नवऱ्याने आणि सासऱ्यांनी जागवलेल्या आठवणी...

माझे पप्पा हेमंत करकरे - भाग 19

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई शहरावर मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये त्यावेळचे दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएसचे) प्रमुख हेमंत करकरे शहीद झाले. त्यांची कन्या जुई करकरे - नवरे यांनी वडलांविषयी लिहिलेल्या आठवणी दोन वर्षांपूर्वी 'Hemant Karkare: A Daughter's Memoir' या पुस्तकाच्या रूपाने  The Write Place कडून प्रकाशित झाल्या. शोभा चित्रे यांनी मराठीत अनुवादित केलेल्या या आठवणी लेखमालेच्या स्वरुपात 18 सप्टेंबरपासून प्रत्येक शनिवारी आणि रविवारी कर्तव्य साधनावरून प्रसिद्ध होत राहिल्या. वीस भागांच्या मालिकेतील शेवटचा भाग उद्या प्रसिद्ध होईल.  
 - संपादक


पप्पांच्या आयुष्यातून शिकण्यासारखं खूप काही होतं... मेहनती, कामात झोकून देण्याची वृत्ती, दयाळूपणा, ज्येष्ठांबद्दल आदर, प्रतिकूल परिस्थितीतही मनाचा तोल राखणं, साधी राहणी, उच्च विचारसरणी, अत्यंत दक्ष इत्यादी. ही यादी न संपणारी आहे.
- देवदत्त नवरे


देवदत्तनं, म्हणजे माझ्या नवऱ्यानं 26/11च्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्यावर वाहिलेली श्रद्धांजली...

पप्पांचा फोन आल्यावर ‘गुड मॉर्निंग’ हा पहिला शब्द ऐकायची मला सवय होती. सकाळ, दुपार, संध्याकाळ... वेळ कोणतीही असो... अत्यंत उल्लसीत आवाजात अभिवादन करून पप्पांचा फोन सुरू व्हायचा. पप्पांबद्दलचे विचार शब्दांत उतरवण्याचा प्रयत्न मी खूप दिवस करतोय. त्यांच्याबरोबर घालवलेले एवढे अनमोल क्षण आठवून ते लिहून काढण्याची हिंमत मी एव्हाना केलेली नाही. माझं हे लिहिणं म्हणजे माझ्या मनातल्या पप्पांच्या आठवणींची उजळणी आहे. याला श्रद्धांजली म्हणता येईल किंवा आठवणींचा खजिना. 

मी पप्पांना पहिल्यांदा पाहिलं ते माटुंगा जिमखान्यावर डिसेंबर 2006मध्ये. माझ्या आणि जुईच्या कुटुंबांची तेव्हाच एकमेकांशी ओळख झाली. थोड्या दिवसांनी आमच्या साखरपुड्याची तारीख ठरली. साखरपुड्याच्या समारंभात पप्पांनी त्यांच्या नेहमीच्या तडाखेबाज स्टाईलमध्ये समारंभाचं सूत्रसंचालन केलं. आम्हा दोघांना स्टेजवर बोलावलं. मी उत्तम वक्ता नाही त्यामुळे त्यांच्यानंतर बोलणं सोपं नव्हतं. या समारंभासाठी मी माझ्या मित्रांना बोलावलं होतं. ते म्हणाले, "अरे, डीडी हे लोक कोण आहेत? एवढ्या पोलिसाच्या गाड्या का आहेत बाहेर?" 

साखरपुड्याच्या दुसऱ्या दिवशी मम्मी, पप्पा आणि जुई आमच्या घरी आले. पप्पा आणि बाबा (माझे वडील सुनील नवरे) यांच्या अगदी आंतरराष्ट्रीय विषयांपासून ते थेट माटुंग्यापर्यंत मनमोकळ्या गप्पा रंगल्या. पप्पा मला माझ्या बाबांसारखेच वाटले... शिस्त, संयोजन, चौफेर ज्ञान... मला थोडं जपूनच राहायला हवं. 

पप्पांनी माझ्या परतीच्या विमानाची चौकशी केली. लगेच एअरलाईनला फोन करून माझी विमानाची बसण्याची जागा बदलून घेतली. खरंतर असं काही करता येतं... तेही फोनवर... हे मला माहीतही नव्हतं. बॉस्टनला परत जाण्याचा माझा दिवस आला. त्या वेळी मी प्रथमच आमचं माटुंग्याचं घर संजीवनी सोडून जात होतो. अर्थात लवकरच मी परतणार होतो. आईबाबांचे हसरे चेहरे पुन्हा बघणार होतो. पप्पामम्मीसारखे व्याही मिळाल्यानं ते खूप खूश होते. विमानतळावर मला ज्या पद्धतीची प्रथमश्रेणीची वागणूक मिळाली तशी मी कधी पाहिली नव्हती. मी विमानात बसेपर्यंत माझ्या संरक्षणासाठी बंदूकधारी पोलीस होते.

