आजचा दिवस चांगला गेला; कोणी आरडाओरड केली नाही; माझं ऐकून घेतलं; मी त्यांना समजावून सांगू शकलो; ही वाक्यं लिहिल्यावर माझ्या लक्षात येतंय की माझा दिवस आणि माझा आनंद दुसऱ्यांवर अवलंबून आहे. मी आत्मनिग्रही नाही हे चांगलं नाही. आयुष्यात मला वेगवेगळे धक्के खावे लागतील. जगण्याचा अर्थ आणि कृतीचं समाधान मला माझ्याच आत सापडायला हवं. तसं मी स्वतःला तयार केलं पाहिजे.
- हेमंत करकरे, वय 22, 20 ऑगस्ट 1976. (रोजनिशीतली नोंद)
पप्पा त्यांच्या पोलिसी कामात तरबेज होतेच शिवाय त्याचबरोबर त्यांना स्वतःचं घर स्वच्छ, सुंदर ठेवण्यामध्ये, हस्तकलांमध्येसुद्धा रुची होती. घरात कुठं काय शोभून दिसेल त्याप्रमाणे ते कलाकृती निवडून आणायचे. व्हिएन्नाला नेमणूक झाल्यावर अशा वस्तूसंग्रहांमधला त्यांचा (वस्तूंचा संग्रह करण्यातला त्यांचा असा) उत्साह आणखीनच वाढला. भारताच्या सांस्कृतिक वारशाचाही त्यांना खूप अभिमान होता. व्हिएन्नामधल्या लोकांना हा वारसा दाखवायचं त्यांनी निश्चित केलं. आम्हालाही या कामात ओढून घेतलं. तिथल्या आमच्या घराला आता देशोदेशीचे महत्त्वाचे अधिकारी भेट देणार होते. दिवाणखान्याच्या सजावटीसाठी खरेदी सुरू झाली. पप्पांनी दोन राजस्थानी राजा-राणी खुर्च्या मागवल्याचं मला आठवतंय. त्या आमच्या घरी पोहोचल्या. परदेशात जाण्याची वाट पाहत दिमाखात बसल्या. एक दिवस मी कॉलेजमधून आले तर खुर्च्या बेपत्ता… आईकडे चौकशी केली तर कळलं की, खुर्च्यांना परदेशात पाठवण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागणार होती. त्या खुर्च्यांसाठी एवढे पैसे उधळणं योग्य नव्हतं. पप्पांना आईचं हे मत ऐकण्यावाचून गत्यंतर नव्हतं. शेवटी त्या दोन सुंदऱ्या खुर्च्या आल्या पावली आपल्या मूळ गावी परतल्या.
यानंतर थोड्याच दिवसांत आईनी माझ्या लहान भावासाठी कपडे घेतले. ते जरा महाग होते... त्यावर पप्पा लगेच म्हणाले ‘असे कपडे तर सिनेतारकांच्या मुलाला शोभतील…’ मम्मी यावर काय बोलणार? तिला यातला उपरोध कळला होता. हे झालं एक साधं उदाहरण. पण आम्ही अशी अनेक उदाहरणं पाहत होतो ज्यातून आम्ही मुलं पैसे, त्याचं बजेट, त्याचं महत्त्व या गोष्टी लहानपणापासून शिकलो. आणखी एक… अशा सगळ्या विषयांवर मोकळेपणानं बोलणं हा आमच्या दैनंदिन आयुष्याचा भाग होता.
पप्पांची ऑफिसची गाडी कटाक्षानं त्यांच्या जाण्यायेण्यासाठीच वापरली जायची. गाडी रोज किती चालवली, पेट्रोल किती लागलं याची नोंद ठेवली जायची. याबाबतीत पप्पा अतिशय काटेकोरपणे ड्रायव्हरला सूचना देऊन रोजच्या नोंदी नीट भरून ठेवायला लावत; त्यावर बारकाईनं लक्ष ठेवत. पप्पांनी आम्हाला केलेल्या सूचनांपेक्षा त्यांच्या वागण्यातून आम्ही अनेक गोष्टी शिकायचो. पण त्यांच्या सूचना अगणित असायच्या हे सांगायला नकोच…
आम्ही प्रवाससुद्धा बसनं, लोकलनं करायचो. महागडे कपडे खास समारंभासाठीच मिळायचे. एकदा पप्पांना ट्रेनिंगसाठी दिल्लीला पाठवण्यात आलं. तिथंही ते पहिले आले मात्र तरीही त्यांनी आपला साधेपणा कायम ठेवला. ते बहुतेकदा बसनंच प्रवास करायचे. गच्चीला जोडून लागून असणाऱ्या ‘बरसाती’ नावाच्या दिल्ली स्टाईल अपार्टमेंटमध्ये राहायचे.
