चंद्रपूरमधील बालपणीच्या आठवणी

माझे पप्पा हेमंत करकरे - भाग 11

लवकरच एका नेत्रदीपक लायब्ररीचा जन्म झाला. पारदर्शी प्लॅस्टीक कव्हरमध्ये पुस्तकं चकाकत होती. लायब्ररीचा कॅटलॉग सुंदर अशा पुठ्ठ्याच्या बांधणीत सजून सज्ज होता. पुस्तकांची आवड असणाऱ्या साऱ्यांना पप्पा अतिशय प्रेमानं, आनंदानं ही लायब्ररी दाखवायचे.
- जुई करकरे-नवरे


1991 मध्ये पप्पांची बदली मुंबईहून चंद्रपूरला झाली. चंद्रपूरचं विश्व मुंबईहून अगदी वेगळं. आम्हा लहान मुलांना खेळायला, दंगामस्ती करायला इथं भरपूर जागा होती. मी तर दहा वर्षांची होते. पाठची बहीण सहा वर्षांची आणि अगदी तान्हा भाऊ. इथल्या आमच्या बंगल्याच्या चारही बाजूंनी छान लॉन होतं. विशेष प्रशिक्षित डॉबरमन कुत्र्याबरोबर एक बंदूकधारी पोलीस बंगल्याच्या प्रवेशद्वारापाशी उभा असायचा. अंगरक्षक मला आणि बहिणीला शाळेत घेऊन जायचा. आम्ही मधल्या सुट्टीत शाळेच्या पटांगणात खेळतानाही ते आमच्यावर लक्ष ठेवायचे. पप्पा जिथं-जिथं जायचे तिथं त्यांच्या मागं एस्कॉर्ट जीप असायची. या एवढ्या सुरक्षा व्यवस्थेची गरज आणि तिचं गांभीर्य कळण्याइतपत मी मोठी नव्हते आणि  मम्मीपप्पासुद्धा कधीही अस्वस्थ किंवा कुठल्या दडपणाखाली वावरताहेत असं कधीही जाणवलं नाही.

खरं म्हणजे चंद्रपूरच्या आठवणी या अगदी आनंदाच्या, उत्साहाच्या आहेत. त्यात काळजी, दडपण बिलकूल नाही. लॉनवर खेळणं, झाडावर चढणं, फूलपाखरांच्या मागे धावणं, आमच्या पाळीव हरणाचे लाड करणं, बगीच्यातल्या पाळलेल्या कासवाला न्याहाळणं असंच सगळं. मुंबईतल्या लहानशा अपार्टमेंटमध्ये राहून आल्यामुळं असं मुक्त जीवन अनुभवायला मिळणं ही आमच्यासाठी चैनच होती. संरक्षकांचं सतत आमच्या आवतीभोवती असणं एवढीच काय ती त्रासदायक गोष्ट होती. विशेषतः दुपारच्या जेवणाच्या वेळीही ते आमच्या आजूबाजूला असायचे. ते  मला मान्य नव्हतं. मला इतर मुलींसारखं मोकळेपणानं बागडावंसं वाटायचं. तिथल्या मुली शाळेत येताना बसमधून एकट्या बिनधास्त यायच्या. शेवटी एकदाचं मी या रक्षकांना सांगितलंही, 'तुम्ही थोडं लांब राहून लक्ष ठेवा. सतत माझ्या आजूबाजूला राहू नका.' ते प्रोफेशनल होते तरी त्यांनी हसून माझं म्हणणं मान्य केलं आणि मी खेळत असताना ते लांबून लक्ष ठेवायला लागले.

