वीरमरण...

माझे पप्पा हेमंत करकरे - भाग 3

परिस्थिती माणसाला सामर्थ्यवान किंवा दुबळं करत नाही, तर परिस्थिती माणसाचं खरं रूप निदर्शनास आणून देते.  
- हेमंत करकरे, वय 21. 17 मे 1975.
(रोजनिशीतील नोंद)


26/11च्या मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्याच्या बातम्या जगभरातल्या प्रसारमाध्यमांनी दाखवल्या. भारतातले एटीएस प्रमुख या हल्ल्यात मारले गेले ही गोष्ट कोणालाही मान्य होत नव्हती. आमचे पप्पा अतिशय स्थिरचित्त आणि शांत स्वभावाचे. ते कमालीचे धैर्यवान होते. त्यांचं नियोजन आणि त्याबरहुकूम नेमकी कृती ही त्यांच्या कामाची खासियत होती. एक ऑफिसर म्हणून त्यांचं रेकॉर्ड भारदस्त होतं. त्यांच्या अशा मृत्यूनं आम्हा कुटुंबीयांची मती गुंग झाली.  

जगभर त्यांची प्रशंसा ‘मृत्यूला न घाबरणारा’, ‘आदर्श नायक’, ‘बहादूर’, ‘धाडसी’ अशा कैक शब्दांनी करण्यात आली. प्रशंसा ऐकताना माझं हृदय अभिमानानं भरून यायचं. मन मात्र अतीव दुःखानं भळभळत राहायचं. जगासाठी ते कितीही कर्तबगार आणि कर्तृत्ववान व्यक्ती असले तरी माझ्यासाठी ते फक्त ‘माझे पप्पा’ होते. आम्हा बापलेकीचं आमचं आमचं म्हणून एक जग होतं. 

माझ्या प्रत्येक वाढदिवसाला मला सर्वात पहिल्या शुभेच्छा पप्पा द्यायचे. दर वेळी काहीतरी आगळीवेगळी भेटवस्तू द्यायचे. माझ्या सोळाव्या वाढदिवासाला तर त्यांनी मला खास स्वरोव्स्कीचं एक पेंडंट दिलं. पेंडंटबरोबर सोन्याची छोटीशी चेन. या पेंडंटचा आकार कुलपासारखा, त्याला जोडलेली सोन्याची बारकीशी किल्ली. या गिफ्टसोबत पप्पांनी मला एक छोटी चिठ्ठीही दिली. तिच्यात लिहिलं होतं, ‘‘तुझ्या सगळ्या इच्छाआकांक्षांची कुलपं उघडण्याची किल्ली तुला सापडो आणि तुला कदाचित माहिती नसेल, पण ते कुलूप तुझ्यातच आहे आणि किल्लीही तुझ्या आतच दडली आहे.’’

अगदी लहानसहान गोष्टींबद्दल पप्पा जागरूक असायचे. त्यांच्या सगळ्या याद्या तयार असायच्या. मग ते महिन्याचं खर्चाचं अंदाजपत्रक असो, आमची ट्रीप असो, वाढदिवसाच्या पाटर्या असोत किंवा घराची सजावट करायची असो... यांच्या याद्या तयार. 

पप्पांनी कधीही आमचं आयुष्य नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला नाही किंवा कधी आमच्यावर कसलं दडपण आणलं नाही. आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं. मग ते करिअरसंबंधी असोत किंवा आयुष्याचा जोडीदार निवडण्याविषयी असोत.

नियोजन हा त्यांचा स्थायिभाव होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कॉलेजच्या दिवसांतल्या डायऱ्या माझ्या पाहण्यात आल्या. त्यात दिसत होतं... दुसऱ्या दिवशी काय करायचं याची यादी होती, काल संपवलेल्या कामांवर काट मारलेली होती. मला अजून आठवतंय, माझ्या लग्नाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी ते हॉल बघायला गेले. तिथले टॉयलेट स्वच्छ नव्हते. लगेच तिथल्या सफाई कामगारांना बोलावून मनासारखी स्वच्छता होईपर्यंत पप्पा तिथेच थांबून राहिले. रात्री उशिरा घरी परतले आणि तरी दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे ताजेतवाने, उत्साहात लग्नाला हजर झाले. रात्री त्यांची झोप झाली नसेल असं कुणाला वाटलंही नाही.  

