हौतात्म्यामागची आजन्म तपश्चर्या

माझे पप्पा हेमंत करकरे - भाग 7

I want to rise above the common herd, but don’t find way or know how to?
सगळ्यांसारखे नोकरी करून आयुष्य घालवण्यात मला काहीच रस वाटणार नाही. मला आपले वेगळे अस्तित्व प्रखरतेने सिद्ध करावयाचे आहे. प्रवाहपतित व्हायची माझी बिलकूल तयारी नाही. शैक्षणिक क्षेत्रात असे असामान्यत्व सिद्ध करण्याची आता फारच थोडी संधी आहे. एखादे दुसरे क्षेत्रच निवडावे लागेल. 
- हेमंत करकरे

 वय 21, मार्च 1975. (रोजनिशीतली नोंद)


हुतात्मे एका रात्रीत निर्माण होत नाहीत. त्यासाठी वर्षानुवर्षाची मेहनत, शिस्त आणि चिकाटी लागते. पप्पांचं लहानपण पाहिलं तर तेव्हापासूनच ही मूल्यं त्यांच्यात रुजत गेली हे लक्षात येतं.

मला माझे आजोबा आठवतात. खूप उंच, देखणे. त्यांच्या नाकावर नेहमी चश्मा घसरलेला असायचा, पण चेहऱ्यावर हसू असायचं. मोजूनमापून वापरलेले शब्द असले तरी बोलणं प्रेमळ होतं. पातळ, कुरळे केस तेल लावून व्यवस्थित विंचरलेले असायचे. कपडे अगदी छान इस्त्री केलेले, त्यावर कुठं सुरकुती नसायची. नातवंडांवर नुसत्या नवनव्या कपड्यांचा, चॉकलेट्‌सचा भडिमार,करणारे ते नव्हते. त्याऐवजी ते आमच्यासाठी पुस्तकं विकत घ्यायचे. पुस्तकं वाचून त्यांवर चर्चा करायचे शिवाय आमच्याबरोबर बुद्धीबळ आणि कॅरमही खेळायचे.

मला अधुंकसं आठवतंय. त्यांच्याकडं एक आयताकृती डबा होता. त्याला छोटीछोटी छिद्रं होती. त्यात ते होमिओपॅथी औषधांच्या छोट्या बाटल्या ठेवायचे. खरं म्हणजे ते रेल्वेत गार्ड होते, पण सहकाऱ्यांमध्ये होमिओपॅथीचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध. नाममात्र म्हणजे औषधासाठी जितका खर्च येत असेल तेवढेच पैसे ते आकारायचे. डॉक्टर म्हणून रीतसर शिक्षण घेतलेलं नव्हतं तरी त्यांनी होमिओपॅथीचा गाढा अभ्यास केला होता. त्यात प्रावीण्य मिळवलं होतं. उपचारासाठी दारात लोकांची रांग लागायची. ते शांतपणे पेशंटचं म्हणणं ऐकून घ्यायचे. त्यांना व्यवस्थित ती-ती औषधं कागदाच्या छोट्या पिशव्यांमध्ये घालून द्यायचे. या पिशव्याही ते स्वतःच तयार करायचे. 

वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी आजोबा अनाथ झाले. त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन व्यावहारिक होता हे खरं, पण आईवडलांचं छत्र इतक्या लहान वयात हरवल्यानंतरही त्यांच्या वागण्यात कडवेपणा आला नव्हता हेही तितकंच खरं. उलट त्यांनी स्वतःला आत्मनिर्भर केलं आणि स्वतःची बायको, मुलं, नातवंडं ही आत्मनिर्भरच होतील यावर कटाक्षानं लक्ष ठेवलं. 

आईवडील गेले तेव्हा आजोबांना दोन बहिणी, त्यांतली एक अविवाहित आणि तीन धाकटे भाऊ होते. सर्वांत धाकट्या भावाला एका प्रेमळ कुटुंबानी दत्तक घेतलं. 

