सहकाऱ्यांनी जागवलेल्या आठवणी - उत्तरार्ध

माझे पप्पा हेमंत करकरे - भाग 14

रवी पाटील आयपीएस अधिकारी. 2004च्या पप्पांच्या तुकडीतले. 26/11च्या हल्ल्याच्या वेळी यांची नेमणूक 'सायबर क्राईम ॲन्ड फोरेन्सिक महाराष्ट्रा'च्या दहशतवादी पथकाच्या विभागात झाली होती. त्यामुळं त्यांना पप्पांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली. पप्पांच्या एकंदर व्यक्तिमत्त्वाचा आणि कामाच्या पद्धतीचा ठसा त्यांच्यावर उमटला. पप्पांच्या रूपात त्यांना लाभलेला त्यांचा मित्र, तत्त्वज्ञ, मार्गदर्शक गमावल्यावर मनाच्या गाभ्यातून उमटलेले विचार कागदावर उतरले.

दहशतवाद्यांच्या हल्ल्याचे वृत्त कळताच पप्पा हेल्मेट घालून, बुलेटप्रुफ वेस्ट घालून घटनास्थळी निघाले. त्यांची क्षणभरही चलबिचल झाली नाही. मात्र अनेकांनी या धाडसी कृत्यावर टीका केली. उघडपणे त्यांचं विरोधी मत व्यक्त केलं. त्यांच्या मते करकरे यांनी इतकी घाई करण्याचं कारण नव्हतं. रवी पाटील यांची ही श्रद्धांजलीच सांगेल की, पप्पा नेहमीच आघाडीवर राहून लढणारे होते. 26/11 त्याला अपवाद नव्हता.


आघाडीवरून नेतृत्व करणारा
आयपीएस अधिकारी रवी पाटील यांच्या आठवणी... 

मी पोलीसदलात भरती झालो तेव्हा मनात भव्य स्वप्नं होती, मूल्यं होती. जिथं माझी नेमणूक झाली तिथं मी बदल घडवू इच्छित होतो. माझ्या या आदर्शवादी विचारसरणीवर भोवतालचे लोक उपहासानं बोलायचे. म्हणायचे, ‘येणारा प्रत्येक नवीन उमेदवार अशीच मूल्यं घेऊन येतो, स्वप्नं बघतो. पण काही वर्षांतच ती अडगळीत जातात. त्यांवर गंज चढतो.’ 

पण मी नाउमेद झालो नाही. कारण आयपीएस होण्याआधी मी इंडिअन ट्रेड सर्व्हिसेसमधे होतो आणि माझ्या सुदैवानं तिथं दोन अतुलनीय व्यक्तींशी माझा संबंध आला. त्यांच्या स्वप्नांसमोर आणि चिकाटीसमोर असल्या नाउमेद करणाऱ्यांचा टिकाव कधीच लागला नाही. माझ्या उमेदीच्या काळात हेमंत करकरे यांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. एकाच माणसात एवढे गुण, उत्तम नेतृत्व तर होतंच शिवाय माणूस म्हणूनही ते फार चांगले होते. 

दहशदवाद्यांनी 26/11च्या रात्री मुंबईवर हल्ला केला तेव्हा मी ओबेरॉय हॉटेलच्या परिसरात होतो. कानठळ्या बसवणारा तो बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज, बॉम्बस्फोट. लोक घाबरून सैरावैरा पळत होते. मी कबूल करतो की, मीही घाबरलो होतो. लपण्यासाठी सुरक्षित जागा शोधात होतो. मी पळत सुटलो. पंचवीस-तीस मीटर पळालो आणि मग मी स्वतःलाच प्रश्न केला, 'मी का पळतोय? मी पोलीस अधिकारी आहे. माझ्याकडं शस्त्र आहे. अशा प्रसंगात आघाडीवर राहण्याचं शिक्षण मी घेतलंय. जर मीच असा पळालो तर सर्वसामान्यांची काय दशा?'

मी स्वतःला सावरलं. माझ्या सहकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्या सल्ल्यानुसार मदतीसाठी पुढं झालो. सुरुवातीला मी गोंधळलेला होतो. माझ्यातला सामान्य माणूस माझ्यातल्या पोलीस अधिकाऱ्याशी झगडत होता. निःसंशय आणि निर्विवादपणे याच्या अगदी विरुद्ध होते करकरे साहेब. छत्रपती शिवाजी स्थानकावरच्या हल्ल्याची बातमी त्यांना कळली. ते लढण्यासाठी लगेच तयार झाले. कुणी आघाडीवर जायचं हा प्रश्नही त्यांच्या मनाला शिवला नसेल. ‘मी जिथं आहे तिथं मीच आघाडीवर लढायला जाणार...' या बोधवाक्यानंच त्यांनी पोलीसखात्यात काम केलं. त्यांनी निर्णयाची घाई केली अशी शंका घेणाऱ्यांना हे माहिती नसावं. 

