सहकाऱ्यांनी जागवलेल्या आठवणी - पूर्वार्ध 

माझे पप्पा हेमंत करकरे - भाग 13

माणसाची खरी ओळख एखाद्या असामान्य प्रसंगापेक्षा (कृत्यापेक्षा) त्याच्या रोजच्या जीवनातूनच आधी चांगली पटू शकते. 
- हेमंत करकरे
वय 21, 16 फेब्रुवारी 1975. (रोजनिशीतली नोंद)


कुठलंही राजकीय पाठबळ नसताना किंवा पाठीशी कुणीही गॉडफादर नसताना, अगदी सामान्य कुटुंबातून येऊनही स्वतःच्या मेहनतीनं यशस्वी झालेल्या लोकांबद्दल पप्पांना खूप आदर होता. खरंतर पप्पा स्वतः त्यांच्यापैकीच एक होते. त्यांच्यासारखेच त्यांचे पोलीस अकादमीतले मित्र अंकुश धनविजयही... धनविजय हे दुर्गम भागातले. त्यांचे वडील शेतकरी. पण त्यांनी स्पर्धा परीक्षेत स्वतःच्या मेहनतीनं यश मिळवलं आणि स्वतःचं भवितव्यच बदललं. आम्ही त्यांना पप्पांच्या आठवणी सांगण्याची विनंती केली तेव्हा त्यांना भरून आलं. 

‘‘मी आणि हेमंत करकरे प्रथम भेटलो ते नागपूरच्या सिव्हिल डिफेन्स कॉलेजमध्ये. उंच, सडपातळ, रुबाबदार व्यक्तिमत्त्व. पुढं जाऊन हा देशाचा असा हिरो होईल असं तेव्हा वाटलंही नव्हतं. असा हिरो की, सगळा देश त्याला अभिवादन करेल आणि त्याच्या मृत्यूनं देशातली जनता शोकाकुल होईल. त्याचा वर्गमित्र म्हणून आम्हाला त्याचा अभिमान वाटतो.’’ 

श्री. धनजंय यांनी आणि पप्पांचे उच्च पदावर असलेल्या इतर सहकाऱ्यांनीही पप्पांची कामाची असोशी, कर्तव्यकठोरतेनं काम करताना जपलेली मनाची सहृदयता या सगळ्याचं दर्शन आम्हाला घडवलं.


पोलीसदलातलं अनमोल रत्न
पप्पांचे कॉलेजमधले सहाध्यायी, सहकारी, नागपूरचे माजी पोलीस कमिशनर अंकुश धनविजय यांच्या आठवणी...

आमचं प्रशिक्षण नागपूरच्या सिव्हिल डिफेन्स कॉलेजमधून पूर्ण झालं. त्यांनतर आम्ही हैदराबादच्या सरदार वल्लभभाई पटेल अकादमीत रुजू झालो. हेमंतला सगळ्या उपक्रमांत भाग घ्यायचा असायचा. बरं... त्यात प्रावीण्यही मिळवायचं असायचं. त्यावर चित्त एकाग्र करून पूर्ण ऊर्जेनं ते काम करायचा. ज्यात भाग घेईल त्यात पहिला नंबर. बाकीचे वर्गमित्र त्याला चिडवायचेसुद्धा, पण त्या चिडवण्यानं त्याचा उत्साह कधी कमी झाला नाही.

हैदराबादचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर आम्ही नाशीकला महाराष्ट्र पोलीस अकादमीत बरोबर होतो. या काळात आम्ही अधिक जवळ आलो. तासन्तास आम्ही आमचं कुटुंब, शाळा, परिवार यांविषयी बोलायचो. कुणालाही मदत करायला तो सदैव तत्पर असायचा. मग त्यात त्या व्यक्तीचा प्रांत, धर्म, त्याची जात, शैक्षणिक पात्रता या गोष्टींचा विचार नसायचा. साहजिकच तो प्रोफेसर आणि इतर उमेदवार यांच्यात चांगलाच लोकप्रिय झाला. आम्हा मित्रामित्रांमधला स्नेहबंध, सद्‌भाव कायम घट्ट टिकून राहिला. 