एका तरी भावाला चांगलं घर मिळालं म्हणून त्यांना आनंद झाला. लग्न झालेली बहीणही तिच्या भावंडांना तिच्या ऐपतीनुसार मदत करायची. आजोबा पेपर टाकण्याचं काम करायचे. कुठलंही लहानसहान काम करून उदरनिर्वाह करायचे. आपल्या भावंडांना सांभाळायचे. परिस्थितीनं ते अकाली प्रौढ झाले, जबाबदार आणि सद्‌गुणी झाले. त्यांचे बालपणीचे दिवस अतिशय हलाखीत गेले त्यामुळंच त्यांना उधळेपणा आवडायचा नाही. 

अत्यंत मेहनतीनं ते स्पर्धा परीक्षा पास होत गेले. रेल्वेत क्लास वन अधिकारी झाले. तो स्वातंत्र्यापूर्वीचा काळ होता. ते डाव्या गटाकडे आकर्षित झाले. त्या गटाकडून नेमून दिलेलं काही काम करत असताना आजोबा पकडले गेले. त्यांच्याकडच्या वस्तू जप्त करण्यात आल्या. त्यांच्यावर पोलिसांकडून प्रश्नांचा भडिमार झाला. 

ज्या संस्थेसाठी त्यांनी काम केलं त्या संस्थेनं आपली जबाबदारी झिडकारली. आपला यांचा काही संबंध नसल्याचं सांगितलं. जबाबदारी घेणारे लोक फार कमी असतात. बाकीचे स्वतः भ्याड असतात म्हणून त्यांना धोक्याची कामं करण्यासाठी तरुण लागतात. या प्रसंगानंतर आजोबा उजव्या गटाकडे झुकले.

आजोबांची पहिली नेमणूक मध्यप्रदेशात झाशीला झाली. त्यानंतर त्यांची बदली अमला इथं झाली. इथं घनदाट जंगल होतं आणि तापमान तर चार डिग्री सेंटीग्रेड. तिथं कऱ्हाडे ब्राह्मण लोकांची लहानशी वस्ती होती. सर्व एकमेकांना धरून असायचे. वसंतमामा (आजीचा भाऊ) यांनी आजोबांची ओळख तिथल्या पेंढारकर कुटुंबाशी करून दिली. आजोबा स्वतःच्या कामात हुशार होतेच शिवाय एक गुणी कलाकारही होते. 

मला आठवतंय... मी लहान असताना ते मला हंसाची स्केचेस काढून द्यायचे. ते उत्तम हॉकीपटूही होते. या सर्व गुणांमुळे पेंढारकर कुटुंबाला त्यांच्या लाडक्या यमूसाठी हा मुलगा अगदी अनुरूप वाटला आणि यमू पेंढारकरची कुमुदिनी करकरे झाली. त्यांचं लग्न झालं तेव्हा आजोबा चोवीस वर्षांचे होते आणि आजी अठरा वर्षांची होती.

लग्नानंतर आजी नव्या घरी आली. एका लहानशा ट्रंकेत मावेल एवढं मोजकंच सामान घरात होतं. स्वयंपाकासाठी कोळसाही नव्हता. इतरही काही गरजेच्या गोष्टी नव्हत्या. साधं जेवण करणंही आजीला कठीण झालं. कसाबसा तिनं वरणभात केला आणि दुपारी चार वाजता ते दोघं जेवले. मग आधी तिनं बसून वाणसामानाची यादी केली. त्या यादीतच सर्वात शेवटी लिहिलं घर आणि गाडी. तिनं घराचं, गाडीचं स्वप्न पाहिलं. त्याची नोंद केली आणि हे एक दिवस मिळवण्याचा निर्धारही केला. 

अमला हे गाव शांत, गर्द झाडीत गुरफटलेलं. अगदी एका खोलीतला आवाजही दुसऱ्या खोलीत ऐकू जायचा नाही असं. पप्पांचा जन्म अमला गावचा. आजीची मावशी बाळंतपण करण्यासाठी आलेली. टेकडीवरचं लहानसं घर. खोल्यांना दगडी भिंती. इथंच आजीनं आपल्या तान्ह्या हेमंतबरोबर वेळ घालवला. आजोबा खूप प्रेमळ होते, पण मनातल्या भावना व्यक्त करायचे नाहीत. रोज संध्याकाळी कामावरून आल्यावर ते पप्पांबरोबर खेळायचे. आजोबा कामावरून आले की रोज आजी झोपलेल्या पप्पांना उठवायची. मग आजोबा पप्पांबरोबर खेळायचे. मग पप्पा आजोबांजवळच झोपायाचे.

