वर्गमित्रानं आणि स्वयंपाक्यानं जागवलेल्या आठवणी 

माझे पप्पा हेमंत करकरे - भाग 18

फोटो सौजन्य: STRINGER INDIA / REUTERS

सगळ्यांवर प्रेम करणारा
हेमंत करकरे यांचे इंजिनिअरिंग कॉलेजमधले वर्गमित्र सुरेश जुनगारे यांनी जागवलेल्या आठवणी...

1972 मध्ये नागपूरमधल्या विश्वेश्वर रिजनल कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला असताना हेमंत माझा वर्गमित्र होता. तो स्कॉलर होता. त्यानं अमरावतीच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून पहिलं वर्ष पूर्ण केलं आणि मग इकडे आला. कॉलेजमध्ये असताना आमची भेट क्वचितच व्हायची कारण तो मेकॅनिकल इंजिनिअरिंगला तर मी सिव्हिलला होतो... 

मात्र आम्ही 1974 मध्ये केलेली ट्रिप माझ्या चांगली स्मरणात आहे. आम्ही नागपूरपासून सुमारे 35 किलोमीटरवर असलेल्या ‘खापा’ या ठिकाणी सायकलनं पिकनिकला गेलो होतो. सकाळी जाताना आम्ही सर्व अतिशय उत्साहात होतो. परत येताना मात्र इतकी सत्तर किलोमीटर सायकल चालवण्यानं पार दमून गेलो होतो.

आम्ही परत भेटलो ते 1996मध्ये. आमच्या 1975च्या बॅचचं री-युनिअन होतं. त्या वेळेपर्यंत तो सिनिअर आयपीएस अधिकारी झाला होता. रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि वागण्यातली विनम्रता दिसत होती. त्या कार्यक्रमात हेमंतनं सूत्रसंचालनसुद्धा  केलं. मला अजूनही त्याचं तेव्हाचं भाषण आठवतंय. तो म्हणाला होता की, शिक्षक विद्यार्थिरूपी दगडातून शिल्पकाराच्या कौशल्यानं मूर्ती घडवतात. त्यानं मायकेल एन्जेलोचा दाखला दिला. 

दगडामध्ये स्वतःचं असं सौंदर्य लपलेलं असतं असं तो म्हणायचा. आयुष्य उत्साहानं, जोमानं जगा; खेळ आणि अभ्यास यांव्यतिरिक्त इतर गोष्टींचाही आनंद घ्या; शिक्षण महत्त्वाचं आहेच पण मुलांनी त्याचं दडपण न घेता आयुष्याचा आनंद घेतला पाहिजे असं त्यानं मुलांना तळमळीनं सांगितलं. 

चंद्रपूरला तो नक्षलवाद्यांच्या ‘हिट लिस्ट’वर होता. आणि तरीही याच्या मनात त्यांच्याविषयी द्वेष नव्हता. या लढ्यात तो विवेकानं वागला. त्यानं शांततेच्या आणि अहिंसावादी मार्गानं त्या प्रसंगांना तोंड दिलं. मला त्याच्या कलात्मकतेचंही  कौतुक होतं. जंगलात मिळणाऱ्या लाकडाच्या तुकड्यांतून त्यानं सुंदर काष्ठशिल्पं तयार केली.

2007 मध्ये ॲन्टीकरप्शन ब्युरोचा प्रमुख अधिकारी म्हणून हेमंत नागपूरला आला होता. तो दिवसभर कामात व्यग्र होता पण रात्री आम्ही काही मित्र जेवणासाठी भेटलो. तो आम्हाला त्याच्या व्हिएन्नाच्या पोस्टिंगबद्दल सांगत होता. ऑस्ट्रियाविषयीसुद्धा बोलत होता. 

