चंद्रपूरमधील आठवणी सांगणारा काही पत्रव्यवहार

माझे पप्पा हेमंत करकरे - भाग 10

करकरे साहेबांची स्वतःची अशी कामाची एक शैली होती. ते ठरावीक पठडीत काम करायचे नाहीत, त्यामुळे ते अद्वितीय अधिकारी झाले. चालू कामात छोट्यातला छोटा सहभाग असणाऱ्या माणसाशीसुद्धा चर्चा करून ते माहिती गोळा करायचे. वरिष्ठांसोबत चर्चा करून सल्ला घ्यायचे. जंगलातल्या सर्व मोहिमांमध्ये मी त्यांच्याबरोबर काम केलंय.
- पुरुषोत्तम चौधरी (हेमंत करकरे यांचा विश्वासू सहाध्यायी, चंद्रपूर)


धाडसी आणि कनवाळू साहेब
(पप्पांचे पोलीस कॉम्रेड श्री. धोटे, सेवानिवृत्त डेप्युटी सुपरिटेंडंट पोलीस यांचं पत्र)

2014

26 नोव्हेंबर 2008च्या रात्री ‘एटीएस प्रमुख हेमंत करकरे शहीद’ ही बातमी टीव्हीवर दिसली आणि प्रथम तर डोळ्यांवर आणि कानांवर विश्वासच बसेना परंतु पुन्हा-पुन्हा तीच बातमी येत होती. त्यामुळे मन मानत नसतानाही मला ती गोष्ट स्वीकारावी लागली.

पोलीसदलातील दर दोनतीन वर्षांच्या बदलीच्या नोकरीत अनेक अधिकाऱ्यांशी संपर्क येतो. प्रत्येकाशी जुळवून घ्यावे लागते. प्रत्येकाचे स्वभाव समजून घेऊन आपली कामाची पद्धत बनवावी लागते. माझा 30 वर्षांच्या नोकरीत अनेक अधिकाऱ्यांशी संपर्क आला, अनेकांचे बरेवाईट अनुभव घेतले. करकरेसाहेब चंद्रपुरात आले आणि त्यांच्याबरोबर काम करण्याचा योग आला. कनिष्ठ अधिकाऱ्याकडून काम करवून घेण्याच्या त्यांच्या हातोटीचा माझ्यावर इतका मोठा प्रभाव पडला की, त्यांच्याबरोबर प्रत्येक वेळी नवा अनुभव तर मिळायचाच परंतु काम करण्यातही इंटरेस्ट वाटायला लागला.

प्रत्येक अधिकाऱ्याला त्याच्या कामाचे श्रेय त्या-त्या वेळी देणे ही करकरेसाहेबांची खासियत आम्ही थोड्याच दिवसांत अनुभवली. 22 ऑगस्ट 1991 रोजी त्यांनी चंद्रपूर पोलीस अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला आणि पहिल्या दिवसापासून एकेक दलम, त्यांचे कमांडर यांची माहिती घेण्यास सुरुवात केली. नक्षलवाद या विषयाचा त्यांनी पूर्वीच अभ्यास केला होता हे आम्हाला लगेच लक्षात यायला लागले.

क्रांती रणदेव हा ‘मोस्ट वॉन्टेड’ नक्षलवादी होता. त्या वेळी त्याला अटक केल्यानंतर 16 आयएएस अधिकाऱ्यांचे अपहरण झाले होते. त्यांची सुखरूप सुटका करण्यासाठी क्रांती रणदेवला सोडावे लागले होते. त्या वेळीही नक्षलवाद्यांच्या आजसारख्याच क्लृप्त्या होत्या. क्रांती रणदेव तुरुंगातून सुटला, मात्र तो आजतागायत बेपत्ता आहे. दुसरा आणखी एक नक्षलवादी रामराव शेळके. या कट्टर नक्षलवाद्याची कशी कोणास ठाऊक... करकरे साहेबांजवळ पूर्ण माहिती होती. रामराव शेळकेच्या अटकेपासून करकरे साहेबांच्या चंद्रपूरच्या धडाकेबाज कारकिर्दीला सुरुवात झाली.

आम्हाला दर महिन्याचा गुन्हेगारीसंबंधीचा तपशीलवार मासिक अहवाल द्यावा लागतो. त्यावर एक नजर टाकताच आपल्या लक्षात येईल की, एखाद्या नक्षलवाद्याची माहिती मिळवण्याकरता खबऱ्यांना देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रकमांत रामराव शेळकेंच्या खबऱ्याचे नाव ठळक दिसते. त्या वेळी शेळकेची माहिती देणाऱ्या खबऱ्याला  पंधरा हजार रुपयांचे बक्षीस मिळाले होते. त्या काळी ही फारच मोठी रक्कम मानली जात असे. रामराव शेळकेबद्दलची सर्व माहिती साहेबांच्या स्वतःच्या इन्फर्मेशन नेटवर्कवरून मिळाली होती.

या शेळकेला पकडले गेले त्याची एक पार्श्वभूमी आहे. ती मला इथे मुद्दाम सांगावीशी वाटते... बहाद्दूरपुरे नावाचा एक नावाप्रमाणेच बहाद्दूर असलेला अधिकारी. त्यांनी काही वनाधिकाऱ्यांविरोधात कारवाई केली. बहाद्दूरपुरेच्या प्रकरणाची तक्रार विधानसभा, केंद्रसरकार यांच्यापर्यंत गेल्यामुळे बहाद्दूरपुरेला निलंबित करण्याच्या मागणीचा बऱ्यापैकी दबाव आला होता. तसे वरिष्ठांचेही आदेश होते.

कोणत्याही व्यक्तीचे अंतरंग ओळखण्याची साहेबांची क्षमता काही औरच होती. त्यामुळे त्यांनी बहाद्दूरपुरेला बोलावून सांगितले की, मी तुला पर्याय देतो, ‘तू असे काही काम करून दाखव... जेणेकरून मी तुला पुनर्नियुक्त करण्याकरता वरिष्ठांवर नैतिक दबाव आणू शकेन. नेमकी याच वेळी साहेबांना स्वतःच्या माहितीस्रोतांमधून रामराव शेळके या अत्यंत जहाल दलम नेत्याविषयीची माहिती मिळाली होती. हा कट्टर नक्षलवादी मराठवाड्यात हिंगोली, परभणी भागात दडलेला होता. साहेबांनी त्याची माहिती बहाद्दूरपुरेला दिली आणि सांगितले की, मला तुम्हाला आव्हान द्यावेसे वाटते की, या शेळकेला तुम्ही मुसक्या बांधून आणावे. आणि काय आश्चर्य बहाद्दूपुरेने खरोखरच ते आव्हान स्वीकारून ती कामगिरी यशस्वी करून दाखवली. ती एक स्वतंत्र कहाणी आहे.

अशा तऱ्हेने निलंबनामुळे नैराश्य आलेल्या अधिकाऱ्याकडूनसुद्धा साहेबांनी उत्कृष्ट कामगिरी करवून घेतली... त्यामुळे चंद्रपूरच्या संपूर्ण पोलीस दलात एक प्रकारचे चैतन्य ओसंडून वाहू लागले. प्रत्येकाला वाटू लागले, मीसुद्धा अशीच असामान्य कामगिरी करून दाखवेन. या कामगिरीनंतर चंद्रपूर पोलिसांच्या यशाचा आलेख सतत उंचावतच गेला.

