निर्जीव लाकडामध्ये प्राण फुंकणारे पप्पा...

माझे पप्पा हेमंत करकरे - भाग 12

फोटो सौजन्य : जुई करकरे - नवरे

ज्याच्याशी भेटणं, बोलणं सहजशक्य आहे असा एक कलावंत, अभिरुचिसंपन्न अधिकारी आम्ही गमावला.
- कमल कश्यप, माजी डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, महाराष्ट्र.


फरार नक्षलवाद्यांच्या शोधमोहिमेत पप्पा आघाडीवर राहायचे. चंद्रपूरमधल्या कार्यकाळात पप्पा रात्रंदिवस गडचिरोलीच्या त्या घनदाट जंगलात हिंडत राहिले. त्या निसर्गातच पप्पांमधला कलावंत जागा झाला. त्यांना जंगलातल्या त्या रमणीय लाकडांमध्ये सौंदर्य दिसलं. लाल मातीत वाढणाऱ्या तिथल्या सागवानात विलक्षण आकार होते. पप्पांच्या तीक्ष्ण नजरेतून ही आगळी जादू सुटली नाही. साधारण त्याच वेळी त्यांची भेट मनोहर सप्रे यांच्याशी झाली. हे चंद्रपूरचे रहिवासी. या लाकडांतून अतिशय आकर्षक सर्जनशील आकार घडवण्यात त्यांनी आयुष्य घालवलं होतं. पप्पा त्यांचा संग्रह पाहून मोहित झाले आणि प्रेरितही झाले. 

मोहिमेच्या वेळी जंगलात हिंडताना कुठं कुठं पडलेले लाकडाचे तुकडे आणायला पप्पांनी सुरुवात केली. हे ओबडधोबड ओंडके, तुकडे सरकारी बंगल्याच्या व्हरांड्याला लागून असलेल्या खोलीत साठवायला लागले. कुणाला हे अशा तऱ्हेचं लाकूड गोळा करणं, साठवणं विक्षिप्तपणा वाटेल. पण दिवसभराच्या शिणवट्यानंतर पप्पा या मुक्या ओंडक्यांच्या सहवासात वेळ घालवायचे... जसं काही  लाकडाचा प्रत्येक तुकडा पप्पांना त्याची काही-ना-काही कथा सांगत आहे. आम्हा मुलांवर त्यांनी जसे संस्कार केले, आमची जशी जडणघडण केली, आम्हाला जसा आकार दिला तसाच त्यांनी या मूक तुकड्यांना आकार दिला. त्या प्रत्येक तुकड्याच्या अस्तित्वाला स्वतंत्र अर्थ दिला. धुळीनं माखलेल्या त्या लाकडांचं बघता-बघता देखण्या काष्ठशिल्पात रूपांतर झालं. दिवाणखान्यातल्या भिंतीवर ते शोभून दिसायला लागलं. 

जंगलात इतस्ततः विखुरलेल्या लाकडाच्या दुर्लक्षित तुकड्यांचा सुंदर कलात्मक कायापालट झाला. त्यांच्या आयुष्याला एक वेगळं सुंदर वळण मिळालं. जंगलातून व्हरांड्यात आणि तिथून थेट दिवाणखान्यात. जन्मजात चांगुलपणा आणि सर्वांमध्ये सौंदर्य बघण्याची दृष्टी या गुणांमुळेच हे शक्य झालं. अगदी गुन्हेगारांच्याबाबतही त्यांचा असाच विचार होता. अतिबेरड गुन्हेगारांना एकदा शिक्षा ठोठावली गेल्यानंतर त्यांचा गुन्हा बाजूला ठेवून पुढच्या पुनर्वसनाचा विचार पप्पा करायचे. प्रत्येकाला दुसरी संधी मिळायला हवी यावर त्यांचा विश्वास होता.