दुसरी शंका म्हणजे या हल्ल्यात इतक्या ज्येष्ठ अधिकाऱ्याचा बळी कसा गेला? मी याला प्रतिप्रश्न विचारू इच्छितो. दुर्दैवानं अशीच परिस्थिती परत आली तर बळी कोण जाईल असं तुम्हाला वाटतं? देवाच्या दयेनं तो प्रसंग न येवो. पण मला खातरी आहे की, आजही आपला सर्वोत्तम अधिकारीच आघाडीवर लढेल. एकाग्रता, उत्तम चारित्र्य असलेले लोकच अशा भयंकर प्रसंगाला सामोरं जाऊ शकतात. वरिष्ठ अधिकारी फक्त एकत्र मंत्र जाणतात, 'देशाचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे आणि या कर्तव्याचं पालन करणं हाच माझा धर्म आहे.' ज्याला हे तत्त्वज्ञान उमगलंय तो कुठल्याही परिस्थितीला न डगमगता सामोरा जातो. असा लाखात एक अधिकारी असतो. आमचे करकरे सर तसे होते. 

आपल्या टीमला कामाचं श्रेय द्यायचं आणि टीकेचे धनी आपण व्हायचं हा चांगल्या नेतृत्वाचा मानदंड मानला जातो. मालेगाव बॉम्बस्फोटातल्या एटीएसच्या तपासावर फार मोठ्या प्रमाणात टीका झाली. करकरे सर ज्या ठामपणे त्याला सामोरे गेले ते आमच्यासाठी प्रेरणादायी होतं. या टीकेमुळं त्यांच्या टीमच्या प्रतिमेला, नैतिकतेला तडा जाऊ नये म्हणून भरपूर खबरदारी घेतली. 

सामोरं जाऊन भिडणं त्यांना आवडायचं. त्यांनी कधीही काढता पाय घेतला नाही. त्यांची टीम रात्री, अपरात्री तीन-तीन वाजेपर्यंत काम करत असली तर ते त्यांच्या सोबत असायचे. ते नेहमी मला सांगायचे, 'तुला कोणतीही बातमी अगदी रात्री, अपरात्री कळली तरी मला लगेच फोन करायला कचरू नकोस.' मी त्यांना सकाळी चार वाजता जरी फोन केला असता तरी ते ताबडतोब माझ्या ऑफिसमध्ये आले असते. मी पहाट होईपर्यंत कामात राहिलो असतो तर तेही माझ्याबरोबर जागे राहिले असते.

सरांचा कायद्याचा सखोल अभ्यास होता. त्यांना कायद्याचे विभाग, उपविभाग माहीत होते. बोलता-बोलता ते अगदी सहज याबाबतीतले संदर्भ द्यायचे. सर तत्त्वज्ञान, धर्म, संस्कृत यांत प्रवीण होते. कधी बोलताना ते संस्कृत कविता आणि भगवद्गीतेचे संदर्भ द्यायचे. ते कलावंत होते. त्यांच्या ऑफिसमध्ये लाकडाच्या शिल्पांचा संग्रह होता. ती शिल्पं त्यांनी स्वतःच तयार केली होती. या साऱ्यातून त्यांचं विविधरंगी व्यक्तिमत्त्व दिसतं.

मी त्यांच्या सहवासातून अनेक गोष्टी शिकलो. त्यांची फोनवर बोलण्याची पद्धत, त्याचं इंग्लीश भाषेवरचं प्रभुत्व, त्यांचं पत्रलेखन इत्यादी बारीकबारीक गोष्टी लक्षपूर्वक पाहून मी खूप काही शिकलो. पत्रकार परिषदेत अतिशय सौम्य स्वरात बोलूनही भेदक आणि ठाम संदेश कसा द्यायचा, मनावर ताबा ठेवून शांत मनानं तणावपूर्ण काळात कसं वागायचं हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो. सरांनी आम्हाला प्रसिद्धीपासून दूर राहून, डोक्यात हवा शिरू न देता फक्त कामावर लक्ष केंद्रित करणं दाखवलं. ते नेहमीच जमिनीवर पाय रोवून उभे होते. 

‘कायदा हा धर्मापेक्षा श्रेष्ठ’ हे कागदावर स्वीकारणं सोपं आहे. पण रोजच्या व्यवहारात प्रत्येक पावलावर धर्म आणि जात त्यांचं डोकं वर काढतातच. जी व्यक्ती या सर्वांच्या पलीकडे जाऊन समाजाच्या हिताचा विचार करते ती खऱ्या अर्थानं श्रेष्ठच... म्हणूनच सरांच्या या बलिदानानं सर्व देशभक्तांची मनं उचंबळून येतील. 

