आजन्म विद्यार्थिनी, आदर्श शिक्षिका, आमचा दीपस्तंभ!

माझे पप्पा हेमंत करकरे - भाग 20

फोटो सौजन्य: जुई करकरे

26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई शहरावर मोठा दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यामध्ये त्यावेळचे दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएसचे) प्रमुख हेमंत करकरे शहीद झाले. त्यांची कन्या जुई करकरे - नवरे यांनी वडलांविषयी लिहिलेल्या आठवणी दोन वर्षांपूर्वी 'Hemant Karkare: A Daughter's Memoir' या पुस्तकाच्या रूपाने  The Write Place कडून प्रकाशित झाल्या. शोभा चित्रे यांनी मराठीत अनुवादित केलेल्या या आठवणी लेखमालेच्या स्वरुपात 18 सप्टेंबरपासून प्रत्येक शनिवारी आणि रविवारी कर्तव्य साधनावरून प्रसिद्ध होत राहिल्या. वीस भागांच्या मालिकेतील हा शेवटचा भाग.  
 - संपादक


कविताचं पूर्वाश्रमीचं नाव जोत्स्ना. त्याचा अर्थ शीतल चांदणं. चांदणं नेहमीच इतरांना शीतलता देतं. तशी शीतलता इतरांना मदतीच्या रूपानं देऊन त्या शांतवत होत्या.

- शिल्पा नवरे


अगदी लहानपणीपासून मम्मीला शिक्षिका व्हायचं होतं आणि तरीही तिनं सुरुवातीला काही वर्षं बँकेत नोकरी केली. ती तिथे मुळीच रमली नाही. पण त्या काळी बायकांसाठी बँकेतली नोकरी अधिक योग्य समजली जायची. कामाचे ठरलेले तास आणि भरपूर पगार. मम्मीला आपल्या वडिलांचं मन राखायचं होतं. मुलींनी योग्य, सुरक्षित मार्ग निवडावा ही आजोबांची इच्छा होती. मम्मीपप्पांचं लग्न झालं आणि पप्पांनी तिला तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. शिक्षण क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेऊन ती कॉलेजमध्ये लेक्चरर झाली. स्वतः शिक्षिका झाल्यावरही तिच्यातली विद्यार्थिनी कायम राहिली. नवनवीन गोष्टी शिकण्याची तिला भारी हौस होती.

वर्गात तंत्रज्ञानाच्या मदतीनं मुलांना शिकवण्याविषयी शासकीय आदेश आला तेव्हा पारदर्शक कागदावर तिनं छान मार्करनं मुलांसाठी महत्त्वाचे मुद्दे लिहिले. प्रोजेक्टर कसा वापरायचा हे तिनं शिकून घेतलं आणि त्यावर शिकवायला लागली. आम्हा बहिणींना मम्मीचं खूप कौतुक आणि उत्सुकता वाटत होती. तिच्या तंत्रज्ञान वापराविषयी आम्ही तिला सतत प्रश्न विचारत असू. शेवटच्या दिवसांमध्ये म्हणजे 2014 मध्ये मम्मी जाण्याआधी काही दिवसांपूर्वी तिनं कॉम्प्युटर शिकवण्यासाठी एका शिक्षकाची नेमणूक केली होती. मी तिला इमेल वापरायला शिकवलं. तिला खूप आनंद झाला. ती मला म्हणाली, 'आधीच्या पिढीतल्या लोकांना तंत्रज्ञान शिकवण्याचं कसब आणि त्यासाठी लागणारा संयम असं दोन्ही तुझ्याकडे आहे'

मम्मीला निरनिराळे पदार्थ करायला आवडायचे. मराठी, गुजराथी, राजस्थानी, साऊथ इंडियन, नॉर्थ इंडिअन, मॅक्सिकन, इटालिअन असे वेगवेगळ्या प्रांतांतले पदार्थ ती करून बघायची. तिला नुसती फर्माईश देण्याचा अवकाश... ती लगेच घरीच तो पदार्थ करायची. आम्हा तीन भावंडांमध्ये आईच्या या घरी केलेल्या देशोदेशीच्या पदार्थांना मीच सर्वात जास्त न्याय दिला असेल. मला घरचं जेवण आवडतं. लहान असताना तर मला कधी बाहेरचं, हॉटेलचं खाण्याची इच्छाही व्हायची नाही. मम्मी रेस्टॉरंटच्या शेफशी गोड बोलून पाककृती जाणून घ्यायची आणि घरी करून बघायची. मात्र ती तिचा सगळा वेळ काही स्वयंपाकघरात घालवायची नाही. तिला कितीतरी गोष्टींची आवड होती, छंद होते... तिनं उत्कटतेनं त्यांचा पाठपुरावा केला... ऑईल पेंटिंग, क्राफ्ट, वाचन, कविता लिहिणं.

