संकटसमयी सगळ्यांच्या पुढे उभा राहून लढणारा धैर्यधर...

माझे पप्पा हेमंत करकरे - भाग 4

तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. सी. सेठी यांच्या हस्ते बेस्ट कॅडेट ट्रॉफी स्वीकारताना हेमंत करकरे. राष्ट्रीय पोलीस अकादमी, हैद्राबाद. 1983.

आज कॉलेजमध्ये जाऊन मार्कलिस्ट आणली. कॉलेजमधून परत येताना खूप पाऊस यायला लागला तर मार्कलिस्ट भिजू नये म्हणून आम्ही एका रणगाड्याचा आश्रय घेतला. गमतीदार वाटत होतं आतमध्ये. याच रणगाड्यावर कधीतरी गोळ्यांचा वर्षाव होत असेल आणि आत कुणीतरी असाच आमच्यासारखा पावसाशी, नव्हे गोळ्यांशी सामना करत असेल.
- हेमंत करकरे, वय - 21,17 जुलै 1975. (रोजनिशीतील नोंद)​


​​​​​​मी बॉस्टनच्या थंड वातावरणात परतले. मनात मात्र सतत आईचेच विचार येत होते. आपण एप्रिलमध्ये मम्मीला आणि भावाला पुन्हा भेटायला जायचं असं मी ठरवलं. माझा डिसेंबरमधला भारतातला मुक्काम अगदी विमनस्क अवस्थेत गेला होता. घरी सतत भेटायला येणाऱ्या लोकांची रीघ, 12 डिसेंबर पप्पांचा वाढदिवस ‘शौर्यदिन’ म्हणून जाहीर झाला. त्या निमित्तानं घडलेले कार्यक्रम. त्या सगळ्यांत डिसेंबरमधले दिवस असेच निघून गेले.

2009च्या उन्हाळ्यात मी पुन्हा भारतात आले. त्याच काळात पप्पांवर पुस्तक लिहिण्याच्या कल्पनेनं मनात मूळ धरलं. पप्पांची जीवनकथा मला उत्तमरीत्या उलगडता यावी यासाठी मी त्यांचं वैयक्तिक लेखन, त्यांनी वर्षानुवर्षं जपून ठेवलेला त्यांचा पत्रव्यवहार हे सगळं पाहिलं. त्यातच मला त्यांच्या कॉलेजच्या दिवसांतल्या दोन डायऱ्या मिळाल्या. डायऱ्यांमधली अगदी तरुण वयातही त्यांची स्वतःच्या ध्येयाविषयी असलेली स्पष्टता पाहून आश्चर्य वाटलं. खरंतर डायरीत त्यांनी लिहून ठेवलं त्याहून जास्तच त्यांनी आयुष्यात साध्य केलं, हे नोंदवताना मला अतिशय आनंद होत आहे. ते आयुष्याचा प्रत्येक दिवस  'शेवटचा दिवस' असल्याप्रमाणे जगले.

पप्पांनी डायरीत एक आठवण लिहिली आहे. 17 जुलै 1975ला पप्पा इंजिनिअरिंगची मार्कलिस्ट घेऊन येताना अचानक धुवाधार पाऊस आला. पप्पांना विशेष प्रावीण्य (डिस्टिंक्शन) गुण मिळाले होते. त्यांच्या आयुष्यातला हा महत्त्वाचा क्षण होता. पाऊस आल्यामुळे त्यांनी वाटेतल्या रणगाड्याचा आश्रय घेतला. तिथं उभं असताना, गोळ्यांचा भडिमार चुकवत या रणगाड्याचा आश्रय घेणाऱ्या लोकांचा विचार त्यांच्या मनात आला होता आणि नियती पाहा... पप्पा आता त्यांच्या कारकिर्दीच्या सर्वोच्च शिखरावर असताना, सरकारी वाहनातून जात असताना मात्र त्यांच्यावर पावसाऐवजी प्राणघातक गोळ्यांचा वर्षाव झाला. या योगायोगानं मी सुन्न झाले. नियती आपल्याला पुढं घडणाऱ्या घटनांचे संकेत देत असते यावर माझा विश्वास आहे. आपण कुठला मार्ग निवडायचा हे आपल्या हातांत असतं. आपण एखादं विशिष्ट कृत्य करायचं ठरवतो, त्यात अज्ञात शक्तीचा हात असतोच याचा अनेकदा अनुभव येतो.