सौंदर्य बघणाऱ्याच्या नजरेवर अवलंबून असतं, पण अस्सल कलावंतच अशी नवनिर्मिती घडवू शकतो. पप्पांची मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधली पदवी, सुतारकामातली गती, चौफेर वाचन यांतून जागृत झालेल्या त्यांच्या अंतर्मनानं त्यांना लाकडाच्या तुकड्यांतल्या आंतरिक सौंदर्याची जाणीव करून दिली. एकदा त्यांना लाकडाचा एक तुकडा घरट्याच्या आकाराचा वाटला. ते तो घरी घेऊन आले. त्याला पॉलीश केलं. सहा महिन्यांनंतर एक पक्षी त्यात अंडं घालायला आला. झाडाच्या गाठीपासून तयार केलेलं कासव ही पप्पांची पहिली कलाकृती. कडुलिंबाच्या खोडावर त्यांना अशा विविध आकारांतल्या गाठी सापडल्या. त्यांतली मोठी गाठ कासवाच्या शरीराचा मुख्य भाग झाली. दुसऱ्या गाठीतून डोक्याचा आकार झाला आणि छोट्या गाठींतून त्याचे पाय तयार झाले. सप्रेकाकांनी कौतुक केल्यानं पप्पांचा उत्साह द्विगुणित झाला.

या तुकड्यांतून एखादी कलाकृती निर्माण करताना त्या तुकड्यांचा मूळ आकार कधीही बदलायचा नाही हा अलिखित नियम पप्पांनी कायम पाळला. या तुकड्यांत अंगचंच सौंदर्य आहे आणि ते कशा तऱ्हेचा आकार घेऊ इच्छितात हे कल्पनाशक्तीनं जाणून तसा आकार देणं एवढंच आपलं काम आहे याची जाणीव पप्पांना होती. त्यांनी लाकडातून आदिमानवाची एक प्रतिकृती निर्माण केली. फक्त पायांसाठी दुसरा तुकडा जोडला. गरुड, कबुतरं, हंस, कोकीळ असे पक्षी आणि काही मानवी आकार तर त्यांनी घडवलेच शिवाय हॅट ठेवायला स्टॅन्ड, पेन स्टॅन्ड, फोटो फ्रेम्स, ट्रे, ॲश ट्रे, भिंतीवरचं घड्याळ, टेबलावरचं घड्याळ असं बरंच काहीसुद्धा तयार केलं. वाळलेल्या बांबूच्या तुकड्यांपासून आणि झाडाच्या बुंध्याला आडवा छेद देऊन कॉफी टेबल तयार केलं. सागवानाच्या झाडाला असाच आडवा छेद देऊन भिंतीवरचं घड्याळ तयार केलं. मागच्या बाजूनं बॅटरीवर चालणारं मशीन जोडलं. पुढं वेळ दाखवण्यासाठी धातूचे ठिपके लावले. किती कलात्मकतेनं पप्पांनी या वस्तू घडवल्या!

या निर्जीव लाकडाच्या तुकड्यात प्राण फुंकणं तुम्हाला कसं जमतं असं मी एकदा पप्पांना विचारलं. ते म्हणाले की, 'एखाद्या लाकडातून कोणता आकार घडू शकेल यावर विचार करण्यात ते भरपूर वेळ घालवतात. यासाठी चांगली कल्पनाशक्ती आणि बारीकसारीक गोष्टी टिपणारी नजर लागते. त्या लाकडातून कोणती आकृती घडू शकेल हे एकदम पहिल्या नजरेत सुचत नाही. पण एकदा साफसूफ करून, ते पॉलीश केल्यावर हळूहळू त्याचा सूक्ष्म आकार प्रकट होतो.'

पेन्सिल स्टॅन्ड करण्यासाठी बांबूचा पोकळ गोलाकार तुकडा घेऊन त्यांनी त्याला तळ जोडला. बांबूच्या फक्त मुळांपासून त्यांनी गणपती तयार केला. भोवती फ्रेम लावल्यावर त्याचं सौंदर्य उठून दिसायला लागलं. आणखी एक लक्षवेधक कलाकृती म्हणजे विदूषक. त्याचे डोळे, नाक, तोंडच काय पण अगदी त्याची टोपीही मुळातच तयार होती. येशू ख्रिस्त तर अगदी बोटापेक्षा पातळ डहाळीतून तयार केला. त्यामध्ये क्रॉस, येशूचा चेहरा, शरीर, हात अगदी स्पष्ट दिसत होते.