आई ही मुलाची पहिली शिक्षिका असते. उन्हाळ्याच्या सुट्टीत तिनं आम्हाला पोहण्याची शिकवणी लावली. आम्ही थोडे मोठे झाल्यावर प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत पोहायला जाणं रोजचंच झालं. दहावीत सुट्टीत मी घरी राहून अभ्यास करायचे. मम्मी माझ्या धाकट्या भावंडांना पोहायला घेऊन जायची. तिला पोहायला आवडायचं. ती लहान असतानाच तिला आणि दोन्ही मामांना आजोबांनी पोहायला शिकवलं. या बापलेकीच्या नात्यात खूप जवळीक होती. मात्र मम्मी एकवीस वर्षांची असतानाच ते ब्रेन हॅमरेज होऊन गेले. मम्मी नियमितपणे चालायची. आरोग्याला पोषक असा आहार घ्यायची... नियमित पोहणं आणि योगा. ती दीर्घायुषी होईल असंच आम्हाला नेहमी वाटायचं. पण नियतीच्या मनात दुसरंच होतं.

मम्मीच्या आजाराविषयी मला कळलं तेव्हा मी बॉस्टनला होते. मी ब्रेन डॅमेज हा शब्द ऐकला आणि भीतीची लाट माझ्या मनात उसळली. मम्मी आम्हाला पूर्वीसारखी चालतीफिरती हवी होती. आम्ही भारतात आलो. डॉक्टरांनी सर्व परिस्थिती सांगितली. अवयवदानाचा विचार करण्याविषयी सल्ला दिला. डॉक्टरांनी अगदी साध्यासरळ शब्दांत आम्हाला सांगितलं की, मेंदू सर्व शरीरावर नियंत्रण ठेवतो. मम्मीचा मेंदू इतका नादुरुस्त झालाय की, तो पूर्ववत होणं शक्य नाही. मात्र शरीरातले अवयव अजून धडधाकट आहेत. तिला ताबडतोब हॉस्पिटलला आणण्यात आलं. लगेच व्हेंटिलेटर लावला. मम्मीची छाती वरखाली होत होती. तिचा चेहरा अगदी शांत दिसत होता. जणू काही तिला झोप लागलीय. पण ही गाढ झोप आहे, यातून ती कधीच जागी होणार नाही हे आमच्या पटकन लक्षात आलं नाही. 

आम्ही तिघाही भावंडांनी डॉक्टरांच्या म्हणण्याचा विचार करून एकमतानं निर्णय घेतला. माझे आईवडील हे पुरोगामी विचारांचे, विज्ञानाचे पुरस्कर्ते होते. आम्हाला वाटलं की, मम्मीचे इतके सुंदर डोळे कुणाला मिळाले तर त्या डोळ्यांतून त्या व्यक्तीला जग बघता येईल. हा निर्णय घेणं सोपं नव्हतं. त्यात आमची खूप घालमेल झाली, दमछाक झाली. पण शेवटी मनाला समाधान मिळालं. आता मम्मीला हट्टानं धरून ठेवण्यात अर्थ नव्हता. तिला जाऊ द्यायला हवं होतं. डॉक्टरांनी आम्हाला कल्पना दिली की, व्हेंटिलेटरमुळे तिचे अवयव नीट आहेत, पण थोड्या वेळात ते खराब व्हायला सुरुवात होईल.

एका संध्याकाळी मम्मीचे काही विद्यार्थी आमच्याकडे आले. मम्मीनं पप्पांसाठी लिहिलेली एक छोटी कविता त्यांनी लिहून आणली होती. ती माझ्या मम्मीला दिलेली मोलाची श्रद्धांजली आहे.

एक तारा निखळला आणि निखळताना अधिकच शुभ्र झाला

आपल्याच सुखाची राखरांगोळी झाल्यावर
कोणी कोणाच्या दारी अलगद रांगोळी काढून जातं?
असं वास्तवात सोड... स्वप्नात तरी कधी होतं?

उगवणारा सूर्य संजीवन पण मावळणारा
कधी आपलाच प्रकाश देऊन जातो तहानलेल्या गात्रांना?

जन्माला येणं नसतं कधी कुणाच्या हाती
पण आल्यावर काय करायचं या जन्माचं....

ही कविता ज्या कवियित्रीनं लिहिली तिलाच अर्पण. कविता मॅडम तुम्हाला सलाम! परत भेटू या.


