बहिणीनं आणि मित्रानं जागवलेल्या आठवणी 

माझे पप्पा हेमंत करकरे - भाग 17

हेमंत... तुझी अफाट बुद्धिमत्ता, कर्तव्यनिष्ठा, कलासक्ती, तुझा देखणेपणा, मोठ्यांविषयी आदर, अन्‌ सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुझी निर्भीडता हे सगळं आम्ही नेहमी मनात जपून ठेवू.
- अनुराधा रिंगणगावकर
(हेमंत करकरे यांची मावस बहीण.)


पप्पा लाघवी आणि उदार मनाचे होते त्यामुळं ते मित्रपरिवार, कुटुंब, नोकरचाकर सर्वांना जिंकून घ्यायचे.

ते इतर सगळ्यांसाठी मित्र होते, शिक्षक होते... रक्षणकर्ते, नायक, सामाजिक कार्यकर्ते, उत्तम वक्ते, पोलीस ऑफिसर, कलावंत, साहित्यप्रेमी होते... पण त्याहीपेक्षा ते आमचे वडील होते. इतक्या व्यग्र  व्यग्र दिनक्रमातून ते सर्वांसाठी वेळ काढायचे. आमच्या वाट्याला मात्र ते फार कमी यायचे. आम्ही त्या दिवसाची नेहमी वाट बघायचो जेव्हा ते अखंड दिवस आमच्या सोबत असतील म्हणजे त्या दिवशी कुणी त्यांना फोन करणार नाही किंवा आम्ही मिळून सिनेमा बघताना मध्येच त्यांना कुणी बोलवायला येणार नाही किंवा मी त्यांच्याशी बुद्धीबळ खेळताना कुणी त्यात व्यत्यय आणणार नाही. आमचा बुद्धीबळाचा एक डाव एकेक आठवडा चालायचा. पप्पा इतके व्यग्र असायचे की, ते एका दिवशी एकच चाल खेळायचे.


हेमंत, तू स्वतःला जपायला पाहिजे होतंस
मावस बहिण अनुराधा रिंगणगावकर  यांनी जागवलेल्या आठवणी...

प्रिय हेमंत,
अनेक आशीर्वाद!

तुला आठवतं...? जुईच्या लग्नाहून परत आल्यावर मी तुला एक पत्र लिहिलं तर तुला किती आनंद झाला होता. पत्र मिळाल्यानंतर एका महत्त्वाच्या मिटिंगला जातानाही तू थांबून माझ्याशी दहा मिनटं भरभरून बोललास. म्हणालास, ‘ताई, मी तुझं पत्र पुन:पुन्हा वाचलं अन्‌ जपूनपण ठेवणार आहे.’

ते आठवून आज तुला पत्र लिहायला घेतलं खरं पण डबडबलेल्या डोळ्यांना अक्षरंही दिसत नाहीत... कारण या पत्राची प्रेमळ पोहोच मला मिळणार नाही पण तुला नक्की कळतील ना रे आम्हा भावंडांच्या भावना?

तू आमच्यापेक्षा बराच लहान होतास तरी आपली जेव्हा-जेव्हा भेट व्हायची तेव्हा तू प्रेमानं, अगत्यानं बोलायचास. आमच्या मुलांची चौकशी करायचास. लहानपणाच्या आठवणींबद्दल बोलायचास. तू एवढ्या वरच्या पदावर पोहोचला होतास की, तुझ्यापुढे आम्ही सगळे अगदीच सामान्य होतो... पण तुझ्या वागण्याबोलण्यात कधीही अधिकाराची आढ्यता जाणवली नाही. तुझे हात आकाशाला पोहोचले असते तरी पाय सदैव जमिनीवरच होते. भल्यामोठ्या ताफ्याबरोबर आलास तरी गाडीतून उतरल्यावर एकदम लहान भाऊ व्हायचास. तुझा हा साधेपणा, सच्चेपणाच आम्हाला खूप आवडायचा. कसं जमायचं रे हे तुला? आपला मामेभाऊ रवी, तो तर तुझा अगदी जिवलग होता. कसा राहील रे तो तुझ्याशिवाय...!

हेमंत, तू ज्या-ज्या गावाला गेलास तिथे आपला ठसा उमटवलास. तुझी कर्तव्यतत्परता, तुझा पारदर्शी स्वभाव, प्रामाणिकपणा, कुठलंही काम हातात घेतलं की ते सचोटीनं आणि अदम्य साहसानं पूर्णत्वाला नेण्याची तुझी तळमळ... यांमुळं तुझं वेगळेपण प्रत्येक ठिकाणी उठून दिसायचं.