पप्पांचं बारीकसारीक गोष्टीकडेही लक्ष असायचं. त्यांना बागकामाची भारी आवड. लॉनची वेळच्यावेळी कटिंग होतेय ना हे ते स्वतः जातीनं बघायचे त्यामुळं आमचं लॉन सुंदर आणि नीटनेटकं दिसायचं. त्यांनी आम्हा भावंडांकडून रोपं लावून घेतली. तिथंच बागेत बांबूची झाडं लावून 'चक्रव्यूह'ही तयार केलं. केवळ अॅम्युझमेंट पार्कमध्येच पाहायला मिळणारं 'चक्रव्यूह' आपल्या घरच्या बागेत असेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं शिवाय दोन झाडांच्या मध्ये झोपाळापण लावला होता. सुट्टीत माझी चुलत, आते, मामे भावंडं जमली की त्यावर बसून झोके घेणं आम्हाला आवडायचं. अगदी रम्य म्हणावं असं ते बालपण होतं. माझी आई तर मला 'लिटील प्रिन्सेस' म्हणून चिडवायची. माझ्या या अशा रम्य बालपणाच्या काळातच माझे पप्पा नक्षलवाद्यांशी झुंजत होते याची मला कल्पनाही नव्हती.

पोलीस अधिकारी म्हणजे फक्त पोलिसी कामात रस असणारा आणि एरवी रुक्ष अशी बहुतांश लोकांची समजूत असते पण पप्पा वेगळेच होते. ते एकूण आयुष्याच्याच प्रेमात होते. आयुष्याकडून मिळालेल्या प्रत्येक गोष्टीच्याच प्रेमात होते. त्यांच्याकडे अगदी लहान मुलांची जिज्ञासू वृत्ती होती. सतत नवं काही शिकण्याची तहान त्यांना होती. दांडगं वाचन, तीक्ष्ण स्मरणशक्ती, विविध विषयांतलं ज्ञान असं भरपूर त्यांच्याकडे होतं. त्यांना विविध क्षेत्रांतल्या लोकांना भेटायला, त्यांच्याशी संवाद साधायला खूप आवडायचं.

चंद्रपूरची दिवाळी
चंद्रपूरला दिवाळीत पप्पा आम्हाला एका अनाथाश्रमात घेऊन गेले. त्यांनी आम्हाला आमचे फटाके सोबत घ्यायला सांगितले. पप्पांची जीप बघताच मुलं आनंदानं नाचायला लागली. एवढी मुलं पाहून मी एकदम खूश झाले. जीपमधून एकदम उडी मारून लगेच मुलांशी खेळायला गेले. पण माझे फटाके पप्पांनी त्या मुलांना देऊन टाकले तेव्हा मी हिरमुसले. मला ते आवडलं नाही म्हणजे मला फटाके मिळाले. पण त्या मुलांइतकेच, जास्त नाही. 

स्वतःकडे जे जास्तीचं आहे ते ज्यांच्याजवळ नाही त्यांच्यासोबत वाटून घ्यावं हा महत्त्वाचा धडा पप्पा मला देत होते, पण ते कळण्याचं आमचं वय नव्हतं. मी गाडीतून परतताना पप्पांना सांगितलंही की, आता माझ्याकडे थोडेच फटाके उरले आहेत. मला आणखी हवेत. पप्पांनी मला पुन्हा फटाके घेऊन द्यायला सरळ नाही म्हटलं. उलट मला म्हणाले की, त्या लहानग्या अनाथ मुलांच्या चेहऱ्यांवरचा आनंद हीच खरी दिवाळी. हे मला समजण्यापलीकडचं होतं. मी खूप उदास झाले पण आता वाटतं की, माझ्या आत्तापर्यंतच्या सगळ्या दिवाळीमध्ये ती दिवाळी विशेष होती. 