दिवाळीच्या सुट्टीत जेव्हा आम्ही पप्पांकडे गेलो तेव्हा त्यांचं अपार्टमेंट अतिशय स्वच्छ, चकचकीत ठेवलेलं होतं. त्यांच्या मदतीला एक ऑर्डर्ली होता. पण स्वतःचे कपडे पप्पा स्वतः धुवायचे, बुटपॉलिशही तेच करायचे. मला कपडे धुवायला पप्पांनीच शिकवलं. कपडे धुण्याचा साबण आणि ब्रश कसा वापरायचा; शर्टची कॉलर, शर्टच्या हाताजवळचा भाग स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस वापरायचा हे सारं त्यांनीच सांगितलं… शिकवलं. त्यानंतर धुतलेले कपडे गच्चीत वाळत घालायचं कामसुद्धा स्वतःच करायचं हेही सांगितलं.
डिसेंबर 2000 साली पप्पा व्हिएन्नाला गेले होते… त्या वेळेपासून पप्पांना सोडून राहायची सवय आम्हाला झाली. नाहीतर आम्ही नेहमीच त्यांच्या बदलीच्या ठिकाणी त्यांच्यासोबत राहायचो, सरकारी बंगला सजवायला त्यांच्याबरोबर शॉपिंगसाठी जायचो.
2001च्या नववर्षाच्या पूर्वसंध्येच्या आधी व्हिएन्नाला गेले. त्यांच्या मित्रांनी आम्हाला न्यू इयर पार्टीला आमंत्रित केलं होतं. पण पप्पांशिवाय ती पार्टी आम्हाला नीरस वाटली. बदली जायला कुणी नसल्यामुळे पप्पांचा व्हिएनाचा मुक्काम वाढला. स्वतःच्या कामात आणि तिथल्या भारतीय समाजाला भक्कम आधार देऊन त्यांच्यावरही पप्पांनी आपला ठसा उमटवला. युनायटेड नेशनचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी तिथे राहावं या दृष्टीनं बरेच प्रयत्न झाले पण पप्पांचं मन त्यात रमत नव्हतं. पप्पांना भारतात परतायचे वेध लागले होते.
व्हिएन्नाहून परतल्यावर मात्र त्यांची लगेच कुठं नेमणूक झाली नाही. याबद्दल वृत्तपत्रांतून, माध्यमांतून बरेच अंदाज वर्तवले जाऊ लागले. ते आंतरराष्ट्रीय दहशतवादासंबंधी उत्तम जाणकार असल्यानं त्यांना नुसतं बसवून ठेवण्यापेक्षा एटीस प्रमुख म्हणून नेमावं अशा बातम्या वृत्तपत्रं देऊ लागली.
पप्पांना अशा अफवा पसरवणाऱ्या बातम्या वाचून खेद वाटायचा. ते म्हणत, ‘मला कळतच नाही… वर्तमानपत्रं अशा तऱ्हेच्या बातम्या कशा छापतात? मला तर कुठल्याही पदाची हाव नाही… अशा बातम्या वाचून लोकांचा गैरसमज होऊ शकतो की, मलाच ते पद हवं आहे. त्यामुळे मीच या बातम्या उठवतोय. कोणतंही काम मला मिळालं तरी मी ते उत्तमरीत्या करून त्या कामाला न्याय मिळवून देणार.’