घरातल्या एका तिजोरीवजा कपाटावर फक्त पप्पांचा अधिकार असायचा. आम्ही कुणीही त्याला हात लावलेला त्यांना चालायचं नाही. त्या कपाटात त्यांचे कपडे आणि आतल्या तिजोरीत कामाचे कागद, फायली असायच्या. क्वचित कधीतरी पप्पा त्या कपाटाला कुलूप लावायला विसरले की लगेच आम्ही मुलं उत्सुकतेनं ते उघडत असू. कपाटात काय आहे ते बघण्याचा मोह आम्हाला व्हायचा. बघून झाल्यावर आम्ही तिथल्या वस्तू जशाच्या तशा ठेवायचो. पण हे काम आम्ही कितीही काळजीपूर्वक केलं तरीही आम्ही कपाट उघडल्याचं त्यांना कळायचंच. आम्ही गंमतीनं म्हणत असू की, बहुधा त्यांच्या तीक्ष्ण नजरेला आमच्या लहानशा हातांचे ठसेही दिसत असतील.


पप्पांच्या अंत्यविधीनंतरही सतत लोक आम्हाला भेटायला येत होते. पप्पांच्या नसण्याच्या प्रचंड आघातातून सावरण्याचा प्रयत्न एकतर मम्मी आधीच करत होती. तिची तब्येत स्थिर राहावी यासाठी डॉक्टर स्ट्राँग औषधं देत होते, त्यामुळे आलेल्या प्रत्येकाला भेटणं तिला शक्य नसायचं. मग देवदत्त, आमचे दोन काकाकाकू, आत्या आणि तिचे यजमान, असे सर्व जण तेरा दिवस घरीच राहायला आले शिवाय कुटुंबातल्या आल्या-गेलेल्यांना कुणीतरी भेटणं गरजेचं होतं. ती जबाबदारी मग या सगळ्यांनी पार पाडली.

मम्मी नेहमीच घरी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला काही ना काही खाऊपिऊ घालायचीच. तिनं हा शिरस्ता नेहमीच पाळलेला होता. किमान चहा तरी ती घ्यायलाच लावायची. त्या दुःखद दिवसांमध्येही हा शिरस्ता पाळला गेला. मम्मी स्वतः औषधाच्या गुंगीत होती, पण  तिनं घरात आलेल्या प्रत्येकाला चहापान करायचं या सूचना घरकाम मदतनिसांना दिलेल्या होत्या. सांत्वनासाठी येणाऱ्या सगळ्यांसाठी घराची दारं सतत उघडी होती. 

प्रसारमाध्यमं वगळता सदिच्छाभेटीसाठी येणाऱ्या प्रत्येकाला घरात सोडायला सुरक्षा रक्षकाला सांगितलं होतं. त्यातल्या बहुतेकांना तर मी ओळखतही नव्हते, पण ते आपली ओळख करून द्यायचे. पप्पांशी त्यांचा कसा, किती संबंध आला ते सांगायचे. काही लोकांची पप्पांशी वीसपंचवीस वर्षांची ओळख तर काहींची अलीकडची. काहींचा तर तसा पप्पांशी थेट संबंधही आलेला नव्हता, पण अशा तऱ्हेच्या प्रसंगात आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी, एकजूट दाखवण्यासाठी ते येत होते. पप्पांच्या बलिदानाप्रति आदर व्यक्त करण्यासाठी, आमच्या सांत्वनासाठी जमणारी ही मंडळी. आम्हीही त्यांच्या भावनांचा आदर ठेवून त्यांना भेटत होतो, त्यांना वेळ देत होतो. या सगळ्यांनी आम्हाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल आमचं कुटुंब नेहमीच कृतज्ञ राहील. 

माझ्या पप्पांचा आदरातिथ्याचा वारसा सांभाळण्याचा प्रयत्न मी माझ्या परीनं करत होते. कोऱ्या चेहऱ्यानं दिवसभर लोकांना भेटत होते. पण रात्र झाली, सगळे निघून गेले की सरतेशेवटी मला माझ्या घरी एकांत मिळायचा. मग मी त्या अंधारात माझ्या दुःखाला वाट करून द्यायचे.  