पप्पांची लायब्ररी
एक साधी लाकडाची बुकशेल्फ. तिला सरकणारी काचेची दारं. आतमध्ये इंग्लीश, मराठी, हिंदी पुस्तकं. ही बुकशेल्फ माझ्या कंबरेइतक्या उंचीची आणि चंद्रपूरला माझ्या खोलीतल्या भिंतीला टेकून उभी. तेव्हा मी बारा वर्षांची असेन. आपल्या स्वतःच्या खोलीत स्वतःची अशी हजारहून जास्त पुस्तकांची लायब्ररी असणं हे मला स्वप्नच वाटायचं. आमच्या घरी सर्वांनाचं वाचनाचं वेड. प्रत्येक जण पुस्तकं पाहून खूश होणारा.

लायब्ररी व्यवस्थित लावण्यासाठी पप्पा सज्ज झाले. प्रथम त्यांनी सुंदर हस्ताक्षर असलेला लेखनिक शोधला. लेखनिकाचा शोध पप्पांना एका कार्यक्रमात त्याचं हस्ताक्षर पाहून लागला. त्याची चौकशी केली आणि लायब्ररीच्या कामासाठी बोलावलं. मग पप्पांनी पुस्तकांचं वर्गीकरण करण्यासाठी एक रूपरेषा ठरवली. कवितेचं पुस्तक - PY, लघुकथा - SS, संदर्भ - RF, धार्मिक - RL याप्रमाणे सगळ्या पुस्तकांचं वर्गीकरण करण्यात आलं. 

वेगवेगळ्या धर्मांची, तत्त्वज्ञानाची पुस्तकं त्यात होती. माझी आई आणि आजी दोघी शिक्षिका असल्यानं ‘शिक्षण - ED’ या विभागामध्येही बरीच पुस्तकं होती शिवाय भरपूर कादंबऱ्या, काल्पनिक कथांची आणि मुलांसाठीची पुस्तकंही होती. 

लेखनिककाका एकेका पुस्तकाची वर्गवारी करून कॅटलॉग भरायचे. एखादं पुस्तकं कोणत्या विभागात टाकावं हे कळलं नाही की ते पप्पांना विचारायचे. पुस्तकांना प्लॅस्टीक कव्हर्स घालायचे. ते घालायचीही एक विशिष्ट पद्धत होती. पप्पांनीच एका पुस्तकाला कव्हर घालून दाखवून ती पद्धत काकांना शिकवली होती. अधूनमधून पप्पांचं सुपरव्हिजन चालूच असायचं. पप्पांच्या मनासारखं कव्हर घालणं जमायला लागल्यानंतरच काकांना स्वतंत्रपणे कव्हर घालण्याची मुभा मिळाली. पप्पांकडे वेळ असता तर ही लेखनिकाची सगळी कामं पप्पांनीच आनंदानं केली असती.

एकदा तर त्यांनी त्यांचे मित्र मनोहर सप्रे यांच्याशी ‘पुस्तकाला कव्हर घालणं’ या विषयावर गंभीर चर्चाही केली. त्या चर्चेच्या वेळी मला तिथं मुद्दाम बोलावलं. मला त्या विषयाचं गांभीर्य कळावं आणि मी किमान माझ्या शाळेच्या पुस्तकाला उत्तमरीत्या कव्हर घालायला लागावं हा यामागचा उद्देश. दोन मोठी माणसं पुस्तकाला कव्हर घालण्याच्या आपापल्या पद्धतीची तुलना करत इतक्या उत्साहानं या विषयावर चर्चा करताहेत याचीच मला गंमत वाटत होती.

एरवीसुद्धा पप्पा आणि सप्रेकाका अगदी रंगात येऊन पुस्तकांवर चर्चा करायचे. मी पुस्तकातला किडा आहे हे लक्षात येताच सप्रेकाकांनी मला त्यांच्या या गटात सामील करून घेतलं. त्यांच्याकडे ‘फॅन्टम’ आणि ‘डॉ डुलिटील’ या पुस्तकांचं संपूर्ण कलेक्शन होतं. चंद्रपूरसारख्या ठिकाणी अशा दुर्मीळ पुस्तकांचा खजिना मिळाल्यानंतर मी किती तास या पुस्तकांच्या सान्निध्यात घालवले असतील ते सांगता येणार नाही.

