मला मल्टीनॅशनल कंपनीत काम करायला नक्कीच आवडेल. त्यातून वेगवेगळ्या देशांतल्या लोकांशी संपर्क येईल. त्यांची निराळी संस्कृती, समाज, पार्श्वभूमी यांचं आदानप्रदान करता येईल. कधीतरी माझी ही इच्छा पूर्ण करायला मी परदेशात जाईन.
- हेमंत करकरे, वय 21 ,29 जानेवारी 1975.
(रोजनिशीतली नोंद)
भारतीय पोलीसखात्यामधून येऊन पप्पांनी किती सहजतेनं 2000 ते 2005च्या काळात परराष्ट्रीय खात्यात मुत्सद्दी अधिकाऱ्याची भूमिका पार पाडली हे कथन ऑस्ट्रिया येथील व्हिएन्ना दूतावासामधल्या भारतीय वकिलातीतल्या पप्पांच्या सहकाऱ्यांनी केलं आहे.
शूर अधिकारी आणि सज्जन माणूस
टी.पी. श्रीनिवासन हे इंडिअन फॉरीन सर्व्हीसमध्ये (आयएफएसमध्ये) होते. ते व्हिएन्ना आणि स्लोव्हेनिया इथे ते भारताचे माजी राजदूतही होते. 2000 ते 2004 या काळात ते व्हिएन्नातील भारतीय दूतावासात हेमंत करकरे यांचे अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी जागवलेल्या आठवणी...
2000 ते 2004मध्ये व्हिएन्ना दूतावासामधल्या माझ्या टीमला मी नेहमी ‘ड्रिम टीम’ म्हणायचो. त्यांतले प्रमुख हेमंत करकरे. दहशतवाद्यांशी लढण्यात पटाईत, मुत्सद्दीपणातही प्रवीण. पोलीसखात्याचं प्रशिक्षण घेऊन आलेल्या हेमंतनं परराष्ट्र खात्यातलं कामसुद्धा आत्मविश्वासानं पेललं. पोलीस म्हणून मुंबईतून वावरावं तेवढ्याच सहजतेनं ते व्हिएन्ना इंटरनॅशनल सेंटरच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये वावरत. दहशतवाद्यांशी लढताना त्यांनी बलिदान दिलं आणि भारतानं एक शूर नायक, उत्तम मुत्सद्दी गमावला.
करकरे व्हिएन्नाला कॉन्सुलेट ऑफिसर म्हणून आले. ते तिथंच व्हिसा आणि पासपोर्ट यांसंबंधीच्या कामात होते. पण त्यांच्यातला मुत्सद्दी गुण ओळखायला मला वेळ लागला नाही. इंटरनॅशनल ॲटोमिक एनर्जीशिवाय व्हिएन्नात ड्रगसंबंधित संघटित गुन्हे, लाचलुचपत आणि दहशतवाद यांवर काम करणाऱ्या एजन्सीज् होत्या. या एजन्सीजचं स्वरूप तांत्रिक असतं पण राजकीय आणि युनायटेड नेशन्सच्या संघटनेसारख्या इथंही महत्त्वपूर्ण वाटाघाटी घडत असतात.
तुलनेनं करकरे यांचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव, त्यांचं उमदं व्यक्तिमत्त्व आणि त्यांची कार्यतत्परता यांमुळं ते या एजन्सीजमध्येही लोकप्रिय झाले. त्यांनी त्यांचं एक स्थान निर्माण केलं. ते कुठलीही वस्तुस्थिती लक्षपूर्वक ऐकून घ्यायचे. एखाद्या घटनेतली वस्तुस्थिती समजून घेण्याची त्यांची समज प्रचंड होती. त्यामुळं सर्व चर्चांमध्ये त्यांचं योगदान महत्त्वाचं असायचं.