चंद्रपूरमधील अवघ्या 23 महिन्यांच्या कारकिर्दीतील 22 कट्टर नक्षलवाद्यांना अटक झाली. चंद्रपूर पोलीस दलाने विदर्भातील इतर जिल्ह्यांपासून ते मध्यप्रदेशातील इटारसीपर्यंत धडक मारून नक्षलवाद्यांच्या मुसक्या बांधून आणल्या.

करकरेसाहेब चंद्रपुरात दाखल होण्यापूर्वी काही दिवसच आधी ग्यारापत्तीला नक्षलवाद्यांनी एक स्फोट घडवून आणला होता. त्याआधी मांगेझरी, टेकामांडवा या ठिकाणी स्फोट झाले होते. त्यात डझनभर पोलीस शहीद झाले होते. परिस्थिती भीषण होती. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याचे पोस्टिंग हे एक आव्हानच होते. अशा पार्श्वभूमीवर करकरेसाहेबांची येथे बदली झाली. त्यांचेच बॅचमेट श्री. के. एल. प्रसाद साहेबांकडून त्यांनी पदभार स्वीकारला. दोघांच्या भेटीत एकमेकांना पहिल्या नावाने संबोधित करण्यावरून लक्षात आले की, उभयतांमध्ये चांगलीच मैत्री होती. प्रसाद साहेबांनी त्यांच्या कार्यकाळात बऱ्यापैकी पाया म्हणजेच नेटवर्क तयार करून ठेवलेले होते पण रिझल्ट्स मात्र यायचे बाकी होते. आपल्या कामाचे चांगले परिणाम मिळवून देणारा एक सक्षम अधिकारी येथे यावा अशी प्रसाद साहेबांची मनापासूनची इच्छा होती. त्यामुळे हेमंत करकरे चंद्रपूरला येत आहेत हे कळल्यावर एक अत्यंत सक्षम अधिकारी आपल्या जागी येत असल्याचा त्यांना खूप आनंद झाला.

आम्हाला मात्र करकरे साहेबांविषयी काही माहिती नव्हती पण प्रसाद साहेबांनी आम्हाला आश्वस्त केले की, ‘ऐसा समझो, मैं ही हूँ’ चार्ज देताना झालेल्या मिटिंगमध्ये प्रसाद साहेबांनी आम्हाला हेही सांगितले की, आपण निर्धास्त असा. तुम्हाला माझ्याहूनही चांगला एस.पी. मिळत आहे. नंतर मी तेथेच केबीनमध्ये बसलो असताना प्रसाद साहेबांनी ड्रॉवरमधून एक फोटो काढला व करकरे साहेबांना दाखवत म्हणाले, ‘हेमंत, ये खतरनाक शेखरअण्णा है! हम लोग सालों से  इसके पीछे पड़े थे मगर पकड़ में नही आया! इसे पकड़ने का टाईम आ चुका है. यदि सब ठीक हुआ तो जल्दी वह तुम्हारी पकड़ में आयेगा!’

योगायोगाने साहेब रुजू झाल्याझाल्या 30 ऑगस्टला माहिती आली की, शेखरअण्णा नावाचा तो कुख्यात दलम कमांडर लालपेठ भागात आलेला आहे. पोलीसही त्याच्या वॉचवर होतेच. ही माहिती आम्ही साहेबांना देताच ते ताबडतोब स्वतः कारवाईचे नेतृत्व करायला निघाले पण आम्हीच साहेबांना विनंती केली की, त्यांनी स्पॉटवर येऊ नये... कारण एकतर साहेब चंद्रपूर भागात नवखे होते. त्यांना त्या भागाविषयी, जंगलातील लढायांविषयी (जंगल वॉरफेअरविषयी) माहिती नसावी असे आम्हाला वाटत होते आणि साहेबांचे उंचपुरे, नजरेत भरणारे व्यक्तिमत्त्व, नवा चेहरा, बाहेरची व्यक्ती म्हणून नक्षलवाद्यांनी ओळखला असता... त्यामुळे आम्ही त्यांना विनंती केली, तुम्ही ऑफिसमध्येच थांबावे. कारवाई झाल्यानंतर लगेच तुम्हाला कळवतो अशी विनंती केल्यानंतर मोठ्या नाखुशीने साहेब ऑफिसमध्येच थांबले... पण ते अस्वस्थ होते. एवढा मोठा कॅच होत असताना मी मात्र बाहेर राहावे हे काही बरे नाही अशी त्यांची भावना होती.

रात्री नऊ-साडेनऊला शेखरअण्णाच्या पाळतीवर असलेल्या पोलीस पार्टीला तो लालपेठ भागात मिळाला. पोलीस आपल्या मागावर आहेत हे लक्षात येताच त्याने फायरिंग सुरू केले. पोलिसांनीही क्षणाचा विलंब न लावता त्याला गोळीबारानेच प्रत्युत्तर दिले. लालपेठ भागात धुमश्चक्री सुरू झाली. पोलिसांच्या गोळीबारात शेखरअण्णा तसेच त्याच्यासोबत असलेला स्थानिक खबऱ्या रामू केरकावार हादेखील जबर जखमी झाला. इस्पितळात नेल्यावर दोघांनाही मृत घोषित करण्यात आले. दरम्यान... ही माहिती करकरे साहेबांना मिळताच ते ताबडतोब घटनास्थळी हजर झाले.

आता यापुढील कायदेशीर कारवाईत साहेबांची मदत अपेक्षित होती. ते तर तयारच होते. साहेबांनाही ते चांगले ठाऊक होते. त्यांनी ताबडतोब पत्रकार परिषद बोलावून त्यात आवश्यक त्या तयारीनिशी सर्व माहिती दिली. कायदेशीर बाबींची पूर्तता केली. कागदपत्रे बनवून घेतली. केस व्यवस्थित तयार केली. दुसऱ्यातिसऱ्या दिवशी गडचिरोली अहेरी भागात ‘शेखरअण्णाको’ अशी पोस्टर्स लागली. कारवाई करणाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या यायला सुरुवात झाली. साहेब मात्र शांत होते. त्यांनी म्हटले की, ‘या पोस्टर्सने व धमक्यांनी हे सिद्ध होत आहे की, मारले गेलेले दोघेही जण नक्षलवादीच होते.’ त्या वेळी गडचिरोलीचे अधीक्षक रघुवंशी साहेब होते. ते मुद्दाम तिथून चंद्रपूरला आले व म्हणाले, ‘हेमंत, मला वाघाच्या शिकारीनंतर काढतात तसा एक फोटो घ्यायचा आहे.’ या अभूतपूर्व यशानंतर चंद्रपूर पोलिसांचे नाव विदर्भातील अन्य जिल्ह्यांपासून ते सीमावर्ती राज्यांमध्ये अत्यंत आदराने घेतले जाऊ लागले.