पूर्वतयारीचे सर्व सोपस्कर झाल्यावर डोळ्यांना आनंद देणाऱ्या लायब्ररीचा जन्म झाला. पारदर्शी प्लॅस्टीक कव्हर्समध्ये पुस्तकं चकाकत होती. लायब्ररीचा कॅटलॉग सुंदर अशा पुठ्ठ्याच्या बांधणीत सजून सज्ज होता. पुस्तकांची आवड असणाऱ्या साऱ्यांना पप्पा अतिशय प्रेमानं, आनंदानं ही लायब्ररी दाखवायचे.

त्यानंतर या बुकशेल्फचा उपयोग पप्पांनी केलेल्या लाकडाच्या कलाकृती मांडण्यासाठीही झाला. त्यांचे हे दोन छंद त्यांनी चंद्रपूरच्या वास्तव्यात जोमानं जोपासले आणि त्यांची मांडणीही एकत्रच एका बुकशेल्फमध्येच झाली. थोड्याच महिन्यांत हे अनमोल क्षण संपले आणि चंद्रपूरचा गाशा गुंडाळून आम्ही भिवंडीला गेलो. पप्पांची आता तिथं बदली झाली होती.

लिहिण्याचं टेबल आणि पुस्तकांचं कपाट
भिवंडीत आम्ही छोट्या घरात राहत होतो. तिथं डीसीपीसाठी असलेले सरकारी निवासस्थान अजून मंजूर झाले नव्हते. माझ्या छोट्या बहिणीला तर प्रश्न पडला की, आपण एकदम गरीब कसे झालो?

भिवंडीत पुस्तकांची कपाटं ठेवायला जागा नव्हती. वेगवेगळ्या बदलीच्या जागी अशा गोष्टी पोलिसांच्या स्टोअरेज रूममध्ये ठेवाव्या लागायच्या. पप्पांनी मग भिवंडीच्या घरात मावेल अशी एक उंच, अरुंद बुकशेल्फ आणली. तिच्यात लिहिण्यासाठी टेबलही होतं. पप्पा कौतुकानं या बुकशेल्फकडे बघायचे. गडद महोगनी रंगाची, काचेचं आवरण असलेली ही बुकशेल्फ देखणी होती खरी पण त्यात पप्पांची मोजकीच पुस्तकं बसली होती. त्यात लेदर कव्हरची आणि सोनेरी अक्षरांत नावं कोरलेली दोन पुस्तकं होती. जॅक लंडनचं 'द कॉल ऑफ द वाइल्ड' आणि जेन ऑस्टीनचं 'प्राईड अँड प्रीज्युडाईस' ही पुस्तकं पप्पांनी दागिन्यांप्रमाणे अगदी कडीकुलपात ठेवली होती. पुस्तक वाचून झाल्यावर लगेच त्याच्या ठरलेल्या जागी परत गेलं पाहिजे या एका अटीवरच पप्पा आईला ते कपाट उघडून द्यायचे. याच अटीवर मी एमिली ब्रोंट यांचं 'वदरिंग हाइट्स' (Wuthering Heights) वाचलं. 

एकदा त्यांची गंमत करायची असं ठरवून मी आणि मम्मीनं हार्ड कव्हर असलेलं त्यांचं एक पुस्तक त्यांच्या मित्राच्या मुलाला देऊन टाकल्याचं सांगितलं. एक मौल्यवान वस्तू हरवल्याचं दुःख त्यांच्या डोळ्यांत दाटून आलं. त्यांना असं पाहून मला खूप वाईट वाटलं. मी ताबडतोब पुस्तक माझ्याजवळ असल्याचं सांगून टाकलं. 