आजोबा कामावर गेले की आजी एकटी असायची पण आता छोट्या बाळाची सोबत होती. अमल्याला ते 1955पर्यंत राहिले. त्यानंतर आजोबांची बदली बडनेरला झाली. तिथे पप्पांचा धाकटा भाऊ, शिरीषचा म्हणजे माझ्या शिरीषकाकांचा जन्म झाला. नंतर आजोबा वर्ध्याला बदलून गेले. इथंच पप्पांना वाचनाचा, मगनवाडी लायब्ररीचा छंद लागला. आजोबांचे मित्र श्री. अगरवालसुद्धा या मुलांसाठी पुस्तकं आणायचे.

पप्पांच्या आणि त्यांच्या भावंडांच्या आजोळच्या - सागरच्या खूप चांगल्या आठवणी आहेत. सागरचं घर खूप मोठं होतं. तिथं विहीर होती आणि बगिच्यात भरपूर झाडं. नाशपातीची आणि काळ्या मनुकांची झाडं फळांनी लगडलेली असायची. आईवडलांच्या सूचनांकडं दुर्लक्ष करून ही मुलं बकऱ्यांचा पाठलाग करायची. गंमत म्हणून त्यांना पकडून दूध काढून प्यायची. सुट्ट्यांचे दिवस अगदी स्वच्छंदपणे घालवायची.

एकदा त्यांचे एक मामा त्यांना सागरचा जुना किल्ला दाखवायला घेऊन गेले. तो मजबूत किल्ला बघून पप्पांनी विचारलं, ‘‘इतक्या जुन्या काळात सिमेंट, काँक्रीट नसतानाही इतका दणकट किल्ला कसा बांधला?’’ मामा म्हणाले, ‘‘प्राचीन काळात भारतात ज्ञान आणि तंत्रज्ञान इतकं प्रगत होतं की, आत्ताही त्याची बरोबरी करणं शक्य नाही.’’ पप्पांनी किल्ल्याकडे पाहिलं. त्यांना मामांचं म्हणणं पटलं. त्यांनी तीनशे वर्षांपूर्वीच्या तेजस्वी इतिहासाची कल्पना केली. बहुधा त्या वेळेपासून भारताच्या संपन्न वारशाचा अभिमान त्यांच्यात निर्माण झाला. 

पप्पांचं लहानपण शिस्तीत गेलं. आजीनं त्यांना साध्या, घरच्या जेवणाची गोडी लावली. त्यांना मराठी जेवण आवडायचं. पालकाची पातळ भाजी आणि मुगाची खिचडी पप्पांची फेव्हरेट होती. इतर लहान मुलांसारखंच त्यांना हसायला, भावंडांच्या खोड्या काढायला आवडायचं. 

धाकटी बहीण मनीषा (पूर्वा साठे) ही त्यांची सर्वांत लाडकी. दोन्ही भावांवर मात्र ते दादागिरी करायचे. एकदा पप्पांनी सायकल भाड्यानं आणली. धाकटा भाऊ शिरीष सायकल चालवण्यासाठी मागे लागला. सायकल परत करायला थोडाच वेळ शिल्लक असताना त्यांनी ती शिरीषकाकाला दिली. उशीर झाल्यानं शिरीषकाकाला सायकलवाल्याला ज्यादाचे पैसे द्यावे लागले शिवाय दुकानापासून घरी चालत यावं लागलं. इकडं घरी मोठा भाऊ मात्र झाल्या प्रकाराला हसत बसला होता.