हेमंतला भाषेचं उत्तम ज्ञान होतं. त्याच्या शब्दकोशात शब्दांचा अमर्याद साठा होता. अगदी आयत्या वेळी बोलायला उभा राहिला तरी वादविवादात तो बाजी मारून जायचा. त्याचा हातही लिहिता होता. आमच्या सगळ्यांमध्ये तो अगदी बेस्ट होता. त्याचं उदंड आणि अधाशासारखं वाचन होतं आणि वाचलेलं लक्षात ठेवण्याचं, स्वतःत मुरवून घेण्याचं तंत्र त्याला अवगत होतं.

काही वर्षांपूर्वी मी नाशीक पोलीसमध्ये इन्स्पेक्टर जनरल होतो. त्या काळात हेमंतनं लिहिलेल्या नोट्‌स माझ्या हाती आल्या. पोलीस रेकॉर्ड, खेड्यातल्या गुन्ह्यांचं रेकॉर्ड याच्या अत्यंत दक्षतेनं केलेल्या सविस्तर नोंदी... पुढच्या अधिकाऱ्याला उपयोगी पडतील अशा. त्यानं केलेल्या या नोंदी तरुण प्रशिक्षणार्थींनी अनुकरण करण्याजोग्या, अभ्यास करण्याजोग्या आहेत. 

भुसावळहून तो अ‍ॅडिशनल सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस म्हणून अकोल्याला गेला. तिथं त्याचा मुक्काम फार दिवस नसणार हे त्याला माहिती होतं. तरीही तिथं त्यानं सुंदर बाग फुलवायला घेतली. अतिशय सुंदर बगीचा, फुलझाडं, लॉन आणि स्वीमिंग पूलही. त्यानं या बागेला नाव दिलं ‘जुईची बाग’. तुझ्या लाडक्या लेकीची जुईची बाग असं मी त्याला चिडवलंही. तो हसला. त्यानं मला आजूबाजूला फुललेली जुई दाखवली. या फुलांचा सुगंध मंदपणे दरवळत होता. तो म्हणाला, ‘हा बगीचा सर्व नागरिकांना, मुलांना खुला आहे.’ 

त्याची अकोल्याहून बदली झाल्यावर काही वर्षांनी त्या बंगल्याला भेट देण्याचा योग मला आला. मात्र त्या बगिच्याची दशा पाहून मी दुःखी झालो. बगीचा ओसाड दिसत होता. जुई आणि इतर फुलझाडं सुकली होती. त्या गवतावर लहान मुलांचा गोंगाट चालला होता. जेव्हा मी हे हेमंतला सांगितलं तेव्हा तो खिन्न झाला. म्हणाला, ‘मी ती जागा माझ्या आनंदासाठी फुलवली. इतरांनी काय करावं हे माझ्या हातात नाहीच.’

हेमंतनी नक्षलग्रस्त चंद्रपूरला केलेल्या कामाची खूप प्रशंसा झाली. माझी तेव्हा भंडाऱ्याला पोलीस अधीक्षक म्हणून नेमणूक झाली. तोही नक्षलवाद्यांचा भाग होता. मी नेहमी वेगवेगळ्या विषयांवर हेमंतचा सल्ला घ्यायचे. विशेषतः नक्षलवाद्यांचा पाठपुरावा करण्याच्या संदर्भात तो नेहमीच अतिशय योग्य, प्रभावी, व्यावहारिक उपाय सांगायचा. जातिवादाचे प्रश्न सोडवण्यासाठी सुसंवाद साधण्याचा त्याचा सल्ला नेहमी उपयोगी पडायचा. 

तो सतत समाजातल्या सर्व स्तरांमधल्या लोकांत मिळूनमिसळून वागायचा. त्यांचा विचार करून पोलीस खात्यात सामाजिक बाबी अमलात आणायचा प्रयत्न करायचा.

त्यानंतर त्याची बदली रॉमध्ये झाली तर माझं पोस्टिंग राज्याच्या गुप्तहेर खात्यात झालं. पुन्हा आमचा एकमेकांशी व्यावसायिक विचारविनिमय सुरू झाला. त्यानं सांगितलेली माहिती अत्यंत महत्त्वाची असायची. (इथं सविस्तर सांगता येणार नाही. पण त्यानं केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये प्रभावीपणे समन्वय साधला.)

