शेवटचा प्रवास...

माझे पप्पा हेमंत करकरे - भाग 2

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई शहरावर मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये त्यावेळचे दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएसचे) प्रमुख हेमंत करकरे शहीद झाले. त्यांची कन्या जुई करकरे - नवरे यांनी वडलांविषयी लिहिलेल्या आठवणी दोन वर्षांपूर्वी 'Hemant Karkare: A Daughter's Memoir' या पुस्तकाच्या रूपाने  The Write Place कडून प्रकाशित झाल्या. शोभा चित्रे यांनी मराठीत अनुवादित केलेल्या या आठवणी 18 सप्टेंबर ते  26 नोव्हेंबर 2021 या काळात प्रत्येक शनिवारी आणि रविवारी कर्तव्य साधनावरून प्रसिद्ध करत आहोत. त्याचा पहिला भाग काल  प्रसिद्ध झाला. हा  दुसरा भाग...        
- संपादक 


नुकत्याच उगवलेल्या सूर्याचे कोवळे पण सशक्त प्रकाशकण अंगावर झेलत देशाच्या कानाकोपऱ्यातून निरनिराळ्या पोलीस दलाचे प्रतिनिधी म्हणून आलेले आम्ही सोळा जण या स्मारकासमोर निस्तब्धपणे, अर्धवर्तुळाकार उभे होतो.
- हेमंत करकरे
(हुतात्मा स्मारक, हॉट स्प्रिंग्ज, लडाख. 1990)


माझा भाऊ आणि माझे सासरे सुनील नवरे आम्हाला घ्यायला विमानतळावर आले. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर कधी नव्हे अशी उदासी जाणवत होती. हे सहार विमानतळ... (आत्ताचं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ...) खरंतर नेहमीच गर्दी, उत्साह, लगबग यांनी गजबजलेलं असतं. पण आज मात्र सुनसान होतं. सतत उत्साहानं सळसळत्या मुंबईमध्ये हे भेसूर शांततेचं वातावरण भयाण वाटत होतं. विमानतळातून बाहेर पडलो. पुढं 25 किलोमीटरचा प्रवास करून आमच्या घरी जाईपर्यंत जागोजाग पोलिसांची गस्त दिसत होती. या मुंबई हल्ल्याची बातमी जगभर पसरली होती. पण अजूनही त्याचं भीषण नाट्य संपलेलं नव्हतं. घरी जाताना आम्हाला कुणीतरी सांगितलं की 'काही दहशतवादी अजूनही ताज हॉटेलमध्ये आहेत आणि त्यांच्या ताब्यात अडकलेल्या माणसांची अजूनही सुटका झालेली नाही.' 

दीड वर्षांपूर्वी बोस्टनला स्थायिक झाल्यापासून मी आज पहिल्यांदाच भारतात येत होते. दीर्घ काळानंतर कुटुंबीयांना भेटण्याचा माझा आनंद या धक्कादायक दहशतवादी हल्ल्यानं हिरावून घेतलेला होता. देवदत्त आणि मी डिसेंबरमध्ये एका लग्नासाठी भारतात येणारच होतो. त्या ट्रीपची तिकिटंही बुक केली होती. पप्पांनी ठरवलं होतं की, त्या लग्नसमारंभानंतर आम्ही सगळे मिळून एका छोट्या ट्रीपला जाऊ. पण यातलं काहीच आता होणार नव्हतं! 

घरी जाताना कारच्या खिडकीतून मी बाहेर पाहत होते. अंधारानं संपूर्ण मुंबई झाकोळून गेली होती. रस्त्यांवर गूढ शांतता होती. घरी पोहोचताच मला सर्वात आधी आईला भेटायचं होतं. मी कारमधून उतरतातच आईकडे धावले. पण ती निर्जीवपणे पलंगावर पडून होती. तिला शांत करण्यासाठी औषधांचा मारा करावा लागला होता. माझी बहीण जर्मनीहून आधीच पोहोचली होती. ती आईच्या शेजारी डोकं धरून बसून होती. माझा अवघा 17 वर्षांचा भाऊ या दुःखद प्रसंगाला धीरानं सामोरा जात होता. या प्रसंगानं त्याला अकाली मोठं केल्याचं आम्हाला जाणवलं. थोड्या वेळानं मम्मीला जाग आली. आपल्या तिन्ही मुलांना आपल्या आजूबाजूला बघून ती किंचित हसली, पण आलं तसं ते हसू क्षणार्धात नाहीसं झालं. तिचे टपोरे डोळे प्रचंड वेदनेनं भरलेले होते. तिनं आम्हाला कुरवाळलं आणि ती परत गुंगीत गेली.

