कुटुंबवत्सल माणूस

माझे पप्पा हेमंत करकरे - भाग 8

मला आठवतंय, आम्ही पप्पांसोबत टेबलवर किंवा कधीकधी नवीन ठिकाणी घर लागलं नसेल तर जमिनीवर मांडी घालून जेवायला बसायचो. वरणभात हातानं कालवून खाणं हे ठरलेलं असायचं. खाताना उजव्या हातानं तेही बोटांच्या पहिल्या पेरांनीच नीट स्वच्छ जेवायचं. जेवताना अख्खा हात बरबटून घेतला नाहीय ना... हे जेवण झाल्यावर पप्पा चेक करायचे. माझी मुलगी हातानं जेवते हे पाहून अलीकडे आमचे एक पाहुणे मला म्हणाले ‘अरे वाह! ही हातानं जेवते. माझ्या मुलांना नाही येत.’ पप्पांनी शिकवलेली ही साधी गोष्ट पण मी माझ्या मुलीतही ती रुजवली. 

पप्पांना भारतीय संस्कृती, परंपरा यांचा खूप अभिमान होता. आम्ही घरी अतिशय उत्साहानं सगळे सणवार साजरे करायचो. गुढीपाडवा, गणेशचतुर्थी, होळी आणि अर्थातच दिवाळी. मम्मी घरीच सगळे पारंपरिक खाद्यपदार्थ रांधायची. आम्ही लहान असताना  भारतीय सणांची माहिती करून देणारी गोष्टींची पुस्तकं आमच्यासाठी आणली जायची. पप्पा आम्हाला पाढे पाठ करायला सांगायचे. मी आठेक वर्षांची असेन. मला त्यांना रोज सकाळी पाढे म्हणून दाखवायला आवडायचं. हायस्कूलमध्ये असताना अवघड गणितं घेऊन मी पप्पांकडे जायचे. एकदा पप्पांनी ती गणितं तोंडी शिकवली. माझ्या मात्र डोक्यावरून गेलं. मग त्या गणिताची एकेक पायरी त्यांनी समजावून सांगितली, तेव्हा ती नीटच लक्षात राहिली.

आजीनं पप्पांना लहानपणी संस्कृत श्लोक शिकवले होते. खरंतर आजोबा नास्तिक होते, पण त्यांची इतरांना आडकाठी नव्हती. आपला-आपला मार्ग शोधण्याची मुभा घरी सर्वांना होती. आजीआजोबा यावर वाद घालायचे नाहीत. हीच मोकळीक माझ्या मम्मीपप्पांनी आम्हाला दिली. इतिहास हा पप्पांचा आवडता विषय होता आणि त्यांना गडकिल्ल्यांचं वेड होतं. तेच त्यांनी आम्हा भावंडांतही रुजवलं. आम्हाला ते ट्रेकला न्यायचे. प्रवासात त्या-त्या गडकिल्ल्याचं ऐतिहासिक महत्त्व गोष्टी रूपानं सांगायचे. त्यामुळं आमच्या ज्ञानात भर पडायची...

गाडीतून कुठेही जाताना पप्पा नेहमी पुस्तकांवर चर्चा करायचे. सॉमरसेट मॅगनेमचं 'मून ॲन्ड सिक्सपेन्स' त्यांचं आवडतं होतं. पूर्वी पुस्तक वाचल्यावर त्यावर चर्चा करण्यासाठी माझा पप्पांना लगेच फोन व्हायचा. आज मात्र ती पोकळी जाणवते. मम्मी सांगायची, त्यांचं नवीन लग्न झालं तेव्हाही पप्पा रात्री उशिरापर्यंत वाचत बसायचे. तिला त्या दिव्याच्या भगभगीत प्रकाशाचा त्रास व्हायचा. पण नंतर-नंतर तिलाही सवय झाली. पप्पांचं इंग्लीश आणि मराठी वाचन दांडगं होतं. पप्पांच्या ऑफिसमध्येही पुस्तकांचं कपाट असायचं. त्यात पुस्तकांचं नीट वर्गीकरण केलेलं असायचं. 