पप्पांच्या खासगी कागदपत्रांत रॉनी मेंडोसा यांनी पप्पांना लिहिलेलं प्रशंसापत्र सापडलं. मेंडोसा हे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त होते. Flight IC-814चं अपहरण करण्यात ज्या गुन्हेगारांनी मदत केली त्यांना पप्पांनी पकडलं होतं. पप्पांच्या या यशाबद्दल पत्रात कौतुक होतं. हे पत्र हाती लागलं त्याचदरम्यान मला पप्पांवरच्या या पुस्तकासाठी त्यांच्या सहकाऱ्यांना भेटून त्यांची व्यावसायिक माहिती गोळा करायची होती. या कामासाठी मी सर्वांत आधी मेंडोसा यांना भेटायचं ठरवलं. तो दिवस हिंदू नववर्षाची सुरुवात असणाऱ्या गुढीपाडवा या सणाचा होता... मात्र या वर्षभरात करकरे कुटुंबात कुठलाही सण साजरा होणार नव्हता. मेनडोन्सा आमच्या घरी आले. आमच्या बैठकीच्या खोलीत मी त्यांचं स्वागत केलं. ही खोली पप्पांनीच सजवली होती.

या खोलीचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं असलेली सरस्वतीची लाकडाची मोठी मूर्ती. सरस्वती ही विद्येची देवता. तसंच एक मधुबनी शैलीतलं छान चित्र भिंतीवर टांगलं होतं. पप्पांच्या एकुलत्या एक बहिणीनं मनीषाआत्यानं हे मधुबनी चित्र रेखाटलं होतं. जेव्हा तिनं पप्पांना ही भेट दिली तेव्हा ते मिश्कीलपणे  म्हणाले, ‘‘तुझी राधा अगदी खात्यापित्या कुटुंबातली दिसतेय.’’ आणखी एक चित्र टांगलेलं होतं. ते एका अफ्रिकन मुलीचं पोट्रेट होतं. या संपूर्ण चित्रासाठी फूलपाखरांचे पंख वापरले होते. मला हे चित्र पाहताना नेहमी अंगावर काटा यायचा. एका चित्रासाठी किती फुलपाखरांचे प्राण गेले असतील या विचारानं माझा थरकाप उडायचा पण पप्पांना कुणीतरी ही भेट दिली होती. ती नाकारणं त्यांच्या सुसंस्कृत स्वभावात बसणारं नव्हतं. या दोन चित्रांबरोबर मम्मीनं एका प्रदर्शनात घेतलेलं एक चित्रही होतं. तसंच एका हौशी कलावंतानं केलेलं माझं पोट्रेटही. माझे गुबगुबीत गाल हातांच्या ओंजळीत घेऊन दोन्ही कोपरे टेबलावर विसावलेली माझी ती मुद्रा.

माझं लक्ष त्या पोट्रेटकडे गेलं. मी चार वर्षांची असेन. साधा पांढरा फ्रॉक, त्यावर काळे ठिपके आणि चेहऱ्यावर मिश्कील हसू असं हे पोट्रेट सोनावणे म्हणून एका हवालदार काकांनी रेखाटलं होतं आणि ते चित्र मम्मीपप्पांना भेट म्हणून दिलं होतं. तसं पाहता, पोलीस अधिकाऱ्याची नोकरी म्हणून त्यांची अनेक वेळा बदली झाली. आमची घरंही तितक्यांदा बदलली. मात्र पप्पांचा कटाक्ष असा की, प्रत्येक बदलीच्या जागी त्यांच्या सर्व महत्त्वाच्या वस्तू जातील याची खबरदारी त्यांनी घेतली. हे पोट्रेटपण त्यांतलंच एक. त्यावर इंग्लीशमध्ये सोनावणे म्हणून काकांची सही होती. 

सर्व पोलिसांचं मिळून आमचं एक कुटुंबच होतं. ते रक्ताचं नातं नव्हतं, सद्भावनेचं होतं. या सोनावणेकाकांचीसुद्धा आमच्या कुटुंबाशी जवळीक होती. त्या काकांनी माझा फोटो काढून त्यावरून मेहनतीनं हे पोट्रेट केलं होतं. ते काही व्यवसायिक चित्रकार नव्हते. पण त्यांनी लहान मुलीच्या चेहऱ्यावरचे निरागस, मिश्कील भाव या चित्रात बरोबर टिपले होते.

माझी मम्मी गेल्यानंतर कुणीतरी म्हटलं, ‘हे पोट्रेट बॉस्टनला घेऊन जा.’ पण मी ते नाही नेलं. मला वाटलं, ते पोट्रेट पाहून माझ्या दुखऱ्या आठवणीच जाग्या होतील. अगदी अपरात्री मुंबईला फ्लाईटनं पोहोचले की माझे पहाडासारखे, तेजस्वी डोळ्यांचे पप्पा फुलांचा गुच्छ घेऊन हसतमुखानं माझं आता स्वागत करणार नाहीत. मी न सांगताही मला आग्रहानं माझ्या आवडीचे पदार्थ करून खाऊ घालणारी मम्मीपण आता नाही. अशा दुःखद आठवणी नको म्हणून पोट्रेट नेलं नाही.