व्हिएन्ना मुक्कामातलं आमचं प्रमुख काम म्हणजे भ्रष्टाचाराविरोधी United Nation Conventionची तयारी करणं. दोन वर्षं चालणाऱ्या या आंतरसहकारी कामकाजात भारताला अनेक विषयांत नेतृत्व घेऊन काम करायचं होतं. त्यांतली सर्वात आव्हानात्मक गोष्ट होती... ती म्हणजे लाचलुचपतीनं जमा केलेलं आणि परदेशी बँकांत ठेवलेलं धन परत आणण्याची. पैशाचे अवैध व्यवहार आणि त्या अनुषंगानं गुन्हेही सतत चर्चेत असायचे. करकऱ्यांचा या बाबतीतला दांडगा अनुभव हे आमचं मोठंच भांडवल होतं. या अधिवेशनाचं कामकाज वेळेत आटोपण्यासाठी आम्हाला त्यांची मदत झाली. कदाचित या संमेलनानं जगभरच्या देशांमधल्या भ्रष्टाचारात फार काही फरक पडला नसेलही मात्र व्हिएन्नामध्ये आम्हाला जे व्यावसायिक यश मिळालं त्यात करकरे यांचा महत्त्वाचा वाटा आहे.
करकरे व्हिएन्नाला आल्यानंतर महिन्याभरानं 9/11 चा दहशतवादी हल्ला झाला. त्या वेळी व्हिएन्नाच्या इंटरनॅशनल सेंटरमध्ये एक छोटं दहशतवाद विरोधी युनीट अगदी कोपऱ्यात अंग चोरून बसलेलं असायचं. मात्र 9/11नंतर ते एकदम प्रकाशात आलं आणि नवी जबाबदारी पार पाडण्यासाठी ते कसं मजबूत करता येईल त्याचा विचार सुरू झाला. आमचे त्यांच्याशी चांगले संबंध होते. त्यांना आम्ही आर्थिक साहाय्यही केलं होतं. सर्वांनी एकत्र येऊन दहशतवादाविरुद्ध काम करण्यात आम्हालाही रस होता. हे युनीट ताकदीनं उभं राहण्यासाठी करकरे यांनी पुढचे कित्येक महिने मेहनत घेतली.
करकरे व्हिएन्नामधल्या भारतीय लोकांमध्ये अगदी सहजतेनं वावरायचे. कॉन्सुलेट ऑफिसर म्हणून ते लोकांना तत्परतेनं सेवा पुरवायचे. त्यामुळं ते खूप लोकप्रिय झाले. त्या वेळी त्यांची बायको भारतात होती. ती शिक्षिका होती. मुलांनासुद्धा तीच एकटीनं वाढवत होती. इथं व्हिएन्नामध्ये करकरेंच्या घरी पाहुण्यांचं नेहमी आदरातिथ्य व्हायचं. त्यांना गाण्यांची आणि इतर कलांची आवड होती. राजदूतावासात होणाऱ्या अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन ते करायचे. त्यांनी हस्तविद्येत जुजबी ज्ञान मिळवून त्यावर व्हिएन्नामध्ये वकिलातीच्या लेडीज चॅरिटीच्या कार्यक्रमात पैसे मिळवून दिले. भारतातून आलेल्या पाहुण्यांचं त्यांच्याकडं जोरदार स्वागत व्हायचं. ते काही काळ प्रसिद्ध अशा ‘स्कोन्ब्रान’ आवारात राहत होते.
भारतातून सतत येणारी आव्हानात्मक शिष्टमंडळं, औषधी कंपन्यांचे आयोग... यांच्याशी वाटाघाटी करायच्या आणि त्याच वेळी त्यांच्यावर बारीक लक्षसुद्धा ठेवायचं हे काम सोपं नव्हतं पण ही दोन्ही कामं त्यांनी उत्तमरीत्या हाताळली. पाच वर्षांनी भारतात परतताना व्हिएन्नामध्ये त्यांचे वेगवेगळ्या देशांतले मित्र, सहकारी, चाहते झाले होते. त्यांना युनायटेड नेशन्सच्या एखाद्या विभागात कमी काम असणारी आणि भरपूर पगाराची नोकरी सहज मिळाली असती पण त्यांनी घरी परतायचं ठरवलं. त्यांना पोलीसखात्यात राहून देशबांधवांचं रक्षण करायचं होतं.
