26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई शहरावर मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये त्यावेळचे दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएसचे) प्रमुख हेमंत करकरे शहीद झाले. त्यांची कन्या जुई करकरे - नवरे यांनी वडलांविषयी लिहिलेल्या आठवणी दोन वर्षांपूर्वी 'Hemant Karkare: A Daughter's Memoir' या पुस्तकाच्या रूपाने The Write Place कडून प्रकाशित झाल्या. शोभा चित्रे यांनी मराठीत अनुवादित केलेल्या या आठवणी 18 सप्टेंबर ते 26 नोव्हेंबर 2021 या काळात प्रत्येक शनिवारी आणि रविवारी कर्तव्य साधनावरून प्रसिद्ध करत आहोत. त्याचा हा पहिला भाग.
- संपादक
माणूस स्वतःच स्वतःला अज्ञानातून बाहेर काढू शकतो. आपण एक बुद्धिमान, श्रेष्ठ आणि कुशल प्राणी असल्याची जाणीव त्याला होऊ शकते. तो स्वतंत्र होऊ शकतो, उडायला शिकू शकतो.
- रिचर्ड बाक (जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल)
26 नोव्हेंबर 2008, बॉस्टन. नेहमीसारखीच ती एक सकाळ. माझं सुरळीत चाललेलं आयुष्य लवकरच एका भयानक आघातानं आतून बाहेरून उद्ध्वस्त होणार आहे आणि त्यातून बाहेर पडणंही मला कठीण जाणार आहे अशी पुसटशी शंकाही तेव्हा मनात नव्हती. रोजच्यासारखाच त्याही दिवशी सकाळी आईचा फोन आला. तिचा आवाज थरथरत होता. मला तिची अस्वस्थता जाणवली. पण तरीही पुढे काहीतरी भयंकर घटना घडणार आहे याची चाहूल मला काही त्यातून लागली नाही. क्षणभर काहीतरी वाटून गेलं खरं, पण दूर राहणाऱ्या आपल्या मुलीची काळजी करणाऱ्या आईचंच हे लक्षण असं म्हणत मी स्वतःची समजूत घातली! फोनवर इकडचं तिकडचं बोलणं झालं. खास असं काही नाही म्हणजे माझं खाणं झालं का, दिवसाचा बेत काय आहे हे आणि असलंच काहीतरी. कुणीतरी माझ्या आईवडलांचं घर (दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) प्रमुख यांचं घर) उडवण्याची धमकी दिलेली आहे, हे मला तेव्हा माहीत नव्हतं. आईनं मला ते कळूही दिलं नाही. अर्थात आपला नवरा संकटात आहे हे एक पत्नी म्हणून तिच्या अंतर्मनाला जाणवत असणारच.
पुढल्या काही तासांतच सगळ्या मुंबई शहरावर आतंकवादी क्रूरपणे हल्ला करून, अमानुष नरसंहार घडवून आणणार आहेत आणि त्यामध्ये आमचं कधीही भरून न येणारं नुकसान होणार आहे अशी कल्पनाही माझ्या डोक्यात तेव्हा येणं शक्य नव्हतं.
माझा नवरा देवदत्त रोजच्यासारखा ऑफिसला गेला. त्याची मावसबहीण शिकागोहून तेव्हा आमच्याकडे आली होती. बॉस्टनमध्ये फेरफटका मारण्यासाठी तिला घेऊन मी बाहेर पडले. आमचं मस्त भटकणं चालू होतं. आम्ही युद्धकाळातली जुनी बोट ‘USS Constitution’ बघायला गेलो. बाहेरून लाकडाची मांडणी असलेली ही अमेरिकन नेव्हीची बोट होती. तीन डोलकाठ्या असलेलं हे लढाऊ गलबत. मन भरेपर्यंत आम्ही दोघी फोटो काढत भटकलो. मग घरी परतायचं ठरवलं.