दुसऱ्या दिवशी सकाळी पप्पांची अंत्ययात्रा होती. हिंदू प्रथेनुसार व्यक्तीच्या मृत्यूपासून चोवीस तासांत अंत्यसंस्कार करतात. पण मी आणि माझी बहिण जर्मनी आणि अमेरिकेहून येणार होतो, म्हणून पप्पांचे अंत्यसंस्कार एक दिवस पुढे ढकलले होते.

29 नोव्हेंबर 2008 - सरकारी इतमामातले अंत्यसंस्कार
चार महिन्यांपूर्वी मम्मी आणि पप्पा आमच्याकडे बॉस्टनला आले होते. पप्पांशी ती शेवटची भेट ठरली. विमानतळावर त्यांचा निरोप घेताना लहान मुलीसारखं त्यांच्या मागं पळत जावं असं मला खूप वाटलं होतं. पप्पांना टर्मिनलमधून आत जाताना पाहिलं आणि त्यांच्यासोबत आत्ताच भारतात जावं असं अगदी मनापासून वाटून गेलं होतं. लग्न करून बॉस्टनला गेल्यानंतर माझी पहिली इंडिया ट्रीप पप्पांच्या अंत्यसंस्कारासाठी होईल असा विचारही तेव्हा माझ्या मनात येणं शक्य नव्हतं. 

हिंदू रीतीरिवाजानुसार पप्पांचं पार्थिव प्रथम घरी आणण्यात आलं. मी त्यांच्या गालाला स्पर्श केला, मात्र माझ्या बोटाला झालेल्या त्या निर्जीव थंडगार स्पर्शानं मी हादरून गेले. भीतीनं एकदम मागे सरकले. शवागरातून आणलेलं हे पार्थिव माझ्या लाडक्या पप्पांचं आहे यावर माझा विश्वासच बसेना. एक अभिजात व्यक्तिमत्त्व असलेले माझे पप्पा. त्यांची ती सहा फूट उंची आणि चेहऱ्यावर झळकणारं ज्ञानाचं आणि शहाणपणाचं तेज. दिव्याभोवती पाखरं जमावीत तसा आप्तेष्टांच्या समारंभात माझ्या पप्पांभोवती गोतावळा जमायचा. आणि आता मात्र त्यांचा तो निर्जीव देह आणि कपाळाला लागलेलं रक्त बघायची मला भीती वाटत होती. पप्पा नेहमी अगदी काळजीपूर्वक स्वतःसाठी कपडे निवडायचे, कडक इस्त्रीचे कपडे ते वापरायचे. त्यांचे केस कधीच जराही विसकटलेले नसायचे. झुबकेदार मिशा नीट विंचरल्याशिवाय ते कधीही घराबाहेर पडायचे नाहीत. 

माझे हात त्यांच्या कपाळावरचं रक्त पुसण्यासाठी शिवशिवत होते. मात्र त्यांच्या त्या थंडगार शरीराला पुन्हा स्पर्श करण्याची हिंमत होत नव्हती. मला त्यांना हलवावंसं वाटत होतं, त्यांना तंद्रीतून जागं करावंसं वाटत होतं. किंचाळावसं वाटत होतं, पळून जावंसं वाटत होतं. पण मी यांतलं काहीही करू शकले नाही. त्यांच्या तजेलदार त्वचेवर मृत्यूमुळे आलेली निस्तेजता माझ्याही चेहऱ्यावर प्रतिबिंबित होत होती.

नंतर एका क्षणी मला जाणीव झाली की, माझ्या समोरचं हे शरीर म्हणजे माझे पप्पा नव्हेत. हिंदू धर्म असं सांगतो की, शरीर नाशवंत आहे आणि आत्मा अमर आहे. एकतर आत्म्याला मोक्ष मिळतो, या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून त्याची सुटका होते किंवा त्याचा पुनर्जन्म होतो. पण हे तत्त्वज्ञान त्या क्षणी माझ्या डोक्यातही येत नव्हतं. मला एवढंच कळत होतं की, माझे पप्पा आता या जगात नाहीत. बाकी कशाला आता काही अर्थ उरला नव्हता.  