कर्तव्य बजावताना त्यांनी कधी हिंदू-मुस्लीम असा भेदभाव केला नाही. त्यांनी कुणाच्या दडपणाचा विचार केला नाही. भगवद्‌गीतेत म्हटलंय त्याप्रमाणे ‘सर्व धर्माचा त्याग करून तू माझ्यात विलीन हो...’ हे वचन आचरणारे असे आमचे सर होते. हे तत्त्वज्ञान जाणण्याची ताकद त्यांच्यात होती. त्यांचा मृत्यू हे फक्त एटीएसचं नुकसान नाही तर देशाचं नुकसान आहे. कायद्याचं सखोल ज्ञान असणारा, ते अमलात आणणारा आणि आत्मसात केलेला प्रामाणिक अधिकारी आता आपल्यामध्ये नाही.

सर कार्यरत असताना तर त्यांचं कर्तृत्व मोठं होतंच शिवाय त्यांच्या बलिदानानं त्यांचं नाव अजरामर झालं. आपल्या टीमला ते समजून घ्यायचे. आपल्या टीमसोबत त्यांचं भावनिक नातं जुळायचं. सरांमुळे टीममध्ये चैतन्य असायचं. त्यांच्या मृत्यूनं आम्हाला पोरकं केलं. सर आमची प्रेरणा होते. त्यांना अभिमान वाटेल अशीच आम्ही आमची वर्तणूक ठेवू. तसंच काम करू.


एक अपरिहार्य ताकद
पप्पांचे वर्गमित्र, महाराष्ट्र पोलीसचे माजी डायरेक्टर जनरल दत्ता पडसलगीकर यांच्या आठवणी...

हेमंत हे जग सोडून गेल्याची वार्ता आली आणि 'ओ सोविनिअर्स' एकोणिसाव्या शतकातला फ्रेंच साहित्यातला दादा माणूस व्हिक्टर ह्युगो याचा आक्रोश माझ्या मनात घणघणत राहिला. आठवणींचं भांडारच माझ्या डोळ्यांसमोर उघडलं गेलं. हेमंतच्या नसण्याची जाणीव अजून ठळक नव्हती. तो माझा अतिशय जवळचा मित्र. मला सतत ऊर्जा पुरवणारा, पाठिंबा देणारा सहकारी. त्याहीपेक्षा हेमंत एक विलक्षण माणूस होता. त्यानं जे काही केलं ते भव्यदिव्यच केलं.

1984चे महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशीकमधले आमचे दिवस आठवतात. हेमंत चांगल्या पगाराची मल्टीनॅशनल कंपनीतली नोकरी सोडून पोलिसात आलेला. आमच्या बॅचच्या सगळ्यांनाच त्याच्याविषयी उत्सुकता होती. आम्ही सगळे महिन्याला जेमतेम सातशे रुपये मिळवणारे. समाजाला उपयोगी पडण्यासाठी 'पब्लीक सर्व्हीस'मध्ये भाग घेण्याची हेमंतची इच्छाशक्ती जबरदस्त होती. त्यामुळंच तो करिअरच्या बाबतीतला इतका महत्त्वाचा निर्णय घेऊ शकला. एकदा याविषयी बोलताना तो म्हणाला, 'कॉर्पोरेट नोकरीत वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक करण्यापेक्षा; जाहिरातींचा त्यांच्या मालावर कसा, काय आणि किती परिणाम होतोय यावर चर्चा करण्यापेक्षा; पोलिसांनी मदत केल्यामुळं एखाद्या म्हातारीच्या चेहऱ्यावर जे हसू उमटतं ते जास्त समाधान देणारं आहे. आधीच्या नोकरीत आयुष्याच्या कक्षा मर्यादित होत्या.' 

मला तेव्हाची एक जाहिरात आठवतेय... ‘ही साबूची पावडर लपून राहिलेले जंतू नष्ट करेल.’ मी अनेकदा ही म्हणून हेमंतला चिडवायचो. 

आठ महिन्यांच्या ट्रेनिंगनंतर अकादमीनं आम्हा प्रशिक्षकांच्या बायकांना इथं येण्याची परवानगी दिली. आमच्या दोघांच्याही बायका तेव्हा नागपुरात होत्या. हेमंतची बायको कवितावहिनी, त्यांची दोन वर्षांची मुलगी जुई आणि माझी बायको अदिती या रात्रीच्या ट्रेननं हैदराबादला येणार होत्या. त्यांना घ्यायला मी स्टेशनवर गेलो तेव्हा कळलं की, चक्रीवादळामुळं पूर येऊन रेल्वेचे ट्रॅक्स वाहून गेलेत. त्यामुळं काझीपेठच्या पुढची सर्व व्यवस्था कोलमडलीये. हे काझीपेठ होतं 130 किलोमीटरवर. 