आता मागे वळून पाहताना तो प्रसंग आठवला तरी खूप त्रास होतो. मी तिकडे बॉस्टनच्या बंदरावर ऐतिहासिक बोट पाहत हिंडत होते. त्याच वेळी माझ्या मुंबई बंदरावर एक भीषण नाट्य घडत होतं. पाकिस्तानी अतिरेक्यांनी एका बोटीचं अपहरण केलं. त्या बोटीतून ते मुंबईत घुसले आणि हल्ला सुरू केला. अतिरेक्यांनी त्या नावाड्याला बंदुकीचा धाक दाखवून बोट बंदरावर आणण्यास भाग पाडलं होतं. मुंबई बंदरावर पोहोचताच त्याला ठार मारून, छोट्या बोटीतून ते किनाऱ्याकडे आले. त्या नावाड्याच्या खुनानं सुरू झालेला तो नरसंहार पुढे साठ तास चालू होता. त्यामध्ये 166 लोक मारले गेले... 14 पोलीस अधिकारी, 2 नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) कमांडोज आणि 4 सुरक्षा अधिकारी त्यांत होते. शिवाय 308 नागरिक जखमी झाले. ज्या दोन टॅक्सींतून त्यांनी प्रवास केला तिथेही बॉम्ब ठेवले. तसंच कुलाब्याच्या एक्सप्रेस पेट्रोलपंपावरही बॉम्ब ठेवले. माध्यमांनी 26 नोव्हेंबरच्या या काळरात्रीचा उल्लेख अमेरिकेचे 9/11 असा केला आहे.
इकडे आम्ही दोघी बंदराकडे जाणाऱ्या बोटीची वाट पाहत चार्ल्स टाऊनच्या स्टॉपवर थांबलो होतो. अचानक माझ्या धाकट्या बहिणीचा जर्मनीहून फोन आला. अतिशय घाबरून ती बोलत होती, 'अगं जुई, आतंकवादी लोकांनी मुंबईवर हल्ला केलाय. तुला काही समजलं का? पप्पांनी बुलेटप्रुफ जॅकेट, हेल्मेट घातलंय आणि ते या आतंकवाद्यांच्या दिशेनं निघालेत.'
'कुणी सांगितलं तुला हे?' माझा आवाज कापत होता.
ती म्हणाली, 'अगं, टीव्हीवर तशी बातमी दाखवताहेत.'
उसनं अवसान आणून तिला धीर देत मी म्हणाले, 'घाबरू नकोस. आपल्या पप्पांना काही होणार नाही.'
मला नेहमी वाटायचं की, माझे पप्पा अजिंक्य आहेत. ते सगळ्यांना खंबीरपणे आधार देतात, त्यांना कधीच काही होणार नाही. मी बहिणीला धीर दिला खरा पण क्षणार्धात मला त्या प्रसंगाचं गांभीर्य जाणवलं.
मी बोटीत शिरले तेव्हा एक समुद्रपक्षी डौलदारपणे पंख पसरून आकाशातून खाली झेपावत होता. त्याची गती कमी झाली आणि तो अलगद जमिनीवर उतरला. ‘जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल’ हे रिचर्ड बाक यांचं पुस्तक पप्पांचं अतिशय आवडतं पुस्तक. त्यातला तो समुद्रपक्षी उंच-उंच उडण्याचं स्वप्न पाहणारा, त्यासाठी धडपडणारा. आणि माझे पप्पाही तसेच. सतत नवनवीन आव्हानं स्वीकारून पुढेपुढे जाणारे. या क्षणी माझ्या मनानं या दोघांची सांगड घातली. माझे पप्पा उत्कृष्ट पोलीस अधिकारी. वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी आयपीएस म्हणजे भारतीय पोलीस सर्व्हिसमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. आज ते त्रेपन्न वर्षांचे आहेत. त्यांनी त्यांचं अर्ध आयुष्य देशाच्या सेवेत अर्पण केलं. त्यांच्या पोलीस ट्रेनिंगच्या दरम्यान त्यांनी तीन सुवर्णपदकं पटकावली. तसंच पुढे पोस्टिंगनंतर महत्त्वाच्या कामगिरीबद्दल त्यांना दोन वेळा सुवर्णपदकं मिळाली. पप्पा नेहमीच अतिशय तत्पर असायचे. प्रसंग कुठलाही असो... जराही विचलित न होता ते त्याला सामोरे जायचे.