तो अगदी कुटुंबवत्सल माणूस होता. कुटुंबाच्या गरजांविषयी तो भावनाशील होता. आम्ही दोघंही अनेकदा पालकत्वाच्या जबाबदारीची साधकबाधक चर्चा करायचो... मग ती मुलांच्या शिक्षणाची असो, करिअरची असो नाहीतर लग्नासंबंधीची. 

हेमंतला व्यवस्थापन कला कमालीची अवगत होती. प्रत्येक समारंभ तो किती विचारपूर्वक आखतो हे पाहून आम्ही अवाक व्हायचो. वेगवेगळ्या स्तरांमधल्या लोकांबरोबर असलेली त्याची सामाजिक नातीगोती, लोकप्रियता आम्हाला जुईच्या लग्नात बघायला मिळाली. लग्नाला आलेल्या प्रत्येकाचं जातीनं स्वागत करून तो त्यांची चौकशी करत होता.

...तेव्हा जॉइंट कमिशनर ऑफ पोलीस ॲडमिनिस्ट्रेशन या पदावर त्याची नुकतीच नियुक्ती झाली होती. आपण अशा पद्धतीनं काम केलं पाहिजे की, पुढच्या येणाऱ्या अधिकाऱ्याला ते काम त्याच पद्धतीनं पुढं घेऊन जाता येईल असं त्याचं मत होतं. 

त्यानं पोलीस कल्याणाच्या कामात विलक्षण रस घेतला. तो रात्री उशिरापर्यंत काम करायचा शिवाय शनिवार, रविवार जाऊन साठलेली कामं पूर्ण करायचा. हातात थोडा वेळ आहे याची जाणीव त्याला आत कुठंतरी होती की काय कोण जाणे... पण तो झपाटल्यासारखा पोलीस खात्याला अद्ययावत करण्याच्या मागे लागला. 

त्यानं पोलीस क्वार्टर्सची देखभाल, पोलीस क्लबचं नूतनीकरण, योग आणि आरोग्य जागृती, आरोग्य तपासणी, नियुक्त्यांमधली आणि बदल्यांमधली पारदर्शकता, संपूर्ण खात्याचं आधुनिककरण हे सारं फार थोड्या कालावधीत पूर्ण केलं.

त्यानं अनेकांकडून अभिप्राय मागवले. त्यातून पोलीस बांधवांच्या कल्याणासाठी कशी पावलं उचलायची यावर विचार केला. त्याच्या या भरीव योगदानाची एवढी प्रशंसा झाली की, त्याची एटीएसला बदली होऊनही आयुक्तालयानं पोलीस वेलफेअर खातं त्याच्याकडेच ठेवलं. 

मुंबईच्या पोलिसांसाठी दिवाळीच्या कार्यक्रमाचं आयोजन हीसुद्धा याचीच कल्पना. त्यानं अशी नावीन्यपूर्ण, भव्य योजना आखली की, मुंबई पोलीस त्याचं हे योगदान कधीही विसरू शकणार नाहीत. जर्मनीमधल्या माझ्या एका कामात त्यानं मला खूप मार्गदर्शन केलं. त्याचे युरोपमधले मित्र प्रत्येक गोष्टीत मदत करतील याची खातरी दिली. 

त्या काळात मी युनायटेड नेशन्समध्ये प्रातिनिधिक मंडळावर जाण्याच्या कामगिरीचा विचार करत होतो. अर्थात हेमंतनं मला निर्णय घेण्याच्या दृष्टीनं अगदी आमनेसामने या पदाचे फायदे तसेच त्याच्या मर्यादाही समजावून दिल्या. गणवेशाशिवाय असणाऱ्या या नोकरीतल्या मर्यादा, गणवेशामुळे मिळणारे अधिकार, आदर यांविषयीही तो बोलला. तो माझा मित्र, मार्गदर्शक, भाऊ होता. तसाच तत्त्वज्ञानीही होता... कुठल्याही मार्गदर्शनासाठी विश्वासार्ह असा.