मी पप्पांच्या कपाटातले त्यांचे कपडे बघितले. वाटलं की, ते माझ्या काकांना द्यावेत. ते पप्पांच्याच उंचीचे आहेत. भावाची आठवण म्हणून काका ते वापरू शकतील पण पप्पांचे कपडे घरातच अन्य कुणी घातलेले आपल्याला  पाहवणार नाहीत असं माझ्या भावाचं मत पडलं. त्यापेक्षा ते सरळ बाहेर कुणालातरी दान करावेत असाही एक विचार आला. आमचे यावर वादविवाद झाले, चर्चा झाल्या. आम्ही भांडलो नाही, पण पप्पांच्या अशा जाण्यानं आमच्या सगळ्यांच्या मनात दाटलेलं दुःख, अगतिकता, अन्यायाची भावना होती. या सगळ्याचा निचरा कुठेतरी व्हायला हवा होता. आम्हा भावंडांना एकत्र म्हणून जो काही थोडा वेळ मिळत होता तेव्हा आम्ही असं बोलून, भांडून मोकळे होत होतो. कुणी आजूबाजूला नसलं, आमचे आम्हीच असलो की डोळ्यांना धार लागायची. दिवसभर आवरून धरलेला बांध फुटायचा.

काही दिवसांनी पोलीसदलातर्फे घरासमोर एक प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली. त्यात प्रार्थना म्हणण्यासाठी हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन आणि ज्यू अशा सर्व धर्मांमधल्या प्रतिनिधींना बोलावलं होतं. मी या उपक्रमाचं स्वागत केलं खरं, पण असलं काहीच आणि कुणीच माझ्या पप्पांना परत आणू शकणार नाही हा विचार माझ्या मनातून मी कसा काढू? आमच्या घरासमोर छोटा चौथरा उभारला गेला. या सभेला हजर राहणाऱ्यांना बसण्यासाठी शंभर खुर्च्या ट्रकमधून आल्या. 26/11च्या हल्ल्यात शहीद झालेल्या अधिकाऱ्यांची मोठीमोठी छायाचित्रं मुंबईभर सगळीकडे लागली होती. 12 डिसेंबर म्हणजे पप्पांचा जन्मदिवस ‘शौर्यदिन’ म्हणून घोषित करण्यात आला. आमच्या घरापर्यंत कँडल मार्च काढले गेले. या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांच्या पत्नींना भगिनीभावानं मम्मीनं एकत्र आणलं. त्यांचा एक सपोर्ट ग्रुप तयार केला. 26/11च्या हत्याकांडामुळं नियतीच्या एका फटकाऱ्यात या सगळ्या जणी एकत्र आल्या. मम्मी त्यांचा भक्कम आधारस्तंभ झाली.

आमच्यासह सर्व हुतात्म्यांच्या घरी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी भेट दिली आणि नुकसानभरपाईचे धनादेश कुटुंबीयांकडे सुपुर्द केले. आमच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिलेल्या जनतेचे आम्ही वृत्तपत्रातून आभार मानले. दिवस असे भांबावलेल्या अवस्थेत चालले होते. सतत एकामागोमाग घडणाऱ्या घटनांची वावटळ चालू होती. सोसाट्याच्या वाऱ्यामुळं झाडावरून गळलेली पानं दिशाहीन होऊन सैरावैरा पळतात तशीच आमची अवस्था होती.

अंत्यविधीनंतर तीन दिवसांनी स्मशानभूमीतून पप्पांच्या अस्थी गोळा केल्या. त्यांचं समुद्रात विसर्जन केलं. पप्पांच्या अस्थींचं ते छोटं भांडं बघून माझ्या पोटात ढवळून आलं. एवढ्या मोठ्या देहाची चिमूटभर राख! हिंदू तत्त्वज्ञान शिकवतं की, 'आकाश, वायू, जल, अग्नी आणि पृथ्वी या पंचमहाभूतांतून आपण आलोय, केव्हातरी आपलं शरीर पुन्हा या पंचतत्त्वातच विलीन होणार.' मी हे तत्त्वज्ञान जाणून आहे. जन्माला आलेल्या प्रत्येकाचं हे विधिलिखित आहे यावरही माझा विश्वास आहे, पण तरीही पप्पांच्या मृत्यूनंतर हे तत्त्वज्ञान स्वतःलाच पटवणं मला कठीण जात होतं.