पप्पा व्हिएन्नाला असताना आम्ही एका सुट्टीत त्यांच्याकडं गेलो. त्यांनी आम्हाला तिघांना घेऊन दोनाउइंजलफेस्टला (Donaufest) जायचं ठरवलं. या दोनाउ (Donau) नदीच्या किनारी पर्यटकांची प्रचंड झुंबड असते. आम्ही तिघं जण आधी पप्पांच्या ऑफिसला गेलो. तिथं पिझ्झा खाल्ला. नकाशात बघून दोनाउइंजलफेस्टला (Donaufest) जाण्यासाठी कुठली ट्रेन पकडायची हे ठरवलं. भावाची सायकलही सोबत होती. स्टेशनवर चिक्कार गर्दी. माझा भाऊ अवघा नऊ वर्षांचा होता. स्टेशनवर मुंबईसारखी ढकलाढकली नव्हती. एका बाईनं त्याला सायकल फोल्ड करून घ्यायला सांगितली. यात त्याचे काही सेकंद गेले असतील. दरम्यान आम्ही ट्रेनमध्ये चढलो. भाऊ स्टेशनवरच राहिला. पप्पांनी आम्हा दोघींना पुढच्या स्टेशनवर उतरवलं. मागच्या स्टेशनवर जाऊन भावाला बघायला सांगितलं. पप्पा ट्रेननं तसेच पुढं गेले. तो ठरलेल्या ठिकाणी पुढे आलाच तर पुन्हा चुकामूक नको म्हणून ते त्याच ट्रेननं पुढे निघून गेले. 

आम्ही मागच्या स्टेशनवर गेलो... भाऊ तिथं नव्हता. आम्ही लगेच पप्पांना तसं कळवलं. तिथंही पप्पांना तो दिसला नाही. त्यांनी मम्मीला फोन केला. तो हरवलाय याचा पत्ता लागू न देता अगदी सहज केल्यासारखा फोन केला. आम्ही दोघींनी पप्पांना शेवटच्या स्टेशनवर भेटायचं ठरलं होतं. आम्ही खूप घाबरलो होतो. तसं व्हिएन्ना हे सुरक्षित शहर. दोनाउइंजलफेस्टमुळे (Donauinselfest) भरपूर गर्दी झालेली... त्यामुळं काळजी वाटत होती. तेवढ्यात भाऊ समोर दिसला आणि आम्ही सुटकेचा निःश्वास सोडला. त्यानं नकाशा बघून दुसरा जवळचा रस्ता शोधला होता. आम्हा बहिणींना त्याचं कौतुक वाटलं. पण पप्पांनी त्याला सांगितलं की, कधीही चुकामुक झाली की आधी ठरलेल्या रस्त्यानंच पुढं जात राहायचं. 

पप्पा कडक शिस्तीचे होते, पण त्यांनी आमचे लाड, कौतुकही खूप केले. लहानपणी ते आमच्या वाढदिवसांना छानशी पार्टी ठेवायचे. पप्पांनी आम्हाला आमचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलं. आम्ही तिघंही भावंडं अगदी स्वतंत्र वातावरणात वाढलो. 

माझ्या लग्नाच्या आदल्या दिवशी पप्पा तीन तास बेपत्ता होते. त्यांच्याशी संपर्कही होत नव्हता. शेवटी ते परतले. माझ्या कॉलेजच्या दिवसांतल्या फोटोंचं एक सुंदर कोलाज फ्रेम करून घेण्यासाठी ते गेले होते. खास रुखवतावर ठेवण्यासाठी पप्पांनी आणलेली ही माझ्या लग्नाची भेट होती. प्रत्येक गोष्टीत त्यांची स्वतःची म्हणून वेगळी छाप असायची. आपल्या आयुष्याच्या नाड्या  ते आपल्याच हातांत ठेवायचे. चिकाटी आणि सातत्य हे त्यांचं खरं वेगळेपण. 

पप्पांनी त्यांच्या धाकट्या बहिणीला, मनीषाला लिहिलेल्या पत्रातला काही भाग  

20 जून 1983
'आयुष्य हे नेहमीच बेरीज-वजाबाकीनी भरलेलं असतं. जर तू फक्त नकारात्मक गोष्टींकडे बघितलंस तर औदासीन्य तुला घेरून टाकेल. एखादी गोष्ट तडीस नेण्यासाठीची अंगभूत क्षमताच नष्ट होईल. मनापासून मी दोन गोष्टींवर विश्वास ठेवतो. कितीही गडद काळा ढग असला तरी त्याला चंदेरी किनार असते आणि जे घडतं ते आपल्या भल्यासाठीच घडतं. 