पप्पांच्या शिक्षणाची सुरुवात घरातूनच झाली. आजीनं त्यांना संस्कृत श्लोक, पाढे शिकवले. रोज संध्याकाळी छोट्या शिरीषला मांडीवर घेऊन ती पप्पांचं पाठांतर घ्यायची. अगदी साडेचार वर्षांचे असतानाच पप्पा पुस्तक वाचायला शिकले. वर्ध्याच्या शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत जाऊन आल्यावर त्यांनी सांगितलं, ‘‘शाळेत शिकवतायत ते सगळं मला येतंय. वर्गातली मुलं अगदी बालीश आहेत. मला दुसरीत घालायला हवं.’’ आजोबांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण पप्पा काही पहिल्या इयत्तेत बसायला तयार होईनात. शेवटी आजोबा मुख्याध्यापिकांना भेटले. त्यांनी नाखुशीनं डबल प्रमोशनची परवानगी दिली. फक्त त्याआधी पप्पांना एक परीक्षा द्यावी लागली. त्यात ते सहज उत्तीर्ण झाले. त्यांना वरच्या वर्गात प्रवेश मिळाला. प्राथमिक शाळेत नियमित ते वर्गात पहिले यायचे. चौथ्या इयतेत ते वर्धा जिल्ह्यात पहिले आले.

नंतर 1999 मध्ये पप्पा पोलीस खात्याच्या क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यासाठी वर्ध्याला गेले. तेव्हा त्यांनी त्यांचे प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री. रामराव चौधरी यांचा पत्ता शोधून काढला. त्यांना भेटायला गेले. पप्पा शहीद झाल्यावर या वर्ध्याच्या शाळेनं त्यांच्या सन्मानार्थ एक ग्रंथालय सुरू केलं. त्यावेळी त्यांनी पाठवलेली पत्रं वाचली की वाटतं भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात स्थान मिळवण्याची कला पप्पांकडे होती. वर्ध्याहून आलेली ती पत्रं आणि त्यासोबतचे ग्रंथालयाचे फोटो पाहून मन भरून आलं. 

नंतर वर्ध्याहून माझ्या आजोबांची बदली नागपूरला झाली. पप्पा न्यू इंग्लीश हायस्कूल, काँग्रेस नगर इथं दाखल झाले. शाळेची निवड करताना घरापासूनचं अंतर आणि शाळेची फी हे दोन महत्त्वाचे निकष होते. पप्पा इथं मॅट्रिकपर्यंत शिकले. रेल्वे कॉलनीतली मुलं सहज बिघडू शकतात हे आजोबांना दिसत होतं. वडील दिवसभर घरापासून दूर नोकरीत गुंतलेले असायचे. लक्ष ठेवायला कुणी नाही त्यामुळं मुलांना शिस्त लावणं कठीण होतं मात्र आजी कडक शिस्तीची होती. आजोबा कामावर गेल्यावर या चार मुलांना ती सांभाळायची. एकदा पप्पा शेजारून शिव्या शिकून आले. घरी आल्यावर त्यांच्या बोलण्यात लगेच त्या शिव्या आल्या. पुन्हा असे अपशब्द वापरायचे नाहीत म्हणून आजीनं त्यांना बजावलं आणि शिव्या देऊन घाण झालेलं तोंड धुऊन घ्यायला सांगितलं. अशा लहानमोठ्या अनेक घटना... पप्पांवर आजीच्या विचारांचा खूप प्रभाव होता.

काँग्रेसनगर या मध्यमवर्गीय वस्तीत आजोबांनी भाड्यानं घर घेतलं. या टुमदार घरात ही मुलं वाढली. पप्पांची धाकटी भावंडं म्हणजे माझे प्रवीणकाका आणि मनीषाआत्या इथंच जन्मले.

आजोबांच्या खास मित्राचा मुलगा दहावीत मेरीट लिस्टमध्ये आला. लगेचच्या वर्षी पप्पा बोर्डाच्या परीक्षेला बसणार होते. पप्पांनीसुद्धा वरच्या नंबरात यावं असं आजोबांना वाटत होतं. पप्पांना चांगले मार्क्स मिळाले, पण मेरीट लिस्टमध्ये नाव लागलं नाही. पुढं 1971मध्ये इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून ते बारावी झाले. 