मृत्यूनंतर शरीर पंचतत्त्वात विलीन झाल्यावरही क्रियाकर्मं थांबत नाहीतच. मग दहाव्या दिवशी देवळात पिंडदान झालं. भटजींनी सांगितल्याप्रमाणे भावानं भाताचे पिंड केले. हे पिंड घराण्यात आधी होऊन गेलेल्या पूर्वजांचे प्रतिनिधी. वातावरण मंत्रोच्चारांनी भारलेलं. या क्रियाकर्माचा हेतू एवढाच की, गेलेल्या व्यक्तीच्या आत्म्यानं शांतपणे पुढल्या प्रवासाला लागावं. आत्मा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात पुन्हा पुन्हा अडकतो असं मानतात आणि शेवटी तो जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटतो तेव्हा त्याला मोक्ष मिळतो. तो ब्रह्मांडाचा एक भाग होतो. मम्मीला मात्र या सर्व क्रियाकर्मातून मनःशांती मिळाली. 

पप्पांनी जिवंतपणी देशाची सेवा केली, देशासाठी बलिदान दिलं, त्यामुळे त्यांना नक्कीच मोक्ष मिळणार अशी मम्मीला खातरी होती. काही वेळासाठी आपलं दुःख बाजूला ठेवून फक्त या मंत्रोच्चारावर मन केंद्रित करण्यासाठी मला मम्मीसारखी मानसिक ताकद हवी होती. हे सगळं घडत असतानाही पप्पांनी शरीरानं आमच्याबरोबर असायला हवं होतं असं मला राहून-राहून वाटत होतंच. मी मम्मीकडं अश्रूभरल्या डोळ्यांनी पाहिलं. तिनं माझं डोकं थोपटलं, म्हणाली, ‘‘आज ना उद्या प्रत्येकालाच हे जग सोडून जायचंय. मृत्यू अटळ आहे. मात्र देशबांधवांच्या संरक्षणासाठी येणारा मृत्यू हा कुणालाही हेवा वाटावा असा मृत्यू आहे. हो की नाही?’’

शेवटचं क्रियाकर्म म्हणजे तेरावं. त्या दिवशी सगळ्यांनी एकत्र भोजन करायचं कारण तो आत्मा आता या पृथ्वीतलावरच्या पाशातून मुक्त झाला. सगळ्या जवळच्या नातेवाइकांना, मित्रमंडळींना जेवणासाठी बोलावलं. ‘तेरावं’ म्हणजे दुखवट्याचा कालावधी संपला. लोक टेबलाभोवती जमले. टेबलावर खीर वगैरे सगळे मराठी पदार्थ होते. चांगला स्वयंपाक केल्याबद्दल लोक केटरर्सला नावाजत होते. मला तर अन्नाचा घास घेणंही कठीण झालं. अशा प्रसंगी नेमकं जेवण चवदार लागतं आणि त्यामुळंच आपल्याला लख्ख जाग येते. जाणवतं की, आयुष्य पुढे सरकरणारं आहे. पप्पांच्या या अशा मृत्यूनंतर माझी अन्नावरची वासनाच उडाली, पण इतरांचं तसंच व्हावं असं नाही.

आमच्या कुटुंबाला ठिकठिकाणाहून शोकसमारंभासाठी निमंत्रणं यायला लागली. पप्पांच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या वर्गमित्रांनी ठेवलेल्या सभेला मी गेले. मम्मी त्या मनःस्थितीत अजून नव्हती. आम्ही मुलांनी जावं. पप्पांच्या वर्गमित्रांनी जिव्हाळ्यानं दिलेली श्रद्धांजली आम्ही बघावी अशी तिची इच्छा होती. मम्मीनं आयुष्याचा जोडीदार नुकताच गमावला होता आणि त्याही परिस्थितीत ती इतरांच्या भावनांचा आदर करत होती. तिचा हा खंबीरपणा पाहून मला तिचा अभिमान वाटला.

आम्ही त्या सभेला गेलो. पप्पांचे कॉलेजमधले मित्र. इतकी वर्षं त्यांनी ती मैत्री जोपासली, अखंड मैत्रीचा अभिमान बाळगला. पप्पा गेले त्याच्या काही महिने आधीच हे सगळे मित्र भेटले होते. त्या वेळी काढलेल्या फोटोकॉपीज्‌ पप्पांचे अगदी जवळचे मित्र सुरेश जुंगारे यांनी सगळ्यांना वाटल्या. तोच फोटो पुढं मोठा करून मांडला होता. त्याच्यासमोर उदबत्त्या जळत होत्या. त्यांतल्या काहींनी छोटी भाषणं केली. मी पप्पांबद्दल काही बोलावं असंही त्यांनी सुचवलं. पण अजूनही पप्पांबद्दल चारचौघांत काही बोलायच्या मनःस्थितीत मी नव्हतेच. मुळात श्रद्धांजली सभेला जाण्याची हिंमतच मी कशीबशी जमवली होती. त्या मित्रांनी पप्पांच्या आठवणींचा जपलेला खजिना, त्यांची मैत्री पाहून मी भारावले. 