मला आयुष्यात जे काही थोडफार यश मिळालं ते मी चांगल्या गोष्टींवर विश्वास ठेवल्यामुळे. मी सामान्य माणूस असलो तरी मला एक आश्चर्यकारक शोध लागला की, चांगलं काम मिळवण्यासाठी प्रामाणिकपणा आणि कामाची आवड हे महत्त्वाचं. जरी या वेळी तुला यश मिळालं नाही तरी त्यासाठी घेतलेले परिश्रम वाया जाणार नाहीत. ते कुठेतरी उपयोगी पडतील.' 

मे 2008मध्ये पप्पा माझ्या बहिणीला व्हिएन्नाला आणि मला बॉस्टनला भेटायला आले. पप्पामम्मीनं आणि मी बॉस्टनच्या पब्लीक गार्डनमधल्या नयनरम्य पुलाखाली बसून जगभरच्या गोष्टींवर गप्पा मारल्या. ती आमची शेवटची एकत्र संध्याकाळ असेल अशी तेव्हा कल्पनाही केली नव्हती. त्या दिवशी पुलावर एक अमेरिकन कोणतीतरी धून वाजवत होता. ती अगदी लहानपणापासून ऐकलेली खूप ओळखीची धून वाटत होती. पण कोणती ते आठवेना. पप्पा म्हणाले की, त्यांनी ही धून व्हिएन्नामध्येसुद्धा ऐकली होती. त्यांना आश्चर्यच वाटलं होतं की, हिंदी गाणं इथे ऑस्ट्रियात एवढं लोकप्रिय कसं! नंतर त्यांना कुणी सांगितलं की, छाया सिनेमातलं ‘इतना ना मुझसे तू प्यार बढा कि मैं एक बादल आवारा’ हे गाणं म्हणजे मोझार्टच्या सिंफनी 40ची कॉपी. 

आता ही सुमधुर हिंदी गाणी ऐकली की पप्पांची आठवण येते आणि डोळे पाणावतात. कॅसेटच्या जमान्यात तर पप्पा किशोर कुमार, रफी, लता मंगेशकर यांची गाजलेली गाणी रोज रात्री ऐकायचे. ती शांत चालीची गाणी जणू मला थोपटून झोपवायची. आम्ही सगळे झोपलो तरी त्यांची ही मैफील चालूच असायची. रात्री उशिरापर्यंत चाललेलं त्यांचं वाचन आणि सोबतीला ही मधुर ठेक्यातली गाणी. ही गाणी माझ्या अचेतन मनात शिरली आणि नकळतच त्यातून माझा पप्पांशी एक घट्ट बंध निर्माण झाला.

एखाद्या जादूगारासारखं योग्य वेळी छान छोटे चुटके सांगून, माहिती देऊन लोकांना आश्चर्यचकित करणं पप्पांना चांगलं जमायचं. पप्पा उत्तम संभाषणपटू होते. आपल्या संभाषण कौशल्यानं ते लोकांना खिळवून ठेवायचे.

एक किस्सा तर ते अनेकांना रंगवून-रंगवून सांगायचे. तो असा... ते सांगायला सुरुवात करायचे, ‘व्हिएन्नात असताना अतिशय सुंदर शॉनब्रुन (Schonbrunn) पॅलेसच्या झॅपेमध्ये (Xaipe) मी राहत होतो. सुरुवातीला घरची मंडळी येईपर्यंत मी एकटाच राहायचो. एकट्या माणसासाठी तसं ते ऐसपैस घर होतं. पण रात्री कुठूनसा आवाज यायचा कुणीतरी धडपडल्यासारखा. ही जागा भुतानं झपाटलेली आहे असं मला वाटायला लागलं. कितीतरी रात्री मी जागून काढल्या. मग मात्र या आवाजाचं रहस्य उकलायचंच असं मी ठरवलं. 

...आणि सापडलं काय तर एक गलेलठ्ठ उंदीर म्हणजे घर उंदरांनी झपाटलेलं होतं तर. मला गंमत वाटली.’ 