व्हिएन्नामध्ये आंतरराष्ट्रीय दृष्टीकोनातून दहशतवादाची व्याप्ती जाणून घेतल्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये दहशतवादविरोधी पथकाच्या कामात उडी घेतली. मी त्यांना केरळमध्ये आणि मुंबईमध्ये भेटलो होतो. ते नेहमी तन्मयतेनं आणि उत्साहानं आपलं काम करायचे. ते मुंबईला कुटुंबात परत आले होते. मुलं छान वाढत होती. त्यांच्या या कामातले धोके करकरे जाणून होते पण त्या धोक्यांना कवेत घेऊन ते चालत होते. प्रत्येक वेळी त्यांना टीव्हीवर बघताना मला अभिमान वाटायचा आणि भीतीही कारण ते सतत विस्तवाशी खेळत होते.
मी 25 नोव्हेंबरच्या रात्री दोन वाजता दचकून झोपेतून जागा झालो. मुंबईवर आतंकवाद्यांनी हल्ला केल्याचं मला माहीतही नव्हतं. बीबीसीच्या बातम्या लावल्या आणि करकरे आतंकवाद्यांच्या गोळीनं मारले गेल्याची वाईट बातमी कळली. टीव्हीवर जी क्लिप दाखवत होते तिच्यात हेल्मेट आणि बुलेटप्रुफ जॅकेट घालताना ते अतिशय शांत आणि संयमी दिसत होते. शौर्यानं या आतंकवाद्यांशी लढताना त्यांचा अंत व्हावा ही शोकांतिका. त्यांच्या देशभक्तीसाठी, धैर्यासाठी आणि स्वार्थत्यागासाठी करकरे नेहमी स्मरणात राहतील शिवाय त्याचबरोबर व्हिएन्नाच्या इंटरनॅशनल सेंटरमध्ये त्यांनी भारतासाठी लढलेल्या मुत्सद्दी लढायांसाठीसुद्धा त्यांना स्मरणात ठेवायला हवं.
‘एच फॉर हेमंत, एच फॉर हिरो’
युनायटेड नेशन्सच्या आउटर स्पेस अफेअर्ससाठी व्हिएन्नामधे कार्यरत असलेले हेमंत करकरे यांचे सहकारी शिरीष रावण यांनी जागवलेल्या आठवणी...
27 नोव्हेंबर 2008 रोजी मी बँकॉकमध्ये ‘एशिअन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या गेस्ट हाऊसमध्ये होतो. काही कामानिमित्त मी तिथं दौऱ्यावर गेलो होतो. सकाळी-सकाळी फ्रेश होताना बीबीसीवर बातमी ऐकली. मुंबईवर दहशतवादी हल्ला आणि त्या हल्ल्यात एटीएस प्रमुख हेमंत करकरे मारले गेले. हेमंत करकरेंचं नाव ऐकलं मात्र आणि मटकन खालीच बसलो. हेमंत माझा व्हिएन्नातील जीवलग मित्र. करकरे व्हिएन्नात असताना त्यांचा एक जवळचा मित्र आणि मी युनोमध्ये एकत्र काम करत होतो आणि त्यामुळं हेमंत करकरेंच्या कार्यपद्धतीविषयी माझा मित्राकडून फार चांगलं ऐकून होतो. थोड्याच दिवसांत माझा त्यांच्याशी परिचय झाला. बघता-बघता मैत्रीही झाली त्यामुळं त्यांच्या अचानक जाण्याने मला आणखीनच जास्त दुःख झालं.