पप्पांबरोबर मी भरपूर वेळ घालवला तो ते बॉस्टनला आले असताना. त्यांना जास्त दिवसाची सुट्टी मिळत नव्हती पण शेवटी त्यांना 20 दिवसांची सुट्टी मिळाली आणि ते बॉस्टनला 2 जुलै 2008ला आले. मम्मीनं छान पंजाबी ड्रेस घातला होता. पप्पांचं येणं एवढं अचानक ठरूनही मम्मींना त्यांच्या बॅगेत चांगला ड्रेस सापडला म्हणून मी त्यांची थट्टा केली. पप्पांना घ्यायला मी, जुई आणि मम्मी दुपारी विमानतळावर पोहोचलो. माझ्या सवयीप्रमाणे आम्ही उशिरा पोहोचलो. पप्पा आमच्यासाठी दहा मिनटं वाट पाहत होते. मला वाटलं की, पप्पांना राग आला असणार पण त्यांनी जावयाला माफ केलं. काही बोलले नाहीत. मी त्यांना हे म्हणालोसुद्धा की, मी लोकांना विमानतळावर घ्यायला उशिरा जायचं तंत्र चांगलं अवगत केलंय, त्यात कधी चूक होत नाही. 

त्या रात्री आम्ही पुढच्या पंधरा दिवसांचा आराखडा ठरवला. मम्मी तर एवढ्या खूश होत्या की म्हणाल्या, ‘गेल्या पंधरा वर्षांत प्रथमच पोलिसांच्या लवाजम्याशिवाय अगदी मोकळेपणानं कुटुंबाबरोबर वेळ घालवता येतोय. आम्ही हसत सुटलो. रोज रात्री पप्पा, जुई आणि मी एकएक, दोनदोन वाजेपर्यंत गप्पा मारत बसायचो. एका ज्येष्ठ अधिकाऱ्याशी बोलतोय असं मला कधी वाटलं नाही. त्यांनी त्यांच्या व्यवसायातले अनेक अनुभव आम्हाला सहजपणे सांगितले. जणू काही चारचौघांसारखी एक चाकोरीबद्ध नोकरी ते करत होते. हल्लीच्या काळात सापडायला अगदी दुरापास्त असा हा महत्त्वाचा गुण... कारण प्रत्येकाचा विश्वास असतो की, आपण काहीतरी आगळंवेगळं करतोय.

4 जुलैला अमेरिकन स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पप्पा, माझी बहीण प्रणोती आणि मी असे व्हेल वॉचिंग टूरवर गेलो. ही तीन तासांची ट्रीप. समुद्रात साधारण 60 मैलांवर गेल्यावर आम्हाला 12-13 व्हेल्स दिसले. एका ट्रीपमध्ये एवढे व्हेल्स पाहायला मिळाले. आम्ही लकीच! आम्ही चार्ल्स नदीवर गेलो. तिथे पाच लाख लोक दिवसभराच्या पिकनिकसाठी जमले होते. आम्हीही नदीवर पिकनिक केली. रात्री इथे फटाक्यांची आतषबाजी. बॉस्टनवासियांचं असं दिवसभर चालणारं सेलिब्रेशन बघायला, मम्मीपप्पांना घेऊन जायला मी सुरुवातीला साशंक होतो पण दोघांनी आनंदानं मान्यता दिली होती. दुसऱ्या दिवशी ते लवकर उठले. त्यांचा मॉर्निंग वॉक आटपून परतले आणि ब्रेकफास्ट घेताना त्यांचा प्रश्न आलाच, 'आता आज कुठे जायचं?' या तीन बायका सर्द झाल्या कारण आधला दिवस आम्ही घराबाहेरच घालवला होता. पप्पा तरीही ताजेतवाने होऊन नवीन मोहिमेला जायला तयार होते. 