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख म्हणून थोड्याच दिवसांत त्यांची नेमणूक झाली. त्यांनी अतिशय उत्साहानं, जोमानं या कामाचा ताबा घेतला. ते म्हणाले, ‘निर्लज्जपणे लाच घेणाऱ्या मोठ्या माशांना पकडण्याची माझी इच्छा आहे. एकदा जर असे लोक पकडले गेले तर समाजालाही धडा मिळेल... त्यामुळं खालच्या स्तरावर लाच खाणाऱ्यांना आपोआपच भीती वाटेल.’ त्यांनी माहिती काढायला सुरुवात केली. कुठलं खातं जास्त लाचलुचपत करतं याबद्दलचे लोकांचे विचार जाणून घ्यायला सुरुवात केली. उदाहरणार्थ, इन्कम टॅक्स, ट्रॅफिक, प्रशासन, महाराष्ट्र इलेक्ट्रिक बोर्ड की त्यांचं पोलीस खातं…
लोक जेव्हा एखाद्या विशिष्ट खात्यातल्या किंवा खात्यांतल्या लाचलुचपतीबद्दल बोलत तेव्हा ते म्हणायचे, ‘एखादं खातंच्या खातं लाचलुचपत करत नाही. त्यातले काही ठरावीक लोक करतात. सत्तेचा दुरुपयोग करून लाच खातात. त्यांना कळत नाही की, ते ज्या पदावर आहेत, जी सत्ता त्यांच्याकडे आहे ती लोकांच्या सेवेसाठी, समाजकल्याणासाठी आहे. त्यांना जर वाटत असेल की, सरकारकडून जेवढे पैसे त्यांना मिळतात त्याहून अधिक मिळायला हवेत, तर अशा लोकांनी इथं राहून लाच घेण्यापेक्षा किंवा लाचखोरांना खूश ठेवण्यापेक्षा खुशाल खासगी कंपनीत रुजू व्हावं किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. लाच घेणं हा फक्त सामाजिक गुन्हाच नाही तर भयंकर अनैतिक कृत्य आहे. अशा तऱ्हेचा पापाचा पैसा कुणाला पचवता येणार नाही.’
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख झाल्यावर लगेचच पप्पांनी नागपूर इंप्रुव्हमेंट ट्रस्टच्या लाचखाऊ अधिकाऱ्याला पकडलं. त्याचे लागेबांधे वरपर्यंत होते. या बातमीनं तिथल्या रहिवाशांना इतका आनंद झाला की, त्यांनी ‘एनआयटीच्या लाचखोरांची धुलाई केल्याबद्दल धन्यवाद, हेमंत करकरे. आता आम्ही म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या धुलाईची वाट पाहतो.’ अशा तऱ्हेचे फलक रस्त्यांच्या बाजूंना लावले.
समाजातल्या काही प्रतिष्ठितांनी पप्पांना भेटून तडजोड करण्याविषयी सुचवलं. पप्पांनी अगदी शांत सुरात त्यांना सांगितलं, ‘तुम्ही ज्यांची वकिली करताय त्यांना तुम्ही या कामाची खातरी देऊन आलेला नाही ना… आणि तुम्हीच तर यात गुंतलेले नाही ना?’ ते गृहस्थ वरमले. पप्पा पुढं म्हणाले, ‘या आरोपीनं आम्हाला लाच देण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा ही रक्कम सरकारी खजिन्यात जमा करून समाजकल्याणासाठी द्यायला हवी. काही लोक असं करतातही… जर प्रत्येकानं लाचलुचपत करून मिळवलेले पैसे सामाजिक सुधारणांसाठी दिले तरी देशाची प्रगती होईल.’
पप्पांना या प्रामाणिकपणाची किंमत मोजावी लागली. तडकाफडकी त्यांची बदली प्रशासन खात्यात झाली. पप्पा यामुळे जराही अस्वस्थ झाले नाहीत. आपल्याला बाजूला काढलं असं न मानता ते म्हणाले, ‘इथेसुद्धा करण्यासारखं खूप काही आहे. माझ्या पोलीस बांधवांचं आयुष्य अतिशय खडतर आहे. मी मुंबई पोलिसांचं राहणीमान सुधारण्यासाठी, त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी अथक परिश्रम करेन.’ त्यांनी पोलीसदलासाठी राबवलेल्या अभूतपूर्व योजना उपयोगी ठरल्या.