तरुणपणी पप्पा लाजरेबुजरे होते शिवाय शरीरानं काटकुळे. बरोबरीची मुलं चेष्टा करायची. मराठी माध्यमातून आल्यानं इंग्लीशही कच्चं होतं. कॉलेजला जाईपर्यंत इंग्लीश भाषेशी फारसा संबंध आला नव्हता. मात्र त्यांनी इंग्लीशवर प्रभुत्व मिळवायचं ठरवलं. अधाशासारखं इंग्लीश साहित्य वाचायचा सपाटा लावला. ते वाचलेल्या पुस्तकाचं परीक्षण आपल्या डायरीत लिहून ठेवायचे. दोन वर्षांतच त्यांनी इंग्लीशमध्ये प्रावीण्य मिळवलं आणि अभ्यासात कॉन्व्हेंटमधून शिकून आलेल्या मुलांपेक्षा पुढं निघून गेले. 

नंतर पप्पांनी मराठी-इंग्लीश शब्दकोश पाठ करण्याचा निश्चय केला. इंग्लीश शब्दसंग्रह वाढवण्यासाठी ते मराठी शब्द लिहून त्यापुढं त्याचा इंग्लीशमध्ये अर्थ लिहायचे. स्मरणशक्तीला धार देण्यासाठी ते उतारेच्या उतारे, म्हणी लिहून ठेवायचे. शब्दकोशातल्या अधल्यामधल्या कुठल्याही पानावरच्या कुठल्याही शब्दाचा अर्थ ते सांगू शकायचे. आपल्या मित्रांची नावं लिहून त्यापुढं त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं वर्णन करणारे शब्दही लिहायचे... उदाहरणार्थ,

जानेवारी 1975
स्थितप्रज्ञ - stoic - K
भोगवादी – epicurean – myself
भाग्यवादी – fatalist – S
मोजकं बोलणारा – laconic – G
जेवढ्यास तेवढं बोलणारा – taciturn - B

सगळ्या गोष्टींच्या याद्या करण्यात ते विशेष तरबेज होते. ते डायरीत कामांची यादी करायचे. झालेल्या कामापुढं खुण करायचे. लहान वयातही ते प्रत्येक दिवसाचं मूल्यमापन करायचे. तो वेळ सत्कारणी लागला की नाही  तपासायचे. उदाहरण म्हणून त्यांच्या डायरीतल्या या नोंदी पाहता येतील... 

22 जानेवारी 1975
एक पत्र जिम गुरू प्रोजेक्ट
,  बेडेकर कपडे
आज आमचा निकाल लागला. मला चांगले मार्क्स मिळाले. उद्या सुट्टीचा दिवस. आज मी बरीचशी कामं पूर्ण केली. लवकर उठलो. एकंदर दिवस छानच गेला.

28 जानेवारी 1975
आज मुलाखात ठीक झाली पण माझ्या तीन मोठ्या चुका झाल्या. त्या म्हणजे
1) सहकाऱ्यांबरोबर झालेल्या चर्चेत माझ्या मुद्द्यावर जोर देऊन माझं म्हणणं त्यांना पटवून द्यायला हवं होतं.
2) इंग्लडचा इतिहास माहीत नसताना त्याबद्दल बोलायला नको होतं.
3) तिसरं म्हणजे ग्रुपने एक ठरावीक निर्णय घेतल्यानंतर माझा मुद्दा चुकीचा असू शकतो असं म्हणायला नको होतं. पण ठीक आहे. हा एक चांगला अनुभव. पुढील वेळी या चुका टाळायच्या.

पप्पा स्वतःची चूक लगेच दुरुस्त करायचे. चूक मान्य केली की ती सुधारता येते हे ते जाणून होते. अर्धवट काम करणं त्यांना पसंत नव्हतं. त्यांचा कामातला काटेकोरपणा लहानसहान गोष्टींतही ठळकपणे दिसायचा... ते म्हणायचे की, माणसाच्या मोठेपणाचं मोजमाप त्याच्या मोठ्या कामावरून नव्हे; तर त्याच्या रोजच्या, दैनंदिन कामावरून करावं. 

