बुलेटप्रुफ जॅकेटचा अपशकुन

माझे पप्पा हेमंत करकरे - भाग 5

आपल्याला सुखाची झोप लागावी म्हणून जे स्वतःच्या प्राणांची आहुती देतात, त्यांना त्यांचा हक्क मिळवून देणं ही आपली जबाबदारी ठरते. 
- जुई करकरे-नवरे


पप्पांच्या संदर्भात बुलेटप्रुफ जॅकेटचा उल्लेख मी प्रथम ऐकला तो 26/11च्या हल्ल्याच्या रात्री. माझ्या बहिणीनं मला व्हिएन्नाहून फोन करून हल्ल्याची बातमी दिली आणि आमचं आयुष्य कायमचं बदलून गेलं. पप्पा बुलेटप्रुफ जॅकेट घालून गोळीबाराच्या दिशेनं निघाल्याचं तिनं मला फोनवर सांगितलं. त्यांच्या अंगावर बुलेटप्रुफ जॅकेट आहे हे कळल्यानं मला हायसं वाटेपर्यंत ते किती कुचकामी आहे हेही कळलं आणि थोड्याच वेळात पप्पा गेल्याची बातमी आली. पप्पांच्या अशा तडकाफडकी जाण्यानं आम्ही सुन्न झालो. पप्पांवर अंत्यसंस्कार झाले आणि मग आम्ही त्या बुलेटप्रुफ जॅकेटविषयी चर्चा केली. ते जॅकेट जर चांगल्या दर्जाचं असतं तर त्यांचे प्राण वाचले असते का हा प्रश्न मनात राहून-राहून येत होता. त्या प्रश्नाबरोबर मनात कल्लोळ निर्माण व्हायचा आणि राग यायचा. 

निकृष्ट दर्जाच्या त्या जॅकेटमुळे पप्पांचा मृत्यू ओढवला असण्याची शक्यता आहे, हे कळलं तेव्हा मला प्रचंड संताप आला. आता या घटनेला दहा वर्षं होऊन गेलीत. अगतिकतेतून मी ते सत्य स्वीकारलेलं आहे. पण आमची जखम अजून ताजी होती तेव्हा पप्पांच्या जवळच्या पोलीस अधिकाऱ्यांना मी या बुलेटप्रुफ जॅकेटबद्दल विस्ताराने विचारलं. वर्तमानपत्रातून, टीव्हीवर याविषयी बातम्या येत होत्या. पण सर्वांत धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या भयाण रात्री पप्पांना हॉस्पिटलमध्ये नेण्याआधीच त्यांच्या अंगावरचं ते जॅकेट गायब झालेलं होतं.

मी आईची टीव्हीवरची मुलाखत पाहिली. गृहमंत्री चिदंबरम यांनी ते जॅकेट गहाळ झाल्याबद्दल आईची माफी मागितली असल्याचं तिनं सांगितलं.  पोलिसांना अशा तऱ्हेची निकृष्ट साधनसामग्री पुरवली जाते या विरोधात काही सामाजिक कार्यकर्त्यांनी कोर्टात खटला दाखल केला. मम्मीही या लढ्यात सामील झाली. तिला वाटलं एटीएस प्रमुखाची पत्नी म्हणून ही चळवळ पुढे नेणं ही तिची नैतिक जबाबदारी आहे. या सगळ्याचा तिच्या तब्येतीवर परिणाम व्हायला लागला. झोपेशिवाय जाणाऱ्या रात्री, वेदना, असहायता... सगळंच. आम्हाला तिच्या तब्येतीची काळजी वाटत होती. तिनं हे सगळं सोडून द्यावं म्हणून मी मागे लागले. आमच्या प्रश्नांची उत्तरं सापडणार नव्हती आणि तरीही ती गप्प बसली नाही याचा मला अभिमान आहेच. कुणीतरी असे प्रश्न विचारायला हवेतच. कुणीच आवाज उठवला नाही तर काहीच बदलणार नाही. हे जाणवत असूनही मम्मीला यातून आणखी वेदना, क्लेश होऊ नयेत म्हणून मी तिला यापासून दूर ठेवायला बघत होते.