काही मिनटांतच टीव्हीवर एकएका गोष्टीचा उलगडा होऊ लागला. मुंबईवरील दहशतवादी हल्ला परतवून लावण्यासाठी ते निधड्या छातीनं पुढे गेले. घरात बसून दुसऱ्यांना आदेश न देता स्वतः युद्धभूमीवर उतरले. दुसऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घातला. देशाप्रति, स्वतःच्या खाकी वर्दीप्रति असलेली बांधिलकी त्यांनी शंभर टक्के निभावली. शल्य एकाच गोष्टीचं वाटतं की, त्यांची शूरता, वीरता सिद्ध करण्यास नियतीनं त्यांना पुरेशी उसंतच दिली नाही. हो, दहशतवाद्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठली होती पण काळ तर करकरेंच्या बाबतीत अधिकच क्रूर ठरला. झाडाझुडपांच्या मागे लपलेल्या त्या दोन अतिरेक्यांचा हेमंत हा दुर्दैवी बळी ठरला नाही का? काही प्रश्न कायम अनुत्तरित राहून फक्त गूढ बनून राहिले आहेत.
हेमंत आणि माझ्यातील मैत्रीचे व्हिएन्नातील काही क्षण आठवल्यानंतर माझ्या आजीनं मला लहानपणी सांगितलेली एक गोष्ट आठवली. चांगल्या व्यक्तींना देव नेहमीच इतरांपेक्षा लवकर आपल्याकडं बोलावून घेतो. खरंय... ते हेमंत एक चांगला माणूस होता म्हणून देवानं त्याला इतक्या लवकर बोलावून घेतलं की आपल्या प्रियजनांना ‘गुडबाय’ म्हणण्यासाठीसुद्धा त्याला वेळ मिळाला नाही.
हेमंतची आणि माझी भेट ऑफिसच्या कामांव्यतिरिक्त इतरत्रही व्हायची त्यामुळं माझे खासगी संबंधच जास्त आले. हेमंतना मी जितकं अनुभवलं त्यातून वेळोवेळी एकच खातरी पटत गेली. He was the gem of a person. माझा विश्वास आहे चांगली व्यक्तीच चांगला अधिकारी होऊ शकते कारण अशा व्यक्तींची नीतिमत्ता आणि काही गोष्टींसंबंधीची बांधिलकी नेहमीच अढळ राहणारी असते. अब्राहम लिंकन म्हणायचे, ‘विपरित परिस्थितीत कोणताही माणूस तग धरू शकतो. तुम्हाला एखाद्या व्यक्तीचे चारित्र्य तपासून पाहायचे असेल तर त्या व्यक्तीला अधिकार द्या.’ अगदी खरं आहे. हेमंतकडं त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये हे दोन्हीही राहिले. असं असूनही हेमंत आयुष्यभर ‘एक माणूस’ म्हणूनच राहिले.
हेमंतच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक गुणविशेष होते. मला ठळकपणे नेहमी जाणवला तो त्यांचा नम्र स्वभाव. त्यांची विनयशीलता. इतकी नम्र व्यक्ती एक लौकिकप्राप्त आयपीएस अधिकारी असू शकते आणि मुंबईत कायदा व सुव्यवस्थेच्या पालनात अतुलनीय शौर्य दाखवल्यामुळं स्वतःबद्दल लोकांच्या मनात आदर निर्माण करू शकते यावर विश्वास ठेवणं तसं कठीणच पण हेमंत यांच्याबाबतीत मला तो अनुभव आला.
व्हिएन्नात महाराष्ट्रीय समाज तसा फारच कमी. तिथलं प्रत्येक कुटुंब हेमंतला आपल्या कुटुंबातला सदस्यच मानायचा. संपूर्ण समाजात त्याच्याविषयी प्रचंड आदर होता. सगळ्या औपचारिक, अनौपचारिक कार्यक्रमांना त्यांना निमंत्रित केलं जायचं.