महाराष्ट्र राज्यातल्या पूर्वेकडच्या चंद्रपूरला, जिथे माओवाद्यांनी शेकडो पोलिसांना जीवे मारलं, त्याच चंद्रपूरच्या जंगलात पप्पांनी गनिमी काव्यानं (Guerilla Warfare) लढून माओवाद्यांशी मुकाबला केला. चंद्रपूरला नेमणूक म्हणजे लोकांना काळ्या पाण्याची शिक्षाच वाटायची. पण पप्पांनी हे आव्हानही अगदी सहज स्वीकारलं. पप्पा चंद्रपूरला गेले. मम्मी आणि आम्ही मुलं मुंबईला राहिलो त्या वेळी माझा धाकटा भाऊ तर अगदी तान्हा होता.
संकटसमयी शांत चित्तानं अतिशय सूत्रबद्ध नियोजन करणं ही पप्पांची खासियत. त्यांनी व्हिएन्नातल्या जागतिक परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात सल्लागार म्हणून भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. तिथेही उत्कृष्ट कामगिरी करून एक मुत्सद्दी म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला. परदेशातील इंटरनॅशनल डिप्लोमॅटिक एजन्सीजदेखील पप्पांनी त्यांच्यासोबत राहावं म्हणून प्रयत्न करत होत्या, त्यांचं मन वळवत होत्या कारण पप्पांसारखा अधिकारी मिळाल्यानं त्या एजन्सीजचं जागतिक स्तरावरचं स्थान मजबूत होणार होतं. पण पप्पांची खरी बांधिलकी ॲक्टिव्ह पोलीसशी होती. त्यामुळं ते जानेवारी 2006मध्ये भारतात परतले.
माझ्या या विचारांच्या तंद्रीतून मी जागी झाले. मी कुठे आहे याचं भान आलं. बहिणीचे शब्द कानांत घुमत होते. तो क्षण माझ्या मनात गोठला गेला. मनोहारी निळ्या निळ्या पाण्यावर नाचणारी प्रकाशमान सूर्यकिरणं, डोक्यावरून उडणारे समुद्रपक्षी, फेरीच्या स्टॉपजवळची ती गुंडाळलेली लोखंडी साखळी आणि भीतीनं पोटात खड्डा पडलेली मी. अजूनही इतक्या वर्षांनंतर ते सगळं माझ्या मनात जसंच्या तसं उभं राहतं, मनाला पीळ पाडतं.
देवदत्तची मावसबहीण आणि मी किनाऱ्यावर परतण्यासाठी एका रिकाम्या बोटीत शिरलो. मी वरच्या डेकवर गेले. वर निळ्याभोर आकाशाकडे पाहिलं आणि सर्व काही ठीक असेल अशी आशा केली. हिवाळ्यातला तो तेजस्वी सूर्यप्रकाश, चकवा देणारा, हवेतल्या थंडीची वर्दी देणारा. तेवढ्यात ऑफिसमधून देवदत्तचा फोन आला. मुंबईला काय घडतंय याची कल्पना मला आहे का, असं त्यानं विचारलं. मला जर्मनीहून बहिणीचा फोन आल्याचं मी त्याला सांगितलं. आम्ही लगेच मुंबईला मम्मीला कॉन्फरन्स कॉल लावला.
'पप्पा ठीक आहेत ना?'
ती म्हणाली, 'ए.एन. रॉय यांचा फोन आल्यावर ते लगेच निघून गेले. तेव्हापासून माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही.'
पप्पांनी महाराष्ट्र पोलीस दलाचे प्रमुख, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस (डीजीपी) ए.एन. रॉय यांना रिपोर्टिंग केल्याचं आम्हाला माहीत झालं. तेवढ्यात मम्मीला जर्मनीहून बहिणीचा फोन यायला लागला. मग आम्ही आमचा फोन बंद केला.
त्यानंतर खरंतर फक्त पाचच मिनटांचा बोटीचा प्रवास पण तो संपता संपत नव्हता. फेरी बंदरावर पोहोचली. इथून आमचं घर अगदी हाकेच्या अंतरावर. आम्ही घरी धावलो. मला ते दडपण असह्य झालं. मी पटकन घरात शिरून टीव्ही लावला. कॉम्प्युटर उघडला. माझ्या भावंडांना कॉन्फरन्स कॉल लावला. भाऊ म्हणाला, 'मी बातम्या बघतोय. मम्मी फोनवर आहे.' टीव्हीवर परत-परत तेच ते दृश्य दाखवत होते. हेल्मेट घातलेले फोनवर बोलत चालणारे पप्पा. भावाच्या हातून फोन गळून पडला. टीव्हीवर बातमी आली - दहशतवाद विरोधी पथकाचे (अँटी टेररिझम स्क्वॉड- एटीएसचे) प्रमुख हेमंत करकरे जखमी.'