याच वेळी त्यानं आमच्या ‘ज्युनिपर्स’ बिल्डिंगला भेट दिली. बांधकाम अजून पूर्ण झालं नव्हतं तरी त्यानं अगदी वरपर्यंत जाऊन काम पाहिलं. हेमंत गेल्यावर इमारत पूर्ण झाली. आता ती गजबजलेली इमारत ज्युनिपर्स हेमंत या नावानं प्रसिद्ध आहे. तिला नावीन्यपूर्ण रचनेचा पुरस्कार मिळाला. काही वर्षांपूर्वी कवितावहिनींनीही या इमारतीला भेट दिली.

हेमंत एकदा आमच्या शेतात आला होता. खेड्यातलं जीवन, संस्कृती यांत त्याला रस होता. देशाचा एकांगी विकास होतोय, त्यातून गरिबांवर अन्याय होतोय याची त्याला खंत होती. तरुणांना मार्गदर्शन करणारं व्याख्यान द्यायलासुद्धा तो तयार झाला होता पण ते काही झालं नाही. 
त्याच्या वीर मरणाच्या धक्क्यातून मी खूप दिवस सावरू शकलो नाही.


तळागाळातल्या लोकांचा कैवारी
हेमंत करकरे यांचेऑस्ट्रियामधले स्वयंपाकी राजू पाटील यांनी जागवलेल्या आठवणी... 

सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यात सालशिरांबे गावातल्या एका गरीब कुटुंबातला माझा जन्म. जेमतेम एक एकर जमिनीच्या उत्पन्नावर आमचं कुटुंब जगत होतं. कुटुंबात वडील, तीन भावंडं, काका, त्यांची मुलं. एवढी गरिबी असूनही मी दहावीपर्यंतचं शिक्षण पुरं केलं. घरात आर्थिक तंगी आणि गावात नोकरीची वानवा. मग मी 1997 मध्ये मुंबईला आलो. वडील धारावीतल्या एका बारमध्ये काम करत होते. ओळखीच्या कुणा माणसाकडे राहत होते. मला प्रिंटिंग प्रेसमध्ये हरकाम्या म्हणून महिना 2000 रुपयांवर नोकरी मिळाली. मी घरी पैसे पाठवायला सुरुवात केली. 

आपली आर्थिक स्थिती सुधारायची असा माझा निश्चय होता आणि अचानक तशी संधी चालून आली. आमच्या शेजारी राहणाऱ्या कांबळे कॉन्स्टेबलनं माझ्यासाठी नोकरीची वर्दी आणली. त्याच्या साहेबांची मोठ्या हुद्द्यावर ऑस्ट्रियात नेमणूक झाली होती आणि त्यांना तिथे स्वयंपाक्याची जरूर होती. त्यासाठी राजूचं नाव सुचवू का असं त्यांनी आमच्या कुटुंबाला विचारलं. 

माझे वडील तर पार गोंधळून गेले. त्यांना मुंबईपलीकडचं काही माहीत नव्हतं किंवा हे साहेब ॲडिशनल कमिशनर ऑफ पोलीस आहेत म्हणजे काय हेही आम्हाला कळत नव्हतं. कांबळेंनी सुचवलं की, आम्ही साहेबांना भेटून मग निर्णय घ्यावा.

दुसऱ्या दिवशी त्यांनी आम्हाला साहेबांच्या नेपियन सी रोडवरच्या घरी नेलं. आम्ही तिथे आठ वाजता पोहोचलो पण साहेब फिरायला गेले होते. मग माझी बाईसाहेबांशी ओळख करून देण्यात आली. त्यांनी मला काही जुजबी प्रश्न विचारले म्हणजे स्वयंपाक करता येतो का इथपासून. त्यांनी हेही विचारलं की, परदेशात जायला मी तयार आहे का? तिथे मला तीन वर्षं राहावं लागेल हेही त्यांनी सांगितलं. साहेब परत आल्यावर माझ्याशी बोलतील असं म्हणाल्या. 