या सर्वांमध्ये पप्पांची आवडती कलाकृती म्हणजे नाचणारी जोडी. प्रत्येकी एक फूट लांब अशी पातळ बांबूची दोन मुळं. त्यांत अशा काही गाठी होत्या की, ज्यातून बाईचा आणि पुरुषाचा चेहरा दिसत होता शिवाय हात नाचण्याच्या आविर्भावात वर उचललेले.

‘‘एक डहाळी हात वर उचलेल्या पुरुषाशी साधर्म्य दाखवणारी आणि दुसरी स्त्रीची. या आकृत्यांना डौल होता. नाचणाऱ्या जोडीची तरलताही. या डहाळ्यांतून मानवी आकृत्यांचं साधर्म्य होतं. मी त्यांना एकत्र ठेवलं. ते उभे राहू शकत नव्हते म्हणून त्यांना लोखंडाच्या एका पाईपमध्ये ठेवून उभं केलं.’’ पप्पांच्या या आगळ्या छंदाबद्दल जाणून घेण्यासाठी एका पत्रकारानं पप्पांची मुलाखत घेतली होती. 

ही शिल्पं बघण्याची एक विशिष्ट पद्धत असते. पप्पा ते तुकडे पाणी आणि कॉस्टिक सोडा यांच्या मिश्रणात चार ते पाच दिवस घालून ठेवायचे. त्यांना धुवून सूर्यप्रकाशात वाळवायला ठेवायचे. यामुळे त्यांची बाहेरची साल निघून यायची. कीड वगैरे लागली असली तर स्क्रू ड्रायव्हरनं ती काढून टाकायची. मग या लाकडाला 160/200 ग्रेडच्या पॉलीश पेपरनी पॉलीश करायचं. त्याला आकर्षक चमक येण्यासाठी ते फ्रेंच पॉलीश वापरायचं. मग परत वाळवून शेवटचा थर टचवूड कोटिंगचा द्यायचे. यामुळे या लाकडाच्या वस्तू चमकदार दिसायच्या.

या लाकडाच्या तुकड्यांवर पप्पांनी जीव ओतून काम केलं. तितक्याच मनापासून त्यांनी कुटुंबासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. ते कुटुंबाचा मजबूत आधार होते. त्यांनी सगळ्यांना बांधून ठेवलं. घरात कुणीही लहानमोठा नव्हता. ते नेहमी सांगायचे, ‘तुम्ही तुमचं सुख शोधा, निर्माण करा. स्वतःतच तुम्हाला ते सापडेल. सुखासाठी कुणावर अवलंबून राहू नका, नाहीतर सुखी राहणं कठीण होईल.’ 

ही काष्ठशिल्पं घडवण्यात पप्पांनी खर्चलेले तासन्तास त्यांना निर्मितीचा आनंद देत होते. दिवसभर केलेलं जिकिरीचं काम, गुन्ह्याविरुद्धचा संघर्ष या सर्वांतून ताण यायचा. पण या अशा कामामुळे त्यांचा ताण, थकवा कमी होऊन जायचा.

चंद्रपूरला अनेक हवालदार त्यांना अशा तऱ्हेची लाकडं जमवायला मदत करायचे. एकदा लाकडाचा एक दुर्मीळ तुकडा नाहीसा झाला. त्याचदरम्यान एक हवालदार त्यांच्या या कलाकृतींमध्ये विशेष उत्सुकता दाखवतोय हे पप्पांच्या लक्षात आलं. या दोन गोष्टींची सांगड घालून ते थेट एक दिवस त्याच्या घरी पोहोचले. त्या घरात भिंतीवर वॉलपीस म्हणून लाकडाच्या गाठींतून केलेली तीन कासवं होती. या हवालदारानं पप्पांच्या परवानगीशिवाय हे लाकूड नेलं म्हणून प्रथम ते चिडलेच... पण नंतर ते शांत झाले. त्या हवालदारानं ही कला शिकून घेतली याचा त्यांना अभिमान वाटला. त्यांनी लाकडाचे आणखी 15-20 तुकडे त्याला दिले.