मग आम्ही ऱ्होड आयर्लंडच्या न्यूपोर्टला जायचं ठरवलं. तिथे अतिश्रीमंत, लोकप्रिय लोकांचे जुन्या काळातले पाण्याच्या काठाशी अब्जावधी डॉलर्सचे प्रासाद आहेत. आम्ही या घरांची टूर घेतली. परत साडेपाच वाजता निर्णय घेण्याची वेळ आली. घरी परतायचं की आणखी कुठे? मी जवळच्या कसिनोला जायचं सुचवलं. पप्पा एका पायावर तयार झाले. मग आम्ही गाडीनं तिथे पोहोचलो. तिथे प्रवेश केल्यावर मी पप्पांना गमतीत म्हटलं, "मी महाराष्ट्राच्या एटीएस प्रमुखाचा जुगार खेळताना फोटो काढतो आणि मिडियाला पाठवतो." ते हसले. मम्मींना तर हसू आवरेना. जपून ठेवण्यासारख्या किती मौल्यवान आठवणी! पप्पांचा दुसरा गुण म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर स्मित अधिक काळ रेंगाळलं की समजावं, 'तो चांगला जोक होता आणि पप्पा रिलॅक्स्ड आहेत.'

...शिवाय पप्पांचा महत्त्वाचा पैलू म्हणजे प्रत्येक गोष्टीची कसून चौकशी करून शहानिशा करणे. या सगळ्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देताना पप्पा नाना तऱ्हेचे प्रश्न विचारायचे. ते प्रश्न बॉस्टनच्या संदर्भात असायचे... अमेरिकेचं धोरण, इथली अर्थव्यवस्था इत्यादी... आणि या प्रश्नांना सामोरं जाण्यासाठी मला तयारी करायला लागायची. इथं पोहोचण्यापूर्वी मी माहिती वाचून ठेवलेली असायची. अमेरिकेत रोज काय घडतंय हे मी पाहून ठेवायचो... शिवाय टुरिस्ट स्थळांची नीट माहिती करून घेतलेली असायची. मला माहीत असायचं की, प्रश्नोत्तराचा तास सतत चालू राहणार आहे.

दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 जुलैला आम्ही गावातल्याच शॉपिंग मॉलमध्ये गेलो. माझ्या ऑफिसला वापरायच्या पँट्स पप्पांना आवडल्या होत्या. त्यांना तशाच फिटिंगची पॅन्ट हवी होती म्हणून आम्ही दुपारी आऊटलेट मॉलमध्ये गेलो. राल्फ लॉरेन आणि ब्रुक ब्रदर्स ही दुकानं पाहून ते खूश झाले. ते पाहून मला आश्चर्य वाटलं. 

मी म्हणालो, "यातल्या एका दुकानात जाऊन आपण शॉपिंग आटपून घेऊ या." 

त्यांनी विचारलं, "तुम्ही फक्त ब्रॅन्डेड कपडे वापरता का?" 

चलाखीनं विचारलेला प्रश्नपण मला अपराधी ठरवणारा. आम्ही या दुकानात शॉपिंग केलं. मी ती पॅन्ट आमच्या संभाषणाची आठवण म्हणून जपून ठेवली. त्या रात्री आम्ही प्रणोतीला तिच्या घरी सोडलं आणि घरी परतलो मात्र प्रणोती तिच्या अपार्टमेंटमध्ये सुरक्षित राहील याची खबरदारी पप्पांनी घेतली. दाराचं कुलूप नीट आहे ना याची खातरी करून घेतली. त्यांची कुटुंबवत्सलता सतत दिसून यायची. पोलीस डिपार्टमेंटच्या प्रमुखपदाच्या भूमिकेतून ते वडीलधाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेत आले. त्यांना आपलं वैयक्तिक आयुष्य आणि कामकाज यांना दोन वेगवेगळ्या कप्प्यांत ठेवणं अवगत होतं. आत्ताच्या काळात वावरताना हे कठीण आहे. मुंबईला असताना त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येतच असायच्या. बॉस्टनला त्यांनी तो कप्पा तात्पुरता बंद ठेवला होता. 

मम्मीपप्पांबरोबर नायगराच्या ट्रीपला जायची इच्छा असूनही मला जाणं शक्य नव्हतं. मग मी त्यांना माझ्या युनिव्हर्सिटीच्या आसपास फिरवण्याचा बेत केला पण जुईनं पुढाकार घेऊन ती ट्रीप केली. पप्पा रोज माझ्यासाठी रात्री साडेदहा-अकरापर्यंत जेवायला थांबायचे. आपण सगळ्यांनी बरोबर जेवू या असं म्हणायचे. त्यांचं अगदी लहान-लहान गोष्टींमधून व्यक्त होणारं प्रेम, काळजी, माया मी कधीच विसरू शकणार नाही. मी त्यांना म्हणायची की, दिवसभराच्या भटकंतीनंतर थकल्यावर त्यांनी माझी वाट पाहत थांबायला नको पण ते म्हणायचे, "नाही... त्यात काय आहे? सगळ्यांनी एकत्र जेवू या." जेवल्यानंतर आमच्या गप्पागोष्टींचा अड्डा पडायचा आणि त्यानंतर एखादी मुव्ही ठरलेली असायची.