मला माझं कुटुंब वर आणायचं होतं. करकरे साहेबांकडून आलेली ही नोकरीची संधी म्हणजे मला देवाची कृपाच वाटली. मी मनात स्वप्न पाहायला लागलो. तेवढ्यात साहेब आलेच. कणखर, प्रभावी व्यक्तिमत्त्व, मृदू आवाजात बोलणं आणि त्यांच्या चेहऱ्यावर असलेलं तेज. मी एकदम भारावून गेलो. 

बाईसाहेबांनी विचारलेले प्रश्न त्यांनी मला पुन्हा विचारले. मी तीन वर्षं तिकडे त्यांच्यासोबत राहिलो तर माझ्याकडे खूप पैसे जमा होतील असं त्यांनी मला सांगितलं. मला जेव्हा त्यांनी रक्कम सांगितली तेव्हा माझा विश्वासच बसेना. मी स्वप्न पाहायला लागलो. खरंच एवढी मोठी रक्कम मिळेल मला? मला बहिणीच्या लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडायचंय. घराची तातडीनं डागडुजी करणं गरजेचं आहे. भावालाही स्वतःच्या पायांवर उभं राहायला मदत करायची आहे. माझ्या डोळ्यांसमोर येणाऱ्या या जबाबदाऱ्यांमुळे मी साहेबांना नम्रपणे होकार दिला. 

साहेबांनी सांगितलं ते थोड्याच दिवसांत ऑस्ट्रियाला जातील पण मी मात्र लगेच दुसऱ्या दिवशीपासून दररोज त्यांच्या घरी जायला लागावं म्हणजे साहेबांना लागतो तसा स्वयंपाक बाईसाहेब मला शिकवतील. मी कामावर जायला सुरुवात केली खरी पण ठरलेल्या वेळी बरोबर आठ वाजता तिथे पोहोचणं जमेना. मला नेहमी उशीर व्हायला लागला. मी पोहोचेपर्यंत जेवण तयार व्हायचं आणि बाईसाहेब कामाला निघून गेलेल्या असायच्या.

दरम्यान हैदराबादहून एक चांगला स्वयंपाकी आणला. त्याचा व्हिसा, पासपोर्ट, थंडीचे कपडे सगळं तयार होतं. माझ्याऐवजी त्यानं जायचं नक्की झालं. मला काय करावं कळेना. त्याचा ऑस्ट्रियाला जायचा दिवस आला आणि एकदम तो साहेबांचे पाय धरून रडायला लागला. तो म्हणाला, ‘‘साहेब नुकतंच माझं लग्न झालंय. आत्ता मला कळलं की, माझी बायको गरोदर आहे. कृपा करून मला तुमच्याबरोबर नेऊ नका.’’ साहेब संतापले खरे पण त्या मुलाची मनःस्थिती पाहून त्यांना वाईट वाटलं. म्हणाले, ‘‘तुझी इच्छा नसेल तर तू येऊ नकोस.’’

साहेब ऑस्ट्रियाला ठरल्याप्रमाणे गेले. तिथे गेल्यावर ते बाईसाहेबांना नियमित फोन करायचे. काही दिवसांनी त्यांनी बाईसाहेबांना सांगितलं, ‘‘मला वाटतं तू राजूला बोलवावं. तो तरुण आणि प्रामाणिक आहे. या कामासाठी योग्य आहे.’’ हे कळताच मी ठरवलं या वेळी परिस्थितीवर मात करायची. मी बरोबर आठ वाजता कामाला हजर होऊ लागलो. बाईसाहेब जे-जे शिकवतील ते मन लावून शिकायला लागलो. दोन महिन्यांनंतर साहेबांनी मला दिल्लीला त्यांचे मित्र लांबा साहेबांकडे पाठवलं. इथे मी पंजाबी डिशेस्‌ शिकलो.