जुंगारे यांची नागपूरला सॉफ्टवेअर कंपनी आहे. तेव्हा त्यांची नवीन बिल्डिंग बांधली जात होती. पप्पा गेल्यानंतर बांधकाम पूर्ण झालं आणि बिल्डिंगला नॅशनल ॲवॉर्डही मिळालं. त्या बिल्डिंगचं नाव त्यांनी ‘Junipers Hemant’ असं ठेवलं. नंतर ऑगस्ट 2009मध्ये त्यांनी मम्मीला खास निमंत्रण दिलं. मम्मीनं ते स्वीकारल्यानं त्यांना खूप आनंद झाला.

नंतर पोलीसदलातर्फे 18 शहीद पोलिसांसाठी एक श्रद्धांजली सभा, मुंबई पोलीस जिमखाना-मरीनलाइन्स इथे आयोजित करण्यात आली. शहीद पोलिसांचे मोठे पोस्टर्स करून चौथऱ्यावर ठेवले होते. चौथऱ्यावर फुलं वाहिली होती. या सभेची सुरुवात वेगवेगळ्या धर्मांच्या प्रार्थनांनी झाली. बुद्ध, जैन साधू, मुस्लीम पुढारी, तसंच झोरॅस्टिअस ज्यू असा समुदाय होता. त्यानंतर प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी गाणं म्हटलं. 

त्यानंतर पोलीसदलातल्या लोकांनी एक चित्रफीत दाखवली. ती 26 नोव्हेंबरची चित्रफीत होती. वेगवेगळ्या ठिकाणी मारले गेलेले ते पोलीस... त्यात माझे पप्पा हेल्मेट आणि जॅकेट घालून मृत्यूच्या दरीकडे निघाले होते. हे बघणं मला आणि माझ्या बहिणीला असह्य झालं. आम्ही पटकन तिथून उठलो आणि त्या मोठ्या स्क्रिनपासून दूर जायला लागलो. मम्मीला आमची काळजी वाटली आणि ती उठून आमच्या मागे आली. मला आठवतही नाही की, कुणी आम्हाला परत जागेवर आणलं. त्या प्रसंगीही आम्हाला आमचा आत्मसन्मान जपायचा होता. तरीही पप्पा कसे गेले यापेक्षा ते कसे जगले हे दाखवणं महत्त्वाचं होतं असं मला वाटत होतं. हा कार्यक्रम आखणाऱ्यांनी एवढ्या मोठ्या पडद्यावर अशा तऱ्हेची दृश्यं दाखवून आपली असंवेदनशीलता दाखवली. पप्पांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या आनंदाच्या घटना, त्यांना राष्ट्रपती पदक मिळालं तो प्रसंग असं काही दाखवणं योग्य होतं. त्यांच्या मृत्यूपूर्वीची ही क्लीप मात्र नक्कीच दाखवायला नको होती.

पप्पांच्या मृत्यूनंतर त्यांच्या निर्णयाचं, धाडसाचं काही लोकांनी कौतुक केलं तर याउलट पप्पांनी विनाकारण घाई केली, पप्पांना परिस्थितीचं गांभीर्य जोखता आलं नाही असं म्हणणारेही लोक होते. यांतले बहुतांश लोक पोलीस खात्याबद्दल काहीही माहिती नसणारे किंवा कसलीही तज्ज्ञता नसलेले होते. तर काहींना हुतात्म्यांच्या कुटुंबाला मिळणाऱ्या सरकारी नुकसानभरपाईची रक्कम किती आहे याचीच उत्सुकता होती. मम्मी मात्र अशा गोष्टींनी विचलित न होता शांत राहिली. एक मात्र खरं...  26/11च्या घटना तिला पुन्हा पुन्हा आठवत होत्या त्यामुळं औषध घेतल्याशिवाय तिला झोपच लागत नव्हती. आम्ही दादरला शासकीय निवासस्थानात राहत होतो. आमचं घर तळमजल्यावर होतं. हॉलला जोडून व्हरांडा होता. तो लोखंडाच्या जाळीनं बंद केला होता. मी रात्री घरात येरझाऱ्या घालत असे तेव्हा बाहेर गस्त घालणाऱ्या पोलिसांचा मला आधार वाटत असे.