यानंतर करकरे साहेबांनी नक्षलवाद्यांचा बीमोड करण्याचा चंगच बांधला. त्याकरता त्यांनी स्वतः रात्रंदिवस दौरे करून कोष्टाळा, कोरपना, भारी, टेकामांडवा, जिवतीचा डोंगर हा संपूर्ण दुर्गम भाग पिंजून काढला. हे भाग नक्षलवाद्यांचे बालेकिल्ले होते. या दौऱ्यांमध्ये त्यांचा मूळ उद्देश असायचा तो जनजागृती निर्माण करण्याचा, त्यातून नक्षलवाद्यांचा जनाधार तोडण्याचा व पोलिसांची प्रतिमा उंचावून त्यांच्याविषयी जनतेत विश्वास निर्माण करण्याचा. त्यांनी मग सुरू केले जनजागृती अभियान व उभारायला सुरुवात केली ग्रामसुरक्षा दले. या भागात अठरापगड जाती व बोली भाषा प्रचलित आहेत. विशेषतः पहाडांवर वंजाऱ्यांची वस्ती, गडचिरोली सीमा भागात गोंड, कोरकू तर आंध्रलगत तेलुगु... त्यामुळे सोबत दुभाषक न्यावे लागत. त्यांचाही (दुभाषकांचाही) त्यांना विश्वास संपादन करावा लागे. साहेबांनी गावोगावी फिरून, सभा घेऊन जनाधार निर्माण केला. लोकांच्याही मनात पोलिसांबद्दल हळूहळू शाश्वती निर्माण होऊ लागली.

अशाच एका दौऱ्यातून साधलेल्या जनसंपर्कातून व शेळकेसंबंधी केलेल्या चौकशीतून 15-16 कट्टर नक्षलवाद्यांची नावे कळत गेली व त्यांना पकडण्यात साहेबांना अभूतपूर्व यश संपादित करता आले आणि त्याच्या परिणामस्वरूप निश्चितच असे झाले की, साहेबांच्या पोस्टिंगनंतर चंद्रपुरात नक्षलवादी चळवळीचा पायाच रोवला गेला नाही. गडचिरोलीत वा इतर राज्यांमध्ये जसे घडले वा घडत आहे त्याची पुनरावृत्ती चंद्रपुरात मात्र झाली नाही. अजूनही गडचिरोली जिल्ह्यासारखी दुर्दैवी परिस्थिती चंद्रपुरात नाही. नक्षलवाद्यांना जबरदस्त सेटबॅक मिळाला. याचे पूर्ण श्रेय साहेबांना आहे याविषयी दुमत असूच शकत नाही. त्यातच साहेबांच्या कारकिर्दीत नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य प्लॅनचे कंबरडेच मोडले.

नक्षलवादी क्रांती रणदिवे हा दंडकारण्य प्लॅनचा म्होरक्या होता. त्याच्या व इतर साथीदारांच्या अड्ड्यांवर छापा मारल्यानंतर जे छापील साहित्य मिळाले ते खरोखरच बघण्यासारखे होते. आंध्रप्रदेशपासून मध्यप्रदेश, झारखंड, ओरिसा ते थेट बिहारपर्यंत निबिड जंगलातून नक्षलवादी साम्राज्यनिर्मितीचा, दंडकारण्याचा तो एक पथदर्शक नकाशा होता. साहेबांनी त्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करून त्याची माहिती आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यांना कळवली. योग्य व पुरेसा बंदोबस्त वाढवून ‘दंडकारण्य प्लॅन’ उघड केला व तो नकाशा फक्त कागदापुरताच सीमित राहील याची तजवीज केली.

त्यातूनच आम्हाला माहिती मिळाली की, नक्षलवादी दहशत पसरवून बल्लारपूर पेपर मिलच्या ट्रक्समधून शस्त्रास्त्रांची वाहतूक करत असत. ते ड्रायव्हर्सना, मजुरांना मारहाण करायचे; ट्रक जाळायचे. त्यांच्या भीतीमुळे वाहतूकदारांना शस्त्रास्त्रांची वाहतूक करणे भाग पाडायचे. ते लोक शस्त्रास्त्रांसह बल्लारपूरला जात नसत कारण तेथे पोलीस ठाण्यात चोख बंदोबस्त असायचा म्हणून ते चंद्रपूर स्टेशनला उतरून ऑटोने बल्लारशहाला जात. तेथे आल्यावर ही शस्त्रास्त्रे पेपरमीलची ट्रक वापरून घनदाट जंगलात पोहोचत. साहेबांना याची माहिती मिळताच त्यांनी चंद्रपूर स्टेशनवरच बंदोबस्त वाढवला व आम्हाला डोळ्यांत तेल घालून वॉच ठेवायला सांगितले. गुन्हेगार आपसूक जाळ्यात अडकले व पुढे सर्व वाहतूकच बंद झाली.

आधी ही शस्त्रे स्टेशनवर उतरवली जायची. तेथून बल्लारशहाला जायची व ट्रक्सद्वारे घनदाट अरण्यात पाठवली जायची. साहेबांना हे लक्षात येताच आधी त्यांनी नक्षलवाद्यांच्या या शस्त्रास्त्रांच्या वाहतुकीला चाप बसवला. मग नक्षलवाद्यांनी चंद्रपूरला फक्त मेडिकल एड सेंटर सुरू केले. आमनेसामनेच्या लढाईत वा स्फोटात जखमी झालेल्या नक्षलवाद्यांना त्यानंतर चंद्रपूरला आणले जाऊ लागले. डॉक्टरांना याची कल्पना नसे कारण त्यांना हे नक्षलवादी खोटंच सांगत. विहिरीचे काम करताना केलेल्या स्फोटात जखमी झालो वा तत्सम खोट्या सबबी सांगितल्या जात. मग साहेबांनी त्या डॉक्टरांना विशेषतः सर्जनला विश्वासात घेतले.

जेव्हा अधीक्षक दर्जाचा आयपीएस अधिकारी सांगतो तेव्हा त्याचा वेगळाच परिणाम होतो. मग ते डॉक्टर, असे जखमी येताच संशयित नक्षलवादी भरती झाल्याची माहिती साहेबांना देत असत. मग त्यांच्यावर पाळत ठेवत असू कारण अशा जखमींची विचारपूस करण्याकरता आलेल्या व्हिजिटर्समध्ये बरेचदा मोठे मासेही असत जे आमच्या गळाला आपसूकच लागत. अशा तऱ्हेने साहेबांनी समाजातील सर्व घटकांचा विश्वास संपादन करून नक्षलवाद्यांची चारी बाजूंनी नाकाबंदी केली.

याहून सर्वात जास्त आठवणीत राहील ती ऑक्टोबर ब्याण्णवची घटना... त्या वेळी झालेले खलिस्तान कमांडो फोर्सच्या अतिरेक्यांचे एनकाऊंटर. हे अतिरेकी पंजाब पोलिसांपासून वाचण्याकरता पळून जात असत. त्यांच्याजवळ एके-47सारखी अत्याधुनिक शस्त्रे होती. ते आग्रा महामार्गाने येऊन धुळे, जळगाव, अकोला, वर्धा यामार्गे चंद्रपुरात उतरले होते. येताना त्यांनी जागोजागी गोळीबार करून लोकांना मारले होते. धुळे, जळगाव परिसरात तर एका पेट्रोलपंपावर त्यांनी हल्ला केला होता.