गोष्टी इतक्या भराभर घडल्या की, माझा विश्वास बसेना. करकरे साहेब मला देवासारखे वाटायला लागले. थोड्याच दिवसांत ऑस्ट्रिया प्रवासासाठीची माझी कागदपत्रं तयार झाली. मी कधी कल्पनाही केली नव्हती की, एक दिवस पासपोर्ट घेऊन मी परदेशात जाईन. 27 फेब्रुवारी 2001 या दिवशी आयुष्यात प्रथमच मी दिल्ली विमानतळावर ऑस्ट्रियाला जाण्याच्या विमानात बसलो. त्यापूर्वी मागे पांढरी रेषा सोडत उडणारी विमानं मी आमच्या खेड्यात पाहिली होती. लांबा साहेब माझ्याबरोबर होते. आमची फ्लाईट पॅरिसला गेली. तिथून आम्ही व्हिएन्ना आंतरदेशीय विमानतळावर रात्री अकरा वाजता पोहोचलो. साहेबांची गाडी आम्हाला घ्यायला आली. या वेळेपर्यंत मी पुरा भेदरलो होतो. तो प्रवास लवकर संपला. आम्ही थोड्याच वेळात घरी पोहोचलो. मी ते घर बघूनच आश्चर्यचकित झालो. ते नुसतं घर नव्हतं, राजमहाल होता. जगप्रसिद्ध स्कोर्नबर्न पॅलेसचा एक भाग होता. तिथल्या सुंदर लॉनकडे मी बघतच राहिलो. साहेबांनी माझ्या प्रवासाची चौकशी केली. फ्रिजमधलं अन्न गरम करून खायला सांगितलं. ते म्हणाले, 'सकाळी बोलू या.'

माझं काम दुसऱ्या दिवसापासून सुरू झालं. साहेब रोज सकाळी नऊ वाजता जायचे. त्याआधी मी त्यांना चहानाश्ता द्यायचो... बहुतेक पोहे, उपमा असं काही. त्यांनी कधीही माझ्या स्वयंपाकाला नावं ठेवली नाहीत. ते माझ्या तब्येतीची चौकशी करायचे. ते निघून गेल्यावर मी घराची साफसफाई करायचो. संध्याकाळी ते बरेचदा बाहेर जेवायचे. त्यांनी मला माझ्या गतीनं काम करण्याचं स्वातंत्र्य दिलं होतं. पण ते कामाच्या, स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक असायचे. त्यांना कुठेही धुळीचा कणही चालायचा नाही. घर अतिशय नीटनेटकं ठेवायला लागायचं. एखाद्या शोभेच्या वस्तूची जागा बदलली तरी ते त्यांच्या पटकन लक्षात यायचं. 

कामं कशी करायची, कपडे कसे धुवायचे ते मला साहेबांनी शिकवलं. मला कसलाही अनुभव नव्हता त्यामुळे हातून खूप चुका व्हायच्या. मी जेव्हा त्यांचे चांगले कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन वापरायचो तेव्हा ते रागवायचे, चिडायचे पण त्यांनी कधी अपशब्द उच्चारले नाहीत. ते म्हणायचे, ‘‘अरे मूर्ख माणसा, हे काय केलंस? मी काय म्हणतो तुला कळत नाही का? तुला जर मशीनमध्ये घातलं तर कसं वाटेल?’’ 

मला एकदम भीती वाटायची पण माहीत होतं की, साहेबांचा राग फार चटकन जातो. ते शांत झाल्यावर मला बोलावून घ्यायचे. समजावून सांगायचे, ‘‘तुझ्यावर ओरडायला मला आवडत नाही पण तू चुकाच अशा करतोस की, मला राग येतो.’’ त्या वेळेला मला माझ्या चुकांची जाणीव झालेली असायची. त्या परत घडणार नाहीत याची खबरदारी मी घ्यायचो.