निष्कृष्ट बुलेटप्रुफ जॅकेटचा पुरावा नष्ट करण्याचे प्रयत्न चालू होते. मम्मी मात्र सत्य शोधण्यासाठी झगडत होती. तिच्या या संघर्षानं माझ्या विचारांना बळ आलं. आता मी जेव्हा-जेव्हा पप्पांचा विचार करते तेव्हा एका वेगळ्या आणि आनंदी दृष्टीकोनातून त्यांच्याकडे बघते. आजोबा म्हणून ते माझ्या मुलींशी कसे खेळले असते... त्यांनी नातींना पार्कमध्ये नेलं असतं, मुव्ही बघायला नेलं असतं, माझ्यासोबत खेळायचे तसे त्यांच्याबरोबर बुद्धीबळ खेळले असते.

देवानं माझ्या आयुष्यातली इतकी मौल्यवान गोष्ट इतक्या क्रूरपणे का हिसकावून घेतली असा विचार आत्ता-आत्तापर्यंत माझ्या मनात सारखा यायचा... पण आता वाटतं, देवाला किंवा दुसऱ्या कुणा व्यक्तीला दोष देणं व्यर्थ आहे. त्यानं वस्तुस्थिती बदलत नाही आणि हीच माझ्या मम्मी पप्पांची शिकवण आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं असतं की, अंतर्मुख व्हा. आपल्या आत डोकावून पाहा. 

आता आयुष्याकडे बघण्याचा माझाही दृष्टीकोन बदलला. मी माझ्या आजूबाजूला  बघते आणि मला जाणवतं की, देवानं मला भरभरून दिलंय. त्याबद्दल मनात कृतज्ञता आहेच. माझं अतिशय सुंदर घर, सुखी संसार, प्रेमळ नवरा आणि दोन अनमोल सानुल्या. एकापाठोपाठ एक असे माझे पप्पा आणि मम्मी या दोघांनाही नेल्याबद्दल देवाला दोष देणं चुकीचंच. मला त्यांचा बराच काळ सहवास मिळाला. कदाचित त्यांच्या वाट्याला एवढंच आयुष्य होतं. 

आता काहीही आणि कुणीही पप्पांना परत आणू शकणार नाही, पण त्यांच्या जागी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना सर्वोत्तम साधनसामग्री पुरवली गेली तर ते अधिक समर्थपणे आपलं आणि स्वतःचं संरक्षण करू शकतील. मुंबईचे पोलीस अधिकारी ब्रिटिशांच्या काळातल्या जुन्यापुराण्या बंदुका घेऊन लढतात. ते कसे काय एके-47 घेऊन हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांशी दोन हात करणार? देव करो तसं न होवो, पण परत जर असा हल्ला झाला तर आपल्याकडे चांगल्या दर्जाची साधनसामग्री आहे का... अशी शंका माझ्या मनात येते. या अधिकाऱ्यांना आपण खातरीपूर्वक सांगू शकतो का की, जेव्हा नागरिकांच्या रक्षणासाठी ते उभे राहतील तेव्हा त्यांच्याकडे उत्तम साधनं असतील? 


इथे ओशाळला मृत्यू!

वादळासारखे आले नि नरसंहार करत गेले 
त्यात मारले गेले, ते माझे पप्पा होते... 
माझ्या पप्पांवर त्यांनी गोळ्या झाडल्या 
पण त्यांच्या आदर्शांना ते गोळ्या नाही घालू शकले...

ते पप्पांना मारून गेले 
पण त्यांच्या मूल्यांना ते नाही मारू शकले.... 
पप्पा रस्त्यात जखमी होऊन पडले
पण त्यांच्या स्वाभिमानाला ते धक्काही नाही लावू शकले...

लाकडातून सुबक कलाकृती कोरणाऱ्या 
कलाकाराला त्यांनी मारलं 
पण ते ती कला नाही मारू शकले...
ती कला आजही पप्पांच्या घरी, आमच्या आप्तेष्टांच्या घरी विराजमान आहे...