मधल्या दिवशी जुई मम्मीपप्पांना घेऊन हार्वर्ड, एमआयटी आणि इतर पर्यटन स्थळं दाखवून आणायची. हार्वर्डला जाऊन आल्यावर पप्पा म्हणाले की, त्यांची इच्छा होती हार्वर्ड किंवा तत्सम दुसऱ्या कॉलेजमधून दहशतवादविरोधी विषयात पीएचडी करावी. शिकण्यासाठी पोलीस खात्यातून मोठी रजा आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा त्यांचा मानस होता. गप्पांच्या ओघात ते हेही म्हणाले की, युनायटेड नेशन्सच्या वतीनं इराकमध्ये किंवा अफगाणिस्तानात काम करण्याचंही त्यांच्या मनात आहे. आम्हाला सगळ्यांना हे ऐकून धक्काच बसला. जणू काही आत्ताचं त्यांचं काम कमी तणावपूर्वक होतं म्हणून त्यांना असं काहीतरी करायचं होतं पण हे पप्पांचं नेहमीचंच. सतत पुढच्या उंच भरारीची स्वप्नं. 

रोज रात्री पप्पांबरोबर गप्पा हा खास कार्यक्रमच असायचा. पप्पा आठवणी सांगायचे - चंद्रपूरच्या, भिवंडीच्या आणि थेट व्हिएन्नाच्या... त्यांना सामना कराव्या लागलेल्या चकमकी वगैरे. तसंच आम्ही जागतिक बाजारपेठ, अर्थशास्त्र, धोरणं याही विषयांवर बोलत असू. त्यांना डायबिटीस असल्यानं ते रोज सकाळी तास-दीड तास चालायला जायचे. रात्री झोपायला कितीही उशीर झाला तरीही सकाळी लवकर उठून ते चालायला जायचे. तेव्हाच मुख्य कार्यालयाशी संपर्क साधून तिथली खबरबात घ्यायचे. एक दिवस ते अपार्टमेंटबाहेरच अडकले. मम्मी त्यांना आतून बटन दाबून अपार्टमेंट कॉम्प्लेक्सचं दार उघडू शकल्या नाहीत. अर्धा तास मग ते आणखी फिरत राहिले. ते घरी परतले. तो अगदी मजेदार प्रसंग होता.

"मी तुला साडेसातपर्यंत परत येतो असं सांगितलं होतं पण म्हणून काय सात वाजता आलो तर दरवाजा उघडायचा नाही का? मला त्याच्यामुळे आणखी एक फेरी मारावी लागली." सकाळच्या चहाबरोबर हे संभाषण रंगलं. आता या अशा सगळ्या आठवणी आमच्याजवळ नेहमीकरता राहतील.

ते न्यूयॉर्कला आणि डीसीलाही वीकएन्डला जाऊन आले. त्यांनी कॅपिटल हिल पाहिलं. परत आल्यावर छान विश्रांती घेतली. त्याच्या दुसऱ्या दिवशी मम्मी भारतात परतल्या आणि बापलेकीला दोन दिवसांसाठी खास ‘क्वालिटी टाईम’ मिळाला. जुईनं त्यांना उरलेलं बॉस्टन दाखवलं. ते परत जाण्याच्या आदल्या दिवशी त्यांना माझं ऑफीस दाखवलं. ती त्यांची तिथली शेवटची रात्र असल्यानं आम्ही जास्तीत जास्त गोष्टी करण्याचं नक्की केलं. तेही त्यात सामील झाले. दिवसभर घराबाहेर फिरूनही आम्ही रात्री नऊ वाजता डाऊनटाऊनची टूर घ्यायचं ठरवलं. पप्पांना युनियन ऑइस्टर हाऊसला भेट द्यायची होती. अमेरिकेतलं हे सर्वात जुनं रेस्टॉरंट आहे असं त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांकडून ऐकलं होतं त्यामुळं तिकडे जाण्याचा आग्रह त्यांनी धरला. आम्ही तिथे गेलोही. त्यांना ते रेस्टॉरंट बघून खूप मजा वाटली. त्यांनी तिथे काही भेटवस्तूही खरेदी केल्या. त्यानंतर आम्ही जेवण घेतलं. तिथून हार्ड रॉक कॅफेकडे चालत निघालो. तेव्हा रस्त्यावर विकायला ठेवलेल्या स्वीस चाकूकडे त्यांचं लक्ष गेलं. तो पप्पांना आवडला. आमच्या घरी तो असावा म्हणून त्यांनी लगेच तो विकतही घेतला. 