नेहमीप्रमाणे ट्रेनविषयी किंवा पॅसेंजरविषयी काही माहिती उपलब्ध नव्हती किंवा ट्रॅक्स पूर्ववत कधी होतील हेही कळत नव्हतं. मी स्टेशनवरून परतलो. या परिस्थितीत काय करावं हे आम्हा दोघांना सुचत नव्हतं. आम्ही काळजीत होतो. एकदम हेमंतला एक वेगळीच कल्पना सुचली. आम्ही दोघं अगदी वेगानं आमचे डेप्युटी डायरेक्टर एस. सुब्रमणीयम यांच्याकडं गेलो. 

एक नावाजलेले पोलीस अधिकारी आणि स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपचे जनक, डॉ. सुब्रमणीयम यांनी त्यांच्या पद्धतीनं सूत्रं हाती घेतली. आंध्र पोलीस रेल्वेला सावध केलं. डॉ. सुब्रमणीयम यांच्या ऑफिसमधून तासाभरातच आम्हाला बोलावणं आलं. त्यांनी आम्हाला वायरेलसचा संदेश दाखवला. ते शब्द अजूनही माझ्या मनात कोरले गेले आहेत. 'बायका आणि लहान मुलं, सगळ्यांचा तपास लागला. सुरक्षित आहेत. हैदराबादला येणाऱ्या पहिल्या बसमध्ये त्यांना बसवलंय. - काझीपेठ रेल्वे पोलीस.' आम्हाला हुश्श झालं. हेमंतच्या चेहऱ्यावरची चिंता दूर झाली. या प्रसंगानं आमच्या बायकांना पोलिसांच्या तत्परतेची, त्यांच्या नेटवर्कची झलक दिसली आणि छोट्या जुईला पंचलाईन मिळाली 'माझे पप्पा – पोलीस'.

अकादमीत हेमंतनं सगळ्यांना मागं टाकलं. कायद्यातली पदवी असणाऱ्यांपेक्षा जास्त प्रावीण्य त्यानं कायद्यात मिळवलं. नवीन विषयाला तो नियोजनपूर्ण अभ्यासानं भिडायचं. पोलीसदलात काम करण्याची तीच उत्कृष्ट पद्धत होती म्हणूनच ज्या-ज्या हुद्द्यावर तो गेला तिथं त्यानं प्रत्येक प्रश्न विलक्षण समजंसपणे, व्यापकतेनं हाताळला. त्यानं मनाचा तोल कधी ढळू दिला नाही. कुठल्याही प्रश्नाला सामोरं जाताना चिडचिड केली नाही.

आमच्या बॅचला 25 वर्षं पूर्ण झाली त्या निमित्तानं डिसेंबर 2007मध्ये आम्ही अकादमीत जमलो. अर्ध्याहून अधिक वर्गमित्र आले. या 25 वर्षांत अकादमीत खूप उलथापालथ झाली. बदल झाले. आमच्या सगळ्यांच्या आयुष्यातले जुने आणि नवे फोटो पडद्यावर दाखवले गेले. हेमंतनं त्या संध्याकाळच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करून आम्हाला पूर्वीच्या दिवसांच्या आठवणींची मेजवानीच दिली. हेमंतच्या आग्रहाखातर आम्ही जुने वर्ग, ग्राउंड, आमच्या खोल्या यांना भेट देऊन त्या जुन्या आठवणींच्या रस्त्यावरून मनमुराद भटकलो.

मे 2005ला संयुक्त राष्ट्र संघाच्या व्हिएन्ना इथं होणाऱ्या परिषदेसाठी जाण्याची संधी मला मिळाली. त्या वेळी हेमंत तिथंच होता. हेमंतनं आमची टीम, मी आणि आयएएस अधिकारी ए. के. श्रीवास्तव यांच्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था आधीच करून ठेवली होती हे वेगळं सांगायला नको. आम्ही विमानतळावर उतरल्यापासून पुढचा आठवडाभर त्यानं आमच्यासाठी वेळ काढून ठेवला होता. 

भारताचं स्थान मजबूत करण्याच्या दृष्टीनं त्यानं युनायटेड नेशन्सच्या विचारविनिमय बैठकीत ज्या पद्धतीनं आपले विचार मांडले ती एक मेजवानीच होती. त्याचे मुद्दे ठाम आणि तरी नम्र होते. भारताच्या या प्रतिनिधीनं मांडलेली मतं तिथं जमलेल्या अनेक मान्यवरांनी मान्य केली. एक मुत्सद्दी म्हणून त्यानं बजावलेली भूमिका ग्रेट होती. 

एकदा दोन सेशन्सच्या मधल्या वेळेत आम्ही दुसऱ्या दिवशीचं शेड्यूल बघायला काउंटरवर गेलो. तिथं माहितीपत्रकं रचून ठेवलेली होती. हेमंत म्हणाला, 'ही पत्त्याच्या जोडासारखी दिसतात. त्यानं आम्हाला त्यातलं कुठलंही निवडायला सांगितलं. मी गमतीत म्हणालो, 'वरून तिसरं'. हेमंत हसायला लागला. म्हणाला, 'इतक्या दिवसांनंतर मराठी विनोद ऐकला.'