एका आदर्श पोलीस अधिकाऱ्यानं शेवटचा श्वास घेतला 
पण पप्पांची मित्रांमध्ये, सहकाऱ्यांमध्ये गुरू म्हणून, 
अतुलनीय म्हणून ठसलेली प्रतिमा ते पुसू नाही शकले...

त्यांनी एक सामाजिक कार्यकर्ता मारला 
पण ज्यांनी तरुणांमध्ये व्यसनमुक्तीचं काम केलं 
त्यावर बोळा नाही फिरवू शकले.... 

हपापून वाचणाऱ्याचे डोळे त्यांनी कायमचे झाकून टाकले 
पण ते पुस्तकांचं वेड आम्हा मुलांच्या धमन्यांतून वाहतंय. 

अंत्यसंस्कारातून पतीच्या देहाची राख झाली असली 
तरीही सहजीवनातल्या सुखद आठवणी 
माझ्या आईच्या मनात नित्य फुलत राहतील...

पप्पांच्या बहीणभावांनी त्यांचा मोठा भाऊ गमावला 
तरीही डोक्यावर भावाचा मायेचा हात त्यांना जाणवत राहील... 

आता उद्याचा दिवस जणू उगवणारच नाही,
आजचा दिवस शेवटचा असे जगले माझे पप्पा दररोजच... 
आणि म्हणून जेव्हा तो उद्या खरंच आला नाही
तेव्हा त्यांना त्याचं सुखदुःखही वाटलं नसेल 
त्यांनी त्यांचं आयुष्य पूर्णपणे उपभोगलं 
आता या जमिनीवर त्यांचं पाऊल उमटणार नाही 

पण मला विश्वास आहे, 
पृथ्वीवरला आनंददायी प्रवास संपवून 
पप्पा आता आणखी चांगल्या ठिकाणी पोहोचले असणार.

आणि त्या खुन्यांचं काय?
ते बेवारस म्हणून मेले, 
इतक्या निरपराध लोकांना 
मारण्याचं पाप त्यांनी डोक्यावर घेतलं. 

हे दिशाभूल झालेले तरुण, 
द्वेषाच्या वेदीवर बळीच्या बकऱ्यासारखे मारले गेले...
वादळासारखे आले नि नरसंहार करत गेले 
त्यात मारले गेले, ते माझे पप्पा होते... 

पण मला विश्वास आहे, 
पृथ्वीवरला आनंददायी प्रवास संपवून 
पप्पा आता आणखी चांगल्या ठिकाणी पोहोचले असणार.

(अनुवाद: शोभा चित्रे)

- जुई करकरे - नवरे
jui.navare@gmail.com

Tags: लेखमाला जुई करकरे जुई करकरे - नवरे माझे पप्पा : हेमंत करकरे मुंबई दहशतवादी हल्ला 26/11 अँटी टेररिझम स्क्वॉड दहशतवाद विरोधी पथक एटीएस हेमंत करकरे भाग 5 Marathi Series Jui Karkare Majhe Pappa : Hemant Karkare My Pappa : Hemant Karkare Hemant Karkare: A Daughter's Memoir Part 5 Jui Karkare- Navare Load More Tags

Comments:

Sunil

विनम्र अभिवादन, जुई. हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ न जावो.

लतिका

मर्मस्पर्शी!

विष्णू दाते

मन हेलावून टाकणारं लेखन! खंत एकच आहे की अशा निधड्या छातीच्या विराला, केवळ निषकृष्ठ साधनांमुळे प्राणाचे मोल द्यावे लागले?....

संजीवन

कवितेतून लेखीका आणि अनुवादीका दोघांनीही जणुकाही एका कर्तव्यदक्ष अधिकारीव्यक्तीच्या आयुष्याचे सारच नेमके वाचकांसमोर मांडले आहे.

Arvind Gangadhar Navare

As usual nice to the point contents keep it up

Add Comment