मला का कुणास ठाऊक वाटून गेलं की, कदाचित बंदुकीची गोळी फक्त त्यांना चाटून गेली असेल. टीव्हीवरून नजर हटवून मी लॅपटॉपवर बहिणीशी चॅटिंग करत होते. तेवढ्यात बहिणीनं चॅटिंग विंडोमध्ये दोनच शब्द लिहिले, 'पप्पा गेले.' मी तिला विचारलं, 'पण हे खरंय का?' त्यावर तिनं सांगितलं की, लोकांचे दुखवट्याचे मेसेजेसही यायला सुरुवात झालीये. माझ्याही इमेलवर तसेच मेसेजेस येणं सुरू झालं. पण त्या भयंकर बातमीवर विश्वास ठेवायला मन तयार होत नव्हतं.
देवदत्त लवकर घरी येत असल्याचं त्यानं फोन करून सांगितलं. त्याला बातमी कळल्याचं त्याच्या आवाजावरून माझ्या लक्षात आलं. कसंबसं धैर्य एकवटून मी टीव्हीकडे नजर वळवली. आता तिथे पप्पा गेल्याची बातमी पुन्हापुन्हा दाखवली जात होती, 'एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांचं निधन. त्यांच्या छातीवर तीन गोळ्या झाडण्यात आल्या...'
एवढा वेळ मी बहिणीशी बोलत होते पण तिच्या तोंडून शब्दही फुटत नव्हता. पप्पा जिवंत आहेत अशी आशा मला अजूनही होती. मी भावाला फोन लावला. तो म्हणाला की, पप्पांचं शव ज्या हॉस्पिटलमध्ये नेलंय तिथे मम्मी गेलीये. आमचा धाकटा मामा आकाशला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार होता.
देवदत्त घरी आला तेव्हा त्याचा चेहरा पांढराफटक पडला होता. मी बॅग भरली. देवदत्त मला घेऊन तातडीनं विमानतळावर आला. मात्र तिथे पोहोचल्यावर मुंबईचा विमानतळ रेड अलर्ट म्हणून घोषित झाल्याचं आणि तिकडे जाणाऱ्या सर्व फ्लाइट्स रद्द करण्यात आल्याचं समजलं. बधीर मनानं आम्ही घरी परतलो. माझा सेलफोन सतत घणघणत होता. जगभरातून सांत्वनाचे फोन येत होते. मला थोडी उसंत मिळावी म्हणून देवदत्त आणि त्याची बहीण, दोघं फोनला उत्तर देत होते. मी रात्रभर इंटरनेटवर बातम्या बघत होते. जे घडलं त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होते. झोप तर लागणं शक्यच नव्हतं. मी आडवीसुद्धा झाले नाही. बेडरूमच्या टीव्हीसमोरच्या कार्पेटवर हताशपणे बसून समोरचा तो नरसंहार बघत होते.
उद्या गुरुवार. नातेवाइकांच्या, मित्रमंडळींच्या संगतीत साजरा होणारा अमेरिकेचा 'थँक्सगिव्हिंग' दिवस. आमच्याकडेही देवदत्तची धाकटी बहीण आणि त्याची मावस, मामे भावंडं सुट्टीसाठी लांबलांबून जमणार होती. ती सगळी थँक्सगिव्हिंग साजरा करायला येणार होती. शिकागो, सिनसिनाटी, मिनॅपोलीस इथून ते येणार होते. त्यांच्या येण्याला सुरुवात झाली खरी पण घरादारावर शोककळा पसरली होती आणि घराला सांत्वनसभेचं रूप आलेलं होतं.
त्या रात्रीच देवदत्तला केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयातून (सेंट्रल एव्हिएशन मिनिस्ट्रीतून) फोन आला. महाराष्ट्र सरकारनं आमच्यासाठी विमानाची तिकिटं काढली असून दुसऱ्या दिवशी म्हणजे थँक्सगिव्हिंगच्या दुपारी न्यूयॉर्कहून आमचं विमान असल्याचं त्यांनी कळवलं. आम्ही दोघं फ्लाईट घेऊन न्यूयॉर्कला पोहोचलो. तिथून आम्हाला न्यूयॉर्कच्या प्रतीक्षाकक्षापर्यंत घेऊन जाण्यासाठी संरक्षक आला. आता तिथे काही तास काढायचे होते. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला स्वतंत्र खोलीत नेलं. मी लगेच टीव्ही लावून बातम्या बघायला लागले.
