. 

विविध प्रकारच्या माणसांना आपल्याकडं आकर्षित करण्याची कला त्यांच्याकडं होती. तऱ्हेतऱ्हेची अशी अनेक माणसं त्यांनी आपल्याभोवती जमवली होती. अर्थात असं असलं तरी आपल्या पदामुळं या बाबतीत ते खूप जागृतही असत. कुणीही नवीन माणूस संबंधात आला की ते त्या-त्या क्षेत्रातील मित्रांकडे तो कसा आहे याबद्दल चौकशी करत आणि खात्री पटली की मगच त्याला आपल्या मित्रपरिवारात सामील करत. 

त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यदर्शनाला वा त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनाकरता प्रचंड संख्येनं विविध क्षेत्रांतली जी माणसं आली होती ते बघितल्यावर त्यांनी नेमकं काय कमावलं होतं याची कल्पना येते. 

अनेक नवनवीन गोष्टींबद्दल कुतूहल, त्या करून बघण्याची इच्छा हे करकऱ्यांचं दुसरं वैशिष्ट्य. कामाच्या रगाड्यातही ते या सगळ्याकरता वेळ काढत. एकदा माझ्यासमोर आणि माझ्या मित्रासमोर त्यांनी एक भव्य डिपार्टमेंटल स्टोअर सुरू करण्याची कल्पना मांडली. आमच्या अशा भव्य योजनांवरच्या तितक्याच भव्य चर्चांमुळं आमच्या दोघांच्याही बायका काही वेळा आमची गंमतही करत पण त्यांचा उत्साह कमी होत नसे. नवनव्या गोष्टींमधला रस इतका की, जाहिरात एजन्सी चालवणाऱ्या माझ्या एका मित्राला एका जिन्सच्या आणि विडीच्या जाहिरातीचं काम मिळाल्यावर जणू काही ती आपलीच एजन्सी आहे आणि आपल्यालाच काम मिळालं आहे अशा प्रकारे त्या कँपेनवर ब्रेन स्टॉर्मिंग करण्याकरता त्यांनी अख्ख्या रात्रीचं सेशनही आयोजित केलं आणि त्यात उत्साहानं भाग घेतला, कल्पना सुचवल्या. त्यातला त्यांचा रस म्हणजे या निमित्तानं काहीतरी क्रिएटिव्ह विचार करायला मिळतो. 

मला वाटते... एकाच वेळी अनेक क्षेत्रांत संचार करण्याची आपली इच्छा ते या पद्धतीनं भागवत असत. चंद्रपूरला असताना चित्रकार, व्यंग्यचित्रकार मनोहर सप्रे यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी केलेली उत्कृष्ट काष्ठशिल्पं त्यांच्यातल्या कलाकारांची आणि त्यांना अनेक विषयात असलेल्या रुचीची साक्ष आहेत.

नव्यानव्या गोष्टींमध्ये रस असल्यामुळंच त्यांना अनेकदा पोलिसाची नोकरी सोडून देण्याची हुक्की येई पण ती अवस्था तात्पुरती असे. त्याबाबत ते चर्चा करत आणि ते करत असलेले काम कसं आणि किती महत्त्वाचं आहे हे त्यांना पटवलं की तो विषय बंद होई... पण तरीही आपल्याकडून (नेहमीचं ड्युटीचं काम सोडून इतरही) जे आणि जेवढं मोठं काम व्हायला हवं तसं होत नाहीये असं वाटून त्यांना मध्येमध्ये डिप्रेस्ड वाटे. सतत उत्साहानं आणि आनंदानं नवनवीन काम करणाऱ्या आपल्या काही सहकाऱ्यांचं त्यांना खूप कौतुक होतं. सुरेश खोपडे हे त्यांपैकी एक. असंच कौतुक त्यांना अनिल अवचट यांचंही वाटे. 

कुठल्याही छोट्या कर्तृत्वाबद्दल त्यांना कौतुक असे. मुख्य म्हणजे कुणीतरी आपल्या पुढं जाईल अशी भीती त्यांना नसे. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे अनेक गोष्टींत मनापासून रस घेत असतानाच आपल्या कामावर असलेली त्यांची पकड. कामाकरता आलेल्या सर्वांना ते भेटत, कुणालाच परत पाठवत नसत. या सर्वांकरता त्यांना खूप वेळ द्यावा लागे आणि काम आणि छंद यांच्यात समतोल राखताना त्यांची खूपच धावपळ होत असे. परिणामी मित्रांना, परिचितांना आणि घरच्यांनाही दिलेल्या वेळा ते अनेक प्रसंगी पाळू शकत नसत... (माझ्याकडे ते नेहमीच सांगितलेल्या वेळेच्या एकदीड तास उशिरा येत पण शेवटच्या भेटीच्या वेळी कधी नव्हे ते सांगितलेल्या वेळेच्या आधी आले होते.) पण तरीही दोन्ही गोष्टी ते मनापासून करत. सामान्य लोकांनाही जेवढी मदत करणं शक्य आहे तेवढी करत.