...तर या आमच्या बैठकीच्या खोलीत सौम्य, शांत प्रकाश होता. एक निःशब्द भिंत, गेरूनं रंगवलेली. तिथं बसायला एक आरामशीर सोफा. पुस्तकांचं एक सुबक कपाट. बाजूच्या कोपऱ्यात टेबल आणि त्यावर सरस्वतीची मूर्ती. मेंडोसांचं स्वागत करायला कुणीतरी पुरुषमाणूस असावं म्हणून माझ्याबरोबर माझे सासरे हजर होते.

‘मेंडोसा’ म्हणजे ‘खाकी’तली ख्यातनाम व्यक्ती. त्यांचा फोटो पोलीस आयुक्तांच्या ऑफिसकडे जाणाऱ्या लाकडी जिन्यावर लावलेला होता. मुंबईतल्या पोलीस प्रमुखांमध्ये त्यांचं नाव मोठं आहे पण त्यांच्या वागण्यात जरादेखील मोठेपणा वा मिजास नव्हती. ते आरामात सोफ्यावर बसले आणि मोकळेपणानं त्यांनी पप्पांबद्दल बोलायला सुरुवात केली.

"हेमंत व्हिएन्नाहून परतला तेव्हा त्याला लगेच दहशतवाद विरोधी पथकाचं (एटीएसचं) प्रमुख करायला हवं होतं. त्याच्यासाठी तेच योग्य होतं. तसं झालं असतं तर हेमंतची पार्श्वभूमी आणि त्याचा कामाचा अनुभव बघता 26/11च्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी तो पूर्णपणे तयार झाला असता. जगात इतरत्र गोष्टी कशा हाताळतात हे त्यांनी पाहिलं. संकट काळी काय करायचं हे मुंबई पोलिसांना शिकवलं. कामात जागतिक दर्जा देण्याचा प्रयत्न केला. मात्र या सर्व गोष्टींसाठी काही वेळ जावा लागतो आणि हेमंत काहीच महिने एटीएस प्रमुख होता. हेमंत प्रामाणिक पोलीस अधिकारी होता. प्रत्येक प्रसंगात कर्तव्य बजावताना आवश्यकतेपेक्षा जास्त कष्ट करण्याची त्याची पद्धत होती. राज्यकारभाराविषयी लोकांच्या मनात विश्वास असावा म्हणून तो जागरूक होता. त्यानं कधी कुणाचं दडपण घेतलं नाही. त्याच्या कामात बोट दाखवायला जागा नसायची. त्यामुळे पोलीसदलात त्याच्याबद्दल प्रचंड आदर होता. तो माझ्याहून 16 वर्षांनी लहान तरी आम्ही दोघांनी काही महत्त्वाच्या विषयांवर एकत्र काम केलं. आमचं कधीही एका ठिकाणी पोस्टिंग झालं नाही. त्यानं लोकांना प्रेरणा देण्याचं आणि त्यांच्यात आत्मविश्वास जागवण्याचं काम केलं. तटस्थ भूमिकेतून राजकारण्यांचा मान ठेवला पण त्यांना डोक्यावर बसवून घेतलं नाही." 

ते पुढे म्हणाले, "हेमंतनं सरकारी नियम पाळले; राजकारण्यांच्या लहरी नाही. तो आपलं काम शांतपणे करत होता. आपलं श्रेय आपल्याला योग्य वेळी मिळेल अशी त्याला खातरी होती. तो राजकारण्यांच्या हातातलं प्यादं होण्याचा प्रश्नच नव्हता. त्याच्यासारख्या अधिकाऱ्यांमुळेच मुंबई पोलिसांची मान ताठ आहे. कितीही कठीण प्रसंग येवो, तो धैर्यानं सामोरे जायचा. हेमंतसारखा अधिकारी संकटसमयी सगळ्यांच्या पुढं उभा राहून लढतो तेव्हा इतरांमध्येही धाडस निर्माण होतं. त्याची निष्ठा, समर्पणाची वृत्ती यांमुळेच नेतृत्व त्याच्याकडं चालत आलं. इतरांचं संरक्षण करणं त्याला परमकर्तव्य वाटायचं. तो एक प्रश्न स्वतःला नेहमी विचारायचा 'अमुक एका संकटप्रसंगाचा सामना याहून अधिक कोणत्या चांगल्या पद्धतीनं मी करू शकलो असतो का?'"