मी साहेबांकडून सर्व काही शिकलो. डिशवॉशर कसा वापरायचा... ओव्हन, मायक्रोवेव्ह, गॅस हिटर, इस्त्री, व्हॅक्युम क्लीनर आणि कितीतरी... शिवाय वेगवेगळ्या शिष्टमंडळांतून आलेली मंडळी नेहमी घरी यायची. या लोकांशी कसं वागायचं, बोलायचं; त्यांना चहा, कॉफी, खाण्याचे पदार्थ कसे द्यायचे हेही मला साहेबांनी शिकवलं. 

साहेबांनी घर पूर्णपणे भारतीय पद्धतीनं सजवलं होतं. त्यांनी लाकडाच्या केलेल्या कलाकृती, राजस्थानी पपेट्‌स, झुंबर. साहेबांच्याकडे भारतीय संगीताचा मोठा खजिना होता. ते नियमितपणे परदेशी लोकांना जेवायला बोलवायचे. मला भारतीय पद्धतीचं जेवण करायला सांगायचे. 

आलेल्या प्रत्येकाशी ते माझी ओळख करून द्यायचे. काही वेळा एखाद्या व्यक्तीशी जास्त न बोलण्याबद्दल बजवायचे किंवा एखाद्याशी संपर्क वाढवायला सांगायचे. त्यांच्यातल्या कुणी काही विचारलं तर कुठलीही माहिती द्यायची नाही ही सूचना त्यांनी मला देऊन ठेवली होती. नंतर मला कळलं की, साहेबांच्या कामाचं स्वरूप वेगळं असल्यानं अशी गुप्तता राखणं जरूर आहे. 

साहेबांकडे भारतातून खूप पाहुणे यायचे. मुंबई-दिल्लीहून अधिकारी यायचे... कधी मित्र तर कधी नातेवाईक. साहेब मला या सगळ्यांबरोबर गाईड म्हणून पाठवायचे कारण तोपर्यंत मला बस-ट्रामचे रस्ते माहीत झाले होते.

एकदा साहेबांचं कुटुंब इथे राहायला आलं. त्यांनी मला घरच्यासारखं वागवलं. मला वेगळी वागणूक दिली नाही. रक्षाबंधनाला त्यांच्या धाकट्या मुलीनं माझ्या हातावर राखी बांधली. त्यानंतर थोड्या दिवसांनी ही मंडळी भारतात परतली. मग लांबलचक कंटाळवाणा हिवाळा आला. मला घरच्यांची खूप आठवणी यायची. मग मी तासन्‌तास फोनवर बोलायचो. जेव्हा साहेबांना हे कळलं तेव्हा असे पैसे वाया घालवू नकोस म्हणून त्यांनी बजावलं. ते नियमितपणे माझ्या कुटुंबाला पैसे पाठवायचे. मला घरातली कामं केल्यानंतर बराचसा रिकामा वेळ असायचा. फावल्या वेळात मी वर्तमानपत्राचं वाटप करावं असं साहेबांनी सुचवलं. ही तीन तासांची नोकरी होती. त्यात मला 20,000 रुपये मिळायचे.

याशिवाय दुसऱ्या कोणत्या भारतीय कुटुंबात कधी डिनर पार्टी असली तर ते मला कामाला बोलवायचे. साहेबांनी मला यासाठी परवानगी दिली. ही मंडळी मला त्या कामाचे पैसे द्यायची... त्यामुळे माझ्या महिन्याच्या उत्पन्नात वाढ व्हायची. मी वायफळ खर्च करत नाही ना याकडे साहेब बारकाईनं लक्ष ठेवायचे... त्यामुळे मी पुरेसे पैसे साठवू शकलो. त्यातून बहिणीच्या लग्नासाठी घेतलेलं कर्ज फिटलं. माझ्या वडलांचं ऑपरेशन, घरदुरुस्ती हे सर्व झालं. साहेबांनी पूर्वी कबूल केल्यापेक्षा ही रक्कम दुप्पट झाली.