दुसऱ्या एका प्रसंगी लंचब्रेकमध्ये एक भारतीय वाटणारा माणूस आमच्याजवळ येऊन म्हणाला, 'तुम्ही इथं आहात? मी तर केव्हाची तुमची वाट पाहतोय.' नंतर लक्षात आलं की, तो हेमंतला दुसराच कुणीतरी समजत होता. तो स्वतः पाकिस्तानी होता आणि युनायटेड नेशन्सच्या दुसऱ्या कॉन्फरन्ससाठी शिष्टमंडळावर आला होता. हेमंत म्हणाला, 'भारतातले आणि उपखंडातले लोक यांच्यातलं दिसणं, वागणं, भाषा यांतल्या साधर्म्यामुळे त्याला असा अनुभव अनेकदा येतो. साधर्म्य आहे पण सख्य नाही ही वस्तुस्थिती.'

व्हिएन्नामध्ये भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्राचे (BARCचे) क्षितिज कुलकर्णी हे तेव्हा आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा यंत्रणेमध्ये (IAEAमध्ये) होते. त्यांच्यामुळे आमची ड्यॅानुब नदीच्या तीरावर गाडीतून रमणीय सफर झाली. रस्त्यावरची वॅगरॅम ही पाटी बघून मी म्हणालो, '1809मध्ये इथं नेपोलिअननं महत्त्वपूर्ण विजय मिळवला.' हेमंत हसून म्हणाला, 'खरंखुरं युरोपचं एकीकरण आता दिसेलच. एकाच व्हिसावर सरहद्द ओलांडता येते. एकच युरोपिअन पार्लमेंट, एकच चलन आणि सगळीकडे तर्कसंगत सीमाशुल्क आणि अशा कितीतरी गोष्टी या सामायिक आहेत. ही सगळी उत्क्रांती वर्षानुवर्षांची. पण त्यातून आता शक्तिशाली, आर्थिक युरोप निर्माण झालाय.' 

नंतर हेमंतची नेमणूक प्रथम मुंबईला झाली. त्यानंतर एटीएसमध्ये. तो कामात अधिकाधिक व्यग्र होत गेला. 2008पासून तर त्याला त्याचा फोन बंद करावा लागला. कामासाठी नवीन फोन, नवीन नंबर वापरायला लागायचा. आमच्या दोघांच्या मित्रानी हेमंतचा नवीन नंबर माझ्याकडं मागितला. पण हेमंत म्हणाला, 'थोड्या दिवसांनी दे.' पण तो फोन नंबर मित्राला देण्याची वेळ आलीच नाही. 

26 नोव्हेंबर 2008ला आम्ही हेमंतच्या ऑफिसमध्ये भेटणार होतो. त्यानं मला फोन केला. त्याला पाच-साडेपाचला मंत्रालयात मिटिंगसाठी जायचं असल्याचं सांगितलं. आम्ही दुसऱ्या दिवशी भेटायचं नक्की केलं. हे आमचं शेवटचं बोलणं. दहशतवाद्यांचा हल्ला सुरू झाल्यावर मी हेमंतला फोन केला, पण तो लागला नाही आणि नंतर तिथं फक्त असह्य शांतता उरली.

हेमंत ही देशाला लाभलेली दैवी देणगी होती. दुर्दैवानं परमेश्वरानं त्याला लवकर बोलावून घेतलं. हेमंतच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. हेमंतनं आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दहशतवाद्यांविरुद्ध लढताना दाखवलेलं धाडस हे पोलीसखात्याला सदैव प्रेरणा देत राहील. 


काटेरी मुकुट धारण केलेले हेमंत करकरे
मीरा चड्डा-बोरवणकर, आयपीएस, माजी पोलीस महासंचालक, पोलीस रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट. गणवेशधारी अधिकाऱ्यांमध्ये समाजसुधारणा घडवून आणण्याची ताकद असते असा मीराआंटींना विश्वास आहे. विशेषतः मुलींच्या आणि स्त्रियांच्या बाबतीत. मीराआंटींनी पप्पांना वाहिलेली ही आदरांजली.

हेमंत करकरे यांच्या करारी आणि ठाम व्यक्तिमत्त्वाचा ठसा प्रथम भेटीतच उमटायचा. ते तर्कवादी आणि मूल्यव्यवस्थेचे खंदे पुरस्कर्ते आहेत हे त्यांना भेटलं की लगेच लक्षात यायचं. त्यांच्या स्वभावात उतावीळपणा नव्हता किंवा ते भावनेच्या भरात वाहणारे नव्हते. ते नेहमी इतरांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकून घ्यायचे आणि त्यानंतर आपलं मत मांडायचे. त्यांच्याबरोबरचं संभाषण हे कधीही वरवरचं नसायचं.