आदरणीय कविता

माझी आई कविता करकरे ही जणू धैर्याचं प्रतीक होती. माझ्या वडलांना त्यांच्या करिअरसाठी तिनं भक्कम पाठिंबा दिला, ते करिअरही असं जिथे डोक्यावर प्रचंड अशा जबाबदारीचा डोंगर आणि जिवाला सतत धोका. सामाजिक न्याय, समता यांबद्दलच्या तिच्या जाणिवा तीव्र होत्या. ती एक धैर्यवान स्त्री होती. माझ्या सासूबाई शिल्पा नवरे यांनी तिच्या स्वभावाचे पैलू दाखवणारी श्रद्धांजली तिला वाहिली आहे...

खरोखरच आश्चर्य वाटावं, अभिमान वाटावा अशी विहीण आणि व्याही आम्हाला कविता-हेमंतच्या रूपात भेटले. ही इतकी विलक्षण माणसं होती की, त्यांच्याशी जवळचं नातं असणाऱ्या कुणालाही त्यांच्या सहवासाचा अभिमान वाटावा. ते आमच्या कुटुंबाचा भाग झाले याचा आम्हाला कोण आनंद झाला. याबद्दल आमचा मुलगा देवदत्त यालाच धन्यवाद द्यायला हवेत की, त्यानं त्यांची मुलगी जुई हिच्याशी लग्न केलं.

हे नातं जुळलं ते डिसेंबर 2006च्या दुसऱ्या आठवड्यात जुई करकरेंचं माझा मुलगा देवदत्त याच्याशी लग्न ठरल्यामुळे. माझ्या सासूबाई अत्यवस्थ होत्या म्हणून आजारी आजीला भेटायला देवदत्त 18 डिसेंबरला भारतात आला.

तो 15 दिवसच इथे राहणार होता. त्या वेळी तो जुईला दोनतीनदा भेटला. त्यांची ओळख झाली. दोघांनी पसंती दिली. त्यानंतर जुईच्या आईवडलांनी आणि आम्ही (माझे पती सुनील आणि मी) दोघांनी आणि अर्थात जुई-देवदत्त यांनीही संध्याकाळी साडेसात वाजता माटुंगा जिमखान्यावर भेटायचं ठरवलं. आम्ही तिथे पोहोचलो. आमच्यासमोर मेड फॉर इचअदर  असं जोडपं - श्री. हेमंत आणि सौ. कविता प्रेमभरानं आमचं स्वागत करायला उभेच होते.

या पहिल्या भेटीतच लक्षात आलं की, हेमंत करकरे यांचं जगणं गीतेत म्हटल्याप्रमाणे आहे...

कर्म करताना बुद्धी चांगली दे
कर्म करताना देह हा पडू दे
कर्म करताना पूजा तुझी (देवाची) होवो
निश्चयाचे बळ सदा अंगी राहो

असे हे हेमंत करकरे. त्याचबरोबर प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते या उक्तीचा अनुभव मला कविता करकरे यांना बघून आला. पुरुषाच्या आयुष्यात लग्नापूर्वी त्याचं व्यक्तिमत्त्व घडवणारी आई असते. लग्नानंतर उर्वरित आयुष्यात त्या पुरुषाच्या सुखदुःखात, यशापयशात त्याच्या पत्नीचा सिंहाचा वाटा असतो. मात्र स्त्रीच्या या कर्तृत्वाची आपण हवी तेवढी दखल घेत नाही. कविता हे याचंच उदाहरण. त्या सतत सावलीसारख्या आपल्या पतीच्या सोबत राहिल्या. धाडसी आणि प्रामाणिक पोलीस अधिकारी असलेल्या पतीला त्यांच्या आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर खंबीरपणे साथ दिली. एवढंच नाही तर आयुष्यातल्या त्या दुःखद प्रसंगात ठामपणे निराश झालेल्या, खचलेल्या कविता आपल्या तीन मुलांबरोबर राहिल्या.

श्री. हेमंत करकरे यांना एक ज्येष्ठ पोलीस अधिकारी म्हणून ओळखायचे. पण एवढ्या मोठ्या पोलीस अधिकाऱ्याची पत्नी म्हणून कविताला अभिमान असला तरी यत्किंचितही अहंकार नव्हता.