जानेवारी 1994मध्ये पप्पांची भिवंडीला बदली झाली तेव्हा नवचैतन्य कलामंडळात त्यांच्या कलाकृतींचं प्रदर्शन भरलं होतं. या वेळी एका पाहुण्यानी अभिप्राय नोंदवला, ‘एका चैतन्यहीन लाकडाच्या तुकड्यांतून इतकं सुंदर काही घडू शकेल हे मला माहीतही नव्हतं.’ बांबूच्या तुकड्यांतून पप्पांनी भिंतीवर लावायला एक मोझॅक तयार केलं. ते म्हणायचे की, आपला प्रेमळ स्पर्श झाला की लाकूड चमकतं. त्यांच्या या छंदामुळं ते निसर्गाच्या अधिक जवळ गेले.

पोलीस अधिकारी म्हणजे रुक्ष, कठोर, निर्दय असतो असा एक साधारण समज आहे. काही मर्यादेपर्यंत हे वर्णन पप्पांसाठीही खरं असलं तरी त्यांची संवेदनशीलता, त्यांच्या हृदयातली कोमलता अशा कलाविष्कारांतून प्रकट व्हायची. साहित्य, संगीत, चित्रकला यांनी त्यांच्या मनाच्या गाभाऱ्याची तार खोलवर छेडली होती. पप्पा आमच्याशी कठोरपणे वागायचे हे खरंय... कारण आम्हा जवळच्या लोकांकडून त्यांना अपेक्षाही खूप होत्या. लाकडाचा ओबडधोबडपणा, खरबरीतपणा घालवून त्याचा पृष्ठभाग गुळगुळीत, चमकदार करण्यासाठी ते तो सॅन्डपेपरनी घासून काढायचे. हे घर्षण करण्याचा उद्देश लाकडाला दुखावणं किंवा नष्ट करणं हा नसून त्याला सुंदर आकार देणं हा असायचा.

तसंच आम्हाला रागवताना ते अत्यंत औपरोधिकपणानं बोलायचे. आम्हा प्रत्येकाला चांगली, जबाबदार व्यक्ती करण्यासाठी त्यांचं पित्याचं प्रेम अशा तऱ्हेनं व्यक्त व्हायचं. त्यांनी आम्हालाही जोमानं, उत्साहानं, अगदी लाकडाच्या तुकड्यासारखं घासायचा प्रयत्न केला. पण आम्ही काही मुक्या वस्तू नव्हतो. आम्हीही कधीकधी बंडखोरी करायचो. साधारण सगळी मुलं आपल्या वडलांशी वागतात तसंच वागायचो. त्यामुळे या लाकडाच्या कलाकृतीसारखा, अगदी त्यांच्या मनासारखा, त्यांना आवडणारा आकार ते आम्हाला देऊ शकले नाहीत.

ते एक कर्तव्यकठोर पोलीस अधिकारी होते. मुत्सद्दीपणावर त्यांचा भर होता. त्यांच्या या कर्तव्यकठोरतेला, या पोलादी मुठीला साथ देण्याची ताकद त्यांच्या ज्या सहकाऱ्यांमधे होती त्यांना प्रथम उच्च दर्जाची शिस्त आणि सर्वोत्तम प्रवीण्य आत्मसात करावी लागायची. जसं लाकडाच्या तुकड्याचं. जे लाकडाचे तुकडे त्या सर्व ठरावीक प्रक्रियेमधून तरून गेले. त्यांचा संपूर्ण कायापालट झाला. जणू पुनर्जन्मच... पण काही तुकडे यात टिकले नाहीत. ते धुळीत जाऊन पडले. त्यांनी एक संधी गमावली. ही काष्ठशिल्पं घडवताना पप्पांच्या लांबसडक कलात्मक बोटांमध्ये प्रसंगी कुसंही घुसली असतील. ...आणि तरीही सुंदर कलाकृती निर्माण करण्याची त्यांची ओढ कमी झाली नाही.