26/11ची भयानक बातमी कानांवर आदळली. अंगावर वीज कोसळली. मी त्या बातमीवर विश्वास' ठेवायला तयार नव्हतो. पोलीस डिपार्टमेंटनं आणि देशानं एक उत्तम व्यवस्थापक, प्रशासकीय, भावनाशील उमदा अधिकारी गमावला. समाजानं एक सच्चा सद्‌गृहस्थ आणि नागरी सेवक गमावला. कुटुंबानं प्रेमळ पती, बाप, भाऊ, काका गमावला आणि मी माझा वर्गबंधूच नाही माझा भाऊच गमावला. मला प्रचंड धक्का बसला. या दुःखातून बाहेर पडायला कित्येक महिने गेले. 

आजसुद्धा मला कुठल्याही गोष्टीत सल्ला हवा असेल तर मी माझ्या अंतःचक्षूंनी हेमंतला फोन लावतो आणि त्याच्या आवाजाचा प्रतिध्वनी माझ्या कानी येतो. ‘हॅलो अंकुश? कसा आहेस? सांग. काही खास? मी काय करू? ओके. हे हॅन्डल करायचा उत्तम उपाय म्हणजे...’


आमचा भावी नेता
पप्पांचे सहकारी, माजी पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांच्या आठवणी

1983मध्ये पोलीस अकादमीत हेमंतची पहिली भेट झाली. तेव्हा आम्ही तिथं नवे उपक्रम सुरू केले होते. प्रशिक्षण काळात कायकाय अडचणी येतात याचा आढावा दर पंधरा दिवसांनी घेतला जायचा. तिथंच अगदी जेवणाच्या मेन्यूपासून ते ‘रॉ’पर्यंत चर्चा झडायच्या. एकदा एका ब्रेन स्टॉर्मिंग सेशनमध्ये हेमंत बोलले. त्या वेळी अत्यंत कूल-काम डिसेंट, विचार करून बोलण्याचा त्याचा गुण मला फारच आवडला.

अकादमीतलाच एक प्रसंग मला आजही स्पष्ट आठवतोय. वृक्षारोपणाचा कार्यक्रम होता. सर्वप्रथम ते आले आणि स्वतः खड्डा खणण्यापासून ते झाड लावेपर्यंत तिथे काम केले. काम किरकोळ असले तरी ज्या हिरिरीने ते पुढाकार घ्यायचे तो लक्षणीय असायचा. एखाद्या छोट्याशा गोष्टीबद्दलही त्यांच्यात जी उत्सुकता आणि उत्साह असायचा तो मला नेहमीच आवडला.

माझी नाशीकला बदली झाली तेव्हा करकरे भुसावळला पोलीस उप-अधीक्षक म्हणून बदलून गेले. झालेल्या निर्णयाची ताबडतोब अंमलबजावणी करण्यासाठी ते नेहमीच उत्सुक असायचे.

मी नागपूरला पोलीस आयुक्त होतो तेव्हा प्रत्येक पोलीस ठाण्याला भेट द्यायचो. तेव्हा करकरे चंद्रपूरला अधीक्षक होते. 1992ची घटना आहे. नागपूरला नक्षलवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा पकडला होता तेव्हा ते चंद्रपूरहून चौकशीसाठी आले होते. कोणत्याही घटनेचा, गुन्ह्याचा अभ्यास केल्याशिवाय बोलायचे नाही हे पथ्य ते नेहमी पाळत असत. पोलीसदलात कोणत्या सुधारणा होऊ शकतात या विषयावर आमच्या नेहमी चर्चा चालायच्या. डिपार्टमेंट सुधारायचे असेल तर आपल्या स्वतःपासून सुरुवात करायला हवी. स्वतःचे ऑफिस, नोकरीचे ठिकाण, जिल्हा इथून सुरुवात व्हायला हवी. यावर आमचे दोघांचे कायम मतैक्य असायचे. पोलीसखात्याला आणि पर्यायाने पोलिसाला चांगले दिवस यावेत असे वाटत असेल तर करकरेंची आठवण नेहमी ठेवली पाहिजे. त्यांचे कार्य विस्मृतीत जाता कामा नये. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र एका उत्कृष्ट भावी पोलीस महासंचालकाला मुकला.