एक दिवस अचानक त्यांची बदली एटीएस प्रमुख म्हणून झाली. के.पी. रघुवंशी यांच्याकडून त्यांनी या पदाचा ताबा घेतला. नेहमीप्रमाणेच अतिशय उत्साहानं त्यांनी ही नवी जबाबदारी स्वीकारली. त्यांचा दहशतवाद्यांशी सामना करण्याचा अनुभव, अभ्यास, तसंच नक्षलवाद्यांच्या हालचाली आणि अमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्यांचा दहशतवाद यांतला अनुभव या सगळ्यामुळे ते या पदासाठी निवडले गेले. ते नेहमी लोकांना एक मुद्दा स्पष्ट करून सांगायचे, ‘मी दहशतवाद विरोधी पथकाचा प्रमुख आहे. दहशतवादी विरोधी पथकाचा नाही. हे जाणून घ्यायला हवं की, दहशतवादी सामान्य गुन्हेगार नसतात. ते कट्टर विचारधारेला पाठिंबा देणारे असतात. आपल्याला असं वातावरण निर्माण करायला हवं की, त्यातून अशा तऱ्हेची विचारसरणी हद्दपार होईल. अशा तऱ्हेच्या कृत्यांमुळे त्यांच्या हाती काही लागणार नाही हा धडा त्यांना मिळायला हवा. दहशतवाद, खूनखराबा हे सर्व यांतूनच निर्माण होतं. आजच्या आधुनिक युगात या गोष्टींना स्थान नाही. सामाजिक, नैतिक तत्त्वांना लागलेली ही कीड आहे. या दहशतवाद्यांना धर्म नसतो. ते एकूण मनुष्यजातीच्याच विरोधात असतात.’
पप्पा वेगवेगळ्या ठिकाणच्या पोलीस खात्यांत काम करताना त्यांना माहिती पुरवणाऱ्यांचं एक जाळं नेहमी तयार करायचे. एकदा एखाद्याचा विश्वास संपादन केला की तो आयुष्यभरासाठी असायचा. त्याचबरोबर आयबी, रॉ, सीबीआय, स्टेट इंटलिजन्स डिपार्टमेंट आणि इंटरपोल यांच्याशी त्यांची जवळीक होती. ते 24×7 काम करायचे.
एकदा एक जवळचे नातेवाईक पप्पांना भेटायला आले. अचानक पप्पा म्हणाले ‘मला जरा कामाला बाहेर जायचंय, तुम्ही येणार का कंपनी द्यायला?’ दोघं गाडीत बसले. नक्की कुठे जायचंय हे न सांगता कोणत्या रस्त्यानी जायचंय याच्या सूचना पप्पांनी ड्रायव्हरला दिल्या. एकदम त्यांनी ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली. त्यांच्या बरोबरच्या टीमला मागे थांबायला सांगून त्यांनी आपण कोपऱ्यापर्यंत जात असल्याचं सांगितलं. ते त्या नातेवाइकाबरोबर गप्पा मारत एका गल्लीत शिरले. एकदम एका ठिकाणी थांबले. त्या नातेवाइकानी एक अस्पष्ट आकृती तिथून डोकवताना पाहिली. ‘एक मिनीट थांबा…’ असं त्यांना सांगून ते त्या व्यक्तीकडे पोहोचले. तिच्याशी काही बोलणं झालं. ती व्यक्ती पळाली. त्या भयचकित झालेल्या नातेवाइकाला पप्पा म्हणाले ‘तो खबऱ्या होता म्हणून गुप्तता ठेवून असं भेटणं भाग होतं. त्यालाही स्वतःच्या जिवाची भीती आहेच. बातमी जितकी महत्त्वाची तेवढा ती पुरवणाऱ्याच्या मागचा धोकाही… त्यामुळे अतिशय गुप्तता बाळगून भेटणं अधिक महत्त्वाचं.’