त्यांना पत्र लिहायला खूप आवडायचं. त्यांनी मित्रांना खूप पत्रं लिहिली. परीक्षेसाठी म्हणून अभ्यास करण्यात त्यांनी फार वेळ घालवला नाही. पण त्यांना मार्क्स चांगले पडायचे. ते इंजिनिअरिंगला टॉपर नव्हते. पुस्तकी किडा तर मुळीच नव्हते. जास्त मार्क्स मिळवण्यापेक्षा व्यक्तिमत्त्व घडवण्याकडे त्यांचं अधिक लक्ष होतं. त्यांना मित्रांबरोबर हिंदी, इंग्लीश चित्रपट पाहायलाही आवडायचं.

वयाच्या सोळाव्या वर्षी इंजिनिअरिंगला जायचं म्हणून त्यांनी घर सोडलं. 1975मध्ये ते विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VRCE) नागपूर इथून मेकॅनिकल इंजिनिअर झाले. मनीषा आत्याकडे त्या वेळच्या कितीतरी प्रेमळ आठवणी आहेत.

मनीषाआत्या तिसरीत असताना पप्पा अमरावतीला इंजिनिअरिंग कॉलेजला पहिल्या वर्गाला होते. एकदा त्यांच्या हॉस्टेलमधल्या मित्रांनी आजोबांना फोन करून पप्पांना ताप आल्याचं सांगितलं. मुलाला बरं नाही, जाऊन बघितलं पाहिजे असा आजीचा तगादा. झालं, आजोबा निघाले पप्पांकडे. तब्येत बरी नसतानाही पप्पांना आपल्या घरच्या लोकांसाठी चांगल्या जेवणाची व्यवस्था करायची होती. त्यांनी जवळच्या हॉटेलमधून श्रीखंडपुरी मागवली. आजोबांनी फळं, ग्लुकोज आणि औषधं बरोबर नेली होती. हॉस्टेलवर राहणं शक्य नसल्यानं ही मंडळी मग त्याच दिवशी परतली.

अमरावतीमधून इंजिनिअरिंगचं पहिलं वर्ष पूर्ण झाल्यावर नागपूरच्या VRCE कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्या वेळी आत्या चौथीत होती. तिची शाळा पाचसात किलोमीटर दूर होती. सकाळी जाताना ती दोन बस बदलून जायची... पण तिघा भावांपैकी कुणालातरी एकाला तिला शाळेतून आणायला जावं लागायचं. पप्पांची पाळी असली की ते मित्रांचा घोळका घेऊन तिला आणायला जायचे. 

मनीषाआत्या दहावीत होती तेव्हा पप्पांनी नागपूरजवळ हिंगण्याला नोकरी धरली. त्याच दरम्यान आजोबांनी लुना घेतली. आत्याला ती चालवायला शिकायची होती. पप्पांनी तिला प्रोत्साहन दिलं. शिकवलं. ती लुना शिकताना पप्पा धावत तिच्याबरोबर पळायचे. एकदा घाबरून तिनं ब्रेक दाबण्याऐवजी ॲक्सिलेटरच दाबला. पप्पा 'थांब थांब' म्हणून ओरडत होते. पण तोपर्यंत ती चांगली एक किलोमीटर पुढे गेली.

पप्पा इंजिनिअर झाल्यावर एक नातेवाईक त्यांना भेटायला आले. त्यांनी पप्पांकडे बघितलं आणि म्हणाले “स्मार्ट हो जरा. तुझी पर्सनॅलिटी सुधारायला पाहिजे. सामान्यज्ञान वाढवलं पाहिजे. इंग्लीश अस्खलित बोलता आलं पाहिजे. स्वभावात आत्मविश्वास हवा.” पप्पा गप्प राहिले, पण हा प्रसंग ते विसरले नाहीत. या टीकाटिप्पणीनं ते निराश झाले नाहीत. त्याऐवजी हा दोष दूर करायचा असं त्यांनी ठरवलं. स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची ताकद आपल्यामध्ये आहे हे ते जाणून होते.

पप्पांच्या जगण्यातून तर खूप शिकण्यासारखं आहे. माझ्या आईबाबांनी जी मूल्यं माझ्यात रुजवली ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे. ते मी इतरांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. पप्पांचं सुंदर, संपन्न आयुष्य विझवलं गेलं परंतु त्यांनी अनेकांच्या मनात ज्योत प्रज्वलित केली.