घरात धांदल सुरू झाली. पप्पांच्या अंत्यदर्शनासाठी घरी माणसं जमणार होती. त्यासाठी घर आवरण्याचं काम लगबगीनं चालू होतं. बेडशीटं बदलली, पडदे स्वच्छ केले, फरशी पुसली... पण या वरवरच्या स्वच्छतेनं घरावर पसरलेली मृत्यूची शोकाकुल छाया पुसली जाणार नव्हती. खरंतर अशा दु:खद प्रसंगी ही आवराआवरी निरर्थक होती. पण रोजच्यासारखा दिनक्रम पाळल्यामुळे दुःखाचा भार थोडा हलका झाला. 

मम्मी वरून शांत वाटत होती, पण मनातला गोंधळ तिच्या डोळ्यांत दिसत होता. जगासाठी ते एका कर्तबगार, नामवंत व्यक्तीचं निधन असेल; पण आम्ही आमची जिवलग व्यक्ती गमावली होती. याआधी आम्ही कायमच माध्यमांपासून दूर राहिलो होतो. कधीही प्रकाशझोतात आलो नव्हतो. त्यामुळे मोठ्या जनसमुदायात, त्यातही त्यांच्या नजरा आमच्याकडेच असताना आम्हाला मोकळेपणानं व्यक्त होणं अवघड जात होतं.   

लोक वाढू लागले. त्यांना सामोरं जाताना मला शब्दच सुचेनात. मग आपल्या भारतीय पद्धतीनं हात जोडून सगळ्यांना ‘नमस्ते’ करत मी माझी सुटका करून घेत होते. शेकड्यांनी लोक आम्हा कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी घराबाहेर रांगा लावत होते.   

तेवढ्यात डॉ. सदानंद दाते आले. हे इंडिअन पोलीस सर्व्हीसमधले पप्पांचे सहकारी. तासाभरापूर्वीच त्यांनी कामा हॉस्पिटलमधल्या दहशतवाद्यांना नेस्तनाबूत केलं होतं. दहशतवाद्यांनी फेकलेलं एक ग्रेनेड त्यांच्या अगदी जवळ फुटल्यानं त्यांना अनेक ठिकाणी जखमा झालेल्या, पण त्यातून ते वाचले होते. ते आधाराशिवाय उभेही राहू शकत नव्हते.  ग्रेनेडचा एक कण त्यांच्या डोळ्यातही रेटिनाच्या मागे घुसला होता. दोन सहकाऱ्यांच्या मदतीनं ते उभे राहिले आणि त्यांनी शहीद पप्पांना आदरांजली वाहिली. डॉ. दातेंचं दुःख त्यांच्या त्या जखमांपेक्षा जास्त खोल होतं. कारण दातेकाका दहशतवाद्यांशी लढत होते आणि पप्पा त्यांच्याच मदतीसाठी कामा हॉस्पिटलमध्ये धावून गेले होते. डॉ. दातेंना बघून माझी आई लगेच त्यांच्याजवळ गेली. खालमानेनं तिनं त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. तिचं शरीर दुःखानं गदगदलं. 

पोलीस महासंचालक ए.एन. रॉय आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हसन गफूर यांनी पप्पांना खांदा दिला. ताजमधलं ऑपरेशन त्याच दिवशी सकाळी निपटून ते पप्पांच्या अंत्ययात्रेला हजर झाले होते. पप्पांचं पार्थिव तिरंग्यात गुंडाळलं गेलं. ते ओपन ट्रकमध्ये ठेवण्यात आलं. ट्रक चारही बाजूंनी पांढऱ्या, केशरी फुलांच्या माळांनी आणि हिरव्या पानांनी तिरंग्याच्या तीन रंगांत सजवलेला होता. ट्रकच्या पुढच्या बाजूला पप्पांचा मोठा फोटो लावलेला होता आणि दोन्ही बाजूंना ताज्या फुलांचे गुच्छ होते. शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीमध्ये पप्पांवर अंतिम संस्कार होणार होते. ट्रकच्या पुढे मंदगतीनं राष्ट्रगीत वाजवत पोलीस बॅन्ड चालला होता. पोलीस बॅन्डच्या मागे पोलीस संरक्षक गाड्या आम्हा कुटुंबीयांना घेऊन चालल्या होत्या. ट्रकच्या मागे पाचेक हजार माणसं फुलांची उधळण करत होती आणि ‘हेमंत करकरे अमर रहे!’, ‘भारत माता की जय!’ अशा घोषणा देत होती. पप्पांना मानवंदना देत ती सारी मंडळी पायी येत होती.