आपण नेहमी ऐकतो की, कुणीतरी केलेल्या चांगल्या कामाचं श्रेय दुसराच कुणीतरी घेतो. पप्पा मात्र ज्याचं माप त्याच्या पदरात घालायचे. एकदा पप्पा एका गुन्हेगाराला पकडणार होते. त्यांच्या टीमनी सगळी माहिती गोळा केली पण कशी कुणास ठाऊक... ती बातमी दुसऱ्या पोलीसपथकाला मिळाली. त्यांनी घाई करून त्या गुन्हेगाराला पकडून मुंबईला आणलं. हे एटीएसचं युनिट तुलनेनं लहान होतं. त्यांच्याकडे साधनांची कमतरता होती. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात दुसऱ्या पोलीसपथकाचे फोटो, बातम्या झळकल्या. त्यात एटीएसला टोमणा मारण्यासाठी एका वर्तमानपत्रानं फोटोला मथळा दिला ‘या फोटोमध्ये नसलेला माणूस शोधा.’ पप्पांच्या एका मित्रानं झाल्या प्रकारामुळे तुला काय वाटलं अशी पप्पांकडे विचारणा केली. ते नेहमीप्रमाणे हसून म्हणाले, ‘कुठूनतरी गुन्हेगार पकडला गेला हे महत्त्वाचं. कुणी पकडला याला महत्त्व नाही. हा मुंबई पोलिसांसाठी आणखी एक मानाचा तुरा.’
...मात्र या प्रकरणात त्यांच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांनी आपला तीव्र मतभेद व्यक्त केलाच. पप्पांनी लगेच एक मिटिंग घेतली आणि त्यांचं कसब पणाला लावून या लोकांना नैतिक बळ दिलं. त्यांनी हा झाला प्रकार त्यांच्या खात्याच्या प्रभारी मंत्र्यांना कळवला आणि त्यांना या मंडळींशी बोलून त्यांचा उत्साह वाढवण्याची विनंती केली. मंत्र्यांनी या विनंतीला मान देऊन या संपूर्ण एटीएस टीमला त्यांच्या घरी चहापानासाठी निमंत्रित केलं.
मधल्या काळात पंतप्रधानांनी पप्पांची निवड मेगा पोलिसिंगसाठी केली. (सात महानगरांमध्ये इंटेलिजन्स वाढवून पोलिसांचं बळ वाढवण्यासाठी मेगा पोलिसिंग सुरू करण्यात आलं होतं.) कामासाठी पप्पा दिल्लीला गेले होते. तिथे मिटिंगमध्ये असताना, त्यांना ठाण्याच्या गडकरी रंगायतनच्या सभागृहात बॉम्बस्फोट झाल्याची बातमी मिळाली. या प्रकरणाची माहिती गोळा करून ती फाईल घरी पाठवण्यास सहकाऱ्यांना सांगितलं. ते तातडीनं मुंबईला परतले. त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्री साडेअकरा वाजता ही फाईल घरी पोहोचवली... सोबत 'सरांना ही ताबडतोब द्यावी' हा निरोप. पप्पा रात्री दीड वाजता घरी पोहोचले. पायांतले शूज काढल्यानंतर 'कुणी फाईल आणून दिली का' याची चौकशी त्यांनी लगेचच केली. फाईल आलेय हे कळताच कोट हँगरला लावून, टाय काढून ते पहाटे चारपर्यंत या फाईलमधली माहिती वाचत होते. पुढं काय, कसं करायचं हे ती माहिती वाचून झाल्यानंतर त्यांनी ठरवलं.
सकाळी सात वाजता त्यांनी ऑफिसला हजेरी लावली. सोळा जणांचा गट तयार केला. चोवीस तासांच्या आतच त्यांनी गुन्हेगाराला शोधलं.
पप्पांचा एक सहकारी म्हणाला, ‘आरोपी साधासुधा माणूस आहे. त्याच्याकडून हे कृत्य होण्याची शक्यता नाही.’
पप्पा शांतपणे म्हणाले ‘माझ्याकडे आरोपीविरुद्ध भक्कम पुरावा आहे. आम्ही तो तपासतोय. जर तो निरपराध असेल तर सुटेलच याची खातरी बाळगा. मात्र तो दोषी शाबीत झाला तर कायदेशीर मार्गानी त्याचा समाचार घेऊ. इतक्या निरपराध माणसांचे प्राण धोक्यात घालणाऱ्याच्या गुन्ह्याला माफी नाही.’
आरोपी त्या बॉम्बस्फोटात सामील असल्याचं थोड्याच दिवसांत सिद्ध झालं.