अगदी भल्या पहाटे अंधारातच वर्तमानपत्रं येऊन पडायची. मी आणि मम्मी ग्रीलमधून हात बाहेर काढून तिथल्या पोलिसांना असतील तेवढी सगळी वर्तमानपत्रं घेऊन यायला सांगत असू. ते वर्तमानपत्र घेऊन यायचे आणि आम्ही त्यांच्यासाठी चहाचा ट्रे तयार ठेवायचो. या वर्तमानपत्रांमध्ये पप्पा आणि त्यांचे सहकारी यांच्या कामा हॉस्पिटलच्या गल्लीत झालेल्या मृत्यूसंबंधी परस्परविरोधी बातम्या यायच्या. पप्पा किंवा  इतर पोलीस अधिकारीही नक्की कसे मारले गेले याची अधिकृत वार्ता आम्हा अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली नव्हती, मात्र पप्पांच्या शेवटच्या क्षणी तिथं उपस्थित असणारे काही पोलीस आमच्या सांत्वनासाठी आले होते. त्यांचा प्रत्यक्षदर्शी अनुभव ऐकून आमच्या डोळ्यांसमोर एक चित्र उभं राहत होतं. 


दहशतवाद्यांचा पाठलाग करत पप्पा कामा हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला पोहोचले. अशोक कामटे आणि विजय साळसकर हे दुसऱ्या बाजूनं तिथं पोहोचले. या तिघांनी काही पोलिसांना तिथंच मागच्या बाजूला ठेवून टोयोटा क्वॉलीस घेऊन कामा हॉस्पिटलच्या पुढच्या बाजूला जायचं ठरवलं. सर्व दिशांनी बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज घुमत होते. प्रसंगाचं गांभीर्य पप्पांच्या लक्षात आलं. आधी वाटल्याप्रमाणे ही दंगल नाही तर हा दहशतवाद्यांचा प्राणघातक हल्ला आहे हे त्यांनी जाणलं. त्यांनी लगेच मेन कंट्रोलरूमला पोलिसांची अधिक कुमक पाठवायला सांगितली. तसंच आर्मीला पाचारण करण्यास सांगितलं, मात्र याची कुणीही दखल घेतली नाही.

पप्पांनी त्यांचा मोटोरोलाचा वॉकीटॉकी कामा हॉस्पिटलच्या मागच्या बाजूस तैनात असलेल्या वायरलेस ऑपरेटर माथने यांना दिला. यामुळे माथने यांना टीमबरोबर संपर्कात राहता येणार होतं. पप्पा कामा हॉस्टिपलच्या पुढच्या बाजूला असणार होते. त्यांच्या जवळ कामटेंचा वॉकीटॉकी होता. त्यांनी मागच्या बाजूच्या टीमला क्रॉस फायर न करण्याची सूचना दिली. साळसकर यांनी गाडी चालवायचं ठरवलं कारण अशा जीवनमरणाच्या प्रसंगात ड्रायव्हरवर जबाबदारी टाकणं योग्य नव्हतं.

साळसकर ड्रायव्हिंगसाठी जागेवर बसले. त्यांच्या शेजारी कामटे बसले. पप्पा मागच्या बाजूला मध्यभागी बसले. साळसकरांचे बॉडीगार्ड जाधव मागे बसले. त्यांच्यासोबत ड्रायव्हर बाळासाहेब भोसले, वायरलेस ऑपरेटर जयवंत पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील होते. क्वॉलिस जशी पुढे सरकली तशी या तीन अधिकाऱ्यांना रस्त्याकडेच्या झुडपात काही हालचाल दिसली. जोरात ब्रेक लावून आवाज करत गाडी थांबली. कामटे गाडीतून उतरले. त्यांनी पोझिशन घेतली. त्यांनी झुडपाच्या दिशेनं गोळ्या झाडल्या. दोन्ही बाजूंनी प्रचंड गोळीबार सुरू झाला. मग  अचानक सगळं शांत झालं. एक आतंकवादी वेदनेनं हात झटकत बाहेर आला. दुसरे दोघं बेडरपणे गल्लीच्या टोकाशी एस. बी. ऑफीसजवळ गेले. तिथे बेछूट गोळीबार करून ते पुन्हा क्वॉलीसकडे वळले. यादरम्यान पोलीस व्हॅन दिवे चमकवत क्वॉलीसवरून पुढे निघून गेली.