मी त्यांना विचारलं, "सरकार एखादं विशिष्ट पद कुणाला द्यायचं हे कसं ठरवतं?"

ते म्हणाले, "नोकरीवर रुजू होण्यापूर्वी सरकार त्या व्यक्तीच्या कामाचं स्वरूप, शैक्षणिक पात्रता अगदी काटेकोरपणे बघते. आता हेमंतच्या व्हिएन्ना पोस्टिंगचंच बघ ना... विदेश मंत्रालयाच्या Permanent Mission to Austria मध्ये त्यानं काम केलं. तिथं त्याला त्याचं गणिताचं ज्ञान आणि इंजिनिअरची डिग्री उपयोगी पडली."

नंतर ते पप्पांच्या व्यावसायिक गुणासंबंधी बोलले. ते म्हणाले,"हेमंत लोकप्रियतेच्या मागे नव्हता. कुणालाही त्याच्याशी सहज संपर्क साधता यायचा. तो जगन्मित्र होता. तो शब्दांचा वापर अगदी मोजूनमापून करायचा. उगीचच मोठमोठे शब्द वापरून भाषण द्यायचा नाही. आम्ही कधी एकत्र काम केलं नाही तरी आमचं छान जमलं. तो वरिष्ठांशीही स्पष्ट बोलायचा. हेमंत सगळ्यांसाठी रोल मॉडेल होता. पोलिसात त्याला विविध स्वरूपाच्या कामांची संधी मिळाली. अमली पदार्थांच्या विरोधात असो किंवा आर्थिक गुन्हाशाखा असो, त्यानंही प्रत्येक वेळी विशेष कामगिरी बजावली. मला तुमच्याकडून काहीही नको असं राजकारण्यांना सांगण्याची हिंमत त्याच्यात होती. त्याच्या प्रामाणिकपणाला ते वचकून असायचे आणि त्याचा आदरही करायचे." पप्पांविषयी ते भरभरून बोलले.

या भेटीनंतर मेंडोसा यांच्याशी माझी पुन्हा एकदा भेट झाली. मी डिसेंबर 2012मध्ये माझ्या नवऱ्यासह आणि छोट्या मुलीसह मुंबई विमानतळावर पोहोचले. आम्हाला घ्यायला माझी आई आणि माझे सासूसासरे आले होते. मेन्डोन्सा मला इथंच भेटले. आम्ही लगेच त्यांच्यापाशी गेलो. त्यांचा मुलगाही परदेशातून येणार होता पण त्याच्या विमानाला उशीर झाल्यानं ते वाट पाहत थांबले होते.  

मला वाटलं, 'माझे पप्पा ज्या अधिकाऱ्याचा अतिशय आदर करायचे त्यांनी आज मी भारतात येताना विमानतळावर हजर असणं हा केवळ योगायोग नाही. माझी मुलगी ईशा प्रथमच भारतात येत होती. माझे पप्पा असते तर ते तिला घ्यायला नक्कीच आले असते. त्यांच्या अनुपस्थितीची उणीव भरून काढण्यासाठीच त्या अज्ञात शक्तीने पप्पांच्या पोलीस खात्यातलीच एक महत्त्वाची व्यक्ती ईशाच्या स्वागतासाठी योजली होती.'

(अनुवाद: शोभा चित्रे)

- जुई करकरे - नवरे
jui.navare@gmail.com


वाचा 'माझे पप्पा हेमंत करकरे' या लेखमालेतील इतर भाग 

मुंबईतले ते भीषण तास...

शेवटचा प्रवास...

हेवा वाटावा असे वीरमरण...

Tags: लेखमाला जुई करकरे जुई करकरे - नवरे माझे पप्पा : हेमंत करकरे मुंबई दहशतवादी हल्ला 26/11 अँटी टेररिझम स्क्वॉड दहशतवाद विरोधी पथक एटीएस हेमंत करकरे भाग 4 Marathi Series Jui Karkare Majhe Pappa : Hemant Karkare My Pappa : Hemant Karkare Hemant Karkare: A Daughter's Memoir Part 4 Jui Karkare- Navare Load More Tags

Comments:

संजीवन

प्रत्येक लेखाच्या सुरुवातीला शहीद हेमंत करकरे यांनी तरूण वयात नोंद केलेले विचार लेखिकेने वाचकांसमोर प्रस्तुत केल्यामुळे महत्वाकांक्षी तरूण पिढीला खुप स्फुर्ती मिळावी. ज्येष्ठ IPS अधिकारी श्री.मेंडेांसा यांचे विश्लेषण थोडक्यात पण खुप सांगून जाते.

Add Comment