खरं म्हणजे ते एक प्रामाणिक समाजसेवक होते. अट्टल गुन्हेगार आणि त्यांचे गुन्हे यांच्या सान्निध्यात पप्पांची माणुसकी विझली नाही. पोलिसाच्या नोकरीमध्ये राहूनही समाज सुधारणेकडे त्यांचा अधिक कल होता. कित्येक जणांनी पप्पांच्या वाटेवर काटे पसरले. पण पप्पांची नैतिकता एव्हाना इतक्या पातळीवर पोहोचली होती की पप्पांसाठी त्या जखमा विशेष नव्हत्या आणि काटे पसरवणाऱ्यांविषयी पप्पांच्या मनात द्वेषही नव्हता. ते त्यांच्या क्षेत्रात अग्रेसर होते. त्यांची शेवटची पावलं मात्र रक्ताळली हे खरंय, पण त्यामुळे कुणी नाउमेद होऊ नये. उलट त्यातून प्रेरणा घ्यावी. आपण जे करतोय ते योग्य आहे याची खात्री असेल तर स्वतःच्या विचारांना, श्रद्धेला चिकटून राहायला हवं. अगदी कुणी आपल्या पाठीशी नसलं तरी.

कला ही कलावंताच्या आत्म्याचं दर्शन घडवते. प्रत्येकानं आपला छंद, आपल्या आवडीच्या गोष्टी सोडून न देता उलट त्यांची साधना केली पाहिजे, त्यामध्ये प्रावीण्य मिळवलं पाहिजे असं पप्पांना वाटायचं.  संवेदनशील पप्पांनी या लाकडाच्या तुकड्यांना सौंदर्य दिलं. कामाच्या ठिकाणी ज्या सहजतेनं ते सर्व गोष्टी करायचे त्याच सहजतेनं त्यांनी हेही केलं. त्यांनी पोलीससेवेत नीरक्षीर विवेकाचा आग्रह धरला.

मला एकाच गोष्टीचं दुःख आहे. त्यांच्या साठवणीच्या खोलीतला तो मागे उरलेला लाकडाचा ढीग. सेवानिवृत्त झाल्यावर त्यावर काम करायचं त्यांनी ठरवलं होतं. पण दुर्दैवानं आता तसं होणार नाही...!

(अनुवाद: शोभा चित्रे)

- जुई करकरे - नवरे
jui.navare@gmail.com


वाचा 'माझे पप्पा हेमंत करकरे' या लेखमालेतील इतर भाग 

मुंबईतले ते भीषण तास...

शेवटचा प्रवास...

हेवा वाटावा असे वीरमरण...

संकटसमयी सगळ्यांच्या पुढे उभा राहून लढणारा धैर्यधर...

बुलेटप्रुफ जॅकेटचा अपशकुन

हौतात्म्यामागची आजन्म तपश्चर्या

कुटुंबवत्सल माणूस

चंद्रपूरचं आव्हान

चंद्रपूरमधील आठवणी सांगणारा काही पत्रव्यवहार

चंद्रपूरमधील बालपणीच्या आठवणी

Tags: लेखमाला जुई करकरे जुई करकरे - नवरे माझे पप्पा : हेमंत करकरे मुंबई दहशतवादी हल्ला 26/11 अँटी टेररिझम स्क्वॉड दहशतवाद विरोधी पथक एटीएस हेमंत करकरे भाग 12 Marathi Series Jui Karkare Majhe Pappa Hemant Karkare My Pappa Hemant Karkare Hemant Karkare : A Daughter's Memoir Part 12 Jui Karkare- Navare Load More Tags

Comments:

अनुया अहिरे

निराकारही घेई आकार!

संजीवन

‘फिरत्या चाका वरसी देसी मातीला आकार’या पंक्तींची आठवण झाली!निर्जीव लाकडातून निर्माण केलेल्या कलाकृती आणि सहवासांत आलेले सहकारी,नातेवाईक,मित्रपरीवार यांना घडवायचा सतत प्रामाणिक प्रयत्न,अट्टहास जेणेकरुन जीवन सुकर होईल अशा असामान्य व्यक्तिमत्वाला शतश: प्रणाम!

Add Comment