आता बातम्यांवरून कळत होतं की, या आतंकवाद्यांनी मुंबईत एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी नृशंस हल्ले केले होते. मुंबईचं सर्वात मोठं ट्रेन स्टेशन असणारं छत्रपती शिवाजी टर्मिनल, ताज आणि ओबेराय ही दोन पंचतारांकित हॉटेल्स, शाबाद हाऊस हे ज्युइश सेंटर, दक्षिण मुंबईतला प्रसिद्ध कॅफे लिओपाल्ड आणि कामा हॉस्पिटल या ठिकाणी हल्ले सुरू होते. ताज, ओबेरॉय आणि शाबाद हाऊस या हॉटेल्समध्ये लपून या अतिरेक्यांनी लोकांना ओलीस ठेवलं होतं. भारतानं तोपर्यंत एवढा मोठा भयंकर आतंकी हल्ला पाहिला नव्हता. सारं काही एखाद्या युद्धासारखं चालू होतं आणि कुणाला प्रतिकारही करता येत नव्हता. या हल्लेखोरांनी ताजच्या वरच्या मजल्यावर बॉम्ब टाकून आग लावली. तो धुराचा भयानक लोट सर्वदूर पसरला होता. सर्व टीव्ही चॅनल्स या हल्ल्याच्या बातम्या देताना ताजला लागलेल्या आगीला 26/11च्या हल्ल्याची प्रतिमा म्हणत होत्या.
या हल्लेखोरांनी लोकांची मानसिकता जोखली. जिथे हल्ला करायचा ती ठिकाणं निश्चित केली. मुंबईतल्या उच्चभ्रू वस्तीतल्या प्रसिद्ध ठिकाणांवर हल्ला केला तर सगळ्या जगाचं लक्ष वेधलं जाईल हे ते जाणून होते. हे हत्याकांडाचं भीषण नाट्य बघताना माझे अश्रूही मुके झाले होते. सतत लोकांचे फोन येत होते, देवदत्त त्यांच्याशी बोलण्यात व्यग्र होता. त्याची माझ्याकडे नजर गेली. त्यानं टीव्ही बंद केला. फोन सायलेंटवर टाकला आणि माझ्या मनाला थोडी स्वस्थता येईपर्यंत माझ्या शेजारी बसून राहिला.
पंधरा तासांच्या या लांबलचक प्रवासात मी पप्पांचाच विचार करत होते. पायलटनं येऊन आमचं सांत्वन केलं. कर्मचाऱ्यांनी खास लक्ष दिलं. मला जाणवलं की, या जगाचा निरोप घेतल्यावरही पप्पांनीच आम्हाला घरी परत नेण्याची व्यवस्था करून ठेवली आहे. त्यांचं उबदार अस्तित्व मला माझ्याभोवती जाणवलं.
...पण त्या वेळी माझ्या मनात प्रश्नच प्रश्न उभे राहत होते...
पप्पांना एवढ्या लवकर मरण का आलं? ते फक्त त्रेपन्न वर्षांचे होते. त्यांच्याबरोबर मारले गेलेले ऑफिसर्स त्यांना कुठे भेटले? मुख्य म्हणजे त्या बुलेटप्रुफ जॅकेटचं आणि हेल्मेटचं काय? त्याची काहीच मदत झाली नाही?
- जुई करकरे - नवरे
jui.navare@gmail.com
वाचा माझे पप्पा हेमंत करकरे - भाग 2
Tags: लेखमाला जुई करकरे माझे पप्पा : हेमंत करकरे मुंबई दहशतवादी हल्ला 26/11 अँटी टेररिझम स्क्वॉड दहशतवाद विरोधी पथक एटीएस हेमंत करकरे भाग 1 Marathi Series Jui Karkare Majhe Pappa : Hemant Karkare My Pappa : Hemant Karkare Hemant Karkare: A Daughter's Memoir Part 1 जुई करकरे - नवरे Jui Karkare- Navare माझे पप्पा हेमंत करकरे Load More Tags
Add Comment