आमच्याकडे पप्पांच्या बॉस्टन ट्रीपची आठवण म्हणून तो चाकू आहे. जवळजवळ मध्यरात्र होत आली. मी पप्पांना सुचवलं की, आपण नाईट आऊट करू या. जवळच्या पेस्ट्री शॉपमध्ये जाऊन गोडाचा काही प्रकार घेऊ या. कॉफी घेऊ या. त्यानंतर सिगार पार्लरला भेट देऊ या. हे सर्व आटोपून मग घरी जाऊ या. ते एखाद्या कॉलेजच्या मुलासारखे उत्साहानं तयार झाले. रात्रीच्या या आडवेळेलाही नवीन काही बघण्यासाठी त्यांना उत्साह होता. एव्हाना रात्रीचा एक वाजला होता. आम्ही आमच्या घराजवळच्या कॅफे व्हिक्टोरिया या सुप्रसिद्ध पेस्ट्रीच्या दुकानात शिरलो. बिल क्लिंटनपासून ब्रॅडपिटपर्यंत अनेकांनी भेट दिलेलं हे दुकान. पप्पांना मधुमेहाचा त्रास असल्यानं त्यांनी विशेष काही खाल्लं नाही मात्र त्यांनी कॅफे अमेरिकानो घेतली. मग आम्ही खाली सिगार पार्लरमध्ये गेलो. मी त्यांना विचारलंही की, खूप उशीर होतोय का? ते म्हणाले, "नाही, काही विशेष उशीर नाही. आपण थोड्याच वेळात निघणार आहोत नं?" 

आम्ही रात्री अडीचला परतलो. पप्पांची दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सातची फ्लाईट होती. त्यांना रात्री छान झोप लागली. दिवसभर त्यांनी आराम केला. आम्ही घरून साडेचार वाजता निघणार होतो. ते माझ्या येण्याची अगदी वाटच बघत होते. त्या दिवशी मी दुपारी परतलो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर संमिश्र भाव होते. मुलीला सोडून जायचं या विचारानं आलेली उदासीनता, अस्वस्थता. नेहमीप्रमाणे विनयशीलतेनं त्यांनी मला थोडी झोप काढायला सांगितलं आणि ते तयार झाले... सुट-टाय घालून प्रसंगाला साजेसे व्यवस्थित. आम्ही त्यांना विमानतळावर सोडलं. सिक्युरिटीमधून आत गेल्यावर त्यांचा जुईला एसएमएस आला. ‘तुम्ही गेले पंधरा दिवस छान काम केलंत. तुला आणि देवदत्तला शुभेच्छा!’

पप्पांना शेअर बाजाराबद्दल उत्सुकता होती. ते म्हणायचे की, त्यांना नेहमीच बँकिंग गुंतवणूक आणि तिचं व्यवस्थापन यांचं आकर्षण होतं. ते स्वतः गुंतवणूक करायचे. आमच्या साखरपुड्यानंतर दर दोनतीन आठवड्यांनी आम्ही दोघं अर्धा ते पाऊण तास शेअर बाजाराच्या एकंदर हालचालींबद्दल बोलत असू. ते मला बॉस्टनला माझी चौकशी करायला फोन करायचे आणि लग्नाची तयारी कुठपर्यंत आली त्याचाही अहवाल द्यायचे. जुई इथे बॉस्टनला आल्यावर पप्पांचे फोन अधिक वेळ चालायचे. कधी कधी तासभरही. यात प्रामुख्यानं आम्ही शेअर बाजाराबद्दल बोलत असू. त्यांची नवीन नोकरी, भविष्यातले बेत आणि व्यावसायिक गोष्टी. 