प्रत्येक माणसाच्या व्यक्तिमत्त्वात लहान मुलाचा एक चेहरा असतो. हेमंतचं व्यक्तिमत्त्व असंच होतं. वयाच्या पन्नाशीत असताना त्यांचं मन मात्र 16 व्या (सोळाव्या) वर्षाप्रमाणे तरुण होतं. सरळ, साधा स्वभाव आणि कायम सळसळता उत्साह हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू मला कामय आवडायचे. एक प्रसंग आठवतो. व्हिएन्नातल्या एका कार्यक्रमात त्यांनी किशोरकुमारचं ‘फूलो के रंग से, दिल की कलम से...’ हे गीत गायलं होतं. दुसऱ्या दिवशी मी काही खासगी कामानिमित्त त्यांच्या कार्यालयात गेलो होतो. थोडा वेळ त्यांनी गप्पा मारल्या आणि त्यांनी हळूच दार लावलं. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच मिश्कील हास्य होतं. मला विचारलं, 'तुम्हाला काल मी गायलेल्या गाण्याची सर्व कडवी माहीत आहेत का? म्हणजे मी ते डायरीत उतरवून घेऊ शकेन.' वस्तुतः त्या गाण्याचा त्यांच्या मनावर इतका खोलवर प्रभाव होता हे मला ऐकतानाच जाणवत होतं... पण ते गाणं लिहून घेऊन त्यांना पाठ करायचं होतं आणि इथंच हेमंतचं वेगळेपण दिसायचं. त्या क्षणी मला त्याच्या सर्वशक्तिमान आयपीएस व्यक्तिमत्त्वातलं कोवळं मन असलेल्या माणसाचं दर्शन घडलं.
आम्ही व्हिएन्नात असताना माझा मुलगा पाच वर्षांचा होता. त्याला दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांशी लढणाऱ्या स्पायडरमॅनसारखी हिरोगिरी करणाऱ्या व्यक्तींचं प्रचंड आकर्षण होतं. त्याच्यासाठी हेमंतकाका पोलीस असल्यामुळं स्पायडरमॅनप्रमाणेच होते. हेमंत आमच्याकडं आले की त्याचा एक बाळबोध प्रश्न ठरलेला असायचा. हेमंतकाका तुम्ही बाहेर पडता ते बंदूक घेऊनच बाहेर का पडता? त्याच्याबरोबर बोलताना हेमंत अगदी त्याच्या वयाचा होऊन त्याच्यात समरसून जायचा... इतका की, दोघांमध्ये बॉक्सिंग फाईटही चालायची.
आश्चर्य म्हणजे टीव्ही स्क्रीनवर हेमंतचे फोटोग्राफ्स त्यानं पाहिले आणि त्याला चटकन आठवण झाली हेमंतकाकांची. खरं म्हणजे गेल्या तीनचार वर्षांत तो त्यांना भेटलाही नव्हता. एव्हाना तो आठ वर्षांचा झाला होता. बातमी ऐकताच निष्पाप भावनेतून त्याच्या गालांवर दोन टपोरे अश्रू ओघळले. मला कळायला वेळ लागला नाही की, माझ्या मुलाच्या बालमनात अजूनही हेमंत कुठेतरी अलगदपणे सामावलेला आहे.