पप्पांचा अंत्यविधी सरकारी इतमामात झाला. हिंदू प्रथेप्रमाणे भटजींच्या सांगण्यानुसार माझ्या भावानं सर्व विधी केले. पोलीस फोर्सनं एकवीस तोफांची सलामी दिली. पप्पांच्या पोलीस सहकाऱ्यांनी पुष्पचक्रं वाहिली. आता पप्पांचं शव अंतिम विधींसाठी तयार करायचं होतं. त्यांच्या अंगावरचा तिरंगा काढण्यात आला. त्याची नीट घडी करून तो बाजूला ठेवण्यात आला. पार्थिव चितेवर ठेवलं गेलं. भटजींनी मंत्रोच्चार केला. भावानं अग्नी दिला. सगळा जमाव निःशब्द झाला. त्या अग्नीमध्ये पप्पांचा देह जळत होता. ते पाहून निरर्थक दहशतवादी कारवायांविषयी माझ्या मनात संताप उफाळून आला. त्यांनी माझ्या पप्पांचा तर जीव घेतलाच होता, शिवाय अनेक कुटुंबं उद्ध्वस्त केली होती. माझे अश्रू स्वतःहूनच समजूतदारपणानं वागत होते. स्वतःला रोखून धरत होते कारण त्या वेळी पूर्ण वेळ आमच्यावरच रोख असणाऱ्या टीव्ही पत्रकारांचं लक्ष त्यांना वेधून घ्यायचं नव्हतं. रडू दाबून ठेवल्यानं माझी कानशिलं दुखायला लागली होती. 
 
पप्पांचे मित्र आणि पोलीस खात्यातले त्यांचे सहाध्यायी, ज्येष्ठ अधिकारी आणि राजकारणी यांनी पुढे येऊन शेवटची श्रद्धांजली वाहिली. हे एका खऱ्या देशभक्ताचं आणि शत्रूशी लढताना धारातीर्थी पडलेल्या वीराचं क्रियाकर्म होतं. त्याचं थेट प्रक्षेपण नॅशनल टीव्हीवर करण्यात आलं.

कालांतरानं लोकांनी आमच्या कुटुंबाला सांत्वनाचे हजारो संदेश पत्राद्वारे, ईमेलवर किंवा प्रत्यक्ष भेटून दिले. त्यांत आप्तेष्ट होते तसेच अनेक अनोळखी लोकही होते. पप्पांच्या स्मरणार्थ ठिकठिकाणी खासगी संस्थांकडून तसंच सरकारी खात्यांकडून श्रद्धांजलीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले.  

एक महिना उलटला. आता नवऱ्याबरोबर बॉस्टनला जाण्याचा दिवस उगवला. परतताना एअर इंडियाचं विमान न्यूयॉर्कला उतरलं तेव्हा तिथल्या कर्मचाऱ्यांनी अतिशय मधुर भारतीय संगीत लावलेलं होतं. अगदी याच धाटणीचं संगीत पप्पा ऐकायचे. माझे डोळे नकळत भरून आले. पप्पा आता या जगात नाहीत हे पुन्हा जाणवलं आणि सगळं संपल्यासारखं वाटलं. 

आम्ही न्यूयॉर्कहून बॉस्टनला जाणारी फ्लाइट घेतली. डिसेंबरचा बर्फ पडत होता. पोटात काहीतरी खवळून उठलं. मला वाटलं ती भूक असावी. एअर होस्टेसनं आणलेलं खाणं मी संपवलं. डिसेंबरमधलं निरभ्र आकाश आता ढगांनी भरून गेलं होतं. विमान जोरजोरात हलत होतं. जणू त्यानं आपली पकड गमावली होती आणि ते दिशाहीन झालं होतं. आधीच मला पप्पांच्या आठवणीनं त्रास होत होता. त्यात विमानाची ही अवस्था. माझ्या पोटात ढवळून निघालं आणि एकदम ओकारी झाली. प्रवासही असा दगदगीनी आणि आठवणींनी कासावीस असाच झाला. 