तसा तू मितभाषी होतास पण पोलीसखात्यासारख्या रुक्ष खात्यात राहूनही कलेच्या आवडीमुळं तू खूप मित्र जोडलेस. इतकी मोठी जबाबदारीची कामं पार पाडताना आपले छंद जोपासायला तू कसा वेळ काढायचास हे आमच्यासाठी कोडंच होतं. चंद्रपूरला असताना तुला काष्ठशिल्प करायचा नाद होता आणि एकाहून एक सुंदर अशी शंभर ते दीडशे काष्ठशिल्पं तू तयार केलीस. तेवढ्याच प्रेमानं कुणाकुणाला देऊनही टाकलीस. इंग्लीश साहित्याबरोबरच मराठी साहित्याचीही तुला दांडगी आवड होती. ‘जीएं’च्या कथा तर तुला तोंडपाठ होत्या. तू घरी छान ग्रंथालयही केलं होतंस. जेव्हा कधी भेट व्हायची तेव्हा तू एखाद्या नव्या पुस्तकाबद्दल बोलायचास. ‘अरे, वाचतोस तरी कधी?’ असं आश्चर्यमिश्रित कौतुकानं विचारलं की मंदस्मित करायचास. कधी एखाद्या कॉलेजमध्ये किंवा समारंभात अस्खलित मराठीत भाषण करायचास.

तुझं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकाची समस्या आपलीच आहे असं समजून ती कशा सोडवता येईल याचा विचार तू करायचास. नांदेडला असतानाचा प्रसंग आठवतो. राजेंद्र मणेरीकर तेव्हा इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला होता. मुलं रॅगिंग करतात असं ऐकल्यावर तू सहजपणे म्हणालास की, ‘असं करू... मी तुझ्या रूमवर येतो आणि पलंगाखाली दिवसभर झोपून राहतो. तू त्या मुलांना घेऊन ये. एकेकाला धडा शिकवू.’ अर्थात राजेंद्रनं ही सूचना अमलात आणली नाही मात्र तुझ्या शब्दांतली तळमळ आजही इतक्या वर्षांनी तो विसरलेला नाही. कालही भरल्या गळ्यानं ही आठवण तो सांगत होता. असे हजारो लोक आहेत, ज्यांना तू सदैव मदतीचा हात पुढे केलास आणि नंतर विसरूनही गेलास... पण तुझ्या सहवासाच्या आठवणी सगळ्यांनी मोरपिसासारख्या जपून ठेवल्या आहेत. तुझ्यातलं माणूसपण प्रत्येकाच्या मनाला भिडलं आहे.

जुईच्या लग्नात आम्ही सगळे नातेवाईक जमलो होतो. तेव्हा पावलोपावली जाणवणारी तुझी रसिकता पाहून आम्ही थक्कच झालो होतो. इतके लोक जमूनही सगळ्यांची व्यवस्था छान केली होतीस. जातीनं प्रत्येकाकडे लक्ष देत होतास. प्रत्येक जेवणाचा ‘मेनू’ ठरवताना विविधता तर होतीच शिवाय प्रत्येक व्यक्तीच्या वयाचा विचारही केला होतास. रिसेप्शनला अनेक ‘व्हीआयपी’ येत होते तेव्हा त्यांचं स्वागत करताना एकीकडे तू आमच्यासारख्या सामान्य नातेवाइकांकडेही सारखा येत होतास. तेव्हा तुझा मोठेपणा जाणवून मन भरून आलं.

हेमंत, तुझी अफाट बुद्धिमत्ता, देखणेपण, कर्तव्यनिष्ठा, मोठ्यांविषयी आदर, कलासक्ती अन्‌सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुझा निधडेपणा! त्या दिवशीपण अशाच निधडेपणानं तू दहशतवाद्यांना सामोरा गेलास आणि एका क्षणात सगळं होत्याचं नव्हतं झालं. तुझ्या कर्तव्यापुढे तुला प्राणांची पर्वा नव्हती हे खरं पण तुझी पत्नी कविता आणि जुई, सायली, आकाश ही गोड मुलं यांच्या आयुष्यातली पोकळी कोण भरून काढणार रे? एवढं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व एखादंच असतं. पुन्हा असा माणूस घडवणं देवाला तरी जमेल का रे?

हेमंत, तू स्वतःला जपायला पाहिजे होतंस. तुझ्या जाण्यानं आम्हा सर्व नातेवाइकांचं खूप नुकसान झालं आहेच... त्याहीपेक्षा जास्त देशाचं.... देशानं एक मौल्यवान हिरा गमावला आहे. तुला वीरमरण आलं म्हणून आम्हाला तुझा खूप अभिमान आहे रे...