आजही मी जेव्हा अकादमीत जातो तेव्हा करकरेंनी लावलेली आणि वाढलेली झाडे पाहतो, कोठेही भाषणात अतिरेक्यांचा प्रश्न मांडतो तेव्हाही करकरे प्रथम डोळ्यांसमोर येतात.

करकरे यांच्या रूपाने महाराष्ट्राने पोलीसदलातील एक हिरो गमावला आहे. ही एक करकरेंची नाही तर देशाची शोकांतिका आहे. त्यांचे बलिदान अतुलनीय आहे. पोलिसांच्या इतिहासात ते सुवर्णाक्षरात लिहिले जाईल.

मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास सुरू असताना 26/11 घडले. त्याआधी 10/15 दिवसांपूर्वी मला करकरे भेटले होते. तेव्हा मी त्यांना म्हटले होते की, तुम्ही करत असलेले काम अतिशय प्रामाणिकपणे करत आहात. 

26/11च्या आदल्या दिवशी माझे नागपूरला भाषण होते. तेव्हा भाषणातच मी करकरेंच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला होता. कार्यक्रम आटोपल्यानंतर मुंबईकडे यायला निघालो तेव्हा अकोल्याला पोहोचलो असताना मुंबईला हल्ला झाल्याचा मला फोन आला. परंतु तपशील कळला नव्हता. सकाळी व्हीटी स्थानकावर उतरलो तेव्हा सर्वत्र सामसूम... हमाल नाही, तुरळक टॅक्सीवाले दिसत होते. टॅक्सीत बसलो आणि घराकडे जात असता टॅक्सी ड्रायव्हनेच सांगितले, 'साहेब, करकरे साहेब गेले.' त्याच्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता. दोन आठवड्यांपूर्वीच करकरे घरी आले होते तेव्हाचा त्यांचा चेहरा आठवला. कालच नागपूरमध्ये त्यांच्याविषयी जे बोललो ती त्यांना जिवंतपणीच वाहिलेली श्रद्धांजली ठरली असे मला न राहवून वाटले. एक कलासक्त, ॲस्थेटिक सेन्स असलेला, संपर्क केल्यावर लगेच उपलब्ध होणारा असा पोलीस अधिकारी आम्ही गमावला आहे.


तंत्रज्ञानातला जाणकार अधिकारी
कमल कश्यप, माजी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र यांच्या आठवणी... 

(पप्पांची गौरवपूर्ण कारकिर्द आणि तिच्यातली आव्हानं यांचा चहूबाजूंनी सारासार विचार करून कश्यप यांनी आपले विचार व्यक्त केलेले आहेत.)

मी औरंगाबादला सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस असताना हेमंतनं तिथं प्रोबेशनर म्हणून सुरुवात केली. पहिल्या भेटीतच एक प्रसन्न अधिकारी म्हणून त्याचा ठसा माझ्या मनावर उमटला. त्याच्या वागण्यातून त्याची कौटुंबिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी दिसून यायची. त्याला भेटणाऱ्या प्रत्येकाला त्याची जगण्याची मूल्यं आणि तत्त्वं जाणवायची. 

त्याची मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधली डिग्री, मॅनेजमेंटमधलं पदव्युत्तर शिक्षण आणि खासगी नोकरीचा अनुभव हे सगळं जाणून मी अवाक झालो. पोलीसखात्यात कुठल्याही आडगावात केव्हाही होणाऱ्या बदल्या, राजकारण या सर्व गोष्टी जाणूनही त्यानं पोलीसखात्यात यायचं ठरवलं.

अकादमीच्या प्रशिक्षणात दिसणारं पोलीसखातं वास्तवात वेगळं निघायचं. उमेदवारीच्या काळातच हेमंतनं आयपीएस अधिकारी होण्यासाठी आवश्यक गुण आत्मसात केले. 