असे हे खतरनाक अतिरेकी चंद्रपुरात दाखल झाले असून त्यांनी एका घरात वास्तव्य केल्याची कुणकुण अब्दुल रझ्झाक या पोलीस निरीक्षकाला लागली. ती त्यांनी साहेबांच्या कानांवर घालताच त्यांनी ताबडतोब एक मिटिंग बोलावली. त्यात निवडक माणसे घेऊन एक कृती योजना तयार केली. चंद्रपूर पोलिसांनी त्या घरावर आक्रमण करेपर्यंत आतील अतिरेक्यांना जराही कल्पना नव्हती. पोलिसांनी आव्हान देताच ते अतिरेकी आपापली शस्त्रास्त्रे उचलू लागले व त्यांचा प्रतिकार पाहताच पोलिसांनी चारी बाजूंनी गोळ्यांचा वर्षाव केला. त्यात एक अतिरेकी मारला गेला. दुसरा प्रधानसिंग कुच्चर हा जखमी अवस्थेत पकडला गेला तर तिसरा पसार झाला.

ही साहेबांची अतिरेक्यांविरुद्धची सर्वात चांगली आणि मोठी कामगिरी ठरली. पकडल्या गेलेल्या कुच्चरला पंजाब पोलिसांच्या हवाली केले तेव्हा त्यांनी तो किती खतरनाक अतिरेकी आहे यांविषयी सांगितले व साहजिकपणे त्यांनी म्हटले की, साब... इसको क्यों छोड़ दिया? (अशीच विचारणा आंध्र प्रदेशचे पोलीसही त्यांच्या ताब्यात नक्षली कैदी देताना करत.) साहेबांचा कायदेशीर प्रक्रियेवर पूर्णपणे विश्वास होता, त्यामुळे साहेबांनी त्यांना शांतपणे सांगितले की, आम्ही शिपाई आहोत, खुनी नाही. तुम्ही याला घेऊन जा व कायद्याच्या तरतुदीनुसार कारवाई करा. 15 दिवसांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये बातमी झळकली... पोलिसांच्या कस्टडीतून पळून जाण्याच्या प्रयत्नात प्रधानसिंग कुच्चर गोळीबारात ठार.

सदरील कारवाईनंतर साहेबांनी ताबडतोब इनस्पेक्टर रझ्झाक यांची गॅलेटरी ॲवॉर्डकरता शिफारस केली. साहेबांच्या काळात मी, इन्स्पेक्टर गौतम, पुरुषोत्तम चौधरी आदींना शौर्यपदके मिळाली. साहेबांचे ते वैशिष्ट्यच होते. ते दुसऱ्याचे श्रेय पूर्णपणे त्याला देत असत. याशिवाय समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी व पोलिसांबद्दल ‘आपला रक्षक’ अशी विश्वासार्हता निर्माण व्हावी याकरता साहेबांनी केलेले कामदेखील वाखाणण्यासारखे होते. महिला सुरक्षा समिती, सामाजिक सुरक्षा समिती यांच्या माध्यमातून त्यांनी जनसंपर्क वाढवला होता.

मला आठवते, त्यांनी 8 मार्च 1993 रोजी महिलादिन साजरा केला होता. दुसऱ्या दिवशी दैनिक ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीत अग्रलेख लिहून आला होता. त्याचा आशय असा होती की, मालेगाव तपासात एक अधीक्षक दर्जाच्या पोलीस साहेबांनी माझ्या जिल्हा अधीक्षकांना फोनवरती विनंती करून मला बोलावून घेतले व अत्यंत नाजूक व गोपनीय जबाबदारी सोपवली. एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याने माझ्यासारख्या कनिष्ठ अधिकाऱ्याला विश्वासाने बोलावून घेतले याचे संपूर्ण जिल्ह्यातील पोलीस दलाला अप्रूप वाटले.

मी जवळजवळ 19 वर्षे चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा इत्यादी नक्षलग्रस्त भागांत काम केले पण पुन्हा एकदा माझी बदली गोंदियाला झाली. मुलांच्या शिक्षणाच्या व इतर घरगुती अडचणींमुळे मला गोंदियाला जायची इच्छा नव्हती, त्यामुळे मी मुंबईला जाऊन प्रयत्न करायचे ठरवले... पण मला माहीत होते की, तेव्हाचे प्रशासन विभागाचे प्रमुख अत्यंत कडक असल्याची व कुठलीही शिफारस ऐकत नाहीत अशी ख्याती होती... त्यामुळे त्यांच्याकडे कसे जावे या विचारात असताना मी एका आयजी साहेबांकडे गेलो. देव भेटल्यासारखे नेमके त्या वेळी करकरे साहेब तेथे आले. मला पाहताच त्यांनी आपुलकीने चौकशी केली. माझी अडचण खरी असल्याचे त्यांना लगेच जाणवले. समोरच्या आयजींकडे त्यांनी पाहिले तेव्हा तेदेखील करकरे साहेबांना डोळ्यांनी जणू सुचवत होते की, तुम्हीच काही करू शकता. साहेबांनी मला सांगितले, ‘पाहतो प्रयत्न करून पण तुम्ही टेंशन घेऊ नका.’

माझा अर्ज घडीदेखील न करता त्यांनी उचलला आणि म्हटले, तुम्ही इथेच थांबा. मी आलोच. अर्ध्या तासाने ते परत आले व मला सांगितले की, तुमची विनंती मान्य झाली आहे. थोड्याच वेळात मला फोन आले व सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केले की, करकरे साहेब तुमच्या बदलीकरता स्वतः कसे काय बोलले? व केवळ त्यांनी सांगितले म्हणून तुमची बदली गोंदिया सोडून दुसऱ्या ठिकाणी झाली आहे. खरोखर इतक्या वर्षांनंतरदेखील आपल्या एका जुन्या कनिष्ठ सहकाऱ्याच्या अडचणी जाणून घेणारे व शक्यतो त्या सोडवण्याचा प्रयत्न करणारे करकरे साहेब हे एकमेवाद्वितीय.

26 नोव्हेंबरला जेव्हा ती बातमी आली तेव्हा हृदयाचा ठोकाच चुकला, विश्वासच बसेना... वाटले, 'साहेब... एवढे सिस्टीमॅटिक, प्लॅनिंगने काम करणारे अधिकारी, असे कसे होईल? बातमी चूक असावी!' परंतु दुर्दैवाने बातमी खरी ठरली. साहेब देशाकरता सर्वोच्च बलिदान करून निघून गेलेत. पोलीसदलात एक मोठी पोकळी निर्माण करून आणि आमच्यासारख्या असंख्य कनिष्ठ लोकांना पोरकं करून.


लोकांशी वागण्याची साहेबांची पद्धत

(श्री. गौतम, रिटायर्ड ॲडिशनल सुपरिटेंडंट ऑफ पोलीस ॲन्टीकरप्शन ब्युरो, नागपूर यांचं पत्र)

साहेब आमचे बॉस होते... मात्र आम्ही सांगितलेल्या गोष्टींवर त्यांनी कधी डोळे मिटून विश्वास ठेवला नाही. ते अतिशय प्रेमाने कनिष्ठांच्या तक्रारी ऐकत. त्यांच्या शिफारसी ऐकत पण त्यांनी कधीही शिस्तीमध्ये तडजोड केली नाही. समोरच्या व्यक्तीवर अविश्वास दाखवणं त्यांच्या स्वभावात नव्हतं परंतु लोकांना ओळखण्याची, त्यांच्याबरोबर काम करण्याची, त्यांची म्हणून एक वेगळी पद्धत होती. करकरे साहेबांबरोबर काम करताना कामाचं समाधान तर मिळालंच... शिवाय एक वेगळाच आनंद मी अनुभवला.