पण हेमंत तू इतक्या लवकर जायला नको होतंस. खरंच, खूप घाई केलीस.

तुझी ताई,
अनुराधा रिंगणगावकर (पुणे)


मित्राचं उत्तुंग कर्तृत्व
अकोला इथले बालमित्र श्रीकांत पोहनकर यांनी जागवलेल्या आठवणी...

प्रिय हेमंत,

आजपासून तब्बल 43 वर्षांपूर्वी 1965 सालचा आपल्या शाळेचा पहिला दिवस. मी वर्गात शिरलो तेव्हा एका बेंचच्या कोपऱ्यात तू बसला होतास. अगदी आवर्जून तुझ्याशी बोलावं, मुद्दाम ओळख करून घ्यावी आणि मैत्री करावी असं तुझ्या व्यक्तिमत्त्वात काही नसल्यामुळं बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं तू अदखलपात्रच होतास. माझ्या भांडखोर स्वभावाला तुझ्या विलक्षण शांत स्वभावाचं प्रचंड अप्रूप वाटायचं. माणसाला निसर्ग कोणत्या ना कोणत्या स्वरूपात समृद्धी देत असतो. तुझ्या बाबतीत ती तुझ्या पाणीदार डोळ्यांच्या रूपानं होती. मी तुला कितीही डिवचण्याचा प्रयत्न केला तरी समोरच्या व्यक्तीवर जरब बसवणारे तुझे विलक्षण तेजस्वी डोळे मला क्षणात नामोहरम करायचे.

माझ्यासकट सर्व मित्र ग्राउंडवर खेळत असताना तू वर्गात एकटाच बसून काय करतोस हे बघण्यासाठी मी एक दिवस हळूच वर्गात शिरलो तेव्हा ‘चांदोबा’ मासिक वाचण्यात तू एवढा तल्लीन झाला होतास की, मी तुझ्या शेजारी येऊन बसलो आहे हे तुला कळलंही नाही पण त्या क्षणी मला एक अत्यंत महत्त्वाची जाणीव झाली की, आपण दोघंही समानधर्मी आणि वाचनाचे व्यसनी आहोत. आपल्या दोघांनाही वाचनाचं जबरदस्त व्यसन होतं आणि त्या व्यसनामुळंच आपण खऱ्या अर्थानं मित्र झालो. त्या मैत्रीतून वयाच्या अकराव्या वर्षी आपल्या दोघांच्याही घरात छोट्याशा ग्रंथालयाचा जन्म झाला. अमृतचे जुने अंक आणि चोर बाजारातून आणलेली कॉमिक्स ही आपल्या ग्रंथालयाची ग्रंथसंपदा होती आणि त्यांचा फडशा पाडण्यासाठी ती एक्स्चेंज करणं हे आपलं नित्यकर्म झालं होतं.

दहावीच्या परीक्षेनंतर आपले मार्ग बदलेले आणि आपल्या भेटी दुर्मीळ व्हायला लागल्या. तू आयपीएस झाल्याची बातमी माझ्यासाठी केवळ धक्कादायकच नाही तर अविश्वसनीयही होती. शिव्याच काय पण साधे अबे-काबे असे शब्दही ज्याच्या तोंडातून बाहेर पडले नाहीत असा एक सरळमार्गी मित्र चक्क पोलीसदलात काम करणार? मध्यप्रदेशात मी एका कंपनीत कार्यरत असताना पोलीसदलातल्या तुझ्या प्रगतीच्या बातम्या माझ्यापर्यंत पोहोचत होत्या. अनेक वर्षांच्या भटकंतीनंतर मी महाराष्ट्रात परत आलो आणि आपल्या बॅचच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्तानं खूप वर्षांनी आपली भेट झाली. त्या कार्यक्रमात तुझं आगमन झालं आणि तुझ्या व्यक्तिमत्त्वात आमूलाग्र बदल झाल्याची जाणीव झाली. दीर्घ कालावधीनंतर आपली भेट झाल्यावर तुझा पहिला प्रश्न होता- ‘काय म्हणते तुझी लायब्ररी?’

इतक्या वर्षांनंतर भेट झाल्यावरही तुला उत्सुकता होती ती चांदोबा मासिकाच्या एक अंकापासून सुरू झालेल्या आपल्या लायब्ररीच्या प्रगतीची! तू पुस्तकांचा कॅटलॉग कसा तयार केला आहे, तुझ्याजवळ असलेल्या सर्व पुस्तकांची विषयानुसार कशी मांडणी केली आहे याची माहिती एखाद्या शाळकरी मुलाच्या उत्साहानं मला पुरवून तुझी लायब्ररी पाहण्यासाठी येण्याचं निमंत्रण तू मला दिलंस पण आपल्या दोघांच्याही व्यग्रतेमुळे आपली प्रत्यक्ष भेट पुन्हा कधी झालीच नाही.