मी तेरा वर्षांची असताना ‘ॲनिमल फार्म’ हे पुस्तक वाचलं. लगेच पप्पांना सांगितलंही. त्यांचा लगेच प्रश्न आलाच,‘‘पुस्तक तुला समजलं का?’’ मी म्हणाले, ‘‘हो तर! तो कम्युनिझमवरचा उपहास आहे.’’ त्यांनी पुढं विचारलं, ‘‘तुला उपहास म्हणजे काय हे माहीत आहे? कम्युनिझमची संकल्पना या वयात तुला कळणार नाही.’’

मी निवळ पोपटपंची करणं हे त्यांना मान्य नव्हतं. पुस्तकामागचा विचार, त्याची संकल्पना मला समजावी अशी त्यांची इच्छा होती. आमची ज्ञानाची भूक वाढावी, विचारशक्तीला चालना मिळावी असं त्यांना वाटायचं. पुस्तकांवर आम्ही सगळे एकत्र चर्चा करायचो. आजसुद्धा माझी भावंडं आणि मी वाचलेल्या पुस्तकावर नेहमी चर्चा करतो. आमच्या आवडीच्या पुस्तकांमध्ये परसॅपोलिस  (Persepolis) ही ग्राफिक कादंबरी आहे. मी किंडल विकत घेतलं तेव्हा वाटलं की, पप्पा केवढे खूश झाले असते किंडल बघून. 

नियम मोडलेले पप्पांना अजिबात चालायचे नाहीत. प्रत्येक गोष्टीचे नियम, शिष्टाचार पाळले जावेत ही त्यांची अपेक्षा असायची आणि हे फक्त त्यांच्या नोकरीव्यवसायाच्या संदर्भात होतं असं नाही. आम्हा मुलांनाही तेच नियम लागू होते. सरकारी वस्तू आणि खासगी वस्तू यांत फरक करायला त्यांनी आम्हाला शिकवलं. तसंच सरकारी गोष्टींचा दुरुपयोग खासगी कामासाठी करायचा नाही हेही शिकवलं. 

मी हे सर्व लिहायचं ठरवलं याचं कारण एवढंच की, आजच्या युवा पिढीला यातून स्फूर्ती मिळेल, उत्तेजन मिळेल. भविष्य त्यांच्याच हातात आहे. त्यांना लहानपणापासून मार्गदर्शन करून त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं. पप्पांच्या मनात त्यांच्या आईवडलांनी चांगली मूल्यं रुजवली आणि पप्पांनीसुद्धा आयुष्यात उंच शिखर गाठलं. 

(अनुवाद: शोभा चित्रे)

- जुई करकरे - नवरे
jui.navare@gmail.com


वाचा 'माझे पप्पा हेमंत करकरे' या लेखमालेतील इतर भाग 

मुंबईतले ते भीषण तास...

शेवटचा प्रवास...

हेवा वाटावा असे वीरमरण...

संकटसमयी सगळ्यांच्या पुढे उभा राहून लढणारा धैर्यधर...

बुलेटप्रुफ जॅकेटचा अपशकुन

हौतात्म्यामागची आजन्म तपश्चर्या

Tags: लेखमाला जुई करकरे जुई करकरे - नवरे माझे पप्पा : हेमंत करकरे मुंबई दहशतवादी हल्ला 26/11 अँटी टेररिझम स्क्वॉड दहशतवाद विरोधी पथक एटीएस हेमंत करकरे भाग 8 Marathi Series Jui Karkare Majhe Pappa : Hemant Karkare My Pappa : Hemant Karkare Hemant Karkare: A Daughter's Memoir Part 8 Jui Karkare- Navare Load More Tags

Comments:

Dr.Ram Chatte

आयुष्यातील प्रत्येक भूमिका रसरशीतपणे आणि जबाबदारीने निभावणारे हेमंत करकरे साहेब…साहेबांच्या या प्रत्येक भूमिकेचे खूप सुंदर वर्णन ताईने लिखाणातून आमच्यासमोर मांडले आहे…

संजीवन

कुटुंबवत्सल,संगीतप्रेमी,शिस्तप्रिय,..किती पैलु?ज्या व्यक्तीनी मातृभुमीसाठी आपला देह ठेवला अशा महान व्सक्तीच्या मुलीनी आपल्या पप्पाबद्दल तितकंच जीव ओतुन,मन लावून अतिशय मेहनतीनी लिहिल आहे.

Add Comment