हेमंत हा अतिशय शांत, आत्मविश्वासू आणि प्रामाणिक अधिकारी होता. त्याच्याकडे माणुसकी होती. दुसऱ्याचं म्हणणं तो शांतपणे ऐकायचा. मी तर म्हणेन की, चाणाक्ष, मितभाषी तसंच समजंस, कनवाळू असा होता हेमंत. त्याच्या सहानुभूतिपूर्ण दृष्टीकोनामुळे सामान्य लोक विश्वासानं याच्याकडे तक्रारनिवारणासाठी यायचे. सर्वसाधारणपणे पोलिसांकडं जाणं लोक टाळतात. त्यांना फुकटची सहानुभूती दाखवणारा श्रोता नको असतो. कृती हवी असते. हेमंत या त्रस्त, गांजलेल्या मनःस्थितीतल्या लोकांना शांत करून त्यांच्या मनात न्यायाची आशा फुलवायचा. 

हेमंतचे वरिष्ठ आणि हेमंत तसेच हेमंत आणि त्याच्या हाताखाली काम करणारे अधिकारी यांचं गुरुशिष्याचं नातं होतं. हेमंतच्या कामातून त्याच्या सहकाऱ्यांना प्रेरणा मिळायची तर स्वतः हेमंत त्याच्या वरिष्ठांकडून शिकायचे. काही साधनसामग्री कमी पडत असल्याची तक्रार त्यानं कधीही केली नाही किंवा कधी काही खास हवं अशी मागणीही केली नाही. त्याला अकारण लक्ष्य करून डिपार्टमेंटच्या काही ‘ब्लॅक शिप’नं त्रास दिला असंही माझ्या कानांवर आलं. आपल्या डिपार्टमेंटमधला एक महत्त्वाचा माणूस - प्रामाणिक, मेहनती, एकनिष्ठ. त्याचा हा उत्साह, पुढाकार दाबण्याचा प्रयत्न कसा कुणी करू शकतो?

या प्रशिक्षणार्थींचा गुरू एवढंच आमचं नातं मर्यादित नव्हतं. सगळं मिळून ते एक कुटुंबच होतं. माझी बायको रिझवाना माझ्या मागं खंबीरपणे उभी होती. हा काळ अतिशय आनंदाचा, समाधानाचा होता. हेमंत फार पुढं जाईल याबद्दल तेव्हाही आम्हाला खातरी होती. 

सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीमध्ये जाण्याची धमक त्याच्यात आहे असं मला तेव्हा वाटायचं. मला स्वतःला या क्षेत्रातला अनुभव असल्यानं माझा हा कयास पक्का होता आणि तसंच झालं. त्याची रॉमध्ये निवड झाली. त्याला अतिशय महत्त्वाच्या गुप्त आणि जोखमीच्या कामगिरीवर व्हिएन्नाला पाठवलं.

नवनवीन उपकरणं हाताळण्यात आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात हेमंत पटाईत होता. एकंदर यंत्रणेतच सुधारणा घडवून आणण्यावर त्याचा विश्वास होता. आखूनरेखून चालवलेली व्यवस्था हेच कारभाराचं अंतिम रूप असं त्याचं मत होतं. स्वतःच्या आवडीनिवडी, ऐशाराम किंवा श्रेय घेणं यांना त्यानं कधीही महत्त्व दिलं नाही. त्यानं नेहमीच आपल्या डिपार्टमेंटच्या लोकांची काळजी घेतली, डिपार्टमेंटच्या प्रतिमेची काळजी घेतली. स्वतःला प्रसिद्धीपासून दूर ठेवलं. 

एखाद्या गोष्टीला अभ्यासपूर्ण आणि नियोजित पद्धतीनं सामोरं जाण्याच्या त्याच्या वृत्तीमुळे नक्षलग्रस्त भागात त्यानं प्रशंसनीय कामगिरी बजावली. 

आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर काम करत होतो. आम्ही शक्य तेव्हा एकमेकांच्या संपर्कात राहिलो. आमच्यात कामासंबंधी चर्चा व्हायची, विचारविनिमय व्हायचा. आम्ही आता एकमेकांकडून शिकत होतो. एका उत्साही आणि विचारी तरुणाकडून मीही शिकत होतो.