26/11ला पप्पांचा मृत्यू झाल्यानंतर या ठाण्याच्या केसमधल्या त्या सहकाऱ्याचा आम्हाला फोन आला. तो म्हणाला ‘माझं सर्वात मोठं दुःख म्हणजे त्या 26/11च्या रात्री मी सरांबरोबर नव्हतो.’
पप्पा एटीएसचे प्रमुख असताना त्यांना सतत दिल्ली, हैदराबाद, बंगलोर या शहरांत तपासासाठी जावं लागे. त्याच काळात मालेगावला बॉम्बस्फोट झाला आणि त्यांनी आपणहून ते काम अंगावर घेतलं. त्यांनी तिथल्या स्थानिक मंडळींची भेट घेतली. ते लोक म्हणाले, ‘आम्ही हात जोडून विनंती करतो की, या गुन्ह्याच्या मुळाशी जाऊन शोध घ्या. याच्यामागे असणाऱ्या गुन्हेगारांना सक्त सजा करा.’ पप्पांनी या मंडळींना आश्वासन दिलं की, कायद्यानं गुन्हेगारांना शिक्षा होईलच. गुन्हेगारांना शोधणं हे त्यांचं कर्तव्य आहे.
पप्पांचं आयुष्य कामाला वाहिलेलं होतं. त्यांचं काम हाच त्यांचा धर्म होता आणि तोच त्यांचा परमेश्वरही. ते सांगायचे, ‘जो माझ्या देशाला नुकसान पोहोचवेल त्याला त्याचे कायदेशीर परिणाम भोगावेच लागतील हे सगळ्यांना कळायला हवं.’
त्यांना आलेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांना त्यांनी कधी भीक घातली नाही. त्यांना वेगवेगळ्या भागांतून धमक्या यायच्या. त्यांचं म्हणणं ‘सत्य हे फार काळ लपून राहणार नाही.’
या काळात ते सकाळी लवकर, रात्री उशिरा चालायला जायचे. त्यांच्या जवळच्या मित्रांना फार काळजी वाटायची. ते पप्पांना सांगायचे, ‘बॉडीगार्ड असल्याशिवाय कुठे जाऊ नकोस. बुलेटप्रुफ जॅकेट घालून जात जा. जवळ पिस्तूल बाळग.’ पप्पांचं याला एकच उत्तर… ‘मी असल्या धमक्यांना महत्त्व देत नाही. माझ्या नशिबात हौतात्म्यच असेल तर बुलेटप्रुफ जॅकेट, पिस्तूल किंवा संरक्षकही मला मदत करू शकणार नाहीत.’
त्यांना 25 नोव्हेंबरला 2008ला धमकी आली होती की, त्यांचं पुण्याचं घर उडवण्यात येईल. ते हसून म्हणाले ‘माझं पुण्याला घर असलं तर ना ते उडवतील!’
ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार पप्पांना चंद्रपूरच्या दिवसांपासून ओळखत होते. नोव्हेंबरच्या एका संध्याकाळी त्यांनी त्यांच्या मुव्हीच्या प्रिमिअर शोसाठी पप्पांना निमंत्रित केलं. पप्पा त्यांच्या कामात कमालीचे व्यग्र असतानाही त्यातून वेळ काढून या कार्यक्रमाला पोहोचले. कुणीतरी द्वादशीवार यांना सुचवलं, ‘जरा हेमंतला सांगा स्वतःची काळजी घ्यायला.’ द्वादशीकर लगेच पप्पांजवळ पोहोचले, ‘हेमंतभाऊ, ऐकलंत का... हे मला सांगतात की, मी तुला काळजी घ्यायला सांगावं म्हणून पण मला या आतंकवाद्यांना सांगावसं वाटतं काळजी घ्या. हेमंत करकरे आता एटीएस प्रमुख आहेत.’ पप्पा हसून म्हणाले, ‘सरऽ हे युद्ध आहे. अंतिम विजय सत्याचाच होणार पण हे या आतंकवाद्यांना कोण सांगणार?’