साखरपुड्यानंतर, लग्नानंतर आमच्या आप्तेष्टांच्या, मित्रमंडळींच्या बोलण्यात कविताचं कौतुक असायचं. तिच्या प्रेमळ, उमद्या स्वभावाबद्दल तर ही मंडळी बोलायचीच शिवाय तिच्या सौंदर्याबद्दलही बोलायची. त्यांचं सर्वांचं असं निरीक्षण होतं की, खानदानी स्त्रीप्रमाणे असलेलं धारदार नाक आणि अत्यंत बोलके, लोभस डोळे त्यांच्या बुद्धिमत्तेची चमक दाखवतात. खरंच... त्यांचे ते पाणीदार डोळे आठवले तरी माझ्या डोळ्यांत पाणी येतं. आम्हाला दोघींना काही काळ एकत्र व्यतीत करता आला. जुई-देवदत्तच्या लग्नाच्या खरेदीला आम्ही कायम बरोबर जात होतो. आमच्या दोघींत छान संवाद साधला गेला होता. कोणताही चांगला कार्यक्रम असला तर त्या हमखास फोन करून त्यांच्याबरोबर मला घेऊन जायच्या. मोठ्या बहिणीवर करावी तशी माया, प्रेम त्यांनी माझ्यावर केली आणि तिथेच आमचं बहिणीचं नातं सुरू झालं.

लग्नानंतर सौ. जुई अमेरिकेला जायला निघाली... त्या दिवशी त्यांचा फोन आला, 'शिल्पाताई, तुम्ही घरी काही करू नका. मी सर्व काही घेऊन येते.' थोडक्यात आम्हा दोघींत एक विलक्षण असा एकोपा निर्माण झाला. जुईच्या पहिल्या बाळंतपणाच्या वेळी कवितानं बाळासाठी अगदी काटेकोरपणे खरेदी केली. बाळंतिणीला द्यायचे खाण्याचे पदार्थ, डिंकाचे लाडू, अळिवाचे लाडू, आळणीच्या दाण्यापासून गोडाचे प्रकार इत्यादी. जुईबरोबर मीही ते खावं हा आग्रह.

आम्ही दोघी बॉस्टनला अगदी आनंदात एकत्र राहिलो. त्या वेळच्या आमच्या इतक्या सुरेख नात्याच्या आठवणी मनात अजूनही पिंगा घालतात. प्रत्येक चांगल्या नात्यातही प्रसंगी मतभेद असतात, पण थोड्याच वेळात आम्ही ते बाजूला सारत होतो. अमेरिकेत कुणाच्या घरी गेल्यावर तिथे खाद्यपदार्थ कसे करायचे हे मी कविताकडून शिकले. विशेषतः तुम्ही मुलीच्या घरी गेल्यावर दुसऱ्याचं म्हणणं शांतपणे कसं ऐकायचं हेही.

माझी मुलगी प्रणोती तिथे बॉस्टनला पीएचडी करत होती. कविता तिचं कौतुक करून तिला लाडाने पन्नु म्हणायची. मी म्हणत असे, 'मला प्रणोतीच्या लग्नाच्या वेळेस काळजी करायला नको कारण कविता माझ्याबरोबर असणार.' दुर्दैवानं भविष्यात वेगळं काही वाढून ठेवलं होतं.

अमेरिकेत प्रत्येकाला आपापली कामं करावी लागतात, पण मी बॉस्टनला असताना त्या मला चपातीही लाटू द्यायच्या नाहीत. सुट्टीच्या दिवशी त्या पराठे करायच्या. म्हणायच्या, 'चला शिल्पाताई... या गरमागरम पराठे खायला.' त्या दिवसांच्या अनेक आठवणी मनात आहेत. 26/11च्या त्या दुर्घटनेनंतर ईशा झाली तेव्हा आम्ही दोघी बॉस्टनला आलो. देवदत्तचं अपार्टमेंट त्या बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावर होतं. रोज संध्याकाळी आम्ही दोघी त्याच मजल्यावरच्या सोलेरिअममध्ये गप्पा करत असू. ती नेहमी सूर्यास्ताची वेळ असायची. समोर पसरलेल्या अथांग सागराकडे आम्ही बघत असताना कविता आपलं मन मोकळं करायची. त्या 26/11च्या दुर्घटनेबद्दल बोलायच्या. म्हणायच्या, 'आपण मुलांकडे काही गोष्टी बोलू शकत नाही.' त्यांच्या मानसिक वेदनांची मी साक्षीदार होते. त्यांच्या दुःखानं माझं मन व्याकुळ होऊन रडायचं.