हेमंतनं व्हिएन्ना सोडल्यावर मीसुद्धा अफगाणिस्तानमधल्या युनोच्या अमली पदार्थ आणि गुन्हेगारी प्रतिबंधक विभागात रुजू झालो. माझ्या तीन वर्षांच्या काबूलमधल्या वास्तव्यात मीसुद्धा दहशतवादाच्या सावटाखालीच राहिलो. मी होतो तेव्हाच काबूलमधल्या भारतीय दूतावासावर दहशतवादी हल्ला झाला आणि 57 जण ठार मारले गेले होते. मी ज्या गेस्टहाऊसमध्ये राहिलो तिथून भारतीय दूतावासाचं कार्यालय अगदी जवळ, अवघ्या 100 मीटरवर होतं. हल्ल्यात माझा दुसरा एक मित्र ब्रिगेडिअर रवी मेहताचा बळी गेला. त्यानंतर दोन महिन्यांनी बँकॉकहून पुन्हा अफगाणिस्तानात परतलो तेव्हा माझ्या सहकाऱ्यांनी मुंबईवरच्या हल्ल्यासंबंधी प्रश्न विचारला तेव्हा मोठ्या दुःखावेगानं हेमंत करकरेंचं नाव माझ्या ओठांवर आलं. दोन महिन्यांच्या कालावधीत दहशतवादानं माझे जीवाभावाचे दोन मित्र माझ्यापासून हिरावले. शेजारी राष्ट्रांकडून भारताला दहशतवादाचा केवढा गंभीर धोका आहे याची जाणीव झाल्यानं मला फार चिंता वाटायला लागली.
अफगाणिस्तानातली माझी असाईनमेंट आटोपून मी तिथून सुखरूप बाहेर पडलो पण तिथल्या वास्तव्यात असतानाच हेमंतसारखा मित्र गमावल्यानं हृदयाचा थरकाप उडून मनही उद्ध्वस्त झालं होतं. मला हेमंतला अगदी साध्या शब्दांत श्रद्धांजली अर्पण करायची आहे. त्याचं शौर्य कर्तव्याप्रति बांधिलकीला शतशः प्रणाम...
‘एच’ फार हेमंत, ‘एच’ फॉर हिरो...!
व्हिएन्नामधले उच्चपदस्थ अधिकारी रमेश धानडिकोटा आणि त्रिलोक आहुजा यांनी जागवलेल्या आठवणी...
पोलीस डेप्युटी कमिशनर आणि महाराष्ट्रातल्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांनी 26 नोव्हेंबर 2008ला देशाची सेवा करण्याचं कर्तव्य बजावताना त्यांच्या लाडक्या मुंबईसाठी प्राण गमावले. अशा काळात आमच्या भावना, आमच्या प्रार्थना त्यांच्या कुटुंबीयांसमवेत आहेत. हेमंत करकरे अतिशय उत्कृष्ट पोलीस अधिकारी होते. निर्भय नेता, दुसऱ्यांबद्दल कणव असलेले आस्थेवाईक आणि अत्यंत विनयशील होते.
त्यांनी भारतीय वकिलातीत पासपोर्ट, व्हिसाचे कॉन्सुलेट म्हणून काम केलं. ते इंजिनिअरींगमधले पदवीधर. भारतीय पोलीस सर्व्हीसचे सभासद (आयपीएस - 1982 बॅच) आणि हुशार मुत्सद्दी. अमली पदार्थसंबंधित गुन्हे, संघटित गुन्हे, लाचलुचपत, दहशतवाद यांविरोधी व्हिएन्नामधल्या युनायटेड नेशन्समध्ये भारताच्या मिशनचं प्रतिनिधित्व हेमंत करकरे यांच्याकडं आलं. युनायटेड नेशन्सच्या या शाखा तांत्रिक असल्या तरी राजकीयसुद्धा होत्या त्यामुळं इथं अत्यंत गुप्त वाटाघाटी व्हायच्या. अगदी थोड्याच काळात करकरे व्हिएन्ना इंटरनॅशनल सेंटरच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये रुळले. कुणीही त्यांच्याशी सहज संपर्क साधू शकत असायचं. समोरच्या व्यक्तीचं बोलणं ते लक्षपूर्वक ऐकायचे. मित्र म्हणून हेमंत एका रत्नासारखे होते... उदार, सदैव दुसऱ्याला मदत करायला तत्पर. त्यांचं वाचन अफाट होतं. त्यांना भारतीय संस्कृती, संगीत, इतिहास या सर्वाचं ज्ञान होतं.