ते ऑगस्ट 2008ला भारतात परतल्यावर कामात खूप अडकले. त्यांना स्वतःसाठी थोडा शांत वेळही मिळेना तरीही नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी एका दुपारी मला फोन केला. त्या वेळी भारतात तर अपरात्र होती. मी त्यांना विचारलंही की, इतक्या उशिरा ते जागे कसे? तिथे रात्रीचे दोन वाजले होते. ते अजून ऑफीसमध्येच होते... 'सहज चौकशी करायला फोन केला. तुम्ही बिझी असाल तर आपण नंतर बोलू.' मी गोंधळात पडलो. ते स्वतः बॉम्बस्फोटाच्या महत्त्वाच्या केसमध्ये गुंतलेले असताना मीच ऑफीसमध्ये बिझी असल्याची चौकशी करताहेत. आम्ही अगदी थोडा वेळ बोललो. त्यांच्यावर ताण, दडपण असल्याचं जाणवलं. अशा तऱ्हेचा फोन त्यानंतर साधारण त्याच वेळी यायचा. मी जुईला सांगितलंही की, पप्पा अतिशय तणावात वाटतात. मला वाटतं की, आपण दर एकदोन दिवसांनी त्यांच्याशी थोडा वेळ तरी बोलायला हवं.

शेवटचा फोन मी त्यांना केला तो 22 नोव्हेंबरला त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्तानं. ते खूप बिझी होते. थोडा वेळच आम्ही बोललो. मी त्यांना आमच्या डिसेंबरच्या ट्रीपविषयी सांगितलं. त्यांनी जुईच्या आणि माझ्या व्हिसाची माहिती पाठवून द्यायला सांगितलं म्हणजे त्यांना योग्य ती व्यवस्था करता येईल. त्यांच्यावर इतकं दडपण असतानाही त्यांनी व्हिसाची चौकशी केली. आम्ही सगळे ट्रीपला कुठे जाऊ शकतो याचाही विचार करून काही ठिकाणं सुचवली. 26 नोव्हेंबरला सकाळी साडेअकरा वाजता त्यांची इमेल आली. त्यात त्यांनी आवश्यक ते फोनकॉल केलेले असून मी पुढच्या गोष्टींसाठी त्यांच्या हाताखालच्या व्यक्तीशी संपर्क साधावा अशी सूचना होती. हा आमच्या दोघांमधला शेवटचा संवाद.

स्पष्टपणे बोलायचं झालं तर ते कधी माझ्याशी सासऱ्यासारखे वागले नाहीत. लग्न झालेले माझे कित्येक मित्र म्हणायचे, "यार, तू असा इतका सासऱ्यांशी कसा बोलू शकतोस?" यावर माझ्याकडे स्पष्टीकरण नव्हतं. पप्पांकडे एक आगळीच जादू होती. अगदी एखाद्या छोट्या मुलापासून (माझा मामेभाऊ अनिकेत) ते माझ्या आजीपर्यंत सर्वांशी त्यांचं लगेच सूत जमायचं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातूनच आपुलकी, ओलावा, अगत्य, ज्येष्ठांबद्दल आदर इत्यादी अखंड प्रवाह स्रवत होता. त्यांच्या आयुष्यातून शिकण्यासारखं केवढं काही आहे... मेहनत, कष्ट, निष्ठा, माणुसकी, प्रतिकूल परिस्थितीतही मनाचा समतोल राखणं, त्यांची साधी राहणी, उच्च विचारसरणी... ही यादी संपणारी नाही. सर्वसाधारणपणे यांतले काही गुण वेगवेगळ्या लोकांत आढळतात पण आमच्या पप्पांसारखं हे असमान्य संपूर्ण पॅकेज त्या जगन्नियंत्यानं क्वचित घडवलं असेल.

पप्पा आपण 'रिव्हर वाइल्ड' सिनेमा एकत्र पाहिला होता. त्या २६/११च्या भयाण रात्री 'रिव्हर' एवढी 'वाइल्ड' अशी वाहील असं कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. तुम्ही आमच्यासोबत नाही आहात हे खरंच वाटत नाही. अजूनही. वाटतं तुमचा फोन येईल. तुम्ही म्हणाल, 'गुड मॉर्निंग, काय म्हणता?'

तुम्हाला शतश: प्रणाम!
देवदत्त

ता.क. - मी ही श्रद्धांजली आज (15 मे 2009) लिहून पूर्ण केली. टीव्ही लावला. रिव्हर वाइल्ड ही मुव्ही टीव्हीवर लागलेय. अशा योगायोगाचा कसा खुलासा करणार? या फक्त अनुभवायच्या गोष्टी असतात. मला मात्र मी हे लिहून काढल्याचं समाधान आहे. 


ऑफिसर अँड अ कम्प्लिट फॅमिली मॅन
माझे सासरे-सुनील नवरे- माझ्या वडलांचा उल्लेख पप्पा म्हणूनच करायचे. त्यांच्या आठवणी...