आर्थिक गुन्हे विभागाचा कार्यभाग सांभाळू लागल्यावर एका मोठ्या शेअर ब्रोकरला भेटून त्यांनी एकूण शेअरचा व्यवसाय समजून घेतला होता. दहशतवाद या विषयावरही काही चांगली पुस्तकं त्यांनी गोळा केली होती. मुंबई उपायुक्त असताना विविध पोलीस ऑफिसेस आणि आयुक्त कार्यालयं यांच्यातल्या टपाल पाठवण्याच्या व्यवस्थेत बदल घडवून आणून त्यांनी या कामात वाया जाणारं मनुष्यबळ वाचवून ते इतर महत्त्वाच्या कामाकरता उपलब्ध करून दिलं होतं आणि तेही तो विषय त्यांचा नसताना, त्यावर विचार करून, त्याकरता वेळ देऊन, जो विषय असेल त्यात खोलवर जायचे... मग त्याकरता कितीही वेळ द्यावा लागला तरी हरकत नाही हा त्यांचा स्वभाव होता त्यामुळंच जातीय दंगली हा विषयही आता केवळ स्थानिक राहिला नसून त्याला आंतरराष्ट्रीय संदर्भ कसा आला आहे हे अलीकडंच त्यांनी एकदा संगतवार सांगितलं होतं.

सर्व बाजूंनी विचार करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळं गुन्हे आणि गुन्हेगार यांच्या सामाजिक अंगाबद्दल त्यांना कुतूहल असे आणि त्यावर ते विचार करत. एकीकडं ते दहशतवादाचा मुकाबला करत असतानाच दुसरीकडं दहशतवाद्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करत होते. रोगावर औषध देताच मूळ रोगाचा अभ्यास करून तो होऊच नये म्हणून काही करता येईल का असा त्यांचा विचार असे. या विचारातूनच अमली पदार्थविरोधी पथकाचे प्रमुख झाल्यावरच अमली पदार्थ विकणाऱ्यांविरुद्ध मोहीम चालवतानाच तरुण मुलांनी या व्यसनाकडं वळू नये म्हणून महापालिका शाळांमध्ये आयपीएच आणि स्त्रीमुक्ती संघटनेच्या मदतीनं त्यांनी जिज्ञासा प्रकल्प राबवला. करकरे यांचं वेगळेपण नेमकं इथंच होतं. 

अशा वेगळ्या पद्धतीनं विचार करणारे अधिकारी अपवादात्मक असतात. ते आपल्या विचारानं, कामानं, मेहनतीनं समाजाच्या एका छोट्या भागात का होईना पण काही निश्चित बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतात, त्याकरता वेळ देतात... त्यामुळंच त्यांच्या जाण्यानं पटकन स्पष्ट लक्षात आलं नाही तरी समाजाचं काहीतरी नुकसान झालेलं असतं. करकरेंच्या जाण्यानं नेमकं हेच झालं आहे. 

(अनुवाद: शोभा चित्रे)

- जुई करकरे - नवरे
jui.navare@gmail.com


वाचा 'माझे पप्पा हेमंत करकरे' या लेखमालेतील इतर भाग 

मुंबईतले ते भीषण तास...

शेवटचा प्रवास...

हेवा वाटावा असे वीरमरण...

संकटसमयी सगळ्यांच्या पुढे उभा राहून लढणारा धैर्यधर...

बुलेटप्रुफ जॅकेटचा अपशकुन

हौतात्म्यामागची आजन्म तपश्चर्या

कुटुंबवत्सल माणूस

चंद्रपूरचं आव्हान

चंद्रपूरमधील आठवणी सांगणारा काही पत्रव्यवहार

चंद्रपूरमधील बालपणीच्या आठवणी

निर्जीव लाकडामध्ये प्राण फुंकणारे पप्पा...

सहकाऱ्यांनी जागवलेल्या आठवणी - पूर्वार्ध 

सहकाऱ्यांनी जागवलेल्या आठवणी - उत्तरार्ध

Tags: लेखमाला जुई करकरे जुई करकरे - नवरे माझे पप्पा हेमंत करकरे मुंबई दहशतवादी हल्ला 26/11 अँटी टेररिझम स्क्वॉड दहशतवाद विरोधी पथक एटीएस हेमंत करकरे भाग 15 Marathi Series Jui Karkare Majhe Pappa Hemant Karkare My Pappa Hemant Karkare Hemant Karkare : A Daughter's Memoir Part 15 Jui Karkare- Navare Load More Tags

Comments:

Shripad Shidore

Jui has really brought out various facets of her father Late Hemant Karkare's personality so well. For those like me, who have never met him, the book clearly portrays the great personality. We realise what a loss it is for our country and society in general. भाषांतर अतिशय सुंदर झालेले आहे..मूळ इंग्लिश भाषेत लिहिले गेलेले हे पुस्तक आहे असं कधी मनाला स्पर्शून सुद्धा जात नाही.

संजीवन

फारच सुंदर आणि ‘नेमके माझ्या मनातलं लिहिले बघा’ अशा आठवणि!खरच मिलिंद कोकजे यांनी श.हेमंत करकरे यांच्या हजारो,लाखो शुभचिंतकांच्या मनातले विचार मांडले आहेत.

Add Comment