आपण बहुतेक जण कधी विचारही करत नाही की, पोलीस अधिकाऱ्यालाही त्याच्या नोकरीव्यतिरिक्त बायको, मुलं यांची जबाबदारी असते. ही मंडळीही त्यांच्या घरी येण्याची रोज वाट पाहत असायची. पोलीस अधिकाऱ्यालाही कुटुंबाबरोबर वेळ घालवण्याची तीव्र इच्छा असते, घरच्यांच्या सहवासाचा आनंद लुटायचा असतो. मात्र लोक सतत त्याच्या मागे मागे असतात आणि त्याचा त्रास त्या अधिकाऱ्याला होतो आणि त्याच्या कुटुंबालाही.

हेमंत जुलै 2008ला जुई आणि देवदत्त यांच्या घरी बॉस्टनला 12-15 दिवसांसाठी गेले. कविता आधीच तिथे गेल्या होत्या. लग्नानंतर जुईचं कसं चाललंय हे बघण्यासाठी हेमंत तिथे गेले. तिथे आजूबाजूला लोकांची गर्दी नसल्यानं ते 12-15 दिवस अतिशय आनंदात, मजेत गेले. ते भारतात परतल्यावर त्यांनी मला सांगितलं की, परतीच्या प्रवासाला निघत असताना जुईनं विचारलं, 'पप्पा, तुम्हाला इथे खूप आवडलंय. परत कधी येणार? सुट्टी आणखी वाढवत का नाही?' स्वतःच्या कर्तव्याच्या बांधिलकीनं ते उत्तरले, 'कुणाला माहीत मी परत येईन की नाही? मला कल्पना नाही.'

हेमंतनं आणि कवितानं जुईला ज्या पद्धतीनं वाढवलं, घडवलं ते खरंच अविश्वसनीय आहे. त्यांनी मुलगी लग्न होऊन सासरी गेली की तिनं सासूसासऱ्यांचं मन जिंकायचं, तसंच त्या घरच्या चालीरिती जाणून स्वीकारायला हव्यात हेही शिकवलं असेल. आता ते दोघंही नाहीत. पण मी शपथपूर्वक सांगते की, जुईच्या मनावर ही मूल्यं अगदी शंभर टक्के रुजली आहेत. त्याहीपेक्षा त्यांनी कधी तिच्या वैवाहिक आयुष्यात ढवळाढवळ केली नाही. त्यामुळेच तिला आणि आम्हालाही त्या मूल्यांच्या आधारे जगणं सोपं झालं.

(अनुवाद: शोभा चित्रे)

- जुई करकरे - नवरे
jui.navare@gmail.com


वाचा 'माझे पप्पा हेमंत करकरे' या लेखमालेतील इतर सर्व भाग 

मुंबईतले ते भीषण तास...

शेवटचा प्रवास...

हेवा वाटावा असे वीरमरण...

संकटसमयी सगळ्यांच्या पुढे उभा राहून लढणारा धैर्यधर...

बुलेटप्रुफ जॅकेटचा अपशकुन

हौतात्म्यामागची आजन्म तपश्चर्या

कुटुंबवत्सल माणूस

चंद्रपूरचं आव्हान

चंद्रपूरमधील आठवणी सांगणारा काही पत्रव्यवहार

चंद्रपूरमधील बालपणीच्या आठवणी

निर्जीव लाकडामध्ये प्राण फुंकणारे पप्पा...

सहकाऱ्यांनी जागवलेल्या आठवणी - पूर्वार्ध 

सहकाऱ्यांनी जागवलेल्या आठवणी - उत्तरार्ध

प्रियजनांनी जागवलेल्या आठवणी...

परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी आणि भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष यांनी जागवलेल्या आठवणी...

बहिणीनं आणि मित्रानं जागवलेल्या आठवणी 

वर्गमित्रानं आणि स्वयंपाक्यानं जागवलेल्या आठवणी 

नवऱ्याने आणि सासऱ्यांनी जागवलेल्या आठवणी...

Tags: लेखमाला जुई करकरे जुई करकरे - नवरे माझे पप्पा हेमंत करकरे मुंबई दहशतवादी हल्ला 26/11 अँटी टेररिझम स्क्वॉड दहशतवाद विरोधी पथक एटीएस हेमंत करकरे भाग 20 Marathi Series Jui Karkare Majhe Pappa Hemant Karkare My Pappa Hemant Karkare Hemant Karkare : A Daughter's Memoir Part 20 Jui Karkare- Navare Load More Tags

Comments:

संजीवन

मालीकेच्या नायक,मालिकेचा दुर्मिळ फोटो.वाचकवर्गाची पकड धरून ठेवणारी मालिका,लेखिकाचा हा लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे ह्याचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच पडेल. पुस्तक प्रकाशनाची आतुरतेने वाट पाहु.

Add Comment