हिऱ्याचं तेज हे त्याच्या अनेक पैलूंवर अवलंबून असतं. हिऱ्याला किती पैलू आहेत यावर त्याचं मूल्य ठरतं. हेमंत करकरेंनाही हीच मोजपट्टी लागू होते कारण त्यांच्या व्यक्तिमत्त्वालाही असे अनेक पैलू होते. आकर्षक व्यक्तिमत्त्व, प्रामाणिक अधिकारी, दांडगी स्मरणशक्ती, कलासक्त, प्रत्येक विषयाची सखोल माहिती ठेवणारा, स्वतःच्या वेशभूषांच्या बाबतीत कायम जागरूक असणारा माणूस आणि अर्थव्यवस्था, विज्ञान-तंत्रज्ञान सगळ्याच क्षेत्रांची अद्ययावत माहिती ठेवणारी व्यक्ती या स्वरूपातच मी त्यांना अनुभवलं.

देवदत्त-जुईच्या विवाहानंतर देवदत्त काही दिवसांतच अमेरिकेला निघून गेला. घरातल्या महिला वर्गाला थोडी विश्रांती मिळावी म्हणून पप्पांनी पिकनिकला जायचं ठरवलं. माझी मुलगी प्रणोती म्हणाली, पप्पांचे अनुभव इतके ऐकण्यासारखे असतात की, ते ऐकत बसलो तरी दोन दिवसांची पिकनिक नक्कीच सत्कारणीही लागेल... शिवाय वेगळ्या तऱ्हेनं एन्जॉय करता येईल.

हेमंतनं मग भंडारदऱ्याला आणि शिर्डीला जायचा प्लॅन केला. जुईला आणि प्रणोतीला भंडारदरा धरण आतून दाखवायचं, त्याची रचना समजून द्यायची असा त्यांचा विचार होता. आम्ही एकटे गेलो असतो तरी ही संधी कधीच मिळाली नसती. हेमंतच्या तिथल्या सहकाऱ्यांनी आमची दोन्ही ठिकाणी अत्युत्तम व्यवस्था केली. साहेबांचे पाहुणे म्हणून नाही तर हेमंतविषयी त्याच्या सहकाऱ्यांना कमालीचा जिव्हाळा होता म्हणून... त्या भावनेतून त्यांनी आमची सर्व बडदास्त ठेवली. तिथल्या लोकांनी आमच्यासाठी फुलांचा बुके केला. तसा बुके आम्ही प्रथमच पाहिला. पामच्या वाळलेल्या काड्या, पेपर, प्लॅस्टीक, फुलंपानं एकत्र गुंफून काही मिनटांत बुके तयार करून आमच्या हातात ठेवला.

कसारा घाटातून जाताना ट्रॅफिक फारच जास्त होतं. आमची गाडी मंदगतीनं जात होती पण हेमंतबरोबर सुरू असलेल्या गप्पांमुळं वेळ कसा गेला कळलंच नाही. त्या वेळी मी हेमंतमधला एक वरिष्ठ पोलीस अधिकारी, प्रेमळ पिता, प्रिय पती, उत्कृष्ट आयोजक आणि सच्चा मित्र, साईबाबांचा भक्त, निसर्गाचा आनंद लुटणारा प्रवासी किती सांगायचं... सर्वच पैलू अनुभवले. आमच्याबरोबर माझ्या वृद्ध सासूबाईही होत्या. त्यांच्याप्रति हेमंतनं व्यक्त केलेला आदर अगदी त्यांच्या स्वतःच्या आईबद्दल व्यक्त करावा असाच होता. हेमंतच्या रूपानं आम्हाला तेव्हा एका कम्प्लीट फॅमिली मॅनचं दर्शन घडलं.

एकदा आम्ही पार्टीच्या निमित्तानं एकत्र जमलो होतो. अचानक त्यांना कामाच्या संबंधात फोन आला. रात्रीचे साडेअकरा वाजले होते. जायचं तर होतं. बाहेर ड्रायव्हर होता पण त्यांनी त्याला आणखी उशीर नको म्हणून घरी पाठवून दिलं आणि स्वतः गाडी घेऊन घेऊन सायन ते जुहूपर्यंत गेले. सांगायचं असं की, त्यांच्यातली एनर्जी आणि त्यांचा स्टॅमिना अजोड होता.