मध्ये काही वर्षांचा खंड पडला आणि दोघंही परत मुंबईला आलो. आम्ही दुपारचं जेवण एकत्र करत असू. एव्हाना देशात-परदेशात काम करून तो तयार झाला होता. हेरगिरीतील जोखीम, शत्रूंना बगल देण्यासाठी योजलेल्या व्यूहरचना आणि त्यांच्या संलग्न शाखा या सर्व गोष्टी तो अनुभवातून शिकला होता. तो माझ्या कितीतरी पुढं निघून गेला आणि त्याच्यात एक प्रौढ, परिपूर्ण अधिकारी बघताना मला आनंद होत होता. 

त्याच्याकडे विनोदबुद्धी होती. प्रचंड वाचनानं अनेक विषयांची अगदी अद्ययावत माहितीही त्याच्याकडे होती. त्याला बड्या खासगी कंपनीकडून नोकरीचं आमंत्रण असल्याचं मला ठाऊक होतं. पोलीसखात्यात राहिल्यावर सामाजिक बांधिलकी जपली जाणार होती तर खासगी कंपनीत फक्त स्वतःची उन्नती साधली जाणार होती. त्याच काळात त्याला एटीएसमध्ये घेतलं आणि तो त्यात संपूर्ण बुडून गेला. जे काम तो हाती घ्यायचा त्यात शंभर टक्के झोकून द्यायचा. त्याच्या कामावरून राजकारण करण्यात आलं तेव्हा मला खूप दुःख झालं. पण असल्या आरोपामुळे तो काम बाजूला ठेवणाऱ्यातला नव्हता. कर्तव्यनिष्ठेनं काम करणं हाच त्याचा धर्म होता. त्या धर्माशी, शुद्ध आचरणानं आणि चांगल्या विचारांनी तो प्रामाणिक राहिला.

26 नोव्हेंबरला मला छत्रपती शिवाजी टर्मिनलला गोळीबार झाल्याची बातमी मिळाली. हेमंतला ते हेल्मेट आणि बुलेटप्रुफ जॅकेट चढवताना सर्व जगाबरोबर मीसुद्धा पाहिलं. तो अतिशय शांत आणि निश्चयी दिसत होता. आता सर्व आटोक्यात येईल याची मला खातरी होती. सर्वात उत्तम अधिकारी कामगिरीवर होता. मुंबई पोलिसांनी यापूर्वी अनेकदा बिकट परिस्थिती हाताळली होती. 

हेमंतसारख्या पोलीस अधिकाऱ्यांनी नेहमीच मुंबई पोलिसांची परंपरा, त्यांचं नाव वरच्या पातळीवर ठेवलंय. या युद्धभूमीवर आपल्यासाठी हेमंत लढतोय यानं मला दिलासा वाटला. मी झोपायला गेलो. तेवढ्यात मित्राचा फोन आला. त्यानं ती भयंकर बातमी दिली. मला धक्काच बसला. मी हादरलो. मी लगेच डिपार्टमेंटच्या इतर लोकांना फोन केले. आशा होती की, ही बातमी म्हणजे नुसती अफवा निघावी. 

...पण दुर्दैवानं तेच सत्य होतं. अशोक कामटे आणि विजय साळसकर हे त्याच्या बरोबरीचे दोघं शूरवीर. त्यांनाही त्याच गोळीबारात आपले प्राण गमवावे लागले. सगळ्या पोलीस कुटुंबांसाठी हा एक खोल, भरून न निघणारा व्रण होता आणि त्यापाठोपाठ उफाळून आलेला संतापही. नंतर मला कळलं की, हे तिघं शूरवीर बातमी कळताच सावधगिरीनं ताबडतोब घटनास्थळी धावले. हेमंत कुठेही असता... अगदी एटीएस प्रमुख नसतानाही तरी या प्रसंगी कर्तव्याच्या भावनेनं धावलाच असता. त्याला प्रसंगाचं गांभीर्य कळलं नव्हतं ही त्याच्यावर झालेली टीका स्वीकारणं शक्यच नाही. ते बंदुकीच्या गोळ्यांचं घनघोर युद्ध होतं. चहूबाजूंनी गोळ्यांच्या फैरी झडत होत्या. दुर्दैवानं त्या गोळ्यांनी आमच्या सर्वोत्कृष्ट लोकांचा बळी घेतला.