साहेबांना माझ्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मी बारावीच्या परीक्षेला बसावं आणि ड्रायव्हिंग शिकावं हे त्यांनी सुचवलं. ‘‘मी तुला मुंबईला पोलीस फोर्समध्ये भरती करून घेईन किंवा माझ्या ऑफिसमध्ये तुझ्यासाठी काही काम शोधीन.’’ ते म्हणायचे. यापूर्वी इतक्या चांगल्या पद्धतीनं कुणीही मला आयुष्यात मार्गदर्शन केलं नव्हतं.

साहेबांचा सुरुवातीला ठरलेला तीन वर्षांचा ऑस्ट्रियामधला कार्यकाळ सारखा वाढत चालला होता. मला भारतात परत यावंसं वाटायचं. साहेब मला जाऊ नको म्हणून समजावून सांगायचे पण मी परत आलो. परतल्यावर माझी चूक माझ्या लक्षात आली. मी साहेबांना फोन करून मला व्हिएन्नाला परत यायचंय म्हणायला लागलो. साहेब कबूल झाले. वर्षभर भारतात राहून मी परतलो. साहेबांकडे काम केलं. 

2006मध्ये ते भारतात परतले. मी नवीन साहेबांकडे कामाला राहिलो. मला वागणुकीतला फरक जाणवत होता. मी उदास उदास राहायचो. साहेबांना फोन केला तर म्हणायचे की कामाकडे लक्ष दे. जास्तीत जास्त चांगलं काम कर.

साहेबांनी जुईताईंच्या लग्नासाठी 2007च्या मेमध्ये मला भारतात बोलवलं होतं पण मी येऊ शकलो नाही. 2008च्या जुलैमध्ये साहेबांचा फोन आला. ते व्हिएन्नाला येत असल्याचं, मला भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या पाच दिवसांच्या व्हिएन्नाच्या वास्तव्यात मी रोज त्यांना भेटायचो. साहेबांची धाकटी मुलगी व्हिएन्नाला हॉस्टेलवर होती. तिला भेटलो. तिच्याशी संपर्क ठेवायला त्यांनी सांगितलं. ते विमानतळावर जायला निघाले तेव्हा मी त्यांचे पाय धरले. त्यांनी ताबडतोब मला जवळ घेऊन काळजी घेण्यास सांगितलं.

त्यानंतर मी फोनवरून साहेबांशी संपर्क ठेवत होतो. ते कामात खूप गढलेले असायचे पण तरी ते वेळ काढून माझ्याशी फोनवर बोलायचे. मी ज्या अधिकारी लोकांमध्ये राहत होतो त्यांच्या बोलण्यातून साहेबांना मारण्याच्या धमक्या येत आहेत हे कळलं. मी फार काळजीत होतो. 

दिवस पुढे सरकत हाते आणि एकदम 26/11ची काळरात्र आली. जोशी साहेबांच्या मुलीनं फोन करून रात्री आठ-नऊ वाजता बातमी दिली. ही भयंकर घटना कळल्यावर जोशी साहेबांनी टीव्ही लावला. बीबीसीच्या बातमीत एटीएस प्रमुख हेमंत करकरे आतंकवाद्यांच्या हल्ल्यात मारले गेल्याचं कळलं. माझं मन सुन्न झालं.

मी जोरजोरानं हुंदके देऊन रडायला लागलो. जोशी साहेबांनी माझी समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थच. माझं सगळं जगच कोलमडलं. मी वडलांना फोन करून ही बातमी दिली. त्यांना धक्काच बसला. सगळीकडे अंधार पसरला. माझं कुठेच लक्ष लागेना. सगळ्यांचा रक्षणकर्ताच हरवला. मी शिरीषकाकांना फोन केला. त्यांनीही माझी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मी विचारलं, ‘देवानं हे कसं घडू दिलं?’ त्यांच्याकडे या प्रश्नाला उत्तर नव्हतं. त्यांच्याही दुःखाला पारावार उरला नव्हता. मला भारतात यायचं होतं पण सुट्टी मिळाली नाही. 