जंगलातलं (चंद्रपूरचं) युद्ध फारच कष्टाचं होतं. शत्रू दिसत नसे. एकेकट्याला त्या निबिड अरण्यात हाणामारी करावी लागे. कधी टीमबरोबर असे. त्या काळात कुठलीही आधुनिक उपकरणं म्हणजे अगदी मोबाईल फोन, शस्त्रास्त्र, जमिनीत दडवून ठेवलेले सुरुंग शोधण्याचं यंत्र असलं काहीही उपलब्ध नव्हतं. अशा अत्यावश्यक सुविधा नसतानाही जर वरिष्ठ अधिकारी यांनी कामावर टीका केली तर मी चिडत असे. मला वाटायचं किती मोहिमांत आम्ही आमचा जीव धोक्यात घालतो. मृत्यू पाठीशी असताना अतिशय शौर्याने लढतो, मात्र हे अधिकारी हस्तिदंती मनोऱ्यातून आमच्या कामाकडे बघतात. करकरे साहेब मात्र त्यांच्या ऑफिसमध्ये असतानाही ही परिस्थिती अचूक जाणत म्हणून मला कधी वाटलं नाही की, ते कारणाशिवाय किंवा तर्काशिवाय टीका करतात.

मला 26/11ची बातमी रात्री साधारण दीड वाजता कळली. माझ्या एका सहकाऱ्याचा फोन आला. मला ती बातमी ऐकणंही कठीण झालं. मी गोठून गेलो.


साहेबांनी आमची बाजू कधी सोडली नाही

(डॉ. पुरुषोत्तम चौधरी, पोलीस सेवानिवृत्त डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ पुलीस. प्रेसिडेंट पारितोषिक विजेते. पीएसआय (सीआयडी ब्रँच इंटेलिजन्स युनीट) हे पप्पांचे चंद्रपूरमधील अत्यंत विश्वासू मदतनीस. ते खूपच भावनावश झाले. त्यांना पप्पांबद्दल बोलणंही कठीण झालं. त्यांचं हे पत्र) 

पहिल्या दिवशी जेव्हा करकरे साहेबांनी चंद्रपूर येथील पोलीस सुपरिटेंडंट म्हणून ताबा घेतला तेव्हा बारा वाजले होते. त्याच वेळी त्यांना बाबूपेठ कोळशाच्या खाणीत पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक उडाल्याची बातमी कळली. पटकन साहेब तिथे पोहोचले. त्यांना कुविख्यात शेखरअण्णा आणि एक मुलगा मारला गेल्याचं कळलं. नक्षलवाद्यांचा हल्ला होईल याची त्यांना कल्पना नव्हती पण आश्चर्य वाटून न घेता त्यांनी लगेच कामाला सुरुवात केली. माझी, त्यांची त्या वेळेपर्यंत भेट झाली नव्हती पण या प्रसंगानंतर त्यांनी ताबडतोब मला गावाबाहेरच्या कोळशाच्या खाणीजवळ भेटायला बोलावलं. त्यांनी माझं नीट निरीक्षण करून माझं कामातलं कौशल्य, कार्यक्षमता जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी मी ऑपरेशन आणि इंटेलिजन्स या दोन्ही ठिकाणी काम करत होतो. त्यांनी त्यांच्या पद्धतीने माझ्या कामावर लक्ष ठेवलं. 

कधी नक्षलवाद्यांविरुद्ध मोहिम तीन-तीन दिवस सतत चालू असे... पण साहेबांनी आमची बाजू कधी सोडली नाही. ते सतत आमच्याबरोबर राहून जंगलात ज्या अडचणी, संकटं येतात ती जाणून घेण्याचा प्रयत्न करत. ते टीममधल्या प्रत्येकाकडे लक्ष पुरवत. आम्ही आमच्या मोहिमेतून परतताना अगदी शेवटचा माणूस परतेपर्यंत ते थांबून राहत. फारच थोडे अधिकारी असे असतात. ते जातीनं लक्ष ठेवून, आमच्या विनंतीनुसार टीममधल्या प्रत्येकाला शस्त्रास्त्र वापरण्याची परवानगी देत.

सर्वात कनिष्ठ अधिकारी जरी असला तरी त्याच्या अडचणी जाणून त्या दूर करण्यासाठी मदत करत. त्यांनी सगळ्यांना आखून दिलेल्या कामातून, त्यांचं अगदी बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष असलेलं दिसे. आम्हीही यातून त्यांची कामाची पद्धत त्याचं नियोजन हे शिकलो. उदाहरणार्थ, ते टीममधल्या प्रत्येकाला जंगलातून परतताना लाकडाचा तुकडा आणायला सांगत. त्यावरून त्यांना ती व्यक्ती खरंच जंगलात गेल्याचं कळे... शिवाय त्या व्यक्तीला नक्की कुठं तो तुकडा सापडला ते विचारत. बांबूचा आणि सागवानाचा तुकडा आणायलाही ते सांगत. ही झाडं जंगलात अगदी खोलवर असतात. 

ते सहसा त्यांचा राग दाखवत नसत. जेव्हा ते एखाद्याला मूर्ख म्हणत तेव्हाच आम्हाला ते रागवल्याचं समजे. कुणालाही त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून त्यांच्या मनात काय चाललंय याचा थांग लागत नसे. त्यांचा चेहरा शांत असे. त्यावर कधीही मनातली खळबळ दिसत नसे.

मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासणीच्या निमित्ताने साहेबांचे नाव खूप लोकांकडून चर्चेत आले. बहुसंख्य समाज जाणून होता की, ते किती विश्वासार्ह अधिकारी आहेत. मीपण या तपासाचा सीआयडी नागपूर विभागाचा भाग होतो. माझा माझ्या स्वतःवर जेवढा विश्वास आहे त्यापेक्षा त्यांच्यावर जास्त आहे. मला पूर्ण खातरी आहे, विश्वास आहे की, त्यांचा निर्णय हा मिळवलेल्या योग्य पुराव्यांवर आणि कारणमीमांसेवर आधारलेला आहे. माझा त्यांच्यावरील विश्वास इतक्या वर्षांत जराही ढळला नाही. केवळ खोटे पुरावे गोळा करून एखाद्याला धाकदपटशानी गुन्हा कबूल करायला लावण्यातले ते नव्हते हे मला पक्कं ठाऊक आहे. अगदी कसून चौकशी केल्यानंतरही साहेब कधीही आम्हाला विचारायला विसरले नाहीत की, खरंच तिथे शस्त्र सापडलं होतं ना...! 

ते नेहमी म्हणत, कारणाशिवाय कुणालाही त्रास देऊ नये. ते आम्हाला नेहमी सांगत, या नक्षलवाद्यांकडे नजीकच्या काळासाठी आणि भविष्यासाठीही आराखडे आहेत. त्यांच्या या नजीकच्या काळाच्या मोहिमांसाठी आपल्याला खबऱ्यांचं जाळं तयार करायला हवं. या नक्षलांच्या चालू हालचालींची माहिती गोळा करणं, पोलिसांना नवीन शस्त्रास्त्रं पुरवून सज्ज करणं आणि या नक्षलांचे आणि राजकारणी लोकांचे परस्परसंबंध शोधून, पोलिसांचं नैतिक धैर्य वाढवण्यासाठी जास्त सुरक्षा देणं या सर्व गोष्टींवर त्यांचा भर होता... तर दीर्घ काळातल्या नियोजनाबद्दल लोकांमध्ये जागृती घडवून आणणं; सार्वजनिक सभा घेऊन लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं; खेड्यातल्या या समाजाला संरक्षण देणं आणि त्यातून नक्षलवाद्यांना असलेला लोकांचा पाठिंबा कमी करून, खेड्यातल्या स्थानिक लोकांच्या मनात पोलिसांबद्दल विश्वास, सहानुभूती निर्माण करणं या गोष्टी अंतर्भूत होत्या.