पुढे पप्पांचं नाव लोकांच्या मनात अमर झालं, पण पप्पा आपल्यासोबत प्रत्यक्षात असायला हवे होते असं मात्र मला रोज वाटतं. त्यांनी कधीही कर्तव्यात कसूर केली नाही. त्यांना आयुष्याकडून काही निराळं हवं होतं. त्यांच्या या वृत्तीतूनच त्यांनी एक लेख लिहिला होता... 1990 मध्ये उत्तर भारतातील लडाखमधल्या हॉट स्प्रिंगच्या हुतात्मा स्मारकाला त्यांनी भेट दिली तेव्हा.

1960 मध्ये भारत-चीन युद्धात आपल्या सरहद्दीचं रक्षण करताना प्राणांचं बलिदान दिलेल्या जवानांच्या स्मरणार्थ ते स्मारक उभारण्यात आलं आहे. पप्पांनी या स्मारकाला भेट दिली तेव्हा त्यांना अश्रू अनावर झाले. 

त्यांनी लिहिलं होतं... 

'नुकत्याच उगवलेल्या सूर्याचे कोवळे पण सशक्त प्रकाशकण अंगावर झेलत देशाच्या कानाकोपऱ्यातून निरनिराळ्या पोलीस दलाचे प्रतिनिधी म्हणून आलेले आम्ही सोळा जण या स्मारकासमोर निस्तब्धपणे, अर्धवर्तुळाकार उभे होतो. सर्वांगावर रोमांच उभे होते.  सर्वोच्च त्यागाच्या आणि अतुलनीय धैर्याच्या या प्रतिकाकडे अनिमिष नजरेने पाहता पाहता माझ्या पापण्या आपोआप मिटल्या आणि मिटल्या डोळ्यांपुढे साकार झाले ते बलिदान जे माझ्या पोलीस बांधवांनी मातृभूमीच्या रक्षणार्थ केले होते. 

आणि मला आठवले ते माझे जिवलग सहकारी त्यांनी त्यागाच्या परंपरेत कर्तव्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली...

मी भानावर आलो. स्वतःला सावरले आणि स्मारकाकडे 'धीमी-चाल' मध्ये जाऊ लागलो. स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करताना मला जाणवले की माझे डोळे पाणावले आहेत. घाईघाईने स्वतःच्या जागी परत येऊन उभे होईस्तोवर अश्रू ओघळलेसुद्धा.

मी चटकन डोळे टिपले आणि कोणी पाहिले तर नाही ना म्हणून आजूबाजूला पाहिले तर काय. बहुतेक सर्वजण माझ्यासारखेच भावनावश झाल्याचे दिसले. या तीर्थक्षेत्री आदरांजली वाहताना निरनिराळ्या प्रांतातले, हजारो मैलांचा खडतर, दुर्घट प्रवास करून आलेले आम्ही सोळा जण त्या क्षणी एका विशिष्ट एकाच भावनेच्या सूत्राने बांधले गेलो. आम्ही पत्करलेली नोकरी सतीचे वाण आहे. पण त्या नोकरीत एखादा असा क्षण येतो आणि त्या दिव्य क्षणी आयुष्यालाच झळाळी येते. त्याची प्रचिती आम्हास होत होती. या भारावलेल्या स्थितीत तेथून पाय उचलेना...

जिगरबाज माणसे असलेल्या पोलीस दलाचे आपण एक भाग आहोत, या अभिमानाने छाती फुलून येते. मन आपोआप प्रार्थना येते की देवा, यांचे नाव सार्थपणे राखण्यासाठी शक्ती दे. युक्ती दे आणि बुद्धी दे!'

पोलीसदलाचा गौरव वाढवण्याच्या आपल्या शपथेशी पप्पा सदैव एकनिष्ठ होते. निरनिराळ्या प्रसंगांत आम्हाला त्यांची उणीव भासत राहणार आहे. आता पूर्वीसारखं काही असणार नाही. त्यांच्या सुहृदांना त्यांची आठवण येतच राहणार, कारण अनेकांच्या आयुष्याला पप्पांचा स्पर्श झालेला होता. 