मी परत-परत हेच म्हणेन की, हेमंत हा उत्तम संयोजन करून पद्धतशीरपणे परिस्थितीला सामोरा जाणारा अधिकारी होता. जे लोक या संहारात कुठेही नव्हते त्यांना या अधिकाऱ्यांनी काय करायला हवं होतं हे सांगायचा जराही अधिकार नाही. हक्क नाही. त्यांना अशा लढायांमध्ये काय काय अंतर्भूत असतं, त्यातला धोका काय असतो याबद्दल जराही कल्पना नसते. हे लोक जगभरातल्या प्रत्येक गोष्टीवर अधिकारवाणीनं बोलतात. आपल्या देशात असे लोक विपुल प्रमाणात आहेत. तो या दहशतवाद्यांचा काटा काढण्यात यशस्वी झाला असता किंवा त्यानं ऑफिसमध्येच राहायचं ठरवलं असतं तरी त्याला कमी लेखण्यासाठी या निंदकांनी  काहीतरी कल्पना लढवली असतीच. 

आम्हाला हेमंतचा खूप अभिमान आहे. आमच्या देशाच्या या महान नायकाच्या अगणित आठवणी आमच्या कुटुंबात राहतील. या घटनेनं कुटुंबाचं, पोलीसखात्याचं आणि समाजाचंही फार मोठं नुकसान झालंय. मी फक्त एवढीच प्रार्थना करू शकतो की, आपल्या देशाला अभिमान वाटावा असे अनेक हेमंत जन्माला यावेत. 

(अनुवाद: शोभा चित्रे)

- जुई करकरे - नवरे
jui.navare@gmail.com


वाचा 'माझे पप्पा हेमंत करकरे' या लेखमालेतील इतर भाग 

मुंबईतले ते भीषण तास...

शेवटचा प्रवास...

हेवा वाटावा असे वीरमरण...

संकटसमयी सगळ्यांच्या पुढे उभा राहून लढणारा धैर्यधर...

बुलेटप्रुफ जॅकेटचा अपशकुन

हौतात्म्यामागची आजन्म तपश्चर्या

कुटुंबवत्सल माणूस

चंद्रपूरचं आव्हान

चंद्रपूरमधील आठवणी सांगणारा काही पत्रव्यवहार

चंद्रपूरमधील बालपणीच्या आठवणी

निर्जीव लाकडामध्ये प्राण फुंकणारे पप्पा...

Tags: लेखमाला जुई करकरे जुई करकरे - नवरे माझे पप्पा : हेमंत करकरे मुंबई दहशतवादी हल्ला 26/11 अँटी टेररिझम स्क्वॉड दहशतवाद विरोधी पथक एटीएस हेमंत करकरे भाग 13 Marathi Series Jui Karkare Majhe Pappa Hemant Karkare My Pappa Hemant Karkare Hemant Karkare : A Daughter's Memoir Part 13 Jui Karkare- Navare Load More Tags

Comments:

संजीवन

सर्वप्रथम ही लेखमाला सुरू केल्याबद्दल कर्तव्यसाधनाचे अभिनंदन आणि धन्यवाद.सहकारी आठवणि सांगतायत,लिहीतायत त्याचवेळी त्यांचे डोळे पाणावलेत,हुंदका आवरत नाही,लेखणि थांबली असावी असं खरच वाटत

T Uday

The entire free world is undisputedly proud ofRespected Shri Hemant Karkare for his exemplary fight with terrorists and terrorism.We are equally proud of our daughter Jui for her love,devotion and commitment to father rare in this 21st century and to Smt Shobha Chitre for unfolding many lesser known aspects of Hemantji’s personality to common man like me.

Rameshwari Balsaraf

Worth reading. Really very nice article.

Pravin Apte

He was a Gem of a Person

Add Comment