आम्ही एकदा मुंबई पोलिसांसाठी आयोजित केलेल्या दिवाळी मेळ्याविषयी बोललो. सहज गमतीत थट्टामस्करी करत बोलणं झालं. मी त्यांना कधी मोठ्यानं हसताना पाहिलं नाही. पण त्यांचं हसणं वेगळंच होतं. मात्र ‘युनिफॉर्म’चं ओझं वाढत गेलं आणि त्यांच्या कपाळावरच्या आठ्यांचं जाळंही वाढत गेलेलं मला दिसलं.

कालांतरानं आमच्या कामातली जबाबदारी वाढत गेली. आम्ही अधिकाधिक व्यग्र झालो. मात्र आम्ही परिषदेच्या वेळी भेटत होतो. त्यात मोजूनमापून बोलणारे करकरे जेव्हा आपला मुद्दा मांडायचे तेव्हा सगळे लक्षपूर्वक ऐकायचे. बोलण्यासारखं महत्त्वाचं असेल तेव्हाच ते बोलायचे नाहीतर शांतपणे ते इतरांचं बोलणं ऐकायचे. ते त्यांच्या व्यवसायाशी एकनिष्ठ होते. एक चांगली उच्चपदावरची नोकरी, चांगलं करिअर सोडून ते विशिष्ट ध्येयानं भारतीय पोलीस सेवेत सामील झाले. पद्धतशीर काम करण्याची वृत्ती आणि तर्कवादी दृष्टीकोन यांसाठी ते प्रसिद्ध होते.  कामाला संपूर्ण वाहून घेतलेले, गुन्हेगारांविरुद्ध प्रत्येक बारीकसारीक माहिती मिळवण्यासाठी रात्रंदिवस काम करणारे असे ते अधिकारी होते.

ते कुटुंबवत्सल होते. त्यांनी त्यांच्या तीनही मुलांना अगदी उत्तमपणे वाढवले. ते आणि त्यांची पत्नी कविता हे दोघं आदर्श पालक होते. मुलांनी काय करावं, काय करू नये याकडं त्यांचं बारकाईनं लक्ष होतं. त्यांची तीनही मुलं ज्या पद्धतीनं आज मोठी झाली त्यावरून पालकांचा मुलांच्या वाढीतला सहभाग लक्षात येतो.

हेमंतमध्ये असलेल्या अतुलनीय प्रामाणिकपणामुळंच त्यांचे वरिष्ठ आणि कनिष्ठही त्यांचा खूप आदर करायचे. एकदा एका संध्याकाळी मला त्यांचा फोन आला. मी दादरमधल्या अमुक एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते का असं त्यांनी विचारलं. 

'हो...' मी सांगून टाकलं. 'परत तिथं कधी जाऊ नका.' त्यांनी सल्ला दिला.

'का पण?' मी चौकशी केली.

'कारण त्या रेस्टॉरंटच्या मालकानं तुमच्या उपस्थितीची माहिती एसेमेस करून त्यांच्या सगळ्या परिचितांना दिली. मलाही मिळाली.' ते स्पष्टवक्ते आणि खरे मित्र होते.

26/11 घटनेच्या काही दिवस आधीचीच गोष्ट. मी त्यांना पुण्याच्या सीआयडीत सेमिनारमध्ये बोलण्यासाठी निमंत्रित केलं. त्यांना यायला जमणार नसल्याचं त्यांनी मला फोन करून सांगितलं. एका केसच्या तपासात खूप गुंतलोय असं ते सांगत होते. लगेचच तीन दिवसांत हा कार्यक्रम आहे असं त्यांना वाटलं होतं. मी त्यांना मध्येच थांबवून हा कार्यक्रम अजून महिनाभरानं असल्याचं सांगितलं. ते क्षणभर गप्प झाले. त्यांच्या मनात तारखेचा गोंधळ झाला होता. हे त्यांच्या स्वभावाला धरून नव्हतं म्हणजे त्यांच्यावर कामाचा किती ताण असणार हे लक्षात आलं. आमच्या सेमिनारला यायचं त्यांनी लगेचच कबूल केलं.

महाराष्ट्राचे एटीएस प्रमुख म्हणजे डोक्यावर काटेरी मुकुट धारण करण्यासारखं. हेमंतही त्याला अपवाद नाहीत हे सगळ्यांना दिसत होतं. पण आपला हा धैर्यवान सहकारी असा शहीद होईल हे आम्हाला दिसलं नव्हतं. 

मी त्यांना आदरांजली वाहण्यास गेले. त्यांच्या कपाळावर बंदुकीची खोल जखम होती. अंगावर काटा आला.


मीरा चड्डा-बोरवणकर यांनी जुईला लिहिलेलं पत्र

16 मार्च 2009
प्रिय जुई,
तू मला तुझ्या वडलांच्या आठवणी शब्दबद्ध करण्यास सुचवलंस. मला तो विचारच वेगळा वाटला. कारण वीस वर्षांहून अधिक काळाच्या परिचयात आमचा सहवास अल्पच होता. 