पप्पांनी चंद्रपूरला जायच्या आधी एक छोटं टेबल खरेदी केलं होतं. त्यामध्ये थोडी पुस्तकं ठेवण्यासाठीही जागा होती. लाकडी कलाकुसरीच्या या टेबलनं आमच्या दिवाणखान्यात मानाची जागा पटकावली. त्यात ऑस्कर वाइल्डच्या पुस्तकाचा संग्रह होता तसंच सॉमरसेट मॉम यांचीही पुस्तकं होती. पप्पांची आम्हाला सक्त ताकीद होती की, बुकशेल्फच्या बाबतीत जराही धसमुसळेपणा करायचा नाही. पप्पांसाठी या केवळ शोभेच्या वस्तू नव्हत्या. त्यांनी तरुणपणापासून पाहिलेलं स्वप्न होतं ते.

ते आम्हा मुलांना नेहमी पुस्तकांच्या दुकानात न्यायचे. नवीन लेखकांची माहिती द्यायचे. आमच्यासाठी पुस्तकं विकत घ्यायचे. मग आम्हीही आमच्या आवडत्या लेखकांची ओळख करून द्यायचो. उदाहरणार्थ, रोआल्ड डल (Roald Dahl). त्यांना या लेखकाचं 'बॉय' हे पुस्तक मनापासून आवडलं आणि त्याच पुस्तकावर आधारित माठिल्दा (Mathilda) हा सिनेमा बघायला पप्पा आम्हाला घेऊन गेले.

त्यांचं शेवटचं पोस्टिंग मुंबईला झालं ते एटीएस अधिकारी म्हणून... तेव्हा आमच्याकडे पुस्तकांचं फिरतं कपाट होतं. ‘साहेब, एका नजरेत पुस्तकाची जागा बदलल्याचं सांगतात.’ असं पप्पांचे मदतनीस म्हणायचे. पुस्तकांवर इतकं प्रेम करणारा, त्यांची मनापासून काळजी घेणारा माणूस ती पुस्तकं जागच्या जागी ठेवण्याविषयी आग्रही असणारच ना. 

(अनुवाद: शोभा चित्रे)

- जुई करकरे - नवरे
jui.navare@gmail.com


वाचा 'माझे पप्पा हेमंत करकरे' या लेखमालेतील इतर भाग 

मुंबईतले ते भीषण तास...

शेवटचा प्रवास...

हेवा वाटावा असे वीरमरण...

संकटसमयी सगळ्यांच्या पुढे उभा राहून लढणारा धैर्यधर...

बुलेटप्रुफ जॅकेटचा अपशकुन

हौतात्म्यामागची आजन्म तपश्चर्या

कुटुंबवत्सल माणूस

चंद्रपूरचं आव्हान

चंद्रपूरमधील आठवणी सांगणारा काही पत्रव्यवहार

Tags: लेखमाला जुई करकरे जुई करकरे - नवरे माझे पप्पा : हेमंत करकरे मुंबई दहशतवादी हल्ला 26/11 अँटी टेररिझम स्क्वॉड दहशतवाद विरोधी पथक एटीएस हेमंत करकरे भाग 11 Marathi Series Jui Karkare Majhe Pappa Hemant Karkare My Pappa Hemant Karkare Hemant Karkare : A Daughter's Memoir Part 11 Jui Karkare- Navare Load More Tags

Comments:

Sharad Bandarkar

सुंदर

संजीवन

कल्पना करा आपल वयं चाळीशीच्या आसपास आहे आणि बाळपणातल्या १०-१२ वर्ष्याच्या असतानाच्या आपल्या दीवंगत आई,वडीलांच्या आठवणी ‘वाचक उत्सुकतेने वाचतील’अशा लिहायच्या आहेत,किती जणांना जमेल?लेखिकेचं कैातुक कराव तेवढं कमी पडेल!

अहिरे अनुया

अादर्श रहाणीमान!

Jui Navare

Thank you Sanjeevan, Sharad Bandarkar and Anuya for your kind Feedback and appreciation.

Add Comment