त्या दिवसांत नोव्हेंबरमध्ये पप्पा सतत कामात गुंतलेले असायचे. अगदी जवळच्या मित्रांशी, नातेवाइकांशी बोलणं, त्यांना फोन करणं यासाठीही त्यांच्याजवळ वेळ नसायचा. एकामागोमाग एक मिटिंग चालायच्या. त्यांनी त्यांचा फोननंबर बदलला आणि मिटिंगच्या दरम्यान मोबाईलही बंद ठेवायचे त्यामुळे कुणालाही त्यांच्याशी संपर्क साधणं कठीण व्हायचं.
25 नोव्हेंबरला वरिष्ठ आयपीएस अधिकारी अरविंद इनामदार यांनी नागपूरला केलेल्या भाषणात पप्पांचा खूप गौरव केला. पप्पांच्या नातेवाइकांना हे ऐकून अभिमान वाटला. त्यांनी शिरीषकाकाला, पप्पांच्या भावाला ही बातमी सांगितली. शिरीषकाकानी पप्पांना फोन केला, 'गडबडीत आहेस का?’
पप्पा, (पप्पांनी विचारलं,) ‘काही विशेष?’
शिरीषकाका म्हणाला, ‘काल अरविंद इनामदारांनी नागपूरला भाषण केलं. त्यात तुझं खूप कौतुक केलं.’
‘हे बरं झालं तू कळवलंस ते. मला त्यांना फोन करायला हवा. मी त्यांच्याशी बोलेन. आज संध्याकाळचा काय बेत आहे तुझा? माझ्या ऑफिसला ये. बरोबर घरी जाऊ. जेवण करू… आणि थँकयू... मला भाषणाचं कळवलंस त्यासाठी.’
शिरीषकाकाला पप्पांकडून ‘थँकयू’ ऐकून आश्चर्य वाटलं. कदाचित इमानदारांसारख्या अधिकारी व्यक्तीकडून त्यांच्या कामाची दखल घेतल्याची बातमी शिरीषकाकानी दिल्याबद्दल पप्पांना बरं वाटलं असेल. पप्पा छान मूडमध्ये होते. त्यांनी सहकाऱ्याला त्यांच्यासाठी दूध आणि साखर घालून चहा आणायला सांगितलं. सहसा ते बिनदूध-साखरेचा चहा घ्यायचे. त्यानंतर त्यांनी पोलीस कमिशनरांची आणि नंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. ते परत त्यांच्या ऑफिसला पोहोचले. घरी जायचं म्हणून त्यांनी नऊ वाजता ऑफिस सोडलं. छत्रपती शिवाजी टर्मिनल स्टेशनवर (सीएसटीवर) गोळीबार चालल्याची बातमी ते वाटेत असतानाच त्यांना वायरलेसवरून मिळाली. ते घरी पोहोचले. पटकन काहीतरी खाऊन लगेच निघायचं असल्याचं ड्रायव्हर, वायरलेस ऑपरेटर आणि शरीरसंरक्षक यांना सांगितलं. कुठे खायचं… यावर ही मंडळी बोलत असतानाच घरात शिरलेले पप्पा, धावत बाहेर पडले. त्यांनी आज्ञा केली, ‘चला, शक्य तितक्या लवकर सीएसटीला पोहोचायचंय.’
(अनुवाद: शोभा चित्रे)
- जुई करकरे - नवरे
jui.navare@gmail.com
वाचा 'माझे पप्पा हेमंत करकरे' या लेखमालेतील इतर भाग
शेवटचा प्रवास...
हेवा वाटावा असे वीरमरण...
संकटसमयी सगळ्यांच्या पुढे उभा राहून लढणारा धैर्यधर...
बुलेटप्रुफ जॅकेटचा अपशकुन
Tags: लेखमाला जुई करकरे जुई करकरे - नवरे माझे पप्पा : हेमंत करकरे मुंबई दहशतवादी हल्ला 26/11 अँटी टेररिझम स्क्वॉड दहशतवाद विरोधी पथक एटीएस हेमंत करकरे भाग 6 Marathi Series Jui Karkare Majhe Pappa : Hemant Karkare My Pappa : Hemant Karkare Hemant Karkare: A Daughter's Memoir Part 6 Jui Karkare- Navare माझे पप्पा हेमंत करकरे Load More Tags
Add Comment