ते धार्मिक होते. मित्रांनी मंदिरांमध्ये आयोजित केलेल्या धार्मिक उत्सवांत ते भाग घ्यायचे. हिंदू असोसिएशन व्हिएन्ना (एचएमए) यांनी आयोजित केलेल्या मंत्रपठणाच्या स्पर्धेत परीक्षक म्हणून ते गेले होते. एचएमएनं आयोजित केलेल्या अखंड रामायण पाठात भाग घेऊन रामरक्षा म्हणून त्यांनी सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. दिवाळा मेळ्याचं सूत्रसंचालन त्यांनी केलं. आमच्या विनंतीनुसार त्यांनी एचएमएच्या निवडणूक प्रक्रियेत मार्गदर्शन केलं. कार्यकारी समिती आणि निवडणूक आयोग यांना पाठिंबा देऊन मार्गदर्शन केलं.
हेमंतना प्रवासाचं वेड होतं. त्यांना निसर्गातलं सौंदर्य, त्यातली विलक्षण निर्मिती यांचं अप्रूप होतं. त्यांनी बराचसा ऑस्ट्रिया आणि जवळपासचे देश आमच्यासोबत पाहिले. ऑस्ट्रियामधले चर्च, मठ यांना आदरभावानं भेटी दिल्या. या प्रेक्षणीय स्थळांना भेट दिल्यावर त्यांच्या नोंदवहीत सुंदर अक्षरात या स्थळाचं वर्णन ते लिहायचे. बऱ्याच वेळा मराठीत किंवा हिंदीतही ते हे लिहीत असत. भारतातल्या पाहुण्यांचं त्यांच्या घरी नेहमीच स्वागत होत असे. बऱ्याचदा त्या पाहुण्यांना व्हिएन्ना फिरवून आणण्याची जबाबदारीपण तेच घेत.
प्रत्येक वेळी त्यांना टीव्हीवर बघताना आम्हाला अभिमान वाटायचा आणि त्याचबरोबर भीतीही. ते आगीशीच खेळणं होतं. त्यांनी शौर्यानं आतंकवाद्यांना सामोरं जाऊन लढण्याचा शेवट 26/11च्या शोकांतिकेत झाला. भारतानं एक महान नेता गमावला. अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचा मुत्सद्दी, आंतरराष्ट्रीय कम्युनिटीमधला मित्र, हितचिंतक आणि समाजासाठी मनापासून काम करणारा कार्यकर्ता गमावला.
एचएमए आणि हिंदू रिलिजिअस ऑर्गनायझेशन (एचआरओ) व्हिएन्ना यांनी मुंबईच्या हल्ल्यात बळी गेलेल्यांसाठी आदरांजलीचा कार्यक्रम आयोजित केला. 20 सप्टेंबरला मंदिरात श्रद्धांजलीचा कार्यक्रम झाला. त्यात हेमंत करकरे यांनी भारतीय आंतरराष्ट्रीय समाजासाठी केलेल्या कार्याचा गौरवानं उल्लेख झाला. या कार्यक्रमाचा भाग म्हणून एन. दास आणि होशियार मल यांनी भजन गायन केलं. मृतात्म्यास शांती लाभो. परमेश्वर त्यांच्या धैर्यवान कुटुंबाला शक्ती देवो.
ओम शांती! शांती! शांती!
भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी जागवलेल्या आठवणी...