साहेबांसोबत ऊठबस असणाऱ्यांनी श्रद्धांजली वाहिली खरी पण त्यांचं जीवन पूर्ववत चालू राहिलं. या स्वार्थी जगाला पाहून मला दुःख वाटलं. मला स्पष्टपणे आठवतंय, एक मुलगा बेकायदेशीरपणे व्हिएन्नामध्ये घुसत असताना मारला गेला होता. त्याचं प्रेत पाहून साहेब कितीतरी कष्टी झाले होते. त्यांनी भरपूर त्रास सोसून ते प्रेत भारतात त्याच्या पालकांना पाठवलं.

थोड्याच दिवसांत जोशी साहेबांची बदली झाली. मला एप्रिल 2009मध्ये भारतात परतावं लागलं. मी लगेच साहेबांच्या घरी गेलो. त्यांचा फोटो आणि अशोकचक्र पाहून माझे अश्रू अनावर झाले. आजसुद्धा मी साहेबांचा फोटो बघतो तेव्हा डोळे भरून येतात. अंगावर काटा येतो. मला वाटतं की, साहेब आपल्याभोवती कुठेतरी आहेत. तळागाळातल्या लोकांना जगात चांगलं वागवलं जावं यासाठी ते सदैव प्रयत्नशील असायचे. 

मी इतिहासातल्या आदरणीय, मोठ्या व्यक्तींबद्दल वाचलं होतं पण माझ्या दृष्टीनं करकरे साहेब त्यापेक्षा मोठे. ते देवासमानच. मी साहेबांच्याऐवजी त्या गोळ्या स्वतःवर घ्यायला तयार होतो कारण साहेब कितीतरी लोकांचे रक्षणकर्ते होते, कैवारी होते.

(अनुवाद: शोभा चित्रे)

- जुई करकरे - नवरे
jui.navare@gmail.com


वाचा 'माझे पप्पा हेमंत करकरे' या लेखमालेतील इतर भाग 

मुंबईतले ते भीषण तास...

शेवटचा प्रवास...

हेवा वाटावा असे वीरमरण...

संकटसमयी सगळ्यांच्या पुढे उभा राहून लढणारा धैर्यधर...

बुलेटप्रुफ जॅकेटचा अपशकुन

हौतात्म्यामागची आजन्म तपश्चर्या

कुटुंबवत्सल माणूस

चंद्रपूरचं आव्हान

चंद्रपूरमधील आठवणी सांगणारा काही पत्रव्यवहार

चंद्रपूरमधील बालपणीच्या आठवणी

निर्जीव लाकडामध्ये प्राण फुंकणारे पप्पा...

सहकाऱ्यांनी जागवलेल्या आठवणी - पूर्वार्ध 

सहकाऱ्यांनी जागवलेल्या आठवणी - उत्तरार्ध

प्रियजनांनी जागवलेल्या आठवणी...

परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी आणि भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष यांनी जागवलेल्या आठवणी...

बहिणीनं आणि मित्रानं जागवलेल्या आठवणी 

Tags: जुई करकरे हेमंत करकरे माझे पप्पा - हेमंत करकरे भाग 18 Marathi Jui Karkare Hemant Karkare Part 18 Load More Tags

Comments:

संजीवन

लेखिकेनी राजु पाटीलच्या आठवणि मांडून श.हेमंत करकरेंनी साधारणपणे दुर्लक्षीत जनतेला पण समाजात मानाचे स्थान कसे देतां येऊ शकते यांचे एक ऊदाहरणच पुढे आणले आहे.आपण त्याला स्वयंपाकी किंवा cook म्हणू पण हल्लीच्या भाषेत तो Chefच नाही कां!

Add Comment