या दहशतवाद्यांना क्वॉलीसमध्ये काही हालचाल, जिवंतपणाची खूण दिसली नाही. त्यांनी अक्षरशः क्वॉलीसमधल्या लोकांना गाडीतून ओढून रस्त्यावर टाकून दिलं. गाडीचं मागचं दार उघडण्याचा प्रयत्न केला, पण ते घट्ट बसलं होतं. मग त्यांनी कामटे यांच्या हातून एके-47 खेचून घेतली आणि तीच गाडी घेऊन ते पळाले. साधारण रात्री 12.25 वाजता गाडीचं टायर पंक्चर झाल्यानं त्या दहशतवाद्यांनी असेंब्ली हाऊसजवळ ही गाडी सोडली. सिल्वर स्कोडा कार हायजॅक करून ते पुढे गेले. या तिघा अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी तब्बल चाळीस मिनटांनंतर पोलिसांची कुमक आली. तोपर्यंत ते रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. मग त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. 

घटनास्थळापासून मेन कंट्रोलरूम फक्त दोन मिनटांच्या अंतरावर असूनही त्यांना ताबडतोब मदत मिळू शकली नाही. हे ऐकून माझा संताप अनावर झाला. माझ्या मनात प्रश्नच प्रश्न उभे राहिले. गुन्हेगारांचा नायनाट करणारी ही टीम अशी कशी मारली गेली? बंदुकीच्या गोळ्या लागलेली क्वालीस आणि आतले जखमी पोलीस यांना न बघता पोलीस व्हॅन वेगानं पुढे कशी निघून गेली?

माझी मम्मी जिवंत असेपर्यंत सत्ताधाऱ्यांना हे प्रश्न विचारत होती. तिच्या धैर्याचा आम्हाला अभिमान वाटतो. पण आता तीही नाही. माझ्या आईवडलांनी मला सत्याच्या शोधार्थ निर्भय राहायला शिकवलं. ही लढाई पुढे चालू ठेवणं माझं कर्तव्य आहे. नाहीतर मी स्वतःशी प्रामाणिक राहू शकणार नाही आणि त्यांच्या आदर्शाशीही. माझ्या आईनं या तथाकथित बुलेटप्रुफ जॅकेटच्या आणि हेल्मेटच्या कार्यक्षमतेविषयी उघडपणे प्रश्न केले. हे प्रश्न कायम अनुत्तरितच राहणार याची आम्हाला कल्पना होती, त्यामुळं एकीकडं आईनं हा एवढा संघर्ष करून काही फायदा आहे का असंही वाटायचं तरी तिनं लढा दिला.

मी लहानपणापासून पोलीसदलाच्या संरक्षणाखाली वाढले. मला शूर, ताठ बाण्याच्या मुंबई पोलिसांचा अभिमान आहे. त्यांच्याकडे असलेल्या जुन्यापुराण्या शस्त्रांच्या साहाय्यानं ते शौर्यानं पूर्ण ताकदीनिशी लढले. मुंबई पोलिसांनी माझ्या आईच्या शेवटच्या वर्षात तिला खूप मदत केली. त्यासाठी मी नेहमीच त्यांची ऋणी राहीन. त्याच वेळी हेही खरं आहे की, जबाबदारी घेतल्याशिवाय सुधारणा होणार नाहीत. 26/11 रोजी शहीद झालेल्या पोलिसांनी खाकीवर प्रेम केलं आणि त्यांनी त्या प्रेमाची किंमतपण चुकवली, तीही स्वतःचं आयुष्य समर्पित करून. संपर्क आणि संयोजन यांमधला गोंधळ आणि भ्याडपणे उचललेली पावलं या गोष्टी यांतल्या बऱ्याच जणांच्या मरणास कारणीभूत ठरल्या.  