देवदत्तच्या आणि जुईच्या विवाहसमारंभात ते स्वतः लक्ष ठेवून सर्व काम करवून घेत असल्याचं मी अनेक वेळा अनुभवलं.खरं म्हणजे तेव्हा ‘गजा बोले आणि दल हले’ अशी परिस्थिती होती पण मला आठवतात ते हेमंत म्हणजे विवाहाच्या आदल्या रात्री स्वतः समोर उभे राहून त्यांनी हॉलचं टॉयलेट-बाथरूम साफ करवून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता प्रवेशद्वारावर सर्वांचं हसतमुखानं स्वागत करायला आम्ही सज्ज!

विवाह समारंभाच्या काही दिवस अगोदर घडलेला एक गमतीदार प्रसंग... हेमंतनं मला स्वतः सांगितलेला... ते म्हणाले, "कविता सारखी भुणभुण लावते की, तुम्ही कोणाच्या लग्न समारंभाला जात नाही, आपल्याकडेही जुईच्या लग्नाला कोणी येणार नाही.’ त्यांनी हे सांगितल्यावर आम्ही दोघंही खूप हसलो. पण हेमंतनं सुरुवातीच्या जितक्या पत्रिका छापल्या होत्या त्या तर सर्व संपल्याच. नंतरही त्यांना आणखी बऱ्याच पत्रिका छापून घ्याव्या लागल्या. 

देवदत्त-जुईच्या विवाहाला आणि दुसऱ्या दिवशीच्या स्वागत समारंभाला अक्षरशः अलोट गर्दी झाली. वधूवरांना स्टेजवर भेटण्यासाठी निमंत्रितांची भली मोठी रांग लागली होती. त्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपासून ते गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्यापर्यंत... काही विदेशी पाहुणे होते. विशेष म्हणजे हेमंत सर्वांना व्यक्तिशः ओळखत होते. जुई-देवदत्तची, माझी-शिल्पाची सर्वांना ओळख करून देत होते. काही प्रसंगी ते आमचा हात हातात घेऊन काही पाहुण्यांची ओळख करून देत होते. त्या वेळी आपल्यातला अधिकारी हुद्दा सर्व काही विसरून त्यांच्या चेहऱ्यावरून लहान मुलाप्रमाणे निष्पाप, प्रेमळ भाव झळकत होते जे कधीही विसरू शकणारच नाही. उलट आमच्या मनाच्या कुपीत जपून ठेवले आहेत आणि त्या आठवणींच्या सुगंधांचा दरवळ आयुष्यभर आम्हाला पुरणार आहे.

 

(अनुवाद: शोभा चित्रे)

- जुई करकरे - नवरे
jui.navare@gmail.com


वाचा 'माझे पप्पा हेमंत करकरे' या लेखमालेतील इतर भाग 

मुंबईतले ते भीषण तास...

शेवटचा प्रवास...

हेवा वाटावा असे वीरमरण...

संकटसमयी सगळ्यांच्या पुढे उभा राहून लढणारा धैर्यधर...

बुलेटप्रुफ जॅकेटचा अपशकुन

हौतात्म्यामागची आजन्म तपश्चर्या

कुटुंबवत्सल माणूस

चंद्रपूरचं आव्हान

चंद्रपूरमधील आठवणी सांगणारा काही पत्रव्यवहार

चंद्रपूरमधील बालपणीच्या आठवणी

निर्जीव लाकडामध्ये प्राण फुंकणारे पप्पा...

सहकाऱ्यांनी जागवलेल्या आठवणी - पूर्वार्ध 

सहकाऱ्यांनी जागवलेल्या आठवणी - उत्तरार्ध

प्रियजनांनी जागवलेल्या आठवणी...

परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी आणि भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष यांनी जागवलेल्या आठवणी...

बहिणीनं आणि मित्रानं जागवलेल्या आठवणी 

वर्गमित्रानं आणि स्वयंपाक्यानं जागवलेल्या आठवणी 

Tags: लेखमाला जुई करकरे जुई करकरे - नवरे माझे पप्पा हेमंत करकरे मुंबई दहशतवादी हल्ला 26/11 अँटी टेररिझम स्क्वॉड दहशतवाद विरोधी पथक एटीएस हेमंत करकरे भाग 19 Marathi Series Jui Karkare Majhe Pappa Hemant Karkare My Pappa Hemant Karkare Hemant Karkare : A Daughter's Memoir Part 19 Jui Karkare- Navare Load More Tags

Comments:

संजीवन

अतिशय थोड्या काळात इतका जीव लावणारी व्यक्ती!आठवणि वाचून डोळे पाणवतात.श.हेमंत करकरे यांना पुढे येणार्या आपत्ति,संकटाची कल्पना असावी कां?

Add Comment