हेमंत करकरे म्हणजे एक शांत, विचारी अधिकारी. अंतर राखून काम करणारे, इतरांपेक्षा थोडे निराळे, उमद्या व्यक्तिमत्त्वाचे, उत्तम संघटनकौशल्य असलेले अधिकारी. त्यांचा एक प्रकारचा दरारा होता. पण म्हणून त्यांच्याबद्दल माझ्या मनात भीती निर्माण झाली किंवा मला दबल्यासारखं झालं असं बिलकूल नाही. उलट कामाच्या निमित्तानं कधी संपर्क झाला तेव्हा माणुसकीनं वागणारा, दुसऱ्याचा सहानुभूतीनं विचार करणारा हीच त्यांची प्रतिमा मनात उमटली. ते नेहमी त्यांच्या विचारात गुंतलेले, मोजूनमापून बोलणारे असे होते.

आम्ही सहकारी गप्पा मारताना गॉसीप मूडमध्ये असू तर ते फक्त हसून प्रतिसाद द्यायचे. आमच्या तशा इकडच्यातिकडच्या गप्पांमध्ये ते कधीही सहभागी व्हायचे नाहीत. मी पोलीसखात्यात नवीन आले तेव्हा मला त्यांची ओळख ‘हिंदुस्थान लिव्हरमधली गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून, पोलीसदलात येऊन समाजासाठी काही चांगलं काम करण्यासाठी आलेला अधिकारी’ अशी करून देण्यात आली. खरंच हे कारण असेल का हा विचार मनात आलाच. पण तुझ्या वडलांची कामकाजाची पद्धत बघितली आणि माझ्या मनातली शंका दूर झाली.

मुंबई पोलीस आयुक्त या पदावर असताना त्यांनी मुंबईमधली गुन्हेगारी समूळ नष्ट करण्यासाठी स्वतःला वाहून घेतलं. 1990मध्ये आम्ही दोघांनी ‘दिवाळी मेळ्याचं’ आयोजन केलं. आत्तासारखा फॅन्सी इव्हेंट नव्हता तो. पण त्यातून मला करकरेंच्या नियोजनाची पद्धती जवळून बघता आली. त्या वर्षभरात अधूनमधून आम्ही भेटलो. त्यानंतर चंद्रपूरच्या नक्षलग्रस्त भागात ते बदलून गेले आणि त्यांनी नक्षलवादाचं उच्चाटन करण्यामध्ये मोठी कामगिरी बजावली. आपल्या कार्यानं ओळखले जाणारे भारतीय पोलीसदलातले अधिकारी कमीच... पण त्यांतले तुझे वडील एक होते. त्यांची कार्यपद्धती अतिशय नियोजनबद्ध, विचारपूर्वक, एखाद्या गोष्टीच्या मुळाशी जाऊन, त्यात झोकून देऊन काम करण्याची होती. त्यांच्या विचारातली स्पष्टता आणि योग्य शब्दांत त्याची अभिव्यक्ती यांचं आमच्या कॉन्फरन्समध्ये कौतुक व्हायचं त्यामुळंच राज्य सरकारनं आणि केंद्र सराकरनंही नेहमी महत्त्वाच्या पदांवर त्यांची नेमणूक केली.

मी मुंबईत गुन्हे अन्वेषण विभागाच्या सहआयुक्त पदावर काम करत असताना व्यसनाधीनतेच्या विरोधात स्थानिक बिगरसरकारी संघटनेची बैठक बोलावली. ते सगळे लोक तुझ्या वडलांबद्दल अगदी भरभरून बोलत होते हे पाहून मला आश्चर्यच वाटलं कारण हेमंत करकरे दहा वर्षांपूर्वी अमली पदार्थविरोधी विभागाचे प्रमुख होते. नागरिकांना दहा वर्षांपूर्वीच्या अधिकाऱ्याची अशी आठवण राहणं हे विलक्षण आणि अपवादात्मक होतं.

मी उत्साहानं त्यांना हा प्रसंग सांगितला. मंदस्मित आणि 'थँक यू!' एवढीच त्यांची यावरची प्रतिक्रिया.

2008ला आमच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या परिषदेसाठी आम्ही एकत्र आलो. मी त्यांना डीजी ऑफिसच्या कॉरिडॉरमध्ये भेटल्यावर म्हणालेही की, तुम्ही खूप तणावाखाली असल्यासारखे दिसताहात. ते क्षणभर विचारात पडले आणि म्हणाले शक्य आहे. मालेगाव केसचा त्यांच्यावर किती ताण आलाय हे पाहून मला आश्चर्य वाटलं. 