आम्ही पप्पांचे काही फोटो माध्यमांना दिले, पण टीव्हीवर सतत त्यांचं बुलेटप्रुफ जॅकेट, हेल्मेट घालून निघतानाची व्हिडिओ क्लीप दाखवण्यात येत होती. हेमंत करकरे म्हटलं की ती व्हिडिओ क्लीप लोकांच्या नजरेसमोर यायला लागली. ते सदोष बुलेटप्रुफ जॅकेट आणि हेल्मेट घालून दहशतवाद्यांच्या मागे निघालेल्या पप्पांना सतत बघणं आम्हा कुटुंबीयांसाठी मात्र यातनायम होतं. ती व्हिडिओ क्लीप मृत्यूच्या निमंत्रणासारखी भासत होती. 

मी हिंदू तत्त्वज्ञानाच्या आधारे पप्पांच्या आत्म्याचा अखेरचा प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न केला, पण अजूनही या जगातल्या त्यांच्या शेवटच्या क्षणांचं कोडं मला उलगडलेलं नाही. पप्पांसारखा हिंमतबाज माणूस त्या रात्रीच्या नरसंहाराला बळी पडला हे स्वीकारणं माझ्यासाठी आजही अशक्य आहे.

एक महिना मुंबईला कुटुंबीयांबरोबर राहून मी नवऱ्यासोबत बॉस्टनला परतले. माझी बहीण शिकण्यासाठी युरोपला परतली. फक्त माझा भाऊ आईजवळ राहिला. दुःख, मनस्ताप आणि प्रश्नच प्रश्न मनात रेंगाळत होते. जे घडलं त्याच्या बरोबर उलट घडण्याची काही शक्यता, संधी होती का? पप्पांसारखा शौर्यवान माणूस दहशतवाद्यांच्या गोळ्यांना का बळी पडावा?

(अनुवाद: शोभा चित्रे)

- जुई करकरे - नवरे
jui.navare@gmail.com


वाचा माझे पप्पा हेमंत करकरे या लेखमालेतील इतर भाग 

Tags: लेखमाला जुई करकरे जुई करकरे - नवरे माझे पप्पा : हेमंत करकरे मुंबई दहशतवादी हल्ला 26/11 अँटी टेररिझम स्क्वॉड दहशतवाद विरोधी पथक एटीएस हेमंत करकरे भाग 3 Marathi Series Jui Karkare Majhe Pappa : Hemant Karkare My Pappa : Hemant Karkare Hemant Karkare: A Daughter's Memoir Part 3 Jui Karkare- Navare Load More Tags

Comments: Show All Comments

Rushikesh Devgir Giri

माझ्या कडे तर शब्दच नाहीत. करकरे सर, तुकाराम ओंबळे सर, कामटे सर बदल भारत मातेचे हे सुपुत्र खरे हाडा मासाचे देशभक्त होते. ते आजरामार राहणार...

Jui Karkare Navare

Dear Pandurang, Shivaji, Arvind, Sanjeevan, Anup, Thank you for your kind comments. They mean a lot to me. Writing this book was not easy but now I feel content that my father’s inspirational story will reach many through the medium of this book. I’m grateful to Sadhna Prakashan for their efforts. - Jui Karkare Navare

पांडूरंग आत्माराम थोरात

सुन्न करुन सोडणारा लेख. मॅडम करकरे यांचा या प्रसंगानंतरचा बाणेदारपणा त्यांच्या विषयी शतकोटीचा आदर निर्माण करुन गेला होता व ती घटना अविस्मरणीय.

SHIVAJI PITALEWAD

वाचताना गळा दाटून आला.जगण किती कठीण होत असेल! जुई व समस्त कुटुंबीय या दुःखातून बाहेर पडावं यासाठी आपण आशा करुया.

Arvind

Beautiful write up appreciate your courage to face the situation we are proud of you,your mother,sister& brother & ofcourse your beloved father who is our real National leader & salute to him God bless you

संजीवन

मनावर मोठा धोंडा ठेवूनच त्या काळरात्रीच्या भयानक घटनांचे विदारक चित्र लेखिकेने उभे केले आहे.आई,बहीण,भाऊ आणि इतर नातेवाईक यांच्या त्यावेळच्या भावना इतका काळ उलटल्यावरही वाचकांच्या काळजापर्यंत पोहोचतात.

Anup Priolkar

All articles are very touching. Salute your family members. Be brave. Almighty is great. He will take care of all.

Add Comment