त्यांची कामाची पद्धत आगळीवेगळी होती. नक्षल भागातल्या खेड्यातल्या स्थानिक लोकांशी जोडून घेण्यासाठी ते त्यांच्या मुलांना कपडे वाटत, खाऊ वाटत. आम्हाला गस्त घालतानाही बरोबर गोळ्या, बिस्किटं वापरण्याची सूचना होती. आम्हाला कल्पना होती की, पोलिसांना गस्त घालताना बघून स्थानिक लोक पळून जात असत. करकरे साहेबांनी त्यांचं मन जिंकण्याचं आम्हाला आवाहन केलं. जर आम्हाला कधी जंगलातून काही वस्तू या आदिवासींकडून घ्यायच्या असतील तर त्याचे पैसे वस्तूच्या किमतीपेक्षा जास्त देणं आणि कधीही खाण्याचे प्रकार इतर काही त्यांच्याकडून बळजबरीनं न घेणं याची सक्त ताकीद साहेबांनी दिली होती. फक्त ते त्यांच्या इच्छेनं देत असतील तर गोष्ट वेगळी.

एखाद्या घटनेची बातमी कळली की, ते शस्त्रास्त्रांसह पूर्ण तयारीनिशी घटनास्थळी धावत. आम्ही याचा अनुभव 1992मध्ये घेतला आणि आता 26/11च्या हल्ल्यातही तेच दिसलं.

एकदा आमची टीम जंगलात नक्षलवाद्यांच्या मागावर होती. आम्हाला त्यांच्यावर अचानक हल्ला करायचा होता. आमचा हा हल्ला पार पडल्यानंतर माघारी परतताना एक जण परत आला नाही हे साहेबांच्या लक्षात आलं. ते लगेच त्या पर्वताकडे गेले. सगळीकडे शोध घेतला. शेवटी एका झाडाच्या ढोलीत तो हवालदार भीतीनं घाबरून बसला होता. त्यानी या मोहिमेत भाग घेतला नव्हता. त्यानंतर साहेबांनी त्याला निलंबित केलं.

दुसरी महत्त्वाची आठवण त्या काळातली सईद नाझीरची. सईद त्याच्या कुटुंबासह माणिकगड पर्वतावर राहत होता. लहानपणापासून हा सईद छोटा व्यापारी म्हणून ओळखला जात होता. त्याचा उद्योग म्हणजे घनदाट जंगलातल्या खेड्यात जाऊन तिथून आदिवासी जमातीकडून गोंद मिळवणं आणि तो मोठ्या व्यापाऱ्यांना विकणं... त्यामुळे त्याला या घनदाट जंगलातले रस्तेन्रस्ते माहीत होते.

माणिकगड हा भाग नक्षलवाद्यांचा भक्कम बालेकिल्ला होता. तिथे राहणारे लोक यांच्याशी सलोख्याचे संबंध राखून होते. त्या वेळेला या नक्षलवाद्यांनी महाराष्ट्र सरकारमधील तीन इंजिनिअर्सचं अपहरण करून त्यांना सोडवण्यासाठी फार मोठ्या रकमेची मागणी केली पण नंतर त्यांना सोडलंही. या तिघांना त्या गडावरून खाली येण्यास सईदनी मदत केली. त्यानंतर हे नक्षलवादी काही कारणानं सईदवर नाराज झाले. त्यांनी याच्या भावावर प्राणघातक हल्ला करून तो मेलाय असं समजून त्याला जंगलात सोडलं, मात्र तो त्यातून वाचला आणि वीस जणांच्या या कुटुंबानी लगेच रातोरात आपलं राहतं घर सोडलं. त्यांना सर्व काही मागे सोडावं लागलं.

या सर्व प्रकारामुळे सईद संतापला. त्याच्या मनात सुडाची भावना जागृत झाली, मात्र याबाबतीत तो पोलिसांकडे जाण्यास तयार नव्हता. त्यांनी पूर्वी पाहिलं होतं की, खेडुतांनी पोलिसांना नक्षलांच्या हालचालीची बातमी दिली तरी पोलिसांकडून काही घडत नसे. यामुळे त्याचा पोलीस खात्यावर विश्वास नव्हता. जेव्हा मला सईदचा ठाव-ठिकाणा कळला तेव्हा त्यानं पोलिसांच्या मोहिमेत सामील व्हावं म्हणून मी त्याच्या मागे लागलो. करकरे साहेबांनी ज्या पद्धतीनं त्याच्या मनात विश्वास उत्पन्न केला, त्यामुळे सईदला आमच्या बाजूला वळवणं शक्य झालं.

साहेबांनी या संधीचा फायदा घेऊन सईदच्या मदतीनं नक्षलवाद्यांची माहिती गोळा करून त्यांना पकडलं. ठार मारलं पण यामुळे काही राजकारणी संतापले कारण त्यांचे या नक्षलांशी असलेले लागेबांधे. त्यांनी गावकऱ्यांवर दडपण आणून सईदच्या अटकेची मागणी करायला लावली. सईदनं नक्षलांशी संबंध तोडल्यावर लगेच तो राजकारण्यांच्या काळ्या यादीत गेला. लगेच त्याला बेकायदेशीर ठरवून त्याच्याबद्दल भ्रामक बातम्या वर्तमानपत्रातून छापल्या जाऊ लागल्या पण यामुळं नक्षल आणि राजकारणी याचं असलेलं साटंलोटं यावर प्रकाश पडला.

जेव्हा सईदला पकडण्यात आलं तेव्हा करकरे साहेबांनी त्याच्या कुटुंबाची जबाबदारी घेतली. ते म्हणत, सईदने आपल्याला अतिशय महत्त्वाची बातमी पुरवून मदत केलीय. त्याच्या बदल्यात आपण त्याच्या कुटुंबीयांना मदत करायला हवी. त्यानुसार पोलिसांनी या कुटुंबाला मदत करण्याची जबाबदारी घेतली. या सगळ्या घडामोडींत नजीकच्या काळातलं आणि दूरच्या काळातलं साहेबांचं नियोजन याचा अनुभव आला. सईदला तुरुंगवास झाला पण आम्ही त्याच्या कुटुंबीयांना मदत केल्याने आम्ही लोकांचा विश्वास, पाठिंबा गमावला नाही. पोलिसांची प्रतिमा जनमानसात आदराची राहिली. ही सगळी करकरे साहेबांची रणनीती. ती त्यांनी यशस्वीपणे कृतीत उतरवली. सईदच्या या प्रकरणाच्या वेळी हे नक्षलवादी त्यांचा एक वेगळा गट निर्माण करण्याच्या विचारात होते. साहेबांनी हा बेत उधळून लावला.