1976मध्ये पप्पा एकवीस-बावीस वर्षांचे होते तेव्हाच्याही डायऱ्यांमधल्या काही नोंदी आहेत. त्यावरून पप्पा साधे, सरळ आणि स्वच्छंदी, मित्रमंडळींबरोबर वेळ घालवणारे म्हणजे एका अर्थानं तुमच्या-आमच्यासारखेच होते. पण सतत आत्मपरीक्षण करणं, स्वतःमधले दोष दूर करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणं हाच त्यांच्यातला आणि आपल्यातला फरक. 1983मध्ये त्यांनी स्वतःच्याच डायरीचं परीक्षण केलं. ते पहिल्या पानावर लिहूनही ठेवलं. विश्लेषण करणं, नियोजन करणं या त्यांच्या आवडीच्या गोष्टी. स्वतःत सुधारणा व्हावी म्हणून ते सतत प्रयत्न करायचे. 

इंग्लीश आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी ते त्या-त्या भाषेतली उत्तमोत्तम पुस्तकं वाचायचे. आपण सर्वोत्तम विद्यार्थी ठरलो नाही, मेरीटमध्ये आलो नाही याची खंत त्यांना नेहमी राहिली. त्यांनी थोडा जास्त अभ्यास केला असता तर ते सहज नंबरात आले असते. 

त्यांना इतरही अनेक गोष्टींत मनापासून रस होता. एकवीस वर्षांचा हा तरुण काहीसा गोंधळलेलाही होताच. त्यांनी या डायऱ्यांमध्ये आपली स्वप्नं लिहिली. त्यांचा पाठपुरावा करून ती पूर्ण केली. पण त्यावरच ते थांबले नाहीत. त्याही पुढे जाऊन त्यांनी कष्टानं गोष्टी साध्य केल्या. हा योगायोग नाही. मेहनत, चिकाटी आणि हुशारी यांच्या बळावर त्यांनी स्वतःच्या आयुष्याला दिशा दिली.

(अनुवाद: शोभा चित्रे)

- जुई करकरे - नवरे
jui.navare@gmail.com


वाचा 'माझे पप्पा हेमंत करकरे' या लेखमालेतील इतर भाग 

मुंबईतले ते भीषण तास...

शेवटचा प्रवास...

हेवा वाटावा असे वीरमरण...

संकटसमयी सगळ्यांच्या पुढे उभा राहून लढणारा धैर्यधर...

बुलेटप्रुफ जॅकेटचा अपशकुन

साधी राहणी, उच्च विचारसरणी

Tags: लेखमाला जुई करकरे जुई करकरे - नवरे माझे पप्पा : हेमंत करकरे मुंबई दहशतवादी हल्ला 26/11 अँटी टेररिझम स्क्वॉड दहशतवाद विरोधी पथक एटीएस हेमंत करकरे भाग 7 Marathi Series Jui Karkare Majhe Pappa : Hemant Karkare My Pappa : Hemant Karkare Hemant Karkare: A Daughter's Memoir Part 7 Jui Karkare- Navare Load More Tags

Comments:

संजीवन

रोज डायरी लिहिणे(रोजनीशी) या चांगल्या संस्काराचा पुढील आयुष्यांत पिच्छा पुरवून पाठपुरावा केल्यास आणि स्वत:शी प्रामाणिक राहिल्यास आपले व्यक्तिमत्व किती बदलू शकते यांचे उत्तम उदाहरण! त्या नोंदी सुरक्षित ठेवल्या होत्या आपल्या जीवन प्रवासात आणि लेखिकेला (इतक्या फिरत्या/बदल्यानंतर) सापडणे ह्याला काय खुलासा असु शकतो?

संजीवन

एका २१व्या शतकातल्या उत्तुंग व्यक्तिचे तरूण पिढीने परत परत वाचावे असे जीवनचरित्र !

Arvind Gangadhar Navare

अतिशय सुंदर पाहिल्या पासून लिहायला आवडायचे का?

Add Comment