एटीएसवर होणाऱ्या आरोपांना मी व्यक्तिगत पातळीवर मुळीच महत्त्व देत नव्हते. आम्ही सगळे एकमेकांच्या कार्यपद्धती ओळखत होतो. करकरे यांच्या नेतृत्वाखाली चालणारी चौकशी योग्य आणि सर्वोत्तम असणार. हेमंत कधीही व्यावसायिकदृष्ट्या अयोग्य, निंदनीय कृत्याचं समर्थन करणार नाहीत. त्यात तडजोड करणार नाहीत याची आम्हाला खातरी होती.

पुण्यात सीआयडी ऑफिसच्या सेमिनारमध्ये बोलण्यासाठी यायचं त्यांनी मान्य केलं. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. सेमिनारमध्ये ओळख करून देण्यासाठी आम्ही करकरेंची मागवलेली माहिती आली, पण ते मात्र येऊ शकले नाहीत कारण 26/11. आम्ही आमचा तो सेमिनार करकरेंना आणि त्यांच्याबरोबर शहीद झालेल्या सहकाऱ्यांना समर्पित केला. या प्रसंगी आम्हाला झालेल्या यातना तू समजू शकतेस. 

मला या पत्राचा शेवट आनंदानं करू दे. आम्हाला क्वचित कधी एकत्र येण्याचा, बोलण्याचा प्रसंग यायचा. तेव्हा अशाच एका प्रसंगी तू लग्न करायला तयार नव्हतीस आणि त्यांनी शेवटी तुझं कसं मतपरिवर्तन केलं हे तुझ्या बाबांनी सविस्तर सांगितलं. ते मला तुझ्या लग्नाचं आमंत्रण द्यायला आले तेव्हा ते किती खूश होते. लग्नाच्या दिवशी आमचं स्वागत करतानाही आणि एकंदरीत संपूर्ण लग्न समारंभातच त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. आलेल्या सगळ्या पाहुण्यांमध्ये ते उत्साहानं, प्रसन्नपणे वावरत होते.

सामाजिक न्यायासाठी त्यांची चाललेली लढाई पुढं चालू ठेवणं ही तुझ्या वडलांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल. आपल्या सहकाऱ्यांना आपण पुन्हा पुन्हा भेटतच राहू असं आम्ही पोलीस लोक गृहीत धरून चालतो. आता वाटतं की, आम्ही जेव्हा-जेव्हा एकमेकांना भेटतो तेव्हा थोडं थांबून एकमेकांची ख्यालीखुशाली विचारली पाहिजे. थोडा अधिक वेळ एकदुसऱ्यांसाठी दिला पाहिजे.

त्यांना अशा तऱ्हेनं गमावल्यानंतर मला वाटतं की, मी त्यांना आणखी जाणून घ्यायला हवं होतं. आमची अजून थोडी ओळख होण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते म्हणजे या पत्राला मी न्याय देऊ शकले असते.

प्रेमपूर्वक शुभेच्छा
मीराआंटी 

(अनुवाद: शोभा चित्रे)

- जुई करकरे - नवरे
jui.navare@gmail.com


वाचा 'माझे पप्पा हेमंत करकरे' या लेखमालेतील इतर भाग 

मुंबईतले ते भीषण तास...

शेवटचा प्रवास...

हेवा वाटावा असे वीरमरण...

संकटसमयी सगळ्यांच्या पुढे उभा राहून लढणारा धैर्यधर...

बुलेटप्रुफ जॅकेटचा अपशकुन

हौतात्म्यामागची आजन्म तपश्चर्या

कुटुंबवत्सल माणूस

चंद्रपूरचं आव्हान

चंद्रपूरमधील आठवणी सांगणारा काही पत्रव्यवहार

चंद्रपूरमधील बालपणीच्या आठवणी

निर्जीव लाकडामध्ये प्राण फुंकणारे पप्पा...

सहकाऱ्यांनी जागवलेल्या आठवणी - पूर्वार्ध 

Tags: लेखमाला जुई करकरे जुई करकरे - नवरे माझे पप्पा : हेमंत करकरे मुंबई दहशतवादी हल्ला 26/11 अँटी टेररिझम स्क्वॉड दहशतवाद विरोधी पथक एटीएस हेमंत करकरे भाग 14 Marathi Series Jui Karkare Majhe Pappa Hemant Karkare My Pappa Hemant Karkare Hemant Karkare : A Daughter's Memoir Part 14 Jui Karkare- Navare Load More Tags

Comments:

चारूलता उपळेकर.

सरांबद्दल खूप काही नवीन कळलं.एक हरहुन्नरी हुशार व्यक्ती देशांनी गमावली.

संजीवन

श.हेमंत करकरे यांच्या पोलीस खात्यातल्या सर्व स्तराच्या सहकार्याच्या आठवणी वाचून एक गोष्ट प्रकर्षांने लक्षांत आली ती म्हणजे ही सर्व मंडळी आतून माणुसकीचे प्रवर्तक आहेत

अद्भूत जीवन यथाथ वणन

योगय भाषांतर

Add Comment