त्या दहशतवादी हल्ल्याला आता 13 वर्षं उलटून गेली. काळानं दुःखाची धार कमी केली. कधीही भरून न येणाऱ्या जखमेशी जुळवून घेण्याचा मी प्रयत्न करतेय. ती वेदना आता हळूहळू भरून निघतेय असं वाटत असतानाच अचानक असं काहीतरी घडतं की, सगळ्या आठवणी दाटून येतात. मी पुन्हा या सगळ्याच्या आरंभाला जाऊन पोहोचते आणि पुन्हा जखम वाहायला लागते.

पप्पांना गोष्टी जपून ठेवण्याची भारी आवड होती. म्हणजे फक्त वस्तू नव्हेत. ते माणसा-माणसामधल्या नातेसंबंधाला जपायचे, त्याची खरी किंमत त्यांना माहीत होती. अशीच मीही पप्पांची आठवण कायम जिवंत ठेवावी असं मला खूप वाटतं.
 
पप्पांचं पुस्तकांचं वेड तर विलक्षणच. त्यांच्या तीनही मुलांमध्ये वाचनाचं हे वेड आलंय. बॉस्टनहून मी त्यांना फोन करायचे तेव्हा त्यांचा ठरलेला प्रश्न... 'मग सध्या काय वाचत आहेस?'

...त्यामुळे हे पुस्तक म्हणजे एक प्रकारे मी त्यांना वाहिलेली श्रद्धांजलीच आहे.

- जुई करकरे - नवरे
jui.navare@gmail.com


वाचा माझे पप्पा हेमंत करकरे - भाग 1 

Tags: लेखमाला जुई करकरे जुई करकरे - नवरे माझे पप्पा : हेमंत करकरे मुंबई दहशतवादी हल्ला 26/11 अँटी टेररिझम स्क्वॉड दहशतवाद विरोधी पथक एटीएस हेमंत करकरे भाग 2 आठवणी Marathi Series Jui Karkare Majhe Pappa Hemant Karkare My Pappa Hemant Karkare Hemant Karkare: A Daughter's Memoir Part 2 Jui Karkare- Navare Load More Tags

Comments: Show All Comments

सूर्यकांत वैद्य

वाचताना खूपच अस्वस्थताई जाणवत होती पण शूर पित्याच्या धारिष्टवान लेकीच मनोगत वाचून मन भरून आल..

लतिका जाधव

सादर अभिवादन!

संजीवन

सतत उत्कंठा वाढवणारी लेखमाला.आधी समाजमाध्यमातून बघण्यात आलेल्या छायाचित्रा व्यतिरिक्त वैयक्तिक क्षण नेमके टीपले आहेत.

पांडूरंग आत्माराम थोरात

शुर अधिकाऱ्याच्या कन्येचेच आहेत. संयत शब्दात त्यांनी दुःख व्यक्त केले आहे. देशासाठी शहीद झालेल्या या थोर अधिकाऱ्यांच्या स्मृतींना अभिवादन.

अँड.संजय बाजीराव वाखारे.

वाचताना मन व डोळे दोन्हीही भरुन येतात. आपण प्रत्यक्षात तेथे हजर आहोत असे वाटते एवढे प्रभावी लेखन आहे. संपूर्ण करकरे कुटुंबीय हे खरोखरीच आपल्या देशाच्या आदरस्थानी आहेत.

पांडूरंग आत्माराम थोरात

क्षमस्व, पहिली ओळ चुकीने वगळली गेली. ती पुन्हा लिहीत आहे. ज्या धीरोदतपणे करकरे आणि पोलीस अधिकाऱ्यांनी हे असहनीय दुःख सहन केले ते शब्दात व्यक्त करणे अवघड. या आठवणी भारावून टाकतात आणि हे शब्दही आहेत, (कृपया या अगोदरचा प्रतिसाद पहावा)

Kalpana Gupte

Such noble people are our nations real heros. Thousand salutes to them !!!

Kalpana Gupte

Could not control my tears while reading this article. Your simple but true words touched our hearts.

Add Comment