साहेब नेहमी म्हणत, बंदुकीनं गोळी मारणं हा काही नक्षलवादावर उपाय नाही. मग ते नक्षलवादी असोत नाहीतर आतंकवादी. हे लोक अतिरेकी विचारांचे असतात. त्यांची-त्यांची म्हणून एक मानसिकता असते. आपला देश या गंभीर समस्येला तोंड देत असताना आपण जर त्यांना बंदुकीनं मारलं तर त्यातून आणखी शत्रूच निर्माण होतील. अशा तऱ्हेची मानसिकता होण्यामागे समाजातले कुठले घटक त्याला कारणीभूत आहेत हे प्रथम शोधायला हवं. एकदा का याच्या मुळाशी आपण गेलो तर त्यांची विचारसरणी, तत्त्वज्ञान जाणून त्याचा सामना करता येईल असा साहेबांचा विश्वास होता. गावकरी यांच्यामध्ये का असतात? केवळ भीतीपोटी की नक्षली त्यांना काही मदत पुरवतात? जनजागृतीसाठी मोहीम उभारली. या गावकऱ्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून सहकार्य मिळावं म्हणून पोलिसांचं संरक्षण युनीट स्थापन केलं. ते नक्षलवाद्यांच्या थेट  मुळाशी गेले. तो प्रश्न समूळ उपटून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात झालेल्या मोहिमेत असामान्य शौर्य दाखवलं.

दोन वर्षं संपली. त्यांच्या बदलीचा हुकूम आला. साहेब सोडून गेले. नक्षलवाद्यांची चळवळ चंद्रपूरहून उखडली गेली याचं श्रेय त्यांचंच. त्या दिवसापासून नक्षलवादी तिथे तळ उभारू शकले नाहीत. हा नियतीनी त्यांना दिलेला दगाच आहे की, जे इतक्या शौर्याने नक्षलवाद्यांशी लढले. त्यांना आतंकवाद्यांच्या गोळीला बळी पडावं लागलं.


माणुसकीने वागणारा कर्तव्यकठोर अधिकारी
(पप्पांचे मित्र मनोहर सप्रे यांचं पत्र)

हेमंत करकरे अलौकिक पोलीस अधिकारी होते. अतिशय उच्च पदावर पोहोचूनही त्यांचे पाय मात्र जमिनीवर होते. त्यांच्यात प्रशासकीय कौशल्य दाखवण्याची विलक्षण ताकद होती पण मला वाटतं, पोलीस खात्यातल्या ‘खेकडा संस्कृती’मुळे त्यांना तशी संधी मिळाली नाही. ते अस्वस्थ होते. ते सतत त्यांच्या व्यवसायातल्या आव्हानांचा विचार करण्यात मग्न असत. 

चंद्रपूरचा रहिवासी म्हणून मी याआधीच्या एकाही एसपींना भेटलो नव्हतो पण करकरे यांच्याशी माझे अगदी जिव्हाळ्याचे, जवळचे संबंध जुळून आले... ते माझी पुस्तकांची लायब्ररी आणि आर्ट गॅलरी यांमुळे ते माझ्याकडे ओढले गेले. आमच्या तारा जुळल्या आणि हळूहळू आम्ही एकमेकांना अधिकाधिक चांगले ओळखू लागलो. चंद्रपूरचे एसपी हे संवेदनशील पद होते, त्यामुळे त्यांना समाजापासून दूर, वेगळं राहायला हवं होतं. त्या दृष्टीने ते त्यांच्या नोकरीचे गुलाम होते.

त्यांच्यातील वेगळेपण म्हणजे प्रत्येकाचा उल्लेख ते आदराने करत. अगदी शिपायापासून त्यांच्या सहकाऱ्यांपर्यंत. त्यातून त्यांची मानवता, त्यांच्या मनातली समता, न्याय या गोष्टी प्रकट होतात.

पोलीस खात्यात कॅन्सरसारखा पसरलेला लाचखोरपणा, त्याची आमिषं... पण करकरे याला कधीही बळी पडले नाहीत. ते अत्यंत प्रामाणिक अधिकारी होते. इथलं हे वातावरण बदलण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आपल्याभोवती कशा तऱ्हेचे, कोण लोक असावेत याबाबतीत ते अतिशय चोखंदळ होते.

करकरे यांनी त्यांचे सहकारी, कर्मचारी यांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी पुढाकार घेऊन काम केलं. त्यांना कुठल्याही प्रकारचं पद मिळालं तरी त्यांनी त्या ठिकाणी जाऊन काम करून आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं. पुढे जाताना आपल्या कर्तृत्वाचा झगझगीत ठसा उमटवत पुढे गेले. त्यांनी चंद्रपूरला अनेक सामाजिक मोहिमा हाती घेतल्या. तळमळीने काम करून त्या उत्कृष्टपणे राबवल्या. त्यांनी त्यांच्या ऑफिसच्या परिसरात पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय करून दिली. पोलीस स्टेशनच्या भोवताली मुबलक झाडं लावण्याची मोहीम सुरू केली. अशा तऱ्हेच्या कामासाठी ते संबंधित प्रमुखाशी विचारविमिनय करत.

करकरे नेहमी म्हणत, या विभागानं जी काही पद्धत घालून दिली आहे ती आपण बदलू शकत नाही... पण आपल्या अखत्यारीत सकारात्मक बदल तर घडवू शकतो. त्यांचे सहाध्यायी, हाताखाली काम करणारे कर्मचारी यांनी कामाच्या ठिकाणी काही बदल सुचवले तर त्यांना प्रोत्साहन देत. त्याला मान्यता देत. हळूहळू त्यांना प्रवाहाबरोबर किनाऱ्यावर वाहून आलेल्या लाकडातून कलाकृती करण्याचा छंद जडला आणि त्यांनी त्यात प्रावीण्य मिळवलं. यातून त्यांची कलेबरोबर बांधिलकी निर्माण झाली. मनाचा अधिक विकास झाला. मी त्यांना विविध विषयांची पुस्तकं वाचायला सुचवत असे. त्यांना त्याचं कौतुक वाटे. अगदी अधाशासारखी ते पुस्तक वाचत.

आम्ही नेहमी भेटून वेगवेगळ्या विषयांवर सविस्तर चर्चा अगदी रात्रीअपरात्रीपर्यंत करत असू. तसे ते शब्द मोजूनमापून वापरणाऱ्यातले. त्यांचं हसणंही मर्यादित होतं. जमलेल्या मेळाव्यात ते कधी वाहून जात नसत. त्या अर्थानं ते एकटे होते. एखाद्याबरोबर एखादा कप चहा घ्यायला त्यांनी कधी नाही म्हटलं नाही तरी कुठल्याही लाचलुचपतीच्या जाळ्यात ते कधी पडले नाहीत. एकदा त्यांच्या बरोबरीच्या माणसानं खूप मोठ्या रकमेचं आमीष दाखवून त्यांना मोहात पाडण्याचा प्रयत्न केला. मला अजूनही करकरे यांचे शब्द आठवतात. ते म्हणाले, ‘‘मी तुम्हाला ओळखत असल्याने मला उद्धटपणा करायचा नाही. मी तुम्हाला विनंती करतो, कृपा करून इथून तुम्ही निघून जा... नाहीतर मी तुम्हाला ॲरेस्ट करीन.’’