तू दहशतवाद विरोधी पथकाचा प्रमुख झालास आणि  आनंद होण्याऐवजी माझ्या काळजाचा ठोका चुकला. तू ज्या खुर्चीवर बसला होतास तिचा प्रत्येक क्षणी मृत्यूशी अगदी जवळून संबंध येणार आहे याची पूर्ण जाणीव आम्हाला होती पण तरीही तुझ्या बलिदानाच्या आलेल्या बातमीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न मी आजही करतो आहे.

प्रिय हेमंत, कुणासाठी तू स्वतःला मृत्यूच्या दाढेत झोकून दिलंस मित्रा... असहाय नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी?

समवयस्क असूनही प्रत्येक भेटीत वडीलकीच्या नात्यानं प्रत्येक मित्राची अत्यंत आस्थेनं चौकशी करणारा तुझ्यासारखा मित्र आम्हा सर्व मित्रांना पोरकं करून गेला. दगडविटांनी तयार होतात त्या साध्या इमारती... घरं नव्हेत! त्या निर्जीव इमारतींमध्ये राहणारी आपल्या सर्वांसारखी हाडामासाची जिवंत माणसं खरी घरं जन्माला घालत असतात! अशाच एका जिवंत घरात राहणाऱ्या सर्वांचा तू कर्तृत्वाच्या शिखरावर असताना अचानक कायमचा निरोप घेतलास. 26 नोव्हेंबरच्या मध्यरात्री तुझ्या हत्येची बातमी ऐकल्यानंतर डबडबलेल्या डोळ्यांमधून मी अश्रूंना अजूनही बाहेर पडू दिलेलं नाही. तुझ्यासारख्या धीरोदात्त मित्राच्या मृत्यूवर अश्रू ढाळणं हा तुझ्या उत्तुंग कर्तृत्वाचा सर्वात मोठा अपमान ठरेल. दहशतवाद्यांपासून असंख्यांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःला मृत्यूच्या खाईत झोकून देणारा तू केवळ आमचाच नव्हे तर आपल्या देशाचा शेवटचा मित्र ठरशील...!

(अनुवाद: शोभा चित्रे)

- जुई करकरे - नवरे
jui.navare@gmail.com


वाचा 'माझे पप्पा हेमंत करकरे' या लेखमालेतील इतर भाग 

मुंबईतले ते भीषण तास...

शेवटचा प्रवास...

हेवा वाटावा असे वीरमरण...

संकटसमयी सगळ्यांच्या पुढे उभा राहून लढणारा धैर्यधर...

बुलेटप्रुफ जॅकेटचा अपशकुन

हौतात्म्यामागची आजन्म तपश्चर्या

कुटुंबवत्सल माणूस

चंद्रपूरचं आव्हान

चंद्रपूरमधील आठवणी सांगणारा काही पत्रव्यवहार

चंद्रपूरमधील बालपणीच्या आठवणी

निर्जीव लाकडामध्ये प्राण फुंकणारे पप्पा...

सहकाऱ्यांनी जागवलेल्या आठवणी - पूर्वार्ध 

सहकाऱ्यांनी जागवलेल्या आठवणी - उत्तरार्ध

प्रियजनांनी जागवलेल्या आठवणी...

परराष्ट्र मंत्रालयातील अधिकारी आणि भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष यांनी जागवलेल्या आठवणी...

Tags: जुई करकरे जुई करकरे - नवरे माझे पप्पा हेमंत करकरे मुंबई दहशतवादी हल्ला 26/11 अँटी टेररिझम स्क्वॉड दहशतवाद विरोधी पथक एटीएस हेमंत करकरे भाग 17 Marathi Series Jui Karkare Majhe Pappa Hemant Karkare My Pappa Hemant Karkare Hemant Karkare : A Daughter's Memoir Part 17 Jui Karkare- Navare Load More Tags

Comments:

संजीवन

एक मोठी बहीण आणि एक वर्गमित्र-दोघांच्याही काळजावर हात घालणार्या आठवणी!पोहनकरांनी तर शेवटच्या पॅरेग्राफमधून प्नत्येक देशभक्ताची प्रतिक्रिया अथवा कर्तव्यच सांगितले आहे.

Add Comment