माझी आणि हेमंत करकरे यांची ओळख मी व्हिएन्नाला गेलो तेव्हा झाली. तिथं त्यांनी भारतीय वकिलातीत काही वर्षं काम केलं होतं. हेमंत म्हणजे सदैव मदत करण्यात तत्पर, सुसंस्कृत, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचं समग्र भान असणारं व्यक्तिमत्त्व. आमच्या डिपार्टमेंटचे शास्त्रज्ञ नेहमी व्हिएन्नाच्या दूतावासात असत. ते जागतिक परमाणू एजन्सीशी संवाद, समन्वय साधून आमच्या योजनांचा पाठपुरावा करत. या दोन्ही एजन्सीजचे व्यावसायिक आणि व्यक्तिगत पातळीवर फार चांगले संबंध होते. याचाच परिणाम म्हणून मुंबईहून व्हिएन्नाला गेलेली मंडळी हेमंतच्या पाहुणचाराचा आस्वाद घेत. हेमंतच्या घराचं स्थापत्य आगळंच होतं. ते स्क्रोन्बर्न पॅलेस गार्डन या व्हिएन्नामधील खास जागेत होतं.
हेमंतना मनापासून अणुशक्तीविषयक गोष्टींमध्ये रस होता. खरं म्हणजे त्यांचं व्हिएन्नामधलं काम आटोपलं की संशोधनकार्यात सहभागी होण्याची त्यांची फार इच्छा होती. न्युक्लिअर पॉलिसी आणि सुरक्षा या विषयावर संशोधन करण्यात त्यांना रस होता. आमच्यासाठी हे नक्कीच मोलाचं वरदान ठरलं असतं मात्र कर्मठ सरकारी नियमामुळं हे घडलं नाही. त्यानंतरच्या घटना बघता एक महत्त्वाची संधी आम्ही गमावली असंच देशाला म्हणावं लागेल.
26/11नंतर मी एकदा व्हीटी स्टेशनला गेलो होतो तेव्हा माझ्याबरोबरच्या प्रोटेक्टिव्ह सर्व्हीस ऑफिसरनी त्या रात्रीचा सगळा घटनाक्रम मला सांगितला. हेमंतनं आपल्या पथकाला केलेलं मार्गदर्शन आणि सर्वांनी हिंमतीनं आणि जबाबदारीनं त्या प्रसंगाला सामोरं जाणं हे मला तेव्हा जाणवलं. देशाच्या हाकेला धावून जाताना हेमंतनं केलेला तो सर्वोच्च त्याग होता.
मला वाटतं हेमंतसारखे लोक आजूबाजूला असले की आयुष्य जगण्यायोग्य होतं. हेमंतनं आपल्यापुढं उत्तम उदाहरण ठेवलंय. त्याचं अनुकरण करून आयुष्याचा अर्थ शोधता येईल. हेमंतची आठवण आपल्या सर्वांच्या मनात सदैव राहील.
(अनुवाद: शोभा चित्रे)
- जुई करकरे - नवरे
jui.navare@gmail.com
वाचा 'माझे पप्पा हेमंत करकरे' या लेखमालेतील इतर भाग
शेवटचा प्रवास...
हेवा वाटावा असे वीरमरण...
संकटसमयी सगळ्यांच्या पुढे उभा राहून लढणारा धैर्यधर...
बुलेटप्रुफ जॅकेटचा अपशकुन
हौतात्म्यामागची आजन्म तपश्चर्या
चंद्रपूरमधील आठवणी सांगणारा काही पत्रव्यवहार
निर्जीव लाकडामध्ये प्राण फुंकणारे पप्पा...
सहकाऱ्यांनी जागवलेल्या आठवणी - पूर्वार्ध
सहकाऱ्यांनी जागवलेल्या आठवणी - उत्तरार्ध
प्रियजनांनी जागवलेल्या आठवणी...
Tags: लेखमाला जुई करकरे जुई करकरे - नवरे माझे पप्पा हेमंत करकरे मुंबई दहशतवादी हल्ला 26/11 अँटी टेररिझम स्क्वॉड दहशतवाद विरोधी पथक एटीएस हेमंत करकरे भाग 16 Marathi Series Jui Karkare Majhe Pappa Hemant Karkare My Pappa Hemant Karkare Hemant Karkare : A Daughter's Memoir Part 16 Jui Karkare- Navare Load More Tags
Add Comment