त्यांच्यावर वडिलांच्या मार्क्सवादी विचारांचा पगडा होता. ते विचार मनात खोलवर रुजले होते... पण त्याचा अतिरेक नव्हता. त्यांचा कल सामाजिक न्यायाकडे होता. त्यासाठी पूर्ण ताकदीनी, उत्साहानी त्यांनी काम केलं. वरवर ते कठोर वाटत असले तरी ते आतून प्रेमळ होते. त्यांनी स्वतःला कामात पूर्णपणे गुंतवून घेतलं होतं. मुंबईच्या 26/11च्या हल्ल्यातसुद्धा ते आघाडीवर होते. त्यांच्या बलिदानानं त्यांच्या कार्यावर पडदा पाडला.

समाजासाठी चांगलं काही करण्याची वृत्ती, नवनवीन गोष्टींतून ज्ञान संपादन करण्याची इच्छा, उत्सुकता हे सर्व घेऊनच करकरे जन्माला आले होते. मला नेहमी वाटायचं की, ते सामाजिक संशोधनाच्या कामासाठी योग्य होते. तोच त्यांच्यासाठी योग्य मार्ग असावा.


पप्पांनी सप्रे यांना लिहिलेलं एक पत्र 

24 जुलै 2000

मित्रवर्य श्री सप्रेजी,
सरतेशेवटी हान सुईन (Han Suyin) यांचं आत्मचरित्र वाचलं. तुम्ही वारंवार सुचवूनही मी हे पुस्तक वाचू शकलो नव्हतो याचा मला खेद वाटत होता. चिनी लोकांचं अंतरंग जाणून घेण्यासाठी मी हे वाचावं हे तुम्ही सुचवत होतात... म्हणून मला वाटतं, आता पत्र लिहून माझी प्रतिक्रिया तुम्हाला कळवावी. तिच्या या कादंबरीत तिचे अंतर्बाह्य असे दोन्ही संघर्ष आहेत. तिच्या अडतीस वर्षांच्या सावत्र मुलाच्या अकस्मात आलेल्या, त्याला कमजोर करणाऱ्या दुखण्याला सामोरं जाताना कुटुंबात झालेली भावनिक उलथापालथ; भारतीय कुटुंबासारखीच असलेली या कुटुंबाची जवळीक या साऱ्याचं हे चित्रण.

एकत्र कुटुंब पद्धतीचं विघटन होण्याच्या काळात परस्परांमधला घट्ट प्रेमसंबंध आणि त्याबरोबर कर्मावर विश्वास ठेवणारा खास भारतीय विचार. ती गोष्टीचं निवेदन अगदी साध्यासरळ भाषेत करते... कुठल्याही उपमा, अलंकार न वापरता किंवा तिच्या भावनांचं स्पष्टीकरण न देता. त्यासाठी तिला स्वतःची लाजही वाटते परंतु त्यातून ती स्वतःशी आणि वाचकांशी प्रामाणिक आहे हे कळतं.

मला हे सांगावंसं वाटतं की,  हान सुईननं जे लिहिलंय ते फक्त चिनी माणूस समजून घेण्यापुरतं मर्यादित नाही. खरंतर संपूर्ण मानवजातीला समजून घेण्यासाठी आहे. तिने जी सर्वव्यापी भावनेची तार छेडलेय ती प्रत्येकातच असते. मला वाटतं लिखाण हे राष्ट्र, संस्कृती यांच्या सर्व सीमा पार करतं. उदाहरणार्थ, अमृता प्रीतम हिचं तिसरं लग्न हे भारतीय माणसाशी होतं ही वस्तुस्थिती. या पुस्तकात त्यातून आलेली माहिती, संदर्भ माझ्यासाठी जास्तच आनंददायी आणि लक्षवेधक आहेत. आणि हो... या पुस्तकाचं नाव ‘Destination Chung King’ हे 1987 साली प्रसिद्ध झालेलं, ज्या वेळी ही लेखिका साठ वर्षांची होती. तेव्हा तिला असं पुस्तक लिहावंसं वाटलं हा माझ्या मते तिच्यासाठी भावनांना वाट काढून देणारा मार्ग होता.

- हेमंत करकरे

(पप्पांनी मनोहर सप्रे यांना लिहिलेलं पत्र त्यांनी आम्हाला दिलं. त्यांनी ते व्यवस्थित फाईल करून ठेवलं होतं. पप्पांना हान सुईन या नव्या लेखकाचा शोध लागल्यामुळे आनंद झाला. सप्रे यांनी हे पुस्तक सुचवल्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांनी ताबडतोब पत्र लिहून आपली कृतज्ञता व्यक्त केली होती. पप्पांची चंद्रपूरहून बदली झाल्यानंतर पाच वर्षांनंतरची ही घटना. पप्पांचा आणि सप्रे यांचा नियमित संपर्क नव्हता तरी त्यांनी वेळ काढून हे पत्र लिहिलं. पप्पांना नेहमीच आयुष्यातल्या चांगल्या, सुंदर गोष्टींचं; चांगल्या संगीताचं; कवितांचं; कलांचं; पुस्तकाचं कौतुक होतं. त्यांनी गुन्हेगारांशी सामना करतानाही आपली कलात्मकता, वेगवेगळ्या कलांबद्दलची आवड जपली, जोपासली. जीवन कसं छान जगायचं हे पप्पांना माहीत होतं. त्यामुळे मला नेहमी वाटायचं की, मृत्यूलाही त्यांना गाठायला वेळ लागेल.)

(अनुवाद: शोभा चित्रे)

- जुई करकरे - नवरे
jui.navare@gmail.com


वाचा 'माझे पप्पा हेमंत करकरे' या लेखमालेतील इतर भाग 

मुंबईतले ते भीषण तास...

शेवटचा प्रवास...

हेवा वाटावा असे वीरमरण...

संकटसमयी सगळ्यांच्या पुढे उभा राहून लढणारा धैर्यधर...

बुलेटप्रुफ जॅकेटचा अपशकुन

हौतात्म्यामागची आजन्म तपश्चर्या

कुटुंबवत्सल माणूस

चंद्रपूरचं आव्हान

Tags: लेखमाला जुई करकरे जुई करकरे - नवरे माझे पप्पा : हेमंत करकरे मुंबई दहशतवादी हल्ला 26/11 अँटी टेररिझम स्क्वॉड दहशतवाद विरोधी पथक एटीएस हेमंत करकरे भाग 10 Marathi Series Jui Karkare Majhe Pappa : Hemant Karkare My Pappa : Hemant Karkare Hemant Karkare: A Daughter's Memoir Part 10 Jui Karkare- Navare Load More Tags

Comments:

संजीवन

शहीद हेमंत करकरे यांची चंद्रपुर येथील कामगीरी दोन लेखांत मांडणे अतिशय योग्यच आहे.आमच्यासारख्या वरवर(casual)वाचकांना पोलीस खात्यातील कामाच्या पद्धतीची साध्या सोप्या भाषेत ओळख या लेखमालीकेच्या नायकाच्या सहकार्यांनी करून दिल्याबद्दल धन्यवाद.

सॅदीपकुमार जाधव

माझ्या मनात कायम घर केलेला माणूस म्हणजे आपले करकरे साहेब तुमच्या लिखाणातील काही टीप वहीत लिहून काढले आहेत ज्यांचा उपयोग माझ्या मुलाला होईल .

Add Comment